Saturday, September 3, 2022

🛑 दशरथा , घे हे लेखन दान

🛑 दशरथा , घे हे लेखन दान

          बारावी सायन्स नंतर डीएड केलं. कै. सौ. इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालयात पहिल्या वर्षात चाळीस जणांना गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळाला. दहावी झाल्यानंतर डीएड बंद होऊन ते बारावी नंतर सुरु झाले होते. पदवीधर आणि पदव्युत्तर झालेल्या अनेकांनी बारावीच्या मार्कांवर प्रवेश मिळवला होता. 

          दहावी डीएड बॅचची मुलेही काही कमी नव्हती. पहिल्या परिपाठात त्यांच्या विद्वत्तेचा अनुभव आला. तीही जबरदस्त टक्क्यांनी गुणवत्ता सिद्ध करुन प्रवेश घेतलेली मुले होती. कदाचित आम्हीच त्यांच्यापुढे कमी पडू की काय असा धसका पहिल्या दिवसापासून आमच्या अनेकांच्या चेहऱ्यावर दिसू लागला होता. काहींनी कॉलेज लाईफ अनुभवलेले होते. त्यांना हे कठीण नव्हते. 

          अभ्यास एके अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी मात्र थोडे कठीण जात होते. कारण आता फक्त लिहायचे नव्हते तर बोलायचेही होते. नुसतेच बोलायचे नव्हते तर शिक्षकाला शोभेल असे बोलायचे होते. त्यासाठी दोन वर्षे शिकून शिक्षक होण्यासाठी सगळे तयार झाले होते. 

          चाळीसच्या चाळीस छात्र अध्यापक विशेष तयारीचे होते. एकापेक्षा एक हुशार होते. प्रत्येकात काहीतरी वेगळा गुण होता , जो इतरांवर प्रभाव पाडायचा. अर्थात प्रत्येकावर दररोज एकोणचाळीस प्रभाव पडत होते. ते प्रभाव टिपणं सोपं काम नव्हतं. 

          परिपाठात प्रत्येकातील आगळे वेगळेपणा नजरेत भरायचा. आपल्याला असे जमेल का ? असे वाटायचे. प्रत्येकजण एकमेवाद्वितीय होता. आज हे सगळे शिक्षक कुठे ना कुठे आदर्श शिक्षक म्हणून काम करत असतील तेव्हा मला माझ्या बॅचचा सार्थ अभिमान वाटतो. त्यावेळी जे साधे सरळ वाटत होते , ते आता बोलके आणि उपक्रमशील झाले आहेत. शिक्षकी पेशाचा तो गुण असतो. पाण्यात पडले की जसे पोहायला शिकता येते , तसे शिक्षकी पेशा स्वीकारला की त्यातील सर्वकाही अंगी बाणत जाते. 

          संतोष तुळसकर नावाचा माझा मित्र उत्तम बोलका होता. स्मार्ट होता. सगळ्यांच्या गळ्यातील ताईत होता. मुलीदेखील त्याच्या अशा असण्यावर फिदा असाव्यात. बिचारा खेड येथील क्षमताधिष्ठित प्रशिक्षणाच्या सकाळी नदीवर आंघोळीला गेला तो वर आलाच नाही. तो गेला आणि आम्हां मित्रांमधील संतोषच हरपला. 

          संजय शेट्ये हा माझा बेंचमेट. कुठेही जाताना तो आणि मी सतत बरोबर असू. त्याचे तिरपे तिरपे अक्षर अजूनही आठवते. गोड गोबऱ्या गालांचा , मान तिरपी करुन हसणारा संज्या कुठेतरी हरवला आहे की त्याचे काय झाले आहे समजायला मार्ग नाही. दोन वर्षे एकत्र असणारा मित्र अचानक कुठे निघून जातो आणि सापडता सापडत नाही यासारखे दुःख नाही. तो कुठे असेल तर तो सुखात असावा हीच देवाकडे प्रार्थना आहे. 

          दशरथ सावंत एक सुजाण , संस्कारी मित्र. उंच , बारीक , गोरापान. गाल थोडेसे आत गेलेले. केस नीट विंचरलेले. सगळ्यांचा यथोचित आदर करणारा. काळजीपूर्वक पाठ टाचण काढणारा. पाठात चित्रांचा वापर करणारा. माझ्याही पाठीवर अलगद आश्वासक थाप मारुन प्रोत्साहन देणारा. 

          त्या दिवशी शिक्षक समितीचे धरणे आंदोलन होते. तिथे त्याच्या आत्महत्येची खबर ऐकायला मिळाली. खूप वाईट वाटले. त्याचे डीएडच्या वर्गातील क्रियाकलाप डोळ्यासमोर नाचू लागले. त्याला खेळाची खूप आवड होती. तो दरवर्षी आपले विद्यार्थी जिल्हास्तरापर्यंत आणायचा. त्यावेळी धावती भेट होई.  पण विद्यार्थ्यांसाठी तो सतत धाव घेणारा आदर्श शिक्षक होता. तो असा अचानक कसा निघून गेला हे आमच्यासमोर असलेले प्रश्नचिन्ह आहे. त्याने आत्महत्या का केली असावी ? कोणते प्रश्न त्याला भेडसावत होते ? सुखी संसाराला सोडून तो का जावा ? दुसऱ्यांना विजयी होण्यासाठी प्रेरणा देणारा एक उपक्रमशील शिक्षक एवढा स्वतःच्या जीवनावर नाराज का व्हावा नकळे !! जीवन सुंदर असताना त्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला हवे असे सांगणारा दशरथ निराशेच्या खाईत कसा जाऊ शकतो ? हे आम्हाला सर्वांना न उलगडणारे कोडे आहे. 

          दशरथासारखे अनेक शिक्षक असतील , ज्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असेल. संकटे तर येतच असतात. कामाचा ताण येऊन तणाव येतच राहणार आहे. त्यावर मात करुन जगणे हेच खरे जगणे आहे. अशा आव्हानात्मक जगण्यात अर्थ आहे. आजच्या शिक्षकांना अनेक तणावांना सामोरे जावे लागत असेल , पण त्यामुळे त्यांनी असा मार्ग कधीही अवलंबू नये. आपल्याला जमेल तसे काम करत राहावे. दशरथा , माझे हे विचार तुझ्यापर्यंत अंतराळातून पोहोचत असतील तर तुझ्यासाठी माझ्याकडून हे लेखाचे दान आहे असे समज. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

🛑 जिजी

🛑 जिजी

          नावात काय आहे म्हणा ? पण काही नावं आपलं अस्तित्व मागे ठेवून जातात. भाई , अण्णा , दादा आणि जिजी अशी काही नावं पूर्वीपासून खूप आदराने घेतली जातात. ही नावे समोर आली की एक सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व असणार याची जाणीव होत राहते. 

          मोठया बंधुला दादा आणि छोट्या बंधुला अण्णा म्हणायचा प्रघात असावा. हे भावांचे प्रमाण वाढले की मग ' भाई ' म्हटले जाते. आता काय सर्वांच्या नावापुढे भाई या शब्दाचा प्रत्यय लावण्यात येतो. राजकारणात या नावांचा सर्रास वापर सुरु झाला आहे. 

          जिजी हे नाव विशेष व्यक्तींसाठी वापरले जात असावे. दाजी या नावाचा सुद्धा अधिक बोलबाला असे. माझ्या आयुष्यात अशी अनेक नावांची माणसे नातेवाईक म्हणून जास्त आली आहेत. 

          आमचे एक मुख्याध्यापक होते. त्यांच्या पहिल्या दोन नावांची आद्याक्षरे घेऊन त्यांना सारेच ' जिजी '  म्हणत असत. त्यांनीही ते नाव स्विकारले होते. ते स्वतःचे मूळ नाव विसरतील इतके ते जिजी म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. 

          माझ्या आत्येचे पती म्हणजे माझे काका ' जिजी ' नावानेच गावात प्रसिद्ध आहेत. आता ते हयात नाहीत. तरीही त्यांच्या नावाने आणि त्यांच्या स्वभावाने ते कायमच सर्वांच्या लक्षात राहिले आहेत. त्यांच्या स्मृती ताज्या असल्यासारख्या जाणवत राहतात. एक धीरगंभीर व्यक्तिमत्त्व. उंच असले तरी सडपातळ बांधा. गोऱ्या वर्णाचे. त्यांच्या डोक्यावर केस असताना माझा जन्म झाला नव्हता. त्यांना टक्कल असले तरी ते त्यांना शोभून दिसे. त्यांनी शेती करुन कुटुंबाची गुजराण केली. सोबतीला नाभिकाचा व्यवसाय केला. कधी गावात फिरुन तर कधी दुकान मांडून मोठया कुटुंबाचे पालनपोषण केले. स्वतः मितभाषी होते. ते कमी बोलत असले तरी त्यांचे शुद्ध आचरण खूप काही बोलून जाई. आम्हाला त्यांचा आदर वाटे. भीतीही वाटे. ते आमच्यावर कधीही रागावले नाहीत. 

