Saturday, November 11, 2023

🛑आली दिवाळी

 🛑 दिवाळ सण आला

          दरवर्षी दिवाळी सण येतो. प्रत्येक वर्षाला नवीन आकर्षण असते. तो येतो तेव्हा उत्साह घेऊनच येतो. माणसं तीच असतात, त्यांच्यात उत्साह मात्र नवीन येत असतो.

          शाळांना सुट्ट्या लागतात. दिवाळीची सुट्टी हिवाळी सुट्टी म्हणून देण्यात येते. यंदा हिवाळी सुट्टीत हिवाळा जाणवताना दिसत नाहीय. नोव्हेंबर आला तरी गारवा, थंडी कुठे अनुभवायला मिळताना कठीणच झालेली दिसते आहे. कपाटातील स्वेटरे तशीच पडून आहेत.

          उद्या नरक चतुर्दशी. अनेक ठिकाणी नरकासुराचे मोठाले देखावे मांडले जातात. स्पर्धा भरवल्या जातात. अगडबंब राक्षस जाळले जातात. भावना महत्वाची असल्याने सगळेच त्यात सहभाग घेताना दिसतात.

          सकाळी लवकरच फटाक्यांच्या अतिशबाजीने जाग येते. शहरात रात्री बारा वाजल्यानंतर फटाके सुरु होतात, ते सकाळी दिसू लागले तरी वाजतच असतात. कानठळ्या वाजवणारे बॉम्ब बोंब मारत असतात. रोशनाईने शहरे झगमगून उठतात. लोकांच्या रोमारोमात चैतन्य संचारु लागते. तेही त्या आवाजाचा एक भाग बनून जातात.

          अभ्यंग स्नान करताना सुगंधी उटण्याचे सार्थक होते. अंग सुगंधाने दरवळू लागते. गरमागरम पाण्याचा शिडकावा अंगावर घेताना शहारे येतात. नवीन फोडलेला सुगंधी साबण अंगावर चोळताना पूर्वीची दिवाळी आठवून शहाऱ्यांची संख्या वाढत जाते.

          बाहेर पेटणाऱ्या पणत्या, आकाशकंदील हसत हसत नव्या दिपवर्षाचे स्वागत करताना अधिक सुंदर दिसू लागतात. आईने केलेल्या फराळाचा वास तोंडात पाणी आणू पाहत असतो. नवीन खरेदी केलेले कपडे आज घालताना खूप मस्त वाटत असते. कांदेपोहे, चकल्या, करंज्या आणि लाडवांची ताटे समोर येऊ लागतात. फराळ खाण्याचा अतिआग्रह केला जातो. हे खाऊ कि ते खाऊ असे होऊन जाते. गोड पदार्थांपेक्षा तिखट व कुरकुरीत पदार्थांचा फडशा पाडला जातो.

          जवळच्या मंदिरात काकड आरती सुरु होते. अजित कडकडे आणि सुरेश वाडकरांची गाणी कानांना तृप्त करु लागतात. परिवारासह मंदिरात जाताना वाटेतले विविध प्रकारचे आकाशकंदील, आकर्षक रांगोळ्या पाहताना मनाला अपार आनंद होऊ लागतो.

          तुळशी वृंदावनासमोर कडू कारेटांची फोडलेली रांगोळी दिसू लागते.



Friday, November 10, 2023

तुम्ही लिहित आहात का ?

 🔴 तुम्ही लिहित आहात का ? 

          हल्ली बरेच दिवस काहीतरी लिहावं असं वाटतंय !!! खरंच , लिहावं आणि मोकळं व्हावं असं वाटत असेल प्रत्येकालाच. पण वेळ कुठे मिळतोय लिहायला ? लिहायला सुचतंय खूप. लिहायला बसायला वेळ कसा तो मिळत नाही. 

          लिहायला बसलो कि काहीतरी काम समोर येऊन उभं राहतं. मग तेच काम महत्त्वाचं वाटतं. लिहिणारा मग ते काम करण्यात दंग होतो. लिहिणं राहूनच जातं. माझं हल्ली अगदी असंच होतंय. 

          मघाशीच माझा एक लेखक मित्र भेटला. त्याने आपली गाडी काहीशी स्लो केली. त्यालाही गडबड होतीच. तरीही त्याने मला हाच प्रश्न विचारला , " अरे प्रवीण , तू लिहितो आहेस ना ? " मी त्याला माझ्या कामांची यादी पुढे केली. त्यालाही ते पटलं. तो म्हणाला , " तुझं म्हणणं अगदीच बरोबर आहे मित्रा , पण तू तुझं लिहिणं सोडू नकोस " त्याच्या म्हणण्यात तथ्य होतं. मी त्याचं ते म्हणणं गंभीरपणे घेतलं आणि लिहायला सुरुवात केली. 

          माणसाने आपल्या जगण्यात आवडीच्या गोष्टी केल्या नाहीत , तर त्याचं जगणंच निरस होऊन जातं. मला वाचनाची आवड आहेच , पण त्याहीपेक्षा लेखनाची अधिक आवड आहे. मी एकदा लिहायला बसलो कि थांबता थांबत नाही. माझा लेख पूर्ण होईपर्यंत व्यत्यय आला नाही तर मी माझं भाग्यच समजतो. पण व्यत्यय आला नाही असं होतच नाही मुळी. 

          मी एक शिक्षक आहे. शिक्षकाने जसं सतत वाचत राहायला हवं , तसंच त्यानं प्रसंगानुरुप लिहीत सुद्धा राहायला हवं. लिहायला वेळ मिळत नसेल तर वेळ काढायला हवा. तुमच्या मनात आलेले विचार व्यक्त करायला हवेत. एकदा का तुमची लिहिण्याची सवय गेली की पुन्हा तुम्हाला लिहिताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल. 

          लिहिता म्हणजे तुम्ही नक्की काय करता ? तर तुमच्या मनातील विचारांना वाट करुन देत असता. एकदा विचार सत्यात प्रकटले की तुम्ही तुमच्या विचारांना योग्य दिशा मिळालेली असते , विचारांचा निचरा झालेला असतो. अन्यथा विचारांचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही. 

          तुमचे अनमोल विचार वाचण्यासाठी अनेक वाचक उत्सुक असू शकतात. त्या वाचकांची तहान भागवणे हेही तुमच्या लेखनाचे ध्येय असू शकते. तुम्ही स्वतः ताणतणावमुक्त होऊन जाता ही गोष्ट वेगळी. सतत सर्जनशील संकल्पना निर्माण करण्याची तुमची क्षमता वापरली कधी जाणार ? 

          तुमचे मित्र तुम्हाला एखादी चांगली गोष्ट सांगत असतील तर नक्की ऐका. तुम्ही तुम्हाला एका चांगल्या वाटेने नेत आहात हीसुद्धा चांगलीच गोष्ट आहे. नाही का ? 



Wednesday, September 6, 2023

🛑 सर्वांची माई गेली

🛑 सर्वांची माई गेली

          प्रत्येकाला एक आई असते. आपल्या आईवर आपण जिवापाड प्रेम करतो. ती आपल्यावर निरतिशय प्रेम करत असते.  आईला अनेक मुले असली तरी सर्वांवर तिचे तितकेच प्रेम असते. 

          आमची बिडवाडीची आत्या सर्वांची आईच होती. तिला सर्वजण माई या नावाने हाक मारत. हिंदीतील माँ आणि मराठीतील आई या दोन शब्दांचा संगम म्हणजे ' माई ' हे संबोधन तयार झाले असावे. माई या शब्दातच अपार माया भरलेली आहे. माई होतीच तशी. अतिशय मायाळू. तिची माया तिच्या शब्दांतून प्रकट होत असे. तिच्या डोळ्यांत माया दिसे. ती सर्वांना दिसत नसे. ती निर्मळ माया पाहणारा विरळाच. 

          माझ्या बाबांपेक्षा एक ते दोन वर्षांनी मोठी असलेली माझी आत्या सर्वांची खऱ्या अर्थाने माईच होती. तिच्या मालवणी गावठी भाषेतील माया तिच्या शिवराळ शब्दांतून प्रकट होई. ती खूपच परखड होती. तिचा आवाजही मोठा होता. त्या आवाजात अजूनही जरब होती. ती कधीही कोणालाही घाबरलेली नव्हती. 

          आम्हां भाचरांवर तिचं खूपच प्रेम. आम्ही तिच्याकडे गेलो कि ती मायेने आमचं सगळं करीत असे. जेवू खाऊ घाली. तिच्या हाताची चवच भारी. काहीही खाल्ल्याशिवाय तिने आम्हांला कधीच पाठवले नाही. ती आमच्या पाठीवरुन मायेने हात फिरवी. तिच्या मायेची ऊब आता पारखी झाली आहे. तिच्या घरी आता जी उणीव निर्माण झाली आहे , ती कधीही भरुन न येणारी पोकळीच आहे. आमचे चुकले की ती आमच्यावर रागवायची. तिचे रागावणे बरोबरच असे. तिला सर्वांनी व्यवस्थित असावे , सुखी , समाधानी असावे असे वाटे. तिने कधीही कोणाकडूनही कसलीच अपेक्षा केली नव्हती. आमच्याकडून तर मुळीच नाही. तिच्याकडून जाताना ती आमच्या हातात काहीतरी दिल्याशिवाय पुढे पाठवत नसे. ती निस्वार्थी आणि धार्मिक होती. 

          ती आपल्या नातवंडांना बोलबोल बोलायची. पण त्यांनी वेळीच खावे , अभ्यास करावा यासाठी तिचा तीळ तीळ तुटताना मी बघितले आहे. 

          तिचे पती म्हणजेच आमचे ' जिजी ' एक सुप्रसिद्ध वैद्य होते. त्यांच्यावर तिचे खूप प्रेम होते. ते गेले आणि ती दुःखी झाली होती. तिचे रिक्त कपाळ पाहून आम्हांलाही वाईट वाटे. नवरा गेल्याचे दुःख फक्त त्या बाईलाच असते. तिचे ते दुःख कोणीही काहीही केले तरी कमी होणारे नसते. 

          दोन मुलगे , दोन सुना , नातवंडे , एक मुलगी , जावई आणि आम्ही जवळचे नातेवाईक तिच्या जवळ असलो की तिच्या बोलण्याला बहर येई. ती बोलत राही. तोंडात दात नसले तरी न चावता येणारे पान चघळत राही. 

          ती आजारी पडली. तिचा आजार वाढत गेला. तो कमी होण्याची चिन्हे दिसेनात. मुलांनी बरेच प्रयत्न केले. पण ती पुरती थकून गेली होती. आता तिला थांबावेसे वाटत नव्हते. ती कोणालाही ओळखेना. ती फक्त डोळे उघडून बघायची. मानेने होकार किंवा नकार द्यायची. ती स्वतःच्या आजाराला कंटाळली होती. अखेर तिने अखेरचा श्वास घेतला. एक गावप्रसिद्ध माई सर्वांनाच कायमची सोडून गेली होती. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , मुख्याध्यापक

शाळा शिडवणे नं.१



Sunday, August 20, 2023

🛑 भाईमामा : द ग्रेट मामा

🛑 भाईमामा : द ग्रेट मामा

          प्रत्येकाला मामा असणे खूप गरजेचं असतं. आईचा भाऊ म्हणून आपल्या भाचरांची काळजी घेणारा मामा सर्वांनाच नेहमीच हवाहवासा वाटत असतो. ज्यांना एकही मामा नसेल त्यांना मामा नसल्याचं दुःख सतत सतावत असणार.

         आम्ही भावंडे मात्र मामांच्या बाबतीत अतिश्रीमंत आहोत. आम्हाला सहा मामा. चार सावत्र आणि दोन सख्खे. आबामामा , नानामामा , अण्णामामा आणि भाऊमामा हे चार सावत्र मामा. भाईमामा आणि बालामामा हे माझ्या आईचे सख्खे भाऊ. 

          आज यापैकी पाच मामा हयात नाहीत. बालामामा हे माझ्यासाठी नेहमीच आयडॉल ठरले आहेत. रत्नागिरीत असताना त्यांनी मला दिलेली शाबासकीची थाप अजूनही पाठीवर तशीच आहे.

          मोठ्या सर्व सावत्र मामांचे अनेक उत्तम संस्कार मनावर कोरले गेले आहेत. ते सुसंस्कार होते म्हणून मी आज असा आहे. 

          मला आज माझ्या भाईमामांबद्दल सांगायचे आहे. ते जाऊन आज आठ वर्षे होत आहेत. त्यांच्या आठवणी अजुनही ताज्याच आहेत. मी त्यांना कधीही विसरु शकणार नाही.

          भाईमामा म्हणजे एक शांत संयत व्यक्तिमत्त्व. एक हाडाचे प्राथमिक शिक्षक. घरात मवाळ , पण शाळेत जहाल. जहाल म्हणजे कडक शिस्तीचे. त्यांचं हसू ओठातल्या ओठातच. त्यांचं प्रेम पोटातल्या पोटात. प्रेम आहे पण ते सहसा कळू द्यायचे नाही असा त्यांचा स्वभाव. 

          मी मोठा होत असताना भाईमामांना अगदी जवळून बघत आलोय. दर शनिवारी ते आमच्या दुकानात येत. सहजच. फक्त आम्हाला भेटायचे निमित्त असे. ते एखाद्या शनिवारी आले नसले तर आम्हाला त्यांची आठवण येत राही. अजूनही येते. 

