मला सापाने गिळलं!!!
मी तसा सरीसृप वर्गातील प्राण्यांना खूप घाबरतो. त्यात साप म्हटलं की माझी बोबडी वळते. शाळेत असताना माझ्या हातून काही साप मारले गेले, तेही केवळ भीतीमुळे. सरपटणाऱ्या प्राण्यांचा कधी धोका निर्माण होईल याचा नेम नसतो. त्यातल्या त्यात सापांबद्दलची भीती अधिकच गडद.
कालच ऐकलं, आमच्या नाभिक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या कुशीत एक साप अगदी आरामात झोपला होता. ते महाशय गाढ झोपेत असल्यामुळे त्यांना काहीच समजलं नाही. जेव्हा जाग आली, तेव्हा उशीर झाला होता. तो एक छोटा अजगर होता आणि त्याला फक्त चावणं एवढंच माहीत होतं. त्याने आमच्या मित्राला चावा घेतला आणि मग शांत झाला. सुदैवाने तो साप बिनविषारी होता, नाहीतर अनर्थ झाला असता.
खरं तर, साप उंदरांच्या शोधात बाहेर पडतात. पण जर त्यांना उंदीर नाही मिळाले, तर ते माणसांना चावायलाही कमी करत नाहीत, असं म्हणतात. मला मात्र साप पकडता येत नाही. मी सर्पमित्र नाही आणि म्हणूनच सापांपासून शक्य तितकं दूर राहतो.
यावर्षी आमच्या शाळेत जून महिन्यापासून सापांचं येणं सुरू झालं होतं. पण आम्ही त्यांना शाळेमध्ये अजिबातच दाखल करुन घेतलं नाही. शेवटी, आमच्या धाडसी विद्यार्थ्यांनीच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. खरं सांगायचं तर, मला जेवढी सापांची भीती वाटते, तेवढी माझ्या विद्यार्थ्यांना नाही. म्हणूनच बहुतेक वेळा तेच पुढे होऊन या कामात मदत करतात. त्यामुळे मी थोडा निर्धास्त असतो. पावसाळ्यात तर हे विद्यार्थी आठवड्यातून एकदा तरी एखादा साप पकडून आणतात आणि त्याला त्याच्या घरी, म्हणजे निसर्गात सोडायला जातात. कधीकधी मात्र निसर्गात सोडणं शक्य नसेल, तर नाइलाजाने त्याला मारलं जाऊ शकतं. कारण त्याच्या चाव्यामुळे शाळेतल्या मुलांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो.
लहानपणी आम्ही घरी सापशिडीचा खेळ खेळायचो. त्या खेळातल्या सापांना बघूनसुद्धा मला सुरुवातीला भीती वाटायची. पण ते खोटे साप आहेत आणि ते काहीही करत नाहीत हे समजल्यावर मात्र तो खेळ माझा आवडता झाला. आजही अनेक घरांमध्ये हा खेळ असेल का नाही साप जाणे. या खेळात सहा टिंबांची सोंगटी खूप महत्त्वाची असते. एकदा का सहा टिंब पडले की पुन्हा एक डाव खेळायला मिळतो. पण हे सहा टिंब पाडण्याचं कसब सगळ्यांनाच जमत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा त्या खेळातल्या सापाने मला ‘गिळलं’ आहे!
आज सकाळी शाळेत जाताना माझ्या छोट्या मुलीने माझ्याकडून एक वचन घेतलं होतं. मीही तिला लगेच वचन देऊन टाकलं. ती म्हणाली, “पप्पा, तुम्ही शाळेतून आल्यावर माझ्यासोबत सापशिडी खेळायचे.” शाळेतून आल्यावर ती माझ्या मागेच लागली. मग काय, पुन्हा लहान होऊन तिच्यासोबत सापशिडी खेळायला बसलो. मला आश्चर्य वाटलं, तिला तर या खेळाचे सगळे नियम माझ्याही आधी माहीत होते! आणि ती सहा टिंबांची सोंगटी कशी टाकायची याच्यात तर चांगलीच तरबेज झाली होती. माझा मात्र प्रत्येक वेळी एकच टिंब पडत होता, आणि त्यामुळे ती मला हसून म्हणायची, “पप्पा, तुमचा एकच टिंब कसा पडतो?” मी तिला म्हणालो, “अगं थांब, मी तुला आता सहा टिंब पाडून दाखवतो.” पुन्हा सोंगटी टाकली, आणि काय आश्चर्य, पुन्हा एकच टिंब !
खेळताना ती माझ्या पुढे गेली, पण तिला सापाने खाल्लं आणि ती पुन्हा खाली आली. थोडं पुढे गेल्यावर मला एका मोठ्या सापाने गिळलं!
आणि त्यानंतर मी इतका खाली आलो की लवकर वर पोहोचलोच नाही. मी मागेच राहिलो आणि ती मात्र पटापट पुढे सरकत शेवटच्या घरात पोहोचली. मला हरवल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. खरं सांगायचं तर, मला सापाने ‘गिळलं’ याचं मला मुळीच दुःख नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघण्यासाठी मला पुन्हा पुन्हा सापाने ‘गिळावं’ असं वाटत राहिलं!
तुम्हाला काय वाटलं, खरंच मला सापाने गिळलं होतं ?
©️ प्रवीण अशितोष कुबलसर

No comments:
Post a Comment