Saturday, July 30, 2022

🛑 शिष्यवृत्तीची वृत्ती

 🛑 शिष्यवृत्तीची वृत्ती

          हल्ली स्पर्धा परीक्षांचे अनेक वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक इयत्तेसाठी स्पर्धा परीक्षांची ही कवाडं उघडलेली पाहायला मिळत आहेत. सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे असं मान्य केलं तरी मुलाच्या जन्मापासूनच्या या स्पर्धा जीवघेण्या तर ठरणार नाहीत ना ? याचीही कधी कधी भीती वाटते. मुलांना या परीक्षांना बसवलं जातं. मुलांना या परिक्षांबद्दल माहिती दिली जाते. खरंतर अशा परीक्षा ह्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी असतात. परंतु सरसकट सर्व विद्यार्थ्यांना बसवण्यात येतं. 

          प्रत्येक वर्गात तीन प्रकारची मुले असतात. प्रज्ञावान , मध्यम आणि सर्वसाधारण. यांत मध्यम मुलांना प्रज्ञावंत करण्याचा शिक्षकांकडून आणि बऱ्याचदा पालकांकडूनही प्रयत्न केला जातो. सर्वसाधारण मुलं बिचारी नाईलाजाने या परीक्षांना बसत असावीत. शाळेचा अभ्यासक्रम शिकताना त्यांच्या नाकात नऊ आलेले दिसतात. हा आणखीचा अभ्यास त्यांच्या नाकात आणखी काही आकडे आणत असतील की काय असा नेहमी प्रश्न पडतो.

          शिष्यवृत्ती परीक्षा ही खऱ्या अर्थाने शिष्य वृत्ती जोपासण्यासाठी असते. शिष्यवृत्ती म्हणजे विद्यार्थी वृत्ती. विद्यार्थ्याने नित्य नियमाने विद्या घेत राहण्याची सवय अंगी बाणवायला हवी. स्वयंअध्ययन करत राहायला हवे. नवनवीन घटकांचं आकलन स्वतः करुन घ्यायला हवं. शालेय पुस्तकांच्या बरोबरीने इतर स्पर्धा पुस्तकांचं वाचन करत मनन , चिंतन आणि प्रात्यक्षिक करत राहिल्याशिवाय ही शिष्यवृत्ती येणार कशी ? 

          आमच्या बालपणी ४ थी , ७ वी या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाई. आता एक वर्ग वाढवून तो ५ वी आणि ८ वी करण्यात आला आहे. अभ्यासक्रम तोच आहे , परीक्षा पद्धतीत थोडा फरक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आम्ही त्यावेळी 1 , 2 ,3 किंवा 4 यापैकी एक अचूक पर्याय चौकटीत लिहीत असू. त्यावेळी मोबाईल , टीव्ही आणि कॉम्प्युटर अशी ज्ञानाची साधने नव्हती. आतासारखे उदंड खाजगी क्लास नव्हते. आमच्या शाळेत शिकवणारे शिक्षकच आमचे कोचिंग घेत. शनिवार , रविवार अधिकचे मार्गदर्शन घेण्यासाठी शिक्षकांच्या घरी वर्ग भरत. त्यांच्या घरी चालत जावे यावे लागे. दुपार तिपार कधीही जादा वर्ग घेतले तरी आम्ही वर्गाला जात असू. त्यांच्याच घरी खाऊ खाणे होई. अभ्यासाचे आणि पोटाचे दोन्ही प्रकारचे खाऊ खाऊन शिष्यवृत्ती जोपासली आहे याचा आजही अभिमान वाटतो. 

          पाढे पाठांतर , म्हणी , वाक्प्रचार , गणिताची सूत्रे इत्यादी जय्यत तयारी करुन सराव घेतला जाई. भूमिती हा शब्द सातवीपर्यंत आम्हाला माहीतही नव्हता. पाचवी पासून तासवारी चाले. आता तासवारी क्वचित पाहायला मिळते. एका शिक्षकाकडे दोन , तीन किंवा चार वर्गही असतात. मुलांची पटसंख्या रोडावली आणि त्याचा फटका शिक्षकसंख्येवर झालेला दिसतो आहे. दररोजच्या विविध उपक्रमांच्या गर्दीमुळे शिकवायचे कधी तेही समजेनासे झाले आहे. आमच्या लहानपणी समारंभपूर्वक उपक्रमांचा इतका सुकाळ नक्कीच नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या वाट्याला शिकवणे येई आणि विद्यार्थ्यांच्या पदरात ज्ञानकण हमखास पडत. 

          कितीही नियोजन केले असले तरी ते शाळेत जाऊन शिकवता येईल का ?  की त्याऐवजी एखादा कार्यक्रम घेण्याची ऑर्डर येईल हे नित्याचेच बनले आहे की काय ? असे वाटू लागले आहे. त्यामुळे शिक्षकाच्या मनात शिकवायचे असले किंवा विद्यार्थ्यांच्या मनात मनापासून शिकायचे असले तरी वेळापत्रकाप्रमाणे जर घडलेच तर तो भाग्ययोग म्हणण्याची पाळी आल्यासारखे वाटायला लागले आहे.  खरंच परिस्थिती बदलण्याची गरज माझ्यासारखी सर्वांनाच वाटत असावी.

          प्रशिक्षणे घेऊन आम्ही शिक्षक तयार होत आहोत. त्या प्रशिक्षणाचे शाळेत उपयोजन करेपर्यंत दुसरे एखादे प्रशिक्षण येते आणि पहिले विसरले जाते आहे. एकावेळी अनेक गोष्टी करताना शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचीही जी तारांबळ उडते आहे ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळते आहे. हे करु की ते करु ? सगळेच करावेसे वाटते , पण वेळच पुरत नाही. ' एक ना धड भाराभर चिंध्या ' ही म्हण शिष्यवृत्तीचा अभ्यास करताना शिकलो होतो. आता त्याचा प्रत्यय प्रत्येक शिक्षकाला येत असेल तर मी त्यांच्या मताशी सहमत आहे.
          मी स्वतः आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. मात्र माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याने शिष्य वृत्ती जोपासण्यासाठी मी आजन्म प्रयत्न करीन. ही सगळी माझी स्वतःची ठाम मते असली तरी त्याच्याशी वाचकांनी सहमत असलेच पाहिजे असा माझा अजिबात आग्रह नाही असे नम्रपणे नमूद करावेसे वाटते.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 ) कणकवली




Friday, July 15, 2022

आई , मला भिती वाटते

🛑 आई , मला भिती वाटते

          भिती ही प्रत्येकाला जन्मापासून मिळालेली नकारात्मक गोष्ट आहे. ती हळूहळू जाताना आपल्या लक्षात येते. लहान मुले आपली भिती आईजवळ सांगतात. आईच्या पदरात जाताच त्यांची भिती कुठल्या कुठे पळून जाते. काही मुलांना बाबांचा आधार वाटतो. बाबांनी दिलेला धीर मुलांची भितीची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो. 

          आपण सगळे या भितीचा बागुलबुवा सोबत घेऊनच मोठे मोठे होत गेलो आहोत. मोठे झालो तरीही ही भिती डोके वर काढते , तेव्हा आश्चर्य वाटते. याचा अर्थ सर्वांनाच सर्वकाळ ' भिती ' नावाची भावना निसर्गाने बहाल करुन ठेवली आहे. कधी ही भिती आवश्यक ठरते. त्यामुळे आपण सुरक्षित राहतो. मोठया संकटांचा सामना करताना सदसद्विवेकबुद्धी वापरतो. अजिबात भिती नसती तर काहीही करुन टाकण्याचा अतिआत्मविश्वास आला असता. 

          भिती आली की अंग थरथरायला लागतं. कान लाल होतात. हात थरथरत आहेत हे लक्षात येतं. आत्मविश्वास वाढताना दिसत नाही. तेच तेच भितीचं सावट पाठलाग करत राहतं. त्यावर मात करण्यासाठी त्याचक्षणी कोणाचा तरी मायेचा हात पाठीवरुन फिरायला हवा असतो. तो फिरताना भिती दुर पळत असल्याचे लक्षात येते. 

