Thursday, December 31, 2020

आंब्यार जाम

 आंब्यार जाम


          मिठबांवच्या निवासी शिक्षक प्रशिक्षणात रात्री सांस्कृतिक कार्यक्रम करावे लागत. दररात्री वेगवेगळ्या गटाकडे कार्यक्रम करण्याचे नियोजित असे. आमच्या गटाची पाळी आली होती. मला काहीतरी सादर करावेसे वाटू लागले. माझा मित्र सदानंद गांवकर हजरजबाबी आणि वक्ताही चांगला. त्याच्याशी बोललो. तो लगेच तयार झाला. 

          दोघांनी संवाद समजून घेतले. मी त्याला एकदाच समजावून सांगितले होते. पण त्याने तर बाजीच मारली. त्यात अधिक रंगत आणून त्याने केलेली मालवणी बतावणी अधिकच लक्षणीय ठरली होती. दशावतारी नाटकाच्या अगोदर लोकमनोरंजन करण्यासाठी ' शंकासूर ' येतो आणि लोकांना हसवतो. त्याच्या विनोदी बोलण्याने लोकांची हसून हसून मुरकुंडी वळते. 

          अर्थात शंकासूराचे काम करणारा तसा मिश्किल असावा लागतो. तो कोण आहे हे लोकांना समजत नाही. कारण त्याने बुरखा पांघरलेला असतो. त्याच्या आवाजाने ओळखणंसुद्धा कठीणच असतं. कारण शंकासूर आवाज बदलून कोणत्याही भाषेत बोलतो आणि मनाला येईल तसे बोलत जातो. 

          स्टेज डेरिंग येण्यासाठी नवीन आलेल्या कलाकाराला नाटकवाले ही भूमिका देऊन बोलकं करण्याचा प्रयत्न करतात. त्यात नाईकांची भूमिका बतावणीची असते. ते त्याला नीट समजावत समजावत मूळ मुद्द्यावर आणण्याचे महत्त्वाचे काम करतात. सदाने ही भूमिका अगदी पट्टीच्या नाईकाप्रमाणेच पार पाडली होती. 

          मी शंकासूर बनून आलो. मला बुरखा मिळाला नव्हताच. मी माझ्या लुंगीचा वापर केला. माझे तोंड दिसू नये, ते लपून राहावे असे झाकून घेतले. विचित्र हालचाली करत मी रंगमंचावर अवतीर्ण झालो. माझा अवतार बघूनच प्रेक्षागृहातून टाळ्यांचा कडकडाट झाला. मी लुंगीच्या आत खुश झालो. मी माझ्या संवादाला सुरुवात केली. 

          नायकांनो, ' तुमका सांगतंय, आंब्यार जाम , माडार गाय आनि समुद्रात वनवो दिसलो. ' या तिन्ही गोष्टी मी नाईकांना नीट समजावून सांगताना लोकं पोट धरुन हसताना पाहून मला आणखी चेव येत होता. आंब्यावर मला जाम दिसले. सगळीकडे जामच जाम होते. नंतर पुढे गेल्यावर मला माडावर गाय चरताना दिसली. पुढे समुद्रात वणवा पेटलेला दिसला. अशा असंबद्ध गोष्टी मी सांगत चाललो होतो. हालचालींनी प्रत्येक मुद्द्याला अधिक टाळ्या घेत होतो. 

          काही लोकांना हा संकासूर नवाच होता. त्यांनी कदाचित पहिल्यांदाच तो बघितला असावा. मी सुद्धा तो पहिल्यांदाच करत होतो. विद्यार्थीदशेत असताना अनेकविध भूमिका केल्या होत्या. नाईकांच्या सोज्ज्वळ भुमिकेत काम करणारा माझा मित्र सदानंद गांवकर अतिशय हुशारीने माझे म्हणणे खोडून काढत होता. मी सगळ्यांना ' पकवतोय ' या शब्दाने तर त्यानेच अनेकदा टाळ्या मिळवल्या होत्या. त्याने सर्वांना प्रत्येक गोष्ट समजेल अशी उलगडून दाखवली होती. 

          मी आपला त्याच्या प्रत्येक उत्तराला ' असा काय , माका वाटला तसा ' असं म्हणून हसणं उकळत होतो. सदाने नीट स्पष्टीकरण दिले होते. तो म्हणाला होता , " संकासुरा, अरे बाबा , तसा नायहा ... आंब्यार जाम म्हंजे एक माणूस जेवल्यावर आंब्यार चडलो, तेका जांभये येवंक लागले , म्हणून आंब्यार जाम ,  माडार गाय म्हंजे एक मानूस माडाच्या झाडावर माडी काडूक चडलो , तेना थोडी माडी पिल्यान , तो थयसर गावंक लागलो , म्हणून माडार गाय..... आणि शेवटचा समुद्रात वनवो म्हंजे आगीचो वनवो न्हय, समुद्रात जावंन पकडलले मासे वनवो रवान टोपलेत टाकूक लागलो, म्हणून समुद्रात वनवो , मेल्या तो वनवो न्हय. " असं करत करत त्याने माझी संकासूराची अक्षरशः दांडीच उडवली होती. 

