Sunday, July 18, 2021

प्रसार माध्यमांचे वास्तव

           प्रसार म्हणजे एखादी गोष्ट सगळीकडे पसरवणे नाही का ? मग प्रसार माध्यमे तर कितीतरी आहेत. दृक स्वरुपातली आहेत, श्राव्य स्वरुपातली आहेत आणि दृक् - श्राव्य या दोन्ही प्रकारचीही आहेत. आता तर आपल्या हातात जग मावलेलं आहे. 

          छोट्या टचस्क्रीनवर नुसतं टच केलं तरी प्रचंड माहितीचा महासागरच आपल्यासमोर खुला होतो. जगाच्या कानाकोपर्‍यात काय घडते ते सर्वांना सदासर्वकाळ एका क्लिकवर समजू लागले आहे. वर्तमानपत्र, दुरदर्शन अशांमधून आपल्याला अधिकृत विश्वासार्ह माहिती मिळण्याची जास्त शक्यता असते. 

          केबल वाहिन्या , विविध ॲप्स, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यावरही क्षणाक्षणाला अधिकाधिक माहिती येऊन दाखल होते. नुसतं फक्त गुगल करत राहायचं. वेळही पुरणार नाही.मग एकाच विषयावर , घटकावर अनेक प्रकारची वेगवेगळी माहितीसुद्धा मिळते. मग आपण संभ्रमात पडतो. ही माहिती बरोबर कि ती माहिती बरोबर ? बातम्यांचा टी आर पी वाढण्यासाठीही न्यूज चॕनेलवाले बातमीला मीठमसाला लावून भडक करतात. मेकअप स्पष्ट दिसावा म्हणून दशावतारी नाटकातील कलाकार भडक मेकअप करतात ना अगदी तस्संच !! आता आपण चारचौघात उठून दिसण्यासाठी भडक लिपस्टिक लावतोच की !!     

          शोधपत्रकारितेच्या नादात शोधायची गोष्ट सोडून नको तेच शोधलं जातं. आपण सर्वसामान्य दर्शक किंवा वाचक काय करतो, आली नवीन माहिती की कर फाॕरवर्ड. अशाने चुकीचीच माहिती जास्त फाॕरवर्ड होत राहते. चांगली माहिती वाचायची राहूनच जाते, मग ती फाॕरवर्ड तरी कशी होणार ? काही लोकांना तर मॕसेज फाॕरवर्ड करत राहण्याची ॲडिक्शनच झाली आहे. आला मॕसेज.. कर फाॕरवर्ड. वाचतसुद्धा नाहीत आपण नक्की काय फाॕरवर्ड करतोय ते ? काही महाभाग तर आपलं नावसुद्धा बदलण्याची तसदी घेत नाहीत.दुसऱ्यांच्या नावानेच आहे तसाच फाॕरवर्ड करतात. अशाने या प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता कशी राहणार सांगा.

          अधिकृत सुत्रांचा हवाला देऊन बातमी दिलेली असते त्यातही छपाई किंवा संपादनात जर ध चा मा झाला तर अर्थच बदलून जातो. 

सध्या प्रसारमाध्यमांचं जाळंच जाळं पसरलं आहे, कोणी शिंकलं तरी त्याची बातमी होते. बातमीमध्ये आपल्या चॕनलचे वेगळे ट्विस्ट असले पाहिजे असं सगळ्याच प्रसारमाध्यमांना वाटत राहतंय की काय ? 

          विश्वासार्ह बातम्या देणारी सह्याद्री वाहिनी सोडून आपण इतर वाहिन्या सेकंदासेकंदाला बदलत राहतो याचा अर्थ काय समजायचा ? तुम्ही रिमोट हातात घेऊन ते नुसतं दाबत राहण्याचंच काम करत असणार , बरोबर ना ? मग प्रसार माध्यमेसुद्धा तुमच्या चंचल मनाचाच ताबा घेऊ लागल्या आहेत. त्यांची तरी चूक काय ? तुम्हाला जे हवे आहे ते देण्याचं काम माध्यमे करत आहेत. ते जास्त भडक झालं तरी चालेल पण ते तुमच्या गळी उतरवण्यासाठी करत असतील कदाचित नक्की सांगता येत नाही. त्यात आपल्याला असंही लक्षात येऊ लागलं आहे कि काही राजकीय पक्षांचीही वैयक्तिक चॕनल्स वारेमाप आली आहेत. त्याद्वारे त्या वाहिन्या अधिकची माहिती देऊन जनमानसाचं मत आपलंसं करण्याचाही प्रयत्न करतात. 

          पैसे देऊन घेऊन जर बातम्या दिल्या जात असतील तर त्या पेड बातम्यांचं वास्तव काय असणार ? त्यात खरी माहिती कमी आणि फुगवून दिलेली माहिती जास्त असणार यात शंकाच येऊ नये. हल्ली काय ते मतदानाचा कौलसुद्धा कोणाच्या बाजूने ते सांगण्याचा आठवडाभर भारंभार प्रयत्न केला जात असतो.     

          प्रसारमाध्यमांची पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. पण त्यातील वास्तवतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहतो. कोरोनाचा फैलाव वाढत चाललेला असतानाचे खरेखुरे मृतांचे आकडे समजले असते तर लोकं हाॕलमधून बेडरुममध्येही गेली नसती. सर्व प्रकारच्या आकडेवारीमध्ये अंदाजे आकडे देण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते आहे. 

          प्रसारमाध्यमांमध्ये आपापसांत वाढलेली जीवघेणी स्पर्धा या अवास्तवतेला कारणीभूत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. "इंग्रज सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? "असे म्हणणारे नरकेसरी लोकमान्य टिळक आता सापडणार नाहीत. आपल्या जीवाला घाबरुन दुसऱ्यांची स्तुती करत नको ती माहिती प्रसारमाध्यमांकडून फ्लॕश केली जातेय का ? हा सुद्धा एक संशोधनाचा विषय ठरु शकतो. 

