Sunday, July 18, 2021

गो गोवळ गॉन

           गढीताम्हाणे दादरा शाळेत सलग साडे सहा वर्षे काम करताना चांगला अनुभव आला. सर्वात जास्त त्याच शाळेत शिकता आले. मीच मुख्याध्यापक असल्यामुळे प्रशासकीय बाबींची माहिती मिळाली. पण तीच शाळा , तेच ग्रामस्थ , तोच रस्ता , तेच जीवन अनुभवायचे असल्याने कंटाळा येत होता. पण तरीही शैक्षणिक कामांचा कधीही कंटाळा केला नाही. बदलीचे प्रयत्न सुरू होतेच. कधी एकदा बदली होते असे झाले होते. दररोजच्या खराब रस्त्याने तर मानेलाही त्रास जाणवू लागला होता. फणसगावच्या एका डॉक्टरांनी तर मला मानेचा पट्टा लावण्यासाठीही सांगितले होते. मानेचा पट्टा , त्यावर हेल्मेट घालून गाडी चालवताना बाजूला वळणे शक्य नव्हते. 

          बदलीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले होते. बदलीची ऑर्डर हातात आली होती. मला मागणीप्रमाणे ' गोवळ गावठण ' शाळा मिळाली होती. बदलीची ऑर्डर मिळाली तेव्हा मी कधी नव्हे इतका आनंदित झालो होतो. कधी एकदा ही शाळा सोडून नवीन शाळेत हजर होतो असे मला झाले होते. पण जोपर्यंत माझ्या शाळेत दुसरे शिक्षक हजर होत नाहीत , तोपर्यंत मला कार्यमुक्त होता येत नव्हते. ऑर्डरमध्ये तसा उल्लेखही केला गेला होता. नवीन शिक्षक लवकरच हजर होतील अशी अपेक्षा होती. नवीन शिक्षकाची ऑर्डरही मिळाली होती. पण त्यात त्या शिक्षकाचा पत्ता होता , फोन नंबर नव्हता. सतीश गुलाब कांबळे असे त्या नवीन शिक्षकाचे नाव होते.

          पोस्टाने ऑर्डर्स पाठवल्या असल्याने कधी कधी त्या मिळायला उशीर होऊ शकतो. तसेच झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील कळे येथे पावसाने पाणी भरले होते. त्यामुळे नवीन शिक्षकांपर्यंत ऑर्डर पोचायला बराच विलंब झाला होता. ऑर्डर मिळून त्यांना शाळेकडे येईपर्यंत तीन महिन्यांइतका कालावधी गेला. मला तोपर्यंत माझी ऑर्डर बघत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. मी त्यावेळी पाटगाव येथे राहत होतो. जाताना गोवळ गावठण शाळा वाटेतच मिळे. गोवळ गावठण शाळेतील मुलांनाही मी त्यांच्या शाळेत येणार याची माहिती मिळाली होती. त्यामुळे येता जाता ती शाळा , ती मुले , ते शिक्षक मला नुसते माझ्या येण्यासाठी आसुसलेले असल्याचे जाणवे. खरंतर मीच या गोष्टीसाठी अतिशय आतुर झालेलो होतो. गोवळ गावठण शाळेकडून जाताना माझ्या गाडीचा वेग आपसूकच कमी होत होता. येतानाही तसेच घडे. 

          कधी एकदा कार्यमुक्त होऊन नवीन शाळेत हजर होतो असे झाले होते , पण मुहूर्तच सापडत नव्हता. मी कधी कोणत्याही गोष्टीसाठी मुहूर्त बघितलाच नव्हता.  पण यावेळी मात्र मला गढी. दादरावाडी शाळेत जायला उत्साह वाटत नव्हता. म्हणून मी मुहूर्ताची वाट बघत होतो. शाळेत गेलो तरी , माझी नजर नुसती रस्त्यावर भिरभिरे. नवीन शिक्षक कधी येणार ? की मी याच शाळेत सडणार ? असे अनेक नकारात्मक प्रश्न मला क्षणाक्षणाला पडू लागले होते. शाळा सुटताना बरे वाटे , पण पुन्हा उद्या याच शाळेत यायचे आहे या कल्पनेनेच पायातील वीज निघून जाई. 

          एखादी गोष्ट करायची आहे आणि ती कशामुळे तरी होत नसेल तर माणसाला किती त्रास होतो हे मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. माझ्या मुलीचा एक वर्षांपूर्वी जन्म झाला होता. तिला घरी जाऊन भेटण्यासाठी आतुर असलेला मी , या बदली होऊनही जाता येत नाही म्हणून पुरता व्याकुळ झालो होतो. कधी नव्हे ती सहा वर्षांनंतर बदली झाली होती आणि मी अजूनही कार्यमुक्त होण्यासाठी नशीबाशी झगडत होतो. आपण कितीही प्रयत्न केला , तरीही जी गोष्ट ज्यावेळी व्हायची असते , ती त्यावेळीच होत असल्याबद्दल मला चांगलाच अनुभव येत होता. मी खूपच कासावीस झालो होतो. माझे बदली झालेले अनेक मित्र नवीन शाळेत हजर होऊन जुनेही झाले होते. मी आपला माझ्या शाळेत हजर होणाऱ्या नवीन शिक्षकाची चातकासारखी वाट पाहून थकून गेलो होतो. प्रतिक्षा करण्याची सवय मला माझ्या आयुष्यात अनेकदा माझ्यावरील परिस्थितीनेच लावली होती. एकटाच रडत कुढत , डोळ्यातले अश्रू कोणालाही न दाखवत मी आनंदात आहे असे सर्वांनाच भासवत होतो. बऱ्याचदा आपल्याला आपला खरा चेहरा दाखवता येत नाही हेच खरे. सुखाचा किंवा आनंदाचा मुखवटा चेहऱ्यावर लावून जीवन जगणे कधीकधी क्रमप्राप्त होऊन जाते. माझ्याबाबतीत तसेच घडत होते. 

          त्यादिवशी नेहमीप्रमाणे शाळेत आलो होतो. खूप पाऊस पडत होता. मी शाळेच्या व्हरांड्यातील पाणी झाडूने स्वच्छ केले होते. धनगर सड्यावर शाळा असल्यामुळे पावसाचा मारा जबरदस्त होत असे. मजबूत चिऱ्यांमुळे शाळा जमिनीत घट्ट रुतून बसली होती. कितीही पड , मला काहीही होणार नाही असे ती पावसाला बजावत असावी. सतत पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे व्हरांडा थोडा बुळबुळीत झाला होता. त्यावरून मला आणि मुलांना चालण्याची सवय झाली होती. अलगद पाय ठेवून चालावे लागे. मीच एक दोनदा घसरलो होतो. मुलांना सवय होती. कातळावरून चालून चालून त्यांना बुळबुळीत पृष्ठभागावरून चालण्याचे नैसर्गिक प्रशिक्षणच जणू मिळाले होते. 

          अचानक शाळेच्या समोर एक रिक्षा थांबली. मला वाटले कोणीतरी आले असतील. मी तिकडे दुर्लक्ष केलं. पण एक विद्यार्थीच म्हणाला , " सर , रिक्षातून उतरणारे कोणीतरी आपल्या शाळेकडेच येत आहेत." मी अजूनही त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्षच करत राहिलो होतो. पण सहज बाहेर बघितले तर खरेच ते आपल्या शाळेकडेच येत होते. माझ्या डोक्यात आता कुठे प्रकाश पडला होता. शाळेत हजर होण्यासाठी नवीन सर रिक्षामधून उतरत असावेत. मी तसाच धावत रिक्षेच्या दिशेने गेलो. पाऊस रिमझिम पडत होता. सरांकडे दोन बॅगा होत्या. त्या घेऊन ते बिचारे शाळेकडे येत होते. त्यांच्याबरोबर त्यांचे वडीलही आले होते. एखादी बॅग घेण्याचा मी प्रयत्न केला. पण सरांनी माझ्याकडे बॅग दिली नाही. ते म्हणाले , " असू दे सर , घेतो मी ". असे म्हणत त्यांनी शाळेच्या व्हरांड्यात पाय ठेवला. नवीन शाळेतील आणि नोकरीच्या पहिल्या शाळेची पहिली पायरी ते चढत होते. 

          नवीन शाळेत प्रवेश करताना मी नेहमी त्या नवीन वास्तूला जमिनीला हात लावून नमस्कार करूनच शाळेत प्रवेश करतो. त्यांच्या दोन्ही हातात बॅगा असल्यामुळे त्यांना नमस्कार  करण्यास एकही हात शिल्लक नव्हता. पण त्या शाळेनेच स्वतःला त्यांच्याकडून साष्टांग नमस्कार करवून घेतला. त्यांनी व्हरांड्यात ठेवलेला पाय घसरला आणि त्यांनी सपशेल साष्टांग नमस्कारच घातला होता. मला हसू आले तरी मी ते आतल्या आत दाबले. वर्गात त्यांचे स्वागत केले. त्यांची विचारपूस केली. त्यांना शाळेचा चार्ज देऊन मी कार्यमुक्त झालो आणि निघालो. मुले माझ्याकडे बघून कावरीबावरी झाली. कुबलसर आता पुन्हा आपल्या शाळेत असणार नाहीत हे त्यांना माहीत झाले होते , त्यांचाही चेहरा रडवेला झाला होता. सलग एका शाळेत काम केल्यानंतर तेथून निघताना मलाही कसेसेच झाले. पण प्रतिक्षा संपली म्हणून ' आसू आणि हसू ' दोन्ही भावना एकाचवेळी उचंबळून आल्या होत्या. 

          नवीन शाळेत गोवळ गावठण येथे हजर झालो. माझा नवीन शैक्षणिक कार्याचा प्रवास सुरु झाला होता. नवीन मुले , नवीन शिक्षक , नवीन ग्रामस्थ , नवीन पालक , नवीन वर्ग , नवीन उपक्रम सर्व नवीन असल्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कधी एकदा वर्गात जाऊन शिकवतो असे झाले होते. लवकरच मी तिथेही जुना होऊन गेलो होतो. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

ताई नव्हे मोठा भाऊच

           आमची ताई आमच्या भावंडांमध्ये सर्वात मोठी. तिच्याकडे बघूनच आम्ही मोठे होत होतो. सातवीपर्यंत शिकताना आम्हाला आई बाबांकडून मार्गदर्शन मिळत असे. तरीही अभ्यासक्रम सतत बदलत असल्याने ताई आणि दोन नंबर बहीण आक्का या दोघांचे मार्गदर्शन आम्हाला मिळू लागले. 

         आमची ताई अभ्यासात खूप हुशार होती. सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतही ती गुणवत्ता यादीत आली होती. तिचे वाचन अफाट होते. कोणतेही पुस्तक मिळाले की ते वाचण्यात ती कमालीची दंग होऊन जाई. शाळा , कॉलेजचा अभ्यास करता करता ती आम्हालाही वैयक्तिक मार्गदर्शन करत असे. आमच्या सर्व शंकांची उत्तरे तिच्याकडे असत. तिचे आमच्यावर जिवापाड प्रेम. पण आमच्याकडून झालेल्या चुकांबद्दल ती आम्हांला चांगलीच खडसावीत असे. कधीकधी तिचा मारही खावा लागे. मार मिळाला तरी आम्हाला तिच्याशिवाय पुढे जाणे शक्यच नसे. तासा अर्ध्या तासात आम्ही आणि तीही सर्व विसरून जात असू. मार्गदर्शनात तिने कधी खंड पडू दिला नाही. 

