Sunday, February 20, 2022

🛑 प्रज्ज्वलित भाचा

           माझी सगळी भाचरे चांगली आहेत. ते सर्व आम्हां भावंडांचा आदर्श ठेवतात. वाढदिवस दर वर्षांनी येत राहतात. पण दरवर्षीचा वाढदिवस आपल्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. आपल्या आई बाबांना तो जन्मदिवस जास्त प्रकर्षाने आठवत असेल. कारण त्या दिवशी त्यांच्या झालेल्या तारांबळीची केवळ कल्पना केली तरी आज अंगावर काटा उभा राहतो. किती रोमांचक क्षण असतात ते !!!

          बाळ जन्माला येइपर्यंतची ओढ आईला उल्हासित करत असताना तिला स्वतःला होणाऱ्या वेदनाही ती सुसह्य करुन घेते. आणि बाळाचा जन्म होतो.... एक सुकुमार बालक रडत जन्माला येते आणि सर्वांना हसवते. बाळाच्या आईच्या डोळ्यात हसू आणि आसू दोन्ही दाटून येतात. 

          आमच्या पिंटूच्या जन्माच्या वेळी अगदी तसेच झाले. पिंटू हे त्याचे टोपण नाव. मामांनी नाव ठेवण्याची पद्धत असल्यामुळे ' मराठी शब्दकोश ' वापरुन नवीन नाव शोधून काढले. त्यात ' प्रज्ज्वल ' हे नवीन नाव सापडले. या नावाचा अर्थही ' दीप तेवत ठेवणारा ' असा असल्यामुळे त्या नावावर शिक्कामोर्तब झाले. बाळाच्या तोंडात गोड पेढा भरवून ' प्रज्ज्वल ' असे उज्ज्वल नाव ठेवताना मी मामा म्हणून किती आनंदित झालो होतो म्हणून सांगू !!!

          आज हा प्रज्ज्वल ' जिम बॉय ' झाला आहे. स्वभावाने शांत असलेला पिंटू त्याच्या अभ्यासात खूप हुशार आहे. हल्लीच त्याचं शिक्षण पूर्ण होऊन तो नोकरी करत आहे. नवीन तंत्रज्ञान त्याने आत्मसात केले आहे. नक्कीच त्याच्या अंगी असलेल्या गुणांचा , कौशल्यांचा त्याला पुढील आयुष्यात उपयोग होत जाईल. त्याने आमचा सतत आदर केला आहे. आमच्याकडूनच त्यांना काही विशेष सहकार्य घडत नाही. आमचे भाचे आमच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीत हे विशेष. 

          पिंटूचा आज वाढदिवस आहे. तो आज आणखी एका वर्षाने मोठा झाला आहे. तो वयाने मोठा झालाच आहे पण मनानेही मोठा झाला आहे. त्याने नेहमी मोठे होत राहावे आणि आमच्या मनातील स्वप्ने पूर्ण करावीत. त्याला वाढदिवसाच्या अनेक उदंड शुभेच्छा.

©️ मोठे मामा



Thursday, February 17, 2022

🛑 इब्यालो

          संदीप खरेंचं बालगीत लागलं होतं. ते ऐकताना जुन्या आठवणी जागृत झाल्या. गाण्याचे बोल असे होते , " चमालातु चंगतोसा चमी चकए चष्टगो , मजेत बसा पसरुन पाय , मुळीच नाहीत कष्टगो "… म्हणजे त्यांनी चकारी भाषेचा उपयोग केला होता. सगळ्या शब्दांची सुरुवात ' च ' ने होते म्हणून त्या भाषेला ' चकारी ' भाषा म्हणत असावेत. भाषा बोलताना व ऐकताना खूप गंमत वाटते. त्याहीपेक्षा गंमत म्हणजे समोरच्याला अशी भाषा बोलता येत नसेल तर आपण या सांकेतिक भाषेत बोललो तर त्यांना कळायला अवघड जाणारी ही भाषा आहे. थोडा प्रयत्न केला तर ती शिकायला सोपी भाषा आहे. 

          आम्ही लहानपणी ही चकारी भाषा अनेकदा बोलायचो. प्रत्येक भागात ही भाषा वेगवेगळ्या प्रकारे बोलली जात असेल. माझी मोठी आत्या ही भाषा बोलायची. त्यानंतर कणकवलीत आम्ही जशा खोल्या बदलू लागलो तशा भाषेतही बदल घडत गेला. प्रत्येक ठिकाणची भाषा काही फरकाने बदलत गेली. आम्ही लहान मुले एकत्र आलो कि आम्ही मोठ्यांना समजू नये म्हणून चकारी भाषेचा वापर प्रामुख्याने करु लागलो. सतत या भाषेचा उपयोग करत असल्यामुळे सराव होत गेला आणि बोलण्यातील गतीही वाढली. ही भाषा जेवढी जलद गतीने बोलाल तेवढी ती समजायला कठीण जाते. त्यामुळे आपण काय बोललो ते समोरच्याला बिल्कुल समजत नाही. तीच तर खरी गंमत असते. अशी भाषा बोलणाऱ्यांची मग चांगलीच गट्टी जमते. या आगळ्या वेगळ्या सांकेतिक भाषेत बोलणाऱ्यांची वेगळीच मैत्री होऊ शकते. 

          आम्ही पाचही भावंडे ही भाषा लिलया बोलत असू. आमच्या बाबांनाही ती येत होती. शाळेतल्या मोजक्या मित्रांना ती येत होती. आमच्या शेजारी राहणाऱ्या खेळगड्यांना ती चांगलीच येत होती. एखादा नवीन शेजारी आला कि आम्ही काय बोलतोय ते त्याला समजत नसे , त्यामुळे त्याची चांगलीच गोची व्हायची. गोची म्हणजे अडचण बरं का !!!

