Sunday, July 3, 2022

🛑 कब बाळ : आपला शैक्षणिक भविष्यकाळ

🛑 कब बाळ : आपला शैक्षणिक भविष्यकाळ

          स्काऊटिंगमध्ये 6 ते 10 वर्षे वयोगटातील बालकांना ' कब ' म्हटले जाते. बालक म्हणजे येथे फक्त मुलगे असा अर्थ अपेक्षित आहे. मुलींसाठी ' बुलबुल ' असा शब्द संबोधला जातो. 

          लहान मुलांना प्राण्यांच्या , पक्ष्यांच्या गोष्टी खूप आवडतात. आमच्या लहानपणी ' चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ' ही सर्वांना आवडणारी गोष्ट होती. त्यात वाघ , लांडगा हे प्राणी दाखवलेले होते. त्यातील वाघ आता मोगलीच्या गोष्टीत ' शेरखान ' बनून आला आहे असे वाटते. लांडगा ' अकेला ' बनला आहे. यात म्हातारी कुठेही नाही तर तिची जागा कदाचित ' मोगली ' ने घेतली असावी. 

          आम्ही टीव्ही बघितला तेव्हा त्यावर कार्टून लागतं हे समजल्यावर टीव्हीवर प्रेम जडले. त्या कार्टुनमध्ये ' टप टप टोपी टोपी ' हे गाणं लागलं की आमची आवडती मालिका लागली म्हणून बघण्यासाठी आम्हां मुलांची फौज टीव्ही असणाऱ्या घराचा ताबा घ्यायची. छोटा मोगली करत असलेल्या करामती बघून आमच्यातही तो संचारु लागे. 

          हाच धागा पकडून आपल्याला आपला आजचा ' कब ' घडवायचा आहे. आपला विद्यार्थी संस्कारित करायचा आहे. त्याच्या बाललीला योग्य दिशेने कशा जातील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे आहेत. त्यांच्या सुप्तगुणांना योग्य दिशा द्यायची आहे. स्काऊटची संकल्पना असणारे हे ' कबिंग ' त्याचाच एक भाग आहे हे आपल्या लक्षात यायला हवे. 

          गाणी , गोष्टी , खेळ आणि संघ पद्धतीच्या माध्यमातून मुलांना योग्य आकार देण्यासाठी आपल्याला ' कबिंग ' चा नक्कीच वापर करता येईल. मुलांना खेळ , गाणी , गोष्टी जात्याच खूप आवडतात. त्यांच्या या आवडीचा वापर करत करत त्यांना सहज शिक्षण दिल्यास ते शिक्षण त्यांना दीर्घकाळ लक्षात राहणारे व चिरकाल टिकणारे असेल असे वाटते. 

          म्हणून प्रत्येक शाळेमध्ये बनी , कब , बुलबुल , स्काऊट , गाईड , रोव्हर , रेंजरची पथकं असणं ही काळाची गरज होऊ पाहते आहे. मुलांना मोबाईल स्क्रिनपासून दूर नेण्यासाठीही याचा अभिनव उपयोग होऊ शकतो. घरात ढिम्म बसून राहणारी मुले याद्वारे काही हालचाली करतील. बेडन पॉवेल यांनी दिलेले ' बीपी सिक्स ' व्यायाम प्रकार करतील. आभासी दुनियेत राहणारी मुले ' मोगली ' प्रमाणे धैर्याने संकटांचा सामना करण्याची क्षमता प्राप्त करु शकतील. 

          ' मोगलीची गोष्ट ' समजून घेताना निसर्गाच्या सानिध्यात राहण्यास शिकतील. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जर एकत्र राहू शकतात , तर आपण का नाही ? हा दृष्टिकोन वृद्धिंगत होण्यासाठी ' कबिंग ' ही उत्तम संकल्पना आहे. हिंस्त्र प्राणी देखील माणसासारख्या भावना बाळगतात हे शिकू शकतील. नुकत्याच जन्माला आलेल्या लांडगीच्या पिल्लांसोबत ' माणसाचं ' मूल मोठं होत होतं ही कल्पना मुलांसाठी भूतदया शिकवणारी ठरु शकते.

          मोगलीला भालू आणि भगिरा सारखे सल्लागार भेटतात. त्यांचं मोगलीसाठी प्राणपणानं लढणं , झगडणं हेही मुलांनी लक्षात घेण्यासारखं आहे. "  कब बाळ , वडील माणसांचं ऐकतो , कब बाळ , स्वच्छ आणि नम्र असतो " या दोन नियमांवर आधारित केलेली कबिंगची निर्मिती म्हणूनच संस्कारक्षम वाटते. 

          सध्या हा बाळ ' कब ' बाळ नसल्यामुळे कदाचित वडील माणसांचं ऐकताना दिसत नाही. या ' कबिंग ' मुळे हा आजचा बाळ ' कब ' होऊन जाईल आणि वडीलधाऱ्यांचे ऐकेल , नम्र आणि स्वच्छ बनेल असेही वाटते. 

          या जगात शेरखानसारखी माणसं त्याला ज्या ज्या वेळी भेटतील तेव्हा त्यांच्याशी सामना करण्यासाठी तो एकट्याने लढणार नाही तर ' सांघिक ' शक्तीचा वापर करेल. शक्तीच्या वापरापेक्षा युक्तीचा वापर करेल. 

         तो विश्वसनीय , निष्ठावान , शिस्तप्रिय , विनयशील , प्राणीमित्र , मित्र , निसर्गमित्र, सार्वजनिक मालमत्तेचा रक्षक , धैर्यवान , काटकसरी , पवित्र विचारांचा , पवित्र उच्चारांचा , पवित्र आचारांचा बनण्यासाठी ' कबिंग - स्काऊटिंग ' चे माध्यम नक्कीच उपयोगी पडेल यात शंका नाही. 

          आपल्या शाळेतील प्रत्येक मूल असं घडू शकतं , त्यासाठी प्रत्येक शाळेत ' कबिंग ' ची चळवळ प्रत्यक्ष सुरु राहिली तर आपल्या कब बाळाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) कणकवली.



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...