          ते मांत्रिक होते. ते वैद्य होते. त्यांनी मंत्र म्हटला तर सरपटणारी जनावरे जागच्या जागी थांबत. बिळात गेलेली बाहेर पडत. त्यांच्या मंत्रोच्चाराने नाग , सर्प निसर्गाच्या दिशेने आपल्या मार्गाने निघून जात. त्यांनी दिलेल्या तांदळाच्या दाण्यांनी सरपटणाऱ्या जनावरांना घाबरणारी माणसे भयमुक्त होत असत. 

          वैद्य म्हणून त्यांनी कित्येकांना रोगमुक्त केले असेल. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता त्यांनी अनेकांवर मोफत उपचार केले असतील. जंगली औषधी वनस्पतींची नावे त्यांना तोंडपाठ होती. त्यांची प्रथमोपचार पेटी अशा प्रकारच्या मुळ्यांनी भरलेली असे. आम्ही त्या मुळीला ' पाळ ' म्हणत असू. जुने चिवट रोग जिजींच्या या पाळांनी बरे केले आहेत. त्या काळात आमच्या घरातील उपचार त्यांच्या पाळांवरच चाले. 

          माझे लग्न झाल्यानंतर मी पाटगाव येथे राहात होतो. ते माझा संसार बघायला आले होते. ते खूप आनंदी दिसत होते. त्यांना व्यसन नव्हते. अचानक त्यांच्या जिभेला एक जखम झाली. तपासणीअंती ती वाढण्याची शक्यता सांगण्यात आली. ऑपरेशन झाले. तरीही त्या आजाराने त्यांचा बळी घेतला. आमचे सर्वांचे लाडके जिजी गेले आणि सारा गावच हादरला. दुसऱ्यांवर उपचार करणारा वैद्य , स्वतःवर उपचार करु शकला नव्हता.

          त्यानंतर अनेकदा त्यांच्याकडे जाणे झाले. त्यांचं जुनं सलून आणि त्यांनी काम केलेली लाकडी फिरकीची खुर्ची बघून ' जिजींची ' आठवण उफाळून येई. संपूर्ण गावात नव्हे पंचक्रोशीत जिजींचे नाव आजही खूप आदराने घेतले जाते. जोपर्यंत त्यांच्या गावात आजार आहेत , तोपर्यंत ' जिजींचे ' नाव विसरले जाऊ शकत नाही. एक वेगळाच ठसा जिजींनी जनमानसात उमटवला होता. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Friday, September 2, 2022

🛑 आवाजाचा राजा

🛑 आवाजाचा राजा

          आवाज ही निसर्गाने आपल्याला बहाल केलेली देणगी आहे. त्यात प्रयत्नाने रियाज करुन आवाजासाठी प्रसिद्ध होताना मी खूप कमी लोकांना पाहिले असेल. 

          हा आवाज ऐकत राहावासा वाटला पाहिजे. आवाज ऐकून कार्यक्रमातून उठून जात असलेले लोक थांबले पाहिजेत. केवळ या माणसांचा आवाज ऐकण्यासाठी काही आवाजप्रेमी लोक कार्यक्रमाच्या शेवटच्या पुष्पापर्यंत थांबलेले असतात. ज्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असे व्यक्ती करतात , त्यांच्या मुखातून येणारे शब्द टिपून घेण्यासाठी माझ्यासारख्या व्यक्ती टपून बसलेल्या असतात. हे आवाजाचे बादशहाच असतात. त्यांना कोणतेही शब्द द्या , त्या शब्दांना उच्चारांचं सामर्थ्य देणारे ते एक आवाजदूत असतात. काहीही म्हणा म्हणूनच मला अशा व्यक्ती देवदूत वाटत राहतात. 

          असे हे आवाजाचे राजा मला भेटले. त्यांचे नाव राजेश कदम. खरंच आवाजाचे बादशाहाच म्हणालात तरी ते वावगे ठरु नये. भेटीतून त्यांच्यातील सुत्रसंचालक पाहून कोणालाही भुरळ पडेल. माझेही तसेच झाले. एक माझ्यासारखा शिक्षक इतकं चांगलं बोलू शकतो याचा मला नेहमीच सार्थ अभिमान वाटतो. मी त्यांचे अनेक कार्यक्रम पाहिले , ऐकले आहेत. त्यांच्या आवाजाची जादू प्रत्येक श्रोत्याला भुरळ पाडेल अशीच आहे. 

