🔵 फियर ऑफ फिवर लेखांक : ७९
ताप माणसाला तापच आणतो. आता तर साधा ताप आला , तरी त्या तापाची भीती वाटते. कोविड असला तर ? म्हणून ताप येऊ नये यासाठी काळजी घेण्यात येते. पण तरीही ताप आलाच तर काय करणार ? त्याला घाबरून कसे चालेल ? त्याला पळवून लावण्याचे मनोबल आपल्यात निर्माण केले पाहिजे. पूर्वीच्या तापात आणि आताच्या तापात फरक असेलही पण भीतीमध्ये फरक पडलेला आहे. सध्या भीतीनेच माणसे दगावताना दिसत आहेत. काय करावे समजतच नाही. सैरभैर व्हायला झाले आहे. डोकंच चालत नाही असंही म्हटलं जात आहे. रेड झोन नसलेले आपण त्या झोनमध्ये जाताना भीतीच्या थर्मोमीटरचा पाराही तसाच वाढताना दिसत आहे.
अनेक ताप येऊन गेले , ते बरेही झाले. पण सध्या ताप न येताही ' कोरोना पॉझिटिव्ह ' चाचण्या अधिक ताप आणत आहेत. तापाचे विविध प्रकार आहेत. त्या तापांचे प्रकार आपल्याला माहिती आहेत. पण डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आपल्याला त्या तापाची अगदी जवळून ओळख होते. तोपर्यंत फक्त त्या तापाच्या नावापुरताच आपला आणि त्याचा संक्षिप्त परिचय असतो. डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली की ते ऐकणारेही सुन्न होऊन जातात. एकतर ते सगळ्यांच्या समोर सांगत नाहीत. तसे सांगणेही चुकीचेच असते. पण कुटुंबप्रमुखाला बोलावून त्याला एकट्यालाच सांगितले जाते. तो बिचारा एकटाच काय तो ताप सहन करीत वाईट तोंड करत हळूहळू सगळ्यांना सांगतो. तो सांगून सांगून त्याच्या डोक्याचा ताप काही प्रमाणात कमी होतो , पण इतरांच्या डोक्यात भीतीचा ताप शिरतो. हे असेच चालू राहणार आहे , त्याला पर्याय नाही. ही भीती कमी करण्याचे नियंत्रण आपल्याकडेच आहे.
अकरा बारा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळी माझा छोटा भाऊ आपल्या पत्नी व मुलीसह माझ्याकडेच राहत होता. त्याचा पगारही अंशतः सुरू होता. त्यामुळे एकत्र राहून त्याला आधार देणे गरजेचे होते. त्यांच्यासोबत एकत्र राहणे खूप आनंददायी होते. दोन्ही जावा मस्त राहात होत्या. बाबा, आई , मी , माझी पत्नी, तो , त्याची पत्नी , माझी मुलगी , त्याची मुलगी असे आठजण एकत्र राहताना मज्जा येत होती. कधीकधी भांड्यांचा आवाज येत होता, पण नंतर हास्याचे कारंजेही उडत होते. असे आमचे दोन भावांचं कुटुंब ' सुख म्हणजे नक्की काय असतं , काय पुण्य असलं की जे घरबसल्या मिळतं ' अशा प्रकारे हसतखेळत चाललेलं होतं.
अचानक एका संध्याकाळी माझ्या सव्वा वर्षाच्या पुतणीने झोपेत असताना डोळे पांढरे केले. तिला तसे बघून आमचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या माझ्या निरागस बबलीचे अचानक काय झाले म्हणून सगळेच चिंतेत पडले. वहिनीने तिला हलवले , पण तिचे तोंड घट्ट बंद झाले होते, डोळे वर गेले होते. मला घाम फुटला. लहान मुलांना असे काय झाले तर मला खूपच भीती वाटते. माझ्या भावाला तर त्याहूनही भीती वाटली. तो तर रडूच लागला होता. माझ्या बाबांनी आणि मी त्याला शांत केले. बबलीला एकशे चार ताप आला होता. तो डोक्यात गेला होता. तो ताप सहन न झाल्यामुळे तिला आकडी आली होती. ओल्या फडक्याने पुसून काढल्यानंतर ती शुद्धीवर येईल असे वाटले. पण ती शुद्धीवर आलेली नव्हती.
मी तिला तसेच फडक्यात गुंडाळले आणि डॉक्टरांकडे निघालो. सोबत वहिनी आणि भाऊ होताच. एका प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन गेलो. त्यांच्याकडे बेड उपलब्ध नसल्यामुळे व बबलीची क्रिटिकल कंडिशन बघून त्यांनी आपल्याकडे दाखल करून घेतले नाही. आम्ही त्यांना हात जोडून , रडून विनंती केली तरी ते आपल्या नकाराशी ठाम राहिले. आम्ही मग दुसऱ्या बालरोग तज्ज्ञांकडे गेलो. त्यांनी दाखल करून घेतले , तोपर्यंत बबली शुद्धीवर आली होती. तिच्यावर पाच दिवस उपचार झाले. ती बरी झाली म्हणून आम्ही खुश झालो होतो. तिचे बोबडे बोल , तिचं दुडूदुडू धावणं पुन्हा नियमितपणे सुरू झालं होतं. पण तिचा ताप गेला , तरी चार पाच दिवसांच्या फरकाने तो पुन्हा पुन्हा येत राही. डॉक्टर जोशीबाई यांच्याकडे तिला घेऊन गेलो. त्यांनी तिला जमिनीवर ठेवण्यास सांगितले. त्या म्हणाल्या , " या मुलीला मेंदूज्वर असण्याची शक्यता आहे , तुम्ही तिला गोवा येथे उपचारासाठी घेऊन जा. तिथे तिच्यावर मोफत उपचार होऊ शकतील. लवकर निदानही होईल.
