Friday, May 12, 2023

🛑 आदर्श स्काऊट मास्टर : सीताराम लांबरसर

🛑 आदर्श स्काऊट मास्टर : सीताराम लांबरसर 

          काही निवडक शिक्षक शैक्षणिक प्रक्रिया राबवित असताना विविध उपक्रम राबवत असतात. हे उपक्रम राबवून ते थांबत नाहीत. त्यांना अधिक आणि वैशिष्टपूर्ण उपक्रमांची धडपड स्वस्थ बसू देत नाही. 

          सीताराम लांबर सर हे अनेक शिक्षकांमधून वेगळे असे त्यासाठीच ठरतात. स्काऊट नावाची चळवळ ते चालवतात. स्काऊटचे नऊ नियम ते काटेकोरपणे पाळतात , नव्हे ते नियम त्यांच्या अंगी भिनले आहेत म्हणा ना !!!

          हे मी आत्मविश्वासपूर्वक का सांगू शकतो ? कारण मी आणि सीताराम लांबरसर मालवण तळगाव येथे निवासी स्काऊट मास्टरचे प्रशिक्षण सलग सात दिवस केले आहे. एकत्र राहिल्यामुळे त्यांच्यासोबत काही महत्त्वाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. ते आमच्या पथकात नव्हते , तरी दिवसभरातील विविध क्रियाकलापांमध्ये त्यांचा असलेला सक्रिय सहभाग डोळ्यासमोर येऊन जातो आहे. 

          रात्री होणाऱ्या ' कॅम्प फायर ' मध्ये त्यांनी मोठया आवाजात दिलेल्या आणि स्वनिर्मित आरोळ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या होत्या. नवोपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत , कदाचित या सर्वांचे लिखित स्वरुप त्यांच्याकडून करायचे राहून गेले असेल. 

          लांबरसर ज्या शाळेत जातात , त्या शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकतात. त्यांनी आतापर्यंत काम केलेल्या शाळेतील बालक आणि पालक याचे समर्पक उत्तर देऊ शकतात. त्यांनी सर्व शाळांमध्ये धडपड्या शिक्षकांसारखं कार्य केलेलं आहे. 

          लांबरसरांच्या माता पित्यांना त्यांचा रास्त अभिमान असायलाच हवा. त्यामुळे त्यांचं नावच त्यांनी सीताराम ठेवलं असावं.  त्यांच्या नावात सीता आणि राम या दोन्ही उभयतांचं अस्तित्व प्रत्येकवेळी जाणवत राहतं. एकवचनी , एकपत्नी आणि एकबाणी असलेला राम म्हणूनच आपल्या जास्त लक्षात राहतो. पतिव्रतेचं महान पावित्र्य जपणाऱ्या सीतेचं म्हणूनच आपण नित्य स्मरण करतो. या दोहोंच्या नावापासून बनलेल्या नावात आणि ते धारण करणाऱ्या व्यक्तीत देखील नक्कीच त्यांच्या दैवी गुणांचा अंश असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

          नेरुर माड्याचीवाडी माध्यमिक विद्यालयात एक दिवसीय ' भगीरथ प्रतिष्ठान ' चे शिक्षक प्रशिक्षण होते. त्यावेळी वेंगुर्ले तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून अतिशय मुद्देसूद असे मनोगत व्यक्त करणारे सीताराम लांबर सर म्हणूनच माझ्या जास्त लक्षात राहिले आहेत. ते अग्रकर्मी आहेत. कोणीतरी उठून उभे राहून बोलतील असा विचार न करता झटकन व्यासपीठाकडे हसतमुखाने जात विचार व्यक्त करणारी माणसं सहसा दुर्मिळ असतात. सीताराम लांबरसर त्या दुर्मिळ व्यक्तींपैकी एक आहेत. 

          भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे ते सीताराम आहेत. ते वेंगुर्ल्याच्या पतपेढीच्या सिंहासनावर विराजमान होतील याची शंका बाळगण्याचे कारण नाही. शिक्षक मतदार बंधु आणि भगिनींनो , आपल्या सीताराम लांबरसरांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यायचे हे मात्र फक्त तुमच्या आणि तुमच्याच हातात आहे. मग 14 तारखेला होणाऱ्या मतदानाचा तुमचा  हक्क तुम्ही नक्कीच वापरा ही भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलची आपणांस कळकळीची विनंती आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली



Wednesday, May 10, 2023

🛑 विजय सावंतांचा विजय होणारच

🛑 विजय सावंतांचा विजय होणारच

          ज्यांच्या नावातच विजय आहे , ते विजयी होणार यात कोणालाही शंका असायला नको. या माणसाचा ज्यावेळी जन्म झाला असेल त्यावेळी त्यांच्या माता पित्यांनाही किती आनंद झाला असेल ? त्यांच्या जीवनात नव्या बालकाने पदार्पण केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या मनातील इच्छेचाच विजय झाला होता. असा गोड गोंडस बाळ जन्माला आल्यावर हा पुढे कायमच विजयी ठरावा म्हणून त्याचे नाव विजय ठेवण्यात आलं असावं. 