          जसं आहे तसं प्रसारण झालं पाहिजे , प्रसारित होणारा शब्दनशब्द स्वच्छ काचेसारखा सुस्पष्ट असला पाहिजे.तर आणि तरच आजची प्रसारमाध्यमे नक्कीच लोकमानसात एक क्रांतीची ज्योत पेटवतील. या प्रसारमाध्यमांमध्येच लोकमत बदलण्याची दिव्य शक्ती आहे. लोकांनीही अशा भंपक आणि अवास्तव माहिती देणाऱ्या माध्यमांवर किती विश्वास ठेवायचा आणि चिकटून राहायचे ते ज्याचं त्यानं ठरवायचं आहे .नाही का ?


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Saturday, July 17, 2021

जाता जाता पावसाने

 🟣 जाता जाता पावसाने

          रात्रीच्या ड्युटीला जायची गडबड सुरू होती. कणकवलीपासून खारेपाटण पर्यंतचा प्रवास तसा पस्तीस ते चाळीस किलोमीटरचा असेल. टू व्हीलरने सतत ये जा करण्याची सवय असल्यामुळे काही वाटत नव्हते. दुपार सत्र , सकाळ सत्र संपून रात्रीचे सत्र सुरू झाले होते. गेल्यावर्षी पासून अनेक सत्रे पार पाडली असल्याने आत्मविश्वास विचलित होण्याचाही प्रश्न नव्हता. ही बहुदा सातवी ड्युटी असावी. कोविड ड्युटी शाळेत विलगीकरण कक्ष , प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि खारेपाटण चेकपोस्ट येथे करुन करुन शाळेतल्या कामाचा विसर पडत चालला आहे अशीही जाणीव होऊन कावरेबावरे किंवा कासावीस व्हायला होते होते.

          मला पाऊस नको होता. पण मी बाहेर पडताना तो मुद्दाम येत होता. रेनकोट घालून बाहेर पडायचे माझ्या जीवावर आलेले होते. बायकोने मस्त चवळीची उसळ आणि गरमागरम चपात्या बनवलेल्या होत्या . मी टीव्हीवर सुरु असलेला ' या फुलांना सुगंध मातीचा ' हा कार्यक्रम बघतच कश्यातरी दोन तीन चपात्यांचा फडशा पाडत होतो. आज रात्रीच्या ड्युटीवर जायला जीवावरच आलेले होते. पण नाईलाज होता. मी नाराजीतच रेनकोट चढवत होतो. घरातल्यांच्या चेहऱ्यावरची नाराजीही स्पष्ट दिसत होती. तरीही ते मला कृत्रिम हसत निरोप देत होते. छोटी उर्मी उचलून घ्यायला सांगत होती. तिचा एक गालगुच्चा मला संपूर्ण प्रवासात साथ करणार होता. माझा त्रासदायक प्रवास मला सुखकारक होण्यासाठी मला ते गरजेचे वाटत होते. ती मला येताना ' चुपाचूप ' नावाचा खाऊ आणायला सांगत होती , मी तिला उद्या येताना सकाळी आणता येणार नाही असे म्हणून चूप करुन टाकत होतो.

           ' पेरुचा पापा ' घेऊन निघायचे होते. पेन , रुमाल , चावी , पाणी आणि पाकीट या पाच शब्दांची आद्याक्षरे घेऊन बनवलेले ते संक्षिप्त रुप बनवलेले होते. त्यात आता रेनकोट , हेल्मेट, मोबाईल, चष्मा हे आणखी चार शब्द मिळवायचे बाकी होते. लक्षात राहण्यासाठी आपण बऱ्याचदा असे शॉर्टकट वापरतो. पण तरीही मी काहीतरी विसरलोच होतो. त्या दिवशी मी मोबाईल विसरुन आलो होतो तर मला ड्युटीचे आठ तास म्हणजे कमालीची शिक्षा वाटू लागली होती. पण तेवढा इंटरनेटमुक्त जीवन जगण्याचा आनंदही झाला होता. 

         आज मी रुमाल आणायला विसरलो होतो. सुरुवातीला रिमझिम पडत असलेला पाऊस दोन तीन किलोमीटर नंतर धोधो पडू लागला होता. मी माझा मास्क आधीच काढून ठेवला होता. हेल्मेट चढवल्यानंतर मास्कची गरज नव्हती. हेल्मेटवर काच असल्यामुळे पाणी तोंडावर येण्याची भीती नव्हती. मी चष्मेवाला असल्यामुळे तो घातल्याशिवाय मला स्पष्ट दिसणार नव्हते. मी चष्मा चढवला होता. आता पावसाने आपला वेग वाढवला होता. रपारप पाऊस प्रवासात अडथळे आणत होता. हेल्मेटच्या काचेवरुन पाणी ओघळू लागले होते. समोरचे स्पष्ट दिसत नव्हते. हेल्मेटला वायफर असते तर किती बरे झाले असते असे क्षणभर वाटून माझे मलाच हसू आले होते. 

          मी एकटा जातोय म्हणून हा मुसळधार पाऊस माझी सोबत करु पाहत होता. मला त्याची सोबत आता मात्र नकोशी झाली होती. समोर दिसत नव्हते , म्हणून मी हेल्मेटची काच वर केली होती. सगळा पाऊस माझ्या डोळयांत, नाकात आणि तोंडात शिरु लागला होता. चष्म्यावर पाणी आल्याने समोरचा रस्ता दिसेनासा झाला होता. पुढचा रस्ता दिसायला हवा होता. मी चष्मा काढुन ठेवला होता. आता रस्ता साधारण दिसू लागला होता. काळाभोर रस्ता सोबत करु लागला. रस्त्याच्या मधली पांढरी रेषा पुढे जायला मदत करत होती. मित्र असलेला पाऊस आता शत्रू होऊन डोळ्यांत पाणी आणू लागला होता. पाऊस थांबण्याचे अजिबात चिन्ह दिसत नव्हते. रेनकोटातून पाऊस आत यायला बघत होता. माझे कपडे ओले करुन विजयी झाल्यासारखे आकाशात ढोल वाजवत होता. मधेच वीजबाई चमकून अंगावर येत असलेले शहारे वाढवत होती. रस्ता संपता संपत नव्हता. 