          आमचा तो कार्यक्रम ७-८ मिनिटांचा होता, पण संपल्यानंतर सर्व मित्रांनी ' भारीच रे प्रवीण ' असा लगेचच प्रतिसाद दिला होता. मला मस्त वाटत होते. लोकांना हसवताना खूप मजा येते. लोक तसे लगेच हसत नाहीत. त्यांना हसवावे लागते. पण माझे मित्र खळखळून हसताना पाहून मला ' संकासूर ' वटवता आल्याचे समाधान वाटले. आयुष्यात असे अनेक संकासूर येतात, पकवतात. आपण नाईकांसारखे सावध राहिले पाहिजे. मी फक्त एक पात्र म्हणून ' संकासूर ' केला. बाकी मी काही खराखुरा संकासूर नाही.


© प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Wednesday, December 30, 2020

गोष्टींची कॅसेट

 गोस्तींची कॅसेत


          रत्नागिरीत माझ्या करिअरची मस्त सुरूवात झाली. नावाजलेल्या शाळेत नोकरीची संधी मिळाली होती. मी आनंदात होतो. राहण्याची सोय मामांकडेच झाल्यामुळे कोणतीच चिंता नव्हती. रत्नागिरीतील मामांना आम्ही ' बालामामा ' म्हणतो. त्यांची दोन मुले. एक मुलगी मनाली उर्फ गुड्डी. मुलगा मनिष उर्फ बबलू. 

          या दोन्ही मामेभावंडांनी मला माझ्या भावंडांची उणीव भासू दिली नाही. तो काळ खूप अनोखा होता माझ्यासाठी. नवीन नोकरी , नवीन घर, नवीन शाळा, नवीन नातेवाईक आणि नवनवे अनुभव यांनी माझी अनुभवांची शिदोरी दररोज भरुन जात होती. मी आपला साठवतच जात होतो. नवे नवे आकाश हवे , तसे घडत होते. कोकणनगर परिसर गजबजलेला असायचा. मामांचे शेजारीपाजारी चांगले होते. 

          साईबाबांची आरती करायला दर आठवड्यातून एकदा सगळ्यांकडे जायला मिळे. ओळख वाढली. ते मला चव्हाणांचा भाचा म्हणून ओळखू लागले. ' म्हाडा ' मध्ये नोकरीला असल्यामुळे मामा म्हाडाने दिलेल्या खोलीमध्ये राहात. खोली छोटी असली तरी मामा-मामींनी मला खुशाल राहू दिले होते. कधीतरी मी त्यांना लिखाणात मदत करत असे. मला त्यांच्या अधिकारी असण्याबद्दल अतिशय आदर होता. मामी भूमि अभिलेखमध्ये होती. दोघेही नोकरीला होते. नोकरी करताना त्यांची होणारी धावपळ मी अगदी जवळून पाहात होतो. नेहमी हसतमुखाने नोकरी करताना पाहून मी ही तसंच करु लागलो. 

          सहवासात राहणाऱ्यांचा चांगला वास मी माझ्या अंगाला नेहमीच लावून घेत गेलो. मामा मामी माझ्यासाठी आदर्श होते. राहणीमान कसे असायला हवे ते मी त्यांच्याकडून शिकलो. नीटनेटकेपणा, प्रमाणभाषेत बोलणं, इस्त्री करणं, योग्य खरेदी करणं, मोठ्या शहरात टू व्हिलर चालवणं, व्यवहारज्ञान इत्यादी गोष्टी मला त्यांनीच शिकवल्या. गुड्डी आणि बबलू यांच्याबरोबर खेळता खेळता त्यांची मला सवयच झाली. शाळेतून आल्यानंतर त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मजा येई. दोघांनाही भन्नाट प्रश्न पडत. त्यांचा अभ्यास घेताना मला विविधता वापरावी लागे. 