          त्यांच्या आवाजासमोर पार्श्वसंगीत लाजेल. त्यांची बोलण्याची एक आगळी आणि वेगळी शैली आहे. त्यांनी त्याची निरंतर जोपासना केली आहे. या आवाजाचा त्यांना अभिमान असला तरी गर्व मात्र अजिबात नाही. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळणे हे साहजिकच आहे. कितीही पुरस्कार मिळाले तरी त्यांनी आपले पाय जमिनीवरच ठेवले आहेत. पुढील आयुष्यात त्यांनी अनेक उत्तम पुरस्कार मिळवत राहावेत. त्यांना पुरस्कार मिळाला की तो पुरस्कारच मोठा होतो. 

          राजेश कदमांमध्ये दम आहे , ते कधी दमत नाहीत. त्यांनी आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता वाढवत नेली आहे. सध्या ते डॉक्टरेट मिळवण्यात व्यस्त आहेत. ते एक उत्तम कवी आणि लेखक आहेत. त्यांच्यासारखे लेखक ज्यावेळी माझ्या लेखनाला दाद देतात त्यावेळी आमचा साहित्यिक व्यासंग वाढण्यास प्रेरणा मिळत जाते.

          ते कधीही कुठेही भेटले की जे स्मितहास्य करतात , ते पाहून कोणीही आपले दुःख विसरुन जाईल. त्यांच्याही जीवनात अनेक विघ्ने आली असतील , पण त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांवर सदैव मात केली आहे. आमच्यावर आपल्या तेजस्वी आवाजाचा ठळक ठसा उमटवणारे आमचे मित्र राजेश आम्हाला कायमच वंदनीय , आदरणीय असणार आहेत. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )




🛑 भटजी काका

🛑 भटजी काका

          प्रत्येक घरी बाप्पाची पुजा करायला भटजी काका येतात. त्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जाते. एखाद्या घरी सत्यनारायण महापूजा आयोजित केलेली असते. त्यावेळी भटजी काकांची सर्वजण चातकासारखी वाट बघत असतात. हल्ली भटजी काका दुर्मिळ झाले आहेत. एखाद्या गावासाठी एक भटजी काका असतात. मोठा गाव असला तर त्या बिचाऱ्या काकांची त्रेधातिरपीट उडून जाते. शुभकार्य आणि अशुभकार्य अशी दोन्ही कार्ये एकाच भटजी काकांना पार पाडत असताना किती त्रास होत असेल तेच जाणो !! आम्हाला त्याची कल्पना जरी आली तरी पुरे. 

          गणपतीच्या दहा दिवसांत तर या काकांना उसंतच नसते. त्यांचे सर्व दिवस बुकिंग झालेले असतात. त्यात एखादी आकस्मिक पुजा ठरली तर तीही त्यांना पार पाडावीच लागते. मग त्यांना त्यांच्या दैनंदिन कार्याचा वेग वाढवावा लागतो.एका दिवसांत त्यांना नाईलाजाने दोन , तीन , चार किंवा जास्त पुजा कराव्या लागत असतील. दक्षिणा मिळत असली तरी त्याचा त्रास भटजी काकांनाच सहन करावा लागतो. त्यांना तसे करायचे नसते , पण आम्हीच त्यांना तसे करायला भाग पाडत असतो.

          या भटजी काकांचा अभ्यास दांडगा असतो. ते कितीही वयाचे असले तरी त्यांना ' भटजीकाका ' म्हटले जाते. पोरवयाच्या भटजींना ' काका ' च म्हणतात. 

          काही गावांमध्ये ' भटवाडी ' असते. तिथे असलेल्या पौरोहित्य करणाऱ्या काकांना वेगवेगळ्या वाड्या किंवा पंचक्रोशीतील गावे ठरवून दिलेली असतात. ज्या गावांत असे काका नसतात , त्यांना ते आणून ठेवावे लागतात. त्यांना एखादे झोपडीवजा घरही बांधून द्यावे लागत असेल. त्यांची नवी पिढी निर्माण झाली तर पुढच्या पौरोहित्याचा प्रश्न सुटत राहण्याची चिन्हे दिसतात. अर्थात काकांच्या नवीन पिढीने ' भटजीकाका ' व्रत जोपासायला हवे असते. नाहीतर पुन्हा प्रश्नचिन्ह होते तसेच दिसायला लागते. नवीन पिढी जन्माला आलीच नाहीतर मोठेच प्रश्नचिन्ह उभे राहते. 

