Sunday, July 3, 2022

🛑 जीवनात संतोष आला

🛑 जीवनात संतोष आला

          आपलं जीवन हे खरंतर सदैव संतोषमय असायला हवे. तसे घडताना दिसत नाही. कधी तो येतो , कधी जातो असे घडत राहते. मग जीवन निराशाजनक होऊ लागण्याची शक्यता असते. ऐश्वर्या गेली आणि माझ्या जीवनातील स्फुल्लिंगच निघून गेले होते. हर्षदाच्या रुपाने ती आपला अंश सोडून गेली होती ही एक आणि एकच जमेची गोष्ट होती. 

          छोट्या हर्षदाच्या संगोपनाची जबाबदारी सर्वांनी स्विकारली होती. माझं विमनस्क होणं आईला सहन होत नव्हतं. तिच्या हट्टापायी मला दुसरं लग्न करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय दिसत नव्हता. दहा महिन्यात माझ्या आयुष्यात ' राणी ' चा प्रवेश झाला. ती स्वखुशीने माझ्या आयुष्यात आली असे मला वाटले होते. तिच्या वडिलांनी फोर्स केल्याने ती तयार झाल्याचे मला ' राणी ' नेच खूप उशिरा सांगितले. माझ्या बरोबर राहून लवकरच ती माझ्याशी एकरुप होत गेली आणि हेच तिचे जीवन आहे असे तीही मानत गेली होती. तिच्याबरोबर तिच्या सर्व नातेवाईकांची नाती मला येऊन चिकटली. तिचे आईबाबा , भावंडे यांना आपलंसं करणं माझ्यासाठी कसोटी परीक्षा होती. त्या सर्वांनी मला जीव लावला. मीच त्यांच्याशी सुरुवातीच्या काळात कठोर वागलो असेन. त्यांनी मला कधीही दुखावले नाही. उलट माझेच बरोबर आहे असे ते मान्य करत राहिले होते. 

          ' राणी ' ला सुरुवातीच्या काळात माझे अनेक शब्दडोस ऐकून घ्यावे लागले होते. पुन्हा घरातल्यांचे डोस वेगळे होतेच. तरीही ती छान सुरेख संसार रेखाटत चालली होती. तिने खूप कमी काळात साऱ्यांना आपलेसे केले होते. तिचा आवाज मोठा असला तरी तिच्या मनात काहीही नसते हे आम्हालाही समजायला काही काळ जावा लागला होता. तिच्या आवाजाबरोबर तिचं मनही तितकंच मोठं होतं , याची प्रचिती मला कित्येकदा आली होती. आज ती माझ्यासोबत नसती तर आजची हर्षदा कशी असती याची मी कल्पनाच करु शकत नाही. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी स्वतः आई झालेली नसताना चार वर्षाच्या मुलीला आईची माया देऊन सांभाळणे ही काही साधी गोष्ट नव्हती. तिने ते सहजसाध्य करुन दाखवले ही तिचीच किमया होती. 

          तिचा एकुलता एक सख्खा भाऊ होता. माझा मेहुणा. तो आपल्या मोठया चुलतभावासोबत फिरता व्यापार करत असे. तो माझ्याकडे आला होता. त्याला सलून काम करण्याची आवड निर्माण झाली होती. तो माझ्याकडे राहू लागला होता. माझ्या आत्येभावाच्या सलून दुकानात एक कारागिर हवा होता. तो त्याच्या सलूनमध्ये काम शिकू लागला होता. 

          माझी मुलगी हर्षदा तेव्हा दुसरीत तालुका शाळेत जात होती. तिला शाळेत सोडणे , रस्ता ओलांडून देणे अशीही कामे तो आवडीने करीत असे. तो तिचा मामा असल्यामुळे ती त्याला ' मामा , मामा ' म्हणत असे. त्यामुळे त्याच्या गिऱ्हाईकांचाही तो ' मामाच ' झाला होता. त्याच्यापेक्षा मोठी असणारी सगळी माणसे त्याला अजूनही मामा म्हणतात तेव्हा गंमत वाटते. मी सांगेन ती सगळी कामे तो करणारच हे ठरलेलेच असते. 

          त्यानंतर मी माझे स्वतःचे जेन्ट्स पार्लर सुरु केले. त्यात त्याला काम करायला सांगितले. एक दिड वर्षे मी आणि बाबा दोघेही त्याला मदत करत होतो. पण आता तो पूर्ण तयार झाला होता. त्यामुळे दुकानाची सर्व जबाबदारी मी त्याच्याकडे देऊन मोकळा झालो आहे. 

          त्याच्यामुळे मला एक हक्काचा माणूस मिळाला होता. तो कणकवलीत आल्यामुळे संपूर्ण बदलून गेला होता. त्याचे आयुष्यच बदलले होते. त्याचे राहणीमान कमालीचे सुधारले होते. 

          तो मला ' भावोजी ' म्हणत असल्यामुळे आमचे बरेच कस्टमर मला ' भावोजी ' या नावानेच हाक मारतात तेव्हा किती बरे वाटते म्हणून सांगू ? हा संतोष माझ्या जीवनात आल्यामुळे हे असे घडू शकले. तो इथे आल्यापासून अनेक नवनवीन गोष्टी शिकला आणि त्यात पारंगत होत गेला. आम्हालाही एखादी गोष्ट समजली नाही तर आम्ही त्यालाच विचारतो. तो ती सोडवण्याचा प्रयत्न करतोच. असा तो अष्टपैलू बनला आहे. 

          पूर्वी तो बोलताना अडखळत असे. हळूहळू तीही सवय त्याने प्रयत्नपूर्वक घालवली. त्याच्यासोबतच्या अनेक आठवणी ताज्या आहेत. त्याच्यामुळे माझे आणि माझ्या कुटुंबाचे जीवन बदलून जाण्यास मदत झाली आहे हे मी मान्य करतो. त्याचे जीवन घडविण्यासाठी माझा सिंहाचा वाटा आहे हे तो कधीही मान्य करेल असे असले तरी त्याने दिलेली साथ आम्हीही विसरणार नाही हे तेवढेच खरे आहे. 

          एका भावपूर्ण क्षणी मी त्याला असेही म्हणालो होतो कि तू माझा केवळ मेहुणा नसून ' मानसपुत्रच ' आहेस. तो मला अखंड आजन्म साथ देईल हे आम्हां उभयतांवर अवलंबून आहे. नाती टिकवणं हे मला आणि त्याला दोघांनाही जमतं. पुढे काय होईल हे दोघांच्याही प्राक्तनावर सोडून दिले तरी त्याच्यामुळेही माझ्या जीवनात संतोष आला हे नाकारुन चालणार नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर. ( 9881471684 ) कणकवली.



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...