          मी त्यांच्यात इतका मिसळलो कि घरी आल्यानंतर मला मुले दिसली नाहीत तर बोअर व्हायला होई. त्यांनी लावलेला लळा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. घरी आले तरी मामा - मामी कामात मग्न असत. मग मी मुलांशी गप्पा मारत बसे. रोज गप्पा काय मारणार , म्हणून गाणी म्हणून दाखवी. एकदा मी शाळेतून ' गोष्टींची कॅसेट ' घेऊन आलो होतो. टेपरेकॉर्डरवर ती लावली. त्यात छान गोष्टी होत्या. बबलूला त्या इतक्या आवडल्या कि तो रोज त्या लावण्याचा आग्रह धरु लागला. मलाही बरे झाले. मी कॅसेट लावून देऊन माझी शाळेची कामे करु लागलो. कॅसेट शाळेची होती त्यामुळे मी लवकरच ती शाळेत परत नेऊन ठेवली. 

          त्या संध्याकाळी मी घरी आलो. आल्या आल्या त्याचा पहिला प्रश्न , " दादा, ती गोस्तींची कॅसेत लाव ना ? " मी दुसरीच कॅसेट लावून त्याला सांगितले कि ही मी नवीन आणली आहे. ती ऐक. तो खूप हुशार. त्याने मला सांगितले , " दादा, मला फसवू नकोस ? ही जुनीच आहे , मला तू शाळेतून आणलेली तीच कॅसेत हवी आहे. " शेवटी मी त्याला उद्या आणून देतो असे दररोज सांगत राहिलो आणि तो माझ्यावर विश्वास ठेवत राहिला. आजपासून आठ दिवसांनी त्याचे लग्न आहे. तो एक यशस्वी इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे. त्याला ही आठवण सांगितली कि आजही तो जे हसतो तेव्हा मला तो छोटाच बबलू दिसतो ' गोस्तींची कॅसेत ' वाला जसाच्या तसा.



©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

मुंगीस्थान

 मुंगीस्थान


        शाळा सुटली. संध्याकाळचे साडेपाच वाजले तरी मी शाळेतच होतो. मुलेसुद्धा मी शाळा बंद करत नाही म्हणून शाळेतच थांबून होती. मी आता शाळेत राहत नव्हतो. तीन महिने शाळेत राहिल्यामुळे मुलांनाही शाळा सुटल्यानंतरही शाळेत थांबण्याची सवय झाली होती. 

          एका टेबलखालीच मी किचन बनवले होते. त्याला समोरुन पडदा लावून माझे स्वयंपाकघर दिसू नये याची खबरदारी घेतलेली होती. अर्थात माझे हे किचन बघायला कोण येतंय म्हणा ? पण ही गोष्ट  मला खवखवत होती त्याला मी तरी काय करणार ? त्याला जो पडदा लावला होता तो मी स्वतः डी.एड. ला असताना भरतकाम केलेला टेबलक्लाॕथच होता. बाहेर कपडे वाळत घालण्याच्या दोरीवरील कपडे दगा देऊ शकणार होते. 

          तीन महिन्यानंतर आता मी शाळेत राहात नव्हतो. पण जवळच एका मांगरात राहत असल्याने तिथे इतक्या लवकर जाऊन तरी काय करणार होतो. म्हणून शाळेतच वेळ घालवत बसलो. शाळा हे माझ्यासाठी नेहमीच मंदिर ठरलेले आहे. तिथे गेलो कि मी घराला पूर्णपणे विसरुन जातो. कोणत्याही अवघड क्षणी मला माझ्या शाळांनीच जास्त साथ दिली आहे. मी शाळेत इतका रमतो कि माझ्यासाठी इतके रमणीय स्थळ दुसरे कुठले नसेल. लहानपणापासून शाळेने साथ दिली. आता शिक्षक झाल्यामुळे शाळेची सदैव साथ राहणार आहे म्हणून मी मला जगातील सर्वात सुखी आणि समाधानी मनुष्य मानतो. 

          मुले काही जाता जात नव्हती. शेवटी त्यांना बाबापुता करुन मीच घरी पाठवले. मीच पाठवले, पण आता मला माझ्या मुलांची उणीव भासू लागली. मी आणि शाळा दोघेच उरलो. मुले नाहीत तर शाळा मला खायला येतेय असे वाटू लागले. विद्यार्थी असले तरच शाळेला किंमत नाहीतर उरतात फक्त रंगवलेल्या भिंती. त्या भिंती बोलक्या असल्या तरी माझ्याशी बोलत नव्हत्या. 

          कंटाळून मी मांगराचा रस्ता धरला. दोन मिनिटात रूमवर आलो. आता घराकडील आठवणी येऊ लागल्या. आज घरी गेलो असतो तर बरे झाले असते असे वाटू लागले. फोन किंवा मोबाईलची सोय असती तर किती मज्जा आली असती असे आता वाटतेय. मी दादरा नगर हवेली मध्ये बेटावर आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. दुपारची भांडी घासायला घेतली. दुपारचे जेवण तापवले. एकच जेवण तीन वेळा जेवायचे दिव्य करायचे होते. पण मला जेवण्यासाठी जगायचे नव्हते तर जगण्यासाठी जेवायचे होते. काय केले असेल ते मनापासून पोटात दवडायचे होते. 