          सलून दुकान असूनही ती बाबांसोबत रात्री दुकान बंद करेपर्यंत थांबे. सर्व पुरुषासारखी कामे करत असे. सलूनातील सर्व हत्यारे पुसून स्वच्छ करण्याचे काम तीच करी. बाबांनी सांगितलेले कोणतेही काम ती करत असे. बाबांचा तो मोठा मुलगाच होता म्हणा ना !! आम्ही थोडे लहान असल्यामुळे सर्व जबाबदारीची कामे तिलाच दिली जात. सर्व कामे आमची ताई आत्मविश्वासाने करी. बाबांसोबत ती टेलर काम करायलाही शिकली. दुकानात येणारे शिवणकाम आईसोबत माझी ताईच करू लागली. त्यामुळे आईला घराकडील कामे करायला मिळत. घराच्या कामात आईला आक्काने साथ दिली. सर्व प्रकारचे कपडे बाबांनी तिला शिकवले होते. सकाळपासून रात्रीपर्यंत माझी ताई बाबांसोबतच असे. कॉलेज करून ती दुकानातील शिवणकाम आणि इतर कामे सांभाळत होती. 

          शिवणकाम नसताना ती दुकानातच शाळेचा अभ्यास वाचत किंवा लिहीत राही. वाचन करताना तिला एक आवाज करण्याची सवय होती. ती एकाग्र झाली की बंद तोंडातून एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढताना आम्ही प्रत्यक्ष अनुभवले आहे. तिची त्या कामात तंद्री लागली की ती आपल्या जवळ असणाऱ्या कोणत्याही कापडाला , रुमालाला किंवा तिच्या फ्रॉकला बोटाने ' टक टक ' करत असे. हे तिच्याकडून आपसूकच घडे. ती तिची एक सवय होती. प्रत्येकाची एक विशिष्ट पद्धत असू शकते , तिची ती पद्धत होती. त्या सवयीचा तिला किंवा कोणालाही त्रास झालेला मला माहित नाही. रात्री घरी आल्यानंतर जेवण झाले की ती पुन्हा अभ्यासाला बसे. कधीकधी उशिरापर्यंत अभ्यास करताना ती भिंतीला डोके टेकून तिथेच झोपून जाई. ताई दुकानातून लवकर घरी आली तर आमच्या अभ्यासात आम्हाला खूप मदत होई. तिचे अक्षर अगदी मोत्यासारखे , ते बघून आम्ही तसे अक्षर काढण्यास शिकलो. तिने मला अनेकदा निबंध लिहिण्यास घातला आहे. 15 ते 20 ओळींचा निबंध ती सहज अभ्यास करता करता सांगत असे. तिच्यासारखा चांगला निबंध आम्हाला लिहिता येत नसे. 

          आम्ही एकदा असेच तिच्यासोबत बाजारात गेलो होतो. बाजार आणायचा होता. बाजारात भरपूर खाऊही दिसत होते. ते खाऊ आम्हाला आकर्षित करत होते. आम्ही ते खाऊ ताईला आमच्यासाठी घ्यायला सांगत होतो. त्या खाऊसाठी ताईकडे पैसे कसे असणार ? दिलेले पैसे बाजारासाठीच पुरत नव्हते. तेव्हा ताई आम्हाला म्हणे , " आम्ही एवढे भारीवाले खाऊ कधीच खायचे नसते. त्यासाठी जास्त पैसे लागतात. त्यासाठी आपल्याला खूप शिकून मोठे व्हायला लागेल. गरिबांनी हे सगळं बघायचं असतं. ते मिळण्यासाठी कधीच हट्ट करायचा नसतो. " तिचे बोलणे त्यावेळी आम्हाला समजत नव्हते. शिकत गेल्यानंतर थोडी समज आली होती , तरीही श्रीमंत माणसं खातात ते पदार्थ मी कधीतरी नक्की खाणार हे वाक्य माझ्या मनात मी सतत घोळवत ठेवलं होतं . 

          ताईचे लग्न झाल्यानंतर ती सासरी जाताना आम्हाला काही वाटले नाही. पण त्यानंतर आम्हाला तिची फार उणीव भासू लागली. तिचे काम मग आम्ही दोघे भाऊ मिळून करू लागलो. पण ती एकटी जे करू शकत होती , ते आम्ही दोघे करू शकलो नाही हे मी मान्य करतो. ती आमची मोठी ताई नव्हती , तर मोठा भाऊच होता हे अजूनही सांगताना मला अभिमानच वाटतो. ताईचे पती म्हणजे आमचे मोठे भावोजी ताई इतकेच शिकलेले. त्यांचाही आमच्यावर प्रभाव आहे. त्यांचे अक्षर , स्वभाव , व्यक्तिमत्त्व यामुळे आम्ही त्यांच्याकडूनही शिकत गेलो. 

          आज आमची ताई मंत्रालयातील उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयमध्ये लिपिक पदावर कार्यरत आहे. तिने दिलेले संदेश आमच्यासाठी अमृताचे बोल आहेत. लग्नानंतरही तिने आम्हाला नेहमीच मानसिक आणि आर्थिक आधार दिला आहे. भावंडे अशी असावीत , जी आपल्या इतर भावंडांसाठी कायमच सोबत असतात. प्रत्येक वेळी पैशाचीच गरज असते असे नसते. नुसता शाब्दिक मानसिक आधार सुद्धा नवीन उमेद आणत असतो. ही उमेद फुलवणारी आमची ताई म्हणूनच आमच्यासाठी सदासर्वदा गुरुस्थानी असणार आहे. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबल  ( 9881471684 )



बदली कि बदला

           माझ्या पत्नीचे निधन झाले होते. तेव्हा मी गोवळ गावठण या शाळेत होतो. ती पाटगाव शाळेत होती. आम्ही पाटगाव येथे राहात होतो. आता 4 वर्षाच्या छोट्या मुलीला घेऊन राहणे मला जमणारे नव्हते. अर्थात बदली करणे क्रमप्राप्त होते. त्यावेळी बदलीसाठी अनेकांचे उंबरठे झिजवावे लागत. मला तेही शक्य वाटत नव्हते. पण बदली आवश्यकच होती. 