          आमच्या दुकानाशेजारीच कामगार कल्याण केंद्र होते. तिथे कामगारांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवले जात. एसटीतील कामगार , त्यांची मुले येथे सतत येत. सकाळी आणि संध्याकाळी तिथे खूप गर्दी होई. त्यामुळे माझ्या ओळखी वाढल्या. या कामगार कल्याण केंद्रात कॅरम , बुद्धिबळ , गायन , भाषण , वाचन , निबंध , दशावतारी नाटक , शिशुवर्ग , नाट्यस्पर्धा , भक्ती गीत गायन आणि असे अनेक उपक्रम बघायला मिळाले. मी कॅरम खेळायला तिथेच शिकलो. चॅम्पियन कॅरम बोर्डवर खेळण्याची संधी तिथेच मला मिळाली. स्ट्रायकर , रिबॉण्ड , क्वीन , बोरिक पावडर , थम असे अनेक शब्दांची भर पडत गेली. कॅरमची पीस अलगद पॉकेटमध्ये टाकण्याचे अवघड कौशल्य प्राप्त करुन घेतलं. क्वीन , कव्हर घेऊन समोरच्याला हरवतानाचा आनंदच वेगळा असायचा. त्यामुळे दररोज शाळा सुटल्यानंतर कॅरम खेळण्याचा छंदच जडला. इवल्याशा बोटात स्ट्रायकर पकडून त्याचा हलकासा स्ट्रोक मारुन पीस पॉकेटमध्ये गेली की त्याला ' कट :' मारणे म्हणत असू. असे अनेक कट मारायला , रिबॉण्ड मारायला मी शिकलो. 

          तिथे कॉलेजमध्ये शिकणारी मोठी मुलेही येत. त्यांचे पालकही येत. या सर्वांबरोबर हे सर्व खेळ खेळता येत. मोठ्यांबरोबर खेळताना जिंकलो तर आत्मविश्वास वाढत राही. मग आमच्या जोडीला चकारी भाषेचा अवलंब करावा लागे. ती भाषा ओठावर असे आणि कॅरम खेळणे बोटावर सुरु असे. 

          राजेश राजाध्यक्ष नावाचे एक कॉलेज कुमार त्यावेळी माझे मित्र बनले. त्यांना ही भाषा जलदगतीने बोलता येत असे. आम्ही मालवणी असल्यामुळे आमच्या मालवणी भाषेत चकारी भाषा बोलू लागलो. ही मालवणी चकारी भाषा बोलताना खूप मजा येई. 

          एकदा मी आणि राजाध्यक्ष कॅरम खेळत जोडीदार होतो. दुसरी जोडी आमच्यापेक्षा चांगली खेळणारी होती. पण आम्ही आमच्या चकारी भाषेत बोलत बोलत प्रतिस्पर्धी जोडीला नामोहरम करुन सोडले. त्यामुळे प्रतिस्पर्धी जोडीतील दोघेही घाबरुन खेळू लागले. त्यात एक चॅम्पियन खेळाडू होता. तोही घाबरला. मी छोटा होतो , पण खेळात आणि चकारी बोलण्यात चॅम्पियन होतो. राजाध्यक्ष आणि मी चकारीत बोलत होतो. राजाध्यक्ष मला मला म्हणाले , " केत इब्यालो " त्यांना असे म्हणायचे होते , " तो घाबरला ". समोरच्या जोडीला " इब्यालो " ही भाषा अजिबात समजली नव्हती. आम्हाला ती समजत होती म्हणून जास्त आनंद होत होता. आता " इब्यालो " या शब्दाचा आणखी काही वेगळा अर्थ असेल तर मला माहीत नाही. नाहीतर बाबा मी " इब्यालो " आधीच सांगतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल  ( 9881471684 )



Friday, February 11, 2022

फियर ऑफ फिवर

 🔵 फियर ऑफ फिवर लेखांक : ७९

ताप माणसाला तापच आणतो. आता तर साधा ताप आला , तरी त्या तापाची भीती वाटते. कोविड असला तर ? म्हणून ताप येऊ नये यासाठी काळजी घेण्यात येते. पण तरीही ताप आलाच तर काय करणार ? त्याला घाबरून कसे चालेल ? त्याला पळवून लावण्याचे मनोबल आपल्यात निर्माण केले पाहिजे. पूर्वीच्या तापात आणि आताच्या तापात फरक असेलही पण भीतीमध्ये फरक पडलेला आहे. सध्या भीतीनेच माणसे दगावताना दिसत आहेत. काय करावे समजतच नाही. सैरभैर व्हायला झाले आहे. डोकंच चालत नाही असंही म्हटलं जात आहे. रेड झोन नसलेले आपण त्या झोनमध्ये जाताना भीतीच्या थर्मोमीटरचा पाराही तसाच वाढताना दिसत आहे. 

          अनेक ताप येऊन गेले , ते बरेही झाले. पण सध्या ताप न येताही ' कोरोना पॉझिटिव्ह ' चाचण्या अधिक ताप आणत आहेत. तापाचे विविध प्रकार आहेत. त्या तापांचे प्रकार आपल्याला माहिती आहेत. पण डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आपल्याला त्या तापाची अगदी जवळून ओळख होते. तोपर्यंत फक्त त्या तापाच्या नावापुरताच आपला आणि त्याचा संक्षिप्त परिचय असतो. डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली की ते ऐकणारेही सुन्न होऊन जातात. एकतर ते सगळ्यांच्या समोर सांगत  नाहीत. तसे सांगणेही चुकीचेच असते. पण कुटुंबप्रमुखाला बोलावून त्याला एकट्यालाच सांगितले जाते. तो बिचारा एकटाच काय तो ताप सहन करीत वाईट तोंड करत हळूहळू सगळ्यांना सांगतो. तो सांगून सांगून त्याच्या डोक्याचा ताप काही प्रमाणात कमी होतो , पण इतरांच्या डोक्यात भीतीचा ताप शिरतो. हे असेच चालू राहणार आहे , त्याला पर्याय नाही. ही भीती कमी करण्याचे नियंत्रण आपल्याकडेच आहे. 

          अकरा बारा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळी माझा छोटा भाऊ आपल्या पत्नी व मुलीसह माझ्याकडेच राहत होता. त्याचा पगारही अंशतः सुरू होता. त्यामुळे एकत्र राहून त्याला आधार देणे गरजेचे होते. त्यांच्यासोबत एकत्र राहणे खूप आनंददायी होते. दोन्ही जावा मस्त राहात होत्या. बाबा, आई , मी , माझी पत्नी, तो , त्याची पत्नी , माझी मुलगी , त्याची मुलगी असे आठजण एकत्र राहताना मज्जा येत होती. कधीकधी भांड्यांचा आवाज येत होता, पण नंतर हास्याचे कारंजेही उडत होते. असे आमचे दोन भावांचं कुटुंब ' सुख म्हणजे नक्की काय असतं , काय पुण्य असलं की जे घरबसल्या मिळतं ' अशा प्रकारे हसतखेळत चाललेलं होतं. 

          अचानक एका संध्याकाळी माझ्या सव्वा वर्षाच्या पुतणीने झोपेत असताना डोळे पांढरे केले. तिला तसे बघून आमचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या माझ्या निरागस बबलीचे अचानक काय झाले म्हणून सगळेच चिंतेत पडले. वहिनीने तिला हलवले , पण तिचे तोंड घट्ट बंद झाले होते, डोळे वर गेले होते. मला घाम फुटला. लहान मुलांना असे काय झाले तर मला खूपच भीती वाटते. माझ्या भावाला तर त्याहूनही भीती वाटली. तो तर रडूच लागला होता. माझ्या बाबांनी आणि मी त्याला शांत केले. बबलीला एकशे चार ताप आला होता. तो डोक्यात गेला होता. तो ताप सहन न झाल्यामुळे तिला आकडी आली होती. ओल्या फडक्याने पुसून काढल्यानंतर ती शुद्धीवर येईल असे वाटले. पण ती शुद्धीवर आलेली नव्हती. 

          मी तिला तसेच फडक्यात गुंडाळले आणि डॉक्टरांकडे निघालो. सोबत वहिनी आणि भाऊ होताच. एका प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन गेलो. त्यांच्याकडे बेड उपलब्ध नसल्यामुळे व बबलीची क्रिटिकल कंडिशन बघून त्यांनी आपल्याकडे दाखल करून घेतले नाही. आम्ही त्यांना हात जोडून , रडून विनंती केली तरी ते आपल्या नकाराशी ठाम राहिले. आम्ही मग दुसऱ्या बालरोग तज्ज्ञांकडे गेलो. त्यांनी दाखल करून घेतले , तोपर्यंत बबली शुद्धीवर आली होती. तिच्यावर पाच दिवस उपचार झाले. ती बरी झाली म्हणून आम्ही खुश झालो होतो. तिचे बोबडे बोल , तिचं दुडूदुडू धावणं पुन्हा नियमितपणे सुरू झालं होतं. पण तिचा ताप गेला , तरी चार पाच दिवसांच्या फरकाने तो पुन्हा पुन्हा येत राही. डॉक्टर जोशीबाई यांच्याकडे तिला घेऊन गेलो. त्यांनी तिला जमिनीवर ठेवण्यास सांगितले. त्या म्हणाल्या , " या मुलीला मेंदूज्वर असण्याची शक्यता आहे , तुम्ही तिला गोवा येथे उपचारासाठी घेऊन जा. तिथे तिच्यावर मोफत उपचार होऊ शकतील. लवकर निदानही होईल. 

          माझा भाऊ आधीच खूप घाबरला होता. डॉक्टरांनी असे सांगितल्यानंतर तो पुन्हा घाबरला. तो मला म्हणाला , " मला भीती वाटते , तू माझ्या मुलीला घेऊन गोव्याला जा. " मी घाबरलोच होतो , पण न घाबरल्यासारखं दाखवत होतो. पुन्हा एकदा धैर्य एकवटून मी आणि माझी वहिनी छोट्या बबलीला घेऊन गोवा मेडिकल कॉलेजमध्ये जायला निघालो. जाताना भावाची अवस्था बिकट झालेली मला दिसली. त्याची मुलगी असली तरी , मी एकदा जबाबदारी घेतली की ती योग्य पार पाडणार यावर त्याचा ठाम विश्वास होता. त्याची पत्नीही घाबरली असली तरी माझ्याबरोबर बहिणीसारखी यायला तयार झाली. ती आपल्या बाळासाठी हिरकणी बनून माझ्यासोबत आली. मला ती दादा म्हणते. मला तिने कधीही भावोजी अशी हाक मारलेली नाही. 

          गोव्याला आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो. तिथल्या आपत्कालीन विभागात संपर्क करून दोन ते तीन तासात बबलीला डॉक्टरांनी दाखल करून घेतले. तिच्यावर उपचार सुरू केले. बालविभागातील खेळणी पाहून बबली खुश झाली. पण पाच मिनिटांत ती रडू लागे. तिला तपासायला अनेक डॉक्टर्स येत. नवशिके डॉक्टर्स आम्हाला तिच्याबद्दल अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडीत. त्यांचे प्रश्न एकतर इंग्रजीत असत , किंवा कोकणी भाषेत असत. आम्ही त्यांच्याशी मराठीत बोलूनच उत्तरे दिली. जन्मापासून घडलेल्या सर्व घटनांचा धांडोळाच त्यांना कथन करावा लागला. एकतर मला त्यांच्या वॉर्डमध्ये प्रवेश नसे. एखाद्यावेळी दोन तीन मिनिटे आत गेलोच , तर मला तिथल्या वॉर्ड वुमन बाहेर जायला सांगत असत. त्यामुळे माझ्या वहिनीला बबलीकडे एकटीने लक्ष देताना खूप त्रास सहन करावा लागला. तिला अजिबात बबलीला सोडून जाता येत नव्हते. मग बबलीला माझ्याकडे देऊन ती कपडे धुणे वगैरे कामे करत असे. 

          एका सकाळी नर्सने बबलीला अजिबात काहीही भरवू नका असे सांगितले होते. पण बबली खूपच रडू लागली , म्हणून वहिनीने तिला दूध पाजले. थोड्या वेळाने मला बोलावण्यात आले. बबलीची ' मेंदूज्वर ' चाचणी करण्यात येणार असल्याने तिला काहीही द्यायला नको होते. पण ती दूध प्यायल्याचे सांगितल्यावर नर्स गोंधळली. तिने लगेच बारीक प्लास्टिक नळी आणली , तिच्या इवल्याश्या नाकात घातली. त्या नळीतून तिने प्यायलेलं सगळं दूध बाहेर काढलं. मी थिजून गेलो , ती नळी नाकात घालतानाच माझ्या अंगावर शहारे आले होते. आम्ही दोघांनीही बबलीला घट्ट पकडून ठेवले होते. थोड्यावेळाने तिच्या पाठीच्या कण्यात एक इंजेक्शन देण्यात आलं. मेंदुज्वरची चाचणी पूर्ण झाली. रिपोर्ट निगेटिव्ह आला. तरीही आणखी पुढील एका अवघड चाचणीसाठी त्यांनी आम्हाला दुसऱ्या खाजगी डॉक्टरांकडे जायला सांगितले. तिच्या अशा अनेक चाचण्या घेत असताना माझा भाऊही एकदा तिला बघून गेला. ती आता बरी आहे , याचा त्याला आनंद होऊन त्याची भीती कमी झालेली दिसली. 

          हॉस्पिटलमध्ये पेशंटसोबत आलेल्या माझ्यासारख्या व्यक्तींना बाहेरच्या जनरल हॉलमध्ये विश्रांती घ्यावी लागे. मला बबलीच्या काळजीने कधीही नीट झोप लागली नव्हती. त्यामुळे झोपताना वरच्या छताकडे नजर गेली की ते सगळं छतच गोलगोल फिरत आहे असे वाटून मला चक्कर येई. भीतीने आणि काळजीने मी व्याकुळता अनुभवत होतो. शेवटी बबलीला विशेष काहीही झालेले नाही हा निष्कर्ष घेऊन आम्ही कणकवलीची वाट धरली. 

          आल्या आल्या सगळ्यांनी बबलीचे गोड गोड पापे घेतले. भावाने मग तिची इतकी काळजी घेतली , की जरा जरी ती आजारी पडली तरी तो तिला लगेच डॉक्टरांकडे घेऊन जात असे. तिला शेळीचे दूध सुरू केले , गावठी अंडी सुरू केली. बबलीने या सर्वांचा फडशा पाडला. मी माझ्या मुलींसाठी कधीही एवढे प्रयत्न केले नसतील , तेवढे प्रयत्न त्याने केले. आता ती अगदी व्यवस्थित आहे. सातवीत गेलीय. आता तिला  " एवढे नको खाऊस , वजन वाढेल !!! " असे सांगावे लागते. पण काहीही म्हणा त्यावेळचा तो ' फियर ऑफ फिवर ' आज आठवला ना , तरी डोक्यात फिवर जातो. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )










Monday, February 7, 2022

🛑 ने मजसी ने परत मातृभूमीला

          सकाळी उठून सहज फेसबुक उघडले. गानसम्राज्ञी लतादिदींचा एक व्हिडिओ समोर आला. त्यांच्या दुःखद निधनानंतर संपूर्ण भारताला नव्हे तर जगाला दुःख झाले असेल. प्रत्येक घराघरांत दिदी पोहोचल्या असताना घरोघरी दुःख झालेले आहे.  त्यांच्या दिव्य सुरांनी प्रत्येकाचे कान कायमच तृप्त होत राहणार आहेत. 

         ' ने मजसी ने ' हे सावरकरांनी रचलेले देशभक्तीपर गीत मंगेशकर भावंडांकडून ऐकताना मंत्रमुग्ध होत असताना माझ्या डोळ्यांतून हळुवार पाणी ओथंबू लागले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या गीतामध्ये मातृभूमीकडे परत येण्याची अतितीव्र ओढ लागलेली आहे. ते सागराला आपला प्राण तळमळल्याचे सांगत आहेत. आज आपल्यात लतादिदी नाहीत , पण त्यांच्या सर्व गाण्यांनी त्या अमर ठरल्या आहेत. त्यांचे कोणतेही गाणे लावले , तरी त्या ओळी गुणगुणव्याशा वाटतील अशाच आहेत. गानकोकिळा भारतरत्न लतादी म्हणूनच महान आहेत. पुढील कित्येक पिढ्या त्यांच्या श्रवणीय गीतांचा आस्वाद घेत राहतील. 

          हल्ली अनेक गाणी येतात , हिट होतात. लतादिदींची गाणी एव्हरग्रीन आहेत. ती कोणत्याही काळात ऐका , ती नेहमीच आपलीशी वाटत राहतात. त्यांच्या आवाजाची जादूच तशी आहे. 

          ' ने मजसी ने ' हे गाणे मीही समूहसुरात म्हटले आहे. खूप अवघड शब्द आहेत त्या गाण्यात. अचूक यमक जुळवलेले आहेत. चाल कर्णमधुर आहे. अशी अवीट गाणी ऐकण्याचे व गाण्याचे भाग्य आमच्या पिढीला लाभले हेच आमचे परमभाग्य. लहानपणी अक्षरसिंधुमधील गायक महेश काणेकर यांच्याकडून मी हे गाणे ऐकले होते. त्यांच्या गायनाचा प्रभाव माझ्यावर पडला होता. 

          मी डी. एड. ला असतानाची गोष्ट आहे. त्यावेळी आमचे प्राचार्य शहा सर होते. प्राचार्य कसे असावेत ? याचे मूर्तीमंत उदाहरण होते ते. त्यांच्याबद्दल आम्हां छात्रशिक्षकांना कमालीची आदरयुक्त भीती होती. मी प्रथम वर्षात शिकत असताना द्वितीय वर्षात एक गोड गळ्याची गायिका शिकत होती. आमचे परिपाठ एकत्र होत असत. त्यामुळे आम्हांला त्यांच्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाचे आविष्कार नित्य पाहायला मिळत. तिचे नाव फुलासारखे होते. तिचे आडनाव गावाच्या नावावरुन होते. 

          आज ती आमच्यासमोर एक गाणं सादर करण्यासाठी पुढे आली होती. ती गायला लागली , ती जणू लता मंगेशकरांच्या आवाजात गात होती. मी डोळे बंद करुन गाणे ऐकू लागलो होतो. " ए मेरे वतन के लोगो , जरा आँख में भर लो पानी , जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी " तिने हे गाणे पूर्ण म्हटले होते. गाणे संपले होते , मी डोळे उघडले होते. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवल्या होत्या. 

          प्राचार्य शहासरांनी आपला चष्मा काढला होता. त्यांचे डोळे भरुन आले होते. त्यांनी आपले डोळे पुसायला सुरुवात केली होती. टाळ्या वाजवणारे आमचे हात अचानक थांबले होते. त्या गीताने खरंच रडायला लावले होते. शहासरांनी त्या मुलीला अशा प्रकारे शाबासकी दिली होती. त्यानंतर तिने हेच गाणे पुन्हा ज्या ज्या वेळी गायिले होते त्या त्या वेळी आम्ही सारखाच अनुभव केला होता. 

          असे अनेक दिग्गज आहेत , ज्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ' न भूतो न भविष्यती ' असे कार्य केलेले आहे. रमेश देव असतील , सिंधुताई सकपाळ असतील आणि आता लतादिदी असतील. 

          सगळेच आम्हाला हवेहवेसेच आहेत. स्वर्ग असलाच तर त्यांना स्वर्गात नक्कीच स्थान मिळेल यात शंका नाही. नुकतीच बातमी ऐकली , दशावतारी नटसम्राट सुधीर कलिंगण यांचे दुःखद निधन झाले. रोज अशा धक्कादायक बातम्या वाचून , ऐकून आपण या अभूतपूर्व व्यक्तिमत्वांना पारखे झालोय याचीही खंत वाटतेय. या सर्व मंडळीनी चित्रगुप्ताकडे जाऊन हेच गाणे परत परत म्हणावे असे वाटते , " ने मजसी ने परत मातृभूमीला " 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Tuesday, February 1, 2022

🛑 आमचा राजू का रुसला ?

          राजू नावाची अनेक मुलं असतील जगात. माझ्याही आयुष्यात तसे अनेक राजू आले आहेत. त्या सर्व राजूंचे जीवन जवळून पाहता आले आहे. या राजूंची खरी नावे वेगळीच असतात. राजू हे त्यांचं टोपण किंवा उर्फ नांव असतं. सगळेच राजू हे सारखे नसतात. त्यांचं दिसणं , असणं , वागणंही निरनिराळंच. 

          लहानपणापासून असे अनेक राजू मला लोभ लावून गेले. सोबती झाले. आम्ही भाड्याने राहात होतो , त्यामुळे खोल्या बदलाव्या लागत , तसे आमच्या आयुष्यात येणारे राजूही तसेच बदलत असत. खोली बदलू तिथे एखादा नवीन राजू भेटत असे. ही राजू नावाची माणसे जीवाला जीव देणारी असत हे विशेष. 

          डीएडला असताना माझी परीक्षा मालवणला होती. तिथे मला दहा पंधरा दिवस राहावे लागले. तिथे मी ज्या मावशीकडे राहायला होतो , त्यांच्या दोन नंबर मुलाचे नावही राजू होते. तो आणि त्याचा भाऊ महेश , बहिणी सगळ्यांनी मला कौटुंबिक प्रेम दिले. त्यांच्यामुळे मी डीएडला द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकलो. हा राजू अजूनही भेटतो , तेव्हा माझ्या विद्यार्थी काळातल्या आठवणी जागृत होतात. 

          काही राजू हे ' राजगो ' नावाने ओळखले जातात. त्यांच्या चांगल्या नावाचे कायमच विडंबन केलेले दिसून येते. आमच्या चुलतकाकांच्या मुलाला राजगो म्हणत. हा राजू किती निरागस होता म्हणून सांगू ? मी सांगेन ते तो ऐकत असे. मी त्याचा मोठा दादा असल्यामुळे तो माझा कमालीचा आदर करत असे. पण तो मोठा होत गेला तसा त्याने आपल्या वाईट सवयींना मोठे केले. त्या वाईट व्यसनांनी त्याचे जीवनच संपून गेले. तो राजू असा रुसून गेला तो परत आलाच नाही. 

          आम्ही ज्या ठिकाणी स्वतःच्या मालकीची खोली घेतली , तिथेही माझी नवीन राजुशी भेट घडली. हा राजू अतिशय प्रेमळ स्वभावाचा होता. जाता येता तो ज्या ज्या वेळी बाल्कनीत दिसे , प्रत्येकवेळी त्याची ' गुर्जी ' अशी आदराची हाक कायमच कानी पडे. उंच, धिप्पाड देहयष्टीचा हा राजू माझ्या सर्व मुलींसाठी राजुदादा बनला होता. माझ्या छोट्या मुलींना तर त्याने इतका लळा लावला होता कि तो त्यांना हाक मारल्याशिवाय कधी पुढे गेलाच नसेल. तो जास्त बोलला नसेल , पण त्याचे डोळे आणि स्मितहास्य खूप काही बोलून जात असत. तो आमचा शेजारी होता आणि त्याने कायमच आपला शेजारधर्म पाळला होता. तो परोपकारी होता. तो घरी आला कि एक चैतन्यच त्यांच्या घरी प्रवेश करत असे. भारदस्त अशी त्याची चाल समोरच्या माणसाला नक्कीच भुलवणारी. कोणाचीही दृष्ट लागेल असाच होता तो. 

          आणि या आमच्या राजुच्या आयुष्यातला तो काळा दिवस आला होता. त्याच्या कौटुंबिक कामानिमित्त तो आपली टू व्हिलर घेऊन दुपारीच निघाला होता. काम तसे महत्त्वाचे असावे म्हणून त्याला जावे लागले होते. तो गाडीवर बसला कि कसला भारी दिसे !!! त्या दिवशी त्याची गाडी त्याला घेऊन सुसाट निघाली असावी. घरातून निघून त्याला काही तास झाले असतील आणि एक वाईट बातमी आमच्या कानावर येऊन धडकली होती. ती बातमी आम्हांला धक्का देऊन गेली होती. राजुचा जबरदस्त अपघात झाला होता. त्याला बघायला मी घाईघाईने निघालो होतो आणि बघतो तर काय ? अपघातस्थळी शेकडो माणसांची गर्दी झालेली दिसत होती. एका महाभयंकर दिसणाऱ्या काळाने त्याचे प्राण हिरावून नेले होते. आमचा राजू आम्हांला कायमचा सोडून निघून गेला होता. 

          जमिनीवर निपचित पडलेला राजु अचानक उठून बोलू लागेल असं मला त्यावेळीही वाटलं होतं. आता त्याची ' गुर्जी ' अशी प्रेमळ हाक पुन्हा कधीच कानावर पडणार नव्हती.  

          आता जेव्हा मी बाल्कनीतून किंवा जिन्यातून येत जात असताना अचानक कधीतरी तो माझ्या समोर येईल आणि मला ' गुर्जी ' अशी हाक मारेल असे वाटण्यापलिकडे मी कोणताही वेगळा आभास निर्माण करु शकत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Sunday, January 30, 2022

🛑 नाभिक वारी : एक मांदियाळी

           गेल्या तीन ते चार वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक बांधव वारकरी होऊन आंगणेवाडी भराडी देवीला नतमस्तक होत आहेत. पंढरपूरला जाणारे वारकरी जसा भक्तिभाव ठेवतात , तसा भक्तिभाव ठेवून समस्त नाभिक जन निर्मळ मनाने देवीला वंदन करतात. 

          दोन वर्षांपूर्वी मी स्वतः या नाभिक वारीत सामील झालो. कणकवलीतून सकाळी सहा वाजता भालचंद्र मंदिरात जाऊन गाऱ्हाणे घालून वातावरण भक्तिमय करुन वारीचा शुभारंभ केला. २० ते २५ नाभिक बांधव सुरुवातीला होते. पुढे पुढे त्याचे दुप्पट होत गेले. संपूर्ण चालत जायचे होते. 

          मी पहिल्यांदाच एवढे लांब चालण्याचे मनोमन ठरवले होते. भराडीदेवीसाठी मी लहानपणापासून अनेकदा दर्शनाला गेलो असेन. रांगेत दोन ते तीन तास पुढे सरकत सरकत जाण्यात देवीच्या दर्शनाची तीव्र ओढ लागत असे. कधी एकदा देवीचे मुखदर्शन होते असे होऊन जाई. दर्शन घेण्याची वेळ जवळ आली कि दर्शनासाठी कासावीस होणारा मी क्षणात पुढे ढकलला जाई. मागचे लोक दर्शनासाठी आतुर झालेले असत. ती देवीची सजवलेली मनमोहक मूर्ती डोळ्यांत साठवून ठेवत आठवत राहताना दोन्ही हात जोडून काही सेकंदात नमस्कार पूर्ण होई.

          साष्टांग नमस्कार घालता येत नसे. मग बाहेर येऊन मंदिराच्या भिंतींना किंवा खांबांना घट्ट मिठी मारुन राहण्यात आनंद वाटे. खांबांना आलिंगन देताना देवीच्या पदस्पर्शाचा अनुभव केल्यासारखे वाटे. 

          बाहेरील भक्तगणांनी केलेली गर्दी पाहून देवीबद्दलची भक्ती अधिक वाढत जाई. सर्वजण काहीतरी मागणे किंवा गाऱ्हाणे घेऊन आलेले असत. कोणाला मुलगा हवा असे , कोणाला नोकरी हवी असे , कोणाला नोकरीवाली बायको हवी असे. काही लोक नवस करायला येत , काही नवस फेडायला येत. आपली तुला करुन त्या वजनाचा शिधा किंवा वस्तू देवीला वाहताना पाहून मलाही तसे करावेसे वाटे. मीही एकदा मनोमन नवस केला होता. मी माझ्या लग्नानंतर बायकोला घेऊन देवीचे दर्शन घेतले होते. नवसाला पावणारी भराडीदेवी आमची माताच जणू. तिच्याकडे आम्ही चांगलं बाळ व्हावं म्हणून मनातून नवस केला होता. सुंदर मुलगी जन्माला आल्यानंतर तिला देवीच्या चरणांवर ठेवले होते. देवीने आम्हाला इष्ट प्रसाद दिला होता. 

          त्यानंतर पुन्हा प्रत्येकवेळी मी आणि माझी पत्नी मुलीसह मंदिरात दर्शनासाठी जात राहिलो होतो. दोन हजार पाच साली माझ्या पत्नीने मुलगा व्हावा म्हणून मनस्वी नवस केला होता. मुलगा झाला होता , पण तो पोटातच गेल्यामुळे नवस फेडता आला नाही. तिने केलेला नवस फेडण्यासाठी तीही नव्हतीच. तिही देवाघरी किंवा देवीघरी निघून गेली ती कायमचीच. 