          आज काय तिखट डाळ आणि भात होता. तोंडी लावायला भाजी नव्हतीच. आणलेले लोणचे बरणीच्या तळाला गेले होते. त्याच्यात बोट बुडवून आजच्या भाजीची कल्पना केली. कधी कधी मस्त कल्पना करायची म्हणजे त्रास होत नाही. त्यावेळी मी अशा अनेक कल्पना केल्याचे आठवून आजही हसू येते. जेवल्यानंतर पुन्हा भांडी घासली. तेव्हा मी घासलेली भांडी बहुदा चकचकीत दिसत. त्यात मी माझा चेहरा पाहू शकेन इतकी चकचकीत. 

          आता थोडे वाचन करून मग झोप आल्यानंतर झोपायचे होते. शेजारच्या गोठ्यातल्या शेरडांचे आवाज कानावर पडत होते. वाचता वाचता पुस्तक पोटावर ठेवून कधी झोपलो ते कळलेच नाही. झोपायच्या खोलीत  मालकांची धान्याची मोठी कोठी होती.त्यात भात ठेवलेले होते.ते भात खाण्यासाठी रात्री उंदरांची फौज गोळा होई. ती खडखड मला शिरशिरी आणायची. 

          पण ते आपली सोबत करत आहेत तर त्यांचा त्रास होतो असे म्हणणं कृतघ्नपणा ठरेल. गणपतीच्या वाहनाला मी घाबरत असे. त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारा तो आवाज शिसारी आणणाराच होता. अचानक रात्री चार वाजता डोक्यात काहीतरी चावतंय असं वाटलं. घाबरघुबरा होत जागा झालो. बघतो तर माझ्या भोवती लालभडक मुंग्यांनी वेढा दिला होता. चावऱ्या मुंग्या डोक्यात गेल्या होत्या. केसात शिरून सर्वांनी अचानक माझ्यावर हल्ला चढवला होता. मी प्रतिकार करू शकत नव्हतो. थोडा प्रतिकार केला म्हणून त्या इतक्या चवताळल्या कि अधिक चावा घेऊन मला सैरावैरा धावायला लागले होते. मग काय भररात्री मला बाहेर झोपावे लागले. झोप कसली लागते ? सकाळ होण्याची वाट पाहात मी जागा राहिलो. दुसऱ्या दिवसापासून मी त्या ' मुंगीस्थान ' चा धसका घेतला. माझ्या वाट्याला आलेले असे हे ' मुंगी स्थान ' कोणाच्याही वाटेला कधीही येऊ नये म्हणजे झाले.



 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

डोक्यावर मारु नका सर

  डोक्यावर मारु नका सर         

           दादरा शाळेत असतानाची घटना आहे. शाळेत शिस्त असायला हवी हे सगळ्यांनाच मान्य असेल. त्यासाठी मुलांना थोडी शिक्षा करून वटणीवर आणण्याचे प्रयत्न होत असतात. मी सुध्दा लहानपणी शिक्षकांचा व पालकांचा मार खाल्ला आहे. पाढे पाठ नसले तर पाठीत धबके मिळाले आहेत. बाबांच्या काळात त्यांना रुळाने मारण्याची पद्धत होती असे म्हणतात. ' छडी लागे छम छम् विद्या येई घम घम् ' असे बालगीत त्यावरूनच आले असावे. 

          माझे लग्न झाल्यानंतर माझ्या बोटात सोन्याची अंगठी आली होती. मला दागिने घालण्याचा सोस नाही. पण लग्नात घातली. आता काढायची कशाला म्हणून घालूनच ठेवली. ती थोडी सैल होत होती म्हणून दोऱ्याने गुंडाळून तिचा व्यास कमी करून बोटात घट्ट बसवलेली. आता ती बोटातून सुटण्याची भिती नव्हती. 

          मुलांच्या अभ्यासाबाबत मी अजुनही काटेकोर आहे. दिलेला अभ्यास त्यांनी केलाच पाहिजे हा सर्वसाधारण दंडक असे. माझाही तसाच आग्रह नेहमीच असतो. कधी कधी कामाच्या व्यापात अभ्यास तपासणे होत नाही. मग नुसते पाहून सुध्दा प्रतिक्रिया देता येते. दैनंदिन अभ्यास करणे हे विद्यार्थ्यांचे जसे काम असते तसे दिलेला अभ्यास वेळच्या वेळी तपासून देणे हे शिक्षकाचे काम असते. 

