Friday, July 15, 2022

आई , मला भिती वाटते

🛑 आई , मला भिती वाटते

          भिती ही प्रत्येकाला जन्मापासून मिळालेली नकारात्मक गोष्ट आहे. ती हळूहळू जाताना आपल्या लक्षात येते. लहान मुले आपली भिती आईजवळ सांगतात. आईच्या पदरात जाताच त्यांची भिती कुठल्या कुठे पळून जाते. काही मुलांना बाबांचा आधार वाटतो. बाबांनी दिलेला धीर मुलांची भितीची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो. 

          आपण सगळे या भितीचा बागुलबुवा सोबत घेऊनच मोठे मोठे होत गेलो आहोत. मोठे झालो तरीही ही भिती डोके वर काढते , तेव्हा आश्चर्य वाटते. याचा अर्थ सर्वांनाच सर्वकाळ ' भिती ' नावाची भावना निसर्गाने बहाल करुन ठेवली आहे. कधी ही भिती आवश्यक ठरते. त्यामुळे आपण सुरक्षित राहतो. मोठया संकटांचा सामना करताना सदसद्विवेकबुद्धी वापरतो. अजिबात भिती नसती तर काहीही करुन टाकण्याचा अतिआत्मविश्वास आला असता. 

          भिती आली की अंग थरथरायला लागतं. कान लाल होतात. हात थरथरत आहेत हे लक्षात येतं. आत्मविश्वास वाढताना दिसत नाही. तेच तेच भितीचं सावट पाठलाग करत राहतं. त्यावर मात करण्यासाठी त्याचक्षणी कोणाचा तरी मायेचा हात पाठीवरुन फिरायला हवा असतो. तो फिरताना भिती दुर पळत असल्याचे लक्षात येते. 

          कालचीच परिपाठ सुरु असतानाची गोष्ट. शाळेत पन्नास टक्के शिक्षक उपस्थित असल्याने सर्व मुलांची जबाबदारी सांभाळताना सर्वच वर्ग एकत्र घेऊन सुचना देणे सुरु होते. म्हटलं , आज सर्वांच्या कविता घेऊया. प्रत्येक वर्गाच्या मुलांना पुढे येऊन कविता सादरीकरण करायला सांगितले. त्यातील काही मुले लगेच उठून पुढे आली , काही घाबरत घाबरत पुढे आली , काही उठतच नव्हती. न उठणाऱ्या मुलांना हात पुढे करुन उठवावे लागले. सुचनेनुसार मुलांनी रांग केली. ऑर्डर मिळताच कविता गायन सुरु झाले. सुरुवातीला अजिबात आवाज फुटत नव्हता. जवळ जाऊन त्यांच्या पाठीवर हलकेच हात ठेवताच त्यांचा आवाज वाढलेला दिसला. त्यांना प्रबलन दिल्यावर त्यांनी अभिनय करायलाही सुरुवात केली. कवितेचे सादरीकरण संपल्यावर त्यांना ' चांगला रे चांगला , लई लई चांगला ' अशी सामुहिक आरोळी दिली तेव्हा सर्वजण खुश झालेले दिसले. जेव्हा मुले समोर आली होती तेव्हा भितीने ग्रासली होती. प्रोत्साहन मिळताच त्यांची काही भिती आत्मविश्वासाने काढून घेतली होती. सर्व मुलांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि आरोळ्या दिल्या , याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर विलसत असलेला दिसला. 

          एकेकाची सादरीकरणे बघून पुढच्या मुलांमधील आत्मविश्वास वाढताना दिसला. आम्हालाही आरोळ्या आणि टाळ्या मिळाव्यात हिच अपेक्षा प्रत्येकाची दिसत होती. 

          तिसरीमध्ये शिकणारी एक मुलगी तशी अबोलच. ती घाबरली होती. तिचा आवाजच फुटत नव्हता. ती घरी गेली. तिने आईला सांगितले. " आई , मला सर्वांसमोर कविता म्हणता आली नाही. माझे हात पाय थरथरत होते. माझी कविता पाठ होती. पण त्यावेळी मला एकही कडवे आठवेना. " 

          संध्याकाळी मला त्याच पालकांचा फोन आला तेव्हा ही गोष्ट माझ्याही अधिक लक्षात आली. मी लहान असताना अगदी या मुलीसारखाच अबोल आणि भित्रा होतो. परंतु हळूहळू माझ्या गुरुजनांनी माझी भिती घालवली. आता मी शिक्षक असलो तरी शाळेत अचानक साहेब आले की घाबरतोच ना ? भिती ही प्रसंगानुरूप येते आणि जातेही. 

          वर्गात शिकवताना आम्ही शिक्षक राजा असतो. वार्षिक तपासणीच्या वेळी एखादे अधिकारी वर्गावर येऊन पाठ निरीक्षण करु लागले की कशी भंबेरी उडते !!! तशीच भंबेरी मुलांचीही दररोज उडत असेल हे माझ्यासारख्या प्रत्येक शिक्षकाने लक्षात घ्यायला हवे. आज मुलांना वाटणारी ही भिती कमी करण्यासाठी आपणच जाणीवपूर्वक कार्य करु शकतो. मलाही या गोष्टीकडे अधिक जाणीवेने लक्ष देण्यासाठी अशा पालकांच्या फोनसंपर्काचा सदुपयोग झाला याचा उल्लेख करणेही मला अत्यावश्यकच वाटते.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...