Saturday, April 16, 2022

🛑 पियाबिना बसिया बाजेना

🛑 पियाबिना बसिया बाजेना

          प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याची पत्नी खंबीरपणे उभी असते. ती असते म्हणून तो यशस्वी होत असतो. तिने त्याच्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग केलेला असतो. आपला कारभारी नेहमीच यशस्वी होत राहावा असे तिला मनस्वी वाटत असते. पतीच्या यशाची बीजं पत्नीच्या कार्यात असतात. ती त्या पतीसाठी जीवाचं रान करायला सक्षम असते. ती अबला असली तरी पतीसाठी सबला होते. त्याच्यासाठी ती जगाचा विरोध अंगावर ओढून घेऊ शकते. पतीसाठी ती कोणाचीही पर्वा करणार नाही. एकनिष्ठ पती पत्नी असतील त्यांना हे लागू पडते. 

          अचानक संकटे येतात. त्यावर मात करताना पत्नी पुढाकार घेते. ती मिळवती नसली तरी ' झाशीची राणी ' बनते. पतीचा आत्मविश्वास वाढवणारी तीच असते. ती असते म्हणून संसाराचा गाडा सुरळीतपणे हाकला जात असतो. ती नसली तर सारेच शून्य. हे एकच शून्य नसेल ती असंख्य शून्ये असतील. पती आणि पत्नी ही एकाच रथाची दोन चाके असल्याचे म्हटले जाते. रथ कधी एका चाकाने चालणारही नसतो. त्यासाठी दोन्ही चाकांचं एकसारखं फिरणं गरजेचं असतं. 

          पत्नीच्या चाकाला चाक लागते. तिचं चाक निखळतं. एक आणि एकच चाक शिल्लक राहतं. ते पतीचं चाक असतं. रथासाठी दुसऱ्या चाकाची व्यवस्था केली जाते. दुसरं चाक येऊन बसतं. ते पत्नीचं चाक नव्याने सुरु झालेलं असतं. ही दोन्ही चाकं पुन्हा नेटानं फिरु लागतात. रथ पुन्हा होता तसा दिसायला लागतो. चाकं मॅच व्हायला थोडा वेळ लागतो. अखेर चाकं पूर्वीसारखी मॅच होतात. 

          हे नवीन चाक नव्या उमेदीनं पहिल्या चाकाला सांभाळून घेत असतं. तसं ते खूपच अवघड असतं. रथ धावताना थोडा आवाज जरुर येत असतो. याचा अर्थ प्रत्येक पतीला आणि पत्नीला एकमेकांची किती आवश्यकता आहे हे मला इथे मुद्दाम नमूद करायचे आहे. 

          हे उलटं झालं असतं तर ? म्हणजे नवऱ्याचं चाक आधी निखळलं तर ? तर पत्नीसाठी दुसरं चाक शोधावं लागेल ना ? पती नावाचं. तिला किती गरज असते पतीची याचा कधी विचार केला आहे का ? तो फक्त तिनेच करायचा ? आणि समजा तिने केला तर तिला काय म्हणायचे ? 

          आता विविध मालिकांमधून असे प्रकार दाखवले जातात. काही ठिकाणी असे घडतही असेल. पुरुषाने केले तर बोलले जात नाही. बाईने केले की तिला नकोसे करुन सोडणारी अनेक तोंडे असतात. पुरुषाला जशी गरज असते , तशी तिलाही गरज असते. तिने कशाला आजन्म विधवा होऊन राहायचं ? तिने कोणता गुन्हा केलाय ? 

          माझी पत्नी गेली. त्यानंतर मलाही माझ्यासाठी आणि मुलीसाठी दुसऱ्या लग्नासाठी कित्येकांनी आग्रह धरला. मी मनापासून तयार नव्हतोच. त्यावेळी मी माझ्या घरच्यांना हा प्रश्न विचारला होता , " माझे काही बरेवाईट झाले असते तर माझ्या पत्नीचे तुम्ही दुसरे लग्न लावून दिले असते का ? " या प्रश्नावर सगळेच गंभीर झालेले दिसले होते. कारण या प्रश्नाला यांच्याकडे उत्तरच नव्हते. त्यांनी जसा माझा विचार केला तसा तिचा केला असता का ? मी त्यांचा मुलगा होतो म्हणून असा सकारात्मक विचार !!! ती त्यांची सून होती म्हणून ते तिचाही तसाच विचार करायला हवे होते ना ? 

          माझे कुटुंब जर याचे उत्तर देऊ शकत नाही तर दुसऱ्या घरांमधूनही मला याचे समर्पक उत्तर मिळेल असे वाटत नाही. तिने बिचारीने आपले विधवेचे जीवन जगत राहावे एवढेच तिच्या नशिबात लिहिले असेल का ? 