          एकेरी वाहतूक असल्यामुळे समोरुन गाड्या येण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही एखाद्या ठिकाणी उलट दिशेने गाड्या हाकणारे येत होतेच. त्यांच्यापासून जीव मुठीत घेऊन सुखरूपपणे खारेपाटण चेकपोस्ट गाठायचे दिव्य करायचे होते. पाण्याचे ओहळ रस्त्यावरून वाहताना दिसत होते. अचानक रस्त्यावर जास्त साचलेल्या पाण्याचा आवाज येऊन छातीत धस्स होत होते. कुठेही थांबायचे नव्हते. गाडी बंद केली आणि पुन्हा गाडी स्टार्ट नाही झाली तर ? हा प्रश्न सतावत होताच. त्यामुळे गाडी मध्येच थांबवून पाऊस कमी होण्याची वाट पाहणेही धोक्याचेच वाटत होते. पावसाचा मारा सहन करत गाडी रस्ता आणि पाऊस दोन्ही कापत पुढे पुढे चालली होती. 

          मी या कोविड राक्षसाचा राग राग करत खारेपाटण चेकपोस्टची प्रतिक्षा करत होतो. पंचेचाळीस मिनिटांच्या सलग प्रवासानंतर मी सुखरूप खारेपाटणला चेकपोस्टवर पोचलो याचा आनंद होत होता. दुपारची टीम आमच्या टीमची वाट पाहत असल्याचे दिसत होते. पुढील कामकाज आमच्याकडे सोपवून जाताना त्यांना सुटकेचा निःश्वास टाकताना पाहून आम्हाला रात्र काढायची आहे या भीतीने पोटात आलेला गोळा मोठा मोठा होऊ लागला होता. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Friday, June 4, 2021

🟢 इलास , कधी इलास

 🟢 इलास , कधी इलास


          शिक्षण आणि प्रतिभा या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शिक्षणाने प्रतिभा येऊ शकते. प्रतिभेमुळे शिक्षण घडू शकते. कमी शिक्षण असलेले प्रतिभावंत असलेले आढळून आलेले आहेत. जास्त शिक्षण घेतलेल्यांच्या अंगी प्रतिभा असेलच याची खात्री देता येत नाही. माणसाच्या अंगी असलेली ही प्रतिभा कधी लवकर लक्षात येते , तर कधी लक्षात यायला वेळ लागतो. ' हाडाचा शिक्षक ' , ' हाडाचा कवी ' अशी उपमा दिली जाते. सगळी माणसे हाडाचीच बनलेली असतात. पण ' हाडाचा ' हा शब्द त्यांच्यातल्या प्रतिभावंतासाठी वापरलेला असतो. 

          बहिणाबाई चौधरी या प्रतिभावंत कवयित्री होत्या. त्यांना स्फुरत असणाऱ्या कविता त्या म्हणत असत. त्यात असणारा अर्थ डोळ्यातून पाणी आणणारा असे. त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी यांनी आपल्या आईची प्रतिभा जोपासली. त्यांच्या कवितांचे लेखन करून त्या जगाला दिल्या. जगाला जगण्यासाठीचे अमृत बहिणाबाईंच्या गावरान शब्दात सामावलेले होते. बहिणाबाईंचा प्रत्येक शब्द वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. 

          कलासानिध्य आणि अक्षरसिंधु या सांस्कृतिक संस्थांमध्ये काम करताना मला अशी प्रतिभावंत माणसं भेटली. प्रत्येकामध्ये वेगवेगळा प्रतिभावंत मी बघत होतो. त्यांचं बोलणं, वागणं मी टिपत चाललो होतो. मी त्यांच्यात सर्वांत कमी असल्याने टिपकागदासारखं सगळं टिपत राहण्याचं काम करत होतो. माझ्यातला प्रतिभावंत जागा होईल का ? याची मी वाट पाहत होतो. मला काही ते जमत नव्हते. 

          आमच्या या टीममध्ये एक कलाकार माझे विशेष लक्ष वेधून घेत होता. मी त्या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते. कुठे पाहिले मी या माणसाला ? जरा स्मरणशक्तीला चालना दिली. हा माणूस मला कणकवलीतच एका दुकानात दिसला होता. मग ते दुकानही आठवले. अरे हो !!! हा माणूस मला दोन दिवसांपूर्वी नारळाच्या दुकानात नारळ विकताना दिसला होता. अरे !!! मग हा माणूस इथे काय करतोय ? म्हणजे हा एवढा प्रतिभावंत नट असूनही नारळाच्या दुकानात नारळ विकतोय तर !!! मला त्या माणसाबद्दल आदर वाढला. त्याची विनोदी शैली मला भावत होती. सगळ्या वाक्यांमध्ये हसण्याच्या जागा या माणसाने शोधून काढल्या होत्या. शाब्दिक कोट्या करत बोलण्याची त्या माणसाची सवय सगळ्यांचीच फिरकी घेत असे. या माणसाशी बोलायचे म्हणजे विचार करूनच बोलायला लागे. 

          या माणसाने कलाकार म्हणून मालवणी सम्राट मच्छिन्द्र कांबळी यांच्या ' वस्त्रहरण ' नाटकातही काम केले होते. गोप्याची भूमिका करताना या माणसाने प्रेक्षकांना त्यावेळी लोटपोट करून सोडले असणार . हा माणूस एक प्रतिभावंत कलाकार असला तरी एक प्रसिद्ध व्यापारी आहे. ' नारळवाले खानोलकर ' म्हणून त्यांची सिंधुदुर्गातच नव्हे तर सगळीकडे ओळख आहे. या माणसाचे नाव विलास खानोलकर. मालवणीत या नावाचा उल्लेख ' इलास ' असा केला जातो. विलास खानोलकर म्हणजे एक चालतेबोलते नाट्यगृह आहे. 

          आज विलास खानोलकर हे नाव नाट्यक्षेत्रात प्रसिद्ध असले असते. पण व्यवसाय करता करता त्यांना ही कला जोपासावी लागली. रात्रीचे प्रयोग करून पुन्हा आपल्या पारंपरिक नारळाच्या दुकानात काम करताना ते नेहमी नजरेस पडतात. त्यांना दुकानात कॅल्क्युलेटरची गरज पडत नाही. ते सगळं हिशेब तोंडीच करताना दिसतात. त्यांचे मालवणी भाषेवर नितांत प्रेम आहे. ते शक्यतो मालवणी भाषेतच बोलतात. मालवणी भाषेतील म्हणी वापरत ते आपला संवाद अधिक रुचकर बनवतात. त्यांना मोठया साहित्यिक कार्यक्रमामध्ये बोलावणे येत असते. ते शीघ्र कवी आहेत. ते चारोळी तयार करतात. या चारोळ्यांमध्ये आपला गावाकडील माणूस लपलेला असतो. त्यांचे अनेक मालवणी लेख ' तरुण भारत ' या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. ते माझ्या काकांच्या वयाचे असतील. मी त्यांना कुठेही वाटेत भेटलो , तर मला ते विनोदाने ' काका ' अशी हाक मारतात. मात्र मी त्यांना फोन केला तर , तिकडून आवाज येतो , " बोल प्रवीण , काय म्हंतस ". 

          या विलास खानोलकरांनी ' इये कोकणचिये नगरी ' अर्थात ' कोकणच्या लोककला ' नावाचा एक अतिशय पारंपरिक , संस्कृतीविषयक आड दशावतार हा कार्यक्रम लिहून त्यात महत्त्वाची भूमिकासुद्धा केली आहे. त्यात त्यांचे मालवणी पात्र अतिशय भाव खाऊन जाते. मी त्यात त्यांच्यासोबत वासुदेव , धनगरीनृत्य , कोळीगीत गायन केले होते. त्यांची आणि अनिल सावंत यांची बतावणी ऐकताना आम्ही नेहमीच पोट धरून हसलो आहोत. अनिल सावंत त्यात कोल्हापुरी माणसाची भूमिका अतिशय छान रंगवायचे. आता ती कोल्हापुरी माणसाची भूमिका कणकवली कॉलेजचे प्राध्यापक हरिभाऊ भिसेसर हेसुद्धा छान वटवतात. 

          प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा छंदी असतो. विलास खानोलकरांना नाटकाचे , लेखनाचे , काव्यरचना करण्याचे वेडच आहे म्हणा ना !! वगनाट्यात बतावणी करताना सद्यस्थितीवर भाष्य करत बोलण्याची त्यांची पद्धत हास्य निर्माण करते. त्यांचा विनोद हा मार्मिक असतो. पोट धरून हसायला लावणारा असतो. प्रत्येक माणसाने या विलास खानोलकरांसारखे विलासी व्हायला हवे. अश्या प्रकारचा विलास प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी यायलाच हवा. माझ्या जीवनात हा विलास आला आणि माझे जीवन चांगल्या अर्थाने ' विलासी ' करून टाकले. म्हणूनच मी गमतीने म्हणतो , " इलास , कधी इलास ? " . 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Sunday, May 30, 2021

🔴 काबुलीवाले गांधी

🔴 काबुलीवाले गांधी

        काबुली म्हणजे भाजलेले चणे. कागदाच्या गुंडाळीमध्ये गरमागरम काबुली खातानाचा आनंद मी बऱ्याचदा अनुभवला आहे. लहानपणी शाळेच्या जवळ एखादा काबुलीवाला हमखास येत असे. माझ्या एका मित्राचे वडीलही काबुलीवाले होते. ते वयस्कर झाल्यानंतर माझा तो मित्रही काबुलीवाला झाला. माझा हा काबुलीवाला मित्र मला भेटतो. माझ्या संपूर्ण कुटुंबाची विचारपूस करतो. हल्ली बरेच दिवस तो भेटला नाही. त्याचा भाऊ भेटतो , तोही चौकशी करतो. माझ्या या काबुलीवाल्या मित्रामुळे मला त्याच्या वडिलांचा खूप आदर वाटू लागला. स्वतःचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असताना हा माझा मित्र काबुली विकत असे. शिक्षण घेत असताना ' काबुलीवाला ' हा फिरून करावयाचा धंदा असला तरी हा धंदा त्याच्यासाठी कधीच व्यत्यय ठरला नाही. उलट त्या व्यवसायाने त्याचे शिक्षण पूर्ण केले. 
          त्यांची फिरती गाडी असल्यामुळे नाट्यगृह , जत्रा , शाळा इत्यादी ठिकाणी त्यांना फिरून धंदा करावा लागे. शाळा सुटली की माझा मित्र संध्याकाळी उशिरापर्यंत काबुलीच्या गाडीवर चणे , शेंगदाणे विकताना मी अनेकदा पाहिले आहे. आमच्या वर्गातील सर्व मुले , मुली मधल्या सुट्टीत आमच्या ह्या मित्राच्या गाडीवर जाऊन ' काबुली ' घेत असत. माझ्या या मित्राला आपल्या या धंद्याबद्दल कधीही कमीपणा वाटल्याचे दिसले नाही. त्यांच्याकडचे गरमागरम चणे , शेंगदाणे, पिवळे वाटाणे, रंगीबेरंगी वाटाणे, चुरमुरे, खारे शेंगदाणे, भाजकी चणा डाळ, तिखट डाळ, तिखट शेंगदाणे खाऊन झाले की पुन्हा पुन्हा खावेसे वाटत. कागद सहज गुंडाळून त्याची शंकूच्या आकाराची काबुली पुडी बनवून त्यात मापाने काबुली ओतून त्यात आणखी थोडी काबुली घालत हसतमुखाने काबुली देणारे माझ्या मित्राचे ते बाबा माझ्या नयनचक्षूंसमोरून आता तरळून जात आहेत. 
          त्यानंतर अजून एक काबुलीवाले माझ्या आयुष्यात आले. आमचे सलून कणकवली ढालकाठी परिसरात असताना त्यांचा आमचा परिचय झाला. मी एकदा असाच दुकानात अभ्यास करत असताना बाबा किंवा काका मला म्हणाले , " तुला गांधीजी बघायचे आहेत का ? " मी गमतीनेच हो म्हटले. आम्ही शाळेत ज्यांची जयंती , पुण्यतिथी साजरी करतो , ते गांधीजी मी पुस्तकात बघितले होते. पण आता प्रत्यक्ष बघायला मिळणार म्हणून माझी उत्सुकता वाढली. माझी नजर रस्त्यावर वळली. खरंच सांगतो , गांधीजी आमच्या दिशेनेच येताना मला दिसले. मला वाटले स्वप्न असेल. मी मला चिमटा काढून बघितला. मी जागेपणीच गांधीजी बघत होतो. अगदी तसेच दिसणारे कणकवलीतले गांधीजी मी साक्षात बघत होतो. ते आमच्या दुकानात आले. त्यांनी माझ्या हातावर प्रेमाने ' काबुली ' ठेवली. मी अवाक होऊन त्यांच्या कडे बघतच राहिलो होतो. गांधीजींचे हुबेहूब रूप घेऊन आलेले हे काबुलीवाले माझे मित्रच झाले. कधी कधी आम्ही त्यांच्याकडून ' काबुली ' विकत घेत असू. पण बऱ्याचदा ही काबुली त्यांनी आम्हाला आमच्या चिमुकल्या हातात भरभरून दिलेली असे. अगदी पैसे न घेताही. त्यांना सगळे ' बाबुराव ' म्हणत. पण आम्ही त्यांना ' काबुलीवाले गांधीजी ' म्हणत असू. 
          विविध सांस्कृतिक मंडळांनी त्यांच्या या गांधीजींसारखे दिसण्यामुळे ' गांधी जयंती ' , ' स्वातंत्र्य दिन ' अशा विशेष दिनांना ' काबुलीवाल्या गांधीजींना ' वेशभूषेने  गांधीजी ' बनवून उपक्रम सादर करून वाहवा मिळवली. ते गांधीजी म्हणून प्रसिद्ध झाले. ते सर्वांशी प्रेमाने बोलत असत. काबुली विकता विकता ते लोकांना प्रेमाचे शब्दही देत चालले होते. नंतर त्यांनी ' काबुली विकण्यासाठी गाडा ' घेतला. सर्व जत्रा, गर्दी होणारे कार्यक्रम ते करू लागले. ते बहुदा एकटेच असत. सहज कणकवलीत फिरता फिरता ते चणे , शेंगदाणे विकत असत. आधी हातावर फुकटचे चणे देत. सतत फुकट घेणे बरोबर नाही , म्हणून आम्ही त्यांच्याकडे दर भेटीवेळी चणे , शेंगदाणे घेत राहिलो. त्यांचा आमच्याविषयीचा आदर वाढला. आम्हाला तर त्यांच्याविषयी आदर होताच , तो त्यांच्या नियमित येण्याने वाढतच चालला होता. 
          माझी मोठी बहीण ताई त्यावेळी रेशन दुकानात सेल्समन होती. घराला तेवढाच हातभार लागावा म्हणून ती नोकरी करून आमच्या दुकानात शिवणकामही करत होती. तिथेही हे ' काबुलीवाले गांधीजी ' जात असत. माझ्या ताईचा स्वभाव त्यांना खूप आवडे. कदाचित माझ्या ताईमध्ये ते आपल्या मुलीला पाहत असावेत. काबुलीच्या पिशवीत हात घालून जितके येतील तितके चणे , शेंगदाणे ते तिच्या हातात ठेवीत. पैसे न घेताच ते निघून जात. असे त्यांनी अनेकदा केले असेल. संध्याकाळी रेशन दुकान सुटल्यानंतर ताईकडून आम्हाला ' काबुली ' मिळे. रेशन दुकानात कामाला असतानाच माझ्या ताईचे लग्न झाले. लग्नानंतर ती ' डोंबिवलीला ' गेली. पण हे काबुलीवाले गांधीजी आले की पहिल्यांदा तिची चौकशी करत. त्यामुळे ताई कधी गावाकडे आली की रेशन दुकानात भेटायला जाई , तशी या ' काबुलीवाल्या गांधीजींनाही भेटे. त्यांना सहज शंभर , पाचशेची नोट पुढे करी. ताईला वाईट वाटू नये म्हणून ते पैसे ते घेत. पण ताईच्या हातावर पुन्हा एकदा ' काबुलीची प्रेमळ भेट ' मिळे. अशी कोणतेही नाते नसणारी माणसे आयुष्यात येतात आणि जातात. रक्ताचे नाते नसले तरी अशी माणसे एवढा जीव का लावतात समजत नाही.कधीकाळी त्यांची आठवण आली की , घालमेल होते. 
          असे हे काबुलीवाले ' गांधीजी ' . त्यांच्या आयुष्यात ते किती सुखी होते हे आम्हाला माहीत नाही , आम्ही ते शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. पण त्यांच्या येण्याने आम्हाला प्रेमाचा सुवास मिळे. कालच त्यांच्या निधनाची वार्ता वाचली नि क्षणभर ' ते ' काबुलीवाले गांधीजी ' हातावर काबुली देत असल्याचा भास झाला. लोकांसाठी ते बाबुराव असतील , पण आमच्यासाठी ते कायमच ' काबुलीवाले गांधीजीच ' असणार आहेत. 

 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )


Friday, May 28, 2021

मी वासुदेव झालो

 🟣 मी वासुदेव झालो


          पूर्वी सकाळी सकाळी दारोदारी एक पिंगळा येत असे. गळ्यात कवड्याच्या माळा , मोरपिसाची टोपी , बाराबंदी घातलेला , कपाळी टिळा , छोटी झांज वाजवत व हरिनामाचा गजर करत येणारा वासुदेव म्हणजेच पिंगळा आम्ही अनेकदा बघितला आहे. आता हल्ली हा वासुदेव दिसेनासा झाला आहे. या वासुदेवाची कोणतीही अपेक्षा असत नसे. तुम्ही जे द्याल ते घेऊन तो पुढच्या घरी जात असे. हसतमुखाने आशीर्वाद देऊन जाणाऱ्या वासुदेवाकडे पाहिले की दिवस कसा मस्त जात असे. त्यानंतर भविष्य सांगणारे येत. तेही घरातल्या सर्वांचे भविष्य सांगत. हे भविष्यवेत्ते भरपूर तांदूळ , गहू , रोख रक्कम यांची मागणी करत. आमच्याकडे एक तुणतुणेवाला येत असे. तो तुणतुण करत एखादा सुंदर अभंग गात असे. त्याचा स्वर चांगला लागे. ते ऐकण्यासाठी मी त्याच्या जवळ जात असे. पण त्याच्याकडे एक उग्र वास येत असे. मी बाबांना विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितले कि त्याने काल थोडी घेतली असणार त्याचा उग्र वास अजून त्याच्या अंगाला येतो आहे. मला त्यामुळे नंतर त्या तुणतुणेवाल्याचा राग येई. तो आला कि त्याचे गाणे न ऐकताच मी त्याला घरातून काहीतरी आणून देऊन हाकलवून लावी. 

          अक्षरसिंधु संस्थेत काम करत असताना मला अनेकदा ' वासुदेव ' सादर करण्याची संधी प्राप्त झाली होती. मीही त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न केला. माझा आवाज चांगला होता , त्यामुळेही ते मला शक्य झाले असावे. लहानपणी रविंद्र महाजनीचा ' देवता ' हा चित्रपट बघितला होता. त्यात त्याने वटवलेला वासुदेव किती छान होता !! वासुदेव आला हो , वासुदेव आला ..... सकाळच्या पारी हरिनाम बोला .... असे म्हणत आपल्या मैत्रिणीला तुरुंगातून सोडवायला आलेला दरोडेखोर लाखनसिंग त्यावेळी खूप प्रसिद्ध झाला होता. मी तो चित्रपट चार ते पाच वेळा तरी पाहिला असेन. 

          वासुदेव करायचा म्हणजे धोतर नेसावे लागे. सुधाकर प्रभूमिराशी किंवा सुप्रिया प्रभूमिराशी मला छान धोतर नेसवीत. त्यावर बाराबंदी घालावी लागे. कवड्याच्या माळा , मोरपिसाची टोपी . एका हातात चिपळी, दुसऱ्या हातात खंजिरी . नाम लावून हरिनामाचा नामजप करत मी रंगमंचावर नाचत येई. माझ्या येण्यापूर्वी रंगमंचावर ओव्या सुरू होत. बायका दळण दळत असत. दळताना त्यांच्या ओठातून सुस्वर गाणे बाहेर पडे.


           ' कोंबडा घाली साद , 

          जग समदं गं झालं जागं ' 


          याच्या पाच सहा ओळी झाल्या की मी गाणे म्हणत व नाचत नाचत रंगमंचावर दाखल होई. काही भगिनी रांगोळी काढत , काही मुसळाच्या साहाय्याने मसाला कुटण्याचा हावभाव करत. एक घरण म्हणजे घरातली सुहासिनी महिला तुळशीला पाणी घालायला येई. सकाळचा मंगल ध्वनी सुरू असतानाच माझा प्रवेश होई आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट होई. 


          तुळस वंदावी , तुळस वंदावी 

          अहो , माऊली दिनांची साऊली , तुळस वंदावी ।।

          दारापुढती लावलं रोप , त्याला निर्माल्याचा खप 

          नित्य प्रभाती उठून , करा जलाचे सिंचन 

          येई आरोग्य त्यातून , जावे त्याच्यात डुंबून , तुळस वंदावी ।।


          हे गाणं संपलं की ती घरंदाज संस्कारित भगिनी मला म्हणजे वासुदेवाला  ' दानधर्म ' करीत असे. धर्म म्हणजे तिच्याकडे असलेले तांदूळ किंवा इतर धान्य मला मनोभावे दान देत असे. मी हे दान घेतले की पुढचे गाणे म्हणू लागे. 


          दान पावलं हो , धर्म पावला 

          गळ्यात घातल्या कवड्याच्या माळा

          बाराबंदीच्या गाठी बांधल्या 

          नाजूक लाविले गंध कपाळा

          शिरी शोभते मुकुट जैसी 

          मोरपंखांची मोहक टोपी 

          हरिनामाचा गजर ओठी , दान पावलं हो धर्म पावला .......


          आकाशामध्ये सूर्यदेवाला

          भूमीमधल्या नागदेवाला

          पंढरीच्या पांडुरंगाला , दान पावलं हो धर्म पावला .......


          असे म्हणत मी आनंदाने पुढच्या घरी जात असे. पुढच्या घरी जाताना पुढील गाणे म्हणत असे. 


          वासुदेव आला हो , वासुदेव आला 

          सकाळच्या पारी हरिनाम बोला 


          आज बऱ्याच वर्षांनंतर मला मी वासुदेव झालो होतो ती आठवण झाली. एकदा आपण एखाद्या भूमिकेत शिरलो की आपले राहत नाही हेच खरे. मी अगदी वासुदेवच होऊन जात असे. गोवा येथे साखळी येथे प्रयोग होता. त्यावेळी मी सुरुवातीला ' ज्ञानेश्वर ' झालो होतो. पसायदान म्हणणारे कुणी दुसरेच गायक होते. माझ्या समोर ज्ञानेश्वरी ठेवली होती. समईच्या अंधुक प्रकाशात मी ज्ञानेश्वर ' पसायदान ' म्हणायला लागलो. अर्थात मी फक्त ओठ हलवत होतो. पण माझे पसायदान पूर्ण पाठ असल्यामुळे ते मीच म्हणत आहे असे प्रेक्षकांना वाटून गेले होते. त्यानंतर माझे वासुदेवाचे सादरीकरण झाले. तेही इतके सुंदर झाले की कार्यक्रम झाल्यानंतर पडद्यामागे  चार पाच अनोळखी लोकांनी येऊन सांगितले होते , " तुमचा ज्ञानेश्वर आणि वासुदेव दोन्ही आम्हाला खूप आवडले . " मला त्यावेळी जो आनंद झाला तो आगळा नि वेगळा असाच होता. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