          बदलीसाठी अर्ज केला. त्याच्या अनेक प्रती काढल्या. माहितीसाठी पदाधिकारी व अधिकारी सगळ्यांना दिल्या. किर्लोस गावातील एक समाजसेवक गोपीनाथ लाड यांचे मोठे सहकार्य लाभले. त्यांनी अनेकदा सिंधुदुर्गनगरीचा प्रवास केला. त्यांच्यासोबत मीही दोन ते तीन वेळा गेलो असेन. बदलीची ऑर्डर आली. माझी बदली शिडवणे नं. 1 शाळेत झाली होती. माझी पूर्वीची शाळा त्याच बाजूला असल्याने मला ही शाळा लांब वाटू लागली. शाळा बदलून घेण्यासाठी पुन्हा एकदा ओरोस वारी केली. जाताना मला कसाल हायस्कुलच्या प्रवेशद्वारावर शिक्षक प्रशिक्षणासंदर्भात संघटनात्मक आंदोलन सुरू असताना दिसले. तेथे मला भाई चव्हाण, सुनिल चव्हाण असे संघटनेचे नेते भेटले. त्यावेळी सुनिल चव्हाण म्हणाले होते , " सर , खूप वाईट घटना घडली आहे , आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत, आम्ही तुम्हाला तसे पत्र देतो. " भाई चव्हाण यांनाही बदली संदर्भात बोललो. तेही म्हणाले , " मी आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटणार आहे . तेव्हा मी तुमचा विषय घेतो. तुमची बदली नक्की होईल काळजी करू नका. " बदली त्यांच्या प्रयत्नामुळे झाली असेल किंवा गोपीनाथ लाड यांच्यामुळे ते मला नक्की माहिती नाही. पण त्यांनी नक्की प्रयत्न केले असतील याबद्दल खात्री आहे. सुनिल चव्हाणसर यांनी सांगितल्याप्रमाणे पत्रही पाठवले. संघटनेने मला त्यावेळी दिलेल्या आधाराबद्दल मी त्यांच्या ऋणात राहणेच पसंत करतो.

          बदली अर्जामध्ये फोंडा गांगोवाडी , फोंडा माळ अशा शाळांची मी मागणी केली होती. त्यानुसार मला पुन्हा बदली ऑर्डर बदलून मिळाली होती. त्यानुसार मला ' फोंडा गांगोवाडी ' शाळा मिळाली होती. मला खूप बरे वाटले. मोठी शाळा मिळाली याचाही आनंद झाला. मी त्यावेळच्या गटशिक्षणाधिकारी यांना फोन करून माझ्या ऑर्डर बाबत सांगितले. त्यांनी मला सांगितले कि तालुकास्तरावरून ' फोंडा गांगोवाडी शाळा दुसऱ्या कोणालातरी दिली आहे , त्यामुळे तुम्ही तिथे अतिरिक्त होणार आहात , तुम्ही ऑर्डर असली तरी हजर होऊ शकत नाही म्हणूनही सांगितले. मला पुन्हा एकदा भर पावसातही घाम फुटला होता.

          साहेबांनी मला ऑफिसला यायला सांगितले. मला उर्वरित शाळांची यादी दाखवली. मी यादीमधली एक शाळा निवडली. पण साहेब म्हणाले की मी तुम्हाला पत्र देतो ते शिक्षणाधिकारी साहेबांकडे घेऊन जा. ते तुम्हाला ऑर्डर बदलून देतील. मला त्या मुसळधार पावसातून ओरोस गाठावे लागले . त्यावेळी असणाऱ्या शिक्षणाधिकारी साहेबांनी मात्र लगेच ऑर्डरवर बदल करून संक्षिप्त सही करून मला ऑर्डर परत दिली. मला आता थोडे बरे वाटले. मी आणि माझे बाबा शाळा बघून आलो. शाळेत चार ते पाचच मुले असल्याबाबत समजले. शाळा कणकवलीपासून 8 किलोमीटरवर होती. 

          शाळा सुरू कधी होते असे मला झाले होते. जुन्या शाळेत हजर होऊन कार्यमुक्त व्हायचे होते. गोवळ गावठण शाळेतून कार्यमुक्त होतानाचा दिवस अजूनही चांगलाच आठवतो आहे. सर्व मुलांनी आणि शिक्षकांनी माझ्यासाठी 15 मिनिटांचा आकस्मिक निरोप समारंभ ठेवला होता. मी रडत रडतच मुलांशी बोललो होतो. मला ती शाळा सोडताना अनेक वेदना होत होत्या. शिक्षकांनीही माझे सांत्वन केले. पत्नी गेल्यानंतर मी पहिल्यांदा शाळेत गेलो होतो. काही पालकही भेटायला बघत होते. पण त्यांना मला भेटायचा धीर झाला नाही. इतकी वर्षे झाली तरी अजूनही मी त्यांना भेटायला गेलो नाही. पाटगावला हल्लीच गेलो होतो , पण गोवळला थांबायचे मनात असूनही थांबलो नाही. 

          आता मला माझ्या नवीन शाळेत हजर होण्यासाठी बाहेर पडायचे होते. माझी CD Dawn गाडी होती. येत असताना मनात अनेक विचारांचं काहूर माजलं होतं. माझं ड्राईव्हिंगकडे लक्ष नव्हतं असं नाही. पण नांदगाव तिठ्यावर गाडीसमोर एका पाड्याने ( बैलाने ) मला गांगरवले. तो अचानक माझ्या गाडीसमोर आला. त्याला ठोकणार म्हणून माझी गाडी थोडी वळवली, तर तो पुन्हा तिकडेच वळला. त्याला गाडीचा स्पर्श झाला , तो नीट सुटला पण माझी गाडी घसरली. मी रस्त्यावर सपशेल आडवा झालो. समोरून किंवा मागून गाड्या येत नव्हत्या म्हणून बरे झाले. नाहीतर हे लिहिण्यासाठी मी असलो नसतो. माझी पँट फाटली , शर्ट फाटले , थोडेसे खरचटले , बाकी काहीच झाले नाही. मी तसाच उठलो आणि पुन्हा किक मारून नवीन शाळेत हजर होण्यास निघालो. 