          ते आले की एक चैतन्य दुकानात शिरत असे. मग आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत असू. येताना त्यांनी चहा आणि शेवचिवडा यांची ऑर्डर हमखास दिलेली असे. बोलता बोलता टकल्यांच्या हॉटेलमधील आम्हांला सगळ्यांना आवडणारा शेवचिवडा समोर येत असे. आम्ही सर्व मिळून चिवडा फस्त करण्याची आठवण अजूनही जात नाही. हे अप्रतिम क्षण पुन्हा कधीही येणार नाहीत. 

          भाईमामांनी आम्हांला अनेकदा आर्थिक आधार दिला आहे. मानसिक आधार तर ते नेहमीच देत असत. त्यांना पान खाणे आवडायचे. पान तयार करण्याची त्यांची पद्धत आगळी होती. एखादे सुंदर पान निवडून त्याच्या सर्व शिरा काढून नंतर चुना लावत असताना तंबाखुची निवडक पाने त्यात टाकली जात. मग त्याला एक विशिष्ट घडी घालून पानाची तोंडात उडी पडे. हे करत असताना त्यांच्या गप्पा सुरुच असत. माझे मात्र त्यांच्या या हालचालींकडे अधिक लक्ष असे. 

          मी शिक्षक झाल्यानंतर लवकर नोकरीला लागण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. नोकरीच्या पहिल्या दिवशी माझ्यासोबत आले. आदल्या दिवशी रात्री त्यांनी मला केलेले मार्गदर्शन मी कदापि विसरणार नाही. ते म्हणाले , " हे बघ भाच्या , तू मागे मागे राहू नकोस. मी मागे राहिलो. मी कधी चारचौघात बोललो नाही. पण तू मात्र तसे करु नकोस. प्रत्येक वेळी संधी तुझ्याकडे चालून येईल , त्या सर्व संधींचे सोने करणे फक्त तुझ्या हातात आहे. " 

          त्यांचे हे मार्गदर्शन मला नेहमीच पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. आज मामा नाहीत , पण त्यांचे ते अनमोल शब्द सदैव माझ्यासोबत असतात. 

          सेवेतून निवृत्त झाल्यानंतर एक दोन महिन्यांतच ते आजारी पडले. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने डोंगराएवढे प्रयत्न केले. लाखो खर्च केले. परंतु आठ वर्षांपूर्वी ते आम्हाला कायमचे सोडून निघून गेले. एका मार्गदर्शक तत्त्वाचा अंत झाल्याची भीती माझ्या मनात वाटून गेली. त्यांची मार्गदर्शक तत्त्वे मी माझ्या आठवणींच्या कुपीत अगदी जपून ठेवली आहेत. 

©️ प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं.१



Tuesday, August 8, 2023

🛑 ' कारटो ' ची कल्पना

 🛑 ' कारटो ' ची कल्पना

          कल्पना धाकू मलये नावाची माझी डीएडची मैत्रीण. तिने ' कारटो ' नावाची एक बालकादंबरी लिहिली आहे. ती खूप छान लेखन करते. तिने केलेलं लेखन वाचकाला भावणारं आहे. लहानपणी घडणाऱ्या कित्येक गोष्टी कल्पनाने लक्षात ठेवल्या आहेत. गोष्टी नुसत्या लक्षात ठेवून चालत नसतात , त्या काळजीपूर्वक आणि क्रमबद्ध मांडाव्या लागतात. कल्पनाने अगदी तसंच केलंय. 

          बालमनाला दांडगा अभ्यास असणारी व्यक्तीच असं करु शकते. प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा बारकाईने विचार केल्याने कादंबरी वाचनीय झाली आहे. कादंबरीच्या नावामुळे तर ती हातात घेऊन बघण्याचा आणि वाचण्याचा मोह व्हावा. कल्पना चांगलं लिहिते एवढं मला माहिती होतं. पण ती अतिशय कसदार आणि दर्जेदार लिहू शकते हे ' कारटो ' वाचल्यानंतर कोणीही सांगू शकेल. लेखिका म्हणून कल्पना जिंकली आहे. तिने कारटो मध्ये अनेकानेक परखड मतं व्यक्त केली आहेत. एक महिला असं लिहिते आहे म्हणून आणखी अभिमानास्पद आहे.

          मालवणी बोलणारी अनेक प्रसिद्ध माणसे मी बघितली आहेत. नटवर्य कै. मच्छिंद्र कांबळी यांना मी लहानपणापासून ऐकत आलोय. मी ज्याठिकाणी राहायला होतो , तिथे शेजारी गॅरेज होते. त्या गॅरेजमध्ये ते एकदा आले होते. मी धावत जाऊन त्यांची सही घेतल्याचे मला चांगलेच आठवते आहे. त्यावेळीसुद्धा ते माझ्याशी शुद्ध मालवणीत बोलले होते. त्यांची बरीच नाटके प्रत्यक्ष पाहिली , तेव्हा त्यांचं मालवणी भाषेवरील प्रभुत्व लक्षात येतं. कल्पनाची मालवणी भाषेवरील तशीच पकड असल्याचे दिसून येते. शक्यतो तिची मालवणी भाषा शुद्ध आणि जिव्हाळ्याची वाटते. मालवणी शब्दांना तिने लहानपणापासून अधिक आपलेसे केले असावे. आम्हां लोकांना प्रमाणभाषेचं कोडकौतुक वाटत असतं. ती बोलताना आम्ही मालवणी भाषेचं टोनिंग वापरताना अनेकदा चुकत असतो. हे चुकलेलं पुण्यातील लोकांना लगेच समजतं. कारण आमची प्रिय मालवणी भाषा हेल काढणारी आहे. ती हेल वगैरे काढणारी असली तरी ती आम्हाला प्रिय आहे. 

          कल्पना मलये हिने लहान असतानाच्या तिला शंका वाटणाऱ्या गोष्टी जशास तशा मालवणीत शब्दबद्ध केल्या आहेत. तिची मराठी भाषाही स्वच्छ आणि शुद्ध असते. तिला दोन्ही भाषेतून बोलताना आणि तिने दोन्ही भाषेतून लिहिलेले वाचताना तिची साहित्यविषयक उंची लक्षात येते. मीसुद्धा थोडेफार लेखन करतो. तरीही तिची उंची गाठू शकण्यासाठी मला भरपूर अभ्यास करावा लागेल. 

          तिच्या पुस्तकाला वाचल्याशिवाय बोलणे हे कधीही मूर्खपणाचे ठरेल. तिच्या पुस्तकाच्या चार आवृत्त्या निघू शकतात म्हणजे तिचे पुस्तक वाचायलाच पाहिजे असा अर्थ होतो. कोणत्याही लेखकाचे किंवा लेखिकेचे पुस्तक न वाचता आपल्याला कोणतेही भाष्य करता येणार नाही. ते पुस्तक वाचल्याशिवाय त्यात काय वेगळं आहे ते समजणारही नाही. त्यासाठी ते स्वतः विकत घेऊन वाचले पाहिजे. विकत घेऊन पुस्तक वाचण्यात नक्कीच मजा असते. पुस्तक संग्रही राहतं हा आणखी एक फायदा. 

          पुस्तकाचं शीर्षक खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतं. ' कारटो ' हे नाव म्हणजे एका आपल्यासारख्याच प्रश्न विचारणाऱ्या मुलाच्या नावाचं संक्षिप्त रुप आहे. हा मुलगा चोखंदळ आहे , विज्ञानावर प्रेम करणारा आहे. शंकांची उत्तरं शोधून काढणारा आहे. म्हणून हा कल्पना मलये यांचा ' कारटो ' सर्वांनाच सतत भुरळ घालत राहणार आहे. यांवर आधारित एखादा चित्रपट किंवा बालनाट्य बनायला हरकत नाही. कल्पनाने केलेल्या कल्पना जर समजून घ्यायच्या असतील तर प्रत्येकाने हे पुस्तक नक्की घ्या आणि नुसतं घेऊन उपयोग नाही , ते शेवटपर्यंत वाचून काढा. मग समजेल ' कारटो ' म्हणजे काय रसायन आहे ते !!!

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



Sunday, July 30, 2023

🛑 असा रंगारी श्रावण

🛑 असा रंगारी श्रावण

          आषाढ महिना संपला कि श्रावण महिन्याची चाहुल लागते. तो येतो आणि जो आनंद होतो , तो शब्दबद्ध करणं खूपच कठीण असतं. हा स्वानंद अनुभवावा लागतो. तो अनुभवल्याशिवाय कळणार नाही. 

          बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनाही श्रावण महिन्याने भुरळ घातली. त्यांनी लिहिलेली कविता सर्वश्रुत आहे. ' श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे ' ही कविता म्हणताना साक्षात श्रावण समोर उभा राहतो. इतकी त्यांच्या काव्यात ताकद आहे. 

          श्रावणात सर्व निसर्ग बहरुन जातो. पावसाला उधाण आलेलं असतं. हिरव्यागार झाडावेलींना पाहताना डोळे निवून जातात. आकाशात विविध रंगांची उधळण करणारं इंद्रधनुष्य त्यात भर घालत असतं. पशुपक्षी आनंदात नाचू लागतात. शेतकरी सुखावतात. त्यांची शेती करतानाची कार्ये उत्स्फूर्तपणे सुरु असतात. 

          या महात हिंदू धर्मातील विविध सण येतात. पावसाच्या रिमझिम रेशीमधारा बघतच रहाव्याशा वाटतात. फुलांची बाग अधिक आनंदाने हसताना दिसते. विविध रानभाज्या खुलून दिसतात. 

          गावाकडे घराघरात श्रावण सोमवारी शंकर महादेवाची व्रतवैकल्ये केली जातात. उपवास केले जातात. लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही झोपाळ्यावर झोके घेण्याचा आनंद घेता येत असतो. मंगळागौर , नागपंचमी , रक्षाबंधन , नारळीपौर्णिमा , गोकुळाष्टमी , गोपाळकाला असे सण श्रावण महिन्याचे मुकुटच असतात. मांसाहार न करता पूर्ण शाकाहारी राहण्यासाठी निसर्गदेवता श्रावण महिन्याच्या रुपाने माणसाला साद घालत असते. 

          भक्तीभावाने भारावून गेलेली माणसे श्रावणाची वाट पाहत असतात. एखाद्या ग्रंथाचे वाचन सुरु करण्यासाठी श्रावण महाचे औचित्य लागत असते. 

          असा हा श्रावण सर्वांचाच लाडका ऋतू असतो. 

©️ प्रवीण कुबलसर



🛑 एक घास पप्पांचा

🛑 एक घास पप्पांचा

          बालपणी बालभारतीच्या पुस्तकात ' पेरुची फोड ' असा एक धडा होता. त्यात " पेरुची फोड , लागते गोड "  असे म्हटले होते. त्यापुढे असेही म्हटले होते , " आईची फोड , फारच गोड ". खरंच या दोन्हींमधील पुढची ओळ जास्त लक्षात राहते. कारण ती आईने दिलेली फोड आहे. 

          प्रत्येक मुलांचे आपल्या आई बाबांवर निरतिशय प्रेम असते. आईला भेटण्यासाठी मुले आतुर झालेली असतात. शाळेतून घरी येताच आम्ही पहिल्यांदा आईला कडकडून मिठी मारत असू.  ही मिठी आता मिळत नाही , कारण आईच नाही. 

          आई जशी महत्त्वाची असते , तसे बाबाही महत्त्वाचे असतात. आई प्रेमळ असते. बाबा शिस्तीचे असतात. कधीकधी याउलट असू शकते. काहीवेळा दोन्ही पालक प्रेमळ आणि शिस्तप्रिय असू शकतात. त्यांनी तसेच असायला हवे असते. मुलांसाठी आणि मुलांच्या संगोपनासाठी हे सर्वच आवश्यक असते. 

          आई मुलांना भरवते. मुले कितीही मोठी झाली तरी आईबाबांसाठी लहानच असतात. बाबा मुलांना मारतात , तेव्हा आई रडणाऱ्या मुलांना जवळ घेते. हे जवळ घेणे त्यावेळी दिलासा देणारे असते. मला आईने क्वचितच मारले असेल. बाबांचा मार अनेकदा खाल्ला आहे. अजूनही त्यांच्या शब्दांचा मार मिळत असतो. बाबांनी मारल्यानंतर आम्हाला आईचा आधार असे. तिच्या पदरात लपताना जी प्रेमाची ऊब मिळे ती कुठेच मिळणार नाही. 

          माझे आजोबा भरपूर जेवत असत. त्यांच्या जेवणातील एखादा घास मिळण्यासाठी माझे बाबा आसुसलेले असत असं ते सांगतात. माझी आजी तर खूपच प्रेमळ आणि धार्मिक होती. तिने कुठूनही आणलेला खाऊ सर्वांना समान मिळण्यासाठी तिची धडपड असे. लग्न होऊन मुले बाळे झालेल्या मुलांनाही ती लक्षात ठेवून खाऊचा वाटा देत असे. तिच्या निस्सीम मायेची तुलना करणे चुकीचे ठरेल. तिने आम्हाला घास भरवले आहेत. कालवलेला घास तिच्या हाताने खात असताना ती स्वतः सुद्धा आपल्या तोंडाचा ओ करत असे. त्यावेळी तिच्या सुरकुत्या आलेल्या हातांची सैल झालेली कातडी एकत्र करुन तिच्याशी मी खेळत बसलो तरी ती काहीही म्हणत नसे.

