Saturday, May 10, 2025

🔴 आई : देवाजीची माया

🔴 आई : देवाजीची माया

          माझी आई... खरंच खूप ग्रेट होती ती! अतिशय संवेदनशील आणि मितभाषी. तिच्या डोळ्यांत आम्हाला आमचं संपूर्ण जग दिसत असे. ती जास्त बोलली नसली, तरी तिच्या चेहऱ्यावरच्या प्रत्येक भावावरून आम्ही तिच्या मनातलं अचूक ओळखायचो. आपल्या कुटुंबाने नेहमी आनंदात आणि सुख-समाधानात राहावं, हेच तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं. त्यासाठी ती स्वतःच्या जीवाचंही रान करायला तयार असायची. तिला स्वतःला काय हवं आहे, काय नको आहे, हे तिने कधीच स्वतःहून सांगितलं नाही.

          तिने नेहमी आपल्या पतीदेवांच्या म्हणजेच बाबांच्या मताचा आदर केला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार वागण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. कदाचित आम्ही कधी तिचा विचार केला नसेल, पण तिने मात्र आमच्या भल्याचाच नेहमी विचार केला. तिच्यामुळेच आज आम्ही चांगले घडलो आहोत. बाबांनी आम्हाला जगायची दिशा दाखवली, तर आईने आम्हाला खऱ्या अर्थाने जगवलं. 

          स्वतः उपाशी राहून तिने आमची पोटं भरली. तिच्या स्वयंपाकघरात कधीही कशाचीही कमतरता नसायची. तिने केलेली उसळ तर इतकी चविष्ट असायची की विचारू नका! तिच्या प्रत्येक जेवणात प्रेम ओतप्रोत भरलेलं असे. त्यामुळे तिच्या साध्या जेवणालाही एक वेगळीच गोडी यायची, जी फक्त तिलाच ठाऊक होती. 

          आम्ही सर्व भावंडं तिची लाडकी होतो.पण माझ्या छोट्या भावावर तिचं जरा जास्तच प्रेम होतं. तो तिच्याशिवाय क्षणभरही राहायचा नाही. त्याला चहात चपाती बुडवून भरवतानाची आईची प्रेमळ मूर्ती माझ्या डोळ्यासमोर अजूनही जशीच्या तशी उभी आहे. 

          माझा भाऊ बाबांना थोडा घाबरायचा, पण आई त्याची खास दोस्त होती. आई आता जिथे कुठे असेल, तिथून ती आम्हा सर्व भावंडांकडे नक्कीच लक्ष ठेवून असेल. 

          आज मातृदिन आहे म्हणून नाही, तर ती कायमच आमच्यासोबत असायला हवी होती, इतकं तिचं आमच्यावर निस्सीम प्रेम होतं. ती आमची लाडकी आई होती आणि म्हणतात ना, लाडक्या माणसांना देव लवकर घेऊन जातो... तसंच काहीसं झालं. 

          आमची आई आम्हाला कायमचं सोडून गेली. तिने कधी आमच्यावर राग काढला नाही, कधी रुसून बसली नाही. तिला आमच्याकडून काहीच नको होतं, फक्त आणि फक्त प्रेम!!!

©️ प्रवीण अशितोष कुबल



🔴 सुट्ट्यांतील पत्त्यांचे रंग

🔴 सुट्ट्यांतील पत्त्यांचे रंग

          सुट्टी म्हटलं की विविध बैठ्या खेळांची आठवण येते. आमच्याकडे बालपणी सापशिडी, कॅरम, बुद्धिबळ आणि पत्ते असे खेळ असत. आजही हे खेळ प्रत्येक घरात असणार आणि त्यात पत्त्यांचा खेळ तर विशेष लोकप्रिय असेल. काही घरात तर रात्र रात्र जागून पत्त्यांचे डाव रंगतात.

          मे महिन्यात मुंबईचे 'चाकरमानी' गावी परतताना सोबत पत्ते घेऊन येतात आणि मग संध्याकाळ झाली की रात्री जेवण होईपर्यंत 'पत्त्यांचा खेळ' रंगात येतो. आम्हांला पत्ते खेळायला शिकायला मिळालं ते श्रीधर सावंतांच्या घरी.     