          कुडाळ तालुक्यातील पदवीधर शिक्षक विजय सावंतांबद्दल मी बोलतोय. एक प्रचंड विजयी मुद्रेचं व्यक्तिमत्त्व मला मित्र म्हणून लाभलं म्हणून मीही भाग्यवानच. 

          एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे विजय सावंत. शिक्षक हा शीलवान , क्षमाशील आणि कलाकार असावा लागतो. हे तिन्ही गुण विजय सरांमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. त्यांचं प्रेमळ हास्य आणि आपुलकीचे शब्द समोरच्या माणसाला मित्र करुन जातात. मित्राने कसं असावं ह्याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे विजय सावंत. 

          भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलच्या कुडाळ तालुक्यातील उमेदवार म्हणून विजय सावंत सरांची निवड ही अपेक्षितच होती. त्यांनी केलेला मनुष्य संग्रह त्यांना यावेळी नक्कीच उपयोगी पडणार आहे. काहीतरी मिळावं म्हणून तात्पुरता हा मनुष्यसंग्रह नसून तो कायमचा आहे हेही सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. विजय सावंत सर हे तळागाळापर्यंत जाऊन काम करणारे शिक्षक आहेत. विजय सर अन्यायाला वाचा फोडणारे आणि न्यायाची विजयश्री खेचून आणणारे आहेत हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांचा विजय हा 100 टक्के निश्चित आहे. 

          हे विजय सर माझे खास मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी लिहू शकतो आहे. यांचा आणि माझा परिचय देवगड तालुक्यात झाला. देवगड तालुका स्कुलमध्ये महिन्याच्या पगाराच्या वेळी अनेकदा आम्ही एकत्र आलो होतो. ओळख वाढत गेली आणि स्नेह वाढत गेला. त्यावेळी माझी गाडी नव्हती. विजय सावंत सरांनी मला बऱ्याचदा माझ्या मुक्कामी सोडले आहे. ' जाता जाता भलं करावं ' अश्या विचारसरणीचे ते आहेत. त्यांनी देवगड तालुक्यात कुवळे शाळेत असताना अनेक विद्यार्थीकेंद्रित उपक्रम राबवले होते. संगीत हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय आहे. संवादिनीवर त्यांची फिरणारी बोटं पाहिली कि त्याचा अंदाज येतो. त्यांचा स्वतःचा आवाजही कर्णमधुर आहे. त्यांच्या भजनात बसाल , तर भजन संपू नये असं वाटत राहील. त्यांना आपल्या या गुणांचा अजिबात गर्व नाही , अभिमान मात्र नक्कीच आहे. 

          कित्येक प्रशिक्षणांचे मास्टर ट्रेनर म्हणून अतिशय उत्साहाने काम करताना आम्ही त्यांना अनेकदा पाहिले आहे आणि अनुभवलेदेखील आहे. ते तत्त्ववादी आहेत. जे करायचे असते ते हमखास करणारच. त्यात आपला जीव ओतून काम करतील. तहानभूक विसरुन काम करण्याची त्यांची ही क्षमता ते शिक्षक बँकेच्या विकासासाठी नक्कीच वापरतील. आपल्या भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलच्या तत्त्वांशी प्रामाणिक राहून कार्य करणारा संचालक कुडाळ तालुक्यात प्रचंड बहुमतांनी निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. जे व्हायचे आहे ते होणारच. त्याला कोणीही विरोधकांनी विरोध करायचा म्हणून केला तरीही कोणताही फरक पडणार नाही. उलट फायदाच होईल. 

          विजय सावंतसर आणि मी एकदा शिरगाव हायस्कुलमध्ये 4 थी इंग्रजीचे मास्टर ट्रेनर म्हणून एका वर्गावर होतो. त्यावेळी त्यांची आणि माझी जास्त जवळीक झाली. त्यांच्या वक्तृत्वाने मी खरंच प्रभावित झालो. त्यांनी आपल्या अनुभवातून केलेलं विवेचन मी लक्षात ठेवलं आहे. त्यांची बोलण्याची शैली श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. मलाही त्यांचा सुवास आणि सहवास लागला आणि मी घडत गेलो. त्यांना असलेली गाण्याची जाण त्यांच्या गायनाने समजते. 

