Sunday, March 20, 2022

🛑 सतीश , क्या यही प्यार है ?

🛑 सतीश , क्या यही प्यार है ?

          त्या दिवशी पेपरमध्ये बातमी वाचली आणि धक्काच बसला. तसा धक्का बसणं ही आता रोजचीच सवय झाली आहे. कोणाचा जन्म झाला तर आपल्यासाठी आनंदाची बातमी असते , पण कोणाचा तरी मृत्यू झाला तर ती बातमी आपल्या सर्वांसाठीच धक्कादायक असायला हवी. त्यामुळे असे धक्के पेपरमध्ये रोजच बसत असतात. कधी काळचा एक मित्र गेल्याची बातमी होती ती. वयाने माझ्यापेक्षा बराच मोठा असलेला. त्याला मित्र म्हणण्यापेक्षा दादा म्हणणे कदाचित योग्य ठरेल. पण त्याला ते मान्य नव्हते. त्याला नावाने हाक मारणेच आवडत असे. सतीश.

          आमच्या सलून दुकानासमोरच त्यांचे दुकान होते. दुकान टेलरिंगचे होते. केरकर आणि सतीश मयेकर या दोघांचे ते दुकान होते. दोघेही हसतमुख होते. एक कपडे कापत असे , दुसरा कपडे शिवत असे. दोघांचे काम अतिशय कौशल्यपूर्ण असे होते. त्यांनी त्यांच्या कामाच्या मॉडर्न पद्धतीमुळे  गिऱ्हाइके वाढवत नेली होती. शर्ट , पॅन्ट मारण्यात अतिशय पटाईत असलेली मंडळी होती ती. त्यांच्याकडे टेपरेकॉर्डर होता. तो दिवसभर वाजत असे. आमचे दुकान जवळच असल्यामुळे आम्हीही त्या सुरेल गाण्यांचा आस्वाद घेत असू. नवीन गाण्यांची कॅसेट आली रे आली की ती पहिली यांच्या दुकानात वाजत असे म्हणानात. 

          दोघेही संगीतवेडे होते. गाणी ऐकता ऐकता यांचे कर्तनकाम , शिवणकाम धाडधाड सुरु असताना मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तेव्हा संजय दत्तचा रॉकी सिनेमा आला होता. सिनेमा काही बघायला मिळाला नाही. पण त्यातली गाणी मात्र ऐकून ऐकून तोंडपाठ झाली होती. त्यातलं एक गाणं सतीशला खूपच आवडायचं. त्याचे बोल असे होते , " दिन तेरे बिन कही लगता नही  , वक्त गुजरता नही , क्या यही प्यार है , हा यही प्यार है " ती कॅसेट खराब होईपर्यंत ते गाणं सतीशने हजारदा लावलं असेल. तो तेव्हा एकदम तरुण , गोंडस होता. त्याला मिशीसुद्धा आली नव्हती. त्याचे लग्न व्हायला खूप अवकाश होता. त्याच्या मनात काय सुरु होतं तोच जाणे. पण हे गाणं ऐकताना तो फ्रेश दिसायचा. आमचे बाबा त्याला चिडवत , " काय रे सतीश , ह्या गाण्याचो तुका कंटाळो येयत नाय रे " तो बाबांच्या बोलण्यावर फक्त हसायचा आणि म्हणायचा , " कुबल , तुमचा वय गेला , आता आमचा इला , ही आमच्या काळातली गाणी आमका आयकाकच व्हयी. नायतर आमी म्हातारे होतलव " मग माझे बाबा त्याच्या बोलण्यावर न बोलता पुन्हा आपल्या दुकानात येऊन त्याचे वाढलेल्या आवाजातले गाणे ऐकत बसत. कारण त्याच्याशिवाय बाबांसमोर दुसरा पर्यायच नव्हता. 

          काही वर्षे निघून गेली असतील. आमचे संबंध अधिक दृढ होत गेले. मीही त्यांच्या दुकानात जाऊन बसू लागलो. त्यांच्याशी गप्पागोष्टी मारु लागलो. शिलाई मशीनची खडखड थांबत नव्हती , तशी टेपरेकॉर्डरची गाणीही थांबता थांबत नव्हती.

          असेच काही दिवस निघून गेले कापरासारखे. आठवणी मात्र जशाच्या तशा राहिल्या. आम्हाला काही कारणास्तव दुकानाची जागा बदलावी लागली. जागा बदलली तरी कधीतरी सतीशकडे जाणे होई. दिवस बदलत गेले , त्यांची कौशल्येही बदलली. सतीशला आणि त्याच्या भावाला टेलरिंग पेक्षा वेगळा व्यवसाय खुणावू लागला. त्यांनी ट्रक , ट्रॅव्हलर घेतले. व्यवसाय जोमाने सुरु केला. पुन्हा काही वर्षांनी त्यांनी आपापले नवे व्यवसाय सुरु केले. उद्योगाचे घरी जणू लक्ष्मी पाणी भरु लागली होती. सतीशने दिक्षा कंस्ट्रक्शन हा व्यवसाय सुरु केला. विहिरी खोदणे , बोअरवेल खोदणे , विहिरी बांधणे असे काहीसे व्यवसायाचे स्वरुप होते. व्यवसायाने व्यापक रुप धारण केलं होतं. आता हल्ली कधी हा सतीश दिसला कि खूप गडबडीत असे. त्याला आमच्याशी बोलायलाही वेळ नसे. बोलता बोलता त्याचा फोन येई आणि तो गडबडीत निघून जाई. आयुष्याच्या ट्रॅकवर पुढे जात असताना कितीतरी अशी माणसं भेटतात. काही माणसं खूप मोठी होत असताना बघायला मिळतात. सतीश खूप मोठा उद्योजक होताना आम्ही बघितला आहे. पण त्याच्या निधनाची वार्ता वाचली आणि मला पूर्वीचा सतीश आठवून काळजात धस्स झाले. तो अल्पायुषी ठरला होता.

          बातमी वाचली तेव्हा पुन्हा एकदा त्याचं आवडतं गाणं माझ्या कानात आपसूक वाजू लागलं होतं  , " क्या यही प्यार है , दिन तेरे बिन कही लगता नही  , वक्त गुजरता नही " आता हे गाणेच राहिले होते , सतीश कधीच आमच्या पुढे निघून गेला होता.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )





Saturday, March 19, 2022

🛑 आचार्य शिरोमणी

          शैक्षणिक क्षेत्रात वैविध्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांना व इतरही सामाजिक क्षेत्रातील कलावंतांना परफेक्ट अकॅडमीकडून आचार्य शिरोमणी पुरस्कार प्रदान केल्याचे वाचनात आले. अतिशय चांगली गोष्ट आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांमुळेच आजची पिढी अजून सुसंस्कारीत होण्यासाठी संधी उपलब्ध होते आहे. त्यांच्याकडे बघूनही आपल्यात सकारात्मक बदल घडू शकतात अशी व्यक्तिमत्त्वे जगात आहेत. त्यांचं बोलणं , चालणं सगळंच टिपण्यासारखं असतं. त्यांचा सहवास लाभला तर जीवनाचं सोनंच होऊन जाईल. अशा सोनं करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभणं कठिण असलं तरी दुर्मिळ अजिबात नाही. 

          आमच्या सहवासातील अनेक शिक्षक बंधू भगिनींना हल्ली अनेकविध पुरस्कार मिळाले आहेत ही त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावतीच आहे. या व्यक्तींना पुरस्कार मिळून त्यांनी पुरस्कारालाच मोठे केले आहे असे म्हटले तरी वावगे ठरु नये. 

          जिल्हा सचिव सचिन मदने आणि महिला तालुका सचिव नेहा मोरे यांना मिळालेला पुरस्कार आम्हाला म्हणूनच आम्हाला अभिमानास्पद आहे. त्यांचे शैक्षणिक , सामाजिक कार्य उल्लेखनीय असेच आहे. त्यांच्या सोबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून अनेकदा भेटी घडल्या. त्यांच्या व्यक्तित्त्वाने समोरच्याला नवनवीन गोष्टी द्याव्यात असे प्रभावी व्यक्तिमत्त्व त्यांना लाभले आहे , नव्हे त्यांनी ते तावून सुलाखून बनवले आहे. त्यासाठी त्यांना अनेक संघर्षांना , समस्यांना दैनंदिन तोंड द्यावे लागत असेल. त्यावर प्रत्येकवेळी मात करणाराच खरा आचार्य शिरोमणी असतो यांच्यासारखा. 

          सचिन मदने यांची ओघवती भाषा मला भावते. आमचे जिल्हा सरचिटणीस अतिशय अभ्यासू आहेत याबद्दल मला त्यांचा मनस्वी आदर आहे. आपल्या समितीने कित्येक व्यक्तिमत्त्वे घडवली आहेत. नोकरीला लागल्यापासून मी अशा दिग्गज नेत्यांची भाषणे ऐकली आहेत. रॉड्रिग्जगुरुजींची मार्गदर्शने तर आम्ही दररोज परिपाठाला ऐकली आहेत. कणकवली नं.३ शाळेत सातवीपर्यंत शिकताना त्यांची पाठीवरील शाबासकीची प्रेमळ थाप अजूनही आठवते. ते मला स्कॉलर म्हणत. त्यांच्या असे म्हणण्यामुळे मी खरंच चौथी , सातवीत स्कॉलर झालोच. ही त्यांची आणि आमचे आचार्य शिरोमणी पाटकरगुरुजी , नारकरगुरुजी , पालवगुरुजी , परबगुरुजी , तावडेबाई यांची देण आहे असे मी मानतो. 

          मदनेसरांच्या हातून कित्येक विद्यार्थी घडले असतील , ते भाग्यवान असतील , कारण त्यांना असे मार्गदर्शक लाभले आहेत. त्यांच्या सौभाग्यवती देखील त्यांना या कार्यात मोलाची साथ देताना दिसतात. रोटरी क्लबचे प्रमुख पदाधिकारी म्हणून मदने सरांची निवड म्हणजे सचिन तेंडुलकरच्या बॅटचा षटकारच म्हणायला हवा. 

          नेहा मोरेंना मिळालेला पुरस्कार म्हणजे कणकवली शाखेसाठी अभिमानाचा तुरा आहे. एकतर आमची समिती म्हणजे अभिमानांची खाणच आहे. यात अनेक हिरे आहेत. झाकलेली माणकं आहेत. प्रसंगानुरुप त्यांची तेजस्विता चमकताना दिसते. सर्वांची नावे इथे सांगणे कठिण आहे. प्रत्येकजण एकमेवाद्वितीय आहे. वेळेनुसार आपला बौद्धिक खजिना प्रत्येकजण खुला करताना दिसतात.

          म्हणूनच आनंद तांबे , सत्यवान चव्हाण आणि कित्येक शिक्षक रत्ने शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवताना दिसतात आणि आम्ही आमचा ऊर अभिमानाने भरुन येतो. सर्वांनीच आपल्या नैसर्गिक देणगीचा आणि प्राप्त केलेल्या कौशल्यांचा पुढील पिढीसाठी असाच उपयोग करत राहिल्यास आम्ही सर्वजण विद्यार्थ्यांच्या मनात कायमचे आचार्य शिरोमणी ठरु. नक्कीच. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )





Friday, March 18, 2022

🟣 नायक आणि विनायक लेखांक : ९३

 🟣 नायक आणि विनायक लेखांक : ९३


          काही माणसं त्यांच्या कामाने लक्षात राहतात. ही त्याच कामासाठी जन्माला आलेली असू शकतात. किंवा अनपेक्षितपणेही आलेली असली तरी त्यांच्याकडून विलक्षण असे कार्य घडत असताना आपण पाहतो आणि भारावूनही जातो. ते आपोआपच नायक बनतात. ते नायक नसतानाही त्यांच्यातील नायक ठळकपणे दिसू लागतो. हा माहीत नसणारा नायक अचानक विनायक बनून समोर येतो आणि नायक या शब्दाला सार्थ करतो. 

          असेच एक नायक असलेले विनायक माझ्या आयुष्यात आले. डी. एड. होऊन आम्ही बाहेर पडत असताना हे विनायक आम्हाला गवसले. त्यांचा निरागसपणा आम्हाला भावला. त्यांच्यातील नायक त्यावेळी दिसला नव्हता. जास्त संपर्क न आल्यामुळे असेल कदाचित , पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोकरी लागल्यानंतर एकाच तालुक्यात आमच्या नेमणुका झाल्या हे नशीबच म्हणावं लागेल. त्यांना देवगडचे टोक मिळाले. गिर्ये नं. 1 शाळेत त्यांच्या नोकरीची सुरुवात झाली. त्यांच्यासोबत असणारे आमचे दुसरे नायक मित्र गिल्बर्ट यांनीही त्यांची एकाच शाळेत अनेक वर्षे सोबत केली. 

          माझी आत्येबहिण गिर्यात दिलेली होती. गिल्बर्ट आणि विनायक हे माझे मित्र आहेत , हे तिलाही समजले. ती त्यांच्याकडे माझी चौकशी करत असे. त्यावेळी फोन नसल्यामुळे ती या माझ्या मित्रांकडे माझी खुशाली विचारत असे. माझ्या या मित्रांनी तिला प्रसंगानुरूप सहाय्य केले होते. ती बडबडी असली तरी तिच्या या गुणाबद्दल ते माझ्याकडे कधी बोलले नाहीत. 

          विनायक जाधव नावाचं व्यक्तिमत्त्व साधं , सरळ आणि परोपकारी असल्याचे मला त्यावेळीच समजलं होतं. आता या विनायकभाईंच्या सहवासात आल्यानंतर ते अधिक स्पष्टपणे जाणवू लागलं आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करणारे खूप कमी लोक असतात , विनायकराव हे मदत करताना कोणतीही अपेक्षा बाळगताना दिसत नाहीत. त्यांच्यासोबत बोलताना त्यांच्या या गोष्टीचा अधिक अनुभव येतो. 

          शाळेच्या कामातही ते अतिशय तत्पर असतात. त्यांचे अध्यापन विद्यार्थिप्रिय असेच आहे. त्यांच्या हसतमुख वदनाकडे पाहिले की खऱ्या ' विनायकाची ' म्हणजे गणरायाची आठवण यायला हरकत नाही. सावरकरांचे नाव विनायक होते. आता हे आमचे जाधवांचे विनायक आहेत. सावरकरांनी सागराकडे आळवणी केली होती , " सागरा , प्राण तळमळला ". आमचे विनायक अशी आळवणी करत असतील , " शिक्षका , सांग तळमळ   गा " . शिक्षकांच्या समस्या त्यांच्या समस्या झालेल्या असतात. सर्व शिक्षक बंधू भगिनींना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्यांवर सन्माननीय तोडगा काढण्याचे काम ते करताना दिसतात तेव्हा त्यांच्याबद्दल उत्स्फूर्तपणे लिहावेसे वाटते. 

          एखाद्या मोठ्या संघटनेचे तालुक्याचे महत्त्वाचे पद कोणालाही असेच मिळत नसते. विनायकभाईंनी ते आपल्या कार्य कर्तृत्वावर मिळवलेले आहे. त्या पदासाठी काम करताना त्यांना दिवसाचे चोवीस तासही पुरत नाहीत. सर्व पदाधिकारी आणि शिलेदार यांच्याशी दररोज फोन संपर्कात राहणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. सगळ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देताना त्यांची  काय हालत होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. त्यांनी संघटनेचे कार्य जोमाने करताना सर्वांशी कायमच मित्रता जोपासली आहे. त्यांचे वक्तृत्व ऐकण्याचा हल्ली अनेकदा योग आला. सर्व विषयांना स्पर्श करत , सर्व मुद्द्यांना हात घालत बोलण्याची त्यांची पद्धत कोणालाही आवडेल अशीच आहे. त्यांना तरीही संघर्ष करावा लागत असला तरीही त्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आधीच तयार असतात. संघटनेचे अध्यक्ष , मित्र, शिक्षक आणि कौटुंबिक सर्व नाती जगत असताना त्यांना खूपच कसरत करावी लागत असणार. ते या सर्व शिवधनुष्यासारख्या जबाबदाऱ्या लिलया पेलताना दिसतात. 

          गेल्यावर्षी खारेपाटण चेकपोस्टवर माझी तिसऱ्यांदा ड्युटी लागली होती. मी तिथे काम करत असताना त्यांचा फोन आला. ते मला म्हणाले , " प्रविणभाई , तुम्ही पुन्हा पुन्हा ड्युटी का सहन करताय , मला बोलला असता तर मी काहीतरी पर्याय काढला असता. " मी त्यांना म्हणालो , " विनायकभाई , मला पहिल्यांदा ड्युटी आली , तेव्हा मी ती केली. दुसऱ्यांदा मी भावाची ड्युटी केली. तिसरी ड्युटी आली तर ती मी माझी ड्युटी म्हणून करतोय. " 

          मी एवढे बोललो आणि फोन ठेवला. पण विनायकभाई गप्प बसतील तर ना ? त्यांनी थेट तहसीलदारांकडे याबाबत विचारणा केली. माझ्या जागी दोन दिवसात दुसरे शिक्षक हजर झाले, मी कार्यमुक्त झालो. आपला शिक्षकमित्र एकटाच भरडू नये ही त्यांची संवेदनशीलता मला त्यावेळी भावली. मी त्यांचे आभार मानले तरी ते आभार स्वीकारायला तयार नव्हते. असे हे विनायकराव. 

          माणसाने असे असावे , जसे विनायकभाई आहेत. त्यांना कोणताही गर्व नाही. ते रागावले तरी लगेच शांत होतात. ते ज्यांच्यावर रागावतील त्यांना पुन्हा जाऊन वैयक्तिक भेटतील. त्यांच्या मनात नेहमीच सर्वांबद्दल आपुलकी असते. वरवर आपुलकी दाखवून खोटा अभिनय करणे त्यांना कधी जमेल असे मला वाटत नाही. हे विनायकभाई माझ्या जीवनात आले आणि माझ्या जीवनाला एक नवीन नायक जोडला गेला. त्यांचा हा सहवास मला अखंड लाभत राहो अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करत राहणार. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



🛑 धोंडास

🛑 धोंडास 

          तसे अनेकांचे अनेक पदार्थ आवडीचे असतात. त्यात आईने केलेले पदार्थ आपल्या विशेष आवडीचे असतात. लहानपणापासून अनेकविध पदार्थ खाल्ले असतील. कधी भुकेची आग शमवण्यासाठी खाल्ले गेले असतील. भूक लागली की सगळंच गोड लागतं. आपोआप जिभेला चव येते. चवीनुसार पदार्थ खाल्ले जातात. पण आईच्या हातची चवच वेगळी असते. 

          सुरेश वाडकरांचं गाणं ऐकत होतो. शब्द मालवणी होते. ' माझ्या आईच्या जेवणाची चव फार येगळी , विसरुक नाय येवची ' माझी भाषा मालवणी , आई मालवणी आणि गाणं मालवणी त्यामुळे मालवणी मुलखात नसताना , या मालवणी गाण्यांनी माझी खूप सोबत केली आहे. 

          आईने केलेल्या माश्याच्या कडीचा वास हात धुतला तरी जाता जात नसे. तो वास परत परत घेत राहावा असाच होता. तिने केलेली उसळ , चपाती खमंग नसली तरी चवदार होती. त्यात खोबरे जास्त नसे , पण प्रेम पुरेपूर असे. तिने वाढलेल्या शिळ्या भाकरीची चव आताच्या ताज्या भाकरीलाही येण्याची शक्यता कमीच.

          त्या रात्री आईची गडबड सुरु होती. कोणता तरी विशेष पदार्थ बनवण्यासाठी तिची तयारी सुरु असावी. तिने वेलची , गुळ असे पदार्थ जवळ घेतले होते. आम्ही झोपेची तयारी करत होतो. कसल्या तरी पदार्थाचा सुगंध नाकात दरवळत आला. त्या गोड वासाने मला जाग आली. मी उठून बसलो. आई चुलीशेजारी बसली होती. चुलीवर काहीतरी शिजत होते. आई एका टोपात ' टोपातले ' बनवत होती. मला ' टोपातले ' हा पदार्थ खूप खूप आवडत असे. 

          ' टोपातले ' या पदार्थाला गावाकडे ' धोंडास ' असेही म्हणतात.  ते गरमागरम खायचे नसते. पण मला धीर नव्हता. मी ते आईकडे मागितले. आईने मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला , पण माझी स्वारी ते खाण्याचा जास्त आग्रह धरुन बसली होती. बाबांनी डोळे वटारून दाखवले तरी मी ऐकणारा नव्हतो. शेवटी आईने ते गरमागरम धोंडास मला दिलेच. मी त्याच्यावर लागलीच झडप घातली. ते गरमागरम असल्याने माझी जीभ चांगलीच भाजली. आता माझ्या लक्षात आले की ते थंड झाल्यावर खायचे असते ते !!!!

          सकाळ झाली. सगळ्यांच्या आंघोळी झाल्या. आईने ते ' धोंडास ' केकसारखे कापून आम्हाला दिले. आम्ही सर्वांनी ते मनसोक्त खाल्ले. किती मधुर चव होती त्या धोंडासाची !!! ते खाऊन माझी भाजलेली जीभ तृप्त झाली होती. 

          हल्लीच आमच्या गावातून माझ्या काकांनी ' धोंडास ' आणले होते. अगदी आईने बनवल्यासारखीच त्याची चव होती. ते खाता खाता माझी आई माझ्या डोळ्यासमोरुन गेल्याचा आभास प्रत्येक क्षणाला झाला होता. 

          हा पदार्थ अतिशय मऊ असतो. तो धोंड्यासारखा नक्कीच नसतो. तरीही त्याचे नाव ' धोंडास ' का ठेवले असावे असा प्रश्न आजही मला पडतो. काही दिवसांपूर्वी काही कारणास्तव आमचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडेसाहेब यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या सूनबाईंनी ' धोंडास ' आणून दिले. तेव्हाही मला माझ्या आईची आठवण आली होती. किती गोष्टींमध्ये आपल्या अशा सुमधुर आठवणी लपलेल्या असतात नाही ? खरंच या गोड गोड धोंडासासारखी गोड गोड माणसं मला लाभली आहेत असा विचार करुन मी त्या विधात्याकडे नतमस्तक होतो.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  (  9881471684 )



Thursday, March 17, 2022

🛑 होळीचा सण लय भारी

🛑 होळीचा सण लय भारी

          "  होळी रे होळी , पुरणाची पोळी " असे म्हणत सर्वजण होलिकोत्सव अतिशय उत्साहाने साजरा करताना दिसतात. होळी हा रंगांचा सण आहे. दुसऱ्याला मस्त रंगवण्याचा दिवस. होलिकेचे दहन करण्याचा दिवस. 