          गांगोवाडीत आम्ही ज्या घरात भाड्याने राहत होतो, त्या घरातील सर्वजण 'पत्तेप्रेमी' होते. त्यामुळे नकळतच आमचंही पत्त्यांवर प्रेम जडलं. पत्ते खेळतांना त्यांनी आम्हांला काही 'जादू'च्या ट्रिक्ससुद्धा शिकविल्या, ज्या आजही लक्षात आहेत. ती जादू शिकवणारी माणसं तर मनात कायम घर करून राहिली आहेत.

          पत्त्यांमधील खेळांचा राजा म्हणजे 'मेंडी कोट'! गंमत म्हणजे मी त्याला पूर्वी 'मेंढी कोट' म्हणायचो. पत्त्यांमध्ये एकही मेंढी किंवा बकरी नसताना त्याला मेंडी कोट का म्हणतात, हे मला अजूनही कोडं आहे. आणि त्यात प्रत्यक्ष कोट नसतानाही आपल्याला 'कोट' लागतो! दहाला 'मेंडी' म्हणतात आणि अशा चार मेंड्या मिळाल्यावर प्रतिस्पर्ध्याला 'मेंडी कोट' बसतो. 

          आम्ही अनेकदा असे कोट मोठ्या खुशीने स्वीकारले आहेत, पण दुसऱ्यांना कोट चढवण्याइतका शहाणपणा अजूनही आमच्यात आलेला दिसत नाही! त्यावेळी राजा, राणी आणि गुलाम यांचे चित्र असलेले पत्ते डोळ्यासमोर नाचत असतात.

आमचे बाबा शिस्तीच्या बाबतीत खूप कठोर होते. त्यांना स्वतःला पत्त्यांचा खेळ आवडत असला तरी, आम्ही पत्ते खेळून बिघडून जाऊ नये म्हणून ते आम्हांला खेळू देत नसत. पण सुट्ट्या आल्या की त्यांचा नाइलाज होई आणि ते काही काळासाठी त्यांची शिस्त थोडी शिथिल करत. 

          आम्ही त्यांना पत्त्यांच्या जादू दाखवू लागलो की त्यांनाही त्यात गंमत वाटे. पण ही गंमत फार काळ टिकायची नाही. आम्ही दिवसभर पत्तेच खेळतोय हे कळल्यावर, कधीतरी तेच पत्ते चुलीत जळताना दिसत!

          आज आमच्या घरात मी एका बाजूला साऊथ इंडियन चित्रपट बघतोय आणि दुसऱ्या बाजूला मेंडीकोटचा खेळ रंगात आला आहे. मोठ्या मोठ्याने हास्याचे आवाज येत आहेत आणि एकमेकांना कोट चढवण्याची स्पर्धा सुरू आहे. तुमच्याही घरात सध्या असे 'कोट' सुरू आहेत का?

©️ प्रवीण अशितोष कुबल



🔴 आता थांबायचं नाय - शिक्षणाच्या ज्योतीचा वणवा

🔴 आता थांबायचं नाय - शिक्षणाच्या ज्योतीचा वणवा

          सत्य घटनेवर आधारित 'आता थांबायचं नाय' हा चित्रपट केवळ बघण्यापुरता नाही, तर तो प्रत्येक शिक्षकाने आत्मसात करण्यासारखा आणि शिकलेल्या-न शिकलेल्या प्रत्येकाने पुन्हा पुन्हा अनुभवावा असा आहे. यात दाखवलेला शिक्षक म्हणजे आजच्या शिक्षण व्यवस्थेची खरी गरज आहे. 

          विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची केवळ आवड नव्हे, तर एक धगधगता 'वणवा' पेटवण्याची क्षमता शिक्षकामध्ये हवी, हे हा चित्रपट प्रभावीपणे दाखवतो.

         या चित्रपटातील शिक्षकाने परिस्थितीपुढे हार मानलेली नाही. रात्रशाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमातून कसा सकारात्मक बदल घडवता येतो, याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. 

          एका ध्येयवेड्या शिक्षकाची तळमळ आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर होणारा खोलवर परिणाम चित्रपट पाहिल्याशिवाय पूर्णपणे समजणार नाही. याची कथा सांगून त्यातील उत्कंठा कमी करण्यात अर्थ नाही. क्लायमॅक्स तर चित्रपटगृहात डोळे पुसताना अनुभवायचा विषय आहे.

         खरं शिक्षण कशासाठी घ्यायचं असतं, हे तेव्हा कळतं जेव्हा शिक्षणामुळे समाजात आदर मिळतो, जगण्याची दिशा सापडते. अनेकजण मोठे होत असताना घरच्या जबाबदारीमुळे शिक्षणापासून दूर राहतात. मनात असूनही शिक्षण घेता येत नाही आणि मग 'सातवी नापास' किंवा 'आठवी नापास' असं सांगतानाही संकोच वाटतो. 