          मी दररोज अभ्यास देत असे. अभ्यास न केलेल्या मुलांना पाठीवर प्रसाद मिळे. कधी हातावर काठीने हलकेच मारून अभ्यास न आणल्याबद्दल सौम्य शिक्षा देत असे. कितीही शिकवले तरी मुलांमध्ये फरक पडताना दिसत नव्हता. कारण मुले घरी अभ्यासच करत नव्हती. पालकच शिकलेले नव्हते. त्यांना शिक्षणाबद्दल आस्था होती. पण तरीही ते मुलांकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे माझी तळपायाची आग मस्तकात जाई. एवढे सांगूनही मुले अभ्यास करत नाहीत म्हणजे काय ? माझा संयम सुटत चालला होता. मी शिस्तीसाठी शिस्तीचे हत्यार वापरू लागलो. मुले शाळेत यायची बंद झाली. 

          मग मुलांना घरी जाऊन शाळेत आणू लागलो. मुलांना आता शाळेत यावेच लागत होते. नाहीतर सर घरी येतात हे समजले. पालकांनीही " मारा तुम्ही सर , अभ्यासासाठी मारलेत तरी हरकत नाही " असे सांगितले. मग काय मला परवानगी मिळाली होती. मुलांनी अभ्यास करून चांगले शिक्षित व्हावे हा मूळ हेतू होता. तरी मार देणे हा काही त्यावरचा पर्याय नव्हता. पण नाही शिक्षा केली तर मुलांची पाटी नेहमी कोरीच राहताना दिसत होती. माझा संयम सुटला की मारणे आलेच. पण या शिक्षेची सवय होणे कधीही वाईटच. कारण मारल्याशिवाय अभ्यास येतच नाही असा समज दृढ होत जातो. पालक म्हणू लागले ते सर भारी आहेत. शिस्तीचे भोक्ते आहेत. मुलांना भरपूर मारून मस्त अभ्यास करून घेतात. 

          दरमहाच्या मासिक भेटीत केंद्रप्रमुख सूचना देत. मुलांचा अभ्यास कमी आहे त्याकडे लक्ष द्या. ते गेल्यानंतर त्या शेऱ्याचा राग येई. तो राग शिक्षेच्या रूपाने मुलांना परत मिळे. मुले अभ्यास करू लागली तसा मार सुध्दा कमी झाला. पण आता डोक्यावर मारायला सुरुवात केली. खुर्चीवरून न उठता मारायला बरे. 

          तीन चार दिवसानंतर आमच्या ग्रामशिक्षण समितीची सदस्या कोयना बाई झोरे उर्फ कोंडी आजी शाळेत आली. म्हणाली, " सर, तुम्ही मस्त शिकवता. तुमचा मुलांवर छान धाक आहे. तुम्ही आल्यापासून मुले अभ्यास करू लागली आहेत. पण सर , तुम्ही मुलांच्या डोक्यावर मारू नका. कारण तुमची अंगठी त्यांच्या डोक्यात बसते. एखाद्या मुलाच्या डोक्याला खोक पडली तर काय कराल ? " 

          मला तिचे येणे, जाणे, बोलणे अपेक्षित होते. पण तिने जे सांगितले ते अपेक्षितच नव्हते. ती जास्त वेळ थांबली नाही. लगेच निघूनही गेली. ती रागावलीही नाही. पण एका अशिक्षित आजीने मला एक चांगला धडा दिला होता. त्याच दिवशी मी ती सोन्याची अंगठी काढली. पुन्हा ती कधीच घातली नाही. मुलांना मारणे सोडून दिले. 

          मुलांना प्रेमाने जवळ घेतले. मुले मला घाबरेनाशी झाली. पण रोज शाळेत येऊ लागली. दररोज दिलेला अभ्यास वेळच्या वेळी करू लागली. मलाही माझ्या रागावर नियंत्रण आले. माराशिवाय अभ्यास होऊ लागला. हजेरी वाढली. मी अध्यापनाची डिग्री घेतली असली तरी ती अशिक्षित आजी मला जे शिकवून गेली ते मी आजपर्यंत वापरत आहे. जे मारल्याने होत नाही ते प्रेम दिल्याने नक्कीच होते याचा मला पुरता अनुभव नेहमीच येतो आहे. त्यानंतर मी अनेक शाळांमध्ये कामे केली पण शिक्षणाला मी प्राधान्य दिले आणि शिक्षेला गौणत्व. प्रेमाने मुलांना जिंकता येते. शिक्षेने कधीच नाही.


