Wednesday, December 30, 2020

संगीतवही कुठे आहे ?

 संगीतवही कुठे आहे ?

        मला त्यावेळीपासूनच संगीत विषयाची खूप आवड होती. आवड होती म्हणून सवडही मिळायची. कणकवली डी.एड्. कॉलेजला असताना घडलेली घटना माझी फजिती करणारी जास्त आहे. परिपाठात प्रार्थना , समुहगीते आणि संस्कारगीते सादर करावी लागत. मला परिपाठ आवडे तो यामुळेच. 

          पण कथाकथन , वक्तृत्व आणि निवेदन यात मी भाग घेत नसे. मला प्रतिज्ञा म्हणतानाही थरथरायला होत असल्याचे जाणवे. एक हात करुन पुढे प्रतिज्ञा म्हणताना माझा हात थरथरताना मी कित्येकदा प्रत्यक्ष पाहिलाय. पण गाणं म्हणताना कसातरी आत्मविश्वास आणून गायन करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असे. मी जरा लयीत आणि सुरात होतो कदाचित. पण तालाचा अद्याप पत्ता नव्हता. बोंडाळे मॅडम संगीत छान शिकवत. त्यांच्या आवाजाने भारावून जायला होई. 

          पेटी वाजवताना मॅडम तल्लीन होऊन गाऊ लागल्या कि मला आपणही गायला पाहिजे असे वाटत राही. त्यामुळे सहाजिकच मी त्यांनी शिकवलेली गाणी घरी येऊन म्हणू लागलो. सेकंड इयरच्या मुलांमधील सर्वच उपक्रमांमधील क्रियाशीलता बघून आम्ही सगळेचजण भारावून गेलो होतो. भावी आदर्श शिक्षक घडण्याची सुरुवात साक्षात पाहात होतो. मलाही त्यांच्यासारखे करायचे आहे ही ऊर्मी माझ्यात डोकावत होती. मी त्या ऊर्मीला वाट देत गेलो. आमचा पूर्ण वर्गच विविध व्यक्तिमत्वांनी संपन्नच होता. प्रत्येकजण एकमेवाद्वितीयच होता. मीच लाजराबुजरा होतो. हेसुद्धा माझे आगळेवेगळेपण असेलही. 

          मला संगीत विषयाची सर्व वही लिहून काढायची होती. मी ती जीवापाड जपत असे. त्यामुळे माझ्या संगीत वहीवर सर्वांचा डोळा होता कि काय नक्की सांगता येणार नाही. पण सगळेच माझी वही घेऊन आपला गाण्यांचा संग्रह वाढवत चाललेले मला आवडतही होते. एकदा असाच वर्गात असताना संगीतच्या तासिकेला माझी वही मला सापडेना. मी सगळीकडे शोधली. पण व्यर्थ !  काहीच उपयोग झाला नाही. सगळ्यांना विचारले. सगळ्यांची बाके तपासली. संगीत वही सापडली नाहीच. 

          मी अक्षरशः रडकुंडीला आलो होतो. मी रडायचा फक्त बाकी होतो. सगळेजण माझा चेहरा बघून ओळखून गेले होते. माझी फजिती करण्यासाठी कुणीतरी माझी संगीतवही मुद्दाम लपवून ठेवली होती. पण मी त्यांची ती गंमत समजू शकलो नाही. शेवटी अश्रू अनावर झाले. मी स्फुंदु लागलो आणि चरफडू लागलो. सर्वजण ' काय झाले रे प्रवीण  ? , आता बरा होतास ? या सोज्वळ आविर्भावात. मी त्यामुळे आणखी डिवचला जाई. शेवटी ज्याने वही लपवून ठेवली होती, त्याला माझा अधिक अंत पाहवेना. दोन दिवस मी वहीच्या शोधात होतो. घरी शोधली. दुकानात शोधली. घरचे सगळेजण मलाच दोष देत होते.

          माझा बेंचमेट संजय शेटे सुद्धा त्यांच्यात सामिल होता. दुसऱ्या दिवशी ' संतोष मधुकर तुळसकर ' ने माझी वही आणून दिली. आदल्या दिवशी त्याने वहीला वाळवी लागल्याचे खोटेच सांगितले होते. माझी संगीत वही मिळाली म्हणून माझा चेहरा खुलला. त्या वहीसाठी मी माझ्या भावासारख्या मित्रांबद्दल राग राग केला. ते माझे सर्व मित्र (  मैत्रिणी ) आता विविध शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करत आहेत. फक्त ज्याने माझी वही लपवून ठेवली तो संतोष आज हयात नाही याचे वाईट वाटते. 

          खेडला क्षमताधिष्ठित प्रशिक्षण असताना पहाटे नदीत आंघोळीला गेलेला आमचा संतोष गेला तो परत आलाच नाही. संगीतवही कायमची हरवली असती तरी चालले असते , पण आमचा सर्वांना आनंद देणारा संतोष हवा होता. संतोषच्या परिवाराच्या आयुष्यातील संगीत कायमचे बेसूर झाले.


© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )



टचस्क्रिन

 टचस्क्रिन        

        मला खरंच कमाल वाटते, पूर्वी लेखनाची साधने नसताना लेखन केले गेले आहे. , कवी, लेखक यांनी जर लेखन केले नसते तर आज जे आपण वाचन करतोय ते आम्हाला वाचायलाच मिळाले नसते. कसा, कधी वेळ काढत होते लिहायला ? आणि असे काही लिहित कि कधी पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटत राहाते. संग्रह करावासा वाटतो. अधोरेखित करुन ठेवावी अशी वाक्यरचना. 