माझा भाऊ आधीच खूप घाबरला होता. डॉक्टरांनी असे सांगितल्यानंतर तो पुन्हा घाबरला. तो मला म्हणाला , " मला भीती वाटते , तू माझ्या मुलीला घेऊन गोव्याला जा. " मी घाबरलोच होतो , पण न घाबरल्यासारखं दाखवत होतो. पुन्हा एकदा धैर्य एकवटून मी आणि माझी वहिनी छोट्या बबलीला घेऊन गोवा मेडिकल कॉलेजमध्ये जायला निघालो. जाताना भावाची अवस्था बिकट झालेली मला दिसली. त्याची मुलगी असली तरी , मी एकदा जबाबदारी घेतली की ती योग्य पार पाडणार यावर त्याचा ठाम विश्वास होता. त्याची पत्नीही घाबरली असली तरी माझ्याबरोबर बहिणीसारखी यायला तयार झाली. ती आपल्या बाळासाठी हिरकणी बनून माझ्यासोबत आली. मला ती दादा म्हणते. मला तिने कधीही भावोजी अशी हाक मारलेली नाही.
गोव्याला आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो. तिथल्या आपत्कालीन विभागात संपर्क करून दोन ते तीन तासात बबलीला डॉक्टरांनी दाखल करून घेतले. तिच्यावर उपचार सुरू केले. बालविभागातील खेळणी पाहून बबली खुश झाली. पण पाच मिनिटांत ती रडू लागे. तिला तपासायला अनेक डॉक्टर्स येत. नवशिके डॉक्टर्स आम्हाला तिच्याबद्दल अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडीत. त्यांचे प्रश्न एकतर इंग्रजीत असत , किंवा कोकणी भाषेत असत. आम्ही त्यांच्याशी मराठीत बोलूनच उत्तरे दिली. जन्मापासून घडलेल्या सर्व घटनांचा धांडोळाच त्यांना कथन करावा लागला. एकतर मला त्यांच्या वॉर्डमध्ये प्रवेश नसे. एखाद्यावेळी दोन तीन मिनिटे आत गेलोच , तर मला तिथल्या वॉर्ड वुमन बाहेर जायला सांगत असत. त्यामुळे माझ्या वहिनीला बबलीकडे एकटीने लक्ष देताना खूप त्रास सहन करावा लागला. तिला अजिबात बबलीला सोडून जाता येत नव्हते. मग बबलीला माझ्याकडे देऊन ती कपडे धुणे वगैरे कामे करत असे.
एका सकाळी नर्सने बबलीला अजिबात काहीही भरवू नका असे सांगितले होते. पण बबली खूपच रडू लागली , म्हणून वहिनीने तिला दूध पाजले. थोड्या वेळाने मला बोलावण्यात आले. बबलीची ' मेंदूज्वर ' चाचणी करण्यात येणार असल्याने तिला काहीही द्यायला नको होते. पण ती दूध प्यायल्याचे सांगितल्यावर नर्स गोंधळली. तिने लगेच बारीक प्लास्टिक नळी आणली , तिच्या इवल्याश्या नाकात घातली. त्या नळीतून तिने प्यायलेलं सगळं दूध बाहेर काढलं. मी थिजून गेलो , ती नळी नाकात घालतानाच माझ्या अंगावर शहारे आले होते. आम्ही दोघांनीही बबलीला घट्ट पकडून ठेवले होते. थोड्यावेळाने तिच्या पाठीच्या कण्यात एक इंजेक्शन देण्यात आलं. मेंदुज्वरची चाचणी पूर्ण झाली. रिपोर्ट निगेटिव्ह आला. तरीही आणखी पुढील एका अवघड चाचणीसाठी त्यांनी आम्हाला दुसऱ्या खाजगी डॉक्टरांकडे जायला सांगितले. तिच्या अशा अनेक चाचण्या घेत असताना माझा भाऊही एकदा तिला बघून गेला. ती आता बरी आहे , याचा त्याला आनंद होऊन त्याची भीती कमी झालेली दिसली.
हॉस्पिटलमध्ये पेशंटसोबत आलेल्या माझ्यासारख्या व्यक्तींना बाहेरच्या जनरल हॉलमध्ये विश्रांती घ्यावी लागे. मला बबलीच्या काळजीने कधीही नीट झोप लागली नव्हती. त्यामुळे झोपताना वरच्या छताकडे नजर गेली की ते सगळं छतच गोलगोल फिरत आहे असे वाटून मला चक्कर येई. भीतीने आणि काळजीने मी व्याकुळता अनुभवत होतो. शेवटी बबलीला विशेष काहीही झालेले नाही हा निष्कर्ष घेऊन आम्ही कणकवलीची वाट धरली.
आल्या आल्या सगळ्यांनी बबलीचे गोड गोड पापे घेतले. भावाने मग तिची इतकी काळजी घेतली , की जरा जरी ती आजारी पडली तरी तो तिला लगेच डॉक्टरांकडे घेऊन जात असे. तिला शेळीचे दूध सुरू केले , गावठी अंडी सुरू केली. बबलीने या सर्वांचा फडशा पाडला. मी माझ्या मुलींसाठी कधीही एवढे प्रयत्न केले नसतील , तेवढे प्रयत्न त्याने केले. आता ती अगदी व्यवस्थित आहे. सातवीत गेलीय. आता तिला " एवढे नको खाऊस , वजन वाढेल !!! " असे सांगावे लागते. पण काहीही म्हणा त्यावेळचा तो ' फियर ऑफ फिवर ' आज आठवला ना , तरी डोक्यात फिवर जातो.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )