🛑 शिष्यवृत्तीची वृत्ती
हल्ली स्पर्धा परीक्षांचे अनेक वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक इयत्तेसाठी स्पर्धा परीक्षांची ही कवाडं उघडलेली पाहायला मिळत आहेत. सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे असं मान्य केलं तरी मुलाच्या जन्मापासूनच्या या स्पर्धा जीवघेण्या तर ठरणार नाहीत ना ? याचीही कधी कधी भीती वाटते. मुलांना या परीक्षांना बसवलं जातं. मुलांना या परिक्षांबद्दल माहिती दिली जाते. खरंतर अशा परीक्षा ह्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी असतात. परंतु सरसकट सर्व विद्यार्थ्यांना बसवण्यात येतं.
प्रत्येक वर्गात तीन प्रकारची मुले असतात. प्रज्ञावान , मध्यम आणि सर्वसाधारण. यांत मध्यम मुलांना प्रज्ञावंत करण्याचा शिक्षकांकडून आणि बऱ्याचदा पालकांकडूनही प्रयत्न केला जातो. सर्वसाधारण मुलं बिचारी नाईलाजाने या परीक्षांना बसत असावीत. शाळेचा अभ्यासक्रम शिकताना त्यांच्या नाकात नऊ आलेले दिसतात. हा आणखीचा अभ्यास त्यांच्या नाकात आणखी काही आकडे आणत असतील की काय असा नेहमी प्रश्न पडतो.
शिष्यवृत्ती परीक्षा ही खऱ्या अर्थाने शिष्य वृत्ती जोपासण्यासाठी असते. शिष्यवृत्ती म्हणजे विद्यार्थी वृत्ती. विद्यार्थ्याने नित्य नियमाने विद्या घेत राहण्याची सवय अंगी बाणवायला हवी. स्वयंअध्ययन करत राहायला हवे. नवनवीन घटकांचं आकलन स्वतः करुन घ्यायला हवं. शालेय पुस्तकांच्या बरोबरीने इतर स्पर्धा पुस्तकांचं वाचन करत मनन , चिंतन आणि प्रात्यक्षिक करत राहिल्याशिवाय ही शिष्यवृत्ती येणार कशी ?
आमच्या बालपणी ४ थी , ७ वी या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाई. आता एक वर्ग वाढवून तो ५ वी आणि ८ वी करण्यात आला आहे. अभ्यासक्रम तोच आहे , परीक्षा पद्धतीत थोडा फरक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आम्ही त्यावेळी 1 , 2 ,3 किंवा 4 यापैकी एक अचूक पर्याय चौकटीत लिहीत असू. त्यावेळी मोबाईल , टीव्ही आणि कॉम्प्युटर अशी ज्ञानाची साधने नव्हती. आतासारखे उदंड खाजगी क्लास नव्हते. आमच्या शाळेत शिकवणारे शिक्षकच आमचे कोचिंग घेत. शनिवार , रविवार अधिकचे मार्गदर्शन घेण्यासाठी शिक्षकांच्या घरी वर्ग भरत. त्यांच्या घरी चालत जावे यावे लागे. दुपार तिपार कधीही जादा वर्ग घेतले तरी आम्ही वर्गाला जात असू. त्यांच्याच घरी खाऊ खाणे होई. अभ्यासाचे आणि पोटाचे दोन्ही प्रकारचे खाऊ खाऊन शिष्यवृत्ती जोपासली आहे याचा आजही अभिमान वाटतो.
पाढे पाठांतर , म्हणी , वाक्प्रचार , गणिताची सूत्रे इत्यादी जय्यत तयारी करुन सराव घेतला जाई. भूमिती हा शब्द सातवीपर्यंत आम्हाला माहीतही नव्हता. पाचवी पासून तासवारी चाले. आता तासवारी क्वचित पाहायला मिळते. एका शिक्षकाकडे दोन , तीन किंवा चार वर्गही असतात. मुलांची पटसंख्या रोडावली आणि त्याचा फटका शिक्षकसंख्येवर झालेला दिसतो आहे. दररोजच्या विविध उपक्रमांच्या गर्दीमुळे शिकवायचे कधी तेही समजेनासे झाले आहे. आमच्या लहानपणी समारंभपूर्वक उपक्रमांचा इतका सुकाळ नक्कीच नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या वाट्याला शिकवणे येई आणि विद्यार्थ्यांच्या पदरात ज्ञानकण हमखास पडत.
कितीही नियोजन केले असले तरी ते शाळेत जाऊन शिकवता येईल का ? की त्याऐवजी एखादा कार्यक्रम घेण्याची ऑर्डर येईल हे नित्याचेच बनले आहे की काय ? असे वाटू लागले आहे. त्यामुळे शिक्षकाच्या मनात शिकवायचे असले किंवा विद्यार्थ्यांच्या मनात मनापासून शिकायचे असले तरी वेळापत्रकाप्रमाणे जर घडलेच तर तो भाग्ययोग म्हणण्याची पाळी आल्यासारखे वाटायला लागले आहे. खरंच परिस्थिती बदलण्याची गरज माझ्यासारखी सर्वांनाच वाटत असावी.
प्रशिक्षणे घेऊन आम्ही शिक्षक तयार होत आहोत. त्या प्रशिक्षणाचे शाळेत उपयोजन करेपर्यंत दुसरे एखादे प्रशिक्षण येते आणि पहिले विसरले जाते आहे. एकावेळी अनेक गोष्टी करताना शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचीही जी तारांबळ उडते आहे ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळते आहे. हे करु की ते करु ? सगळेच करावेसे वाटते , पण वेळच पुरत नाही. ' एक ना धड भाराभर चिंध्या ' ही म्हण शिष्यवृत्तीचा अभ्यास करताना शिकलो होतो. आता त्याचा प्रत्यय प्रत्येक शिक्षकाला येत असेल तर मी त्यांच्या मताशी सहमत आहे.
मी स्वतः आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. मात्र माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याने शिष्य वृत्ती जोपासण्यासाठी मी आजन्म प्रयत्न करीन. ही सगळी माझी स्वतःची ठाम मते असली तरी त्याच्याशी वाचकांनी सहमत असलेच पाहिजे असा माझा अजिबात आग्रह नाही असे नम्रपणे नमूद करावेसे वाटते.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 ) कणकवली
































.jpeg)