          कालचीच परिपाठ सुरु असतानाची गोष्ट. शाळेत पन्नास टक्के शिक्षक उपस्थित असल्याने सर्व मुलांची जबाबदारी सांभाळताना सर्वच वर्ग एकत्र घेऊन सुचना देणे सुरु होते. म्हटलं , आज सर्वांच्या कविता घेऊया. प्रत्येक वर्गाच्या मुलांना पुढे येऊन कविता सादरीकरण करायला सांगितले. त्यातील काही मुले लगेच उठून पुढे आली , काही घाबरत घाबरत पुढे आली , काही उठतच नव्हती. न उठणाऱ्या मुलांना हात पुढे करुन उठवावे लागले. सुचनेनुसार मुलांनी रांग केली. ऑर्डर मिळताच कविता गायन सुरु झाले. सुरुवातीला अजिबात आवाज फुटत नव्हता. जवळ जाऊन त्यांच्या पाठीवर हलकेच हात ठेवताच त्यांचा आवाज वाढलेला दिसला. त्यांना प्रबलन दिल्यावर त्यांनी अभिनय करायलाही सुरुवात केली. कवितेचे सादरीकरण संपल्यावर त्यांना ' चांगला रे चांगला , लई लई चांगला ' अशी सामुहिक आरोळी दिली तेव्हा सर्वजण खुश झालेले दिसले. जेव्हा मुले समोर आली होती तेव्हा भितीने ग्रासली होती. प्रोत्साहन मिळताच त्यांची काही भिती आत्मविश्वासाने काढून घेतली होती. सर्व मुलांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि आरोळ्या दिल्या , याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर विलसत असलेला दिसला. 

          एकेकाची सादरीकरणे बघून पुढच्या मुलांमधील आत्मविश्वास वाढताना दिसला. आम्हालाही आरोळ्या आणि टाळ्या मिळाव्यात हिच अपेक्षा प्रत्येकाची दिसत होती. 

          तिसरीमध्ये शिकणारी एक मुलगी तशी अबोलच. ती घाबरली होती. तिचा आवाजच फुटत नव्हता. ती घरी गेली. तिने आईला सांगितले. " आई , मला सर्वांसमोर कविता म्हणता आली नाही. माझे हात पाय थरथरत होते. माझी कविता पाठ होती. पण त्यावेळी मला एकही कडवे आठवेना. " 

          संध्याकाळी मला त्याच पालकांचा फोन आला तेव्हा ही गोष्ट माझ्याही अधिक लक्षात आली. मी लहान असताना अगदी या मुलीसारखाच अबोल आणि भित्रा होतो. परंतु हळूहळू माझ्या गुरुजनांनी माझी भिती घालवली. आता मी शिक्षक असलो तरी शाळेत अचानक साहेब आले की घाबरतोच ना ? भिती ही प्रसंगानुरूप येते आणि जातेही. 

          वर्गात शिकवताना आम्ही शिक्षक राजा असतो. वार्षिक तपासणीच्या वेळी एखादे अधिकारी वर्गावर येऊन पाठ निरीक्षण करु लागले की कशी भंबेरी उडते !!! तशीच भंबेरी मुलांचीही दररोज उडत असेल हे माझ्यासारख्या प्रत्येक शिक्षकाने लक्षात घ्यायला हवे. आज मुलांना वाटणारी ही भिती कमी करण्यासाठी आपणच जाणीवपूर्वक कार्य करु शकतो. मलाही या गोष्टीकडे अधिक जाणीवेने लक्ष देण्यासाठी अशा पालकांच्या फोनसंपर्काचा सदुपयोग झाला याचा उल्लेख करणेही मला अत्यावश्यकच वाटते.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



गुरुजी , तुम चंदन हम पानी

🛑 गुरुजी , तुम चंदन हम पानी

          आज गुरुपौर्णिमा. गुरु शिष्यांचा दिवस. आपल्या गुरुंसाठी आदर व्यक्त करण्याचा विशेष दिवस. 

          मी आज गुरुजी आहे तो माझ्या अनेक गुरुजींनी शिकवलेल्या ज्ञानामुळेच. हे सर्व गुरुजी कदाचित पेशाने गुरुजी नसतीलही. तरीही त्यांनी केलेले विविध संस्कार आम्हाला घडविण्यास उपयुक्त ठरले आहेत. सर्वांची नावे घेणे शक्य होणार नाही. त्यांना केलेले मनस्वी वंदन त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल अशी माझी निर्मळ भावना आहे. 

          जन्मापासून आपण शिकत असतो. विविध नवनवे अनुभव गाठीशी बांधत असतो. हे अनुभव चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे असतात. दोन्ही अनुभव आपणांस शिकवित असतात. त्यामुळे आपलं रुपांतर कोषावस्थेतून सुरेख अशा फुलपाखरात होत असते. 

          गुरु ईश्वर असतो. तात आणि माय असतो. गुरु आपल्याला वाट दाखवत असतो. भरकटत गेलेल्याला पुन्हा योग्य मार्गावर आणण्याचे महत्त्वाचे कार्य गुरु करत असतो. गुरु परमात्मा परेशु असतो. गुरुंना आपण आचार्य म्हणतो. ' आचार्य देवो भव ' असे म्हटले जाते. आपले गुरु हे देवांपेक्षाही श्रेष्ठ आहेत असे प्रत्येक शिष्याने मानायला हवे. त्यांचा यथोचित सन्मान करायला हवा. अर्थात गुरुंनीही शिष्यांच्या सन्मानास पात्र होण्यासारखे कार्य करत राहायला हवे. ' गुरु ' बद्दल कोणी वावडे बोल बोलले तर खूप वाईट वाटते. सगळेच गुरु ज्ञानदान करत असतात , प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. भावना मात्र साऱ्यांची एक आणि एकच असते असे माझे मत आहे. आपला शिष्य आपल्या पेक्षा सरस व्हावा असे प्रत्येक गुरुला वाटते. ' गुरुची विद्या गुरुलाच फळली ' अशी एक म्हण आहे. शिष्याने गुरुपेक्षा वरचढ जरुर व्हावे , पण आपल्या गुरुंचा आदर नेहमीच करत राहावा. 

          आज अनेक गुरुंचा सन्मान केला जाईल. गुरुंबद्दल ' गुरुवंदना ' गायिली जाईल. ही एक आवश्यक मानसिक गोष्ट आहे. त्यामुळे एक दिवस माझा आहे असे गुरुला वाटते. माझ्यावर प्रेम करणारे माझे विद्यार्थी बघून माझ्यासारख्या गुरुला होणारा आनंद आदर्श पुरस्कारपेक्षाही अधिक असतो. तो असा कमी शब्दांत व्यक्त करता येत नाही. 

          घरातील सर्व मुले माणसे आपले गुरुच असतात. त्यांच्याकडून आपणांस संसाराचे धडे मिळत असतात. आईने मला बोलायला शिकवले. बाबांनी चांगले वागायला शिकवले. भावंडांनी प्रेम करायला शिकवले. निसर्गाने जगायला शिकवले. शाळेतील शिक्षकांनी सुसंस्कार केले , सुसंस्कृत बनवले. त्यांच्या छडीचा मार खाल्ला. शब्दांचा मार पेलला. तापलो. थंड झालो. मातीचा गोळा चांगल्या भांड्यात रुपांतरीत होताना बघत आलोय. 

          प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे सात वर्षातील महत्त्वपूर्ण शिक्षण मी कधीही विसरु शकत नाही. त्यांनी मला समंजस बनवले म्हणून पुढे शिक्षण प्रक्रियेत टिकत गेलो. स्वतः च कधी शिक्षक झालो तेही समजले नाही. हा शिक्षण प्रवास करताना अनेक गुरु भेटत गेले. आपापला सुगंधी संस्कार मला देत गेले. मी त्यामुळे अधिकाधिक सुगंधित होत गेलो हे सर्व माझ्या गुरुजनांचे देणे आहे. त्यांच्याशिवाय मी कायम अपूर्णच आहे. माझ्या शिक्षकी पेशात मला अनेक शिक्षक लाभले. या सर्वांनी मला एका आगळ्यावेगळ्या वळणावर आणून ठेवण्याचे कार्य केले आहे. या सर्वांचा मी कृतज्ञ आहे. आज मी रात्री झोपण्यापूर्वी या सर्वांना आठवल्याशिवाय राहणार नाही. 

          माझे अनेक विद्यार्थी आज आदरपूर्वक संदेश पाठवतात. नमस्कार करतात. आठवणी ताज्या करतात. मी शिक्षक झालो ही माझी जमेची बाजू आहे , मला या सर्वांचा अविस्मरणीय सहवास लाभत आहे त्याबद्दल त्यांच्या सदैव ऋणात राहणेच मी पसंत करीन. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



🛑 रिमझिम पाऊस लाडाचा

🛑 रिमझिम पाऊस लाडाचा

          धोय धोय धोय पाऊस नुसता कोसळतोय. संततधार पाऊस चिंब भिजवून टाकतोय. सकाळी सगळ्यांची शाळेत जायची घाई झालीय. तिकडे पावसाची मुसळधार कोसळण्याची घाई झालीय. तो थांबता थांबताना दिसत नाहीय. 