          स्वतःला शिक्षण घेता आलं नसलं तरी, आपल्या मुलांनी इंग्रजी माध्यमात शिकावं, चांगलं भविष्य घड़वावं, असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतं. मुलांच्या शिक्षणासाठी कर्जबाजारी होणाऱ्यांच्या व्यथा या चित्रपटात अत्यंत संवेदनशीलपणे मांडल्या आहेत. हा चित्रपट केवळ विद्यार्थ्यांबद्दल नाही, तर समाजात कचरा गोळा करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या जीवनावरही मार्मिक भाष्य करतो.

          आज 'नवसाक्षरता अभियान' मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि आपले अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिक यात सक्रियपणे सहभागी होत आहेत. साक्षर झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवण्यासारखा आहे. 

          एक शिक्षक म्हणून मला याचा आनंद आहेच, पण हा चित्रपट पाहिल्यानंतर तर माझी छाती अभिमानाने आणखी फुलून आली आहे. शिक्षकाने जर मनात आणलं, तर तो आपल्या विद्यार्थ्यांना असं घडवू शकतो की त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलते. हे आयुष्य बदलण्याचं व्रत प्रत्येक शिक्षकाने जपायला हवं.        

          कारण शिक्षक हा केवळ एक पेशा नाही, तो एक आदर्श आहे आणि मी त्याचा एक भाग आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.

©️ प्रवीण अशितोष कुबल



🔴 आप्पासाहेब पटवर्धन: कोकणचे गांधी - गोपुरीतील एका क्षणाची भेट

 🔴 आप्पासाहेब पटवर्धन: कोकणचे गांधी - गोपुरीतील एका क्षणाची भेट

          कणकवलीतील 'गोपुरी आश्रम' ही केवळ एक जागा नाही, तर परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन यांच्या त्याग आणि कार्याची साक्षीदार आहे. त्यांना 'कोकणचे गांधी' म्हणून ओळखले जाते आणि ते अगदी सार्थ आहे. त्यांच्या या आश्रमात अनेकदा जाण्याचा योग मला लाभला आहे. पूर्वी येथे गाई-गुरे आनंदाने चरत असत आणि म्हणूनच या पवित्र भूमीला 'गोपुरी' हे नाव पडले असावे, असे मला वाटते. आप्पासाहेबांनी सुरू केलेले अनेक लोककल्याणकारी उपक्रम आजही गोपुरीमध्ये पाहायला मिळतात.

          आज मी याच गोपुरीमध्ये एका शांत आणि शीतल अशा चिकूच्या झाडाखाली बसून हा लेख लिहित आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वसलेली ही गोपुरी नगरी अनेकांनी केवळ पुस्तकांमध्ये वाचली असेल. पण ज्या भूमीत प्रत्यक्ष 'आप्पा' राहिले, त्या पवित्र स्थळी काही क्षण घालवल्यास आणि त्यांच्या निष्पाप प्रतिमेकडे टक लावून पाहिल्यास, 'कोकणचे गांधी' आप्पासाहेब तुमच्याशी नक्कीच संवाद साधतील, असा अनुभव येतो. निसर्गाची ओढ असणारा प्रत्येक संवेदनशील माणूस या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळासमोर नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही.

          आप्पासाहेबांचा जन्म ४ नोव्हेंबर १८९४ रोजी झाला आणि त्यांचे देहावसान १० मार्च १९७१ रोजी झाले. त्यांच्या पुण्यस्मरणार्थ २२ मार्च १९७१ रोजी त्यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यानिमित्त उभारलेल्या स्मृतिफलकावर एक मार्मिक संदेश कोरलेला आहे: 'परि अवशेष तनुचे सारे, गाडावे तरुतळी, एकची इच्छा नच फेकावे पवित्र गंगाजळी'. त्यावेळी दिलेला हा उदात्त विचार आजही अनेकांना पूर्णपणे समजलेला दिसत नाही, याची खंत वाटते.

          आज योगायोगाने, मी माझ्या दुचाकीच्या दुरुस्तीसाठी जवळच्या शोरूममध्ये आलो होतो. ती दुरुस्त व्हायला बराच वेळ लागणार होता. वेळेचा सदुपयोग व्हावा आणि आप्पांच्या पवित्र भूमीत थोडा विसावा मिळावा म्हणून मी इथे आलो आणि या विचारांची लेखणीतून निर्मिती झाली.