          त्यांच्या शिक्षक मित्रमंडळाच्या माध्यमातून कुडाळ शिक्षक कलामंच नावाची सांस्कृतिक संस्था कदाचित त्यांच्याच सुपिक डोक्यातून आली असावी असे माझे स्पष्ट मत आहे. कोरोना काळात त्यांनी केलेले सादरीकरण यु ट्यूबवरुन पाहताना मला माझ्या या मित्राबद्दलचा  अभिमान सदासर्वदा वाढवत जात होता. विजय सरांच्या शाळेचा संघ असेल तर क्रीडास्पर्धेत त्यांच्याबरोबर स्पर्धा करणं सोपी गोष्ट नसते. पूर्ण तयारीनिशी विजय सर स्पर्धेत उतरत असतात. यावेळीही विजय सावंतसर पूर्ण तयारीनिशी प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुक रिंगणात उतरले आहेत. त्यांनी खेचून आणलेली विजयश्री मला आताच समोर दिसू लागली आहे. विजय सर म्हणजे कुडाळ तालुक्याला लाभलेला एकमेव विजयाचा चेहरा आहे. माझ्या या खास मित्राला कुडाळ तालुक्यातील आपण शिक्षक बंधु भगिनी मिळून  सर्वांनी प्रचंड बहुमतांनी विजयी करणार आहात म्हणून आधीच मी आपले शतशः आभार मानतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Thursday, May 4, 2023

🛑 4 मे ची भीषण काळरात्र

🛑 4 मे ची भीषण काळरात्र

          दरवर्षी हा 4 मे येतो. गेली 16 वर्षे हा दिवस येताना मी मात्र जुन्या काळात जातोच जातो. कितीही कोणीही समजावून सांगितले तरी माझ्यात कोणताच फरक पडत नाही. 

          जगातील सगळ्या माणसांचं असंच होत असेल का ? मला माहित नाही. पण मला नाही सहन होत !!! त्या दिवसांपूर्वीचे दोन्ही संघर्षमय दिवस आठवून अंगाला कापरे भरतेच. रात्र रात्र पुन्हा तेच ते भयानक क्षण आठवत राहतात. 

          ती भयाण काळरात्र जशीच्या तशी आठवून तीव्र होत जात राहते. मी तिच्या जवळ बसलो आहे. तिच्यासोबत बोलत आहे. हातात हात घेतला आहे. तिच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करतो आहे. तीही मग मी आनंदी दिसावं म्हणून तशीच करते आहे. मनातून दोघेही दुःखी असताना आनंदाचं नाटक करताना किती भीषण अनुभवत होतो मी. 

          दोन दिवसांपूर्वी तिच्या पदरातून नव्हे उदरातून गोंडस बाळाचं हिरावून नेणं ती कशी विसरु शकणार होती. शरीराला होत असलेल्या वेदना तिला कमी वाटत असाव्यात. मनाच्या वेदना मात्र तिच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी आणत होत्या. मी मात्र रडायला विसरु पाहत होतो. तिच्यासमोर न रडता तिच्या अपरोक्ष जेवढं जमेल तेवढं रड रड रडत होतो. 

          ती मला सांभाळू पाहात होती आणि मी तिला. तिने मला बऱ्यापैकी सावरले होते. मीच तिला सावरण्यात कुठे कमी पडलो की काय देव जाणे ?  

          रिकामं झालेलं शिवलेलं पोट तिला जणू नकोसं झालेलं. झालेला मुलगा आम्ही तिला बघूही दिला नव्हता हा मात्र आमचा सर्वात मोठा दोष असावा. तिला गतप्राण झालेला मुलगा आम्ही तरी कसा काय दाखवू शकणार होतो ? बोलण्याइतकी ती सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. अर्थात मुलाला तसं दाखवल्यानंतर तिला मोठा मानसिक धक्का बसेल असे आम्हाला वाटले. भुलीतून बाहेर आल्यानंतर तिचे सत्य समजले तेव्हा तिला ते बिल्कुल मान्यच नव्हते. तिचे डोळे पाण्याने इतके भरुन गेले होते कि पाणी थांबता थांबत नव्हते.  

          मी एकांतात तिला अनेक पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मला अजून दुःख होऊ नये म्हणून तिने तिला झालेलं दुःखही गिळून टाकण्याचा प्रयत्न करुन पाहिला होता. शारीरिक वेदना आणि मानसिक वेदना या दोघांची बेरीज झाली होती. तिचे शरीर आणि मन दोन्ही तिला साथ देईनासे झाले होते. 

          एक दोन तासांनी नर्स येत आणि एखादे मोठे इंजेक्शन देऊन निघून जात. ते घेत असताना तिला दुखत असल्याचा लवलेश तिच्या चेहऱ्यावर दिसत नसे. आज मात्र इंजेक्शन दुखत असल्याचे मलाही जाणवले. तिला दरदरून घामही फुटला होता. मी तिचा घाम रुमालाने पुसण्याचा प्रयत्न करेपर्यंत तिचे डोळे पांढरे झाले होते. दातखिळी बसली होती. 

          परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजताच डॉक्टर आले. त्यांनी आपल्या परीने तिला वाचवण्याचे शेवटचे प्रयत्न करताना मी प्रत्यक्ष पाहत होतो. मी मोठ्याने ओरडण्याशिवाय काहीही करु शकत नव्हतो. 

          तिचा हात माझ्या हातातून सुटला होता कायमचा. ती भीषण काळरात्र मी कधीही न विसरण्यासारखी आहे. माणसं जिवंत नसली तरी त्यांच्या सोबतच्या आठवणी मात्र जिवंत होऊन अशी पाठ धरतात. माझ्या कै. पत्नीला ( ऐश्वर्याला ) भावपूर्ण आदरांजली. ती गेली आणि तिनेच मला ईश्वरी आणून दिली आहे अशी माझी भावना आहे. इतकी वर्षे तिच्यात मी तिलाच बघतो आहे. त्यामुळे ऐश्वर्या आणि ईश्वरी दोघांच्या नावातही मी बरंच साम्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल



🛑 चंद्राचे हास्य लाभलेले पाताडेसर

🛑 चंद्राचे हास्य लाभलेले पाताडेसर

          सुंदर , निखळ आणि निर्मळ हास्य हा सत्याभिनय ज्यांच्या चेहऱ्यावर सदैव विराजमान असतो असे आमचे जिल्ह्याचे भाग्यलक्ष्मीचे तरुण तडफदार उमेदवार म्हणजे चंद्रसेन पाताडे. 

          जन्मतः चंद्रासारखे हास्य लाभलेल्या या शिक्षकाचं नावही कदाचित त्यावरुनच ठेवलं गेलं आहे की काय अशी खात्री वाटल्याखेरीज राहणार नाही. चंद्रासारखं शीतल हास्य ज्याच्या मुखात सदा विलसत असेल , त्या माणसाचा नुसता चेहरा बघितला तरी समोरचा माणूस शत्रुत्वही विसरेल. खरंच चंद्रसेन पाताडे सरांचं वर्णन करताना शब्दांची कोणतीही पत आडे ( पाताडे ) येत नाही. त्यांनी आपल्या आडनावाप्रमाणे आपली शिक्षकी पेशाची पत कायम राखली आहे. 

          शिक्षक समितीच्या प्लॅटफॉर्ममधून माझी आणि त्यांची अनेकदा भेट झाली आहे. त्यांचं आगळंवेगळं स्मितहास्य पाहणं ही माझ्यासाठी पर्वणीच. भेटू तिथे हस्तांदोलन ठरलेलेच. कुबलसर , कसे आहात ? ही आश्वासक विचारपूस हमखास असणारच. मी तसा स्वतःच्या प्रसिद्धीपासून कायम दुर राहणारा असलो तरी मी तालुका प्रसिद्धी प्रमुख झाल्यापासून जिल्हा आणि राज्य पदाधिकाऱ्यांच्या अधिक लक्षात राहू लागलो आहे. कणकवली तालुका शिक्षक समिती संघटनेने दिलेला हा विश्वास आहे. प्रसिद्धीबाबत मला जेवढे जमेल ते मी स्वतःहून करत असतो. तरीही प्रत्येक माणसाला मर्यादा आहेतच ना ? 

          चंद्रसेन पाताडे सरांच्या क्षमता मात्र अमर्याद आहेत. शिक्षक संघटना , शालेय कामकाज आणि त्यांची सामाजिक संघटना यांत ते स्वतःला झोकून देऊन काम करीत असतात. ओठात आणि पोटात दोन्ही ठिकाणी समान विचार धारण करणारे आपले चंद्रहास म्हणूनच खूप कमी वयात एवढे उच्च पदापर्यंत पोहोचू शकले. त्यांच्या समाज संघटनेमध्ये त्यांनी केलेले कार्य आणि मिळवलेले सन्मान यावरुनच या माणसाच्या सामाजिक असण्याची प्रचिती येते. 

          पाताडे सरांसोबत मी एकदा , दोनदा किंवा तीनदा जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेण्यासाठी होतो. त्यावेळी चर्चेत भाग घेताना त्यांनी मांडलेली परखड मते माझ्यावर आणि सर्वांवर प्रभाव टाकणारी होती. सहज बोलण्यातून समोरच्या व्यक्तीच्या मनात शिरणं त्यांना जमतं. एखाद्याच्या चांगल्या सादरीकरणाला दाद देणारे ते प्रोत्साहक आहेत. मी कुठल्या तरी शैक्षणिक प्रशिक्षणात एका बालगीताचे सादरीकरण केले होते. प्रशिक्षण संपताच पाताडे माझ्या अगदी जवळ आले आणि माझ्या गायनाची तोंड भरुन स्तुती केली. एखाद्याच्या चांगल्या कौशल्याची स्तुती करायलाही मोठं मन असावं लागतं. एवढं मोठं मन असल्यामुळेच ते आम्हा शिक्षकांच्या , समाजबांधवांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात आदराची पेरणी करु शकलेले आहेत. 

          भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलमधील अभ्यासू उमेदवारांमध्ये चंद्रसेन पाताडे सर अधिक उठून दिसतात. प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत जिल्हा उमेदवार म्हणून हमखास निवडून येऊ शकणारे आमचे मित्र चंद्रसेन पाताडे म्हणूनच मला जास्त महत्त्वाचे वाटतात. त्यांना निवडून आणणे हे मतदारराजा म्हणून फक्त तुमच्या आणि तुमच्याच हातात आहे. तुम्ही त्यांना प्रचंड मतांनी निवडून देणार हे चंद्राच्या शीतल प्रकाशाइतके खरे आहे. निवडणुकीपूर्वीच मला त्यांचं निवडून आलेलं चंद्रहास्य दिसू लागलं आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



Wednesday, May 3, 2023

🛑 समितीचे More ( मोअर ) संतोष

🛑 समितीचे More ( मोअर ) संतोष

          काही अशी माणसं शिक्षणक्षेत्रात आली आणि या क्षेत्राचं सोनं करुन टाकलं. शिक्षणक्षेत्रात धडाडीचं कार्य करता करता सहकार क्षेत्रात उतरुन तिथेही आपली पात्रता सिद्ध करुन दाखवली. सर्वांच्या मनात कायमच संतोष पेरण्याचं काम करणं सोपी गोष्ट कधीच नसते. पण हे व्यक्तिमत्त्व याला अपवाद ठरलं. नावातच संतोष असल्यामुळे की काय , जातील तिथे आनंदाच्या शब्दांची साखरपेरणी करत गेले.

          वैभववाडी तालुक्याला संतोष मोरे सरांच्या रुपाने एक अनमोल असा हिराच सापडला आहे म्हणा ना !! संतोष मोरे हे वैभववाडी तालुक्याचं वैभव आहेत. संतोष मोरेंचा तालुका म्हणूनही तालुक्याची ओळख करुन दिली तरी चालू शकेल इतकी त्यांची घरोघर पडलेली छाप सांगते. संतोष मोरे कमी बोलतात , पण त्यांनी केलेले कार्य जास्त बोलते. 

          मी 31 मार्च 2012 साली वैभववाडी तालुक्यातील मांगवली नं.१ शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून हजर झालो. काही कामानिमित्त भुईबावडा येथे जाणे झाले. तेथे संतोष मोरे सरांची पहिली भेट झाली. त्यांचं दाढीतून हसणं नेहमीच मला भावतं. त्यांच्या प्रेमळ शब्दांनी लगेचच माझं मित्रत्वाचं नातं जोडलं गेलं. असे करत करत त्यांनी अनेक शिक्षक बंधु भगिनी जोडले. शिक्षकच नव्हे तर शिक्षकेतर बांधव देखील त्यांना ओळखतात. एक विद्यार्थी पालकप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी आपली ओळख सर्वदूर पोहोचवली आहे. त्यांची वेगळी प्रसिद्धी करण्याची अजिबात गरज नाही. त्यांच्या आगळ्या वेगळ्या व्यक्तित्वामुळे त्यांची सुप्रसिद्धीच झाली आहे. वैभववाडी तालुक्याचे शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष असताना मी त्यांना अगदी जवळून अनुभवले आहे. त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीतून शिक्षकांना एकत्र केले आहे. त्यांचे मित्रच जास्त आहेत. शक्यतो मोरे सर एकटे कमीवेळा दिसतील , पण शिक्षकांच्या गराड्यात जास्त दिसतील. 

          मला शिक्षक बँकेचे कर्ज काढायचे होते. मला दोन जामीन तारण शिक्षकांची नितांत गरज होती. मी वैभववाडीत नवीनच होतो. शाळेतील दोन्ही जामीन मिळणे कठीण झाले होते. प्रत्येकाने आपले त्रिकुट बनवून ठेवले होते. तरीही एक जामीन शाळेतूनच मिळाले. दुसरे जामीन कोण ? हा माझ्यासमोर प्रश्न होता. हा माझा प्रश्न मी न सांगताच त्यांच्यापर्यंत कसा पोहोचला मला माहिती नाही. उलट मोरे सरांनीच मला फोन करुन जामीन व्यक्तीचे नाव सांगितले. ते म्हणाले , " कुबलसर , तुम्ही फक्त प्रिती जाधव मॅडमांकडे जा आणि सही घ्या. माझे नाव सांगा , तुम्हाला सही मिळणार. " आणि खरेच तसेच घडले. हेत केंद्रशाळेत मला अनोळखी असलेल्या प्रिती जाधव मॅडम यांनी जामीन म्हणून सही दिलीसुद्धा. वैभववाडी तालुक्यातून बदली होईपर्यंत मला जामीन बदलण्याची वेळच आली नाही. संतोष मोरे सरांमुळे मला मिळालेली तातडीची सही मी कधीही विसरु शकणार नाही. 

          मी समितीमध्ये अधिक सक्रिय होण्यासाठी वैभववाडी तालुक्यामध्येच खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तिथे माझ्याकडे कोणतेही पद नव्हते , तरीही मोरे सर सांगतील तिथे मी जात होतो. 

          मोरे सरांच्या घरी सात वर्षांत वैयक्तिक कार्यक्रमांना अनेकदा गेलो असेन. त्यामुळे त्यांच्याशी घरोब्याचे संबंध प्रस्थापित होत गेले. माझ्यासारखे अनेक शिक्षक बंधु भगिनी असेच त्यांच्याशी कायमस्वरुपी जोडले गेले आहेत. पुन्हा कणकवलीत आल्यानंतर आता जाणे होत नाही. तरीही त्यांच्यासोबतच्या आठवणी आजही ताज्या आहेत.

          माझ्या कणकवलीतील आर्यादुर्गा येथील खोलीच्या गृहप्रवेश प्रसंगी संतोष मोरेसर आपल्या टीमसह आले होते. समिती संघटना वाढीसाठी मोरे सरांनी मोअर प्रयत्न केले आहेत , अजूनही करत आहेतच. 

          भाग्यलक्ष्मी पॅनलचे वैभववाडी तालुक्याचे उमेदवार म्हणून प्रचंड बहुमतांनी निवडून येणार हे सर्वांच्या मनात आधीच ठरलेले आहे. तरीही ते माझे लाडके शिक्षकनेते म्हणून मीही आवाहन करतो. आपण सर्व वैभववाडी तालुक्यातील शिक्षक बंधु भगिनींनो , आपल्या धडाडीच्या शिक्षक नेत्याला बहुसंख्य मतांनी निवडून आणा आणि वैभववाडी शिक्षक बँकेच्या तख्तावर पुनश्च विराजमान करा. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🛑 महेंद्र पावसकरसर : एक शैक्षणिक महा इंद्र