          " ए आई , मला पावसात जाऊ दे " म्हणणारी मुलेही " ये रे , ये रे पावसा , येऊ नको दिवसा " म्हणत असतील. शाळेभोवती तळे साचून ' सुट्टी ' मिळेल का ? असा प्रश्न त्यांना पडू लागलाय. शाळेचा अभ्यास , सेतूचा अभ्यास , अध्ययन निश्चितीच्या चाचण्या सोडवताना आणि सोडवून घेताना सर्वांच्याच नाकातून , डोळ्यातून धोय धोय पाऊस गळू लागलाय. 

          पावसाचे हे असेच असते. तो पडायला लागला कि थांबण्याचे नावच घेत नाही. नुसता बरसतच राहतो. छत्र्या घेऊन जाणाऱ्यांची त्रेधा उडताना दिसते आहे. छत्र्या उलट होत आहेत. वारा उधाणलाय. पाण्याचे ओहळ भरुन वाहू लागले आहेत. 

          एखादी सुसाट वेगाने जाणारी गाडी अंगावर चिखल उडवत जाते आहे. छत्री शोभेसाठी घेतल्यासारखे वाटते आहे. सगळा पाऊस छत्रीतून आत येऊ पाहतोय. नव्हे तो आलायसुद्धा. चिंब भिजलेले कपडे तसेच अंगावर लेवून दिवसभर राहणं शिक्षाच ठरु लागली आहे. 

          पक्ष्यांचे आवाज बंद झालेत. तेही थंडेलेत. कुठेतरी एखादा पक्षी पंख फडफडताना दिसला तर नशीब. तेही कुठल्या खोपच्यात लपलेत !!! बेडकांचे डराव डराव पाढे ऐकताना कधी झोप लागते समजतही नाही. 

          झाडं मस्त उभी आहेत. वाकडी होत आहेत. काही उन्मळून पडली तरी हसत आहेत. शेते आनंदाने डोलत आहेत. लव्हाळी लवत आहेत. ओहळ जोशात नदीला जाऊन मिळत आहेत. नद्या सुसाट वाहत आहेत. वाहतानाच्या आवाजाने कानसाटल्यासारखे वाटते आहे. कुर्ल्या दगडाखाली लपण्यासाठी वेगात पळत आहेत. मळ्यामळ्यात शेतकरी नांगरट करताहेत. बैल कमीच पण पॉवर टिलर शेतात दिसताहेत. " हिरी हिरी पाप्पारी " हे शब्द ऐकू येईनासे झालेत. 

          पूर्वीच्या आणि आताच्या पावसात खूपसा फरक जाणवतोय. की तो ही बदललाय काळाप्रमाणे वरुण राजाच जाणे ? 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



Friday, July 8, 2022

शिडवणे नं. १ शाळेत ‘ एक दिवस बळीराजासाठी ‘ उपक्रम संपन्न

 शिडवणे नं. १ शाळेत ‘ एक दिवस बळीराजासाठी ‘ उपक्रम संपन्न 

शिडवणे  : गेली काही वर्षांपासून शासनाने ‘ एक दिवस बळीराजासाठी  ‘ हा उपक्रम शाळांमध्ये राबवण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी शिडवणे नं. १ शाळेने टक्केवाडी येथील शेतात जाऊन ‘ एक दिवस बळीराजासाठी  ‘ हा उपक्रम संपन्न केला. 

          त्यावेळी शिडवणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल पांचाळ म्हणाले , “ शाळेतील मुले स्वतः श्रमप्रतिष्ठा जोपासत आहेत. त्यांनी तरवा काढला , लावणी केली. गावातील टक्केवाडीमध्ये येऊन शेतीकामाचे धडे घेतले. शाळेचा हा उपक्रम मुलांना शेतकऱ्यांविषयी आदर निर्माण करणारा आहे.”

           इयत्ता चौथी ते सातवीच्या सर्व मुलांनी शेतीकामामध्ये सहभाग घेतला. एक काडी पद्धतीने लावणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तरवा काढण्याचे प्रशिक्षण घेतले. पॉवर टिलरची माहिती घेतली. 