          मी लहान असताना मला बाबांनी पेन्सिल दिली आणि हात धरुन लिहायला शिकवले. ताईने अक्षरे गिरवून घेतली. तेच तेच अक्षर गिरवताना ते चुकू नये यासाठी आकाने लक्ष ठेवले. आईने पाटी स्वच्छ पुसून दिली. रात्री घरी आल्यानंतर बाबांनी ती तपासली. पुन्हा पुन्हा हस्ताक्षर सराव करुन घेतला. अक्षर वाचावे असे वाचणार्‍याला वाटावे असा बाबांचा आग्रह. ताईचे मोत्यासारखे वळणदार अक्षर काढण्याचा माझा प्रयत्न असे. तिच्या अक्षराशी तुलना नाही होऊ शकत, पण शाळेत जाण्यापूर्वी मी घरच्या घरी अ, आ, ई काढायला शिकलो. 

          शाळेत जायची मला भिती वाटे. जबरदस्तीने शाळेत पाठवले गेले. मला पहिलीच्या वर्गात बसवण्यात आले. मी उठून ताईच्या वर्गात गेलो. ताईने मला पुन्हा पहिलीच्या वर्गात बसवले. मग आकाच्या वर्गात गेलो. आकाने मला पहिलीच्याच वर्गात सोडले. मी रडू लागलो. मला आईची आठवण येत होती. मी आवाज वाढवला तरी मला कोणीही घरी सोडायला तयार नव्हते. मग काय गप्प राहण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्या वर्गात आणखी इतर मुले माझीच नक्कल करत होती. 

          बाई वर्गात आल्या. मोठ्या आवाजात त्यांनी सर्वांना बसायला सांगितले. मी बसलो आपला. पण बाईंना बघून मला आईची अधिकच आठवण येऊ लागली. ' मला आईकडे जायचंय ' असं मला सांगायचं होतं. पण बाईच म्हणाल्या, " बाळा, रडू नको हो. तुला आईकडे जायचंय ना ? थांब हं, मी तुला आईकडे नेऊन सोडते." आता मला धीर आला. मला बाईंमध्ये माझी आई दिसू लागली. मला बरे वाटले. मी वाट पाहू लागलो. आता मला बाई माझ्या आईकडे सोडतील. पण बाईंनी दुसऱ्या मुलांनाही तसेच सांगितले आणि गप्प केले. न मारता , डोळे न वटारता बाईंनी संपूर्ण वर्ग शांत केला होता. 

          काळ्या शहाबादी फरशीवर थंडगार वाटत होते. दोन सुटलेल्या फरश्यांमधील वाळू मला खेळायला मिळाली होती. मी वाळू काढून काढून खेळू लागलो. बाईंचे माझ्याकडे लक्ष नाही हे माझ्या लक्षात आले. मी हळूच दप्तरासह बाहेर पळालो. आता मला ताईकडे किंवा आकाकडे जायचे नव्हते. कारण त्या मला पुन्हा पहिलीच्याच वर्गात सोडणार हे मला कळून चुकले होते. 

          मला वाट माहिती होती. आमचे दुकान शाळेपासून जवळच होते. कणकवली ढालकाठीजवळ आलो. बाबा दुकानात कोणाचीतरी दाढी करत असावेत. मला बघून त्यांचा पारा चढला. अ, आ शिकवताना प्रेमाने जवळ घेऊन शिकवले होते , आता मात्र त्यांनी दुकानातली झाडूच काढली. मला मारण्यासाठी त्यांनी झाडू माझ्यावर नुसती उगारली आणि म्हणाले,  " झिला, तुका मी आता मुगड्यान मारतलंय." मला बाबांचा मार चांगलाच माहिती होता. मी बाबांना हात जोडले आणि मारु नका म्हणून विनवणी करु लागलो. मला त्यांनी मारत मारत शाळेत सोडले. बाईंनाच सांगितले , " बाई , हा तुमचा विद्यार्थी घ्या, आमच्या दुकानात आला होता. शाळा सुटल्याशिवाय याला घरी पाठवू नका. " आता मला बाई मारणार याची मला पुरेपुर खात्री झाली होती. पण उलटच झाले. बाईंनी मला आईसारखे जवळ घेतले. आपल्याकडचा फळ्यावर लिहायचा खडू घेतला आणि म्हणाल्या , " प्रवीण, हा खडू घे आणि फळ्यावर ' अ ' काढ. " मी दोन गोळे काढले आणि एक काठी काढली. दोन्ही गोळ्यांचा अर्धा भाग पुसून ' अ ' तयार केला. मला बाईंनी पाठीवर शाबासकी दिली. त्यानंतर मला त्या तावडेबाईंची भिती वाटेनाशी झाली.

          आता मला हे सर्व आठवतं आणि मलाच माझी गंमत वाटते. सर्वजण यामधून गेले असतील. मोठे लेखक झाले असतील. अनेक पुस्तके लिहिली असतील. आता मी एक साधा उपशिक्षक आहे. बाईंनी मला पहिल्या दिवशी विद्यार्थी म्हणून फळ्यावर लिहायला सांगितले होते. आता मी कायमच फळ्यावर लिहितोय. 

          आज मी जे काही लेखन करतोय, त्यासाठी प्राथमिक शाळेत माझ्यावर झालेले संस्कारच कारणीभूत आहेत. आताची मुले मोबाईल या यंत्रांच्या ' टचस्क्रिन ' वर शिकत आहेत. काहीही झाले तरी मला माझा फळा आणि पाटीच खरी ' टचस्क्रिन ' वाटते. यांची संगत सर्वांनी करायला हवी. नाहीतर काही वर्षांनंतर आपण पेनाने , खडूने लिहायचे विसरुन जाऊ याची मला भिती वाटत राहते. संगणकाचा आणि मोबाईलचा कीबोर्ड आपलासा केलात तरी आपली खरी टचस्क्रिन कधीही विसरु नका. 



© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )





नागपंचमी आणि उष्टी पाने

      नागपंचमी आणि उष्टी पाने

    आमचा किर्लोस गांव आता आंबवणेवाडी या नावानेदेखील ओळखला जातो. आमचा आंबवणे गाव आता महसुली गाव झाला आहे. नागपंचमीच्या दिवशी पाऊस अगदी बेसुमार पडत होता. आमच्या वरवडे कासरल बंधाऱ्यावरून पाणी वाहून जाताना दिसत होते. पाण्याचा वेग वाढत चाललेला दिसत होता. तरीही आमची घरी जायची ओढसुद्धा तितकीच वाढत चालली होती.  कधी एकदा घरी पोहोचतो असे झाले होते. ही  ओढ नागोबासाठी  आणि आमच्या घराच्या माणसांसाठी अधिक होती. नदीच्या पलीकडे आमचा गाव असल्यामुळे काहीही झाले तरी नदी पार करून जाणे भागच होते. मग आम्ही ठरवले कि, गाडी अलीकडेच ठेवून लोखंडी साकवावरून जायचे. 

          आम्ही गाडी अलीकडे सुरक्षित ठिकाणी लावली आणि चालत- चालत आमच्या घराच्या दिशेने निघालो. वाटेतील वर्षा ऋतूचा वर्षाव धो- धो सुरु होताच. पण त्यातही एक अनोखी गंमत अनुभवत शेतीच्या मेरेवरून चाललो होतो. चालता- चालता  नदी कधी आली ते समजले देखील नाही.  नदीच्या वर आम्ही फक्त १०-१५ फुटांवरून साकवावरून जात होतो. नदीचे पाणी अतिशय वेगाने समुद्राला भेटायला चालले होते. तो वेग इतका भयानक होता कि तो वेग पाहून आमचे डोळे गरगरायला लागले. पण नदीचे ते रौद्ररूप पाहून निसर्ग आपल्यावर इतका का कोपला आहे याचा प्रश्न मला पडला. 

          लांबलचक लोखंडी साकव एकदाचे पार करून आम्ही आमच्या शेतमळ्यांमध्ये प्रवेश केला. शेत छान डुलत होतं . आम्हाला जणू बोलावत होतं . आमचं  स्वागत करत होतं . बऱ्याच दिवसानंतर हिरवे हिरवे गार गालिचे पाहण्याची संधी उपलब्ध झाली होती. आम्ही ते आमच्या डोळ्यात साठवून ठेवत होतो. निसर्गाने दिलेले ते अविस्मरणीय क्षण टिपताना आमची त्रेधा होत होती. काय पाहू आणि काय नको असे झाले होते. मस्त मजेत रमत गमत आम्ही आमच्या घरी कधी पोचलो ते समजलेदेखील नाही. 

          आमची श्रीगणेश चित्रशाळा समोरच होती. त्यात प्रथम प्रवेश केला. गणेशाच्या अप्रतिम मातीच्या मूर्ती पाहून पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तेव्हा आम्ही भावंडे मातीच्या मूर्ती बनवताना तासनतास आमच्या चित्रशाळेत बसून आमच्या  बाबांची,काकांची बोटे मातीत कशी लीलया फिरत त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत असू. नागोबा बनवून त्यांना रंग देण्यास बाबा आम्हास सांगत. आम्ही नागोबा बनवून ते रंगवताना आमचे भान हरवून जात असे. कोण आनंद होई त्याचे शब्दात वर्णन करणे खरेच कठीण आहे. 

          घरी आलो. मस्त वाफाळलेला चहा घेतला. आमच्या बाबांनी  बनवलेला, भावाने रंगवलेला मातीचा नागोबा पाटावर घेऊन मी घरी  आणला. सोबत सर्व लहान मुले जल्लोष करत होतीच.बबली आणि गुड्डी नागोबा विकून आलेले पैसे मोजण्यात दंग झाली होती.

          बाबानी नागोबाचे पूजन सुरु केले. नागोबा पूजन सुरु असताना आम्ही सर्व मंडळी त्यांच्या भोवती बसून होतो. लाह्यांचा नैवेद्द्य,  दुर्वा, फुले,बेलाची पाने आणि सुंदरशी रांगोळी असा सोहळा संपन्न होत होता.  सुखकर्ता  दुःखहर्ता ,  लवथवती विक्राळा अश्या आरत्या म्हणत सर्वांनी नागोबाचे मनोभावे पूजन केले. नंतर  केळीच्या पानावर भोजन वाढण्यात आले. साधा पांढरा भात , गोडी डाळ, कारल्याची भाजी,  जिलेबी,पापड, वाटाणे- बटाट्याची तिखट भाजी, मोदक असा मस्त बेत काकींनी केला होता. त्यांनी त्यात आपले प्रेम भरभरून ओतले होते. सर्वांनी आपापली पाने  संपूर्णपणे स्वच्छ केली होती. स्वाद काही औरच होता त्या  भोजनाचा. वर्षातून एकच असा दिवस असतो ज्या दिवशी आम्ही घरातील सर्व मंडळी एकत्र असतो. काहीही झाले , किंवा कितीही अडचणी आल्या तरी आम्ही सर्व कुटुंबीय या दिवशी एकत्र  येतोच.