          जगात अशा अनेक ' ती ' असतील. ती तिचे पुढील आयुष्य जगताना आपल्या पतीचं स्मरण करत दररोज मरण भोगीत राहील. तिने आता स्वतः आपल्या पायावर उभं राहण्याची गरज आहे. तिच्या नातेवाईकांनी तिच्या लग्नाचा विचार केल्यास तिचे जीवन ती पूर्ववत जगू शकते. ती तिचे पूर्वीचे क्षण आठवेलही. ते आठवून नवीन संसार थाटताना तिला त्याच्यात पूर्वीचा नवरा बघणं अपेक्षित आहे. एकूणच काय दोन्ही चाके महत्त्वाचीच आहेत. रथ सुरु राहिला की दोन्ही चाकांना गती येते. शेवटी तो आयुष्याचा रथ आहे ना ? 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



🛑 कल्पनेपलिकडचो ' कारटो '

🛑 कल्पनेपलिकडचो ' कारटो '

          शिक्षक समितीच्या एका सत्कार समारंभात मला एक पुस्तक भेट म्हणून मिळाले होते. घरी आल्या आल्या ते पुस्तक बघितले. ते ' कारटो ' नावाचे पुस्तक होते. अशी अनेक पुस्तके आपल्या घरी येऊन पडतात. ती वाचायची राहूनच जातात. माझ्या लेखिका मैत्रिणीने हे पुस्तक लिहिले होते याचा मला अभिमान असला तरी पुस्तक वाचलेच नव्हते. तिने लिहिलेले पुस्तक म्हणून मी माझ्या वर्गातील सर्व मुलांसाठी पुस्तके घेऊन ती मुलांना मोफत दिली होती. पुस्तकाची किंमत फक्त पंधरा रुपये असल्याने मला ती परवडली असेल. त्यावेळी मी त्यातले पहिले दोन तीन लेख वाचून दाखवले होते. तेव्हा माझ्या शाळेतील मुले खळखळून हसलीही होती. पण त्यापुढे पुस्तक वाचायचे राहूनच गेले होते.

          वर्तमानपत्रात , फेसबुकवर ' कारटो ' पुस्तकाची प्रसिद्धी वरचेवर येत होती. तरीही पुस्तक हातात घेतले जात नव्हते. मोठ्या मोठ्या लेखकांची पुस्तके वाचताना आपण आपल्या सोबतच्या लेखिकेला कमी लेखत होतो ही माझी चूकच होती हे माझ्या आज लक्षात आले. एकत्र दोन वर्षे शिकल्यामुळे ' ही ' काय लिहिणार असेही वाटून गेले असेल. आपण स्वतः लिहितोय तेच बरोबर आणि दुसऱ्यांचे ते चूकच असा दृष्टिकोन तर निर्माण होत नाही ना आपल्यात असे वाटून माझेच मला हसू आले. तेव्हा माझी मैत्रिण कल्पना मलये मला खूप मोठी लेखिका असल्याचे जाणवले. एक एक करत मी सगळं पुस्तकच बसल्या बैठकीत वाचून फडशाच पाडला. 

          ' कारटो ' पुस्तक हाती घेतलं की त्याचं मुखपृष्ठ आकर्षित करणारं आहे हे ध्यानात येतं.  झाडावर उलटा लटकलेला ' कॅश ' लहानांचे आणि मोठ्यांचेही लक्ष वेधून घेणारा आहे. मालवणी भाषेत कथा लिहिणे ही सोपी गोष्ट नसते. मालवणीत सावंतवाडी , मालवण , कणकवली , वेंगुर्ले , कुडाळ अशा सर्व तालुक्यातील भाषेत थोडा थोडा फरक आहे. तो लक्षात घेऊन लिहायचे असते हे लेखिकेने अभ्यासलेले आहे. डॉ. विजया वाड यांनी केलेले प्रास्ताविक शॉर्ट बट स्वीट आहे. लेखिकेची मालवणीवर श्रद्धा आणि पकड आहे. त्या सर्रास मालवणीच बोलतात. भाषण देताना त्यांचा एकही शब्द मालवणी येत नाही हे विशेष.

          ही एका खोडकर आणि समंजस मुलाची कहाणी आहे. त्यात तो खराखुरा दाखवला आहे. सभ्यपणाचे सर्व बुरखे त्याने फाडले आहेत. वाचणाऱ्या प्रत्येकाला आम्ही लहान असताना तसेच होतो इतके हुबेहूब पटावे असे लेखन करणाऱ्या कल्पना मलये यांना म्हणूनच नव्या पिढीतील जाणकार मालवणी लेखिकेचा सन्मान द्यायला हवा. लेखिका स्वतःच्या जीवनात परखड आहेत , तशीच स्पष्ट भाषा त्यांच्या कादंबरीत उतरली आहे. त्यांना खोटे अजिबात आवडत नाही. 

          मालवणी भाषेचे अलंकार म्हणजे मालवणी म्हणी. या शिवराळ वाटणाऱ्या म्हणींचा त्यांनी केलेला चपखल वापर त्यांच्या मालवणी भाषेचं प्रदर्शन घडवतात. त्यांनी दिलेली शीर्षके प्रत्येक कथेला अगदी बरोबर वाटतात. 

          एक कारटा तुम्हाला तुमच्यासमोर येऊन काहीतरी गमतीजमती सांगत असल्याचा भास वाचकाला शेवटपर्यंत होण्यासाठी लेखिकेने विशेष प्रयत्न केलेले दिसतात. ही कादंबरी कुठेही कंटाळवाणी , रटाळ वाटत नाही. 

          यातील सर्व पात्रे आपल्या सर्वांच्याच घरात वावरत असल्यासारखे वाटत राहते. मालवणी भाषेची हिच लज्जत वाढवत नेऊन कल्पना मलये यांनी मालवणी भाषेचा सन्मान अधिकाधिक वाढवला आहे. 

          आज जर मच्छिन्द्र कांबळी असते तर त्यांनी कल्पना मलयेंच्या या पुस्तकाचे कोडकौतुक केले असते. मालवणी शब्दकोश बनवायचा झाला तर त्यांनी या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून उपयोग करायला काहीच हरकत नाही. 

           हे पुस्तक वाचताना  ' बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत , कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात ' असे शीर्षकगीत असलेल्या ' गोट्या ' मालिकेची आठवण येत राहते. त्यातील गोट्या मराठी भाषा बोलणारा होता , हा कारटा मालवणी आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या ' बोक्या सातबंडे ' या बालचित्रपटाचीही प्रकर्षाने आठवण येत राहते.

          ही कादंबरी म्हणजे फक्त गंमत गोष्ट नसून लहानांप्रमाणे मोठ्या माणसांच्या डोळ्यांत अंजन घालणारी ठरु शकते. विनोदाची झालर असली तरी प्रत्येक गोष्टीच्या शेवटी तुम्हाला धडा मिळतो ही जमेची बाब आहे. 

          श्रद्धा , अंधश्रध्दा , शिवाशिव पाळणे , किशोरवयीन मुलींचे शिक्षण , शैक्षणिक वातावरण , सहल अशा अनेक गोष्टींवर यांत हसत हसत प्रकाश पाडल्याचे दिसून येते. यातल्या बाई , गुरुजी आपलेच शिक्षक वाटतात. 

          ज्यांनी हे पुस्तक वाचले नसेल त्यांनी ते नक्कीच खरेदी करुन वाचावे , वाचले असेल त्यांनी पुन्हा एकदा जरुर वाचून बघा. शाळेत एकपात्री प्रयोग करण्यासाठी तर हे पुस्तक म्हणजे एक अतिशय उत्तम लेखसंग्रह आहे असे म्हटले तरी तुम्हीही त्याला दुजोरा द्याल. अशा या पुस्तकाच्या लेखिकेला लेखनाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 )



Friday, April 15, 2022

🛑 गिल्बर्ट फर्नांडिस : एक अभ्यासू शिक्षक नेते

🛑 गिल्बर्ट फर्नांडिस : एक अभ्यासू शिक्षक नेते

          आम्ही डीएडला होतो. गिल्बर्ट फर्नांडिस त्यावेळी एस. एम्. ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत होते. परीक्षेच्या वेळी आम्ही जवळच्या बेंचवर बसलो असू. तेथे त्यांची माझी पहिली वहिली भेट. त्यांचा त्यावेळचा उत्साह अजून तसाच आहे. 

          नंतर त्यांनीही डीएडला प्रवेश घेतला. त्यांचा परिचय वाढत गेला. त्यांच्यातील नेतृत्वगुण तेव्हापासून दिसायला लागले होते. परिपाठात एखादा मुद्दा ठासून मांडण्यात ते पटाईत असल्याचे दिसले. प्रशासनाकडून काही चुकत असल्यास किंवा त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक सुविधा हव्या असल्यास गिल्बर्ट कायमच पुढे असत. समस्येवर सन्माननीय तोडगा मिळेपर्यंत त्यांनी त्याची पाठ सोडलेली नसे. त्यांना अनेकदा विरोधाला तोंड द्यावे लागले असेलच , पण त्यांनी त्या विरोधाची कधीही पर्वा केली नव्हती. त्यांचा बारीक आवाज असला तरी त्यातील ताकद मोठी होती. 

          आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात नोकरीला असताना येता जाताना भेट होई. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्याची ओढ मला होतीच , त्यांना ती अधिक होती. अखेर तो दिवस उजाडला. आमच्या अनेक मित्र मैत्रिणींना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक नेमणुका मिळाल्या. गिल्बर्ट सरांची आपल्या भूमीत येण्यासाठी घाई सुरु झाली. ते येताना प्रवासात एका संकटात सापडले होते. त्यांचा अपघात झाला होता. त्यांना त्याचा अजूनही त्रास जाणवत असेल. पण म्हणून त्यांनी कधीही जिद्द सोडली नाही. 

          सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भागात गिर्ये शाळेत त्यांना पहिली नेमणूक मिळाली. सोबत त्यांचे जिवलग मित्र होतेच. त्यांनी आपला मित्रसमूह कधीही सोडला नाही. शैक्षणिक गोष्टी करीत असताना त्यांच्या मनात संघटनात्मक कार्य करण्याची उर्मी निर्माण झाली. त्यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कार्य करण्यास सुरुवात केली. मोठमोठ्या नेत्यांनी त्यांची कामाची धडाडी बघितली. कणकवलीत आल्यानंतर त्यांनी तालुकाध्यक्ष पदाची धुरा समर्थपणे सांभाळली. कणकवली शाखेला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शिक्षकांची वैयक्तिक प्रशासकीय कामे , सेवा पुस्तके पूर्ण करणे या कामांचा सपाटाच त्यांनी लावला होता. शालेय कामकाज करुन झाल्यानंतर त्यांचे शिक्षकांसाठीचे काम सुरु होई. त्यांचे हे काम मी अगदी जवळून बघितले आहे. पूर्वी मी त्यांना एकेरीत हाक मारत असे. आता मला त्यांना तशी हाक मारणे आवडत नाही. ते आज शिक्षकनेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेले आहेत. राज्याचे पदाधिकारी त्यांना ' एक धडाडीचा समितीचा नेता ' म्हणून ओळखतात. 