          त्यानंतर काही वर्षे मी आंगणेवाडीला गेलो नाही. पण पुन्हा माझी वारी सुरु झाली. वारी म्हणजे काय ? तर आपण दरवर्षी एखाद्या देवस्थानाला जातो , त्याला वारी असे म्हणतात. वारीला जाताना आपल्यासोबत अनेक बांधव असतात. त्यांच्याशी बोलत बोलत चालत किंवा गाडीने जाताना आपण भक्तिरसात ओथंबून जातो. देवीला नमस्कार करण्याचा वेळ काही क्षणांचाच असतो. पण त्या अभूतपूर्व क्षणसाठीच आपली वारी असते.

          थोडे स्वार्थी भावनेने आपण गेलेले असतो. काहीतरी मागण्यासाठी जातो म्हणजे स्वार्थीच नव्हे का ? आता मला जर काही मागायचे असले तर मी स्वतःसाठी काहीही मागत नाही. मी माझ्या बांधवांसाठी दीर्घायुष्य लाभावं आणि त्यांनी दरवर्षी देवीच्या वारीला आनंदानं सामील व्हावं अशीच प्रार्थना करतो. 

          माझ्या एका मामेभावाने या वारीला का जायचे असते याबद्दल छान सांगितले. तो म्हणाला , ' आपण दरवर्षी देवीसाठी एक दिवस तरी आपल्या शरीराची थोडीतरी झीज केली पाहिजे. खरंतर आपण देवीच्या दर्शनासाठी जातोय , पण त्या निमित्ताने आपण आपल्या शरीराचा व्यायामही घडवून आणतो. चालणे हा एक सर्वोत्तम व्यायाम प्रकार आहे.  चालत वारीला जाणे ही पद्धत म्हणूनच पूर्वापार चालत आलेली असावी. " माझ्या चालत चालत जाण्याने माझे पाय इतके दुखू लागले कि मला चालता येईना. अचानक तीस पस्तीस किलोमीटर चालल्यामुळे पायांवर ताण आला होता. पायांवर ताण आला तरी माझ्या मनावर अजिबात ताण आला नव्हता. मी मग दोन तीन किलोमीटर कोणाच्या तरी गाडीने गेलो. पुन्हा पुढे दोन तीन किलोमीटर जायचे शिल्लक होते. मी गाडीतून उतरुन चालण्याचा निर्णय घेतला होता. शेवटी नाभिक वारी पूर्ण केली तेव्हाच थांबलो होतो. येताना गाडीने आलो. त्यानंतर दोन दिवस अजिबात चालता येत नव्हते. पाय जमिनीला टेकवून उभेही राहता येत नव्हते. पण चालत वारीला गेल्याचा आनंद अपार होता. 

          आता दरवर्षी वारीचा संकल्प होतो. आम्ही नाभिक बांधव एकत्र येत राहतो. सर्व नाभिकांचे त्यानिमित्ताने मनोमिलन घडते. आपुलकी वाढते. ओळखीचे मैत्रीत रूपांतर होते. समाजातील आपल्या ज्ञातीबांधवांच्या गाठीभेटी होतात. नाभिकभक्तांचं दर्शन घडत राहतं. एकत्रित संवाद घडतो. हा हृदय संवाद घडण्यासाठीच या वारीची योजना केली असावी असेही वाटत राहते. पुढील वारी कधी येईल याची वाट पाहताना ती उद्या आली आहे हे लक्षात येताच वारीसाठी मन वाऱ्यासारखं उधाणतं , तसं माझं आता झालं आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )


Sunday, January 23, 2022

🛑 चोरी झाली हो

          एखाद्याच्या घरी चोरी झाल्याशिवाय त्याला समजू शकत नाही चोरी काय असते ते. ते सुद्धा आपल्या लहानपणी चोरी झाली असेल तर ती आपल्या मनावर जास्त कोरली जाते. माझंही तसंच झालं.

          आम्ही तेव्हा गांगोवाडी परिसरात राहात होतो. ते सावंतांचे घर होतं. खूप चांगली माणसं होती त्या चाळीत. ती चाळ म्हणजे एक घरच होतं म्हणाना. मालकांची सगळी मुलं आमचे चांगले मित्र झाले होते. संध्याकाळी दररोज त्यांच्या संगतीने आम्ही आरती किंवा भक्तिगीते म्हणत असू. बाबा दुकानातून रात्री उशिरा येत असत. त्यांची वाट पाहून आम्ही कधीच झोपलेले असू. त्यांनी खाऊ आणले असले तर बाबाच आम्हाला उठवत असत. मग त्या अर्धवट झोपेत आम्ही तो पदार्थ खात खात पुन्हा झोपत असू. 

          बाबांनी आमची सर्वांची  पोष्टात आर डी ची खाती उघडली होती. दरमहा दहा रुपये त्यात भरायचे असत. पाच वर्षानंतर मिळालेली रक्कम मोठी दिसत असे. आमच्या दोघा तिघांची आर डी मुदत संपली होती. त्यामुळे त्याची रक्कम नुकतीच प्राप्त झाली होती. बाबांनी त्यात काहीतरी मुलांसाठी दागिने किंवा एखादी नवीन वस्तू घेण्याचे ठरविले होते. म्हणून ती एवढी मोठी रक्कम घरातच ठेवली होती. रुम भाड्याचा होता. रूमचा दरवाजा मोठ्याने ढकलला की उघडेल अशी दरवाजाची अवस्था होती. पण आतापर्यंत आम्हाला त्या दरवाजाने कधी दगा दिला नव्हता. 