          मी शिरवल गावचा रस्ता धरला. शिरवल रतांबेवाडी शाळा मला मिळाली होती. शाळेत जायचा रस्ता मळ्यातून जाणारा होता. रस्त्यावर गाडी ठेवून 10 मिनिटे चालून शाळेकडे गेलो. शाळा उघडी होती. शाळेतील शिक्षक माझ्या ओळखीचे नव्हते. मी आत प्रवेश केला आणि माझी ऑर्डर त्यांना दाखवली. शिवराम सुतारगुरुजी माझ्यासाठी नवीन होते. मुले माझ्याकडे आशेने बघत होती. सरांकडे माझी ऑर्डर नव्हती. त्यांच्याकडे मडवबाईंची ऑर्डर होती. त्या हजर झाल्या नव्हत्या. त्यांनी मला हजर करून घेण्यास खूपच उशीर लावला. ते म्हणाले , " मला माझ्या वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल , त्यांनी सांगितले की मी तुम्हाला हजर करून घेऊ शकतो. " अर्थात शिक्षणाधिकारी यांच्या सहीची ऑर्डर असूनही ते मला हजर करून घ्यायला विलंब लावत होते. माझी कथा सविस्तर सांगितल्यानंतर त्यांना माझी दया आली आणि मला त्यांनी हजर करून घेऊया असे म्हटले. तरीही मस्टरवर सही करेपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. दुपारपर्यंत केंद्रप्रमुख आले . त्यांनी सुतारगुरुजींना सूचना देताच त्यांनी मला तात्काळ हजर करून घेतले. 

          यात कोणाची चूक असेल तर मला अजिबात सांगता येत नाही. कदाचित कुणाची चूक नसेलही. प्रत्येकजण बरोबर वागत असावा. माझाच पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा असू शकतो. पण नियतीने माझी बदली केली होती की नियती माझा असा बदला घेत होती हे मीही नीट सांगू शकत नाही. माझ्यावर त्यावेळी जशी वेळ आली होती तशी माझ्या शत्रूवरही येऊ नये अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )

फर्स्ट इंडियन आयडॉल आणि मी

           देवगड तालुक्यातील गोवळ गावठण या शाळेत असतानाची गोष्ट आहे. एवढी सुंदर शाळा मिळाली होती कि मी ती शाळा स्वतः मागून घेतली होती. ती शाळा आकस्मिकरित्या मला सोडावी लागली याचा मला कायमच खेद राहील. आम्ही ती शाळा बांधण्यासाठी प्रयत्न केले होते. शाळेत विविध गरजांची पूर्ती करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत होतो. रात्रीच्या सभा घेऊन लोकांना प्रेरित करत होतो. सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य मिळत होते. खटावकरगुरुजी मुख्याध्यापक म्हणून आले आणि कामाचा वेग अधिकच वाढला होता. 

          त्याच काळात इंडियन आयडॉल ही स्पर्धा सुरू झाली होती. त्याचा विजेता अभिजित सावंत झाला होता. तो गोवळ गावातील होता हे आमचे भाग्यच म्हणावे लागेल. तो विनर ठरला म्हणून आमच्या गोवळ गावातील सर्वांना अतिशय आनंद झाला होता. मोठे मोठे बॅनर लावून पंचक्रोशीतील गावातील लोकांनी त्याचे अभिनंदन केले होते. अभिजित सावंत हा गोवळ गावाची अस्मिता ठरला होता. गोवळ गावठण शाळेपासून 100 मीटर अंतरावर त्याचे घर आहे. जाता येता कधीही दिसेल असे रस्त्यालगतच आहे. त्यावेळी अँड्रॉइड मोबाईल असते तर त्याची गोवळकरांनी अधिकच प्रसिद्धी केली असती. पण तरीही त्याची प्रसिद्धी वाऱ्यासारखी पसरविण्यात गोवळवासीयांचा वाटा होता हे मान्यच करावे लागेल. 

          आम्ही त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्या घरी गेलो होतो. त्याची आजी घरी होती. तिने आमचे यथोचित स्वागत केले. आम्ही तिचे अभिनंदन केले. आम्ही तिच्याशी अभिजितच्या अभूतपूर्व यशाबद्दल बोललो. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते. ती स्वतः अंतिम सोहळ्यामध्ये उपस्थित होती. तिला झालेला आनंद ती शब्दात व्यक्त करू शकत नव्हती. ती आपल्या नातवाबद्दल भरभरून बोलत होती. शाळेतून शिक्षक अभिनंदन करायला आले म्हणून तिला अपार आनंद झाल्याचे दिसले. तिने आमचे मनोमन आभार व्यक्त केले. 

          एकदा मी अभिजीतच्या वडिलांचा फोन मिळवला. त्यांना फोन करून त्यांचेही अभिनंदन केले. आमच्या शाळेत 'अभिजित ' ने यावे असा आम्ही त्यांच्याकडे हट्टच धरला. अभिजित सध्या बिझी असल्यामुळे तो येऊ शकणार नाही असे त्यांनी सांगितले. काही दिवसानंतर त्यांचा निरोप आला. त्यांनी शाळेला बेंचीस देण्याचे ठरवले होते. त्यांनी आम्हाला रोख स्वरूपात वीस हजार रुपये त्यावेळी शैक्षणिक देणगी दिली. आम्ही त्या पैशातून शाळेसाठी 22 बेंचीस आणल्या. त्या देताना आम्हाला स्वतः अभिजित असायला हवा होता. आमच्या शालेय व्यवस्थापन समितीने अभिजीतकडे आग्रही विनंती केली. शेवटी अभिजित शाळेत यायला तयार झाला. 

