गेल्या तीन ते चार वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक बांधव वारकरी होऊन आंगणेवाडी भराडी देवीला नतमस्तक होत आहेत. पंढरपूरला जाणारे वारकरी जसा भक्तिभाव ठेवतात , तसा भक्तिभाव ठेवून समस्त नाभिक जन निर्मळ मनाने देवीला वंदन करतात.
दोन वर्षांपूर्वी मी स्वतः या नाभिक वारीत सामील झालो. कणकवलीतून सकाळी सहा वाजता भालचंद्र मंदिरात जाऊन गाऱ्हाणे घालून वातावरण भक्तिमय करुन वारीचा शुभारंभ केला. २० ते २५ नाभिक बांधव सुरुवातीला होते. पुढे पुढे त्याचे दुप्पट होत गेले. संपूर्ण चालत जायचे होते.
मी पहिल्यांदाच एवढे लांब चालण्याचे मनोमन ठरवले होते. भराडीदेवीसाठी मी लहानपणापासून अनेकदा दर्शनाला गेलो असेन. रांगेत दोन ते तीन तास पुढे सरकत सरकत जाण्यात देवीच्या दर्शनाची तीव्र ओढ लागत असे. कधी एकदा देवीचे मुखदर्शन होते असे होऊन जाई. दर्शन घेण्याची वेळ जवळ आली कि दर्शनासाठी कासावीस होणारा मी क्षणात पुढे ढकलला जाई. मागचे लोक दर्शनासाठी आतुर झालेले असत. ती देवीची सजवलेली मनमोहक मूर्ती डोळ्यांत साठवून ठेवत आठवत राहताना दोन्ही हात जोडून काही सेकंदात नमस्कार पूर्ण होई.
साष्टांग नमस्कार घालता येत नसे. मग बाहेर येऊन मंदिराच्या भिंतींना किंवा खांबांना घट्ट मिठी मारुन राहण्यात आनंद वाटे. खांबांना आलिंगन देताना देवीच्या पदस्पर्शाचा अनुभव केल्यासारखे वाटे.
बाहेरील भक्तगणांनी केलेली गर्दी पाहून देवीबद्दलची भक्ती अधिक वाढत जाई. सर्वजण काहीतरी मागणे किंवा गाऱ्हाणे घेऊन आलेले असत. कोणाला मुलगा हवा असे , कोणाला नोकरी हवी असे , कोणाला नोकरीवाली बायको हवी असे. काही लोक नवस करायला येत , काही नवस फेडायला येत. आपली तुला करुन त्या वजनाचा शिधा किंवा वस्तू देवीला वाहताना पाहून मलाही तसे करावेसे वाटे. मीही एकदा मनोमन नवस केला होता. मी माझ्या लग्नानंतर बायकोला घेऊन देवीचे दर्शन घेतले होते. नवसाला पावणारी भराडीदेवी आमची माताच जणू. तिच्याकडे आम्ही चांगलं बाळ व्हावं म्हणून मनातून नवस केला होता. सुंदर मुलगी जन्माला आल्यानंतर तिला देवीच्या चरणांवर ठेवले होते. देवीने आम्हाला इष्ट प्रसाद दिला होता.
त्यानंतर पुन्हा प्रत्येकवेळी मी आणि माझी पत्नी मुलीसह मंदिरात दर्शनासाठी जात राहिलो होतो. दोन हजार पाच साली माझ्या पत्नीने मुलगा व्हावा म्हणून मनस्वी नवस केला होता. मुलगा झाला होता , पण तो पोटातच गेल्यामुळे नवस फेडता आला नाही. तिने केलेला नवस फेडण्यासाठी तीही नव्हतीच. तिही देवाघरी किंवा देवीघरी निघून गेली ती कायमचीच.
त्यानंतर काही वर्षे मी आंगणेवाडीला गेलो नाही. पण पुन्हा माझी वारी सुरु झाली. वारी म्हणजे काय ? तर आपण दरवर्षी एखाद्या देवस्थानाला जातो , त्याला वारी असे म्हणतात. वारीला जाताना आपल्यासोबत अनेक बांधव असतात. त्यांच्याशी बोलत बोलत चालत किंवा गाडीने जाताना आपण भक्तिरसात ओथंबून जातो. देवीला नमस्कार करण्याचा वेळ काही क्षणांचाच असतो. पण त्या अभूतपूर्व क्षणसाठीच आपली वारी असते.
थोडे स्वार्थी भावनेने आपण गेलेले असतो. काहीतरी मागण्यासाठी जातो म्हणजे स्वार्थीच नव्हे का ? आता मला जर काही मागायचे असले तर मी स्वतःसाठी काहीही मागत नाही. मी माझ्या बांधवांसाठी दीर्घायुष्य लाभावं आणि त्यांनी दरवर्षी देवीच्या वारीला आनंदानं सामील व्हावं अशीच प्रार्थना करतो.
माझ्या एका मामेभावाने या वारीला का जायचे असते याबद्दल छान सांगितले. तो म्हणाला , ' आपण दरवर्षी देवीसाठी एक दिवस तरी आपल्या शरीराची थोडीतरी झीज केली पाहिजे. खरंतर आपण देवीच्या दर्शनासाठी जातोय , पण त्या निमित्ताने आपण आपल्या शरीराचा व्यायामही घडवून आणतो. चालणे हा एक सर्वोत्तम व्यायाम प्रकार आहे. चालत वारीला जाणे ही पद्धत म्हणूनच पूर्वापार चालत आलेली असावी. " माझ्या चालत चालत जाण्याने माझे पाय इतके दुखू लागले कि मला चालता येईना. अचानक तीस पस्तीस किलोमीटर चालल्यामुळे पायांवर ताण आला होता. पायांवर ताण आला तरी माझ्या मनावर अजिबात ताण आला नव्हता. मी मग दोन तीन किलोमीटर कोणाच्या तरी गाडीने गेलो. पुन्हा पुढे दोन तीन किलोमीटर जायचे शिल्लक होते. मी गाडीतून उतरुन चालण्याचा निर्णय घेतला होता. शेवटी नाभिक वारी पूर्ण केली तेव्हाच थांबलो होतो. येताना गाडीने आलो. त्यानंतर दोन दिवस अजिबात चालता येत नव्हते. पाय जमिनीला टेकवून उभेही राहता येत नव्हते. पण चालत वारीला गेल्याचा आनंद अपार होता.
आता दरवर्षी वारीचा संकल्प होतो. आम्ही नाभिक बांधव एकत्र येत राहतो. सर्व नाभिकांचे त्यानिमित्ताने मनोमिलन घडते. आपुलकी वाढते. ओळखीचे मैत्रीत रूपांतर होते. समाजातील आपल्या ज्ञातीबांधवांच्या गाठीभेटी होतात. नाभिकभक्तांचं दर्शन घडत राहतं. एकत्रित संवाद घडतो. हा हृदय संवाद घडण्यासाठीच या वारीची योजना केली असावी असेही वाटत राहते. पुढील वारी कधी येईल याची वाट पाहताना ती उद्या आली आहे हे लक्षात येताच वारीसाठी मन वाऱ्यासारखं उधाणतं , तसं माझं आता झालं आहे.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )