Thursday, June 2, 2022

🛑 तातू

🛑 तातू

          काही असे मित्र लाभणे म्हणजे भाग्यच म्हणायला हवे. त्यांनी दिलेली प्रेमळ साथ नेहमीच स्मरणात राहणारी असते. त्यांच्यासोबत काही क्षण अनुभवताना त्या क्षणांचे सोनेरी क्षण कधी झाले समजलेच नाही. 

          त्याची आणि माझी भेट एका परीक्षेच्या वेळी रत्नागिरीत झाली. त्याचे नाव रामचंद्र कुबल. त्याचे आणि माझे आडनाव सारखे असल्याने मागच्या बेंचवर त्याचा नंबर आला. तो पेपर कोकण निवड मंडळाचा होता. मी गणितचा बराच अभ्यास केला होता. मी भराभर पेपर सोडवत चाललो होतो. त्याच्याकडे माझे लक्षच नव्हते. त्याने मात्र माझी खास ओळख करुन घेतली होती. तो गोष्टीवेल्हाळ स्वभावाचा असल्याने माझेही त्याच्याशी काहीसे जमले. 

          पेपर सुटल्यानंतरही तो मला मुद्दाम हाक मारुन ' ओळख ठेव रे प्रवीण ' असे बोलून निघून गेला होता. मी त्यावेळी रत्नागिरी प्राथमिक शाळेत नोकरी करत होतो. मला चांगली नोकरी मिळाली होती , तरी मी खुश नव्हतो. मला जिल्हा परिषदेत काम करायचे होते. शेवटी रत्नागिरी जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक नेमणुकीची ऑर्डर आलीच. एक नोकरी सोडून दुसरी पकडायला जाताना त्रास होत होता. 

          वाटेत भेटलेल्या मित्रांनी हा त्रास कमी केला होता. माझ्याबरोबर माझे अनेक मित्र आणि मैत्रिणी रत्नागिरीत नोकरीला लागले होते. पुन्हा मला गाडीत येता जाता अनेकदा रामचंद्र कुबल भेटला. त्याचं बोलणं विलक्षण आकर्षित करणारे होते. त्याच्याभोवती मित्र मैत्रिणींचा गराडा असे. तो सर्वांशी हसतखेळत बोलत असताना पाहून मला त्याचा खरंच हेवा वाटे. त्याने मलाही त्याच्या मित्रांशी आणि मैत्रिणींशी ओळख करुन दिली होती. त्याचे मित्रमैत्रिणी मला ओळखतात हे माझ्यासाठी नवीन होते. मी फारसा बोलका नव्हतोच. रामचंद्राला सगळे ' तातू ' या नावाने हाक मारत. मीही कधीतरी त्याला ' तातू ' या नावाने हाक मारत असतो. तातू या शब्दाचा फुलफॉर्म ' तारक तुमचा ' असा असावा. कारण तातू हे नाव त्याच्यासाठी या अर्थाने सार्थ ठरते. 

          दर शनिवारी किंवा रविवारी त्याची नियमित भेट होत राहिली. खेड या एकाच तालुक्यात नोकरीला असल्याने त्याची सुसंगती सदा घडत गेली. त्याची सुजन वाक्ये कानी पडत होती. तो जेवण उत्तम बनवतो हे समजले होते. त्याच्याकडे एकदा किंवा दोनदा जाण्याचे भाग्य लाभले. त्याने केलेले कांदेपोहे चटकदार होते. तो ते करत असताना पाककृती सांगत राहिला होता. त्यामुळे मीही एकदा तसे करण्याचा प्रयत्न करुन बघितला होता. पण त्याच्या पोह्यांची चव त्यांना आली नव्हती. दुपारच्या भोजनात त्याने केलेले चिकन अप्रतिम चविष्ट होते. तो कवी , लेखक , नर्तक , कथाकार , दिग्दर्शक , आदर्श शिक्षक आणि एक आदर्श मित्र म्हणून मला जास्त भावत गेला होता. तो कधी कोणावर रागावत असेल असे सहसा वाटत नाही. त्याच्या दिसत असणाऱ्या व्यक्तिमत्वापेक्षा त्याच्यातील सुप्त गुण अधिक दिसून येतात. तो नेहमीच ध्येयवादी राहिला आहे. त्याने एकदा ठरवले की ते तो तडीस नेल्याशिवाय राहत नाही. त्याचे सूत्रसंचालन श्रवणीय असते. 

          माझे लग्न ठरले. तातू लग्नाला आला होता. माझी पत्नी त्याची वर्गमैत्रिण होती. ती त्याला मित्रापेक्षा भाऊच जास्त मानत होती. तो आपल्या सर्व माणसांची जिवापाड काळजी घेत असतो. आता तो मला अनेकदा रस्त्यात भेटतो. तोही घाईत आणि मीही घाईत. एखादया मिनिटांचा संवाद असेल , पण त्यात प्रेमाचा सुवास भरलेला असतो. तो माझ्या मित्रपरिवारातील राम आहे , त्यांच्यासारखे मित्र माझ्या जीवनात आहेत म्हणून माझ्या जीवनात राम आहे.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )

🛑 माझी जलसफर

 🛑 माझी जलसफर


          लहानपणापासून मला पाण्याची भीती खूपच वाटत आली आहे. पाणी पितानाही अनेकदा माझ्या नाकातून आलेले होते. अर्थात मी पाणी तोंडावाटे पित होतो , पण नेहमी घाई नडायची. गडबडीत पाणी पिऊ नये हेच खरे. तोंड आकाशाच्या दिशेने उघडून त्यात पाणी भरल्यानंतर मला अनेकदा असा अनुभव आला आहे. पाणी तोंडातून घटाघटा आत पोहोचत असे. मध्येच ते नाकातून बाहेर पडताना मोठा ठसका लागे. 

          पाणी पिताना ही हालत होती. त्यामुळे पाण्यात सफर करताना त्याहीपेक्षा जास्त अनुभव आले होते. आम्हाला गावाकडे जाताना नदी ओलांडूनच जावे लागे. 

          माझा गाव किर्लोस आंबवणेवाडी. नदीच्या पल्याड आमचे मातीचे घर होते. आमचे घर शेत शिवार संपलं की पहिलंच होतं. आमची नदी पाऊस सुरु झाल्यानंतर पंधरा वीस दिवसांतच दुथडी भरुन वाहू लागते. तिच्या पाण्याचा प्रवाह गतिमान असतो. त्या प्रवाहाला तोडून पलिकडे जायचे म्हणजे एक दिव्यच होते. 

          अर्थात नदीकिनारी आमचा एक होडीवाला आम्हाला पलिकडे सुखरुप नेऊन सोडत असे. आम्ही त्यांना ' होडीवाले काका ' म्हणत असू. ते होडी बिनधास्त हाकत. मोठी माणसे त्यांना ' विठोबा ' नावाने प्रेमाची हाक मारत. 

          आम्ही पलिकडे नदीकिनारी आलो होतो. नदी वेगाने वाहत होती. मधेच एखादा लाकडाचा ओंडका जोरात वाहून जाताना दिसत होता. ती आपल्या पोटातून आणखी काय काय वाहून नेत होती तीच जाणे !! किनाऱ्यावर नदीचे पाणी जोरात आदळताना पाहून भीती वाटत होती.  आम्ही त्या रौद्ररूप धारण केलेल्या नदीच्या पलिकडे जाण्याची घाई करत होतो. पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. डोक्यावर धरलेली छत्री चार पाच वेळा उलटी होऊन पुन्हा सरळ झाली होती. 

          बाबांनी आणि काकांनी मोठ्यांदा कुकारे मारायला सुरुवात केली होती. होडीवाला कुकारे ऐकून होडी घेऊन येणार होता. बाबांना आणि काकांना व्यवस्थित कुकारे घालता येत. माझ्या कुकाऱ्यांचा आवाज ऐकू येतच नव्हता. 

          पलीकडील झोपडीतून कसलीशी हालचाल झाली होती. ते आमचे होडीवाले काका होते. एवढया  भयंकर नदीतून त्यांनी न घाबरता होडी घातली होती. पावसाचे पाणी होडीत साचले होते. काकांनी ते बाहेर काढले होते. काकांनी अतिशय कौशल्याने वल्हे मारत होडी आमच्या दिशेला हाकली होती. ते होडी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चढवत पुढे पुढे येत होते. नदीच्या मध्यभागी येताच होडी वाहून प्रवाहाबरोबर खालच्या दिशेने वेगात येत होती. काका पुन्हा वल्हे बदलून कधी उजवीकडे तर कधी डावीकडे वल्हे मारत लवकरच आमच्यापर्यंत येऊन पोहोचले होते. 

          होडी एकदम किनाऱ्यावर येऊ शकत नव्हती. त्यामुळे थोडे पाण्यात जाऊन आम्हाला होडीत बसावे लागले होते. आम्ही सर्व सात आठजण होडीत बसलो होतो. काकांनी होडी हाकायला पुन्हा सुरुवात केली होती. आमची जलसफर सुरु झाली होती. होडी पाण्यात हिंदोळे देत होती. आमची घाबरगुंडी उडाली होती. वारा थांबता थांबत नव्हता. पावसाचा जोर होताच. माझ्या भाईकाकांनी दुसऱ्या बाजूने वल्हा मारायला सुरुवात केली होती. आता पुन्हा एकदा होडी वरच्या दिशेला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला हाकणे नेटाने सुरु झाले होते. 

          होडीला कुठेतरी बारीकसे छिद्र होते. त्यातून पाणी येत होते. पावसाचे पाणी होडीत येत होतेच. बाबांनी होडीतले पाणी बाहेर ओतायला सुरुवात केली होती. आता होडी प्रवाहाच्या दिशेने वेगाने वाहायला लागली होती. होडीवाले काका थोडेसे घाबरलेले दिसले. त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला दिसत होता. होडी काही केल्या थांबता थांबत नव्हती. माझे काका जिवाच्या आकांताने वल्हे मारतच होते. होडी खूपच पुढे जाऊन एका झाडाच्या पाळाला जाऊन थबकली होती. आता किनारा जवळ होता. पण चारी बाजूला खोलवर पाणी होते. कोणीही होडीतून उतरु शकत नव्हते. शेवटी होडीवाले काकांनी जोरात वल्हे मारुन होडी किनाऱ्याला लावलीच. एवढया पावसातही त्यांच्या अंगातून थबाथब घाम ओथंबत होता. सर्वांचा जीव वाचल्याबद्दल आम्ही सर्वांनीच आमच्या कोसमीवाल्या महापुरुष देवाचे आभार मानले होते. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )

🛑 हायकोटायो

 🛑 हायकोटायो


          आपल्याला किती माणसं भेटत राहतात आयुष्यात ? त्यांचं जगणं बघत असताना त्यांचे कित्येक गुण आपणही नकळत आत्मसात करत असतो हे आपल्याला माहिती नसते. ह्या माणसांमध्ये एक वेगळंच चैतन्य भरुन राहिलेलं असतं. ते त्यांच्या नेहमीच्या वागण्या बोलण्यातून लक्षात येत राहतं. त्यांच्या भारदस्तपणाचं दडपण देखील आपल्यावर येत राहतं. दडपण म्हणजे अधिकची आदरयुक्त भीती असते. या माणसांशी बोलतानाही सतत भीती वाटत राहते. त्यांच्या बरोबर बोलताना कोणते शब्द वापरावेत याचाही खूपच विचार करावा लागतो. असंच एक धीरगंभीर अभिनयाची कार्यशाळा असलेलं व्यक्तिमत्त्व खूप जवळून पाहता आलं याचाही मला आनंद वाटतो. 

          उत्कृष्ट नाटकं करणं ही त्यांची खासियत म्हणायला हवी. त्यांची आवाजाची फेक मी खूप पूर्वीपासून अनुभवली आहे. त्यांच्या शब्द उच्चारांमुळे निर्जीव शब्दांना सजीवपणा प्राप्त होतो. हे सगळं वर्णन एखादया कसलेल्या अभिनेत्याचे असू शकते हे कोणीही मान्य करेल. हो , मी एका अभिनेत्याबद्दलच सांगतोय. त्यांचं नाव आहे सुहास वरूणकर. 

          एसटीत लिपिक म्हणून काम करताना त्यांच्यातील नाटककार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी प्रत्येक गॅदरिंगमध्ये प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवलं होतं. यांचे कार्यक्रम शेवटी ठेवले जात. त्यांचा परफॉर्मन्स बघितल्याशिवाय कॉलेज कुमार आणि कुमारीही जागा सोडत नसत. 

          मी त्यावेळी आठवी , नववीत शिकत असेन. माझी मोठी ताई कणकवली कॉलेजमध्ये शिकत होती. मी तिच्याबरोबर गॅदरिंग बघायला गेलो होतो. त्यावेळच्या कॉलेज जीवनातील विविध गमतीजमती मला बघायला मिळत होत्या. सुहास वरुणकर यांचा रंगमंचावर प्रवेश झाला होता. सगळी मुले त्यांच्या प्रवेशालाच टाळ्या आणि शिट्ट्या देऊ लागली होती. मी फक्त टाळ्या वाजवत होतो. मी शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न केला होता. पण फक्त हवाच बाहेर पडली होती , आवाज आलाच नव्हता. अजूनही माझे तसेच होते , त्यामुळे मी कधी शिट्टी वाजवण्याच्या फंदात पडत नाही. 

          वरुणकरांच्या दोन्ही हातात एक काठी होती. ती त्यांनी आडवी पकडली होती. पोटावर धरुन ते चालत होते. चालता चालता ते कोणते तरी गाणे म्हणत होते. ते जे म्हणत होते त्याचा मला त्यावेळीही अर्थ लागलेला नव्हता आणि आताही लागलेला नाही.  ते म्हणत होते , " हायकोटायो नादे खोटा , हायकोटायो नादे खोटा ". याचा अर्थ त्यांना लक्षात असू शकतो. 

          हे सुहास वरुणकर आमचे सलूनचे कस्टमर. मीही त्यांचे एकदोनदा केस कापले आणि रंगवलेही आहेत. त्यांचे केस कापणे ही सोपी गोष्ट नसते. ते सांगतील तेवढेच केस आपल्याला कापायचे असतात. त्यात जरा जरी कसूर झाली , तर कापणाऱ्याचे काही खरे नसते. बाबांना त्यांच्या केसाचे तंत्र माहिती होतं. त्यांनी कापलेल्या केसात सुहासजी खूप कमीवेळा त्रुटी काढत. एक मोठा अभिनेता आमच्या दुकानात येऊन केस कापून जातोय याचा आम्हाला अभिमान वाटे. ते कायम घाईत प्रवेश करत आणि आपले केस कापून निघून जात. जणू ते रंगमंचावर इन्ट्री करुन गेल्यासारखे वाटत. 

          एकदा मी त्यांच्या जुन्या घरी सहजच गेलो होतो. त्यावेळी ते कोणाचीतरी रिक्षाची सीट बनवून देण्यात मग्न होते. फावल्या वेळेत ते हे काम करीत. 

          नाथ पै एकांकिका , यंगस्टार मित्रमंडळ , अक्षरसिंधु कलामंच , कामगार कल्याण केंद्र , बागेश्री थिएटर आणि एसटीकडून होणाऱ्या अनेक एकांकिका स्पर्धा त्यांनी गाजवल्या. त्यांच्या अभिनयाची एक वेगळीच क्रेझ असते. ' तन माजोरी ' या नाटकात त्यांनी केलेले काम सहकलाकारांसाठी कायमच लक्षात राहणारे असेल. ' किरवंत , आमुषा ' अशा अनेक वेगळा संदेश देणाऱ्या नाटकांचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. अभिनय करता करता त्यांनी दिग्दर्शनाला सुरुवात केली. त्यांनी कित्येक नाटके , एकांकिका बसवल्या असतील. त्यांनी सादर केलेल्या नाटकांना नेहमीच राज्यस्तरावर गौरविण्यात आलेले आहे. 

          आता तर ते यु ट्यूबवर अनेक विनोदी प्रहसनांसाठी प्रसिद्ध झालेले आहेत. कणकवलीत नाट्यक्षेत्राशी निगडित असलेल्या अभिनेत्यांमध्ये त्यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. 

          नाटकासाठी एकदा त्यांना मिशी आणि केस पूर्ण काढावे लागले होते. त्यांची परमप्रिय मिशी त्यांनी काढली होती. त्यांना तसे ओळखताही येत नव्हते. नाट्यप्रकारासाठी वाहून घेतलेल्या या कलावंतांबरोबर मलाही काही क्षण जगता आले हेही माझे नाट्यमय भाग्यच. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )

🛑 निकिता ठाकूर : समितीचा अस्मितांकुर

 🛑 निकिता ठाकूर : समितीचा अस्मितांकुर

          काही माणसे खूप कमी काळात आपला प्रभाव दाखवतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी असण्याची गरज नसते. अशा व्यक्ती जातील तेथील माहोल प्रभावी बनवण्याची क्षमता बाळगतात. जसा माहोल बनत जाईल , तसा त्यांच्यातील प्रभाव हळूहळू जाणवू लागतो. माणसं एकत्र करण्याची कला अशा माणसांमध्ये प्रकर्षाने जाणवते. ही माणसं कधीच कोणाला नकोशी होत नाहीत. प्रतिभावंत व्यक्तिंच्या समुदायातही अशा व्यक्ती विशेष उठून दिसतात. 

          कणकवली तालुक्यात आल्यानंतर समितीच्या सभांना उपस्थित राहिल्यानंतर निकिता ठाकूर आणि त्यांच्या महिला आघाडीचे शैक्षणिक , सामाजिक कार्य पाहून अनेकदा मी थक्क झालो आहे. जास्त न बोलता त्या त्यांच्या कामातूनच बोलत असतात. निकिता ठाकूर नावाच्या महिला अध्यक्षा म्हणूनच समितीच्या अस्मितेचा अंकूर ठरतात. 

          अगदी साध्या सरळ. त्यांचं वागणं , राहणं सर्वसामान्यांसारखं. त्यांच्याकडे बघून कुणालाही वाटणार नाही की या एका शिक्षक संघटनेच्या उच्च पदावर आहेत. त्या कणकवली तालुक्याच्या तालुकाध्यक्षा झाल्या आणि त्यांच्या कार्याला समितीने प्रत्यक्ष पाहिले. अर्थात तालुकाध्यक्षा असल्या तरी त्या एकट्या कार्य करीत नाहीत , सर्वांना घेऊन काम करणे त्यांना आवडते. त्या सतत हसतमुख असतात. त्यांचे दिलखुलास हसणे कदाचित त्यांच्या यशाचे रहस्य असू शकते. 

          तालुका महिला मेळाव्यात त्या भाषण करायला उभ्या राहिल्या होत्या. मी समोर व्हिडीओ शुटींग करत होतो. त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली होती. त्यांनी आपले अध्यक्षीय भाषण अक्षरशः गाजवले होते. त्यांच्या अनेक वाक्यांना टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता. त्या आल्या होत्या , त्या बोलू लागल्या होत्या आणि त्यांनी सर्वांना जिंकूनही घेतलं होतं. जेवणाची वेळ निघून गेली असली तरी त्यांचं भाषण सुरु असताना कोणतीही गडबड नव्हती. त्यांनी सर्व उपक्रम , संघटनात्मक कार्य यांवर मुद्देसूद बोलत यशस्वी बॅटिंग केली होती. या सर्व कार्याचं श्रेय त्यांनी आपल्या संपूर्ण टीमलाच दिलं होतं. नेहा निकिता असा उल्लेख करत त्यांनी आपलं भाषण एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. 

          शिक्षिका म्हणून त्यांचं शाळेतील काम बघण्याची संधी मला मिळाली नाही. पण संघटनेत एवढे हिरीरीने काम करताना पाहून त्यांचे शाळेतील काम किती जबरदस्त असेल याची कल्पना येते. त्यांचा आवाज श्रवणीय आहे. त्यांनी गायलेली कविता मी नीट ऐकली आहे. महिला आघाडीचे शैक्षणिक उपक्रम राबवताना त्यांनी केलेली व्हिडीओ निर्मिती एखाद्या तंत्रस्नेही व्यक्तीलाही लाजवेल अशी आहे. दुसऱ्या व्यक्तीकडून एखादं काम कसे करुन घ्यावे हे त्यांच्याकडून शिकावे. व्हिडीओ निर्माण करताना त्यातील बारीकसारीक गोष्टींची त्यांना परिपूर्ण माहिती आहे. 

          निकिता ठाकूर यांनी आपल्या समितीच्या अस्मितेचा अंकुर प्रत्येक महिलांच्या मनात रुजविण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यांची शिक्षक समितीच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड व्हावी ही आमच्या महिला आघाडीची नव्हे तर समस्त कणकवली शाखेसाठी अस्मितेची बाब आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा अधिकाधिक वृद्धिंगत करत शिक्षक समितीच्या महिला आघाडीचा बोलबाला महाराष्ट्रातच नव्हे देशात वाढवत न्यावा अशा त्यांना आभाळ भरुन शुभेच्छा. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



🛑 स्काऊटिंग : एक अनुभवसंपन्न आऊटिंग

 🛑 स्काऊटिंग : एक अनुभवसंपन्न आऊटिंग


          शिक्षकी पेशामध्ये अनेक प्रशिक्षणे पूर्ण करावी लागतात. प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज असते. शिक्षणातील नवनवीन प्रवाह आणि बदल समजून घेतल्याने नव्या दृष्टीकोनाने शिकवता येते. रोज काहीतरी नवीन शिकता आलं पाहिजे. रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते , " शिक्षक निरंतर अध्ययनशील असल्याशिवाय तो विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही. " 

          मला स्काऊटचे प्रगत प्रशिक्षण घ्यायचे होते. मी स्वतःहून प्रशिक्षणाची मागणी केली होती. ऑर्डर आली होती. पुण्यातील भोर आणि कोल्हापूरातील सोनतळी अशी दोन प्रशिक्षण स्थळे होती. मी सोनतळी येथे जाणे पसंत केले होते. 

          ४ मे ते १० मे असे सात दिवसांचे निवासी शिबीर होते. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण असल्यामुळे मुलांचे नुकसान होणार नव्हते ही माझ्या दृष्टीने चांगलीच गोष्ट होती. 

          ४ मे हा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत वाईट दिवस होता. त्या दिवशी पंधरा वर्षापूर्वी माझी पत्नी मला कायमची सोडून गेली होती. गेल्या पंधरा वर्षात मला कायमच हा दिवस असह्य होणारा असतो , तसा तो मला आजही अस्वस्थ करत होता. तरीही मी माझ्या अस्वस्थतेकडे काहीसे दुर्लक्ष करीत होतो. 

          राधानगरीमार्गे गाडीत बसून निघालो होतो. सोबत एक मोठी आणि एक छोटी अशा दोन बॅगा होत्या. रंकाळा येथे उतरलो होतो. मस्त गरमागरम चहा घेतला होता. तिथूनच चक्क दोनशे रुपये देऊन रिक्षानेच सोनतळी येथे पोहोचलो होतो. 

          प्रशिक्षण स्थळ म्हणजे " राजर्षी छत्रपती शाहू महाराज " यांचे वास्तव्य असलेला बंगलाच होता. तेथील निसर्गरम्य वातावरण पाहून येणारे प्रत्येक नवखे चेहरे भारावून जाताना दिसत होते. 

          मी स्काऊट प्रगत प्रशिक्षण घ्यायला गेलो असलो तरी ते तिथे उपलब्ध नव्हते. त्यामुळे मला कबमास्टरचे प्रगत प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पर्याय सुचविण्यात आला होता. मी तो मान्य केला होता. नोंदणी करुन झाली होती. 

          मी पत्नीने दिलेला भोजन डबा उघडून खाऊन घेतला होता. भूक लागली होती. आता जरा बरे वाटत होते. हळूहळू सूचना मिळू लागल्या होत्या. प्रशिक्षण प्रमुख आणि संचालक यांनी सात दिवसांचे वेळापत्रक नीट समजावून सांगितले होते. 

          पहाटे ४ वाजता उठून दिवसाची सुरुवात होत होती. इतक्या लवकर उठल्यावर आंघोळीसाठी नंबर लागत असे. फ्रेश होईपर्यंत कर्णमधुर भक्तिसंगीत ऐकायला मिळे. ५.२५ वा. रामधून सुरु होई. टाळ्यांचा ठेका धरत मंत्रमुग्ध होत प्रत्येकाच्या मुखातून अभंगवाणी बाहेर पडे. वातावरण प्रसन्न होऊन जाई. 

          त्यानंतर आपल्या तंबूची सजावट करण्याचे टास्क दिलेले असे. ते करताना आपल्या संकल्पना प्रत्यक्षात उतरताना दिसत. टोटम पोल , षटकाचे नाव , प्रशिक्षणार्थी , किल्ला , सुका कचरा , ओला कचरा , शोषखड्डा , तंबूची स्वछता , परिपूर्ण गणवेश , तंबूसाठी प्रवेशद्वार , मोगलीची गोष्ट , चप्पल स्टँड , वस्तू ठेवण्यासाठी मांडणी , गाठींचे प्रकार , रांगोळी , पताका , ले आऊट , तंबूची ओढणी इत्यादी अनेक गोष्टींची मुद्देसूद व काटेकोर पाहणी केली जात होती. अर्थात त्यासाठी लवकर उठण्याशिवाय पर्यायच नसे. 

          बी पी सिक्स चे सहा व्यायाम प्रकार शिकवण्यात आले. प्राणायाम , अनुलोम विलोम आणि योगासने शिकविण्यात आली होती. प्रत्येक बाबींवर पुरेसा वेळ देऊन सराव घेण्यात आला होता. वैयक्तिक लक्ष देऊन सुधारणा करण्यात आली होती. 

          चहा , नाश्ता रांगेत घ्यावा लागत होता. स्वतःची भांडी स्वतः घासावी लागत होती. हे सगळे निसर्गाच्या सानिध्यात घडवले जात होते. प्रत्येक सेशन वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जात होते. वहीवर लिहिण्यासाठी घटक देण्यात आले होते. कोणत्या पानावर काय लिहावे हेही सांगण्यात आले होते. 

          कब मास्टर यांचे वय ६ ते १० करण्यासाठी अभिनवपणे उपक्रम घेण्यात आला होता. आमच्याकडे त्यांनी कबचे वय फेकले होते आणि आम्ही ते सर्वांनी अलगद पकडले होते. सगळेच उपक्रम वक्तशीरपणे घेण्यात आले होते. कामात नेहमीच बदल करण्यात येत होता.

          रिकामपणाची कामगिरी करणे म्हणजे तसे अवघड काम होते. प्रशिक्षकांनी दिलेल्या गोष्टी प्रत्यक्ष वैयक्तिक करुन दाखवायच्या होत्या. त्या करताना ब्लॅंक व्हायला होत होते. त्यामुळे त्या पुन्हा पुन्हा करुन दाखवाव्या लागत होत्या. कितीही तयारी केली असली तरी ट्रेनरसमोर सर्वांचीच तंतरली होती. अगदी पहिल्या झटक्यात बरोबर असणारी मंडळी हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकी कमी होती. शेवटी एकदा टास्क पूर्ण झाल्यानंतर ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मोजता न येण्यासारखा होता. 

          ध्वजारोहण करताना क्रम चुकत होता. पुन्हा पुन्हा करुन घेतले जात होते. आपणच आपल्या चुका ओळखायच्या होत्या. ध्वजनेता , कबमास्टर , कब सहाय्यक यांच्या भूमिका करायच्या होत्या. या सर्व भूमिका प्रशिक्षकांनी प्रत्येकाकडून अचूक येइपर्यंत करुन घेतल्या होत्या. 

          राज्य पुरस्कार , राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत मुलांना कसे घेऊन जाता येईल तेही सांगण्यात आले होते. आपली मुलेही तिथपर्यंत पोहोचल्याची स्वप्नं पडायला लागली होती. 

          कृतियुक्त गाणी नाचून म्हटली जात होती. आरोळ्या देण्यात येत होत्या. वेगवेगळ्या प्रकारच्या टाळ्या वाजवायला शिकवल्या जात होत्या. वेळ भराभर निघून जात होता. कधीच भोजनाची घंटा होत होती. रांगेत भोजन वाढले आणि घेतले जात होते. ड्युटीप्रमाणे प्रत्येकजण आपली कामगिरी पार पाडताना दिसत होते. कोणीही त्यात कसूर करण्याचा प्रश्नच नव्हता. सूचनाच देण्याची पद्धत अशी होती की कुणीही दिलेली कामे करायला टंगळमंगळ करु शकत नव्हते. ज्यांनी आपल्या घरी काहीही काम केलेले नसेल त्यांना काम करताना पाहून आनंद आणि आश्चर्य अशा दोन्ही गोष्टी होत होत्या. 

          प्रशिक्षक स्वतः राब राब राबत होते. प्रशिक्षणार्थींना प्रत्येक गोष्ट गांभिर्याने करण्यास सांगत होते. ताण तणाव येत असला तरी सगळे उपक्रम पार पाडावेच लागत होते. कोणालाही त्यात सूट दिली जात नव्हती. त्यामुळे कित्येकांचे वजन आणि पोट दोन्हीही कमी कमी होत गेलेले दिसत होते. 

          निसर्ग निवासाची सवय किती आरोग्यदायी असते हेच जणू या प्रशिक्षणाच्या निमित्ताने सिद्ध केले जात होते. तंबूत झोपताना डासांची गाणी ऐकत झोपावे लागत होते. 

          पहिल्या दिवशी तर माझी हालतच झाली होती. पहिल्यांदा तंबूत झोपण्याचा प्रयत्न केला होता. एक तास तरी झोपच येईना. मग स्काऊट बंगल्यात फॅनच्या खाली असलेल्या बाकड्यावर झोपलो होतो. पण झोप आलीच नव्हती. झोपेत बाकड्यावरून पडेन ही भीती झोपू देत नव्हती. मग पुन्हा तीही जागा सोडली होती. आकाशाचे पांघरुण घेऊन बाहेर अंगणात गाढ झोपून गेलो होतो. माझ्याबरोबर अनेक मित्र घोरत पडलेले होते. त्या सूरसंगीतात मलाही सामील होण्याची अनमोल संधी मिळाली होती. 

          मोगलीची गोष्ट प्रत्यक्ष अनुभवता येत होती. भालू , भगिरा , का , मोगली यांचा डान्स करताना कितीतरी मजा आली होती. स्पर्श , चव , स्मरणशक्ती , डोळे इत्यादींवर आधारित किम गेम्स खेळले गेले होते. विविध गेम्स खेळताना लहान मुलांसारखी गंमत वाटत होती. सगळेजण आपलं वय खरंच विसरुन गेलेले दिसत होते. 

          रात्रीच्या शेकोटी कार्यक्रमात सर्वांनीच अक्षरशः धमालच केली होती. जे कधीही नाचले नसतील त्यांचे नृत्य हसायला लावत होते. सर्वांनी दिलेल्या थीमनुसार कार्यक्रमांचे सादरीकरण केले होते. तयारीसाठी पुरेसा वेळ न मिळाला तरी कार्यक्रम झक्कास होत होता. 

          सन्मान सभेमध्ये अध्यक्ष , सचिव यांची निवड करुन दिवसभराच्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यात येत होता. दुसऱ्या दिवसाचे नियोजन आधीच सांगण्यात येत होते. वहीचे लेखन करण्यासाठी जागरण केले जात होते. आपल्या तंबूचा नंबर यावा , लाल रंगाचा फ्लॅग मिळावा म्हणून चढाओढ लागत होती. 

          गाठींचे प्रकार शिकवले गेले होते. प्रत्यक्ष जीवनात त्यांचा कसा वापर केला जातो हेही सांगितले गेले होते. कित्येकांनी बांबूंचा वापर करुन अभिनव गॅझेट्स बनवली होती. 

          प्रशिक्षण संपण्याच्या आदल्या दिवशी सहल नेण्यात आली होती. ज्योतिबा , महालक्ष्मी आणि रंकाळा अशा ठिकाणी ऐतिहासिक अनुभव घेतले जात होते. प्रवास करताना गाणे म्हणण्याचा मोह कोणालाही आवरता येत नव्हता. राज्यभरातून आलेले शिक्षक , शिक्षिका एकाच कुटुंबाचा भाग बनून गेलेले होते. रंकाळा हिरवळीवर अभिनय गीते नाचताना सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 

          शेवटच्या शेकोटी कार्यक्रमात प्रत्येक गटातील प्रशिक्षणार्थीनी आपली हृदय मनोगते व्यक्त करताना अक्षरशः रडायला लावले होते. 

          क्लोझिंग कार्यक्रमात सर्वांनी एकमेकांना सलाम केला होता. प्रत्येकाला समारंभपूर्वक प्रमाणपत्रे मिळाली होती. जाताना प्रत्येकजण प्रत्येकाला निरोप देण्याच्या घाईत होता. या प्रशिक्षणात प्रत्येकाला एकसष्ठ मित्र मिळाले होते. प्रत्येकाला  सात ते आठ गुरु मिळाले होते. त्यांचा सर्वांचा निरोप घेताना सर्वांचेच डोळे आतून किंवा बाहेरुन पाणावलेले दिसत होते. स्काऊटिंग नावाचे हे प्रशिक्षण खरंच एक अनुभवसंपन्न आऊटिंग असल्याचे सिद्ध होत होते.


©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) ( कणकवली )

( सिंधुदुर्ग )


🛑 सुट्ट्या लागल्या आता मज्जा

 🛑 सुट्ट्या लागल्या आता मज्जा


          सुट्टी हा शब्द सगळ्यांनाच आवडणारा असेल. नुसता शब्द नाही तर त्याची प्रतिक्षा करण्यातही एक आगळा आनंद असतो. तशी प्रत्येकाला आठवड्यातून एक दिवसाची सुट्टी मिळत असेलच. आता काहीजण 24 गुणिले 7 काम करत असतील तर त्यांनाही सुट्टी घेणाऱ्यांचा हेवा वाटत असेल. अर्थात तशी सगळयांनाच कधीना कधी सुट्टी मिळतच असते , फक्त ते सांगत नसतात. किंवा त्यांना आपल्याला सुट्टी आहे हे जाणवत नसेल. 

          आयुष्यात अशा अनेक सुट्ट्या येत असतात. त्या येतात आणि जातातही. पण प्रत्येक सुट्टी आपलं एक वेगळेपण घेऊन येत असते. माणसाला विश्रांतीची गरज असते. ती विश्रांती सुट्टीमुळे त्याला मिळत असते. सुट्टी म्हणजे आपले स्वतःचे दिवस असतात. त्यावर आपला आणि आपलाच अधिकार असतो. ती आपली स्वतःची असते , म्हणून ती आपली लाडकी असते. ती आपल्याला नेहमीच हवीहवीशी वाटणारी असते. ती पुन्हा पुन्हा येत राहावी अशीही असू शकते. सुट्टी आली की आपल्या मनाचे करता येते हा आनंद असतो. तो आनंद कोणी हिरावून घेऊ नये असे प्रत्येकाला वाटत असते. आज मस्त सुट्टी आहे असे म्हणत जर तुम्ही तुमचा सुट्टीचा दिवस ' एक उनाड दिवस ' म्हणून साजरा करणार असाल तर त्यात जर कुणामुळे विघ्न आलंच तर आपण त्याच्यावर मनातून चरफडल्याशिवाय राहत नाही. 

          एक मे हा दिवस मुलांच्या सुट्टीचा सुरुवातीचा दिवस असावा. आता खूप लवकर परीक्षा होतात , त्यामुळे एप्रिलपासूनच मुले शाळेत यायची बंद होतात. परीक्षा झाल्या की शाळेत कशाला जायचे ? हा प्रश्न पडल्यामुळे मुलांना शाळेत पाठवले जात नाही. उलट याही दिवसात शाळांमध्ये शैक्षणिक कामकाज सुरू असते. निकाल , स्वाध्याय पूर्तता , तोंडी काम , तोंडी परीक्षा , प्रकल्प , शाळा पूर्व तयारी अभ्यासक्रम , अप्रगत मुलांसाठी उपचारात्मक अभ्यासक्रम इत्यादी कामकाज सुरुच असते. ते सुरुच असते , पण ते फक्त शिक्षकांना आणि शिक्षणाशी संबंधित घटकांना माहिती असते. 

          वर्षभर अभ्यास करुन करुन दमायला झालेले असते. थोडी विश्रांती म्हणून शाळेतील वाचनालयाच्या पुस्तकांचा वाचून फडशा पाडायला काय हरकत आहे. अनेक पुस्तके वाचल्यामुळे मुलांच्या ज्ञानात आणखी भरच पडणार असते. शिक्षकांनीही आपल्या शाळेतील डेडस्टॉक मध्ये बंदिस्त करुन ठेवलेली पुस्तके मुलांना वाचायला द्यावीत. पुस्तके वाचून फाटून गेली तर ती सार्थकी लागतील नाही का ? हल्ली मुलांच्या घरी पुस्तके असण्याची शक्यताच कमी असते. शहरात काही वाचनवेडे सोडले तर वाचनासाठी पुस्तके घरी आणणारे विरळेच आढळतील. शहरात जर ही अवस्था असेल तर खेड्यात वाचन अपेक्षा ठेवणे दूरच राहिले. दिवाणखान्यात किमती वस्तू दिसतील , पुस्तके दिसणार नाहीत. पुस्तके दाखवण्यासाठी नकोच , ती वाचनासाठी हवी. 