          त्यालाही कारण तसेच आहे. बाबांच्या बालपणीची गोष्ट आहे. नागपंचमीचा दिवस होता. सर्वजण जेवायला बसले होते. माझे बाबासुद्धा जेवत होते. आजीने खीर बनवली होती. माझ्या बाबांना ती खूपच आवडली. त्यामुळे त्यांनी खीर पुन्हा पुन्हा मागून घेतली. आजी जेवली नव्हती. आजोबा जेवल्याशिवाय आजी जेवायला बसत नसे. सर्वांची जेवणे  झाली. आता आजी जेवायला बसली. बाबा तिच्या जवळच रेंगाळत होते. जेवल्यानंतर मुलांनी खाल्लेली खिरीची पाने आजी  चाटू लागली. ते माझ्या बाबांनी पाहिले  व आजीवर ओरडले. म्हणाले, आज सणादिवशी तू आमची पाने चाटून खातेस म्हणजे काय ? हे काही बरोबर नाही. सर्व भावंडांनी ते ऐकले व बाबांवरच ओरडायला लागली, ' तू आईच्या वाटणीची सर्वच्या सर्व खीर फस्त केलीस , त्यामुळे आईसाठी अजिबात खीर उरली नाही. तुझ्यामुळेच तिला आमची सर्वांची पाने चाटण्याची  वेळ आली आहे. तूच या गोष्टीला जबाबदार आहेस.'  हे ऐकल्याबरोबर माझ्या बाबांच्या सर्व प्रकार लक्षात आला. ते सरळ आजीच्या कुशीत शिरले आणि मोठ्याने रडू लागले. आजी म्हणाली , ' अरे बाळा, तू खीर खाल्लीस तेव्हाच माझे पोट  भरले, पण मी केलेली खीर कशी होती ती मला  बघायची होती, म्हणून मी माझ्या मुलांनी उष्टी पाने चाटून खात होते, तू वाईट वाटून घेऊ नकोस , आपल्याला यापेक्षा चांगले दिवस येतील तेव्हा तू मला आणखी चांगले पदार्थ खाऊ घालशील आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करशील ना ? आजीचे ते शब्द ऐकून त्यादिवसापासून माझ्या बाबांनी लहानपणीच ठरवले कि काहीही झाले तरी आपण आपली परिस्थिती बदलायचीच. म्हणून नागपंचमीचा तो दिवस बाबांच्या आणि आता आमच्याही आयुष्यातील एक अविस्मरणीय सण  आणि अविस्मरणीय क्षण बनला आहे तो यासाठीच. 

          संध्याकाळी नागाचे विसर्जन केले आणि आम्ही परत कणकवलीला येण्यासाठी बाहेर पडणार होतो. पण बाहेर पावसाने अगदी उधाण मांडले होते. तो आम्हाला बाहेर पडायला  देत नव्हता. शेवटी आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला. रात्रीपर्यंत नदीचे पाणी आमच्या घराच्या खालच्या कोपऱ्यापर्यंत येऊन पोहोचले होते. सर्वजण झोपण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते, पण पावसाचे पाणी आमच्या घरात घुसेल या भीतीने अनेकांची झोपच उडाली होती. सकाळी दुसऱ्यादिवशी आज पाणी वाढलेच होते. कमी होण्याची शक्यता नव्हतीच. शेवटी खाजगी गाडी करून आम्हाला आमच्या कणकवलीत घरी यावे लागले. शासनाने सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केल्याचे आम्हाला समजले आणि जीव भांड्यात पडला. कारण आम्हाला शाळेत जायचे नव्हते. दोन दिवसांच्या पाणीमय आठवणी सर्वांच्या डोळ्यात पाणी आणत होत्या. 


        © प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )

आमचे बाबा : एक अनमोल ग्रंथच

आमचे बाबा : एक अनमोल ग्रंथच         

            ९ ऑगस्ट क्रांतिदिनाच्याच दिवशी आमच्या घरात एक क्रांतिकारक जन्माला आले. आमच्या आयुष्यात क्रांती घडवणारे अनोखे व्यक्तिमत्त्व जन्माला आले तो हाच दिवस. आमचे बाबा आता ७४ वर्षांचे झाले. मला समजायला लागल्यापासून आमच्या सर्वांवर अतिशय प्रभाव असणारे आमचे बाबा अजूनही आमच्यासाठी मार्गदर्शकच आहेत. त्यांनी दिलेली शिकवण आम्हाला प्रगतीच्या दिशेने नेणारी ठरली. आमचे पिरगळलेले कान  याची साक्ष आहेत. 

          आमच्या पाठीवरील दिलेली प्रेमाची थाप आमच्या  अंगावर एक एक मूठ मांस चढवत गेलेली. त्यांनी दिलेला आश्वासक प्रत्येक शब्द त्यांनी पाळला . आज आपण शब्द देतो, पण किती पाळतो. परंतु बाबा शब्दाला पक्के. त्यांनी एकदा शब्द दिला कि काहीही झाले तरी , त्या दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी जीवाचा आटापिटा करतील पण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचा आत्मविश्वास प्रबळ. त्यांनी कधी कशात माघार नाही घेतली. सर्व कामे वेळच्या वेळी झाली पाहिजेत असा त्यांचा दंडक अजूनही आहे.

          त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदरयुक्त भीती आहे. त्यांनी आम्हाला नेहमी पुढे पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. कधी मागे ओढले नाही. आम्ही अभ्यासात नेहमी पुढे असावे यासाठी ते नेहमीच आग्रही भूमिका धरत. कधी कधी आम्हीच घाबरत घाबरत आमचे प्रगतीपत्रक दाखवत असू. चांगले गुण  मिळूनसुद्धा  ते प्रगतीपत्रक दाखवताना पोटात भीतीचा भलामोठा गोळा येई. आता बाबा काय म्हणतात कोण जाणे.पण त्यांनी आमच्याकडे पाहिलेली प्रेमाची नजर आमची भीती पळवून लावी. 

          आम्ही मग सर्वजण त्यांच्या मांडीवर बसून स्वर्गसुख घेत असू. त्यांची मांडी आमच्यासाठी राजाची गादीच असे. कारण त्यावर बसायला मिळणे ही साधी गोष्ट नव्हती. त्यावर मी बऱ्याचदा हक्क सांगत असे. त्यावरून आम्हा पाच भावंडांमध्ये वाद होत. पण मी काही केल्या माझे आसन सोडण्यास तयार नसे. शेवटी मी विजयी मुद्रा करून त्यांच्या मांडीवर ठाण  मांडून बसत असे आणि मी कसा जिंकलो आणि बाकी कसे हरले याचा आनंद घेत असे. म्हणून मी त्यांचा लाडका होतो असे नाही. त्यांना आम्ही सर्व भावंडे लाडकीच होतो. कोणालाही त्यांनी कधी कमी स्थान दिले नाही. 

          माझा छोटा भाऊ , आम्ही मोठी भावंडे त्याला न्हानू म्हणतो. त्याच्या उचापती करण्यामुळे त्याला बऱ्याचदा बाबांचा मार खावा लागला आहे. त्याच्यावर आईचे जीवापाड प्रेम होते. त्याला अचानक आकडी येत असे. तो रागाने आपले डोके भिंतीला किंवा जमिनीला आपटून घेत असे. त्यामुळे त्याला आईकडून कमरेवर घेऊन भरवणे होत असे. बाबा त्याला जवळ घेऊन समजावत असत. पण एकाच दिवसात तो ते विसरून जाई आणि आपल्या खोड्या सुरूच ठेवी. त्यामुळे त्याला प्रसाद मिळे. मार खाऊनही त्याला पुन्हा खोड्या करणे जमत असे. त्यामुळे त्याला बाबांची भीती वाटे. आपण कोणतीही गोष्ट केली तर बाबा आपल्यावर रागे भरतात असा  त्याचा समज त्यामुळे अधिक दृढ होत गेला. आता मात्र तो बाबांसाठी जे काही करतो आहे, ते बघून आम्हाला आमचा पूर्वीचा न्हानू आठवतो आणि त्याच्याबद्दलचा अभिमान अधिक दुणावतो. कारण आता आमचा न्हानू खूप ग्रेट झालेला आहे. त्याने फक्त बाबांबद्दल गैरसमज असतील तर ते घालवून शुद्ध व्हावे. कारण काहीही झाले तरी बाबा आपल्याला आपल्या  हिताचेच सांगतात. 

          न्हानूच्या नोकरीसाठी बाबानी केलेले प्रयत्न आणि त्यावेळी त्यांची होणारी घालमेल मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. बाबांनी आम्हा सर्वांना सुखात साथ दिलीच, पण दुःखात  ते आमच्या जास्त सोबत राहिलेले आहेत.

          मला डी एड ला पाठवण्याचा निर्णय त्यांचाच होता. त्यामुळे आज मी एक चांगला शिक्षक बनू शकलो. आमचे बाबा शिक्षक बनू  शकले नाहीत, काही काळ त्यांनी शिक्षकी पेशाचा अनुभव घेतलेला आहे, म्हणून त्यांचे स्वप्न होते कि माझ्या मुलांना मी शिक्षक बनविन. त्यांनी त्यांचे स्वप्न सत्यात उतरविले. आज त्यांचे दोन्ही मुलगे शिक्षक आहेत.  बाबा सगळ्यांना शिक्षकच वाटतात. त्यांनी शाळेत शिकवले कमी , पण आमच्या आयुष्यरूपी शाळेत त्यांनी आम्हाला वेळोवेळी जे शिकवले ते शाळेपेक्षाही अधिक लाखमोलाचे आहे. 

          त्यांच्याबरोबर माझे बऱ्याचदा वाद होतात, पण मी चुकीचा आहे हे मला नंतर पटते, पण माझे बोलणे ते सहन करण्याची शक्ती त्यांच्यात आहे. त्यांच्यासारखा मी कधीच होऊ शकत नाही.


            © प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )

माझी मम्मी आणि भाऊ कुठंय ?

 माझी मम्मी आणि भाऊ कुठंय ?          

    आज ती हयात नाही. पण तिच्या आठवणी सदैव माझ्यासोबत आहेत. ती जाऊन अनेक वर्षांचा लोटला आहे. तिची आठवण रोज मला येते. आज तिची मुलगी म्हणजे आमची मुलगी हर्षदा उर्फ छकुली १३ वीत  शिकत आहे या गोष्टीचा आनंद आहे. ती अगदी आपल्या आईच्या वळणावर गेली आहे. बोलते तशी, वागते तशी, तिचा माझ्या मुलीला फक्त चारच  वर्षाचा सहवास लाभला. तिची मम्मी तिला सोडून जाताना ती फक्त चार वर्षांची छकुली होती. तिला आपल्या मम्मीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला कधी एकदा बघतो असे झाले होते. पण नियतीला असे घडणे मंजूर नव्हते. गरोदरपणात ८ व्या महिन्यात मुलगा पोटातच दगावल्याने माझी पत्नी असह्य वेदना सहन करत होती. शेवटी डॉक्टरच हतबल झाले. त्यांनी हात टेकले. त्यांच्याने पुढील उपचार करताना होणारा धोका आम्हाला समजावून सांगितला. पण आम्ही बाळ गेले तरी आपली पत्नी व्यवस्थित असेल या भावनेने डॉक्टरांना धन्यवाद देत राहिलो. डॉक्टर आम्हाला दिलासा देत होते. आम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवून होतो. पण डॉक्टर देव नसतो, हे तेव्हा मला कळले. माझ्या समोर अखेरचा श्वास घेताना माझी ऐशू माझ्याशी शेवटची बोलत होती. तिला अतिशय घाम आला होता.