लेखन: प्रवीण अशितोष कुबल



Sunday, April 27, 2025

🔴 'कुत्र्यांपासून सावधान'!

          आज सकाळी शाळेच्या वाटेवर नेहमीप्रमाणे कुत्र्यांचे दर्शन झाले आणि पुन्हा तोच विचार मनात घोळू लागला - या कुत्र्यांचे करायचे काय? सकाळी कुणी कुत्रा विव्हळताना ऐकला, की एक अनामिक भीती मनात घर करते, 'काही वाईट तर होणार नाही ना?' ही तीच भीती आहे, जी कदाचित हा अनुभव वाचणाऱ्या प्रत्येकाला जाणवली असेल.

          माझा अनुभव तर याहून वाईट आहे. कित्येकदा या कुत्र्यांनी मला दुचाकीवरून पाडले आहे. नशीब बलवत्तर म्हणून केवळ खरचटलो, हाडं-बिडं मोडली नाहीत. पण या कुत्र्यांना काही होत नाही, आपण त्यांना वाचवायला जातो तेव्हा मात्र आपले हात, पाय किंवा एखादे हाड नक्की मोडते. मग ते सांधेपर्यंत त्या कुत्र्याची आठवण येते, कारण आपल्याला बघायला आलेल्या प्रत्येकाला तो किस्सा सांगताना, त्या सुप्रसिद्ध कुत्र्याचा उल्लेख केल्याशिवाय पर्याय नसतो. सांगताना तर असे वाटते, जणू आपणच भुंकत आहोत!

          हे कुत्रेही कमालीचे असतात! आपल्याला हुलकावणी देतात आणि 'कसं फसवलं?' म्हणत भुंकत भुंकत अचानक गायब होतात. आपण मात्र कोण उठवतंय याची वाट बघत राहतो. 

          काही घरांच्या किंवा बागांच्या बाहेर लावलेली 'कुत्र्यांपासून सावधान' ही पाटी वाचली की आधीच धडकी भरते. मी तर जन्मजात कुत्राभित्रा! ( हा शब्द कुठल्याही शब्दकोशात तुम्हाला सापडणार नाही ) त्यामुळे ती पाटी दिसताच शक्यतोवर तो रस्ता टाळतो. मग नाइलाजाने जावे लागलेच, तर त्या कुत्र्याचे मालक त्याला साखळी बांधून पुढे येतात. पण त्यांच्या हातातून साखळी सुटली तर आपले काही खरे नाही, ही भीती घरी स्वस्थ बसू देत नाही.

          एकदा मी सकाळी लवकर शाळेत निघालो होतो. शासनाने शाळेची वेळ लवकर केल्यामुळे लवकर जावे लागते, हे त्या कुत्र्यांना काय माहीत असणार! ते तर रस्त्याला आपले साम्राज्य समजून आरामात पसरलेले असतात. मी माझ्याच विचारात चाललो होतो, पण समोर येऊन मलाच घाबरवणारा तो कुत्रा मात्र पूर्णपणे सावध होता. त्याने माझी तंद्री पुरती घालवली. त्याने माझ्या गाडीमागे धावायला सुरुवात केली आणि मग सुरू झाली जणू एक शर्यत! मी गाडीचा वेग वाढवला, त्यानेही त्याचा वेग वाढवला. 

          कुत्रा आणि माझ्यामध्ये जीवघेणी स्पर्धा लागली होती. माझ्या गाडीचा वेग खूप वाढला होता, कारण एकतर मला कुत्र्यांची भीती वाटते आणि त्यात हा माझ्या मागे लागला होता. शेवटी माझाच विजय झाला! त्या शर्यतीत मी पहिला आलो आणि तो बिचारा खूप मागे राहिल्यामुळे दुसरा आला.

          पण आता मात्र मला भीती वाटू लागली आहे. जर पुन्हा तो कुत्रा पहिल्या नंबरवर आला तर काय करायचे? म्हणून सगळ्यांना सांगतो, कुत्र्यांपासून सावधान राहा!

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🔴 मला सापाने गिळलं!!!

         मला सापाने गिळलं!!! 