          मला स्वतःला गायन आवडत असल्यामुळे अभिजित येतोय याबद्दल अतिशय आतुरता वाटत होती. त्याची गाणी दररोज गुणगुणण्याचे काम मी करत होतो. त्याचा कोणताही टीव्ही शो मी पाहत होतो. अखेर तो दिवस उजाडला. मुलांनाही आनंदाचे भरते आले होते. शाळेतील सर्व शिक्षकही एखादा सण असल्याप्रमाणे आनंदात होते. तो येत असताना शाळेभोवती तुफान गर्दी जमली होती. ढोल ताशांच्या गजरात त्याचे आगमन झाले. फटाक्यांची आतिषबाजी झाली. अभिजात संगीतातील भारताचा पहिला वहिला इंडियन आयडॉल अभिजित सावंतची पाऊले आमच्या शाळेला लागली होती. सर्वांसाठी तो ' न भूतो न भविष्यती ' असा क्षण होता. प्रवेशद्वारावर त्याचे यथोचित औक्षण करण्यात आले. तोही आपल्या गाववाल्यांकडून मिळणाऱ्या या अनपेक्षित प्रेमाने भारावून गेल्याचे जाणवत होते. 

          त्याचा समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला. त्याचे शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. त्यावेळी शाळेची जुनी इमारत होती. त्यामुळे लोकांना बसायला जागाही पुरत नव्हती इतकी गर्दी झाली होती. अभिजीतने आपल्या भाषणात लोकांबद्दल आदर व्यक्त केला व आभार मानले. 

          असे अनेक प्रसंग आपल्या शाळेत घडत असतात. सर्व प्रसंगांना अविस्मरणीयतेचा दर्जा देता येईल असेच ते असतात. पण अभिजित सावंतचा तो काही मिनिटांचा सहवास मी त्याच्याच गाण्याचा आधार घेत सांगू शकेन , " लब्जोमें कह ना सकू " . त्याला मी हे गाणे म्हणण्याचा आग्रह धरला होता , पण साऊंड सिस्टिमशिवाय कोणतेही मोठे गायक गाणे म्हणत नसल्याने आम्हाला त्याची प्रत्यक्ष गाणे ऐकण्याची संधी हुकली होती याबद्दलही हुरहूर वाटली. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



बालामामा : माय आयडियल ब्रँड

           आमचे बाला मामा रत्नागिरीत राहतात. मी त्यांच्याकडे नोकरीनिमित्ताने 6 ते 7 महिने राहिलो असेन. त्यापूर्वीही मी अनेकदा त्यांच्याकडे सुट्टीमध्ये गेलो आहे. मामा , मामी , बबलू , गुड्डी आणि आजी या सर्वांकडून मला जे प्रेम मिळाले ते एका लेखातून व्यक्त होणे शक्य नाही. आमच्या संपूर्ण नातेवाईकांमध्ये नोकरीला असलेले जवळचे नातेवाईक म्हणजे आमचे मामा आणि मामी दोनच होते. कणकवलीचे त्यांचे मोठे भाऊ भाईमामा हेही माझे आदर्श आहेत. त्यांच्याविषयी मी नंतर स्वतंत्र लेखात अधिक सांगेनच. 

          बालामामांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग असे आहे. त्यांना राग कधी आलेला नाही. ते नेहमी संयमाने बोलतात. नोकरी आणि घर यात गल्लत करत नाहीत. नोकरी करताना नोकरीच करावी. घरी असताना नोकरीचा विचार न करता घराकडे लक्ष द्यावे. मामांचे ऑफिस घराच्या जवळच होते. मामी भूमी अभिलेख कार्यालयात क्लार्क होती. ती अतिशय प्रेमळ स्वभावाची. घरात देवपूजा झाली की सर्वांना विभूती लावताना ती मलाही आठवणीने विभूती लावत असे. जेवणात तिचा हात धरणारे कुणीही नसेल इतका फक्कड स्वयंपाक करत असे. तिने केलेली माशांची कढी अजूनही आठवते. जेवताना आम्ही सगळे एकत्र जेवत असू. आपल्याला हवे तितके आपण स्वतः वाढून घ्यायचे असे. मी न लाजता मला हवे तितके जेवण घेत असे. मी कमी घेईन म्हणून मला माझी मामी आठवणीने चौकशी करून आग्रहपूर्वक जेवू घाले. पण मीच संकोच करत असे. 

          मामांचे माझ्याकडे विशेष लक्ष असे. आपल्या बहिणीचा मुलगा पुढे जावा अशी त्यांची नेहमीच भावना राहिलेली आहे. त्यांना न समजलेली गोष्ट ते मलाही विचारत असत. मी त्यांचा भाचा असूनही मी शिक्षक आहे याचा त्यांना कायमच आदर वाटत आलेला आहे. ते माझ्याबद्दल अभिमानाने बोलताना मी ऐकलेले आहे. रत्नागिरीसारख्या शहरात नोकरी करून एक चांगले ' चव्हाणभाऊ ' म्हणून त्यांनी सन्मान मिळवलेला मी प्रत्यक्ष पाहिलाय. म्हाडा वसाहतीमध्ये राहताना त्यांना अनेकदा संघर्षाला तोंड द्यावे लागले आहे. पण शांत डोक्याने त्यांनी त्याचा प्रतिकारही केला आहे. त्यांची कामाची पद्धत मला खूप काही शिकवून गेली आहे. घरातील कोणतेही काम करताना त्यांनी कंटाळा केला नाही. त्यांच्याकडे बघून मलाही त्यांच्यासारखे व्हावे असा दृष्टिकोन तेव्हापासूनच माझ्या मनात येत राही. मी त्यांच्यासारखा होऊ शकलो नसेन. पण आज मी जो आहे त्यात मामा आणि मामी या दोघांचाही तितकाच वाटा आहे. 