शाळेचे पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल यांनी उपस्थित शेतकरी निलेश टक्के , सचिन टक्के आणि उपसरपंच अनिल पांचाळ यांची मुलाखत घेत मुलांना अधिक माहिती दिली. मुख्याध्यापक सुनील तांबे यांनी पॉवर टिलर चालवून प्रात्यक्षिक करुन घेतले.  ‘ एक दिवस बळीराजासाठी ’ उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल शाळेच्या वतीने प्रवीण कुबल यांनी उपस्थितांचे आभार मानले.




























Wednesday, July 6, 2022

🛑 एक तरी 'ओवी ' अनुभवावी

🛑 एक तरी 'ओवी ' अनुभवावी

          आमच्या घरात मुलींची संख्या जास्त आहे. पहिली बेटी धनाची पेटी असते असे अजूनही म्हटले जाते. सलग मुलीच झाल्या तर त्याही धनाच्या पेट्या म्हणत खूपच धन पदरात पडत जाते. हे धन खऱ्या धन संपत्तीपेक्षा जास्त चिरकाल टिकणारे असते हे कोणाच्या कधी लक्षात येणार ? 

          एखाद्या घरी मुलगी जन्माला येते , तेव्हा बरीच लोकं नाकं मुरडताना मी प्रत्यक्ष पाहिली आहेत. मग ती मुलगी जसजशी मोठी होत जाते , तसा तिच्यावर जीव जडत जातो. ही मुलगीच आपले आयुष्य आहे याची खात्री पटत जाते. 

          तिचे बोबडे बोल लक्षात येतात. तिच्या बाललीला परत परत पहाव्याशा वाटतात. तिचे गोंडस फोटो फिरुन फिरुन बघण्यात गंमत वाटते. ती आपली ' परी ' होते. 

          आमच्या एका जवळच्या नातेवाईकांच्या घरी अशीच एक गोड ' परी ' जन्माला आली. ती जन्माला आली आणि त्यांचे जीवनच बदलून गेले. ' गोरी गोरी पान , फुलासारखी छान ' असलेली ही परी पाहताक्षणी कोणालाही आकर्षित करेल अशीच. तिचे नाव ' ओवी ' ठेवण्यात आले. जात्यावर बसावे आणि ओठात एखादी ' ओवी ' यावी तशी घरात पाय ठेवावा आणि ही 'ओवी ' हसतमुखाने समोर यावी. दिवसभराचा सर्व शिणभार कुठल्या कुठे पळून जातो. 

          आज या चिमुकलीचा पहिला वहिला वाढदिवस आहे. तिला हे कळण्याइतकी ती समंजस झालेली नाही हे नक्कीच. पण तिच्या पहिल्या वाढदिवसाचे हे क्षण आई वडिलांसाठी जितके महत्त्वाचे असतात , तितकेच ते तिच्या आजीआजोबांसाठी अधिक महत्त्वाचे असतात. त्यांच्या लहानपणी असे वाढदिवस साजरे झाले नव्हते. आपल्या नातीचा वाढदिवस जल्लोषात साजरा करतानाचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना खूपच अत्यानंद होतो. असे अनेक अत्यानंद मी प्रत्यक्ष अनुभवले आहेत. 

          अशी ' ओवी' सारखी मुलगी प्रत्येकाच्या भाग्यात आली तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच. म्हणूनच म्हणतो , " एक तरी ' ओवी ' अनुभवावी " हा ज्ञानेश्वरांचा मंत्रघोष अशाही अर्थाने सार्थ ठरतो.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) कणकवली.



🛑 एक सच्चा भालचंद्र भक्त हरपला

🛑 एक सच्चा भालचंद्र भक्त हरपला

          नुकतीच एक बातमी कानावर धडकली. भालचंद्र महाराज आश्रमात दररोज पेटी वाजवून आरतीला साथ देणारे ' शिरी ' बुवा यांच्या निधनाची ती दुःखद वार्ता होती. 

          श्रीधर गुरव असे त्यांचे नाव असले तरी सगळे त्यांना ' शिरी बुवा ' या नावानेच जास्त ओळखत असत. नम्र आणि पवित्र व्यक्तिमत्त्व. सतत हसतमुख. त्यांच्यावर दुःखाचे अनेक डोंगर कोसळले असतील पण त्यातून पुन्हा उभे राहण्याचे बळ त्यांना भालचंद्र महाराजांवरील परमभक्तीमुळे मिळाले होते. 