          लहानपणी कणकवली गांगोवाडीत राहायला असल्यापासून आम्हाला होळी कळू लागली होती. त्यावेळी तरुणांबरोबर आम्ही लहान मुले मुली होळीची मजा लुटत असू. आमच्या खोलीच्या जवळच होळदेव उभा केला जात असे. त्याला आंब्याच्या पानांनी लपेटून सजवले गेले की होळीचा ढंगच न्यारा दिसायचा. परंपरेने चालत आलेल्या रुढींचे पालन करत होळी मनोभावे साजरी व्हायची. होळीचा स्तंभ श्रीफळांनी नटत असे. मग गाऱ्हाणी होत. नवसाचे नारळ होळी स्तंभासमोर ठेवले जात. 

          आदल्या दिवसापासून आमची तयारी सुरु होई. लाकडे , शेणी गोळा करणे हे आमचे काम असे. वाडीतील प्रत्येक घरोघरी जाऊन एखादे दुसरे लाकूड , एक दोन शेणी मागून घेण्यात आनंदच वाटे. आता गॅस आले , लाकडे- शेणी मिळताना दिसत नाहीत. त्यामुळे आजकाल सरसकट वर्गण्या मागितल्या जातात व सण साजरा केला जातो. 

          कवळं तोडण्याची सुरुवात याच काळात होत असल्याने आम्हाला तीसुद्धा मिळत. त्यांनी होळीची आग लागलीच भडके. लाकडे , शेणी आणि कवळे यांचा आगडोंब होई. मग त्या होलिकोत्सवात गाणी म्हटली जात. कोणीतरी लाऊडस्पीकरची सोय केलेली असे. उत्स्फूर्त सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होई. रात्रीचा जागर सुरु झालेला असे. बारा वाजेपर्यंत आम्ही कसेतरी थांबू. ' बाराच्या आत घरात '  अशी बाबांची ऑर्डर असे. त्या ऑर्डरचे पालन न करणाऱ्याच्या आनंदाची होळीच होत असे. त्यामुळे आम्ही वेळेचे काटेकोरपणे पालन करीत असू.

          बाबांच्या भीतीने घरात येऊन झोपलो तरी स्पीकरचा आवाज कानात धडकत राही. परुळेकरांचा आवाज सुरेल होता. त्यांच्या गाण्यांचे सूर होळीची रंगत आणखीच वाढवताना दिसत. आपल्यालाही त्यांच्यासारखे स्पीकरवर गाणे कधी म्हणता येईल का ? असा प्रश्न पडे. असा विचार करता करता कधी झोप येई समजतही नसे. 

          सकाळी होळीच्या राखेचा गंध मस्तकावर लावून आम्ही धन्य होत असू. त्यानंतर अनेक खोल्या बदलल्या असतील पण त्यानंतरची होळी काही आठवत नाही. गावच्या घरी होळीला गेलो असेन , पण वडे सागोती , शिरवाळ्या पुरती मर्यादित होळी पाहिली. बोंबा लांबूनच ऐकल्या , ऐकू नये अशा शिव्यांच्या लाखोल्या ऐकल्या. त्यांचा अर्थ समजणे आमच्या बालवयाला अवघड असे. त्यांचा अर्थ समजून घेण्याचा कधी प्रयत्नसुद्धा केला नाही. 

          काल परवापासून माझ्या घरात होळीची तयारी सुरु आहे. सहावीतल्या तनिष्काने आमच्या इमारतीमध्ये छोट्यांचा ग्रुपमध्ये गुप्तपणे वर्गणी गोळा करायला सुरुवात केल्याचे सांगितले. रंग , पिचकाऱ्या आणि रंगांचे फुगे यासाठी त्यांचा मौजेचा दिवस जवळ येत होता. मोठ्यांनीही त्यांना वर्गण्या देऊन प्रोत्साहनच दिले होते. आज त्यांचे धुलिवंदन , रंगांची उधळण मजेशीर होणार यात शंकाच नाही. 

          आज धुलिवंदनाची सुट्टी आहे. काल शाळेत मुलांसोबत होतो. सातवीच्या मुलांकडून ' कचरा ' एकत्र करुन घेतला. त्याच्याभोवती गोल साखळी करुन कचऱ्याची होळी केली. सभोवती फिरता फिरता अनेक अभ्यासविषयक खेळ घेतले. मुले खेळता खेळता शिकत होती. होळीचा वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Wednesday, March 16, 2022

🛑 सारखं टोचतंय !!!

🛑 सारखं टोचतंय !!!