          तिला समजले कि आता मला जगणे शक्य नाही, तिला रक्तदाबाने घेरले. अतिशय कमी रक्तदाब असल्याने तिने आपले डोळे पांढरे केले. डॉक्टरांनी आपल्या पद्धतीने पुरेपूर प्रयत्न केले , पण व्यर्थ.....तिचे प्राण निघून गेले होते....परत पुन्हा न येण्यासाठी. ....मी एकटा पडलो होतो...सात वर्षे जिने मला अतिशय प्रेमाने साथ दिली होती ती माझी प्रिय पत्नी अखेरच्या घटका मोजत असताना मी पुरता ढासळून गेलो होतो. मी..तेव्हा मी राहिलो नाही....अक्षरशः वेड्यासारखा बरळत राहिलो. डॉक्टरांना काहीबाही बोललो...तेव्हा माझा राग अतिशय अनावर झाला होता...मी पिसाळलेल्या माणसासारखा हॉस्पिटलच्या बाहेर जे बडबडत होतो ...ते आता आठवले तरीही माझा थरकाप होतो...मला खूप त्रास झाला सत्य स्वीकारायला. पण अखेर सत्य स्वीकारणे भाग होते. माझ्या मुलीचा चेहरा मला दिसू लागला. तिला जेव्हा आपला भाऊ गेल्याचे समजले तेव्हा मी तिला कसे तरी समजावून सांगितले...म्हणालो, बाळा, तुझा भाऊ  खूप चांगला होता , पण तो देवाला आवडला असेल म्हणून त्याने त्याला आपल्याकडे नेले.....हे सांगितल्यानंतर ती एवढी रडली कि म्हणाली...पप्पा, मला माझा भाऊ हवा होता हो...माझ्याशी खेळायला तुम्ही मला भाऊ आणून देणार होतात तर मग मी आता कोणाशी खेळू ? गेले आठ महिने मला तुम्ही मला बाळ येणार ...बाळ येणार म्हणून सांगत होतात ...मग असं कसं  झालं ? ....आणि तिला समजावताना माझ्या नाकी नऊ आलेल्या...आता तर तिची मम्मा देखील हे जग सोडून गेली होती...आता हे तिला कसं  सांगायचं ? ....मन घट्ट केलं आणि तिला म्हणालो, बाळा, आपलं बाळ गेलं देवबाप्पाकडे....मग त्याला सांभाळायला कोण ? त्या बाळाला सांभाळायला तुझ्या मम्मीला देवबाप्पाकडे जावं लागलं....हे ऐकल्यानंतर तिने जो हंबरडा फोडला होता....तो मला आठवतो आणि हा लेख लिहितानाही माझ्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत.....खूप कठीण काळीज केलं आणि माझ्या प्रिय पत्नीचं जाणं गिळून टाकलं...ठरवलं कि आता मला माझ्या मुलीसाठी छकुलीसाठी जगायचं आहे...तिच्याशी नंतर मी इतकी मैत्री केली कि ती आपल्या मम्मीला विसरली...त्यासाठी मला तिची मम्मा आणि पप्पा या दोन्ही भूमिका बजावाव्या लागल्या.आता मी दुसरे लग्न करून चांगले आयुष्य जगतोय. दुसरी पत्नीदेखील जीवापाड प्रेम करणारी मिळालीय. पण तरीही कधीतरी अनेक प्रश्न मनात  काहूर आणून जातात. 


© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )

मुले ही देवाघरची फुले आहेत

 मुले ही देवाघरची फुले आहेत

        नेहमीप्रमाणे शाळेची संपूर्ण आवारसफाई करण्यात आली. सर्व मुलांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. बागेची सफाई केली. सर्व तण काढून टाकले. काढलेले रान शोषखड्ड्यांमध्ये टाकण्यात आले. रंगमंचाची घासून स्वच्छता करण्यात आली. सर्व मुले आनंदाने न थकता कामे करत होती.  शिक्षकवृंद त्यांना मदत करत होते. आपली शाळा स्वच्छ दिसली पाहिजे हा एकाच ध्यास मुलांनी घेतला होता. शाळेतील सर्व मुले खूप चांगली आहेत. शिक्षकांचा अतिशय आदर करणारी आहेत. शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करणारी आहेत. शिक्षकांना विचारून व परवानगी घेऊनच जबाबदारीची कामे करणारी मुले काम करताना कामात दंग होऊन जातात. शिक्षक स्वतः देखील मुलांसोबत काम करतात. तेव्हा मुले म्हणतात, सर, तुम्ही नका करू, आम्ही करतो. हातातली झाडू ओढून घेतात.

          सर्व छोटी चिमुकली मुले काम करताना आपले भान हरपून जातात. त्यांना करण्यास सांगितलेली गोष्ट करतातच आणि ती गोष्ट पूर्ण झाली कि आणखी अधिक काम काय करायचे ते विचारतात. मी हे करू , मी ते करू असे करत जास्तीत जास्त काम करत राहतात. मग ती मुले ऊन पावसाची पर्वा करत नाहीत. काम पूर्ण होणे महत्त्वाचे हे त्यांचे उद्दिष्ट ठरलेले असते. ग्रामीण भागातली मुले आहेत. अजून आपल्या परंपरा जपत आहेत. त्याला फक्त विज्ञानाचा स्पर्श दिला कि झाले शिक्षण. 