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )




आता कसे मस्त दिसताय

 आता कसे मस्त दिसताय        

        मी कधीही स्वतःकडे तितकेसे लक्ष दिले नाही. प्रसंगानुरुप जसे लक्ष द्यायला पाहिजे तेवढेच लक्ष माझे माझ्याकडे असे. पण आपण मनाने चांगले असलो तर तनाने सुद्धा चांगलेच असतो. मी नेहमीच मनाने सुदृढ राहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला माझ्या शरीराकडे जाणीवपूर्वक लक्ष देता आले नाही. दुसऱ्यांना सुख देण्यात व्यस्त असताना स्वतःकडे लक्ष द्यायचे राहूनच गेले. 

          आठ दिवस पत्नी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असताना तर मला माझ्याकडे लक्ष देणे अजिबात शक्यच नव्हते. मी तिची काळजी घेत होतो. ती बेडवर होती. पण मला मानसिक आधार देत होती. अर्थात ती स्वतः मनातून हादरुन गेलेली होती हे मला समजत होते. पण मी काहीच करु शकत नव्हतो. 

          मी तिच्याजवळ बसून बोलत राही. जीवनात आनंद आहे हे सांगत राही. जीवन एक उत्सव आहे , तो साजरा करायला हवा असा पोकळ दिलासा देत राही. ती सुद्धा माझे बोलणे हताशपणे ऐकत असे. स्वतः आनंदाने हसते आहे असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राही. मी तिच्या गुडघ्यापर्यंत लांब असलेल्या केसात बोटे घालून तिला येत असलेली डोक्यातील खाज कमी करत होतो. नीट आंघोळही होत नव्हती. केस धुणे होतच नव्हते. केसात उवांनी थैमान घातले होते. मी आय सी यु मध्ये तिच्या उवा काढताना ती म्हणाली होती , " किती करता हो तुम्ही माझ्यासाठी ? मला लवकर घरी जायचे आहे. मला कंटाळा आलाय. कधी मी यातून मोकळी होणार देव जाणे ?  " शिवलिलामृत , मारुती स्तोत्र , गणपती स्तोत्र, महालक्ष्मी मंत्र, गायत्री मंत्र सगळंच तिच्या मुखोद्गत होतं. ती म्हणत असे आणि मी ऐकत असे. कधीतरी ती मला म्हणायला लावी. मग मी ही नाईलाजास्तव म्हणत असे. ती मनापासून म्हणायची. पण मला देवाचाच राग आला होता. त्यामुळे माझ्याकडून मनापासून म्हटले जात नव्हते. फक्त ओठ म्हणत होते , पोटातून भक्ती येत नव्हती. 

          आपला मुलगा पोटातच गेला हे समजल्यानंतरसुद्धा ती स्थिर राहण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. तिच्याकडे बघून माझे काळीज तुटत होते. माझी दाढी वाढली होती. कसातरीच दिसत होतो. ५ मे ला शाळेचा शेवटचा दिवस होता. मी ४ मे पर्यंत रजा घेतली होती. ५ मे ला हजर होणार होतो. ६ मे पासून उन्हाळी सुट्टी पडणार होती. हॉस्पिटलमध्येच वस्तरा घेऊन स्वतःची दाढी केली अगदी आरश्याशिवाय. तिच्यासमोर गेलो तर ती त्यावेळी म्हणाली होती , " आता कसे मस्त दिसताय." तिने मला मस्त म्हणावे ही इच्छा मी कधीच ठेवली नव्हती. 

          त्याच रात्री तिने हॉस्पिटलच्या बेडवरच शेवटचा श्वास घेतला. मी पुरता कोलमडून गेलो. पुन्हा कधी आरश्यात बघताना मला तिचे हे वाक्य कायमच घुमत राहते - " आता कसे मस्त दिसताय." 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )


नेहमी खरे बोलावे

        नेहमी खरे बोलावे

         सोमवारी शिरगांवला बीटसंमेलन होते. संमेलन संपल्यानंतर मी एस्.टी. ने कणकवली गाठली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता उठून शाळेत जायच्या तयारीला लागलो. गढिताम्हाणे दादरावाडी शाळा कणकवलीपासून ४५ किलोमीटरवर होती. कणकवलीवरुन पहाटे सहा वाजताच्या रत्नागिरी गाडीने निघावे लागे. आईने माझ्याबरोबर उठून माझ्यासाठी डबा बनवला होता. बाबांनी मला हलवून उठायला सांगितले होते. उठायला सांगितल्यानंतरही मी १० मिनिटे झोपूनच असे. उठून तयारी करण्याचा कंटाळा येई. लवकर उठणे आणि गाडी मिळायला पाहिजे म्हणून घाईघाईने तयारी करताना नोकरीचा वैतागथोर राग येई. पण उठण्याशिवाय पर्याय नसे. अधिक काळ झोपून राहीलो आणि बाबांची पाठीत लाथ बसली तर ! उठून तयारी करुन लगबगीने निघे. 