©️ चित्र रेखांकन : तुलसी आर्ट : तुळशीदास अशितोष कुबलसर  ( 9405218189 )



ठंडे ठंडे पानी से नहाना चाहीये

 🔴 ठंडे ठंडे पानी से नहाना चाहीये


          उन्हाळा सुरू झाला की थंड पाण्याने आंघोळ करावीशी वाटते. थंडीच्या दिवसांत मात्र थंड पाण्याची आंघोळ करणे जीवावर येते. आपलं शरीर गरम झालं कि ते थंड करण्यासाठी शरीराने नैसर्गिकपणे ' घाम ' आणण्याची केलेली प्रक्रिया अत्यावश्यकच आहे. हा घाम आला की फॅनच्या खाली बसलात की कोण आनंद होतो ? पण  हा उकाडा कोणालाही सहन होत नाही. ती थंडी परवडली , पण उन्हाळ्याच्या झळा सोसत नाहीत. 

          पूर्वीचं सगळ्यांचं आवडतं हिंदी गाणं आंघोळ करताना अजूनही सर्वजण म्हणत असतील. '  ठंडे ठंडे पानी से नहाना चाहीये ' . हे गाणे नुसते म्हणून उपयोगाचे नाही. सोबत थंड पाण्याच्या धारा डोक्यावर पडत असतील तर तो अनुभव काय वर्णावा !! हल्ली शॉवरखाली आंघोळ केली जाते. बंद खोलीत शॉवरखाली आंघोळ , आणि ओठावर ते हिंदी गाणं , थोडावेळ डोळे बंद करून पावसात भिजण्याचा मस्त फील घ्यायचा. लहानपणी पावसात भिजताना घेतलेला आनंद , शेतात गुट्यावर बसून चिखलात बैलांच्या मागे पळण्याचा आनंद , टू व्हीलर गाडीवरून जात असताना अचानक पडलेल्या पावसाने भिजण्याचा आनंद , छत्री डोक्यावर धरलेली असताना वादळाने छत्री उडून गेल्यानंतर भिजायला झाल्याचा आनंद , रेनकोट घातल्यानंतरही त्यात पाणी येऊन अर्धे निम्मे भिजताना होणारा आनंद , बाहेर तुफान पाऊस पडत आहे आणि गारा पडू लागल्या आहेत , त्या गारा वेचत असताना भिजायला होत असल्याचा आनंद हे सगळे आनंद थंड पाण्यामुळे मिळणारे आहेत. 

          ज्यांना सतत गरम पाण्याची आंघोळ करण्याची सवय असेल , त्यांनीसुद्धा कधीकाळी हा सर्व प्रकारचा आनंद घेतलाच असेल. पण आता तो घेता येत नसला तरी आपण हा आनंद पूर्वी घेतलेला आहे , हा सुद्धा आनंदच नाही का ? मी कधी गावी गेलो की नदीत डुंबण्यात मिळणारा आनंद , प्लास्टिकच्या भरलेल्या बादलीत येत नाही. शेतात काम करताना इरले , प्लास्टिक पिशवीची खोळ , कांबळे ( आडनाव असणाऱ्यांनी राग मानू नये ) घालून पावसात भिजताना होणारा आनंद कुडकुडतानाही जाणवतो. विहिरीतील पाणी स्वतः ओढून काढून कळशी कळशीने आंघोळ करताना ती आंघोळ संपूच नये असे वाटत राहते. एक कळशी डोक्यावर रिकामी केली की दुसरी , तिसरी करत दहा पंधरा कळश्या डोक्यावर पालथ्या केल्या तरी समाधान होत नाही. खरंच अशा आंघोळीसारखा आनंद नाही. 

          आमच्या शेजारी एक कुटुंब राहत असे. त्यांचे घर रस्त्याच्या पलीकडे होते. आमच्या मालकांच्या विहिरीचे पाणी संपले की आम्हाला त्यांच्या विहिरीचे पाणी आणावे लागे. त्यांच्या कुटुंबात सगळी तरुण पुरुष मंडळी होती. या सर्व मुलांना विहिरीवर आंघोळ करण्याची रोजची सवय. आम्ही आमच्या खोलीबाहेर आलो , तरी सकाळ , दुपार , संध्याकाळ त्यांच्यापैकी कुणीतरी आंघोळ करताना नजरेस पडे. कळशी भरून पाणी काढायचे आणि धबाधब डोक्यावर ओतायचे. ते बघूनच माझ्या अंगावर शहारे यायचे. थंडीच्या दिवसातही ते थंड पाण्याची आंघोळ करत याची कमाल वाटे. मग गरगरीत साबण लावून तो जाईपर्यंत सात ते आठ कळश्यांचा त्यांच्या अंगावर महाअभिषेक होई. मी त्यानंतर थंड पाण्याची आंघोळ करण्याचा संकल्प करी , पण सकाळी गरम पाण्याची आंघोळ केल्यानंतर पुन्हा तोच संकल्प करत असे. 