 🛑 महेंद्र पावसकरसर : एक शैक्षणिक महा इंद्र

          शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकाकडे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असावे लागते. सगळ्यांकडे सगळेच गुण कसे असतील ? हे गुण प्रयत्नपूर्वक मिळवावे लागतात. कोणीही सर्वगुणसंपन्न नसतं. चांगल्या गुणांचा संचय असणारी माणसं चार चौघात उठून दिसतात. बाह्यगुण आणि आंतरिक गुण दोन्हींची पारख करुनच एखाद्याला मोठेपणा मिळत असतो. दिसणं आणि असणं या दोघांमध्ये थोडीशी जरी फारकत झाली तरी चरित्र डळमळू शकतं.
          माझे मित्र महेंद्र पावसकर हे एक उपक्रमशील शिक्षक आहेत. ते साधे , सरळ आहेत. शक्यतो ते मौन पाळतात. संथ वाहणाऱ्या सागराच्या अथांग खोलीचा अंदाज येत नसतो. महेंद्र पावसकर सरांचं ज्ञान हे अथांग सागरासारखं आहे. ते मार्गदर्शन करु लागले कि त्यांच्या ज्ञानाचा प्रत्यय येतो. ते उठसूट बोलत सुटत नाहीत. मोजकेच पण मुद्देसूद बोलण्याची त्यांची पद्धत आहे. त्यांचं बाह्य व्यक्तिमत्त्व आकर्षक आहेच हे कोणीही सांगेल.
          ते कलेचे वेडे आहेत. ते कृतीशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. ' आधी केले , मग सांगितले " ही उक्ती त्यांना बरोबर लागू पडते. त्यांच्याकडे टाकाऊ साहित्य द्या , ते त्यापासून टिकाऊ आकर्षक उपयोगी साहित्य खूप कमी वेळात बनवून दाखवतील. ही चित्र , शिल्प प्रथम त्यांच्या मनात येतात , मगच ती प्रत्यक्षात अवतरतात. त्यांच्या मुलाला त्यांनी हेच कलेचं बाळकडू पाजलं आहे. त्यांचा मुलगा त्यांच्याहीपेक्षा वरचढ बनला आहे. बाप से बेटा सवाई म्हणतात ना !!! अगदी तस्साच.
          बाहुली नाट्य सादर करणं म्हणजे महेंद्र सरांच्या हातचा मळ आहे. एकदा फणसगाव बीटस्तरीय शिक्षक संमेलनात त्यांचा हा आविष्कार मला प्रत्यक्ष पाहायला मिळाला. बाहुल्या नाचवत बोलणं ही सोपी गोष्ट नसते. महेंद्र सरांनी त्याचं शास्त्रीय प्रशिक्षण घेतलं आहे.
          महेंद्र पावसकरसर यांची भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलमध्ये जिल्हा उमेदवार म्हणून झालेली निवड अतिशय योग्य आहे. आपल्याला दिलेलं कार्य इमाने इतबारे करताना मी त्यांना कित्येक वर्षे पाहात आलेलो आहे. कार्य तडीस कसं न्यायचं हे त्यांच्याकडून शिकावं. स्वतः कोणतेही टेन्शन न घेता आणि दुसऱ्यांनाही टेन्शन न देता कार्य सिद्धीस नेणं त्यांना लिलया जमतं. सतत काम करत राहणं हा त्यांचा खाक्या आहे.
          महेंद्र पावसकर सरांसारखे उच्च विद्याविभूषित पदव्युत्तर पदवी मिळवलेले शिक्षक जर शिक्षक बँकेत निवडून येतील तर बँकेला त्याचा फायदाच होणार आहे. त्यांच्या संकल्पना अफलातून असतात. त्यांनी विविध शाळेत केलेल्या अभिनव कार्याचा दृष्टिकोन ते बँकेसाठी नक्कीच वापरतील याची खात्री आहे. त्यांना अनेक उत्तम सन्मान , पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांची यादीही भलीमोठी आहे. ते स्वतः प्रसिद्धीपासून थोडे दूरच असतात. स्वतःबद्दल ते मोठेपणाचा टेंभा कधीच मिरवताना दिसलेले नाहीत.
          अशा या अभ्यासू आणि नवोपक्रमशील शिक्षकाला त्यांच्या नावाप्रमाणेच आपण महा इंद्र बनवाल आणि मतांचा पाऊस पाडाल अशी मोठी अपेक्षा करतो.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🛑 निवडणुकीची ऋतुजा

🛑 निवडणुकीची ऋतुजा

          प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा ऋतु सुरु आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना ' भाग्यलक्ष्मी सहकार पॅनल ' ने प्रचाराचा धुमधडाका आरंभलेला आहे. 

          वारगाव नं. १ शाळेच्या पदवीधर शिक्षिका आणि मुख्याध्यापिका अशी दुहेरी कामगिरी बजावणाऱ्या ऋतुजा दिनेश जंगले यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कणकवली शाखेकडून जिल्हा महिला उमेदवार म्हणून अभिनंदनीय निवड झाली आहे. एका नवोपक्रमशील व्यक्तिमत्वाची निवड करुन समितीने ऋतुजा यांचा सन्मानच केला आहे. 