          आईने आणि बाबांनीही मला भरवले आहे. मी रात्री , मध्यरात्री अचानक घायाळ पडत असे. मी घामाघूम होई. तेव्हा आईबाबा दोघेही माझ्या जवळ बसून भरवू लागत. त्यावेळी मिळत असलेल्या प्रेमाने मी आणखीच घायाळ होऊन जाई. 

          आता मीही तीन मुलींचा बाबा झालो आहे. मला त्या पप्पा म्हणतात. तिन्ही मुली पप्पांच्या एखाद्या घासासाठी टपलेल्या असतात. मुले कितीही मोठी होत असली तरी आईबाबांसाठी लहानच असतात. त्यादिवशी माझी दोन नंबर मुलगी हट्टच धरुन बसली. मी जेवत होतो. तिला माझ्या जेवणातला एक घास हवा होता. माझे बाबा जवळच होते. मी जेवत असताना त्यांचे माझ्या जेवण्याकडे लक्ष असते. ताटातील भाजी , भाकरी संपत असली तर ते आपल्या सुनेला सांगत असतात. मी मागण्यापूर्वी माझ्या ताटात संपलेला पदार्थ यायला हवा यासाठी त्यांचा हा अट्टाहास असतो. त्यांना मी कितीही सांगितले तरी त्यांनी त्यांची ही सवय अजिबात सोडलेली नाही. 

          मी माझ्या तिन्ही मुलींना एक एक घास भरवू लागलो. मी भुकेलेला असलो तरी त्यांच्या मुखात जसा घास जाई , तशी माझे पोट भरत असल्याचा अनुभव येत जाई. पप्पांनी भरवलेला घास छोटा असला तरी तो त्यांच्यासाठी नेहमीच भारावलेला असतो अगदी आमच्या आईबाबांसारखा. 

©️ प्रवीण कुबलसर



Wednesday, July 12, 2023

🛑 रमला वाचनमेळा

🛑 रमला वाचनमेळा

          वाचन करणे ही आपली संस्कृती बनली पाहिजे. वाचनाची चळवळ जोपासणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. मुले आणि काही मोठी माणसेही मोबाईल वाचतात. हा मोबाईल वाचणे म्हणजे अनेक मानसिक रोगांना आमंत्रण देणे आहे. त्यापेक्षा पुस्तके वाचणे कधीही चांगले. त्यात मध्येच काहीतरी अनाहूत येत नाही. आपल्या वाचनाचा लक्ष दुसरीकडे वळत नाही. 

          मुलांना वाचनासाठी उद्युक्त करणं हे तसं सोपं काम नसलं तरी अवघड मुळीच नाही. पुस्तकं त्यांच्या आजूबाजूला दिसायला हवीत. ही आकर्षक पुस्तकेच त्यांना आकर्षित करु शकतात. फक्त ही पुस्तके त्यांच्या नजरेच्या कक्षेत ठेवायला हवीत. 

          दुपारी शाळेचे माध्यान्ह भोजन संपन्न झाले. मुले जेवल्यानंतर या वर्गातून त्या वर्गात उगीचच फिरताना दिसत होती. कोणी कोणाची पाठ धरत होतं. कोणी काहीबाही करताना दिसत होती. दप्तरातील पुस्तके त्यांची वाट पाहत होती. ती दप्तरात किंवा कपाटात बंद होती. बिचारी हिरमुसली होती. आपल्याला कोणी वाचत नाही म्हणून त्यांचे नाराज होणे साहजिकच होते. 

          मी हळूच कपाट उघडले. त्यातली कदाचित नाराज झालेली पुस्तके मी बाहेर काढली. मुलांना व्हरांड्यात बोलवून घेतले. एकेका मुलाला आकर्षक मुखपृष्ठ असलेले पुस्तक देताना मला खूपच आनंद होत होता. मी काहीतरी वाटतोय हे बघून हळूहळू सगळी मुले माझ्याकडे पुस्तके मागायला आली. मी आपला पुस्तके काढून काढून वाटतच राहिलो. 

          मुलांनी जागा मिळेल तिथे फतकल मारुन बसणे पसंत केले. पुस्तकातील चित्रे बघताना त्यांचे चेहरे मी बघत होतो. पुस्तकं वाचनाचा हा आगळा वेगळा वाचनमेळा पाहून मलाही माझ्या बालपणीची आठवण येऊन गेली. आम्ही त्यावेळी खूप वाचन करीत असू. शालेय पुस्तकांव्यतिरिक्त अवांतर वाचनाची आवड आम्हांला या पुस्तकांनीच लावली होती. हल्लीच्या मुलांना मोबाईलचे आकर्षण असल्यामुळे त्यांना पुस्तकांविषयीचे आकर्षण वाटत नसावे. 

          नुकताच पहिलीत प्रवेश घेतलेला सार्थक माझ्याकडे आला. तो म्हणाला , " सर , मला पुस्तक द्या. " मी त्याला चित्रांचे छान पुस्तक दिले. त्याने त्यातली सर्व चित्रे भराभर बघून घेतली. थोड्याच वेळात तो धावतच माझ्याकडे आला. म्हणाला , " सर , आता दुसरं पुस्तक द्या. " मी त्याला म्हटलं , " अरे सार्थक , हेच पुस्तक पुन्हा पुन्हा वाच. नंतर आणून दे. " तो तयार नव्हता. ते पुस्तक माझ्या हातात कोंबत तो म्हणाला , " सर , मी पहिलीत आहे. मला हे पुस्तक वाचता कुठे येतंय ? " त्याचे अगदी बरोबर होते. मी त्याला दुसरे पुस्तक दिले. तो ते नवे पुस्तक घेऊन धूम पळाला आणि परत आपल्या जागेवर जाऊन त्यातील चित्रे डोळे फाडून कुतूहलाने वाचताना दिसला. 

          इतर मुलेही असेच काहीसे करत होती. माझा वेळ मात्र सार्थकी लागला होता. नाराज झालेली पुस्तकं पुन्हा हसताना दिसत होती. असा हा वाचनमेळा मुलांसाठी पर्वणीच ठरला होता. मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून असे अनेक उपक्रम अनेक शाळांमध्ये सुरुच असतात. हा उपक्रम त्यांच्यासाठी किंवा माझ्यासाठी नवा नाही , पण मुलांसाठी मात्र नक्कीच वाचनवेडा आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर
















Tuesday, July 4, 2023

🛑 पावसाची रंगतसंगत

🛑 पावसाची रंगतसंगत

          पाऊस आता चांगलाच सुरु झालाय. कालपासून त्याने संततधार सुरु केली आहे. गडगडाट नाही , मुसळधार तर नाहीच नाही. पण नुसता बरसतोय. सकाळी सकाळी त्याचा हा वर्षाव खुप सुखद आनंद देऊन जातोय. तो बाहेर छान कोसळतोय. मी मस्त पावसाची गाणी लावून ऐकत बसलोय. पावसाची जुनी गाणी आणि नवा पाऊस दोन्ही कसे भारावून टाकणारे आहे. 

          पाऊस आला की माझं असं होतं. पावसात जावसं वाटतं आणि घरात थांबावं असंही वाटतं. पण यापैकी एकच करता येऊ शकतं. 

          सकाळी लवकरच छोट्या उर्मीला शाळेत सोडायला जायचे असते. तिला मम्मीसुद्धा लागते. शाळेत जायची गडबड सुरु झालेली असते. ती उठायचे नाव घेत नाही. ती लाडात म्हणते , " पप्पा , जरा वेळ झोपते ना ? " माझी तयारी झालेली असते. उर्मीला मस्त आंघोळ करुन झाल्यावर कोमट पाण्यात हॉटबाथ घ्यायला नेहमीच आवडतं. आजही तिने हॉटशेक घेतलाच. रेनकोट वगैरे घालून तयारी करुन शाळेत निघालो. 

          पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नव्हता. तो रेनकोटातून आत शिरु पाहत होता. पाच मिनिटांत पाऊस रेनकोटात शिरलाच. गारवा छान वाटतोय. मजा येतेय. मधूनच आलेली पावसाची मोठी सर थेट तोंडात पाणी ओतू पहात होती. चष्म्यातून धूसर दिसू लागले होते. चष्म्याला वायफर नाही म्हणून तो पुन्हा पुन्हा पुसावा लागतोय. रस्ता अस्पष्ट दिसू लागलाय. चष्मा वापरणाऱ्यांचे सर्वांचेच असे होत असले पाहिजे. 

          मुलीला घरी सोडून आलो , तेव्हा कपड्यातून आत घुसलेला पाऊस आता मला पाहून बाहेरुन मिश्किल हसताना मला दिसला. मीही गालातच छान हसलो. मिलिंद इंगळे ऐकत बसलो. सौमित्र ऐकत बसलो. दोघेही आपल्या शब्दांनी , स्वरांनी मला चिंब भिजवून टाकत होते. आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी मी मस्त पाऊस अनुभवत होतो. पत्नीने वाफाळलेला आलेयुक्त चहा दिला. तिच्यासोबत चहा पिताना पूर्वीचा पाऊस आठवत होता. स्मृतींचाही असाच पाऊस असतो नाही का ? तोही प्रत्येकाच्या मनात असाच उदंड वर्षत असतो. 

          मलाही आता शाळेत जायचं आहे. शिकायला आणि शिकवायला. जातानाही पुन्हा पावसाची साथसंगत असणारच आहे. धोय धोय पडणारा हा पाऊस मनातही शब्दांचा धबधबा कोसळवतोय. 

©️ प्रवीण कुबलसर



Saturday, July 1, 2023

🛑 आईविना भिकारीच

🛑 आईविना भिकारीच

          तिन्ही जगाच्या स्वामीला आई नाही , म्हणून म्हटले जाते , " स्वामी तिन्ही जगांचा , आईविना भिकारी. "

          हे अगदी खरे आहे. आई नाही तर आपण सगळी तिची लेकरे भिकारीच आहोत. ती होती तेव्हा जी श्रीमंती होती , ती आज लाभत नाही. प्रत्येकाला आई असते , कारण आईशिवाय आपला जन्मच नसतो. ती तिच्या उदरात नऊ महिने , नऊ दिवस , नऊ घटका , नऊ पळे आपल्याला वाढवत असताना तिला झालेला त्रास तिला सुखकर वाटत असतो. तिला त्रास झाला तरी तिने त्याकडे दुर्लक्ष कायम दुर्लक्ष केलेले असते. 

          बाळाचा जन्म झाल्यावर तिचा चेहरा पाहावा. ती जगातील सर्वात श्रीमंत भासते. तिचा पुनर्जन्म झालेला असतो. बाळाचं हसणं , रडणं दोन्ही तिला स्वर्गसुख देत असतं.

          आईला आपली सर्व लेकरं प्रिय असतात. तिची सर्वांवर सारखीच माया असते. त्यात दुजाभाव नसतो. लेकरांनी कधीही असा गैरसमज करुन घेऊ नये. तिच्या प्रेमावर अविश्वास दाखवण्यासारखे पाप नाही. 

          आमची आई इतरांसाठी सर्वसामान्य असेल , पण आमच्यासाठी ती सदैव असामान्यच राहिली आहे. तिने आमच्यासाठी काय केले नाही ? तिने शेवटी आमच्यासाठीच आपल्या प्राणांचे बलिदान दिले. ती तिच्या आजाराला कंटाळली. आम्हांला तिचा त्रास होऊ नये म्हणून तिने स्वतःला संपवले असावे. तिच्या कायमच्या डॉक्टरांनी हात टेकले. दुसऱ्या कोणत्याही डॉक्टरांकडे कधीही न जाणाऱ्या तिने आता धसका घेतला. माझ्या डॉक्टरांनी माघार घेतली म्हणजे माझे आता खरे नाही असे तिला वाटले असावे. ती आजारी पडली आणि बरी होण्याची चिन्हे दिसेनात. बाबांशिवाय तिने कोणाकडूनही सेवा करुन घेतली नाही. लग्न झालेल्या मुली आईला बघायला आल्या तरी पाहून जात. आईने त्यांच्याकडूनही सेवा करुन घेतली नाही. आम्ही दोन्ही मुलगे , दोन सुना सेवा करण्यापूर्वीच तिने राम म्हटला. 

          आपली मोठी सून आपल्या आधी गेली याचे अतीव दुःख तिला नेहमीच सलत राहिले असावे. तिच्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी ती हे जग सोडून गेली. बाबांची सहचारिणी बाबांना कायमची सोडून गेली होती. लेकरांना दुःख होतेच , पण बाबांना झालेले दुःख बाबांच्या डोळ्यांत दिसत होते. बाबांनी माझ्या आईवर जीवापाड प्रेम केले. रागाने बोलले तरी त्यात प्रेमाचा ओलावा अधिक होता. बाबांनी माझ्या आईची आठवण केली नाही असा एकही दिवस गेला नसेल. 

          आज आईचा चौदावा स्मृतीदिन आहे. बाबांच्या गळ्यातील चेन बाबांना टोचायला लागली. आईच्या मंगळसूत्रापासून ती बनवलेली आहे. ती आज टोचणारच , कारण ती आई आहे. तिने आज आपल्या पतीला स्पर्श केला आहे हे बाबांना समजलेही नाही. 

          आईचे आमच्यावरील प्रेम सदैव राहावे अशी मी तिच्याकडे प्रार्थना करतो. 

