🛑 बाबा आमचे शिल्पकार
आमच्या बाबांना अनेक गोष्टींचे ज्ञान होते. ते अंतर्ज्ञानी होते. पुढे घडणाऱ्या घटना त्यांना आधीच समजत. त्यांनी आम्हांला एखादी गोष्ट करु नकोस म्हटले आणि आम्ही ती केली तर ती योग्य होणार नाही याचा मलातरी अनेकदा अनुभव आलेला आहे.
एखादी गोष्ट करायला सांगितली तर ती केलीच पाहिजे असा त्यांचा दंडक असे. ती परिपूर्ण होऊन सुद्धा जाई. त्यामुळे बऱ्याचदा मी त्यांच्या नकळत अनेक गोष्टी करत गेलो आहे. यशस्वी झाल्यानंतर मी त्यांना सांगत गेलो आहे. त्यावेळी त्यांना आनंद झालेला दिसे, पण मी त्यांना ती गोष्ट पश्चात सांगितली याचे दुःखही होई.
ते आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या यशाचे शिल्पकार आहेत. आमचे सुंदर आणि यशस्वी आयुष्य व्हावे यासाठी त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्या आहेत. ते अष्टपैलू होते. ते अनेक कौशल्ये जाणत असत.
ते उत्तम केशकर्तनकार होते. त्यांनी कात्रीने कापलेले केस नुसते पाहत राहावेत असे असत. केस मिळविण्याची त्यांची पद्धत अप्रतिम होती. त्यामुळे कणकवलीतील अनेक श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब सर्व पातळीचे लोक त्यांचे कायमचे कस्टमर होते. त्यांचे कायमचे कस्टमर आमच्याकडे खूप क्वचित बसत. बाबांचा हात लागला नाही तर त्यांना केस कापल्यासारखे वाटत नसे. म्हणून मीदेखील त्यांचे कस्टमर करण्याचे धाडस करत नसे. बाबांनी अनेकांना आपल्या दुकानात सलून काम शिकवले आहे. मी त्यांचाच शिष्य. सुरुवातीला मला गालाला साबण लावण्याचे काम असे. हळूहळू बाबांची कला माझ्या हातात रूळली. शाळा, अभ्यास, दुकान एवढीच आमची दैनंदिनी असे. अनेक विनंत्या केल्यानंतर आम्हांला कधीतरी खेळायला किंवा सायकल चालवायला पाठवले तर. नाहीतर आम्ही नेहमी बाबांच्या आदेशांचे बांधलेले.
टेलरिंग हा त्यांच्या आवडीचा छंद होता. तोही त्यांनी व्यवसाय बनवला. आमच्या दुकानात एक शिलाई मशीन असे. ती खूप जुनी झाली होती. तरीही बाबांनी तिला दुरुस्त करुन करुन वापरले. तिच्यावर त्यांनी जिवंत व्यक्तीवर प्रेम करावे तसे प्रेम केले. बाबा ब्लाऊज, झबली, हाफ पॅन्ट, सदरे, लेंगे, फ्रॉक छान मापात शिवत असत. नाडीची चड्डी स्पेशालिस्ट म्हणून ते प्रसिद्ध होते. अजूनही बाबांचे नाडी चड्डीचे कस्टमर घरी येत. बाबा घरच्या घरी चड्डया शिवून देत किंवा त्यांच्या घरपोच करत. त्यांचे आवडीचे काम असल्याने मी त्यांना बोलत नसे.
बाबा कधीही स्वतःसाठी खर्च करत नसत. ते नेहमी कुटुंबासाठी खर्च करत राहीले. खिश्यातील पैसा संपल्यावर त्यांना आनंद होई. मी किंवा भावाने दिलेले पैसे ते परोपकारासाठी खर्च करत. पैसे संपेपर्यंत ते खर्च करीत राहत.
बाबा उत्तम मूर्तिकार होते. त्या काळात त्यांनी कणकवली, आंब्रड, गोठणे आणि किर्लोस अशा चार मूर्तिशाळा चालवल्या. त्यांचे हातीकाम बघतच राहावे. आता अनेक मूर्तिकार साच्यांचा आधार घेतात. आमची गणपतीची शाळा म्हणजे त्यांचा अभिमान होता. गणपतींचे डोळे उघडणे म्हणजे अतिशय अवघड काम असे. रात्र रात्र जागरणे करुन बाबा ते काम करीत. दोन्ही भुवया सारख्याच कशा येतात हा मला प्रश्न पडे. त्यांचे हात आणि ब्रश भराभर चालत.
ते कविमनाचे होते. चांगले वाचक होते. त्यांनी अनेक पुस्तके त्या काळात वाचून फडशा पाडला होता. त्यामुळे त्यांच्या मुखातून नेहमीच सरस्वती नांदत असे. फक्त जुनी सातवी शिकलेले माझे बाबा जेव्हा बोलत तेव्हा त्यांच्या गोष्टी आम्ही भान हरपून ऐकत असू.
आई आजारी असताना तिची सेवा करत असताना बाबांनी आपले आत्मचरित्र लिहायला घेतले. आई गेल्यानंतर बाबांची लेखणी थांबली. सलून मधील त्यांच्या गजाली ऐकायला कणकवली कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे व कणकवली नं. ३ चे उच्चश्रेणी मुख्याध्यापक मारुती पालवगुरुजी मुद्दाम येऊन दोन दोन तास सलग बसत असत.
असे आमचे बाबा ज्यांच्याबद्दल मी कधीही लिहायला घेतले की त्यांच्या अनुभवांच्या शाळेतील शिल्पे माझ्यासमोर अशीच नाचत राहतात.
©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १

No comments:
Post a Comment