          वृद्ध झालेल्या अशा काकांची अवस्था कावरीबावरी होत असेल. जुन्या पद्धतीने मांडणी करुन पूजा व्रत करणारे काका आताच्या नवीन पिढीला सामोरे जाताना घामाघूम होत असावेत. एखादी पोथी वाचत असताना गरिबीमुळे ऑपरेशन न करता आल्याने दिसत नसल्याने पुन्हा पुन्हा चष्मा काढून पुसणारे भटजी काका मी प्रत्यक्ष पाहिले आहेत. त्यांनी केलेल्या प्रसादाची चव मात्र अप्रतिम असते. त्यांनी ब्राम्हण भोजनासाठी केलेल्या महाप्रसादातील वरण पातळ असले तरी तशी चव घरच्या वरणाला कधीच कशी येत नाही हे समजायला मार्ग नाही. अर्थात त्यांच्या हाताची चव कुणा दुसऱ्याच्या हाताला येणार नाहीच. 

          गावोगावी पूजा व्रत करण्याचे कार्य करणाऱ्या या भटजी काकांचा सदोदित सन्मान होत राहायला हवा. त्यांना आदर दिलात तर तुम्हाला मिळणारे पुण्य नक्कीच वाढत जाईल. 

          आम्ही आमच्या भटजी काकांचा कमालीचा आदर करतो. त्यांना घेऊन येतो , नेऊन सोडतो. त्यांनी खुश राहावे यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळे आमचे भटजी काका माझ्यावर एवढे खुश झाले की त्यांनी मला त्यांच्या घरी ' गोड शिरा ' खायला येण्यासाठी गोड शब्दांत आमंत्रण दिले आहे. अजून मी त्यांच्या गृही गेलेलो नाही. बघुयात कधी जायला मिळते ते ?

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Thursday, September 1, 2022

🛑 भजनांचे दिवस

🛑 भजनांचे दिवस

          माणसाकडे एखादी कला असायलाच हवी. त्या एका कलेचा आधार घेत तो आपलं जीवन सुंदर करु शकतो. ही एखादी कला जर भजनाची आवड असेल तर अधिक उत्तम. कारण ही भजनाची कला कधी छंद बनेल ते समजणारही नाही.

          पारंपारिक आणि वडिलोपार्जित कला पुढे नेत असताना घरातील नवी पिढी एक एक धडा घेत असते. आमच्या घरात आजोबांना भजनाचे भारी वेड होते. ते उत्तम गायक होते. त्यांचा आवाज स्त्रियांसारखा बारीक होता. त्यांनी आपल्या काळात अनेक भजने गाजवल्याचे बाबा सांगतात. स्वतः पेटी वाजवत नसले तरी सुरात गाण्याची कला त्यांना अवगत होती. त्यांचे हे वेड पुढच्या पिढीत उतरत गेले आहे. 

          आम्ही लहान असतानाचे भजनांचे दिवस आठवतात. आमच्या एका घरातच आठ नऊ पुरुष असल्यामुळे भजन मंडळ स्थापन झाल्यासारखे झाले होते. काही कारणास्तव आमची आरती बंद करण्यात आली होती. त्यामुळे आमचे भजन आपसूकच बंद झाले होते. अर्थात या कारणामुळे आमचे वैयक्तिक भजन सुरु करण्यासाठी चालना मिळाली होती. बुवाकाका पेटीवर , भाईकाका मृदुंगावर , बालाकाका चकीवर आणि आम्ही उर्वरित सगळे कोरस असे आमचे भजन सुरु झाले. बुवाकाका गायला लागले की आम्हाला चेव येत असे. त्यांचे अफलातून गायन पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. आम्ही एका रात्रीत आठ दहा भजने करत असू. प्रत्येकवेळी आधीपेक्षा भजन सरस होई. जणू रंगदेवता माता आमच्यावर प्रसन्न होण्यासाठी नेहमीच आतुर असल्यासारखी. सलग दहा रात्री जागरणे करुनही बाप्पाची सेवा करताना त्रास वाटत नसे. ते भजनांचे दिवस आठवले की आताही खुमखुमी येते. तसे ते बालपण पुन्हा यावे असे वाटत राहते. ती भजनांची मजा आता येत नाही. 

          एकदा बुवाकाका भजनाला आले नव्हते. दोन तीन भजने करायची होती. बुवाच नाही तर भजने कशी करायची हा आमच्यासमोर प्रश्न होता. सगळ्यांनी मला बुवागिरी करण्याचा आग्रह धरला. मी सहजच पेटीवर बसलो. एक दोन सूर दाबून धरले. त्या सुरात लाऊडस्पीकर लावून तीन भजने केली. लोकांना ती आवडलीही. लोकांनी मला सहन केले. त्यांच्या सहनशीलतेची मी खरंच कमाल करतो. बाप्पाने त्यावेळी माझ्याकडून भजनरुपी सेवा करुन घेतली होती. 