▪️ तिचो झिल



Monday, June 5, 2023

🛑 दमदार वक्तृत्वाचा आविष्कार : किशोर कदमसर

🛑 दमदार वक्तृत्वाचा आविष्कार : किशोर कदमसर

          शिक्षकी पेशामध्ये पदार्पण केले कि अनेक पैलूंवर काम करावे लागते. कसलेला आणि दमदार शिक्षक तयार होण्यासाठी डी. एड , बी. एड. कॉलेजातील वर्षे अतिशय महत्त्वपूर्ण असतात. नोकरीला लागल्यानंतर होणारी सेवांतर्गत प्रशिक्षणे  शिक्षकातील अंतरंग , बाह्यरंग दोन्ही बदलून टाकत असतात. 

          किशोर कदम हे माझे खूप जवळचे शिक्षक मित्र. त्यांची पत्नी शुभांगी. ती माझी क्लासमेट. तिचे पती किशोर कदम आहेत एवढाच सुरुवातीचा परिचय. त्यानंतर अक्षरसिंधु संस्थेत काम करताना कधीतरी किशोर कदमांची गाठ पडली. धावती भेट झाली. त्यांचं राजबिंडं व्यक्तिमत्त्व त्यावेळी माझ्यावर प्रभाव टाकून गेलं होतं. 

          मग पुन्हा माझी आणि त्यांची भेट थेट पुण्यात झाली. बाहुली नाट्य प्रशिक्षणात. दहा दिवसीय प्रशिक्षणात आम्ही दोघे सिंधुदुर्गवासीय असल्याने एकत्र बसत होतो. मालवणीत बोलत होतो. तिथे मला त्यांच्या अभिनय प्रतिभेचा परिचय घडला. त्यांच्या आवाजाचे टोन , आरोह , अवरोह ऐकून मी अक्षरशः भारावून गेलो. त्यांचं ऐतिहासिक नाट्यात्मक बोलणं माझ्यासाठी नवीन होतं. तेव्हाच माझ्या लक्षात आलं. या कदमांमध्ये चांगलाच दम आहे. त्यांनी ऐतिहासिक वाक्यांची फेक करताना एकदा दम घेतला कि वाक्य संपेपर्यंत ते दम सोडत नाहीत हे विशेष. अशी वाक्ये बोलताना त्यांच्या अंगात जणू ती पात्रेच शिरलेली असतात असे वाटते. 

          त्या दहा दिवसात आम्ही दोघे एकमेकांच्या अधिक जवळ आलो होतो. आम्ही जेवायला , नाश्त्याला एकाच हॉटेलमध्ये जात असू. दोघांचा गट असल्याने सादरीकरण करताना मला त्यांची खूपच मदत झाली होती. ते खूप हुशार आहेत. 

          त्यानंतर पुन्हा एकदा ' अतिपरिणामकारक व्यक्तींच्या सात सवयी ' हे तीन दिवसांचं जिल्हास्तरीय प्रशिक्षण नांदगांव शाळेत होतं. तिथे हे किशोर कदम मस्त सुट सफारी घालून आले होते. ते आमचे तज्ज्ञमार्गदर्शक होते. त्यांनी मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि पुन्हा मला त्यांचा अधिक अभिमान वाटू लागला. त्यांचं बोलणं तुफान होतं. ते इतक्या जलद गतीने बोलत होते कि ते इतक्या जलद कसे बोलू शकतात हा मला त्यावेळी प्रश्न पडला होता. पुस्तकातील मुद्दे भरपूर होते. तीन दिवसांत ते सर्व समजून सांगायचे तर वेगवान वक्तृत्व गरजेचं होतं. आम्हाला एवढ्या वेगाने ऐकण्याची सवय नव्हती , त्यामुळे त्यातला काही भाग आमच्या डोक्यावरुन गेला ही गोष्ट वेगळी. पण त्यात त्यांचा अजिबात दोष नव्हता. आमची ग्रासपिंग पॉवर तेवढी काम करत नव्हती हेही त्याचे कारण असू शकते. 

          त्यांच्या दोन्ही मुली खूप हुशार आहेत त्यांच्यासारख्याच. ' बाप तश्या बेट्या ' असे म्हटले तरी वावगे ठरु नये. मुलींनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वक्तृत्वाचा वसा पुढे चालवला आहे. विविध स्पर्धांमध्ये केवळ भागच घेत नाहीत , तर ठरवून प्रथम क्रमांकाचे बक्षीसही मिळवतात. तीन ते चार मिनिटांच्या भाषणात श्रोत्यांच्या मनाचा ताबाच घेतात म्हणा ना !! शब्द बाबांचे आणि आवाज मुलींचा. बाबांना अपेक्षित यश मिळवत पुढे जाताना त्यांनी कधीही मागे वळून बघितलेले नाही. कालपेक्षा आज जास्त जिद्दीने लढा देत ' वक्ता दशसहश्रेषु ' हे सिद्ध करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे असे वाटते. 

          भाषण करत असताना ज्यांच्यावर त्या बोलत असतात त्यांचा पोशाख परिधान करुन त्यांनी कित्येकदा ' भूमिकाभिनय देखील केला आहे. यांच्या भाषणाच्या सुरुवातीच्या वाक्यांपासून प्रेक्षकांच्या टाळ्या सुरु होतात. भाषण संपताना मात्र लोक टाळ्या वाजवायचे विसरुन जातात एवढे ते त्यांच्या भाषणात एकरुप झालेले असतात. 

          किशोर कदम यांना या सर्व गोष्टींचे श्रेय जाते. दोन्ही मुलींना असे वक्तृत्व शिकवत असताना त्यांनाही अधिक उत्तम वाचावे लागते. त्यांनी एकदा लिहायला घेतले की विषयाची मांडणी पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत. त्यांचं व्यक्तिचित्र प्रत्यक्ष बोलण्यासाठी तयार झालेलं असतं. या शब्दांमध्ये आवाजाचे प्राण ओतले कि एक सुंदर प्रभावी वक्त्याचं दर्शन घडायला वेळ लागत नाही. 

          असे वक्तृत्व लेखन करता करता किशोर कदम यांच्या दिव्य लेखणीतून एक पुस्तकच जन्माला आले आहे. त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक सर्व विद्यार्थी , पालक , शिक्षक आणि वाचक यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. शाळेतील जयंत्या , पुण्यतिथी कार्यक्रम साजरे करत असताना मुलांनी या पुस्तकातील भाषणांचा वापर केला तर समोरचे श्रोते खुश होऊन टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाहीत. आवाजात ताकद असली तरी किशोर कदमांनी लिहिलेल्या शब्दांच्या ताकदीमुळे पुस्तक बेस्टसेलर ठरायला हवे यांत शंका असण्याचे कारण नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , पदवीधर शिक्षक , शाळा शिडवणे नं.१ ( 9881471684 )



🛑 गोष्टींचा तास

🛑 गोष्टींचा तास

          माणसांना गोष्टी खूप आवडतात. गप्पा मारता मारता त्यातून कधी कधी गोष्टींची निर्मिती होते. जुन्या गोष्टी ऐकताना त्या ऐकत राहाव्यात असे वाटत राहते. गोष्टींचा कधी कंटाळा येत नाही. 

          गोष्टी सांगणारा म्हणजेच स्टोरीटेलर. त्याला गोष्ट कशी वाढवावी हे माहिती असते. गोष्टींमध्ये रंगत आणणे ही एक कला आहे. गोष्ट सांगणे आणि गोष्ट खुलवून सांगणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गोष्ट खुलवून सांगता यायला हवी. 

          आपल्या समोर असलेल्या मुलांचा वयोगट लक्षात घेऊन गोष्टींची निवड करावी लागते. त्यातील विविध उदाहरणे देताना ती त्यांच्या परिचयाची हवीत. तर ती मुलांच्या हृदयाचा ठाव घेतात. मुलांचं लक्ष एकाग्र करणं ही आजच्या काळातील अतिशय अवघड गोष्ट होऊन बसली आहे. त्यांना त्यांच्या बालविश्वात फिरवून आणण्याची कला स्टोरीटेलरमध्ये असावी लागते. 

          मुलांना बोलते करत , त्यांच्याशी त्यांच्या वयातील होऊन संवाद साधला तर मुले पटकन एकरुप होतात असा अनुभव आहे. त्यांना प्रेरणा देत गोष्ट पुढे घेऊन जायला लागते. त्यांच्या बालमनावर आघात करणारी गोष्ट सांगणे बरोबर नसते. डोळ्यांतून पाणी आणणारी गोष्ट सांगितली तरी हल्लीच्या मुलांच्या डोळ्यांतून पाणी आणताना स्टोरीटेलरच्या डोळ्यांतून पाणी येऊ शकते. मुलांच्या संवेदना कमी झाल्यात की काय असा प्रश्न पडतो. 

          विष्णु शर्माच्या पंचतंत्रातील नितीपर गोष्टी आम्हाला त्यावेळी खूपच आवडत. आम्ही त्या पुनःपुन्हा वाचत असू. इसापची इसापनीती आम्हाला नीती शिकवून गेली. त्यातील प्राणी , पक्षी आमचे मित्र झाले. 

          श्यामची आई हे सानेगुरुजींचं पुस्तक आमच्या नितांत आवडीचं होतं. ते कितीवेळा वाचलं असेल ते सांगता येत नाही. पुनःपुन्हा वाचण्याइतकी या पुस्तकाची स्टोरी आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी तर तिला ' आईचं महान आणि मंगल स्तोत्र '  म्हटले आहे. 

          मुलांची श्रवण क्षमता म्हणजेच ऐकण्याची क्षमता अधिक विकसित होण्यासाठी , शब्दसंग्रहात भर पडण्यासाठी सकस गोष्टींची खूप गरज असते. मुलांना पूर्वी आजोबा , आजी गोष्टी सांगत असत. आज या गोष्टींची मुलांना उणीव भासू लागली आहे. मग मुलांना युट्युबवर ' आजीच्या / आजोबांच्या गोष्टी ' शोधाव्या लागत आहेत. या संस्कारी गोष्टी शोधता शोधता दुसरेच काहीतरी निकृष्ट दर्जाचे सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संस्कारक्षम वयात मुलांनी काय बघावे आणि काय बघू नये हेही आता पालकांच्या हातात राहिलेले नाही. जे दिसेल ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा मोबाईलमधील डेटा संपेपर्यंत मुले नुसते पाहात आणि ऐकत आहेत. काय चांगले आणि काय वाईट ते समजून सांगताना पालकांनी माघार घ्यायला सुरुवात केलेली दिसते आहे. 

          जुन्या बालभारतीच्या पुस्तकांमध्ये खूप चांगले धडे होते. त्या गोष्टीच होत्या. त्यांचे आपण अजूनही वाचन करताना खूप आनंद होतो. ही पुस्तके बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यांचा वापर मुलांनी , पालकांनी आणि विशेषतः शिक्षकांनी करायला हवा. दिवसभरातील हा गोष्टींचा हा एक तास मुलांचा त्रास कुठल्या कुठे पळवून लावील हे नक्की. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , शिडवणे नं.१

Sunday, June 4, 2023

🌀 कल्पनेपलिकडचो ' कारटो '

 🌀 कल्पनेपलिकडचो ' कारटो '

