🛑 गुरुजी , तुम चंदन हम पानी
आज गुरुपौर्णिमा. गुरु शिष्यांचा दिवस. आपल्या गुरुंसाठी आदर व्यक्त करण्याचा विशेष दिवस.
मी आज गुरुजी आहे तो माझ्या अनेक गुरुजींनी शिकवलेल्या ज्ञानामुळेच. हे सर्व गुरुजी कदाचित पेशाने गुरुजी नसतीलही. तरीही त्यांनी केलेले विविध संस्कार आम्हाला घडविण्यास उपयुक्त ठरले आहेत. सर्वांची नावे घेणे शक्य होणार नाही. त्यांना केलेले मनस्वी वंदन त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल अशी माझी निर्मळ भावना आहे.
जन्मापासून आपण शिकत असतो. विविध नवनवे अनुभव गाठीशी बांधत असतो. हे अनुभव चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे असतात. दोन्ही अनुभव आपणांस शिकवित असतात. त्यामुळे आपलं रुपांतर कोषावस्थेतून सुरेख अशा फुलपाखरात होत असते.
गुरु ईश्वर असतो. तात आणि माय असतो. गुरु आपल्याला वाट दाखवत असतो. भरकटत गेलेल्याला पुन्हा योग्य मार्गावर आणण्याचे महत्त्वाचे कार्य गुरु करत असतो. गुरु परमात्मा परेशु असतो. गुरुंना आपण आचार्य म्हणतो. ' आचार्य देवो भव ' असे म्हटले जाते. आपले गुरु हे देवांपेक्षाही श्रेष्ठ आहेत असे प्रत्येक शिष्याने मानायला हवे. त्यांचा यथोचित सन्मान करायला हवा. अर्थात गुरुंनीही शिष्यांच्या सन्मानास पात्र होण्यासारखे कार्य करत राहायला हवे. ' गुरु ' बद्दल कोणी वावडे बोल बोलले तर खूप वाईट वाटते. सगळेच गुरु ज्ञानदान करत असतात , प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. भावना मात्र साऱ्यांची एक आणि एकच असते असे माझे मत आहे. आपला शिष्य आपल्या पेक्षा सरस व्हावा असे प्रत्येक गुरुला वाटते. ' गुरुची विद्या गुरुलाच फळली ' अशी एक म्हण आहे. शिष्याने गुरुपेक्षा वरचढ जरुर व्हावे , पण आपल्या गुरुंचा आदर नेहमीच करत राहावा.
आज अनेक गुरुंचा सन्मान केला जाईल. गुरुंबद्दल ' गुरुवंदना ' गायिली जाईल. ही एक आवश्यक मानसिक गोष्ट आहे. त्यामुळे एक दिवस माझा आहे असे गुरुला वाटते. माझ्यावर प्रेम करणारे माझे विद्यार्थी बघून माझ्यासारख्या गुरुला होणारा आनंद आदर्श पुरस्कारपेक्षाही अधिक असतो. तो असा कमी शब्दांत व्यक्त करता येत नाही.
घरातील सर्व मुले माणसे आपले गुरुच असतात. त्यांच्याकडून आपणांस संसाराचे धडे मिळत असतात. आईने मला बोलायला शिकवले. बाबांनी चांगले वागायला शिकवले. भावंडांनी प्रेम करायला शिकवले. निसर्गाने जगायला शिकवले. शाळेतील शिक्षकांनी सुसंस्कार केले , सुसंस्कृत बनवले. त्यांच्या छडीचा मार खाल्ला. शब्दांचा मार पेलला. तापलो. थंड झालो. मातीचा गोळा चांगल्या भांड्यात रुपांतरीत होताना बघत आलोय.
प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे सात वर्षातील महत्त्वपूर्ण शिक्षण मी कधीही विसरु शकत नाही. त्यांनी मला समंजस बनवले म्हणून पुढे शिक्षण प्रक्रियेत टिकत गेलो. स्वतः च कधी शिक्षक झालो तेही समजले नाही. हा शिक्षण प्रवास करताना अनेक गुरु भेटत गेले. आपापला सुगंधी संस्कार मला देत गेले. मी त्यामुळे अधिकाधिक सुगंधित होत गेलो हे सर्व माझ्या गुरुजनांचे देणे आहे. त्यांच्याशिवाय मी कायम अपूर्णच आहे. माझ्या शिक्षकी पेशात मला अनेक शिक्षक लाभले. या सर्वांनी मला एका आगळ्यावेगळ्या वळणावर आणून ठेवण्याचे कार्य केले आहे. या सर्वांचा मी कृतज्ञ आहे. आज मी रात्री झोपण्यापूर्वी या सर्वांना आठवल्याशिवाय राहणार नाही.
माझे अनेक विद्यार्थी आज आदरपूर्वक संदेश पाठवतात. नमस्कार करतात. आठवणी ताज्या करतात. मी शिक्षक झालो ही माझी जमेची बाजू आहे , मला या सर्वांचा अविस्मरणीय सहवास लाभत आहे त्याबद्दल त्यांच्या सदैव ऋणात राहणेच मी पसंत करीन.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली

No comments:
Post a Comment