          अशी ही माझी गायनाची आणि भजनाची आवड मला स्वस्थ बसू देत नव्हती. मी अनेक भजने प्रत्यक्ष पाहिली आहेत. चंद्रकांत कदम , परशुराम पांचाळ , वामन खोपकर , विलास पाटील यांची भजने प्रत्यक्ष बघितली. त्यांच्या शिष्यांची भजने पाहिली. त्यानंतर कित्येक बुवांची भजने पाहण्याचा योग आला. 

          पूर्वीच्या आणि आताच्या भजनांमध्ये बराच फरक पडला आहे. पूर्वीच्या बुवांना सर्वकाही मुखोद्गत असे. त्यांची नोटेशने , तराने ऐकताना देहभान विसरून जायला होई. आता तसे का घडत नाही समजत नाही. 

          आमचे आणि बुवाकाकांचे काहीतरी बिनसले. भजन बंद पडले ते सुरु झालेच नाही. मीही पेटी शिकण्याचा प्रयत्न करता करता आरंभशूर ठरलो. मला ते तडीस नेता आले नाही हा माझा पराजयच आहे. माकडाच्या घरासारखे मी पेटी वाजवायला शिकण्याचा दरवर्षी निश्चय करत गेलो. पण कधीही सफल प्रयत्न करुच शकलो नाही. संसाराच्या रहाटगाडग्यात अडकत गेलो आणि त्या संसारालाच भजन म्हणू लागलो. आता हे माझे स्वप्न पूर्ण होईल याची मलाही खात्री नाही. 

          आता दरवर्षी आम्ही आमच्या गणपतीकडे छान भजन करतो. सगळी घरातली मंडळी ' भजन मंडळी ' म्हणून बसलेली असतात. दरवर्षी तेच अभंग , तेच गजर , त्याच गवळणी असल्या तरी आमच्या भजनाची गोडी आम्हांला नेहमीच नित्य नूतन टवटवीत वाटते हेही तितकेच खरे आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

🛑 मी पुन्हा पुन्हा येईन

🛑 मी पुन्हा पुन्हा येईन

          दरवर्षी बाप्पा घरी येतात. ते पुन्हा पुन्हा येत राहतात. त्यांचं येणं किती आनंददायी असतं ! त्यांचं पुन्हा येणं असलं तरी त्यांचं जाणं हुरहुर लावणारं असतं. 

          लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वानाच बाप्पाचं असणं स्वर्गीय सुखासारखं असतं.  वर्षातले हे गणपतीचे दिवस प्रत्येकाला हवेहवेसे वाटत राहतात. त्या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र आलेले असते. हेवेदावे विसरुन एकत्र आल्यामुळे गणपतीचे दिवस स्नेहपूर्ण वाटतात. मनाने एकत्र येण्यासाठी गणपतीचा सण नेहमीच लाभदायक ठरत आला आहे. 

          आमचे मोठे कुटुंब. बाबा , तीन काका , त्यांची कुटुंबे , आम्ही दोन भाऊ आणि आमची कुटुंबे मिळून सतरा अठरा मुले माणसे एकत्र येतो , तेव्हा खरी चतुर्थी साजरी होत असते. लग्न होऊन सासरी गेलेल्या बहिणी येतात. त्यांचं हे येणं चतुर्थीमुळेच शक्य होते. आपला हा बाप्पा असा सर्वांना एकत्र आणतो म्हणून हा सण खऱ्या अर्थाने साजरा होतो. 

          गणपती आमच्याच शाळेतला. त्यामुळे तो आणायला जावे लागत नाही. उलट इतर कुटुंबे आमच्याकडून गणपती घेऊन जाताना आमच्या कुटुंबाची लगबग सुरु असते. गणपती सुखरुप आसनावर पोहोचेपर्यंत जीवात जीव नसतो. एकदा बाप्पा सुखरुप घरोघर पोहोचले की जीव भांड्यात पडतो. 

          आम्ही आमचा गणपती घरात आणला. बाबांनी प्रथम पूजा केली. प्रथम पूजा म्हणजे सुरुवातीची पूजा. ही पूजा नेहमी बाबांकडूनच होत असते. यंदा भाईकाका नव्हते , गेल्या वर्षी ते दीर्घ आजारामुळे गणपतीच्या दिवसांत देवाघरी गेले होते. त्यांचा फक्त देह दिसत नव्हता. मात्र त्यांचा आत्मा जिथे तिथे वावरताना जाणवतो आहे. 