शिक्षक समितीच्या एका सत्कार समारंभात मला एक पुस्तक भेट म्हणून मिळाले होते. घरी आल्या आल्या ते पुस्तक बघितले. ते ' कारटो ' नावाचे पुस्तक होते. अशी अनेक पुस्तके आपल्या घरी येऊन पडतात. ती वाचायची राहूनच जातात. माझ्या लेखिका मैत्रिणीने हे पुस्तक लिहिले होते याचा मला अभिमान असला तरी पुस्तक वाचलेच नव्हते. तिने लिहिलेले पुस्तक म्हणून मी माझ्या वर्गातील सर्व मुलांसाठी पुस्तके घेऊन ती मुलांना मोफत दिली होती. पुस्तकाची किंमत फक्त पंधरा रुपये असल्याने मला ती परवडली असेल. त्यावेळी मी त्यातले पहिले दोन तीन लेख वाचून दाखवले होते. तेव्हा माझ्या शाळेतील मुले खळखळून हसलीही होती. पण त्यापुढे पुस्तक वाचायचे राहूनच गेले होते.
वर्तमानपत्रात , फेसबुकवर ' कारटो ' पुस्तकाची प्रसिद्धी वरचेवर येत होती. तरीही पुस्तक हातात घेतले जात नव्हते. मोठ्या मोठ्या लेखकांची पुस्तके वाचताना आपण आपल्या सोबतच्या लेखिकेला कमी लेखत होतो ही माझी चूकच होती हे माझ्या आज लक्षात आले. एकत्र दोन वर्षे शिकल्यामुळे ' ही ' काय लिहिणार असेही वाटून गेले असेल. आपण स्वतः लिहितोय तेच बरोबर आणि दुसऱ्यांचे ते चूकच असा दृष्टिकोन तर निर्माण होत नाही ना आपल्यात असे वाटून माझेच मला हसू आले. तेव्हा माझी मैत्रिण कल्पना मलये मला खूप मोठी लेखिका असल्याचे जाणवले. एक एक करत मी सगळं पुस्तकच बसल्या बैठकीत वाचून फडशाच पाडला.
' कारटो ' पुस्तक हाती घेतलं की त्याचं मुखपृष्ठ आकर्षित करणारं आहे हे ध्यानात येतं. झाडावर उलटा लटकलेला ' कॅश ' लहानांचे आणि मोठ्यांचेही लक्ष वेधून घेणारा आहे. मालवणी भाषेत कथा लिहिणे ही सोपी गोष्ट नसते. मालवणीत सावंतवाडी , मालवण , कणकवली , वेंगुर्ले , कुडाळ अशा सर्व तालुक्यातील भाषेत थोडा थोडा फरक आहे. तो लक्षात घेऊन लिहायचे असते हे लेखिकेने अभ्यासलेले आहे. डॉ. विजया वाड यांनी केलेले प्रास्ताविक शॉर्ट बट स्वीट आहे. लेखिकेची मालवणीवर श्रद्धा आणि पकड आहे. त्या सर्रास मालवणीच बोलतात. भाषण देताना त्यांचा एकही शब्द मालवणी येत नाही हे विशेष.
ही एका खोडकर आणि समंजस मुलाची कहाणी आहे. त्यात तो खराखुरा दाखवला आहे. सभ्यपणाचे सर्व बुरखे त्याने फाडले आहेत. वाचणाऱ्या प्रत्येकाला आम्ही लहान असताना तसेच होतो इतके हुबेहूब पटावे असे लेखन करणाऱ्या कल्पना मलये यांना म्हणूनच नव्या पिढीतील जाणकार मालवणी लेखिकेचा सन्मान द्यायला हवा. लेखिका स्वतःच्या जीवनात परखड आहेत , तशीच स्पष्ट भाषा त्यांच्या कादंबरीत उतरली आहे. त्यांना खोटे अजिबात आवडत नाही.
मालवणी भाषेचे अलंकार म्हणजे मालवणी म्हणी. या शिवराळ वाटणाऱ्या म्हणींचा त्यांनी केलेला चपखल वापर त्यांच्या मालवणी भाषेचं प्रदर्शन घडवतात. त्यांनी दिलेली शीर्षके प्रत्येक कथेला अगदी बरोबर वाटतात.
एक कारटा तुम्हाला तुमच्यासमोर येऊन काहीतरी गमतीजमती सांगत असल्याचा भास वाचकाला शेवटपर्यंत होण्यासाठी लेखिकेने विशेष प्रयत्न केलेले दिसतात. ही कादंबरी कुठेही कंटाळवाणी , रटाळ वाटत नाही.
यातील सर्व पात्रे आपल्या सर्वांच्याच घरात वावरत असल्यासारखे वाटत राहते. मालवणी भाषेची हिच लज्जत वाढवत नेऊन कल्पना मलये यांनी मालवणी भाषेचा सन्मान अधिकाधिक वाढवला आहे.
आज जर मच्छिन्द्र कांबळी असते तर त्यांनी कल्पना मलयेंच्या या पुस्तकाचे कोडकौतुक केले असते. मालवणी शब्दकोश बनवायचा झाला तर त्यांनी या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून उपयोग करायला काहीच हरकत नाही.
हे पुस्तक वाचताना ' बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत , कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात ' असे शीर्षकगीत असलेल्या ' गोट्या ' मालिकेची आठवण येत राहते. त्यातील गोट्या मराठी भाषा बोलणारा होता , हा कारटा मालवणी आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या ' बोक्या सातबंडे ' या बालचित्रपटाचीही प्रकर्षाने आठवण येत राहते.
ही कादंबरी म्हणजे फक्त गंमत गोष्ट नसून लहानांप्रमाणे मोठ्या माणसांच्या डोळ्यांत अंजन घालणारी ठरु शकते. विनोदाची झालर असली तरी प्रत्येक गोष्टीच्या शेवटी तुम्हाला धडा मिळतो ही जमेची बाब आहे.
श्रद्धा , अंधश्रध्दा , शिवाशिव पाळणे , किशोरवयीन मुलींचे शिक्षण , शैक्षणिक वातावरण , सहल अशा अनेक गोष्टींवर यांत हसत हसत प्रकाश पाडल्याचे दिसून येते. यातल्या बाई , गुरुजी आपलेच शिक्षक वाटतात.
ज्यांनी हे पुस्तक वाचले नसेल त्यांनी ते नक्कीच खरेदी करुन वाचावे , वाचले असेल त्यांनी पुन्हा एकदा जरुर वाचून बघा. शाळेत एकपात्री प्रयोग करण्यासाठी तर हे पुस्तक म्हणजे एक अतिशय उत्तम लेखसंग्रह आहे असे म्हटले तरी तुम्हीही त्याला दुजोरा द्याल. अशा या पुस्तकाच्या लेखिकेला लेखनाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

🌏 शिक्षक झालो म्हणून

  🌏 शिक्षक झालो म्हणून

लहानपणापासून प्रत्येकाला कोणीतरी होण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रत्येकजण काहीतरी करणारच असतो. काय होणार ? कोण होणार ? हे कोणाला माहिती नसते. " तुझे बाबा डॉक्टर आहेत , म्हणून तुला डॉक्टर व्हायला लागेल. नाहीतर हा एवढा मोठा डोलारा कोण सांभाळणार ? " अशी वाक्यं ऐकायला मिळतात. मग त्या मुलाला डॉक्टर होण्याशिवाय पर्याय उरत नाही. शेवटी उपजीविकेचे साधन म्हणून डॉक्टरी पेशा त्याला स्विकारणे भाग पडते. असेच इतर सर्व बाबतीत घडत असावे.
शिक्षक शिक्षिका असलेल्या आईबाबांना आपली मुलं शिक्षण क्षेत्रात किंबहुना शिक्षकी पेशात पाठवायला कितपत आवडतील हा सुद्धा एक प्रश्नच आहे. त्यांचा पाल्य आपल्या आईबाबांची वाटचाल बघत असतो. त्यामुळे की काय त्याला तो व्यवसाय स्वतःहून स्वीकारावासा वाटत नाही. ते म्हणतात , " शिक्षकी व्यवसाय सोडून मी दुसरे काहीही करेन. " आईबाबा सुद्धा त्याला दुजोरा देत असतील. कारण त्यांनी भोगलेले त्यांच्या मुलांनीही भोगावे असे त्यांनाही वाटत नाही. त्यांचा हाच उद्देश असेल , इतर कोणता उद्देश असेल असे वाटत नाही.
शिक्षकी पेशा हा पेशा आहे. तो धंदा नाही. ते एक समाजव्रत आहे. ते स्वीकारणे सोपे असू शकते , पण जोपासणे कठीण असू शकते. आपण या शिक्षकी पेशाला योग्य न्याय देऊ शकलो नाही तर त्याचा आपल्यालाच त्रास होऊ शकतो.
' थ्री ईडीएट्स ' चित्रपटात एका मुलाला फोटोग्राफीची आवड असूनही वडिलोपार्जित व्यवसाय करण्यासाठी आग्रह धरला गेला. त्याला वडिलांच्या व्यवसायात अजिबात रस नव्हता. ज्यावेळी त्याचे वडीलच त्याला फोटोग्राफी करण्याची परवानगी देतात तेव्हा तो आपल्या करारी वडिलांना घट्ट मिठी मारुन आपला आनंद व्यक्त करतो.
मला लहानपणी जेव्हा प्रश्न विचारला जाई , " तू मोठेपणी कोण होणार ? " तेव्हा माझे उत्तर ठरलेले असे. " मी इंजिनिअर होणार ... " इंजिनिअर म्हणजे कोण ? हे मला त्यावेळी माहितीही नव्हते. कोणीतरी सांगितले होते म्हणून मला तसे बनायचे होते. माझे स्वतःचे त्यावेळी नक्की कोणते मत होते ते सांगणे कठीण आहे.
मी शिक्षक झालो आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न हवेत विरुन गेले. मी इंजिनिअर झालो नाही ते एका अर्थाने बरेच झाले. कारण शिक्षक झाल्यामुळे माझ्या हाताखालून अनेक इंजिनिअर बनू शकले आहेत.
मी शिक्षक झालो म्हणून मला आज आदर मिळतो आहे. शिक्षक नसतो तर हा आदर नक्कीच मिळाला नसता. हल्ली या आदराचे प्रमाण खूप कमी झाले आहे. शिक्षकाला अध्यापनाव्यतिरिक्त कामे करावी लागत असल्याने त्याचे हे असे झाले असावे. कोणीही शिक्षकांबद्दल काहीबाही बोलू लागले आहेत. त्यात चांगलं कमी आणि बोचेल असे जास्तीचे आहे. त्यामुळे आपली अशी समाजात होणारी अवहेलना पाहून तो ' दीन ' होत चालला आहे.
कितीही चांगले काम केले तरी शाबासकीची थाप मिळणे दुर्मिळ झाले आहे. अर्थात अपवादात्मक असू शकेल , पण हे प्रमाण कमी झाले आहे असे राहून राहून वाटते.
आजही शिक्षक दिनानिमित्त अनेकांचे शुभेच्छा संदेश येतात. फोन येतात. हे लिहीत असतानाच मला एक फोन आला. त्यांनी मला शिक्षक दिनाच्या मनस्वी शुभेच्छा दिल्या. मी भरुन पावलो. मी त्यांना शिकवलेच नव्हते , तरीही त्यांनी मला फोन केला होता. त्यांनी मला वैयक्तिक फोन केला असला तरी मी तो सर्व शिक्षकी पेशालाच फोन आला होता असे समजतो. अजूनही कुठेतरी शिक्षकांबद्दल आदर जिवंत असल्याचे ते एक उदाहरण आहे. प्रत्येकाने असाच शिक्षकांबद्दलचा आदर दाखवण्याची गरज आहे. शिक्षकांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे.
आपल्या शिक्षकांनी जर आपल्या लेकरांना शिकवायचे असेल तर जनमानसातून शिक्षकांना पाठिंबा मिळायला हवा. शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या विरोधात शिक्षकांनीच उभे राहण्यापेक्षा शिक्षकेतर सर्वांनीच ठाम उभे राहिल्यास शिक्षक पूर्णवेळ वर्गात शिकवू शकेल. पुन्हा एकदा अशी क्रांती घडेल याची वाट बघण्याशिवाय माझ्यासारख्या शिक्षकाला दुसरे काहीही करता येत नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 )

Saturday, May 27, 2023

🛑 एका तेजस्वी सूर्याचा खडतर प्रवास : सुर्यकांत चव्हाण

🛑 एका तेजस्वी सूर्याचा खडतर प्रवास : सुर्यकांत चव्हाण 

           " मुलाचे पाय पाळण्यात दिसतात " असे म्हटले जाते. अर्थात मुलाचे पाळण्यात हलणारे पाय बघूनच अशी कल्पना करण्यात येते. हळूहळू मोठा होताना त्याचे गुण अधिक लक्षात येत राहतात. मुलं नुसती वयाने आणि वजनाने मोठी झालेली कोणालाही आवडणार नाहीत. त्यांनी वर्तमान आणि भविष्य उजळून टाकावं असं भव्य दिव्य करावं अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यामुळे प्रेरणा देत देत मुलांचं भविष्य घडवणं हे मोठ्यांचं आद्यकर्तव्य ठरतं. 

          ग्रामीण भागातील मुले विशेषतः तावून सुलाखून निघालेली असतात. विविध संकटांचा सामना करुन वज्रासारखी बनून जातात. गरीबी असली तरी त्यात सुखासमाधानाची भाकरी खाण्यातला आनंद विरळाच. 

          सुर्यकांत चव्हाण हे माझे भावोजी. मोठ्या मामांच्या मोठ्या मुलीचे पती. त्यांचा जन्म हिवाळे गावात झाला. वडिलांच्या तुटपुंज्या मिळकतीत पाच मुलांना उच्च शिक्षण देत मोठं करणं सोपी गोष्ट नव्हतीच. पण शिक्षणच आपणांस चांगले दिवस दाखवू शकतं हा ठाम विश्वास वडिलांनी सदैव बाळगला होता. मुलं मोठी मोठी होत गेली आणि शिक्षण घेता घेता कधी समंजस झाली ते वडिलांनाही कळलं नाही. 

          वडिलांनी मग आपली आणि कुटुंबाची जबाबदारी मोठ्या सुर्यकांतवर सोपवली. सुसंस्काराने वाढलेले झाड वाढायचे थांबत नसते. सुर्यकांत आणि त्यांची भावंडे जिद्दी होती. त्यांनी आपल्यावर आलेली जबाबदारी आनंदाने स्वीकारली.

          वडील आजारी पडले आणि मोठ्या सुर्यकांतने कुटुंबाची स्विकारली. सर्वांची लग्न लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. मोठा असल्यामुळे  स्वतः सुर्यकांत यांचा नंबर होता. माझी मोठी मामेबहिण सुर्यकांत यांच्याशी विवाहबद्ध झाली. 

          घर अगदी जुनेच होते. सुर्यकांत भावोजी कणकवलीत खाजगी नोकरी करत होते. मोठमोठ्या प्रोजेक्टची इंजिनिअरिंग डिझाईन करण्यात ते पटाईत होते. एकदा मला त्यांच्या त्या ऑफिसमध्ये जाण्याचा योग आला होता. तेव्हा मी त्यांचे काम अगदी जवळून पाहिले आहे. खाजगी नोकरी करत असताना एवढ्या मोठ्या कुटुंबाचा गाडा ओढताना त्यांना त्यांच्या भाऊरायांची साथ लाभली. 

          बांदा हायस्कुलमध्ये  सुर्यकांत रुजू झाले. एक भाऊ , एक वहिनी शिक्षिका आहेत. एक भाऊ इलेक्ट्रॉनिक दुकान चालवता चालवता जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. वित्त व बांधकाम सभापती झाले. एक बहिण आरोग्य विभागात नोकरीला लागली. एक बहीण पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये लेक्चरर झाली. सुर्यकांत यांचा सूर्य उगवू लागला होता. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. पत्नीची जबरदस्त साथ त्यांना वेळोवेळी मिळत होतीच. 