          आमच्या बालपणी आम्ही वाचनालयात बालवाचक म्हणून खाते उघडले होते. त्यावेळी महिन्याला पाच रुपयापेक्षा कमी वर्गणी होती. किती पुस्तके वाचायचो आम्ही. शनिवार रविवार कधी येतो आणि वाचनालय कधी गाठतो असे होईन जाई. आता वाचनालयात जाणे संपले आहे. आता घराचेच पुस्तकघर बनवून टाकले आहे. ज्यावेळी वाटेल त्यावेळी एखादे पुस्तक उघडावे आणि वाचत सुटावे. वेळ कसा निघून जातो समजतही नाही. आताच्या मुलांना वाचनाचा छंद कमीच दिसून येतो. त्यांना तुमचा आवडता छंद कोणता असे विचाराल तर खूप कमी मुलांचे उत्तर वाचन असे असेल. 

          या सुट्टीचा वापर मुलांनी वाचनासाठी करायला हवा. बालसाहित्य बाजारात उपलब्ध आहे. गोष्टींची पुस्तके आहेत. बालकथा , इसापनीती , अकबर बिरबल , नितीकथा , लोककथा , एकांकिका , बालनाट्ये , नाट्यछटा , किशोर , कुमार , ठकठक , चांदोबा , अमृत , कॉमिक्स , विक्रम वेताळ , आजोबांच्या गोष्टी , आजीच्या गोष्टी , सिंदबादच्या सफरी , गुलबकावली , लोटपोट , सिंहासन बत्तीशी , गोट्या , श्यामची आई , सानेगुरुजींच्या गोष्टी अशी अनेक पुस्तके आताच्या मुलांना माहीत असतील की नाही यांवर संशोधन करावे लागेल. या सर्व गोष्टी त्यांना यु ट्यूबवर उपलब्ध असतीलही. पण वाचण्यात जी वेगळी मज्जा असते , ती पाहण्यात नक्कीच असेल असे मला वाटत नाही. ते एक मनोरंजन होईल , पण ज्ञानार्जन कदाचित होईल. म्हणून आताच्या मुलांनी भरपूर वाचले पाहिजे. पुस्तकांचा फडशा पाडला पाहिजे. सकाळी उठून स्टेटस लावण्यापेक्षा एखाद्या पुस्तकातील चार ओळी वाचल्यास त्याचा आयुष्यभरासाठी नक्कीच फायदा होईल. 

          सध्या वर्तमानपत्रात देखील लहान मुलांसाठी विशिष्ट पान असते. ते लहानांपासून मोठ्यांनीही वाचले पाहिजे. घरातल्या मोठ्यांनाही हल्ली वाचनाचा विसर पडत चाललेला दिसून येतो आहे. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत मोबाईलने आपले जीवन ग्रस्त करून सोडले आहे. मध्यरात्री उठून बसलो तरी पहिल्यांदा मोबाईलकडे हात जाऊ लागला आहे. घराघरात क्रिकेट मॅच , सासूसुनांच्या मालिका सुरु आहेत. मुले , पालक हेच बघत आहेत. यातून वेळच मिळत नसल्यामुळे त्यांना पुस्तक वाचायला सवडच मिळताना दिसत नाही. 

          पूर्वीची मुले एवढी अभ्यासवेडी किंवा वाचनवेडी होती की त्यांच्या हातात नेहमी एखादे पुस्तक दिसे. आता मोबाईल दिसतो. त्या दिवशी वाचनालयात गेलो होतो. तिथे तरुण मंडळी दिसलीच नाहीत. खूप जुनी जाणती माणसेच पुस्तके वाचन करताना दिसली. या जुन्या माणसांनी आपला वाचनाचा छंद जोपासला आहे. व्यासंग जपला आहे. पूर्वीपेक्षा अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी कमी झालेली आहे , त्यामुळे मिळणारे गुण शंभर टक्क्यांपेक्षा जास्त असले तरी त्यांना अजिबात किंमत नाही. पूर्वीच्या साठ टक्क्यांच्या खालीच आहेत असेही बोलले जात आहे. 

          आता सुट्ट्या पडल्याचं आहेत , तर त्या सुट्टीचा वापर वाचनासाठी करायला हवा. मुलांनी वाचनवेडे बनायला हवे. आम्ही त्यावेळी जेवतानाही समोर पुस्तक उघडून बसत असू. तेव्हा आमचे बाबा आम्हाला ओरडत. आता जेवताना समोर टीव्ही चालू असतो , शेजारी मोबाईलच्या नोटिफिकेशन्सची रिंग वाजत असते. इकडे जेवत असतो , तिकडे हे सुरुच असते. त्यामुळे कधीकधी तोंडात घालायचा घास नाकात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकावेळी एकच काम करा. वाचताना वाचा आणि चावताना चावा. कारण काय चावतोय ते जसे समजायला हवे , तसे काय वाचतोय तेही समजायलाच हवे नाही का ? 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

🛑 पाण्याचा थेंब

🛑 पाण्याचा थेंब

          एक पुरातन काळातील कावळ्याची कथा सर्वांनाच माहिती आहे. त्या गोष्टीला किती वर्षे झाली असतील माहिती नाही. पण अजूनही शाळांमध्ये या कावळ्याची गोष्ट तशीच सांगितली जाते. एक तहानलेला कावळा असतो. तो पाण्याचा शोध घेत असतो. त्याला खूप लांबवर पाण्याचा हंडा दिसतो. त्यातील पाणी खूपच तळाशी असतं. कावळा खूप हुशार असतो. त्याला एक युक्ती सुचते. तो इकडे तिकडे पाहतो. त्याला दगडाचे खडे दिसतात. तो आपल्या चोचीने ते दगडाचे खडे एक एक करुन हंड्यात टाकतो. हंड्यातील तळाला असलेले पाणी वर येते. तो पोट भरुन पाणी पितो आणि आनंदाने उडून जातो. 

