Wednesday, July 6, 2022

🛑 एक सच्चा भालचंद्र भक्त हरपला

🛑 एक सच्चा भालचंद्र भक्त हरपला

          नुकतीच एक बातमी कानावर धडकली. भालचंद्र महाराज आश्रमात दररोज पेटी वाजवून आरतीला साथ देणारे ' शिरी ' बुवा यांच्या निधनाची ती दुःखद वार्ता होती. 

          श्रीधर गुरव असे त्यांचे नाव असले तरी सगळे त्यांना ' शिरी बुवा ' या नावानेच जास्त ओळखत असत. नम्र आणि पवित्र व्यक्तिमत्त्व. सतत हसतमुख. त्यांच्यावर दुःखाचे अनेक डोंगर कोसळले असतील पण त्यातून पुन्हा उभे राहण्याचे बळ त्यांना भालचंद्र महाराजांवरील परमभक्तीमुळे मिळाले होते. 

          कधी देवळात गेलो आणि ते मला दिसले नाहीत हे सहसा होत नसे. मोठया उत्सवांना त्यांची दिवसभर हजेरी असे. ते पेटी उत्तम वाजवत. त्यांचा आवाज पहाडी नव्हता. तरीही ते तालासुरात गायन करत. ते पेटी उघडून बसले की मंदिरातील भक्त भजन करायला कोठून कसे येत ते भालचंद्र बाबाच जाणोत. परमहंस भालचंद्र बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कणकवली भूमी म्हणूनच जगप्रसिद्ध ठरु लागली आहे. 

          मी दररोज मंदिरात जात नाही. जेव्हा माझे जाणे होते तेव्हा मी त्यांच्या भजनात बसत असे. ते कधीकधी मला एखादा अभंग म्हणण्याचा आग्रह करत. मीही मग मला आवडणारा अभंग म्हणत भालचंद्र नामात दंग होऊन जाई. बुवांना माझा आवाज आवडे. ते गोड स्मित हास्य करुन मला दाद देत. मी सुखावून जाई. त्यांच्या आग्रहामुळे मला थोडी भजनसेवा देता आली हे त्यांचंच देणं. 

          ते माणूस म्हणूनही संवेदनशील होते. आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ते नावाने ओळखत. ते आमचेच कस्टमर होते. त्यांनी कित्येकवर्षं आमच्या दुकानात बाबांकडून किंवा काकांकडून केस कापून घेतले होते. मी एखाद्या वेळी त्यांचे केस किंवा दाढी केली असेल असे वाटते. ते दररोज आमच्या दुकानात येऊन बसत. माझ्या बाबांशी गप्पा मारत आणि आपल्या कामाला निघून जात. 

          ते गोडावूनमध्ये पोती उतरण्याचे काम करत हे समजले तेव्हा ते मला खरेही वाटले नव्हते. प्रत्यक्ष पाहिले तेव्हा या माणसाबद्दलचा आदर कित्येक पटीने वाढला. त्यांनी अनेकदा बाबांकडे माझी विचारपूस केली होती. मी भेटलो कि " बाबा कसे आहेत ? " हे त्यांचे नेहमीचे वाक्य असे. 

          किर्तन वाजवणे हे सर्वांत अवघड काम. त्यांनी आपल्या आयुष्यात हजारो किर्तने वाजवली असतील. एवढी किर्तने ऐकल्यामुळे त्यांचे आचरण अतिशय शुद्ध आणि पवित्र झालेले होते. ते मला गुरु घेण्याबद्दल नेहमी सांगत. " सद्गुरु विना सापडेना सोय " , गुरुविण नाही दुजा आधार " अशी भगवद वचने त्यांच्या मुखात येत. त्यांची वाणी भालचंद्र वाणीच होती असे मला वाटे. माझ्यावर त्यांचेही संस्कार झाले आहेत. 

          एकदा आमच्या कणकवली तालुका नाभिक संघटनेचा मेळावा भालचंद्र मठात संपन्न होत होता. त्यावेळी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ' शिरीबुवांचा ' शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील कृतज्ञतेचे निस्सीम भाव स्पष्ट दिसत होते. त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू बोलू लागले होते. आम्ही एका सच्च्या भालचंद्र भक्ताचा सन्मान केल्याचे पुण्य आमच्या पदरी पडले होते. त्यांनी कधीच अहंकार केला नव्हता. आपला सन्मान व्हावा असेही त्यांना कधी वाटले नव्हते. 

          भालचंद्र नगरीने भालचंद्र महाराजांच्या कृपाशीर्वादाने अनेक निस्सीम भक्त घडवले आहेत. त्यापैकी शिरी भाऊंचा नंबर खूप वरचा असेल हे स्वतः भालचंद्र बाबासुद्धा सांगू शकतील. एक निरागस भालचंद्र भक्त अनंतात विलीन झाला आणि भालचंद्र बाबा एका परमप्रिय भक्ताला पारखे झाले आहेत. त्यांच्या पेटीवर फिरणारी बोटे आणि त्या पेटीतून बाहेर पडणारे कर्णमधुर सूर प्रत्येक आरतीच्या आठवले नाहीत तरच नवल.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 ) कणकवली



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...