          गाडी स्थानकात लागलेली पाहून हायसे वाटे. थंडी असली तरी तिची परवा न करता कसातरी चहा ढोसून माझी स्वारी गाडीत चढे. आता आठवडाभर घरी यायला मिळणार नाही याची जाणीव होऊन रडू येई. पण तोपर्यंत कंडक्टर तिकिट काढायला आलेला असे. विचार करता करता कधी तळेरे स्टँडवर आली ते कळतही नसे. 

          तिथेही पाटगांव गाडी लागलेली दिसे. त्या गाडीतून गेलो तर फणसगांवला उतरुन पुन्हा तिसरी गाडी पकडावी लागे. आज मला त्या गाडीने जायचा कंटाळा आला होता. मी गढिताम्हाणे गाडी पकडली. मी पळसकाटे येथील धनगरवाडीमध्ये एका घरात राहण्यास सुरुवात केली होती. १० मिनिटे चालून खोलीवर जाऊन फ्रेश झालो. शाळा साडे दहाची होती. आता १० वाजत आले होते. मी डबा घेऊन शाळेकडे पायी निघालो. सड्यावरुन चालत जायला मला अर्धा तास लागे. मला त्याची सवयच झाली होती. पण आज माझी पावले संथ पडत होती. पाऊलवाट खडकाळ आणि उंचसखल होती. मी शाळेकडे १०.२० पर्यंत पोहोचायला हवे होते. पण थोडा उशिर झाला.....

          मी यावेळी मुलांकडे शाळेची चावी देऊन ठेवलेली होती. शाळा सड्यावर असल्यामुळे मुले ऊन पावसात बाहेर उभी राहीली तर त्यांना त्रास होऊ नये हा एकमेव उद्देश होता. मी शाळेच्या जवळ आलो आणि बघतो तर काय ? ...... शाळेसमोर एक जीप उभी होती. तिच्यावर ' महाराष्ट्र शासन ' असे लिहिलेले होते. मला तिथे  दिवसातून दोनदाच गाडी दिसे. सकाळी ८ वाजता आणि संध्याकाळी ४ वाजता. पुढे गेलो तर शाळेच्या व्हरांड्यात दोन नवीन शुज दिसले. एक लेडीज आणि एक जेन्टस् . 

          माझ्या शाळेत मी येण्यापूर्वी कोणीतरी साहेब आले आहेत याची मला जाणीव झाली. त्यावेळी मी घाबरलो असलो तरी घाबरल्यासारखे न दाखवता आलेल्या साहेबांना नमस्कार केला. देवगड तालुक्याच्या सभापती मॅडम आणि गटविकास अधिकारी साहेब यांना बघून मी पुरता गांगरुन गेलो होतो. त्यांना बघून मीच शाळेत प्रवेश करताना ' मे आय कम इन साहेब ' असं म्हणून मला वर्गात प्रवेश करावा लागला होता. 

          १०.३५ वाजता शाळेत आलो होतो. मी आधी मस्टरवर १०.२० ची सही केली. लगेच राष्ट्रगीताची ऑर्डर दिली. प्रतिज्ञा झाली. प्रार्थना घेतली. सुविचार ' नेहमी खरे बोलावे ' मीच सांगितला. सर्व मुलांकडून घोकून घेतला. परिपाठाचे सर्व घटक घेऊन झाले. मुलांनी बरे सहकार्य केले. सायबांनी विचारले , " सर , तुम्ही शाळेत १०.३५ ला आलात आणि सही मात्र १०.२० ची केलीत. सुविचार शिकवताय , नेहमी खरे बोलावे " भिंतीवरील दिशा चुकीच्या लिहिल्या आहेत. सादिल किती मिळाला ? खुर्चीचा एक हात हालतोय...... असे मला निरुत्तर करणारे अनेक प्रश्न विचारले गेले. माझ्या मुलांनी साहेबांशी अतिशय उत्तम प्रकारे संवाद साधलेला होता. पण माझ्या एकवेळच्या उशिरा शाळेत जाण्याने माझ्याबद्दल अधिकाऱ्यांचे चांगले मत झालेले दिसत नव्हते. तिकडे खुर्चीचा हात हलत होता आणि मीही या आकस्मिक भेटीच्या धक्क्याने पुरता हादरुन गेलो होतो. तेव्हापासून कानाला खडा लावला, काहीही झाले तरी आपले विचार आणि आचार यात कधीही गल्लत करायची नाही. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )




संगीतवही कुठे आहे ?

 संगीतवही कुठे आहे ?

        मला त्यावेळीपासूनच संगीत विषयाची खूप आवड होती. आवड होती म्हणून सवडही मिळायची. कणकवली डी.एड्. कॉलेजला असताना घडलेली घटना माझी फजिती करणारी जास्त आहे. परिपाठात प्रार्थना , समुहगीते आणि संस्कारगीते सादर करावी लागत. मला परिपाठ आवडे तो यामुळेच. 