          आमच्या भाईकाकांचे सजावट , स्पिकर आणि लायटिंगवर भारी प्रेम होते. ते नाहीत तर त्यांच्या या सगळ्या वस्तू पारख्या झाल्या आहेत. त्यांच्या परमप्रिय वस्तूंना कोणीही वाली राहिलेला नाही. त्यांचा आत्मा त्या सर्व वस्तूंमध्ये वास करत असेल. त्यांची ती मालमत्ता जपून ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. त्या सजावटीच्या वस्तू लावताना प्रत्येकक्षणी त्यांची आठवण दाटून येते आहे. त्यांनी जिवापाड प्रेम केलेली तोरणे लुकलुकताना दिसत आहेत. स्पिकरमधले अजित कडकडे  अभंग गात आहेत. त्यांच्या संग्रहातील हजारो गाण्यांच्या सिड्या त्यांच्याशिवाय अधुऱ्या आहेत. 

          पहिले पूजन संपन्न झाले. पहिली आरती सुरु झाली. घालीन लोटांगणचा टिपेचा सुर भाईकाकांच्या कानी पोचला असेल. त्यांच्या मुलीच्या अंगात भाईकाका संचारले. आमची आरती संपण्याऐवजी वाढत चालली होती. गणेशभक्तीचे सूर ' भाईकाकांना ' परत आणण्यात यशस्वी ठरले होते. बहिणीच्या अंगातील भाईकाका आपली नेहमीची वज्रमांडी घालून आले होते. त्यांनी मृदुंगाचा ताबा घेतला. एक वर्षानंतर वाजवायला मिळाल्यामुळे त्यांनी मनसोक्त वाजवायला सुरुवात केली होती. वाजवून झाल्यानंतर त्यांनी गणपती पूजनाची इच्छा व्यक्त केली. डोळे बंद असूनही त्यांना अक्षता , गंध आणि फुले दिसत होती. त्यांनी पूजन केले. हे सगळे आम्ही साक्षात पाहात होतो. सगळ्यांच्या डोळ्यांत भाईकाकांसाठी गंगा यमुना दाटून आल्या होत्या. दरवर्षी गणपती येणारच होता , तसे आमचे भाईकाकाही पुन्हा पुन्हा येणार म्हणून आम्हा सगळ्यांनाच झालेला आनंद लपवता येत नव्हता.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 )



Tuesday, August 2, 2022

🛑 गणपतीची शाळा

🛑 गणपतीची शाळा

          दर नागपंचमीला आम्ही घरी किर्लोसला जातो. आज नागपंचमीला मी माझ्या कुटुंबासह घरी आलो. जुन्या सर्व आठवणी प्रत्येक पावलाला येत होत्या. छोट्या उर्मीला गृहपाठ म्हणून नागोबाचे चित्र रेखाटून दिले. तिनेच सांगितले , " पप्पा , मला आमच्या घरातल्या भिंतीवरचा नागोबा काढून द्या. " पूर्वीच्या घरी भिंतीवर दरवर्षी नागोबा काढला जात असे. जमिनीवर चुन्याची रांगोळी काढली जाई. माझी मोठी आत्या छान रांगोळी काढत असे. गावाकडे या रांगोळीला ' कणे ' असा शब्द वापरत. मालवणीत त्याला ' कनो ' असेही म्हणत. सुंदर रांगोळी बघत राहावीशी वाटे. स्वच्छ आणि पांढरीशुभ्र रांगोळी हिरव्यागार शेणाने सारवलेल्या जमिनीवर उठून दिसत असे. चुन्यात तीन बोटे बुडवून त्यातून तयार झालेली ती कलाकृती असे. याच चुन्याच्या रांगोळीपासून भिंतीवर ' नागोबा ' काढला जाई. आता असे चुन्याचे नागोबा क्वचित पाहायला मिळत असावेत.

          सिमेंटच्या घरांमुळे टाईल्सचे रेडिमेड नागोबा भिंतीवर चिकटले आहेत. ते तसेच दरवर्षी दिसत राहतात. त्यात कोणताही जिवंतपणा दिसत नाही. 

          आम्ही लहानपणी आमच्याच गणपतीच्या शाळेत नागोबा बनवत असताना जी मज्जा केली आहे ती आताच्या मुलांना अनुभवायला मिळते आहे. आमचा मयुरेश आणि उर्मी दोघेही मातीचे नागोबा करण्यात दंग होऊन गेले आहेत. बाबा , काका आणि माझा भाऊ गणपतीच्या मूर्तींवर शेवटचे हात फिरवत आहेत. यंदा आमच्या शाळेत पस्तीस गणपती तयार करुन झाले आहेत. दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी गणपतीचे पाट आणून ऑर्डर देण्याची जुनी पद्धत आहे. ती अजूनही तशीच सुरु राहिली आहे. आमच्या सर्व मूर्ती शाडूच्या मातीच्या असतात. मातीची किंमत महाग झाल्याने मूर्ती स्वस्त देता येणे शक्य नाही. ज्यांना परवडत नाही ते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या हलक्या मूर्ती असलेल्या शाळांची वाट चोखाळतात. पण या मूर्ती पर्यावरण पूरक नसतात हे त्यांना कुणी सांगायचे ? 