मी तसा सरीसृप वर्गातील प्राण्यांना खूप घाबरतो. त्यात साप म्हटलं की माझी बोबडी वळते. शाळेत असताना माझ्या हातून काही साप मारले गेले, तेही केवळ भीतीमुळे. सरपटणाऱ्या प्राण्यांचा कधी धोका निर्माण होईल याचा नेम नसतो. त्यातल्या त्यात सापांबद्दलची भीती अधिकच गडद.

          कालच ऐकलं, आमच्या नाभिक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या कुशीत एक साप अगदी आरामात झोपला होता. ते महाशय गाढ झोपेत असल्यामुळे त्यांना काहीच समजलं नाही. जेव्हा जाग आली, तेव्हा उशीर झाला होता. तो एक छोटा अजगर होता आणि त्याला फक्त चावणं एवढंच माहीत होतं. त्याने आमच्या मित्राला चावा घेतला आणि मग शांत झाला. सुदैवाने तो साप बिनविषारी होता, नाहीतर अनर्थ झाला असता.

          खरं तर, साप उंदरांच्या शोधात बाहेर पडतात. पण जर त्यांना उंदीर नाही मिळाले, तर ते माणसांना चावायलाही कमी करत नाहीत, असं म्हणतात. मला मात्र साप पकडता येत नाही. मी सर्पमित्र नाही आणि म्हणूनच सापांपासून शक्य तितकं दूर राहतो.

          यावर्षी आमच्या शाळेत जून महिन्यापासून सापांचं येणं सुरू झालं होतं. पण आम्ही त्यांना शाळेमध्ये अजिबातच दाखल करुन घेतलं नाही. शेवटी, आमच्या धाडसी विद्यार्थ्यांनीच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. खरं सांगायचं तर, मला जेवढी सापांची भीती वाटते, तेवढी माझ्या विद्यार्थ्यांना नाही. म्हणूनच बहुतेक वेळा तेच पुढे होऊन या कामात मदत करतात. त्यामुळे मी थोडा निर्धास्त असतो. पावसाळ्यात तर हे विद्यार्थी आठवड्यातून एकदा तरी एखादा साप पकडून आणतात आणि त्याला त्याच्या घरी, म्हणजे निसर्गात सोडायला जातात. कधीकधी मात्र निसर्गात सोडणं शक्य नसेल, तर नाइलाजाने त्याला मारलं जाऊ शकतं. कारण त्याच्या चाव्यामुळे शाळेतल्या मुलांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. 

          लहानपणी आम्ही घरी सापशिडीचा खेळ खेळायचो. त्या खेळातल्या सापांना बघूनसुद्धा मला सुरुवातीला भीती वाटायची. पण ते खोटे साप आहेत आणि ते काहीही करत नाहीत हे समजल्यावर मात्र तो खेळ माझा आवडता झाला. आजही अनेक घरांमध्ये हा खेळ असेल का नाही साप जाणे. या खेळात सहा टिंबांची सोंगटी खूप महत्त्वाची असते. एकदा का सहा टिंब पडले की पुन्हा एक डाव खेळायला मिळतो. पण हे सहा टिंब पाडण्याचं कसब सगळ्यांनाच जमत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा त्या खेळातल्या सापाने मला ‘गिळलं’ आहे!

          आज सकाळी शाळेत जाताना माझ्या छोट्या मुलीने माझ्याकडून एक वचन घेतलं होतं. मीही तिला लगेच वचन देऊन टाकलं. ती म्हणाली, “पप्पा, तुम्ही शाळेतून आल्यावर माझ्यासोबत सापशिडी खेळायचे.” शाळेतून आल्यावर ती माझ्या मागेच लागली. मग काय, पुन्हा लहान होऊन तिच्यासोबत सापशिडी खेळायला बसलो. मला आश्चर्य वाटलं, तिला तर या खेळाचे सगळे नियम माझ्याही आधी माहीत होते! आणि ती सहा टिंबांची सोंगटी कशी टाकायची याच्यात तर चांगलीच तरबेज झाली होती. माझा मात्र प्रत्येक वेळी एकच टिंब पडत होता, आणि त्यामुळे ती मला हसून म्हणायची, “पप्पा, तुमचा एकच टिंब  कसा पडतो?” मी तिला म्हणालो, “अगं थांब, मी तुला आता सहा टिंब  पाडून दाखवतो.” पुन्हा सोंगटी टाकली, आणि काय आश्चर्य, पुन्हा एकच टिंब !

          खेळताना ती माझ्या पुढे गेली, पण तिला सापाने खाल्लं आणि ती पुन्हा खाली आली. थोडं पुढे गेल्यावर मला एका मोठ्या सापाने गिळलं!    