आपली शाळा , माझी शाळा सुंदर शाळा आणि ती स्वच्छ असली पाहिजे, त्यामुळे स्वच्छतेचा वसा  घेतलेली ही  मुले खरंच किती चांगली आहेत. अजून त्यांना बाहेरच्या जगाचं  वारं  लागलेलं  नाही. अतिशय निरागस आणि शिक्षकांवर निरतिशय प्रेम करणारी मुले. प्रत्येक शाळेत अशीच मुले असावीत, त्यांना शिकवताना निसर्गात जावे, निसर्ग दाखवावा, कधी कधी ही मुलेच  खूप काही आपल्याला शिकवून जातात. कारण निसर्गाच्या सान्निध्यात दीर्घकाळ वास्तव्य करणारी ही  मुले निसर्गकन्या, निसर्गपुत्र आहेत. रानातल्या भाज्या शाळेत आणून त्यांची नावे  सांगतात. त्यांच्याबरोबर संवाद साधताना खूप चांगला अनुभव येतो. आपण त्यांना शिकवतोय कि तीच आपल्याला शिकवताहेत तेच कधी कधी समजायला मार्ग नसतो.

          ही मुले म्हणजे आमच्यासाठी देवच आहेत. कारण त्यांच्यामुळे आम्हाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. भरपूर मुले आणि त्यांच्यासमवेत दिवस कधी निघून जातो हे समजतसुद्धा नाही. शाळेचा रम्य परिसर, भव्य क्रीडांगण यात शाळेला प्राप्त असलेल्या अधिक उत्तम सुविधा , दानशूर ग्रामस्थ , मार्गदर्शक अधिकारीवर्ग आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने आमची शाळा अधिकाधिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल यात शंका नाही. मुलांमध्ये रमून जाताना , विविध उपक्रमांमध्ये सहभागी होताना दिवस कसा संपून जातो ते समजत नाही. शाळा सुटली तरी शाळेतून जावेसे वाटत नाही अशी आमची शाळा . मी इंजिनियर होणार होतो, तो नाही झालो ते बरे झाले. आज मी शिक्षकी पेशामध्ये अतिशय आनंदात आहे. असा पेशा दुसरा कुठला असेल असे मला तरी वाटत नाही. मी योग्य पेशा निवडला आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.


            © प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )




हादरा देणारी दादरा शाळा

हादरा देणारी दादरा शाळा

        आपली जन्मभूमी ही आपली कर्मभूमी असावी असे प्रत्येकाला वाटत असते. मला अगदी तसेच वाटत होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक भरती होती. मी अर्ज केला. परीक्षा दिली.पास झालो. मुलाखतीत सोपे प्रश्न विचारले होते. पण मुलाखतीची मला नेहमीच भिती वाटत आलेली. शेवटी सिलेक्शन यादी प्रसिद्ध झाली. आदेश घरपोच मिळाल्यावर माझे बाबा स्वतः खेडला घेऊन आले. थेट शाळेतच आले. त्यावेळी संपर्क करण्यासाठी पत्रव्यवहार करावा लागे. पत्राने कळवले तर उशिर होणार होता. म्हणून स्वतः येऊन बाबांनी मला कमालीचे थक्क करुन सोडले. 

मला माझ्या जिल्ह्यात नोकरी करण्याची अनमोल संधी मिळाली होती. माझी बोलतीच बंद झाली होती. इतका आनंद झाला होता कि तो व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नव्हते. आपल्याला आता ही नोकरी सोडावी लागणार म्हणून रात्रभर झोपू शकलो नाही. जामगे सीमावाडीतील ग्रामस्थांना माझ्या नवीन नोकरीविषयी न सांगता मला निघायचे होते. नोकरीचा राजीनामा द्यायचा म्हणजे काही रितसर बाबी पूर्ण करायच्या होत्या. त्यावेळी १२०० रु. बेसिक पगार होता. खेड पंचायत समितीत १२०० रु.भरुन पावती घेतली. लेखी राजीनामा देऊन त्यावर पोच घेतली.

 कर्मभूमी सोडून जन्मभूमीची कर्मभूमी करायला निघालो तरीही हातपाय थरथरत होते. मी माझ्या पायावर धोंडा मारुन घेतोय असेही वाटून सर्वांगाला घाम फुटत होता. पण मनोमन निश्चय ठाम होत होता.माझ्यासारखे अनेकजण नोकऱ्या सोडून जाताना बघून धीर एकवटण्याचा प्रयत्न करत होतो. चेहऱ्यावर ' कभी खुशी , कभी गम ' च्या भावना दिसत होत्या. दोन- तीन गाड्या बदलत बदलत कणकवली मुक्काम गाठला. आई आणि भावंडे वाटच पाहत होती. आल्या आल्या पहिल्यांदा आईच्या कुशीत घुसलो. 

आई म्हणाली , " झिला, बरा झाला इलस तो, तू नाय तर आमका घर कसा खावंक येता. आता हयच नोकरी कर." मी सगळ्या भावंडांची विचारपूस केली. माझ्या मोठ्या दोन बहिणींची लग्ने झाली होती. आता लहान दोन भावंडे म्हणजे न्हानू आणि पपी यांचे शिक्षण सुरू होते. मला देवगड तालुका मिळाला होता. शाळा समजली नव्हती. दुसऱ्या दिवशी पंचायत समिती देवगड येथे लवकरच हजर झालो. पुढे सेवाज्येष्ठता मिळेल हा हेतू होता. 