          गणपतीची शाळा चतुर्थीपर्यंत कायमस्वरूपी उघडलेली असते. आपला तयार होत असलेला गणपती पाहायला लोक येत राहतात. त्यात काही बदल करावयाचा असल्यास सुचना करत राहतात. बिचारे आमचे मूर्तीकार काका त्यांचे ऐकून त्याप्रमाणे करायला नाईलाजाने तयार होतात. आम्हाला प्रत्येकाला सुबक मूर्ती द्यायची असते. गेली पन्नास साठ वर्षे ही मूर्तीकला जोपासणारे माझे कुटुंब आमच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. गणपती रंगवताना तर रोजची गर्दी असते. दुसऱ्या गणपतीपेक्षा आपला गणपती सरस दिसावा असे प्रत्येकाला वाटत असते.

          पूर्वी पार्वती गणपती , शंकर पार्वती गणपती , गाय गणपती , राधाकृष्ण,  वाघावर , सिंहावर , उंदरावर , गरुडावर बसलेला गणपती , सिंहाचा जबडा उघडणारा गणपती , शिवाजी , राक्षसाला मारत असलेला गणपती , राम लक्ष्मण सीता , दत्ताचा अवतार , कंसवध , शेष गणपती , मयुरेश आणि असे अनेक प्रकारचे गणपती असत. आता हे प्रमाण कमी झाले आहे. साईबाबा , बालगणेश , कमळातील , फुलातील गणपती , सिंहासनाधिश्वर , फेटेवाला , उभा गणपती , लालबागचा गणपती , टिटवाळा गणपती , दगडूशेठ , चिंतामणी , बाहुबली , मंगलमूर्ती असे अनेक प्रकार सध्या बघायला मिळतात. ग्राहकांना स्वस्त आणि मस्त गणपती हवा असतो. काही हौशी ग्राहक किमतीकडे बघत नाहीत. तुम्ही सांगाल ती रक्कम न बोलता निमूटपणे देतात. नारळ , विडा ठेवून नेहमीची रक्कम ठेवली जाते. वाढलेली जादा रक्कम मूर्तिकाराच्या हातात दिली जाते. काही गरीब हौशी ग्राहकांच्या मनात असूनही चतुर्थीला गणपतीचे पूर्ण पैसे देणे त्यांना जमत नाही. त्यांचा गणपती पाण्यात गेला तरी पैसे जमा व्हायचे बाकीच असतात. मूर्तीकारांना हा आर्थिक फटका बसत असला तरी गणपती त्यांना सुखात ठेवतो हे अगदी खरे आहे. त्याचे अकरा दिवस तरी मजेत जातात. 

          श्रावण महिना पाळणारे लोक केस दाढी करत नाहीत. त्यामुळे आमच्या सलूनमध्ये कमी काम असे. त्यामुळे गणपतीची शाळा सुरु ठेवणे हे बाबांना अतिशय गरजेचे बनले होते. एका वर्षी तर आमच्या पाच ठिकाणी ' गणपतीच्या शाळा ' होत्या.  त्यावेळी बाबांची आणि काकांची जी धावपळ चाले ती मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. 

          आमचा ' घरचा गणपती ' आमच्याच शाळेतला असे. तो नेहमीच मोठा असे. सोबत देखाव्याची चित्रे बाबा बनवत. ट्रिक सिन नसला तरी शेजारच्या गावातील शेकडो गणपतीप्रेमी आमचा गणपती मुद्दाम पाहण्यास येत. कधी अकरा दिवस , कधी एकवीस दिवस आमच्या घरातील जल्लोष संपता संपूच नये असे वाटत राही. 

          इंग्रजी शाळांमुळे जशी जिल्हा परिषद शाळांमधील मुलांची पटसंख्या कमी झाली आहे , तशीच पिओपीच्या मूर्तीशाळांमुळे आमच्यासारख्या पर्यावरणपूरक गणपतीच्या शाळांमधील गणपतींची पटसंख्या कमी कमी होत चालली आहे ही प्राथमिक शाळांसारखी गणपती शाळांचीही शोकांतिका आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली.









आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...