          गिल्बर्ट सरांनी तळागाळातील शिक्षकांची कामे केली आहेत. माझीही अनेक कामे त्यांनी पूर्णत्वास नेली आहेत. कधीही वाटेत भेटले तर तेच आम्हाला विचारतील , " अरे प्रवीण , तुझं काय काम असेल तर सांग. करुन टाकू. " मेडिकल बिल , सेवा पुस्तक , पेन्शन केस , अपूर्ण नोंदी , महाराष्ट्र दर्शन आणि इतर अनेक कामे करण्याचा त्यांचा हातखंडा दांडगा आहे. ते सांगतील तसे करतील अशा स्वभावाचे आहेत. 

          प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक असतानाही त्यांनी अनेक नवनवीन संकल्पना सुरु करुन तडीस नेल्या आहेत. मी वैभववाडी तालुक्यातील मांगवली नं.१ शाळेत असताना गिल्बर्ट सर आमच्या शाळेत दोनवेळा तरी आले असतील. त्यावेळी त्यांच्या भाषणांना झालेला टाळ्यांचा कडकडाट मी अनुभवला आहे. त्यांची भाषणे मुद्देसूद असतात. एका नेत्याने कसे भाषण द्यावे हे त्यांचे भाषण ऐकून नक्कीच समजू शकते. शासन निर्णय , आयोग आणि विविध शैक्षणिक धोरणे यांवर त्यांचा दांडगा अभ्यास आहे. त्यांचे भाषण ऐकताना आम्ही नेहमीच तल्लीन होत असतो. आमच्यापेक्षा थोडे वयाने लहान असले तरी ते संघटनेतील मोठे नेते आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. प्रत्येकवेळी प्रत्येकाला यश मिळेल याची खात्री देता येत नाही. गिल्बर्ट सरांनी अनेक अपयशे पचवून त्यांचा नेटाने सामना करण्याची नेहमीच तयारी दाखवली आहे ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. त्यांच्याकडे बघून संघटनेतील अनेक कार्यकर्ते तयार झाले आहेत. गिल्बर्ट सर सगळ्या कार्यकर्त्यांना नेहमीच प्रोत्साहनपर मार्गदर्शन करत असतात. 

          शिक्षक आणि मित्र म्हणून त्यांचे काम पाहिले की आम्हालाही लाजल्यासारखे होते. गिल्बर्ट सरांसारखे धडाडीचे मित्र , नेतृत्व आणि शिक्षकनेते आम्हाला लाभले हे आमचेही भाग्यच म्हणायला हवे. त्यांचा सुवास आणि सहवास दोन्हींचा लाभ झाला हेही माझ्यासाठी सदैव स्मरणीयच असेल. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर (  9881471684 )



🛑 वर्सलीची सल

 🛑 वर्सलीची सल

          सध्या वर्सल संस्कृती वाढत चालली आहे. माफ करा. मला संस्कृती नव्हे पद्धती म्हणायचे आहे , पण ती संस्कृती असल्याप्रमाणे रुजू पाहत आहे. म्हणून आपसूकच तसा विचार येऊन गेला. काय आहे ही वर्सल ? मुळात हा शब्द इंग्रजी आहे की मराठी तेच समजताना कठीण जातंय. तसा तो शब्दकोशात न सापडणारा शब्द आहे. वर्सल हा शब्द वर्षलचे अपभ्रंश रुप असावे असे वाटते. वर्षल म्हणजे दरसाल. प्रत्येक वर्षी. 

          आपण सर्रास वर्सल हा शब्द वापरुन मोठमोठ्या घरात या पद्धतीने धार्मिक कामे करण्याची प्रथा सुरु केलेली दिसून येत आहे. 

          पूर्वी आपली एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यात एकाच घरात अनेक कुटुंबे राहात असत. आजी, आजोबा त्यांचे मुलगे , त्यांच्या सुना , त्यांची नातवंडं , त्यांची पतवंडं आणि त्यांची खापर पतवंडं !!! ( हे जरा जास्त होत असेल तर पुढचं वाचू नका.) ही एवढी मंडळी घरात असे. ज्यांची लग्ने झालेली नसत , त्यांचाही समावेश यात असे. त्यामुळे घरातल्या माणसांची संख्याही वाढतच राही. 

          पूर्वी एखादा पुरुष दोन , तीन विवाह करत असे. त्यामुळे होणाऱ्या मुलांची संख्या वाढत जाई हे आणि वेगळेच. त्यामुळे एखादे कुटुंब शंभर माणसांचेही असू शकते हा ! त्याहीपेक्षा जास्त सदस्यसंख्या असण्याची संख्या नाकारता येत नाही. 