          आपल्या आयुष्यात कित्येक गोष्टी टोचणाऱ्या येत असतात. त्या टोचतात आणि टोचतच राहतात. कितीही प्रयत्न केला तरी त्यांचं टोचणं काही कमी होताना दिसत नाही. 

          दोन दिवसांपूर्वी ' फारच  टोचलंय ' हे एकल नाट्य पाहिलं आणि ही गोष्ट अधिक प्रकर्षाने लक्षात आली. खरंच अशा कितीतरी टोचणाऱ्या गोष्टींना घेऊनच आपण आपलं जीवन रडतकडत जगत असतो. 

          आपलं जीवन हे आपलं स्वतःचं असतं. त्यावर जास्तीचा अधिकार आपलाच असतो नाही का ? पण आपलं जीवन अनेकदा दुसऱ्यांकडून नियंत्रित होत राहतं. आपण आपल्या मनासारखं जगू शकत नाही. दुसरे सांगणार तसं जगायचं म्हणजे त्रास होतो ना ? हे जगणं मग जगणं राहतच नाही मुळी. तो एक केविलवाणा प्रवास घडू लागतो. नको असतं, पण करावं लागतं. या नको असण्याची बेरीज वाढली की त्याचं रूपांतर नैराश्याच्या खाईने घेतल्यास ते रुद्ररुप ठरु शकतं. 

          मी एक शिक्षक आहे. मलाही काही गोष्टी टोचत राहतात. एखादी टाचणी टोचावी तशा या गोष्टी आपली पाठ सोडत नाहीत. मी शिक्षक झालो , पण इंजिनिअर झालो नाही ही गोष्ट मला सतत टोचत असे.  पण आता मी खूप सुखी आणि समाधानी आहे. कारण भावी पिढी घडविण्याचे अनमोल कार्य करत आहे हा सुखद विचार मी करत राहतो. मी जगातील सर्वात सुखी माणूस असेन अशीही माझी भावना असते. या भावनेला मी बिलगून राहतो. तसं माझ्या आयुष्यात अनेक टोचणाऱ्या गोष्टींचा शिरकाव होत राहिला आहे. पुढेही तो होत राहील , थांबणार तर नाहीच नाही. पण त्यांचं सततचं टोचणं मला नवीन काहीतरी शिकवणारं असतं. मी ते संयम ठेवून शिकतो आणि पुढे जात राहतो. 

          नोकरीच्या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित होत राहतात. त्या प्रश्नांची उकल मीच शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. कधी प्रश्न पूर्णपणे सुटतात , कधी अर्धे सुटतात. हे अर्धे सुटलेले प्रश्न टोचत राहतात. तेही पुढे पूर्ण सुटतात. अर्थात समस्या या येतच राहणार आहेत , त्याच आपल्यासाठी टोचणाऱ्या टाचण्या आहेत जणू !!! शेवटी टाचणीचं टोकही कधीतरी बोथट होतच ना ?

          नोकरीत असताना नोकरी टोचत राहते. मग नोकरीला कंटाळून व्हीआरएस घेतली तर नंतरचं घराकडचं एकल जीवन टोचत राहील. एखादी गोष्ट केली म्हणूनही टोचणी , ती गोष्ट केली नसेल तरीही टोचणी. मला एक कळत नाही की हे ' सारखं टोचतंय ' हे आपण खूप गंभीरपणे का घेतोय ? ते सहजपणे घेतलं की डॉक्टरांकडे इंजेक्शन घेताना जसं वाटेल तसंच वाटणार. अर्थात इंजेक्शन टोचल्याशिवाय बरंच वाटणार नसेल , तर ते टोचून घेणंही आवश्यकच आहे. ते टोचल्यामुळे माझे बरे होईल ही सकारात्मक मानसिकता महत्त्वाची आहे. काहीतरी चांगले होण्यासाठी ' सारखं टोचतंय ' या गोष्टीचीही गरज आहे असं मला प्रामाणिक वाटतं. 

          काहींना दगडावर झोप लागते , काहींना गादीवरही झोप लागत नाही. म्हणजे दगडावर झोपणाऱ्याला तो खडबडीत दगड टोचत नाही , पण गादी मऊ , लुसलुशीत असूनही ती कशी काय टोचते ? कमाल आहे. म्हणजेच सुखं जास्त मिळू लागली तरीही ती टोचतात. हे म्हणजे असं झालं , फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन चुलीवरची भाकरी मागण्यासारखं. ती भाकरी खरपूस असली तरी गावाकडे जाऊन शेणामातीच्या घरात बसून खाण्यात जे सुख आहे , ते त्या आरसेमहालात कसे असेल ? 