          जो प्रामाणिकपणे काम करतो , त्याच्या कार्याचा नक्कीच गौरव होत असतो. सुर्यकांत चव्हाण  बांदा हायस्कुल मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून  या पदावर काम करत असताना त्यांनी स्वतः अनेक प्रयोग करुन पाहिले आहेत. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी जिल्हास्तरावर नंबर यावा लागतो. आपल्या ज्ञानाच्या आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी सहा वेळा राज्यस्तरासाठी निवड झाली एक वेळा राज्यात उत्तेजनार्थ तिसरा क्रमांक व यावर्षी राज्यात तिसरा क्रमांक मिळाला. ही यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. यश मिळवत राहणे हे त्यांच्या रक्तात भिनलेले आहे. कितीही यश मिळवले तरीही त्यांना अहंकार नाही. त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. 

          यावर्षी होणाऱ्या माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत त्यांनी सहभाग नोंदवला आहे. ते उमेदवार जिल्ह्यासाठी इतर मागास प्रवर्गातून(OBC) उभे आहेत. त्यांनी केलेलं शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहेच. त्यांच्या अभिनव ज्ञानाचा उपयोग बँकेच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि पर्यायाने सभासदांच्या विकासासाठी नक्कीच होईल असा विश्वास वाटतो. हा विश्वास प्रत्येक मतदारालाही वाटेल यांत तिळमात्र शंका वाटत नाही. 

          शिक्षक बंधु आणि भगिनींनो , आपण आपल्या एका तळागाळातील कार्यकर्त्याला जिल्हा उमेदवार म्हणून निवडून द्याल आणि बँकेच्या तख्तावर बसवाल अशी कळकळीची विनंती करतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( पदवीधर शिक्षक , शिडवणे नं.१ )





🛑 दारु आणि मी

🛑 दारु आणि मी

          दारुबद्दल लिहायचे असेल तर दारु पिणाऱ्याबद्दल लिहिले पाहिजे असे बिल्कुल नाही.  दारु बनवणाऱ्यांची घरे , दारु विकणाऱ्यांची दुकाने चालली पाहिजेत म्हणून की काय काही लोक त्यांची दया येऊन दारु पित असावेत. तंबाखूमुक्त चळवळ जशी सुरु असते , तशी दारु विरोधी चळवळी सुरु असतात. 

          क्वचित एखादा चित्रपट असेल की ज्यात दारु दाखवली नसेल. आजच्या काळातील प्रत्येक चित्रपटात तिचा बेसुमार वापर केलेला दिसून येतो. सकाळ ते रात्री कोणत्याही वेळीचा प्रसंग असो , त्यात तिला मोठं स्थान दिल्याचं जाणवतं. पुरुषच काय , पण काही चित्रपटात स्त्रिया सुद्धा पिताना दाखवल्या जातात. 

          Drinking of Alcohol is injurious to health असं वाक्य चित्राच्या खाली बारीक अक्षरात लिहायला अजिबात विसरले जात नाही. आता ती मदिरा पिणे ही फॅशन आणि पॅशन झाली आहे. उलट ही मदिरा न पिणाऱ्यांची हसून खिल्ली उडवली जाते. 

          " अहो , महाशय , तुम्ही किती मागे आहात ? जरा पुढे जा आता !!! " हे वाक्य ऐकून जर तुम्ही घ्यायला किंवा प्यायला गेलात तर तुम्ही नक्कीचे पुढे जाणार हे ठरलेले आहे.   हे पुढे जाणं विनाशाच्या दिशेने असणार आहे हेही लक्षात असू द्या. 

          एकदा माझ्या जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला चाललो होतो. एसटीतून प्रवास सुरु होता. मला गाडीत दारुचा घाणेरडा वास आला. मी मागे वळून पाहिलं. कोणीतरी हळूच पित असल्याचे समजले. मला तो घाण वास सहन होईना. मी कासावीस झालो होतो. प्रवास कधी एकदा संपतो असे मला झाले होते. मी काहीही करु शकत नव्हतो. शेवटी प्रवास संपल्यावर एसटीतून उतरताच मी सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. 

          हल्ली पिणारी माणसे तिचा घाण वास येऊ नये म्हणून तीव्र वासाचे सेंट लावतात. त्यामुळे आणखी तयार झालेल्या मिश्रित वासाचा सामना करत राहावा लागतो. त्यांना बिचाऱ्यांना सवय झालेली असते , त्यामुळे त्यांना स्वतःला त्याचे काहीच वाटत नसावे. पण त्यांच्या सोबतीने जाण्याचे दुर्भाग्य लाभलं तर काही खरं नाही. 

          आपल्याला तशा अनेक सवयी असतात. त्यापैकी ही पिण्याची सवय असली तर ती घातक असू शकते हे लक्षात घ्यावे. कित्येकांचे संसार या अतिपिण्याने उध्वस्त झाल्याचे मी प्रत्यक्ष बघितले आहेत. दारु पिणाऱ्या माणसाला एकदा दारु पिऊ लागली कि तो माणूस संपलाच असे समजावे. 

          त्यादिवशी एके ठिकाणी एक चांगले इस्त्रीचे कपडे घातलेला चांगल्या घरातील माणूस दारु पिऊन रस्त्यात पडलेला मला दिसला. त्याचा हा अवतार बघून येणारे जाणारे लोक त्याच्याकडे तुच्छतेने बघताना दिसत होते. अगदी मीही. या दारुमुळे माणसाचं एका झटक्यात काय घडते ते पहा. 

          कधीकधी माझी छोटी मुलगी मला म्हणते , "  पप्पा , तुम्ही जर कधी दारु पिऊन घरी आलात ना , तर तुम्हाला मी अजिबात घरात घेणार नाही." तिचंही बरोबर आहे. तिलाही आता अशी माणसं चित्रपटात , यु ट्युबवर दिसत असतात. अशा पिणाऱ्या माणसांचा लहान मूलसुद्धा तिटकारा , तिरस्कार करत असतं हेही लक्षात असू द्या. 

          काही लोक तर सकाळी उठले की त्यानेच तोंड धुतात. उठले की सुटले. जोपर्यंत पित नाहीत , तोपर्यंत त्यांना बरे वाटत नाही. प्यायलेले नसले की ते थरथरत उभे राहतात , पुरेशी प्यायले की नीट उभे राहतात एवढी त्यांना सवय झालेली असते तिची. या सवयीच्या अधीन झालेल्या लोकांचं काय करायचं ते समजण्याच्या पलीकडचे आहे. 

          एकदा एक पोट धरुन हसवणारा नट कणकवलीत येणार होता. आम्ही त्याचे फॅन होतो. अर्धा तास लवकरच आम्ही त्याचा कार्यक्रम बघायला गेलो होतो. अजून तो नट आलाच नव्हता. नंतर कुणीतरी हळूच बोलताना ऐकू आले. तो पीत बसला होता. त्याचे पेग संपल्यावर तो आला. पण त्याचा कार्यक्रम बकवास झाला. पुन्हा तो पित असल्याचे समजल्याने त्याच्याबद्दलचा आमचा आदर कमी झाला तो कायमचाच. 

          काही माणसं पितात , पण अजिबात कळू देत नाहीत. या माणसांचा कोणालाही अजिबात त्रास नसतो. अशा माणसांना अति ताण आणि तणाव असतात , म्हणून ते पितात असे म्हटले जाते. पिल्यामुळे त्यांचा ताणतणाव कुठल्या कुठे पळून जातो असे तेच सांगतात. 

          या जगात ताण तणाव सगळ्यांनाच असतात. म्हणून दारु पिण्याचा मार्ग अवलंबून स्वतः बरोबर कुटुंबाची वाताहात करणे अजिबात समर्थनीय नाही. 

          जगात अशी दुःखी माणसे असंख्य असू शकतात , म्हणून ती सगळी दारु पिणारी आहेत का ? नाही ना ? अशा दुःखाचा सकारात्मक सामना करणाऱ्या माणसांकडे बघून तरी या माणसांनी आपल्या दुष्ट मैत्रिणीची साथसंगत सोडली पाहिजे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🛑 इस्त्री आणि मी

🛑 इस्त्री आणि मी

          लहानपणीपासून कपड्यांना इस्त्री करण्याची सवय लागली आहे. स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करुन घालायचे. त्यावेळी इस्त्री कुठे होती ? पितळेचा तांब्या होता. त्यात पेटते निखारे घालायचे. थोडी फुंकर मारुन निखारे फुलवायचे. तांब्याचा तळ चांगलाच तापतो. त्यासोबत धातूच्या उष्णता संक्रमणामुळे तांब्याच्या तोंडापर्यंत उष्णता जाणवे. हात चांगलेच भाजत. ते भाजू नयेत , म्हणून ' भानशिरे ' घेतले जाई. भानशिरे म्हणजे जुना कापडी सुती फडका असे. तो चुलीवरची भांडी उचलून उचलून काळाकुट्ट झालेला असे. 

          इस्त्री करुन सुरकुत्या घालवून शर्ट , पॅन्ट छान दिसत. शाळेचा गणवेश जुना असला तरी नवीन वाटे. शाळेत जाताना पॉश कपडे घातल्याचा अनुभव येई. इतर मुलांचे नवनवे युनिफॉर्म बघून माझे इस्त्री केलेले कपडेही फिके पडत. 

          इस्त्री करुन करुन कपडे कोरम होत. शर्टाची कॉलर विरघळे. पँटीचा रंग बदलून जाई. पण पँट , शर्ट दोन्ही पूर्ण फाटेपर्यंत वापरावे लागत. उसवले तर बाबा शिवून देत. फाटले तर रिपू करावा लागे. हा रिपू कसातरीच दिसे. तरीही फाटक्या कपड्यांपेक्षा रिपू केलेले कपडे वापरणे केव्हाही चांगले. आता हे फाटलेले कपडे किंवा नको तिथे ठिगळ , रिपू ही फॅशन झाली आहे. 

          तांब्यानंतर बाबांनी हप्त्यावर एक साधी इस्त्री घेतली. तिला विजेची आवश्यकता असे. भाड्याने राहत असल्याने मालकांच्या परवानगीने लाईट वापरावी लागे. या नवीन इस्त्रीने इस्त्री करताना मजा येई. पटापट इस्त्री करता येई. कपडे आणखी चांगले दिसत. मामांकडे आजोळी माझे मामेभाऊ कसे इस्त्री करतात ते मी नीट बघून ठेवले होते. त्या निरीक्षणाचा उपयोग झाला. 

          आम्ही सर्व भावंडे इस्त्री करुनच कपडे वापरत असू. आता ऑटोमॅटिक इस्त्री आहे. ती कमी जास्त करता येऊ शकते. ती हलकी व सहज करता येण्यासारखी सुलभ आहे. 

          इस्त्री करताना आपण इतर काहीही करत नसतो. म्हणून मी नेहमी गाणी ऐकत इस्त्री करत असतो. आता मला ती सवयच जडली आहे. इस्त्री , गाणी आणि मी असे समीकरण झाले आहे. एखाद्या वेळी मी इस्त्री करताना गाणी लावली नाही तर माझ्या मुली मला विचारतात , " पप्पा , आज गाण्याशिवाय इस्त्री करताय , कमाल आहे ? " एवढी मला सवय झाली आहे म्हणजे बघा. 

          इस्त्री करताना मी अनेकदा भूतकाळात जात असतो. जुनी आणि मला नेहमी आवडणारी गाणीच मी ऐकत असतो. त्या गाण्यांचीही सवय झाली आहे म्हणा ना !! ही गाणी ऐकता ऐकता मी भराभर इस्त्री करत जातो. माझ्या आठवड्याच्या कपड्यांचा ढिग पडलेला असतो. 

          सलग दोन तासांचा हा इस्त्रीचा कार्यक्रम गाण्यांसह सुरुच असतो. इस्त्री कपड्यांच्या सुरकुत्या घालवत असते आणि गाणी माझ्या मनावरच्या. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर





Thursday, May 25, 2023

🛑 मोटू और पतलु की जोडी

🛑 मोटू और पतलु की जोडी

          बालपणी साधारण हिंदी भाषा समजू लागल्यानंतर ' लोटपोट ' हे हिंदी बाल मासिक हाती आले. कणकवली एस.टी. स्टँडवर असलेल्या पेपर स्टॉलवर हे मासिक मला पाहायला मिळाले. मी ते एकदा घेतले. त्यातील चित्रे आणि हिंदी भाषा जवळची वाटत गेली. 

          मुखपृष्ठावरील मोटू आणि पतलु या दोन कार्टून्सची चित्रे मला आकर्षित करु लागली होती. हळूहळू ही दोन्ही पात्रे माझे मित्र कधी झाली मला समजलेही नाही. मी वाचत गेलो आणि पुनःपुन्हा वाचतच राहिलो. एखाद्या महिन्यात ' लोटपोट ' आले नाही तर मी खट्टू होऊन परत येत असे.  मासिक वाचताना खरंच मी लोटपोट होऊन जात असे. आता हे मासिक जिओ मॅगझीन यावर ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध आहे. त्याचे वाचन करत गेलात तर तुमची हिंदी नक्कीच सुधारु शकते. 

          लहान मुलांनी अवांतर वाचन करणे ही आजची गरज आहे. आम्ही आमच्या लहानपणापासून ही वाचनाची आवड जोपासली आहे. मिळतील ती पुस्तके वाचून संपवली आहेत. सर्वच पुस्तके आता लक्षातही राहिली नाहीत. मराठीप्रमाणेच हिंदी वाचन करणेही गरजेचे आहे. कारण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. इंग्रजीकडे जास्त लक्ष देण्याच्या हव्यासापोटी हिंदीकडे होत असलेला दुर्लक्ष नाकारुन चालणार नाही. 