          आणि त्यानंतर मी इतका खाली आलो की लवकर वर पोहोचलोच नाही. मी मागेच राहिलो आणि ती मात्र पटापट पुढे सरकत शेवटच्या घरात पोहोचली. मला हरवल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. खरं सांगायचं तर, मला सापाने ‘गिळलं’ याचं मला मुळीच दुःख नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघण्यासाठी मला पुन्हा पुन्हा सापाने ‘गिळावं’ असं वाटत राहिलं!

          तुम्हाला काय वाटलं, खरंच मला सापाने गिळलं होतं ?

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🔴 अहो! मुंग्यांनी मजला पिछाडीले

          उष्णतेचा पारा वाढला की यांचा सुळसुळाट सुरू! जिथे जावं तिथे या टोळक्यांनी धुमाकूळ घातलेला असतो. जरा काही गोडधोड ठेवलं की नाही, हे सैन्य तिथं हजर! आणि चुकून जरी यांच्यावर हल्ला करण्याचा विचार केला, तर यांचा दंश काय असतो, हे तुम्हाला चांगलंच ठाऊक असेल!

          लहानपणी, आमच्या मातीच्या घरात ढेकणांनी असाच कहर केला होता. माझी आजी बिचारी, एक-एक ढेकण चिरडून त्यांची वस्ती साफ करायची. त्यामुळे अख्ख्या भिंतींवर रक्ताचे डाग दिसत होते, जणू कोणीतरी संकल्पचित्र रेखाटलं होतं! रात्री झोपलो की हे ढेकूण अवतरणार. एकदा का तुमच्या अंथरुणात घुसले, की तुमची खैर नाही! तुम्ही गाढ झोपेत असताना, हे रक्तपिपासू हळूच बाहेर पडायचे आणि तुमच्या शरीरात त्यांच्या चाव्यांचं इंजेक्शन टोचायला सुरुवात करायचे. मग काय विचारता? झोप तर पार उडून जायची!

          आता या मुंग्यांचंही तसंच झालंय. पण या ढेकणांसारख्या फक्त रात्रीच्या ड्युटीवर नसतात, यांचा तर चोवीस तास कार्यक्रम सुरू असतो! साखर दिसली की लपून बसायच्या, गुळाच्या डब्यात घुसून घर करायच्या, तुमच्या गोड पदार्थांवर ताव मारायचा, हा तर यांना जन्मसिद्ध हक्कच वाटतो!

          सकाळी कचरापेटी उघडून बघा, यांची अख्खी फौज अगदी इमानदारीने कामाला लागलेली दिसेल. आणि ती कचरापेटी उचलून नेणाऱ्याला यांचा एक-दोन चाव्यांचा 'प्रसाद' मिळाल्याशिवाय राहात नाही. बरं, जर तुम्ही डोक्याला तेल लावत नसाल, तर ठीक आहे. नाहीतर त्या तेलावर ताव मारण्यासाठीसुद्धा यांची हजेरी ठरलेली! एकदा मला याचा अनुभव आला आहे, म्हणून सांगतोय, सांभाळून राहा!

          आणि यांचे प्रकार तरी किती! लाल मुंग्या, बारीक मुंग्या, डोंगळे, वळंजू (हा माणसांचा नाही, मुंग्यांचा प्रकार!), धावऱ्या मुंग्या, काळ्या मुंग्या, विषारी मुंग्या, चावऱ्या मुंग्या... हे तर मी शोधलेले काही प्रकार! तुमचे अनुभव याहून वेगळे असू शकतात, कारण तुम्हाला या मुंग्यांनी किती छळले आहे, यावर ते अवलंबून आहे. असो, हे मुंगीपुराण काही संपणारं नाहीये!

          परवा होळीला बायकोने मस्त पुरणपोळ्या बनवल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्या शिळ्या पुरणपोळ्या आणखी चविष्ट लागतात म्हणून डबा उघडला, तर काय आश्चर्य! त्या लाल मुंग्या आधीच तिथे पोहोचून माझी वाट बघत बसल्या होत्या! मी जसा घास घ्यायला गेलो, तशा त्यांनी माझ्या तोंडाचे लचके तोडले! एवढ्या चांगल्या पुरणपोळ्या मला त्यांनी शांतपणे खाऊ दिल्या तर शपथ! तुमचा तरी काय वेगळा अनुभव असेल, असं मला नाही वाटत!

©️ प्रवीण अशितोष कुबल सर



🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...