          त्यावेळी ' हम दो , हमारे दो ' चा नारा आला नव्हता. तो आल्यानंतर तो नारा पाळला जाऊ लागला कदाचित. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी कमी होऊ लागली. ही सगळी एका कुटुंबातील एवढी मंडळी एकाच छताखाली राहात होती आणि एका चुलीवरचे जेवण जेवत होती. एखादे घर म्हणजे एखादी शाळा म्हटली तरी ते चुकीचे ठरु नये. ही माणसं एकमेकांसाठी जीवाला जीव देणारी असत. ' मी माझा ' असा संकुचित विचार त्यांनी त्यावेळी करायला सुरुवात केली नसेल. त्यावेळी शिक्षणाचा प्रसार झालेला होताच. काही सुशिक्षित , काही अर्धशिक्षित , काही साक्षर तर काही निरक्षर अडाणी असली तरी एकत्र राहण्याची संस्कृती त्यांच्यात जन्मापासूनच रुजली होती. 

          हळूहळू ही ' एकत्र कुटुंब संस्कृती ' लोप पावताना दिसू लागली. तिने ' विभक्त कुटुंब ' ची जागा घेतली. कर्ते सवरते कुटुंबप्रमुख यातून निखळत गेले. एका घराची दहा दहा घरे झाली. मी , माझी बायको आणि फक्त माझीच मुलं हेच सदस्य त्यात दिसू लागले. त्यात ' हम दो हमारे दो ' हे वाक्य सतत पाठ करत राहिल्यामुळे प्रत्येक कुटुंबात चारच सदस्य जास्तीत जास्त दिसू लागले. कोणी नोकरीनिमित्त , व्यवसायनिमित्त घराबाहेर पडले होते. गेले तिथे आपापला राजा राणीचा संसार थाटून मोकळे झाले होते. कधीतरी आपल्या मुळघरी आलेच तर परत जाण्यासाठीच. पूर्वी महिन्याने घरी येणारे , नंतर तीन , सहा , नऊ आणि बारा महिन्यांच्या फरकाने येत राहिले. आता त्याची वर्षेही झाली असतील. घर सोडून जाताना लहान असलेली मुले लग्न होऊनच किंवा आपली मुलंबाळं घेऊनच येताना दिसत आहेत. घराचे आणि त्यांचे ऋणानुबंध नावापुरतेच किंवा समाजाला दाखवण्यापुरतेच राहिलेत की काय असा प्रश्न पडावा. 

          आता ही वर्सल ही पद्धती त्यातूनच जन्माला आली. एकटया कुटुंबप्रमुखानेच खर्च का करावा ? असे म्हणत त्या खर्चाचे विभाजन करण्याचे सूत्र आले. झालेला खर्च वितरित होऊ लागला. त्याहीपुढे जाऊन आता दरसाल एकाने खर्च करण्याचीही प्रथा अस्तित्वात येऊ लागली. त्यामुळे सर्व सण एका वर्षात एकानेच साजरे करण्याचे आगळेच सूत्र या माणसांनी सुरु केले. 

          यंदा गणपती मोठे बाबा आणणार , पुढच्या वर्षी मधले , त्याच्या पुढच्या वर्षी ....... असा गणपतीही विभागाला गेला. दरवर्षी वेळ असला तर कुटुंबातील सर्व मुले , माणसे येतात , नाहीतर त्यांची वर्सल असली तरच येतात. या वर्सल पद्धतीमुळे काही गोष्टी सोयीच्या झाल्या असतील. पण त्यात नातेसंबंधांची ताटातूट झालेली आहे हे कटुसत्य आहे. आजी , आजोबा , आत्या , काका , काकी , चुलत भावंडं आणि बरीच माणसे परकी होत चालली आहेत. नाती जपायची म्हणून चाललेला त्यांचा केविलवाणा प्रयत्न लक्षात येऊ लागला आहे. ' हे माझे , तेही माझेच '  या भांडणात आपलेपणाचा लवलेश निघून जात चालला आहे. या ' वर्सल ' नावाच्या अभिनव पद्धतीने नाती कोलमडली आहेत. पूर्वीचा निरागस जिव्हाळा राहिलेला नाही. जिव्हाळा आहे पण तो बेगडी म्हणजे दाखवण्यापुरताच राहिला आहे याची सल लागून राहिली आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली.



Thursday, April 14, 2022

🛑 हृदयी वसंत फुलताना

🛑 हृदयी वसंत फुलताना

              ' अशी ही बनवाबनवी ' हा चित्रपट अनेकदा पाहिला असेन. त्यातील एक गाणं शरीर आणि मन दोघांनाही प्रसन्न करुन टाकतं. ' हृदयी वसंत फुलताना , प्रेमास रंग यावे ' हे शब्द कानी पडले की प्रत्येकाच्या मनात प्रेमरंग फुलत असतील. कवी शांताराम नांदगावकर यांनी किती निसर्गरम्य भाव या काव्यात पेरले आहेत !             

        निसर्ग आपलं चक्र सुरु ठेवत असतो. तसंच ऋतुचक्र फिरत राहतं. वसंताने या चक्राची सुरुवात होते. जणू सृष्टीवर नवचैतन्य पसरतं. झाडे , वेली , फुले , फळे आनंदाने डोलू लागतात. नवी हिरवाई जन्माला येत असते. शिशिर संपताना ' आला शिशिर संपत , पानगळती सरली ' हे कवयित्री इंदिरा संतांचे शब्द आठवू लागतात.           