          लोटपोट सारखी बालमासिके वाचून आपण आपलं हिंदी भाषेतील ज्ञान वाढवत जाण्याची हिच वेळ आहे. आता सर्वकाही इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे इंटरनेटचा असा फायदा करुन घ्यायला हवा. उगीचच निरर्थक सर्फिंग करणे थांबवायला हवे. सर्वच गोष्टी गुगल करण्याची वाईट सवयसुद्धा सोडून द्यायला हवी. 

          एलईडी टिव्ही नावाच्या आयताकृती वस्तूसमोर बसून संपूर्ण दिवसभर कार्टून्स बघणारी मुले बघितली तर पुढील भावी पिढीची चिंता सतावते आहे. काय करायचं या मुलांचं ? कसं होणार या मुलांचं ? हे आणि असे अनेक प्रश्न प्रत्येक पालकाला पडत असावेत. टिव्ही बंद केला तर , मोबाईल आहेतच. मोबाईलच्या छोट्या स्क्रिनवर डोळे मिचिक मिचिक करत का होईना कार्टून्स आणि रिल्स बघणे सुरुच राहते आहे हा खरा घोळ आहे. 

          एका गोष्टीवर निर्बंध घातले तर दुसरी चुकीची गोष्टच करण्याकडेच मुलांचा कल असतो. त्यांना एखादी गोष्ट करु नका म्हटले तर तीच गोष्ट ती पुनःपुन्हा करत राहतात. मग आपणच कंटाळतो. विषयच सोडून देतो. काय करायचं ते करा असे म्हणत वैतागत आणि चरफडत राहतो. 

          आमच्याकडे बऱ्याचदा ही ' मोटू पतलु' मालिका सुरु असते. त्यातली पात्रं कमालीची आकर्षक आहेत. स्वतः मोटू हा धाडसी आहे. आपल्या ताकदीच्या जोरावर तो कितीही मोठ्या संकटांचा सामना करण्यास पुढे सरसावतो. समोसे खाल्ल्याशिवाय त्याला ताकद येत नाही. तो समोसे कधी चावताना दिसत नाही. तो समोसे गिळतो. आपल्याला असं समोसे गिळंकृत करणं या जन्मात तरी शक्य नाही. 

          पतलु हा त्याच्या नावाप्रमाणे बारीक आहे. तो अतिशय हुशार आहे. त्याने सुचविलेल्या युक्त्या भन्नाट असतात. या दोघांची जोडी म्हणूनच बालांच्याच नव्हे मोठ्यांच्याही मनावर अधिराज्य गाजवत आहे. तुम्ही अगदी कंटाळून घरी आलेले असाल तर ' मोटू पतलु' ही मालिका बघा. तुमचा सगळा शीण कुठल्या कुठे निघून जाईल. 

          त्यांच्यासोबत कायम ' चिंगम ' नावाचा पोलीस अधिकारी असतो. तोही अफलातून कॉमेडी दाखवला आहे. मोटू पतलु या द्वयींच्या मदतीने तो अनेकदा दुष्टांना पकडताना दिसतो. त्याने आपल्या बंदुकीने झाडलेली प्रत्येक गोळी नारळ पाडल्याशिवाय राहत नाही. नारळाचे झाड जवळपास नसले तरी नारळ पडतात त्यामुळे गंमत वाटत राहते. 

          डॉ. झटका यांची संशोधने हटके असतात. प्रयोग करताना होणाऱ्या गमतीजमती पाहताना हसू अजिबात आवरत नाही. ' यार ' हा त्यांच्या तोंडी दिलेला नेहमीचा शब्द तुमच्याही तोंडात कधी येईल ते सांगताही येणार नाही. सोबत घसीटाराम असतो. हे पात्र सुद्धा अवलीच आहे. 

          जॉन आणि त्याच्यासोबत असलेले दोन सहकारी काहीतरी कुरघोडी करण्यात पटाईत असतात. ' जॉन बनेगा डॉन ' असं म्हणत तो मोटू पतलु यांना नामोहरण करण्याचा सदैव प्रयत्न करतात. पण त्यांचे फंडे त्यांच्यावरच उलटतात. त्यामुळे गंमत वाढत राहते. 

          या पात्रांच्या हालचाली मजेशीर असतात. ते आकाशात स्वैरपणे संचार करतात. गाडीखाली सापडले तर त्यांची चपाती होते. पण ते कदापि मरत नाहीत. अशी ही सुखांतिका असलेली बालमालिका अतिशय मनोरंजक आणि हिंदी भाषा बोलण्यास प्रवृत्त करणारी आहे. आपणांस वेळ असेल तर आपणही ही ' मोटू और पतलु की जोडी ' जरुर पाहा आणि हास्याचे फवारे उडवून आपलं रक्त शुद्ध करा. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🛑 अभिनंदन तुमच्या मुलांचं आणि तुमचंही

🛑 अभिनंदन तुमच्या मुलांचं आणि तुमचंही

          दहावी , बारावीचा रिझल्ट लागला. म्हणजे मराठीत निकाल लागला असे म्हणायचे ना ? 

          अनेक मुलांनी टॉप केलेले आहे. अनेकांनी मेडियम यश प्राप्त केलं आहे. स्वतःची सर्वसामान्य बुद्धिमत्ता आहे असे वाटणाऱ्या मुलांनीही काठापेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत. सर्व मुलांचं खरंच मनापासून अभिनंदन. त्यांच्या पालकांचं त्याहीपेक्षा जास्त अभिनंदन. 

          मुलांच्या आणि पालकांच्या दोहोंच्या परीक्षेचा आनंददायी निकाल लागल्यासारखे वाटते आहे. सर्वांनी आपल्या मुलांची गुणपत्रके स्टेटसवर ठेवून अधिक आनंद व्यक्त केलेला आहे यातच सगळे आले. सर्वांचे स्टेटस मुलांचे अभिनंदन करताना दिसत आहेत. हे अभिनंदन होत असताना मार्क्स मिळवणाऱ्या मुलांना कित्ती आनंद होत असेल नाही ? आजचे स्टेटस उद्या किंवा परवा असणार नाही. परंतु हे जबरदस्त स्टेटस कायम ठेवण्याची मुलांची आणि पालकांची जबाबदारीही वाढली आहे हे नक्की. त्यामुळे पुढील आयुष्याची शिखरं पादाक्रांत करताना दहावी , बारावीचे गुण महत्त्वाचे ठरणार आहेत. कोणत्या शाखेत ? किती गुण ? ग्रुपमध्ये किती ? आता पुढे काय ? अजून थोडे अधिक गुण मिळाले असते तर ? तू डॉक्टरच हो , नको नको इंजिनिअरिंग कर. त्यापेक्षा स्पर्धा परीक्षा दे. हे आणि अशा अनेक प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावं लागणार आहे. यांची उत्तरे देतानाही नाकीनऊ येणार आहेत असे दिसते आहे. 

          शिक्षकांनी केलेले प्रयत्न , शाळेने केलेले प्रयत्न , संस्थेने केलेले प्रयत्न यांचा सर्वांचा कस लागलेला आहे. यांना यशाची आणि अपयशाची मोजणी करावी लागणार आहे. यापुढे अजून यश मिळवण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे. स्पर्धेत ' पळा पळा , कोण पुढे पळे तो ' असं सगळीकडेच बघायला मिळते आहे. 

          अभिनंदन आणि सत्कार यांचीही स्पर्धा सुरुच राहणार आहे. जास्त टक्के मिळवणारे आणि शिक्षणासाठी जास्त पैसे मोजू शकणारे मोठे कोणीतरी होतील यांत शंकाच नाही. परंतु जास्त गुण मिळवूनही केवळ पैशाची कमतरता असल्यामुळे , आर्थिक परिस्थितीमुळे सोपा कोर्स निवडताना दिसणार आहेत. कृपया त्यांनीही आपल्या मार्कांच्या जोरावर  चांगल्या व्यावसायिक प्रशिक्षणाला प्रवेश घ्यायला हवा. जे आपल्याला जमू शकतं , जे आपल्याला आवडतं , ते करण्याचा प्राधान्याने विचार करावा. उगीच दुसरे सांगतात , म्हणून कोणताही कोर्स जॉईन करणे आवश्यकच आहे असे नाही. तो कोर्स तुमच्यासाठी आवश्यक असेल , तर त्याचा थोडाबहुत अभ्यास करुन तो करावा की नाही ते जरुर ठरवावे. उगीच भावनिक होऊन एखादा अभ्यासक्रम सुरु करायचा आणि कंटाळा आला , जमत नाही असे म्हणून सोडून देण्यापेक्षा आधीच सारासार विचार करावा. 

          प्रत्येकवेळी मोठ्या पॅकेजचा विचार करणेही चुकीचे आहे. आपल्याला ज्या पॅकेजमध्ये मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही समाधान मिळू शकेल असे पॅकेज जरुर निवडावे. 

          काही मुले दहावी किंवा बारावी नंतर जॉबचा पर्याय निवडताना दिसतात. घरातील आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना ते करावे लागू शकते. पण जॉब करता करता मुक्त विद्यापीठ जॉईन करता येते. आपल्याला हवे असेल ते शिक्षण घेण्याचा पर्याय शिल्लक आहे हे विसरू नये. नोकरी मिळाली तरी शिकतच राहावे. उच्चशिक्षण घेतले तर ते कधीही फुकट जात नसते. उलट तुमच्या पुढील वैभवशाली जीवनाला त्याने सुडौल आकारच मिळणार असतो. 

          सध्या मुली मुलांपेक्षा अधिक बाजी मारताना बघून सावित्रीबाई फुले यांची जास्त प्रकर्षाने आठवण होते आहे. फेसबुक , व्हाट्सएपच्या जगात आपल्याला मिळालेल्या लाईक्सना , कमेंट्सना महत्त्व नसून आपण एक महत्त्वाची परीक्षा पास झालो हे जास्त महत्त्वाचे आहे नाही का ? आता तुम्ही सोळा किंवा अठरा वर्षांचे झाला आहात , तुम्ही या भारताचे एक जागरुक नागरिक बनत चालला आहात हेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी खूपच वाढली आहे. तुम्ही आता लहान नाहीत. तुम्ही आता खऱ्या अर्थाने मोठे झाला आहात. तुम्ही वयाने मोठे झालात , ज्ञानाने मोठे झालात , आता मनानेही मोठे व्हा. समंजस , जिद्दी आणि सकारात्मक विचारसरणी अंगीकारा. तडजोड करायला शिका. आभासी दुनियेतून बाहेर पडा. उघडे असलेले डोळे अधिक व्यवस्थित उघडा आणि जगाकडे जाणीवपूर्वक सजगपणे बघा. तुम्ही मोठे आणि अधिकाधिक मोठे होणार हे फक्त तुमच्यावरच अवलंबून असतं. शुभेच्छा तुम्हाला या सर्वांसाठी. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं.१



Tuesday, May 16, 2023

🛑 भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे भाग्य

🛑 भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे भाग्य

          गेल्या महिन्याभरात सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीची निवडणुकीची रणधुमाळी , प्रचार आणि प्रत्यक्ष भेटी यांच्या तोफा धुमधडाक्यात सुरु होत्या. 

          कालच निकाल लागला. दोन पॅनेलमध्ये जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली. सर्व शिक्षक आपलेच आहेत. सर्वच शिक्षक हे प्राथमिक शिक्षक बँकेचे विद्यमान सदस्य आहेत. सर्व शिक्षक आपल्या बँकेवर अतिशय प्रेम करतात. शिक्षक बँक आहे म्हणून आपण आहोत असे म्हटले तरी अनेकांच्या बाबतीत ते अगदीच खरे ठरेल. ती आहे म्हणून आपण तिच्या एकटीच्या जीवावर कर्ज काढून घरे , लग्ने आणि आरोग्य विषयक अडचणींना तोंड देत आहोत. त्वरित कर्ज देणारी व कमी व्याज दर असणारी दुसरी बँक मला तरी माहिती नाही. 

          बँक चालवण्यासाठी त्यावर संचालक निवडून दिले जातात. बहुतेक चार वेळा सत्ता उपभोगणारे भाग्यलक्ष्मी सहकार पॅनल पाचव्या खेपेला बहुमतांनी निवडून येणे ही सोपी गोष्ट नव्हतीच. मतदार कधीही तेच तेच चेहरे पाहण्यास उत्सुक नसतात. नवीन तरुण तडपदार उमेदवार त्यांना बँकेवर हवे असतात असाच काहीसा अनुभव येतो आहे. 

          विरोधकांनी निवडून येण्यासाठी केलेले प्रयत्न नाकारुन अजिबात चालणार नाही. त्यांचा निसटता पराभव आपल्याला विचार करायला लावणारा आहे. हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या मताधिक्याने निवडून आलेल्या उमेदवारांना कदाचित या आकड्यांनी धक्काही बसला असेल. निवडून आलो म्हणून आनंदही झाला असला तरी मताधिक्य नसल्याचे दुःख सलणार हे नक्कीचे आहे. याचा अर्थ पुढील काळात डोळ्यांत तेल घालून काम करावे लागणार आहे. 