          त्या दरवाजाच्या जवळच मी आणि माझे बाबा झोपत असू. मी बाबांच्या कुशीत गाढ झोपणारा मुलगा होतो. त्यांच्याशिवाय मला झोप लागत नसे. मध्यरात्री जाग आली तर भीतीने बाबांच्या अधिक कुशीत शिरत असे. एक लोखंडी पत्र्याची कॉट होती. त्यावर सुद्धा कधीतरी आमचे झोपणे होई. पण मी मात्र कायम बाबांकडेच. बाकीची चार भावंडे आईच्या जवळ झोपत. रूममध्ये दोनच खोल्या होत्या. त्यात आम्ही सात माणसे कशीतरी दाटीवाटीने झोपत असू. 

          त्याच खोलीत दोन लोखंडी बॅगा होत्या. त्यात सर्वांचे कपडे ठेवलेले असत. बाबांनी दोन दिवसांपूर्वी मिळालेले पैसे त्या कपड्यांच्या खाली  लपवून ठेवले होते. ते पैसे तिथे ठेवल्याचे मला माहिती नव्हते. आईला आणि मोठ्या बहिणींना माहिती होते. 

          त्या दिवशी रात्री आम्ही सगळे गाढ झोपलो होतो. सकाळी बाबांना नेहमीप्रमाणे जाग आली होती. त्यांना लोखंडी पेट्या दिसल्या नाहीत. त्यांनी सगळ्यांना जागे केले होते.. आम्ही घाबऱ्याघुबऱ्या उठलो होतो. खरंच पेट्या कुठे दिसत नव्हत्या. दरवाजाकडे पाहिले. दरवाजा किलकीला उघडा दिसला. उघडून बघितला तर बाहेर एक भला मोठा दगड ठेवलेला दिसत होता. 

          बाबांनी ओळखले. चोरी झाल्याबद्दल ते म्हणाले. त्यांच्या कष्टाच्या कमाईचे पैसे चोरांनी चोरुन नेल्याबद्दल त्यांना खूपच वाईट वाटलेले त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. त्यांनी मातीच्या माठातील थंडगार पाणी प्यायला सुरुवात केली होती. कितीवेळ ते पाणीच पित होते. तेही खूप घाबरले होते पण घाबरल्याचे दाखवत नव्हते. आम्ही रडू लागलो. त्या आवाजाने शेजारी पाजारी जागे झाले. त्यांनाही चोरीबद्दल समजले. तोपर्यंत बाहेर दिसायला लागले होते. 

          खोलीपासून शंभर दिडशे मीटर अंतरावर असलेल्या नदीच्या किनाऱ्याजवळच्या झुडपांमध्ये आमच्या बॅगा चोरांनी विस्कटून टाकलेल्या दिसत होत्या. त्यातले पैसे तेवढे घेऊन चोर पसार झाले होते. आमची प्रमाणपत्रे सुद्धा विखरुन टाकली गेली होती. चोरांना त्यांचा काहीच उपयोग होणार नव्हता. कोणीतरी धावत धावत सांगायला आले होते. ते ऐकून आम्ही भावंडे आणि बाबा जिवाच्या आकांताने नदीच्या दिशेने धावत सुटलो होतो.      

          तिथे जाऊन बघतो तर काय !!! खरंच आमच्या दोन पेट्यांमध्ये मावणारा आमचा गरिबीतला संसार उद्ध्वस्त झालेला पाहायला मिळत होता. आमची पाच वर्षांची पुंजी त्या चोरांनी चोरुन नेली होती. 

          कोणीतरी पोलिसात तक्रार नोंदवली होती. चार पाच पोलिसांची फौज घटनास्थळी हजर झाली होती.  त्यांनी पहिल्यांदा आमच्याच घरातल्या माणसांचे ठसे घ्यायला सुरुवात केली होती. त्यांना आमच्यावरच संशय आला होता. पण आम्ही सर्वांनी त्यांना हवे तसे सहकार्य केले होते. 

          दुपारपर्यंत श्वानपथक आले होते. पोलिसांनी त्या श्वानांमार्फत तपास सुरु केला होता. आम्ही आमच्या विखुरलेल्या कपड्यांना हात लावू शकत नव्हतो. साखळी बांधलेले पोलिसांनी आणलेले कुत्रे कपड्यांचा वास घेऊन नदीपर्यंत धावत गेले होते व तिथेच घुटमळत राहिले होते. त्यांना पुढेही जाता येत नव्हते आणि मागेही. ते फक्त भुंकत राहिले होते. 

          पुढील तपास झाला कि नाही मला माहित नाही. पण आमच्या कष्टाचे पैसे मात्र आम्हाला मिळालेच नाहीत. 

          चोरी झाल्यानंतरच्या रात्री मी आणि बाबा कॉटवर झोपलो होतो. रात्री बाराचा सुमार असेल. बाहेर कुत्री मोठ्याने भुंकू लागली होती. मला वाटले आजही चोर आले असतील. मी एवढा घाबरलो होतो कि बाबांच्या कुशीत अधिकाधिक शिरत होतो. जसजसे कुत्र्याचे भुंकणे वाढे , तसे माझ्या हृदयाचे ठोके वाढू लागले होते. 

          त्या चोरांनी अलगद दरवाजा उघडून कशी चोरी केली , हे कोणालाही समजले नाही. कुणी म्हणाले, " त्यांच्याकडे मंतरलेले तांदूळ असतात. तांदूळ टाकून ते आपल्याला संमोहित करुन टाकतात , मग चोरी करतात. " त्या दिवशी खिडकीच्या बाहेर काही तांदळाचे दाणे होते खरे. मी स्वतः बघितले आहेत ते तांदूळ. 

          ह्या चोरांचं मला एक समजत नाही !! त्यांना चोरी करण्यासाठी आमचेच घर कसे सापडले ? त्या तांदळांनी आम्ही खरंच संमोहित झालो होतो का ? त्या चोरांना ते आमचे कष्टाच्या कमाईचे पैसे लाभले असतील का ? असे अनेक प्रश्न मला त्यावेळीही पडले होते आणि आताही.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर( 9881471684 )



🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...