          एखादया गाण्याच्या कार्यक्रमामध्ये बझर टॅप करुन ' मौसम बदल दिया ' असे उत्साहाच्या भरात म्हणणाऱ्या परीक्षकांप्रमाणे ऋतुजा मॅडम या निवडणुकीत मौसम बदलतील असा ठाम विश्वास वाटतो. त्यांच्यासोबत उभे असलेले भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे सर्वच उमेदवार अतिरथी महारथी आहेत. त्यांच्या महारथी असण्यामुळे ते सर्वच प्रचंड बहुमतांनी निवडून येतील याची शंभर टक्के खात्री आहे.

          युद्धात लक्ष्मण मूर्च्छित पडल्यानंतर हनुमान द्रोणागिरी पर्वतावरील ' संजिवनी ' आणण्यासाठी गेला. त्याने संपूर्ण पर्वतच उचलून आणला. त्यामुळे युद्धभूमीवर सर्वच मुर्च्छितांना नवजीवन प्राप्त झाले. ' ऋतुजा जंगले ' मॅडम या आपल्या शिक्षक बॅंकेसाठी ' संजिवनी ' ठरतील अशी आशा करुया. काही नवनवीन अभिनव योजना आणून शिक्षकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देतील. आपले बॅंकेविषयीचे ज्ञान वाढवून बँकेच्या सभासदांच्या हिताचा विचार करतील. 

          आम्ही सिंधुदुर्गात नोकरीला लागलो तेव्हा बऱ्याच शिक्षकांची देवगड तालुक्यात रवानगी झाली. विजयदुर्ग , देवगड अशी दोन बसस्थानके असलेला देवगड तालुका 1998 मध्ये दुर्गम समजला जात होता. त्यावेळी ऋतुजा जंगलेमॅडम देवगड तालुक्यात कविता बोडेकर या नावाने रुजू झाल्या. शिरगाव बीटमध्ये विविध प्रशिक्षणांर्गत ऋतुजा मॅडमांची शैक्षणिक कारकिर्द अधोरेखित होताना दिसत होती. त्यांनी केलेल्या ऱ्हाईम्स सादरीकरणात प्रभावीपणे घेतलेला सहभाग त्यांच्यातील आवाजाचे , नृत्याचे आणि सभाधीटपणाचे प्रदर्शन घडवत होता. त्यांनी भाग घेतला असेल तर आम्हाला नंबर मिळणार नाही हे ठरलेलेच असे. त्यांना त्यांच्या घरातूनच शैक्षणिक बाळकडू मिळाले आहे. त्यांच्या घरातील आणि माहेरकडील सर्वच सदस्य प्रतिभावंत आहेत. 

          आमचे जिवलग मित्र दिनेश जंगले यांच्याशी त्यांचा विवाह संपन्न झाला. पुन्हा फणसगाव बीटमध्ये जंगले दाम्पत्याची भेट घडली. उंडील तिठ्यावर अनेकदा दोघांची भेट घडे. माझी पत्नी ऐश्वर्या आणि ऋतुजा यांची मैत्री झाली. दोघी मैत्रीणी असल्या तरी बहिणीच जास्त वाटत. 

          माझ्या पत्नीचे 2007 मध्ये निधन झाल्याचे समजताच दिनेश जंगले आणि संतोष राणे ( देवगड उमेदवार ) माझ्या दुःखदप्रसंगी धावून आले होते हे मी कदापि विसरणार नाही. 

          त्यानंतर आता पुन्हा दोघांचीही तळेरे प्रभागात पुनश्च भेट घडते आहे. साळीस्ते आणि शेर्पे केंद्राच्या टॅग मिटींग एकत्रित व्हायला लागल्या होत्या. त्यावेळीही पुन्हा एकदा ऋतुजा मॅडमांची इंग्रजीवरील मास्टरी दिसली. त्यांच्या इंग्रजी ज्ञानाचा आम्हाला बराच फायदा झाला. 

          असे अभ्यासू आणि शिक्षकांबद्दल आदर बाळगणाऱ्या व्यक्तींना निवडून देणे हे प्रत्येक शिक्षक मतदाराचे परमकर्तव्य आहे. मला वाटते ऋतुजा जंगले मॅडमांच्या अभ्यासू असण्याचा फायदा बँकेला होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अर्थात ऋतुजा मॅडम शिक्षक बँकेच्या या निवडणुकीत भाग्याचा ऋतू बहरुन टाकतील आणि भाग्यलक्ष्मी पॅनेलचे सर्वच उमेदवार निवडून देण्यासाठी मौसम बदलून टाकतील यासाठी आपण सर्व शिक्षक बंधु भगिनी त्यांच्या पाठीशी बहुमताने राहूया. 

©️ प्रवीण अशितोष कुबल



🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...