त्यावेळी गढिताम्हाणे गावात ५ शाळा होत्या. त्यातील चार शाळा द्विशिक्षकी होत्या. आम्ही सुरुवातीला गेलेले चारजण गढिताम्हाण्यात नेमले गेलो. देविदास प्रभुगांवकर, वल्लभानंद प्रभु, सदानंद गांवकर आणि मी. जणू आम्हा चारजणांची गढिताम्हाणे गाव वाटच बघत होतं. मला गढि. दादरा शाळा मिळाली होती. दादरा नाव वाचून मला त्याचवेळी हादरा बसला होता. नंतर समजले कि ती धनगरवाडीची शाळा होती. ऐन पावसाचे दिवस होते. नद्या दुथडी भरुन वाहत होत्या. आम्हाला शाळेकडे जाण्याचे दोन मार्ग सांगण्यात आले. तळेरेमार्गे आणि तळेबाजारमार्गे असे ते दोन मार्ग होते. संध्याकाळ झाल्यामुळे त्याचदिवशी न जाता दुसऱ्या दिवशी शाळेकडे जायचे ठरवले. सकाळी सहाची कणकवली रत्नागिरी गाडी पकडली. तळेरे स्थानकात उतरलो. 

तिथून गढिताम्हाणे गाडीत बसून गढिताम्हाणे नं.१ शाळेकडील आमराईस्टाॕपवर उतरुन मुख्याध्यापकांच्या खोलीवर गेलो. गोसावीगुरुजी जेवण बनवत होते.  त्यांना आम्ही काल तालुक्याला हजर झाल्याचे सांगितले. पण त्यांनी मला आदल्या दिवशीच्या तारखेला हजर करुन घेण्यास नकार दर्शविला. मग काय आलो तो दिवस अखंड नोकरीची सुरुवातीची तारिख ठरली. माझी शाळा एकशिक्षकी होती. 

लक्ष्मण चौधरीगुरुजी तिथे एक नंबर शाळेतून कामगिरी करत होते. त्यांच्याबरोबर चालत चालत मी आणि बाबा मजल दरमजल करीत दादरा धनगरवाडी गाठली. तीन चार चढावाच्या घाट्या चालताना माझा आणि बाबांचा जीव चांगलाच वर आला. सलग चार किलोमीटर चालून पाय दुखून आले होते. धनगरांच्या शेळ्यांशिवाय वाटेत कुणीही दिसले नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या अनोळखी व्यक्तींना  चौधरीसर हात वर करुन दाखवताना दिसत होते. कुठे घेऊन चाललात सर ? कधी येणार शाळा ? असे प्रश्न मी विचारत होतो. ही काय आली, आता थोडेच चालायचे आहे असे म्हणत पाऊण तास चालतच होतो. 

अखेर शाळा लांबवर दिसू लागली. आता मी माझ्या चालण्याचा वेग वाढवला होता. शाळा एका वर्गखोलीची होती. तीन चार मुलं व्हरांड्यात बसून सरांची वाट बघत बसली होती. बाकीची मुलं सरांनी हाक मारुन बोलावून आणली होती. ८- ९ मुले ' के रं , के रं ' करत काहीतरी कुजबुजताना दिसली. मला त्यांची भाषा समजेना. सरांनी मला सांगितले कि ' के म्हणजे काय चे लघुरुप आहे ' मी निःशब्द झालो. पुढे साडेसहा वर्षे मला त्या शाळेत एकट्याने काम करायचे होते हे मला माहितही नव्हते. त्या शाळेत असताना मी तावून सुलाखून निघालो. 

केंद्रप्रमुख शिरवडकरसर यांनी दरभेटीच्या वेळी बारिकसारीक गोष्टींचा शेरेबुकात उल्लेख केल्याने खूप शिकता आले. घडीचित्रे व शब्दकार्डे हा नवोपक्रम राबवला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यात पहिला क्रमांक आला. मला वाटले मी आता खूप काही प्राप्त केले आहे. माझी ४ थीतील सर्व मुले संपूर्ण इंग्रजी पुस्तकाचे वाचन करु लागली होती. गढिताम्हाणे आमराईवाडीत यादवगुरुजींच्या घरी राहत होतो. रोज ८ किलोमीटर चालत तरी होतो नाहीतर सकाळी ९ वाजता गाडीने शाळेत येत होतो. गाडी पकडायची तर जेवण लवकर करुन डबा घेऊन गाडीसाठी पळत बाहेर पडावे लागे. एवढे करुनही उशिर झाला आणि गाडी चुकली तर ४ किलोमीटर चालण्याशिवाय पर्याय नसे. 

शेवटी काही महिने शाळेतच राहिलो. शाळेत लाईट नव्हती. रात्रीच्या अंधारात दिव्याच्या प्रकाशात कसेतरी पिठीभात बनवून रात्रा संपण्याची वाट पाहिली. शाळा वस्तीच्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला होती. शाळेच्या बाजूला हापूस आंब्याच्या बागाच बागा होत्या. त्यात रानटी डुकरांचे वास्तव्य असल्याने शिकारी लोक दिवसा दिसत. एकदा तर बंदुकीच्या आवाजाने तीन चार रानडुकरे शाळेच्या दिशेने सैरावैरा धावत आलेली. मी धसका घेतला. मग धनगरवस्तीत राहायचे ठरवले. त्यांचा मांगर राहण्यास मिळाला. मुले रात्री अभ्यासाला येत. त्यांची सोबत होत होती. माणसे आदराने दूध , दही देत होती. शनिवारी घरी येताना ताज्या भाज्या देत होती. हापूस आंबे देत होती. मुलांचा मला लळा लागला. पालकांचा माझ्या कामावर विश्वास बसला. त्या शाळेने मला खूप शिकवले. त्या अशिक्षित ग्रामस्थांचे निष्पाप प्रेम बघत होतो. असं दुर्मिळ प्रेम मिळण्याचे भाग्य मला लाभले. आता ती शाळा बंद झाली असली तरी माझ्या मनात ती अजूनही तशीच सुरु आहे.



🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...