          कधी देवळात गेलो आणि ते मला दिसले नाहीत हे सहसा होत नसे. मोठया उत्सवांना त्यांची दिवसभर हजेरी असे. ते पेटी उत्तम वाजवत. त्यांचा आवाज पहाडी नव्हता. तरीही ते तालासुरात गायन करत. ते पेटी उघडून बसले की मंदिरातील भक्त भजन करायला कोठून कसे येत ते भालचंद्र बाबाच जाणोत. परमहंस भालचंद्र बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कणकवली भूमी म्हणूनच जगप्रसिद्ध ठरु लागली आहे. 

          मी दररोज मंदिरात जात नाही. जेव्हा माझे जाणे होते तेव्हा मी त्यांच्या भजनात बसत असे. ते कधीकधी मला एखादा अभंग म्हणण्याचा आग्रह करत. मीही मग मला आवडणारा अभंग म्हणत भालचंद्र नामात दंग होऊन जाई. बुवांना माझा आवाज आवडे. ते गोड स्मित हास्य करुन मला दाद देत. मी सुखावून जाई. त्यांच्या आग्रहामुळे मला थोडी भजनसेवा देता आली हे त्यांचंच देणं. 

          ते माणूस म्हणूनही संवेदनशील होते. आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ते नावाने ओळखत. ते आमचेच कस्टमर होते. त्यांनी कित्येकवर्षं आमच्या दुकानात बाबांकडून किंवा काकांकडून केस कापून घेतले होते. मी एखाद्या वेळी त्यांचे केस किंवा दाढी केली असेल असे वाटते. ते दररोज आमच्या दुकानात येऊन बसत. माझ्या बाबांशी गप्पा मारत आणि आपल्या कामाला निघून जात. 

          ते गोडावूनमध्ये पोती उतरण्याचे काम करत हे समजले तेव्हा ते मला खरेही वाटले नव्हते. प्रत्यक्ष पाहिले तेव्हा या माणसाबद्दलचा आदर कित्येक पटीने वाढला. त्यांनी अनेकदा बाबांकडे माझी विचारपूस केली होती. मी भेटलो कि " बाबा कसे आहेत ? " हे त्यांचे नेहमीचे वाक्य असे. 

          किर्तन वाजवणे हे सर्वांत अवघड काम. त्यांनी आपल्या आयुष्यात हजारो किर्तने वाजवली असतील. एवढी किर्तने ऐकल्यामुळे त्यांचे आचरण अतिशय शुद्ध आणि पवित्र झालेले होते. ते मला गुरु घेण्याबद्दल नेहमी सांगत. " सद्गुरु विना सापडेना सोय " , गुरुविण नाही दुजा आधार " अशी भगवद वचने त्यांच्या मुखात येत. त्यांची वाणी भालचंद्र वाणीच होती असे मला वाटे. माझ्यावर त्यांचेही संस्कार झाले आहेत. 

          एकदा आमच्या कणकवली तालुका नाभिक संघटनेचा मेळावा भालचंद्र मठात संपन्न होत होता. त्यावेळी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ' शिरीबुवांचा ' शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील कृतज्ञतेचे निस्सीम भाव स्पष्ट दिसत होते. त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू बोलू लागले होते. आम्ही एका सच्च्या भालचंद्र भक्ताचा सन्मान केल्याचे पुण्य आमच्या पदरी पडले होते. त्यांनी कधीच अहंकार केला नव्हता. आपला सन्मान व्हावा असेही त्यांना कधी वाटले नव्हते. 

          भालचंद्र नगरीने भालचंद्र महाराजांच्या कृपाशीर्वादाने अनेक निस्सीम भक्त घडवले आहेत. त्यापैकी शिरी भाऊंचा नंबर खूप वरचा असेल हे स्वतः भालचंद्र बाबासुद्धा सांगू शकतील. एक निरागस भालचंद्र भक्त अनंतात विलीन झाला आणि भालचंद्र बाबा एका परमप्रिय भक्ताला पारखे झाले आहेत. त्यांच्या पेटीवर फिरणारी बोटे आणि त्या पेटीतून बाहेर पडणारे कर्णमधुर सूर प्रत्येक आरतीच्या आठवले नाहीत तरच नवल.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 ) कणकवली



आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...