        निसर्ग एक किमयागार आहे हे पटतं. धरतीला नवा शालू नेसून राहायचे असते. धरणी प्रफुल्लित होऊन वसंत ऋतूच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत असते. झाडांना नवी पालवी फुटताना पाहून निसर्गदेवतेला सलाम करावासा वाटतो. पक्षी गुंजन करु लागतात. त्यांनाही निसर्ग बदलाची चाहूल लागलेली असते. ती त्यांच्या आनंदाची शीळ असते. त्यांचं कर्णमधुर गायन कान तृप्त करुन टाकणारं असतं.आपण सर्व पृथ्वीवासी मंत्रमुग्ध होऊन जातो.               गुढ्या , तोरणे उभारुन वसंताचे स्वागत केले जाते. एक नवीन आशेचा किरण सर्वांनाच खुणावू लागतो. प्रत्येकाच्या रोमारोमात वसंत संचारु लागतो. वसंत पंचमी उत्साहाने साजरी केली जाते. निसर्गाने केलेली पुष्पपर्णाची उधळण सर्वांचं मन मोहवून टाकते.              

        खेड तालुक्यातील जामगे सीमावाडी शाळेत शिक्षक होतो. जाता येताना वसंत खुल्या दिलाने माझे स्वागत करत असे. घनदाट वनराई , चिंचोळी वाट आणि मी एकटा. पण माझ्यासोबत वसंत नक्कीच सोबत करत असे. त्याने माझ्या निराशा घालवलेल्या असत. एकाकी जीवनाला पालवी देत चैतन्य निर्माण करणारा तोच तर होता.ऊन मी म्हणत असताना त्याची तीव्रता या वसंताने कमी केली होती. सर्व झाडे मला फळे काढण्यासाठी वाकून सांगत असत , " आमची फळे काढा हो , आम्हाला ती जड झालीत. " मी मग एखादा आंबा काढत असे. घरी त्याचे लोणचे होई. भाताबरोबर ते खाताना जणू वसंताची चव जिभेवर तरळत राही. खूप गोड आठवणी होत्या त्या. 

          शाळेत येताना मुले जास्वंदीची भरपूर फुले आणत. त्यांचा पुष्पहार शारदेला घालताना वसंताची माळ अर्पण केल्याचा आनंद होऊन जाई.सावरीच्या , पळसाच्या झाडाखाली फुलांचा सडा बघून त्यावर अलगद पाय ठेवताना गुदगुल्या होत. 

          परीक्षेचे वातावरण सुरु झालेले असे. एखाद्या बुटक्या झाडावर बसून अभ्यास करण्याची मजा काही औरच असे. दुपारनंतर वाडीतील पोरेसोरे गोळा होत. आंब्याचे , करवंदांचे खिरमाट बनवत. ते आंबटगोड असे. त्याची लज्जत आता येत नाही. तो वसंत वेगळाच होता. 

          परशुराम पांचाळ बुवांची भजने ऐकताना मंगलाचरण सुरु होई. ' आला वसंत घ्यारे नाम , हरी जय जय राम ' त्यात ते वसंत ऋतूत रामाला आळवावे असे सांगत. लवकरच रामनवमी , हनुमान जयंती साजरी होई. वासंतिक सुंठवडा मिळे. 

          वासंतिक व्याख्यानमाला सुरु होत. दिग्गज लेखक , कवींची व्याख्याने ऐकताना बौद्धिक वसंत फुलत राही. एखाद्या शाळेत मुले शिक्षकांना कलमाचे हापूस आंबे आणून देत. कदाचित त्या मुलांचा असा समज असेल की हे आंबे दिल्यानंतर आपले गुरुजी आपल्याला चांगल्या गुणांनी पास करतील. पिवळ्या रंगांची प्रगतीपत्रके बघून त्यांच्या मनाचा मोर नाचू लागे. 

          असा हा विविध रंगांचा आणि ढंगांचा वसंत ऋतू नित्यनेमाने येतच राहणार आहे. तो प्रत्येकाच्या आयुष्याचे सोने करु पाहत असतो. तो आपल्या जीवनाचे सोने करतोय हे समजण्याइतका आपला सकारात्मक दृष्टिकोन असला म्हणजे झाले. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



🛑 नलावड्यांचे भाई : एक प्रेमळ माणूस

🛑 नलावड्यांचे भाई : एक प्रेमळ माणूस

          काही माणसं त्यांच्या प्रेमळ व्यक्तित्वामुळे लक्षात राहतात. प्रेमळ म्हणजे निर्मळ मनाने , जिव्हाळ्याने वागण्याचा उत्तम गुण. हा गुण प्रत्येकातच असेल हे सांगता येत नाही. अशा व्यक्तींच्या सहवासात आल्यानंतर यांचा मनाचा मोठेपणा सापडतो आणि त्यांची आपल्या मनातील आदरयुक्त प्रतिमा अधिक उंचावत जाते. कदाचित ही माणसे सामाजिक कार्य करण्यासाठीच जन्माला आलेली असावीत. 

          कणकवली नगर पंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या वडिलांना सगळेच भाई या नावाने ओळखतात. आमचेही ते भाईच होते.  ते सगळ्यांचेच भाई ठरले होते. 