          एकदा मला रत्नागिरीवरून घरी यायचे होते. मी मला घरी येताना घ्यावयाच्या वस्तू एका पॅडवरील पांढऱ्याशुभ्र कागदावर लिहून ठेवल्या होत्या. मामांनी त्या बघितल्या. त्यावर छत्री वगैरे असे काहीबाही लिहिले होते. तो कागद उलटून बघितल्यानंतर समजले कि तो साधा कागद नव्हता तर तो एक त्यांच्या कस्टमरने दिलेला बॉंड पेपर होता. माझ्या त्या लिहिण्यामुळे तो खराब झाला होता. तरीही मामा मला काहीही बोलले नाहीत. माझ्याकडून तर चूक झालीच होती. मला त्यावेळी त्यांच्याकडे क्षमाही मागता आलेली नाही. त्यांनी मला कधीच क्षमा करून टाकली होती. आपल्या भाच्याला वाईट वाटेल असे ते कधीच वागले नाहीत. कदाचित माझ्याकडूनच अनेक चुका झाल्या असतील. मामा आणि मामी यांनी त्यावेळी मला दिलेला आधार माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या इमारतीचा मुख्य पिलर असावा असे मला वाटते. 


©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )

कर कच कट

           त्यावेळी आमचे सलून ढालकाठी येथील सावळाराम वाळके यांच्या जागेत होते. त्यांच्या नारळाच्या दुकानाच्या मागे रिकामी जागा होती. त्यामध्ये त्यांचे गोडाऊन होते. त्यापैकी एक जागा त्यांनी आम्हाला भाडेतत्त्वावर दिली होती. त्यांनी उद्या जायला सांगितले तरी आम्हाला जायला लागले असते अशा बोलीवरच त्यांनी आम्हाला ती जागा दिली होती. आम्हाला गरज होती, त्यामुळे त्यांचे सर्व नियम आम्ही म्हणजे बाबांनी मान्य केले होते. 

          दुकान उंचावर होते. त्यामुळे चार पाच पायऱ्या चढून दुकानात प्रवेश करावा लागे. बाबांनी त्या दुकानाचे दोन भाग केले होते. त्यातला आतील भाग शिलाई मशीन ठेवण्यासाठी वापरला होता. त्यावर आमची आई  , ताई किंवा स्वतः बाबा गिऱ्हाइकांचे कपडे शिवत असत. दुकानात दोन खुर्च्या ठेवल्या होत्या. त्यावर माझे बाबा आणि माझे एखादे काका काम करत. काका गावावरून दररोज येत. कधीतरी संध्याकाळी उशीर झाला तर काका कणकवलीत आमच्या खोलीवर थांबत.

         शिलाईमशीननेही आम्हाला जगवले. दुकानात काम नसताना तिच्यावर केलेल्या शिवणकामावर आमचा चरितार्थ चाले. मी त्यावेळी लहान होतो , त्यामुळे मशीनवर बसून शिवणे मला जमत नव्हते. फक्त पायडळ मारणे जमत होते. खाली पायडळ मारल्यावर वरचे चाक गरागरा फिरते म्हणून मला गंमत वाटे. त्यामुळे टाईमपास म्हणून मी सहजच पायडल मारत बसे. बाबा ओरडेपर्यंत मी हे काम करत राही. बाबा ओरडले की माझे चाक फिरवणे मी थांबवी. बाबांचा मार मला चांगलाच माहीत होता. 

          त्यादिवशी मी शाळेतून दुकानात आलो. बाबा कोणते तरी गिऱ्हाईक करत होते. मी माझा टाईमपास सुरू केला होता. शिलाई मशिनचे पायडल मारत राहिलो होतो. बाबांना त्याचा आवाज येत होता. पण बाबा मला काही बोलले नाहीत. त्यामुळे मला बाबांची परवानगीच मिळाली आहे अशा थाटात मी माझे पायडल चालवण्याचे स्पीड वाढवले. त्यामुळे मोठा आवाज येऊ लागला होता. एकदा बाबा मला ओरडलेही असतील कदाचित , पण मी माझ्या नादात ते ऐकायला विसरलो होतो. माझी गाडी धूम सुसाट पळत होती. मशीनचा खडखडाट सुरूच होता. अचानक खडखडाट थांबला होता. ' कर कच कट ' असा आवाज येऊन मशिनची सुई माझ्या हाताच्या बोटातून आरपार गेली होती. सुई बोटात गेल्याबरोबर मशिनचे चाक फिरायचे थांबले . सुई बोटात गेल्यामुळे मीही थांबलो. 

          अचानक मशीन ' कर कच कट ' असा आवाज करत थांबली कशी ? असा विचार करून बाबा पार्टिशनच्या पलीकडे माझ्याकडे आले. मी आपला गप्प. सुई बोटात गेली तरी तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. बाबांनी ओळखले होते. ते माझ्या जवळ आले. त्यांनी माझ्या बोटात गेलेली सुई काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. माझा हात आपल्या हातात घेतला. बोटातून रक्त वाहू लागलं होतं. तरीही मी गप्पच. जर मी रडायला सुरुवात केली असती तर मला अजून मार मिळाला असता या भीतीनेच मला रडायला येत नव्हते. बाबांनी माझा हात आपल्या तोंडाकडे नेला. मला काहीच समजत नव्हते. त्यांनी आपल्या दातांनी माझ्या बोटातील सुई ओढून काढली. सुई काढल्यानंतर रक्त जास्त वाहू लागले होते. बाबांनी शिवणकाम करताना उरलेल्या कापडाची मला पट्टी बांधली. त्यापूर्वी दुकानातील डेटॉलने जखम स्वच्छ धुऊन घेतली होती. 

          त्यानंतर मला स्वतःला शिवायला येईपर्यंत मी मशीनला हात लावला नसेन. दररोज खोबरेल तेल आणि पांढरी अँटिबायोटिक पावडर लावून लवकरच माझे दुखरे बोट बरे झाले होते. त्यामुळे मला एक कायमचा धडा मिळाला होता कि आपल्याला माहीत नसताना कोणत्याही यंत्राच्या भानगडीत पडू नये हेच खरे. नाहीतर असे घडते , " कर कच कट ". 