          शिक्षण , घर , नोकरी , धंदा, लग्न , नातीगोती या प्रत्येकात वेगवेगळ्या पद्धतीने टोचणं अनुभवत असताना त्यांचा सामना करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. यात सर्वच यशस्वी होत असतात. लोकमान्य टिळकांनी एकदा म्हटलं होतं , " कितीही संकटे आली , आभाळ जरी फाटलं , तरी त्यावर मी पाय ठेवून उभा राहीन. " त्यांनी असं म्हटलं नसतं तर आज आपण स्वराज्यातील हे सुखमय दिवस कदाचित पाहू शकलो नसतो. सारख्या टोचणाऱ्या या टाचणीच्या टोकाला बोथट करण्याचं सामर्थ्य प्रत्येकात आहे , ते त्या त्या वेळी आपल्यातून बाहेर काढणं ही आजची आत्यंतिक गरज आहे. मग ' सारखं टोचतंय ' असं रडगाणं आपण कधीच रडत बसणार नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Monday, March 14, 2022

जिल्हा सचिव सुधीरसाहेब

🛑 जिल्हा सचिव सुधीरसाहेब

          सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटना गेली कित्येक वर्षे जोमाने कार्य करत आहे. त्यासाठी जी जिल्हा कार्यकारिणी आहे , त्यांची जाणीव जागृती आणि ज्ञाती बांधवांबद्दल असलेली आपुलकी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यात जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर साहेब यांचे कार्य अद्वितीय असेच आहे. त्यांना साथ देणारी त्यांची कार्यरत कार्यकारिणी त्यांच्या कायमच सोबत राहिलेली आहे. 

          कुडाळ पिंगुळीचे मूळ वालावलचे आमचे सचिव सुधीर चव्हाण यांचे कार्य त्यात लक्षात घेण्यासारखे आहे. ज्या ज्या वेळी  जिल्ह्याचे उपक्रम असतात , त्या त्या वेळी त्यात हिरीरीने सहभाग घेणारे व कार्यक्रमांची अंमलबजावणी करणारे सुधीर चव्हाण कायमच अग्रस्थानी असलेले दिसून येतात.

          हल्लीच त्यांच्या आईचे निधन झाले तेव्हा त्यांच्यावर मोठे संकट कोसळले होते. ते पुरते कोलमडून गेलेले दिसले. त्यांना उठताही येत नव्हते. त्यांना पाहून आम्हाला आमच्या आईची आठवण आली. खरंच आई गेल्यानंतर काय अवस्था होते , याची आम्हालाही कल्पना होती. पण सुधीरजी खूपच हळवे आहेत. त्यांना दोन मुली आहेत. त्यासुद्धा खूप हुशार आहेत. 

          वधु वर मेळाव्याच्या आयोजनात सुधीर साहेबांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसली. कोणी कोणाचे स्वागत करायचे हे त्यांनी सर्व नियोजनबद्ध करून माझ्याकडे दिले होते. सचिव कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुधीरजी आहेत. सूत्रसंचालन करतानाही मला त्यांनी अनेक ठिकाणी महत्त्वाच्या टिप्स दिल्या होत्या. सर्वसामान्यांसारखे सलून दुकानात काम करता करता असे काम करणे कठीण असते. पण त्यांना त्याचे काही वाटत नाही. त्यांची सेवाभावी वृत्ती असल्याने ते संघटनेचे कार्य आनंदाने न थकता करताना दिसतात. 

          जिल्ह्याचे सर्व कागद काळजीपूर्वक जपून ठेवणे , हिशोब ठेवणे ही सर्व कामे ते करताना बघून आम्हाला त्यांच्याकडूनही काही शिकायला मिळते. त्यांचा आर्थिक कारभार अगदी पारदर्शक असतो. 

          नुकताच त्यांना पडवे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. ते दवाखान्यात असताना त्यांना मी सपत्नीक भेटायला गेलो होतो. त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांना नीट बोलताही येत नव्हते. त्यांचा बोलताना धाप लागत होती. त्यांना पित्ताशयाचा त्रास होत होता. त्यावर शस्त्रक्रिया करुन आता त्यांची तब्येत साधारण बरी आहे. तरीही त्यांना आता भविष्यात अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांना डॉक्टरांनी काळजी घ्यायला सूचना दिल्या आहेत. या सर्व सूचनांचे ते काटेकोर पालन करतीलच. आता ते काही काळ दुकानात जाऊन काम करु लागले आहेत. 

          सुधीर साहेबांचा हा त्रास लवकरच पूर्णपणे बरा होवो अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना त्यांच्या प्रकट दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आमचे जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्य करण्यासाठी व पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...