          आपण मतदार शिक्षकांना जी वचने , आश्वासने दिली आहेत ती परिपूर्ण करण्याची जबाबदारी अधिक वाढली आहे. प्रचाराच्या वेळी जसे जोमाने काम केले होते , त्याच्याहीपेक्षा जास्त काम बँकेच्या खुर्चीत बसून निरपेक्षपणे करावे लागणार आहे. पारदर्शक काम करत असताना सामान्य शिक्षक सभासदाच्या हिताचा विचार प्राधान्याने करावा लागणार आहे. सर्वच सामान्य शिक्षक बँकेत फक्त कामापुरतेच जात असतात. कधीतरी जाणाऱ्या शिक्षकांना बँकेकडून मिळणाऱ्या सेवा सुसह्य आणि लाभदायक वाटत राहायला हव्यात. शिक्षक बँकेतील कर्मचारी वर्ग अतिशय चांगला आहे. फक्त फोन केला तरी हवी असलेली माहिती मिळत असते. कर्मचारी कामात असले तर थोड्या वेळाने पुन्हा फोन करुन माहिती देतात ही सुद्धा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. कणकवली शाखेतील गेल्या चार वर्षातील माझा अनुभव सकारात्मक आहे. मी सहसा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला क्वचित उपस्थित असतो. विरोधकांनी चुकत असलेल्या गोष्टींसाठी विरोध जरुर करायला हवा या मताचा मीही आहे. परंतु विरोधासाठी विरोध करणे हेही योग्य नाही. चांगल्या गोष्टींचे त्यांनी कौतुक करायला हवे. बँकेच्या चांगल्या निर्णयांना मंजुर करण्यासाठी विरोधकांनी सुद्धा हातभार लावणे ही आपल्या सर्व शिक्षक बंधु भगिनींच्या हिताचे आहे. 

          प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात. ती अनेकदा एकसारखी होत नाहीत , म्हणूनच संवादाचे विसंवादात रुपांतर होते. शेवटी बहुमतांनी निर्णय घेतला जातोच. काही बांधव नाराज होतात. त्यांना राजी करताना नाकीनऊ येतात. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना त्यांनाही त्रास होतोच. मग तेही पुन्हा प्रवाहात आणि प्रवाहाच्या दिशेने वाहण्यासाठी सिद्ध होतात. त्यामुळे पुन्हा सर्व पूर्वीसारखेच सुरु होणार अशा आशा पल्लवित होण्याची चिन्हे दिसू लागतात आणि आनंद द्विगुणित होत जातो. सर्वांनी आनंदाने राहावे हेच आनंदी जगण्याचे रहस्य असते. हे रहस्य समजत जाईल तसे सर्वच सर्वांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करत राहतील.

          भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचा सूर्य पुन्हा पाच वर्षांसाठी प्रकाशमान झालेला आहे. कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करताना सदैव चारित्र्यसंपन्न राहता यायला पाहिजे. जिथे शंका येण्याची जराशी शक्यता वाटत असली तर त्यावर अधिक विचारमंथन होऊन योग्य निर्णयाप्रत यायला पाहिजे. जिथे विरोध होऊ शकतो तीच दुखरी नस असते , ती दुखू न देणे हाच तो एकमेव पर्याय आहे. कोणतेही निर्णय हे व्यक्तिनिष्ठ न होता ते बहुमतांनी आणि एकमत होऊन पारित झाले पाहिजेत. अर्थात मला यांत जास्त तपशीलवार कळत नाही , पण माझा स्वतःचा वैयक्तिक फायदा होत नसेल तर ते मला कळणार नाही असेही नाही. 

          बँकेच्या तख्तावर भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलच्या तेरा जणांची वर्णी लागली आहे. भाग्यलक्ष्मीच्या तेराही उमेदवारांसोबत आणखी दोन आपले विरोधक शिक्षक मित्र सहभागी असणार आहेत. त्यांनाही सदैव सोबत घेऊनच कार्य करावयाचे आहे. त्या उभयतांनीही नेहमी आपल्या शिक्षक बँकेच्या हिताचाच विचार केलेला असणार आहे. 

          भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे भाग्य पुनश्च उजळले आहे. ते सदैव आणि अक्षय उजळत राहो अशी भाग्यलक्ष्मी चरणी प्रार्थना करतो. सर्व नवनिर्वाचित संचालकांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील पाच वर्षांच्या दैदिप्यमान वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( कणकवली ) ( 9881471684 )

Friday, May 12, 2023

🛑 सावंतवाडीचे पाईक : नारायण नाईक

🛑 सावंतवाडीचे पाईक : नारायण नाईक

          सर्व सृष्टी संकटाच्या खाईत असताना आठवण येते ती विष्णू नारायणाची. नारदमुनी तर ' नारायण नारायण ' असा नित्य जप करत असतात. भाग्यलक्ष्मी आणि नारायण यांचं नात सर्वानाच ज्ञात आहे. सावंतवाडीचे भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे विद्यमान उमेदवार नारायण नाईकसर हे भाग्यलक्ष्मीचे पाईक आहेत. निष्ठावंत आहेत. शांत आणि संयत व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण आविष्कार आहेत. 

          स्वतः नारायण रिंगणात उतरले कि विजय ठरलेला असतो. हा विजय ' न भूतो , न भविष्यती ' असणार असे भाकित केले तरी ते खोटे थोडेच ठरणार आहे. आपले सर्व शिक्षक बंधु भगिनी मतदार अतिशय सुज्ञ आहेत. ते जुन्या जाणत्या आणि तरुण तडफदार उमेदवारांचा संयोग असणाऱ्या उमेदवारांना निवडून देणार हे स्पष्ट आहे. 

          सावंतवाडी ही सुंदरवाडी आहे. ती अधिक सुंदर बनण्यासाठी शिक्षक बँकेत ' नारायण ' नाईक जिंकुन आले पाहिजेत. सावंतवाडी बँकेसाठी ' नारायण नावाचं अस्त्र नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. ज्यांच्या नावात नारायण असतो , ते सदैव अजिंक्य ठरल्याची उदाहरणे आहेत. 

          शिक्षक समितीच्या सभा , अधिवेशनात नारायण नाईक यांची आणि माझी पुसटशी भेट घडत राहते आहे. भेट सतत घडली नाही तरीही एका भेटीतही नारायण नाईकांचा प्रभाव पडण्याइतके ते प्रभावी नक्कीच आहेत. 

          ते आता आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत हेही विसरुन चालणार नाही. एवढ्या मोठ्या संघटनेचे महत्त्वाचे पद सहजासहजी मिळत नसते. त्यासाठी माणसांत नारायण असावा लागतो. नावाप्रमाणे हा ' नारायण ' त्यांच्यात आहे. आमच्या कणकवली शाखेच्या अनेक कार्यक्रमांना असलेली त्यांची हजेरी म्हणूनच सार्थ ठरते. " ते आले , त्यांनी पाहिलं , ते बोलले आणि त्यांनी जिंकून घेतलं " असंच काहीसं त्यांच्याबाबतीत घडताना दिसतं. 

          एखादं नाटक सुरु असावं आणि अचानक मुख्य नटाच्या घरात दुःखद घटना घडावी. दुःख झालं तरी ' शो मस्ट गो ऑन ' असं म्हणत डोळ्यांतील अश्रूंना आवर घालत प्रयोग पूर्ण करणं हे एका आदर्श अभिनेत्याचं कर्तव्य असतं. तसंच घडलं जिल्हाध्यक्ष नारायण नाईकांच्या बाबतीत. त्यांच्या घरात दुःखद घटना घडली होती. त्यांना दुःख अनावर झालं होतं. त्यांनी आपल्या दुःखावर मात करण्याचा प्रयत्न केला. पोटात अतीव दुःख होतं , पण ते ओठात न आणण्याचा प्रयत्न करत होते. कधीकधी असंही करता आलं पाहिजे. मोठी माणसे सर्वांसमक्ष रडत बसत नाहीत , त्यांचं रुदन आतल्या आत असतं. 

          जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळताना घरातील अशा घटनांकडे भावनाविवश न होता जिद्दीने , चिकाटीने सामना करत राहिले. शाळा , सभा , आंदोलने , मोर्चा यांत सामील झाले. संघटनेला जिल्हाध्यक्ष म्हणून कमतरता जाणवू दिली नाही. आपली उपस्थिती फक्त हजेरीपुरती मर्यादित न ठेवता अनमोल असे मार्गदर्शन करत राहिले. 

          असे कणखर ' नारायण व्यक्तिमत्त्व ' आपल्याला लाभले आहे हे आमचे भाग्य म्हणायला हवे. आम्ही सर्व शिक्षक बंधु भगिनी आमच्या या नारायण नाईकांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणणारच. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🛑 भाग्यलक्ष्मीचे खणखणीत नाणे : संतोष राणे

🛑 भाग्यलक्ष्मीचे खणखणीत नाणे : संतोष राणे 

          देवगड तालुक्यात असताना अनेक शिक्षकांच्या भेटी घडल्या. संतोष राणेसर यांची भेट तिथेच घडली. त्यांच्या पत्नी त्यावेळी चांदोशी शाळेत होत्या. मी त्याच तळवडे केंद्रात होतो. केंद्रसंमेलनाच्या निमित्ताने आम्ही चांदोशी शाळेत तीन ते चार वेळा तरी गेलो असेन. त्यावेळी मॅडम साटम नावाने आम्हाला परिचित होत्या. त्यांचे लग्न ज्यांच्याबरोबर झाले ते म्हणजे संतोष राणेसर. अतिशय दिलखुलास माणूस. हसरा चेहरा ही त्यांची विशेष ओळख. 

          शिक्षक समितीची सभा किंवा त्रैवार्षिक अधिवेशन असेल , तेव्हा संतोष राणेंचे प्रथम दर्शन झाले. त्यांच्या कार्याबद्दल जिल्ह्याचे पदाधिकारी भरभरुन बोलत होते. मी त्यांना अजिबातच ओळखत नव्हतो. त्या दिवसापासून त्यांचा हसतमुख चेहरा भावत गेला. त्यांनी स्वतः बद्दल सांगितले नाही. त्यांच्या शैक्षणिक कार्याने ते मला परिचित झाले. त्यांच्या भाषेतील माधुर्याने त्यांनी शाळा परिसरातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना , ग्रामस्थांना शाळेच्या उपक्रमात सक्रिय सहभागी होण्यास भाग पाडले होते. संतोष राणे गुरुजी मुलांचे साने गुरुजी ठरत गेले ते यामुळेच. जातील तिथे ते त्यांच्या कामाचा ठसा ठळकपणे उमटवून जातात. नंतर येणाऱ्या शिक्षकांना संतोष राणेंसारखे काम करणे म्हणूनच आवश्यक होऊन जाते. नाहीतर संतोष राणे सरांच्याच नावाचा उल्लेख सदासर्वदा कानी पडत राहतो. संतोष राणे आपले काम करत राहतात , त्यांचे काम बघून इतरांना तसे काम करण्याची आपसूकच प्रेरणा मिळत जाते. मलाही त्यांच्या कार्याने प्रेरणा मिळालेली आहे. 

          देवगड तालुक्यातील संतोष राणे हे सर्व शिक्षकांचं लाडकं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा मनुष्यसंग्रह अफाट आहे. एकदा ते मला ' नानासाहेब धर्माधिकारी ' यांच्या प्रतिष्ठानात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून पुन्हा दिसले. ते आपल्याला दिलेला विषय पोटतिडकीने मांडत होते. बोलून बोलून त्यांचा घसा बसला होता. येणाऱ्या सात आठ माणसांच्या गटाला तीच तीच माहिती पुन्हा पुन्हा सांगायची होती. परंतु न थकता संतोष राणे आपली जबाबदारी इमानेइतबारे पार पाडत होते. तिथे मला त्यांच्यातला एक अध्यात्मिक माणूस दिसला. शिक्षणातही अध्यात्म वापरता येतं या विचारांचा मीही आहे. अध्यात्माने त्यांच्या व्यक्तिमत्वात आलेला संयमीपणा जास्त दिसून येतो. मुखावर दिसणारे तेज चमकत राहते. मी ज्या शाळेत साडेतीन वर्षे अतिशय उत्साहाने काम केले , त्याच शाळेत ते सध्या आहेत. गोवळ गावठण शाळा. 

          संतोष राणे यांची निवड भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलने करुन दूरदृष्टीने विचार केलेला दिसून येतो. त्यांचा संयमी दृष्टिकोन आणि अध्यात्मिक विचारसरणी शिक्षक बँकेच्या यशात वृद्धी करण्यासाठी उपयोगी ठरेल हे नक्कीचे आहे. 

          माझ्या पत्नीच्या निधनानंतर माझे सांत्वन करण्यास ते आले होते. त्यामुळे मी त्यांना कसा विसरु ? माझा हात हातात घेताना त्यांच्याही डोळ्यांत अश्रुंची गर्दी झालेली मी पाहिलेली आहे. संकटकाळी मला त्यांनी दिलेला आधार मला मानसिक बळ देणारा ठरला. 

          असे दुसऱ्यांच्या दुःखात वेळीच आधार देणाऱ्या शिक्षकांपैकी ते एक आहेत. त्यांच्यासारखा संवेदनशील शिक्षक बँकेत असेल तर सर्वसामान्य शिक्षकांच्या गरजा पूर्ण होतील असे वाटते. संतोष राणे म्हणजे भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे एक खणखणीत नाणे आहे. हे नाणे नक्कीच प्रचंड निवडून येऊन गाजणार आणि वाजणार. संतोष राणेंच्या पाटीवर शिक्का मारुन त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणाल एवढीच आशा बाळगतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ,  कणकवली



💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...