 ©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



मी उंदीर झालो

           पाचवीत असतानाची गोष्ट असेल. भालचंद्र महाराज विद्यालय शाळेत त्यावेळी पालवगुरुजी होते. ते वरच्या वर्गांना शिकवत. कधीतरी आमच्या वर्गात येत असत. त्यांची चित्रकला आम्हाला आवडायची. फळ्यावर चित्र काढताना चित्र पूर्ण झाल्याशिवाय ते थांबत नसत. अक्षरही वळणदार आणि वेगवेगळ्या पद्धतीचे. इंग्रजी रनिंग लिपी देखील काढत. फक्त त्यावेळी ती आम्हाला समजत नसे. त्यांचा गणपतीच्या मूर्तीचा कारखाना होता. शाळा सुटल्यानंतर आम्ही तिथे बघायला जात असू. आमचे पालवगुरुजी चित्रकार आहेत , मूर्तिकार आहेत याबद्दल आम्हाला अभिमान आहे. ते स्काऊट मास्टर देखील होते. अनेक प्रशिक्षणे पूर्ण करून त्यांनी कार्यशाळा घेतल्या होत्या. 

          दिल्लीचे सी. सी. आर. टी. चे प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर त्यांनी त्याची अंमलबजावणी शाळेत सुरू केली. कळसूत्री बाहुल्यांचे प्रयोग केले. आम्हाला त्यांचे प्रयोग बघायला खूप आवडत. त्यांचा वाचिक अभिनय चांगला होता. विविध प्रकारचे आवाज काढण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखेच होते. एकच माणूस दोन ते तीन आवाज काढत सोबत बाहुल्या नाचवण्याचे काम पाहून आम्ही मंत्रमुग्ध होऊन जाऊ. त्या निर्जीव बाहुल्यांना काही मिनिटांसाठी सजीव करण्याचे कौशल्य पालवगुरुजींमध्ये होते. त्यांचा भटजी मला खूप आवडे. तो बोलायला लागला की त्याचा जबडा वर खाली होई. आरती म्हणताना तो नाचतही असे. पालवगुरुजींची सर्वच पात्रे विनोदी असत. त्यामुळे आम्हा लहान मुलांना गंमत वाटे. मोठी माणसे त्यातून बोध घेतील असाही संदेश शेवटी दिला जात असे हे विशेष होते. या संपूर्ण कार्यक्रमात पालवगुरुजी दिसत नसत. त्यांचा फक्त आवाज ऐकू येई. नंतर पालवगुरुजींनी मुलांची मदत घ्यायला सुरुवात केली. त्यांना एक रेकॉर्डिंग करायचे होते. त्यांनी आमच्या शाळेतील दोन मुले आणि तालुका स्कुलमधील दोन मुले निवडली होती. त्या मुलांमध्ये मी होतो.

          गोष्टीचे नाव होते ' बुड बुड घागरी '. त्यात उंदीर , मांजर , माकड आणि निवेदक अशा चार जणांचे आवाज रेकॉर्ड करायचे होते. मला उंदराची भूमिका मिळाली होती. फक्त संवाद म्हणायचे नव्हते तर संवादासोबत पार्श्वसंगीतही द्यायचे होते. पालवगुरुजी यांनी सर्व वस्तू जवळ ठेवल्या होत्या. चार ते पाच वेळा सराव घेऊन मगच अंतिम रेकॉर्डिंग करण्यात आले. सर्व संवाद पालवगुरुजींनी आम्हाला एका कागदावर लिहून दिलेले होते. त्यांचे बघून वाचन करायचे होते. माझ्याबरोबर आमच्या शाळेतील प्रणाम कामत हा मुलगा होता. त्याचा अभिनय अफलातून होता. त्याचं जगणंच ते होतं. पण तो खोडकर मुलगा होता. त्याचे वडील नसल्यामुळे त्यांच्या काकांकडे तो राहत असे. आज तो एक प्रसिद्ध व्यापारी आहे. त्याने कोणती भूमिका केली होती ते मला आता नक्की सांगता येत नाही. मला वाटतं तो माकड झाला असावा. 

          इतर दोन मुले आमच्यासाठी अनोळखी होती. आम्ही त्यांना विचारले , " तुम्ही कुठले ? " त्यांनी उत्तर दिले , " आशिया " . आम्ही दोघेही हसलो. कारण आम्हाला त्यावेळी आशिया खंड माहीत होते. मी सहज विचारले , " तुम्ही इतक्या लांबून कसे आलात ? " ते म्हणाले , " पायाने " . आम्ही चकित झालो. इतक्या लांबून पायाने आल्याबद्दल आम्हाला त्यांचे आश्चर्य वाटले. नंतर समजले की ती मुले आशिये या शेजारच्या गावातून आले होते. ते ' आशिया ' बोलल्यामुळे आमचा घोळ झाला असावा. 

          माझ्याकडे सोपी वाक्ये दिलेली होती. त्यापैकी एक वाक्य असे होते  , " ची ची करी , वरचे डोंगरी मी खीर खाल्ली तर बुड गे घागरी " मी चांगला वाचिक अभिनय केला होता. गुरुजींनी आमची सगळ्यांची पाठ थोपटली होती. ते रेकॉर्डिंग त्यांनी पुढे अनेक कळसूत्री कार्यक्रमांमध्ये वापरले असेल. माझ्या मुली लहान असताना त्यांना बऱ्याचदा ही ' बुड बुड घागरी ' ही गोष्ट सांगावी लागली आहे. मला वाटतं सर्वच आई वडिलांनी आपल्या पाल्यांना ती ऐकवली असेल.

          गोष्टीचा सराव केल्यामुळे माझ्या अंतर्मनात तीच गोष्ट रात्रीपर्यंत राहिली होती. सकाळी उठताना मला आईने हलवून उठवले तर मी अजून उंदीरच असल्याप्रमाणे बडबडत उठलो , " ची ची करी , वरचे डोंगरी , मी खीर खाल्ली तर बुड गे घागरी . " 


©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...