          कणकवली रेशन दुकानाचे ते अनेक वर्षे चेअरमन होते. हे रेशन दुकान अजूनही कणकवली ढालकाठी परिसरात उभे आहे. आमचे सलून त्यावेळी याच परिसरात होते. भाई आमचे कस्टमर होते. आमच्या बाबांचे ते जिवलग मित्र होते. कधी काही आर्थिक संकट आले की भाई आम्हांला जमेल तशी मदत करत. त्यांना आम्ही अगदी जवळून अनुभवले आहे. आम्ही पाचही भावंडे त्यांना ओळखत होतो. बाबा त्यांच्याबद्दल नेहमी सांगत. त्यामुळे भाई आले की आमचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक आदर्श व्यक्तिमत्त्व बघत आहोत असाच असे. 

          भाई नलावडे आले की आम्ही चिडीचूप होऊ. ते नेहमी गडबडीत असत. दाढी करता करता ते बाबांशी बोलत राहत. वस्तरा लागेल याची मला भीती वाटे , पण आमचे बाबा त्यांची दाढी करताना त्यांना बोलू नका असे कधीच सांगत नसत. त्यांनी आमच्या बाबांना कायम मित्रासारखी वागणूक दिली होती. 

          कणकवली स्टेट बँकेखाली त्यांचे ' अलंकार भोजनालय ' होते. त्यावेळी असणाऱ्या प्रसिद्ध हॉटेलपैकी ते एक होते. मधली अनेक हॉटेल्स पार करुन काही शौकीन लोक भाई नलावडेंच्या ' अलंकार भोजनालयात ' जेवणाचा आस्वाद घेत असलेले मी पाहिले आहेत. 

          माझी मोठी बहीण ताई नुकतीच पदवीचे शिक्षण पूर्ण करुन आमच्याच दुकानात टेलरिंग काम करत असे. बाबा कपडे कापून देत , आमची ताई कपडे शिवी. कॉलेजमध्ये असल्यापासून तिचे हे काम अव्याहतपणे सुरुच होते. भाईंनी हे बघितले होते. त्यांनी तिला आपल्या रेशन दुकानात सेल्समनची नोकरी दिली होती. त्यावेळी बाबांपेक्षा माझ्या ताईलाच खूप आनंद झालेला दिसत होता. ती सेल्समनपदी हजर झाली. तिला दरमहा पगार मिळू लागला होता. भाईंनी बहिणीला नोकरी दिल्याने आम्हां भावंडांचा आनंद द्विगुणित होत गेलेला होता. दिवाळीच्या सणाला ती आम्हांला नवीन कपडे घेऊ लागली होती. भाईंमुळे हे शक्य झाले होते. आम्ही त्यांना कायमच दुवा देत होतो. 

          ताईचे लग्न झाल्यानंतरही तिने नोकरी सोडली नव्हती. मी तिला सायकलने स्टँडवर नेहमी सोडत असे. ती गाडीत बसून कळसुली गावी जात असे. भावोजींनी डोंबिवली येथे रुम घेतल्यानंतर ताईला ही नोकरी सोडावी लागली तेव्हा ताई खूप रडली होती. नोकरी सोडण्याचे दुःख तिला जास्त होते. भाईंना हे नोकरी सोडणार आहे हे सांगतानाही तिला कठिण गेले होते. भाईनी आमच्या ताईच्या लग्नाला विशेष आर्थिक मदत केली होती. 

          आमची ताई त्यानंतर अनेक वर्षे ज्या ज्या वेळी गावी येई , त्या त्या वेळी रेशन दुकानात भाई आणि सर्वांना जाऊन भेटे. पुढे ताईला मंत्रालयात नोकरी मिळाली होती. ही गोष्ट समजताच भाईंना कितीतरी आनंद झाला होता. ते दरवेळी ताईची आपुलकीने चौकशी करत. 

          भाईंची सर्व मुले कणकवली नंबर तीन शाळेतच शिकली होती. आमच्या बरोबर लहानाची मोठी झाली होती. त्यापैकी समीर नलावडेसाहेब आमच्या पुढच्या वर्गात होते. त्यांनी हा भाईंचा मदतीचा वसा कायम ठेवला आहे. भाईंचे सामाजिक कार्य त्यांनी सुरु ठेवले आहे. 

          धी कणकवली को ऑपरेटिव्ह सोसायटीचा ( जुने रेशन दुकान ) आता मोठा वटवृक्ष बनला आहे. कणकवलीची आता मुंबई बनत चालली आहे. पण भाईंची ती जुनी सोसायटी अजून तशीच डोळ्यासमोर     येत राहते. भाई आता हयात नसले तरी त्यांच्या आठवणी आमच्या मनात तशाच ताज्या आहेत. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Saturday, April 9, 2022

🛑 गोंधळ : देवीचा एक परिपूर्ण जागर

 🛑 गोंधळ : देवीचा एक परिपूर्ण जागर

          काल आमच्या नातेवाईकांच्या लग्नाच्या गोंधळाला उपस्थित होतो. तसा हा माझ्या आयुष्यातील पहिला गोंधळ असेल. गोंधळाची गाणी ऐकली होती. जोगवा चित्रपट बघितला होता. अनेकदा गोंधळ झाल्यावर जेवायला गेलो असेन. संपूर्ण गोंधळ बघायला मिळाला नव्हता. 