          पण कथाकथन , वक्तृत्व आणि निवेदन यात मी भाग घेत नसे. मला प्रतिज्ञा म्हणतानाही थरथरायला होत असल्याचे जाणवे. एक हात करुन पुढे प्रतिज्ञा म्हणताना माझा हात थरथरताना मी कित्येकदा प्रत्यक्ष पाहिलाय. पण गाणं म्हणताना कसातरी आत्मविश्वास आणून गायन करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असे. मी जरा लयीत आणि सुरात होतो कदाचित. पण तालाचा अद्याप पत्ता नव्हता. बोंडाळे मॅडम संगीत छान शिकवत. त्यांच्या आवाजाने भारावून जायला होई. 

          पेटी वाजवताना मॅडम तल्लीन होऊन गाऊ लागल्या कि मला आपणही गायला पाहिजे असे वाटत राही. त्यामुळे सहाजिकच मी त्यांनी शिकवलेली गाणी घरी येऊन म्हणू लागलो. सेकंड इयरच्या मुलांमधील सर्वच उपक्रमांमधील क्रियाशीलता बघून आम्ही सगळेचजण भारावून गेलो होतो. भावी आदर्श शिक्षक घडण्याची सुरुवात साक्षात पाहात होतो. मलाही त्यांच्यासारखे करायचे आहे ही ऊर्मी माझ्यात डोकावत होती. मी त्या ऊर्मीला वाट देत गेलो. आमचा पूर्ण वर्गच विविध व्यक्तिमत्वांनी संपन्नच होता. प्रत्येकजण एकमेवाद्वितीयच होता. मीच लाजराबुजरा होतो. हेसुद्धा माझे आगळेवेगळेपण असेलही. 

          मला संगीत विषयाची सर्व वही लिहून काढायची होती. मी ती जीवापाड जपत असे. त्यामुळे माझ्या संगीत वहीवर सर्वांचा डोळा होता कि काय नक्की सांगता येणार नाही. पण सगळेच माझी वही घेऊन आपला गाण्यांचा संग्रह वाढवत चाललेले मला आवडतही होते. एकदा असाच वर्गात असताना संगीतच्या तासिकेला माझी वही मला सापडेना. मी सगळीकडे शोधली. पण व्यर्थ !  काहीच उपयोग झाला नाही. सगळ्यांना विचारले. सगळ्यांची बाके तपासली. संगीत वही सापडली नाहीच. 

          मी अक्षरशः रडकुंडीला आलो होतो. मी रडायचा फक्त बाकी होतो. सगळेजण माझा चेहरा बघून ओळखून गेले होते. माझी फजिती करण्यासाठी कुणीतरी माझी संगीतवही मुद्दाम लपवून ठेवली होती. पण मी त्यांची ती गंमत समजू शकलो नाही. शेवटी अश्रू अनावर झाले. मी स्फुंदु लागलो आणि चरफडू लागलो. सर्वजण ' काय झाले रे प्रवीण  ? , आता बरा होतास ? या सोज्वळ आविर्भावात. मी त्यामुळे आणखी डिवचला जाई. शेवटी ज्याने वही लपवून ठेवली होती, त्याला माझा अधिक अंत पाहवेना. दोन दिवस मी वहीच्या शोधात होतो. घरी शोधली. दुकानात शोधली. घरचे सगळेजण मलाच दोष देत होते.

          माझा बेंचमेट संजय शेटे सुद्धा त्यांच्यात सामिल होता. दुसऱ्या दिवशी ' संतोष मधुकर तुळसकर ' ने माझी वही आणून दिली. आदल्या दिवशी त्याने वहीला वाळवी लागल्याचे खोटेच सांगितले होते. माझी संगीत वही मिळाली म्हणून माझा चेहरा खुलला. त्या वहीसाठी मी माझ्या भावासारख्या मित्रांबद्दल राग राग केला. ते माझे सर्व मित्र (  मैत्रिणी ) आता विविध शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करत आहेत. फक्त ज्याने माझी वही लपवून ठेवली तो संतोष आज हयात नाही याचे वाईट वाटते. 

          खेडला क्षमताधिष्ठित प्रशिक्षण असताना पहाटे नदीत आंघोळीला गेलेला आमचा संतोष गेला तो परत आलाच नाही. संगीतवही कायमची हरवली असती तरी चालले असते , पण आमचा सर्वांना आनंद देणारा संतोष हवा होता. संतोषच्या परिवाराच्या आयुष्यातील संगीत कायमचे बेसूर झाले.


© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )



आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...