          आता आंघोळीसाठी टब बाथ वगैरे पद्धती अस्तित्वात आल्या आहेत. माझी पाच वर्षांची लहान मुलगी मोठ्या प्लास्टिकच्या टबात आंघोळ करत असताना मला या '  ठंडे ठंडे पानी से नहाना चाहीये ' च्या आंघोळीविषयी सुचले. कारण तीसुद्धा आंघोळ करताना हेच गाणे मोठ्याने म्हणत या आंघोळीचा मनमुराद आनंद घेत होती. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )


तुलसी आर्ट : तुळशीदास अशितोष कुबलसर ( 9405218189 )

Thursday, May 27, 2021

दारावरचा न्हेल्यानी

 🐀 दारावरचा न्हेल्यानी


          आपण राहण्यासाठी एखाद्या शहरामध्ये भाड्याची खोली घेतो. त्यात आपल्याला राहायचे असते. घरातल्या कुटुंबासोबत काही नको असलेले सदस्य आपल्याबरोबर राहायला आलेले असतात. ते पूर्वीपासूनच राहत असतात , फक्त आता आपली त्यांना सोबत झालेली असते इतकेच. मी उंदीर , झुरळे , मुंग्या , कोळी यांच्याबद्दल बोलतोय हे तुमच्या एव्हाना लक्षात आले असेलच. अर्थात स्वतःचे घर असले म्हणून हे अनवॉन्टेड सोबती यायचे राहात नाहीत , ते कुठूनतरी येतातच. चांगल्या फ्लॅटमध्येही बेसिनच्या खाली झुरळांची ये- जा सुरू असतेच. स्वयंपाकघरातील त्यांचा वावर आपल्याला शिसारी आणणारा असतो. 

          मुंग्यांनीही बेजार करून सोडलेले असते. जिथे तिथे आपल्या घरात कोळी आपले घर बांधताना दिसतात. हे सगळे कीटक परवडले , पण उंदीर नको. तसे सगळेच कीटक उपद्रवीच असतात. पण उंदीर, चिचुंद्री यांचा उपद्रव अधिक जाणवतो. सीतेला कुटीत एकटी सोडून जाताना लक्ष्मणाने जशी ' लक्ष्मणरेषा ' आखलेली असते , तशी ' लक्ष्मणरेषा ' बाजारातून विकत आणून आपण त्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करतो. मग हे अनवॉन्टेड रावण सैरावैरा पळतात आणि त्यांना मारण्यासाठी आपण त्यांच्या मागून सैरावैरा पळतो. त्यांना काठीने मारताना चुकून एखादा घाव आपल्याच माणसांवर किंवा एखाद्या चांगल्या वस्तूंवर करायलाही आपण कमी करत नाही. आपल्यात त्यावेळी कमालीची वीरश्री संचारलेली असते. काही तर उगीचच धावत असतात. शेवटी सगळे हे प्राणी आपल्या आपल्या निवाऱ्यात काही काळ लॉकडाउनप्रमाणे जाऊन राहतात आणि औषधाचा असर संपला की पुन्हा त्यांचे अनलॉक झालेले असते. 

          आमच्या घरी या उंदरांना पळवून लावण्यासाठी ' पिंजरा ' आणून ठेवलेला असे. उंदरांनी खूपच उच्छाद मांडला होता. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे होते. लोखंडी पिंजऱ्यात जाण्यासाठी एक दरवाजा असे. त्यात प्रवेश केल्यानंतर पुन्हा बाहेर पडता येत नसे. रात्री आईने त्या पिंजऱ्याच्या दरवाजावर ' हिरवी कोथिंबीर ' लावून ठेवली होती. आम्ही सर्व भावंडांनी आपापली अंथरुणे घातली. नेहमीसारखे गाढ झोपी गेलो. बाबा पडल्यापडल्या घोरायला लागले. मीही त्यांच्या पोटात शिरून झोपलो. आई उशिरापर्यंत जागी असे. ती उद्याची तयारी करून ठेवत असे. तीही झोपली. आज तिला शांत झोप लागली असावी. सकाळी लवकर उठण्याची तिची सवय नव्हती. तिला माझे बाबा उठवत असत. बाबांची तयारी झाली की मग आई उठत असे. बाबांना गडबड असली तर कधीकधी ते आईला लवकर उठवून जेवणाची तयारी करायला सांगत. 

          पण का कोण जाणे , आज बाबांच्या अगोदर आई उठली होती. उठल्याउठल्या तिने काहीतरी पाहिले असावे. ते पाहताक्षणी ती मोठ्याने बोलली नव्हे ओरडलीच , " ओ , दारावरचा न्हेल्यानी " हे वाक्य ती मोठ्याने बोललीच. पण बाबांच्या कानाकडे जाऊन पुन्हा हळू आवाजात बोलली , " ओ , दारावरचा न्हेल्यानी " . बाबा तसेच घाबऱ्याघुबऱ्या उठले आणि बाहेरच्या दरवाजाकडे गेले. त्यांनी बाहेरच्या दरवाजाकडे ठेवलेल्या सर्व आपल्या वस्तू पडताळून पाहिल्या. सर्व वस्तू होत्या तश्याच होत्या. घरवालीने उगीचच काहीतरी सांगितले म्हणून तिला ते ओरडण्यासाठी वळले. आम्हीही आईच्या ओरडण्याने जागे झालो होतो. पण अंथरुणातून उठलो नव्हतो. पुन्हा आई ओरडली , " ओ , हकडे येवा , हेनी सगळा दारावरचा न्हेल्यानी " . तेव्हा बाबा स्वयंपाकघरात गेले तर तिथे पिंजऱ्यात एकही उंदीर नव्हता. पण पिंजऱ्याच्या दारावर ठेवलेली कोथिंबीर त्या उंदरांनी पळवली होती. एकही उंदीर त्या पिंजऱ्यात अडकला नव्हता. दारावर ठेवलेली कोथिंबीर पळवल्याबद्दल आई तसे म्हणत होती , " ओ , दारावरचा न्हेल्यानी ". 

          उंदीर एवढे हुशार झाले होते की त्यांना पिंजऱ्यात न सापडता खाऊ घेऊन जाता येत होता. त्यानंतर वेगवेगळे प्रकार करुन उंदरांना पकडण्याचे काम सुरूच राहिले. आजही ' दारावरचा न्हेल्यानी ' या वाक्याला आम्हाला पोट धरून हसू येते. तुम्हालाही हसू आले असेल तर तुम्हीही पोट धरुन हसू शकता. फक्त हसताना तुमचे पोट धरा म्हणजे झाले.


©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...