          माहूरची रेणुका , तुळजापूरची  तुळजाभवानी , कोल्हापूरची अंबाबाई यांना बोलावणे धाडत गोंधळ मांडला जातो. माझे गोंधळ्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष होतं. त्यांनी सुंदर मांडणी केली होती. खणावर रांगोळीसारखे तांदळाचे यंत्र तयार करण्यात आले होते. दिवट्या पेटवल्या होत्या. कापडाचे काकडे बनवले होते. पाच ऊसाच्या दांड्या उभारण्यात आल्या होत्या. मध्यावर कलश ठेवण्यात आला होता. सुके खोबरे , नागवेलीची पाने , सुपाऱ्या , लिंबू , खारीक , बदाम , केळी , फळे आणि इतर पुजा साहित्य मांडून छान सजावट करण्यात आली होती. 

          बाहेर बोकड ओरडत होता. त्याचा बळी द्यायची वेळ आली होती. त्याचा काळही जवळ आलेला मला दिसत होता. त्याला देवीचा भंडारा लावण्यात आला. काहीच मिनिटांत त्या बिचाऱ्या बोकडाचा बळी देण्यात आला होता. त्याचे ओरडणे कायमचे थांबले होते. त्यावेळी मला एक ओळ सुचली होती , " देवीला शरण आणि बोकडाचं मरण "… 

          देवीच्या गोंधळात बोकडाच्या जीवावर आलेले दिसले. त्याच्या जीवनाचा गोंधळच झाला होता. परंपरेने चालत आलेल्या रूढी माणसं जोपासत होती. बोकडाचं मुंडकं आणि पाय हे अवयव देवीला वाहण्यात आले होते. 

          जोगवा मागणे सुरु झाले होते. सात ते नऊ घरांमध्ये यजमान गेले होते. त्यांनी प्रत्येक घराच्या दारात जाऊन ' जोगवा ' मागितला होता. जोगवा पूर्ण झाला होता. त्यानंतर देवीला गोंधळाला येण्यासाठी आळवणी करण्यात आली होती. त्यासाठीची गाणी गोंधळी बुवांनी ठसक्यात म्हटली होती. संबळ वाजवत गाणी तालासुरात म्हटली जात होती. 

          या गोंधळी समाजातील कलाकारांचे आवाज कर्णमधुर असतात. वेगळ्या धाटणीचा आवाज , चाली यामुळे माझ्यासारखा माणूस तिकडे आकर्षिला जातो. मी त्यांची सर्वच गाणी ऐकत राहिलो होतो. आता त्यांनी काही नवीन गाणीसुदधा म्हटली होती. 

          मला त्यावेळी कणकवलीच्या ' पाचंगे ' गोंधळी यांची आठवण आली होती. त्यांचे खायच्या पानांचे दुकान होते. मी लहान असताना त्यांच्या दुकानातून बाबांसाठी पाने घेऊन येत असे. त्यांचे काही ग्रुप असत. एप्रिल , मे या दरम्यान अनेक गोंधळ असत. त्यावेळी हे सगळे ग्रुप आमच्या सलूनमध्ये केस दाढी करण्यासाठी येत असत. त्यात किसन नावाचे एक गोंधळी खूप चांगले होते. त्यांचा आवाज सुरेल होता. गळ्यात सूरपेटी घालून ते गाणे म्हणत. ते आता हयात नाहीत. त्यांच्या आठवणी माझ्या मनात हयात आहेत. त्यात एक ' संतु ' नावाचा गोंधळ्यांच्या संबळवादक होता. त्याचा चेहरा कायम हसरा दिसे. त्याला कितीही बोला , त्याची कितीही चेष्टा करा , तो हसतच राही. तो आता कुठे हसत असेल देव जाणे ?   

          प्राध्यापक हरिभाऊ भिसे यांची गोंधळाची गाणी ऐकली आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कणकवली कॉलेज कणकवलीचे ते अभ्यासकेंद्र प्रमुख होते. अक्षरसिंधु संस्थेचे ते पदाधिकारी आहेत. त्यांनी ही परंपरा जपली आहे. 

          लोककलाकार छगन चौगुले यांच्या अनेक कथा ऐकल्या आहेत. लोककला जोपासना करताना यांना सलाम केलाच पाहिजे. 

          गोंधळ बघताना मी नवीन पाहतोय म्हणून आश्चर्याने भारावून गेलो होतो. गोंधळाचा विधी साग्रसंगीत पार पडला होता. हा दिवसाचा गोंधळ असल्यामुळे ' आख्यान ' झाले नाही. आरती व पाळणा गीते झाली. त्यातील शिवाजीचा पाळणा विशेष होता. 

          दुपारी शाकाहार झाला होता. सायंकाळी किंवा रात्री लोकांनी त्या बोकडाचे मटण प्रसाद म्हणून घेतले होते. कार्यक्रम अतिशय सुंदर , नियोजनबद्ध झाला होता. तरीही माझ्या डोळ्यासमोरुन तो बोकड काही जाता जात नव्हता. मीही या सर्व घटनेचा साक्षीदार असल्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबाबत मला काहीही लिहिणे शक्यच होत नाही. मी सपशेल माघार घेतो आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )




आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...