🛑 आई गं !!!!!
सकाळची शाळा असल्यामुळे शाळेत जाण्याची गडबड होती. आईचा दोन जुलैचा दिवस लक्षात होता. तिच्या स्मृतिनिमित्त दरवर्षी सगळ्या फोटोंना हार अर्पण केले जातात. बाबांनी आधीच हार आणून ठेवले होते. आईच्या आणि पत्नीच्या फोटोंना हार घातले गेले. मी फोटोतील आईच्या डोळ्यांत पाहण्याचा प्रयत्न केला होता. तिला हळदीकुंकू लावले.
काहीही न घेता तडक शाळेत जायला निघालो होतो. शाळेत गेल्यानंतर मी माझा उरत नाही. शालेय कामकाज करताना आईची आठवण निघून गेली होती. याचा अर्थ ती माझ्यातून निघून गेली नव्हती. ती माझी माऊली आहे. तिने केलेले संस्कार आम्हां भावंडात पुरेपूर उतरले आहेत. तिच्याकडून सोशिकवृत्ती आणि संयम शिकायला मिळाला होता.
तिच्या आचरणातून आम्ही घडत गेलो होतो. आम्ही बालपणी तिला जो त्रास दिला होता तो आठवला कि आईचा संयम समोर उभा ठाकतो. तिने आम्हाला प्रेम करायला शिकवले. तिचा पाठीवरुन फिरणारा हात मऊ पिसासारखा मुलायम वाटे. काम करुन करुन तिचे हात कडक झाले होते तरीही. तिने कधी आम्हाला कामांची सक्ती केली नाही. आम्ही न केलेली कामे ती बिचारी निमूटपणे करत असे. आज हे आठवले कि माझा मला राग येतो.
बाबा मारत असताना ती माऊली आम्हांला सोडवायला पुढे येई , तेव्हा बाबांचे काही फटके तिलाही बसले असतील. तिने कधी कुरकुर केली नाही. तिला हव्या असलेल्या वस्तू कधीच वेळेत मिळाल्या नाहीत. दागिन्यांची हौस तिला करता आली नाही. संकटकाळी तिच्या असलेल्या दागिन्यांवरही घाला येई. आमच्या शिक्षणासाठी आणि मोठया कुटुंबासाठी तिला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला. तिला जे मिळे त्यात ती समाधानी दिसे. माझ्या बाबांवर तिचे अतिशय प्रेम होते. ती कधीच बाबांच्या शब्दाच्या बाहेर गेली नव्हती. बाबा सांगतील तसेच तिने केले आहे. तिने आपल्या अनेक इच्छांना कायमच मुरड घातली होती.
पूर्वी दगडी पाट्यावर चटणी वाटली जात असे. आई चटणी वाटत होती. मी शाळेतून आल्या आल्या अतिशय प्रेमाने आईला मागून मिठी मारली होती. माझे वजन पेलत ती माऊली तशीच चटणी वाटत मला झुलवत राहिली होती. मी कधी रात्रीचा उपाशीपोटी झोपलो असलो , तर मध्यरात्री घायाळ पडत असे. मी घामाघूम होत असे. ती बिचारी मध्यरात्री उठून मला चहा आणि बटर भरवी. असे निर्व्याज प्रेम एक आईच करु शकते.
बाबांना कितीही उशीर झाला तरी ती वाट बघत उपाशीच राही. तिला दम्याचा त्रास होता. डॉ.सुधीर मराठे हे तिचे कायमचे डॉक्टर होते. त्यांच्यावर आणि त्यांच्या औषधांवर तिची श्रद्धा होती.
ती टेलरिंगचे काम बाबांकडून शिकली होती. गरोदर असतानाही तिने शिवणकामे केली आहेत. तिच्या हाताला चव होती. तिने बनवलेली उसळ सर्वानाच खूप आवडे. तिने बनवलेले धोंडास चविष्ट असे.
ती आपल्या मोठ्या भावांना ' आबा , अण्णा , नाना ' अशा आदराने हाक मारी. आमच्या आजोळीचे सुसंस्कार आमच्यावर झाले आहेत. आज आम्ही जे आहोत ते त्यांच्या सुशिल संस्कारामुळेच. आमच्या आईचे माहेरचे नावही ' सुशिला ' होते. ती नावाप्रमाणे तशीच होती. ती बाबांची ' जयश्री ' होती. आई आजारी असताना बाबाच तिची सेवा करीत. ती आमचा हातही लावून घेत नसे. एखाद्याची आई गेली की त्या मुलांची काय अवस्था होत असेल याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. तिचं ते गोड हसणं मला माझ्या स्वप्नांत दिसलं असतं तरीही मी धन्यता मानली असती. आई गं ..... तू ये ना माझ्या स्वप्नात ? मी तुझी वाट पाहतोय.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली.


No comments:
Post a Comment