          पाण्याचे काही थेंब मिळून पाण्याचा हा साठा तयार होतो. पाणवठा होण्यासाठी पाण्याचे थेंब एकत्र यावे लागतात. थेंबे थेंबे तळे साचे. तळे साचण्यासाठी थेंबांची जरुरी असते हे या म्हणीतूनही स्पष्ट होते. याचा अर्थ पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. कावळ्याला तहान लागली होती , त्यावेळी त्याला कधी एकदा पाणी पितो असे झाले होते. त्याने विज्ञानातील आर्किमिडीजचे तत्त्व न शिकताही ते वापरले होते. दगडाचे खडे टाकून टाकून त्याने पाणी वर आणले होते. गरज ही शोधाची जननी आहे हे त्या कावळ्यानेही सिद्ध केले होते. आपण तर माणूस आहोत. आपणही तहान लागली की विहीर खणायला लागतो तसे. 

          लहानपणी आकाशवाणी पुणे नेहमी ऐकायचो. तेव्हा त्यातील उद्घोषक नेहमी काहीतरी चांगले सुविचार सांगत. त्यातील पाण्यासंबंधात एक सुविचार माझ्या चांगलाच लक्षात राहिला आहे. " आभाळातून पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब जपायला हवा , उद्याच्या अंकुरणाऱ्या कोंबासाठी. " खरंच पाण्याचा प्रत्येक थेंब जपायलाच हवा. 

          सध्या आपल्याला सगळ्यांनाच खूप तहान लागत असेल. तहान लागली की आपण आपली पाण्याची बाटली शोधतो. पाणी पितो तेव्हाच शांत होतो. पाणी पिऊन पिऊन संपून जाते. पाणी हवे असते , पण ते मिळत नसते. आता पाण्याची किंमत समजू लागते. जवळपास पाण्याची बाटली किंवा पाणी मिळते का बघतो. पाणी मिळाल्याशिवाय तृष्णा शांत होत नाही. पाणी मिळाले की ते घटाघटा पिण्यात जो आनंद असतो तो कशातही नसेल. जेवढे पाहिजे तेवढे पाणी पिल्याशिवाय आपण पाणी पिणे थांबवत नाही. आपल्या शरीराला पाण्याची इतकी गरज असते , की पाणी हे आपल्या जीवनाचे जीवन झालेले आहे. म्हणूनच पाण्याला जीवन म्हणत असावेत. हेच पाणी पिण्यासाठी महत्त्वाचे असते , तसे इतर अनेक सुविधांसाठी उपयोगी असते. 

          त्यादिवशी काही मुले नदीत पोहोण्यासाठी गेली होती. उन्हाळ्यात सर्वांनाच पाण्यात डुंबायला जायला खूप आवडते. त्यांनाही तो मोह आवरला नाही. पाण्याच्या खोल डोहात उतरल्यामुळे त्यातील एका मुलाला बुडून प्राण गमवावे लागले. जे पाणी तहान भागवते , ते अतिरिक्त घेतल्याने मृत्यूही ओढवतो. पाण्याने त्या मुलाचा प्राण घेतला होता. त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं होतं. तो बराच वेळ पाण्यात बुडून राहिल्यामुळे त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले होते. पोहता येणारे सुद्धा बुडतात. त्यात आमच्यासारख्यांचे काय ? 

          उन्हाळा संपता संपता पाण्याची टंचाई जाणवू लागते. सगळ्या विहिरींमधील पाणी संपू लागते. तळ दिसू लागतो. एकाच विहिरीवर चार पाच पंप लावलेले असतात. विहिरीत पाणी आहे का नाही बघितलेही जात नाही. बटन चालू करतात. पाणी भरुन घेतात. विहिरीमधले पाणी संपले तरी पाहिले जात नाही. कोणीतरी पंपाचा आवाज येतो आहे म्हणून बघायला जातो. तेव्हा लक्षात येते की विहिरीत पाणी नसल्यामुळे ' घरघर ' आवाज येत आहे. टाकीतील पाणी संपून जाते. घरखर्चासाठी पाणी मिळत नाही तेव्हा पाण्याचा वापर जपून करण्याचे लक्षात येते. रात्रभर पंप बंद राहतो. सकाळपर्यंत झऱ्यातून पाणी येत राहते. पुन्हा पाण्याच्या थेंबा थेंबानी विहिरीचा तळ भरुन जातो. तो पाहून पुन्हा हायसे वाटते. पंप पुनश्च सुरु केले जातात. पुन्हा तसेच घडत राहते. 

          उन्हाळ्याची सुट्टी लागते. मुंबईची चाकरमानी मंडळी गावात गर्दी करतात. पाण्याचा बेसुमार वापर सुरु होतो. माठातले थंडगार पाणी पिताना पिणाऱ्याचा तृप्त चेहरा बघत राहावासा वाटतो. गावात नदी असतेच. त्यात एखादी कोंडही असतेच असते. मुले दरवर्षी पोहोण्याची मजा लुटत असतात. एखादा बुडून जाणार असतो हे कोणाच्या गावीही नसतं. पुन्हा तशी नको असलेली घटना घडते. सन्नाटा पसरतो. दोन तीन दिवसांत सन्नाटा संपतो. 

          पावसाचे ढग आकाशात जमू लागतात. अमृतासारखे पाण्याचे थेंब धरतीला येऊन मिळतात. धरतीवर जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन जाते. शाळा सुरु होते. मी सातवीच्या वर्गाला शिकवित असतो. अचानक एक कविता समोर येते. " थेंब आज हा पाण्याचा " ही कविता शिकवताना मी शब्द साहित्य आणि व्याकरण शिकवत राहतो. त्यातील समानार्थी शब्द , यमक असणारे शब्द , विरुद्धार्थी शब्द , शब्दार्थ आणि साहित्यिक मूल्य शिकवत राहतो. हे शिकवताना मुलं ते कदाचित लक्षात ठेवतात. पाणी वाचवण्याचे विसरुनच जातात. मुलांना प्रश्नांची उत्तरे देता येतात. व्यवहारात वापरता येत नाही. हे असं चित्र पाहिलं की तो कावळा बरा वाटतो. नळ चालू असताना वाया जाणारे पाणी पाहून काहीच न करणारी माणसे बघून डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...