🛑 झिला, माका सोड
बाबांची तब्येत अचानक बिघडली. बिपी वाढण्याचे निमित्त झाले. वाढत असलेला बिपी आणि त्यांचे पूर्वीचे आजार थांबायचे नाव घेईनात.
अगदी काल परवा पर्यंत चांगले चालते फिरते बाबा विविध आजारांनी त्रस्त झाले होते. १० ते १२ दिवसांच्या कालावधीत ते कोमात गेले.
हात खांद्यात दुखणे, संडासातून रक्त पडणे, हर्निया हे त्यांचे खूप जुने आजार वयोमानानुसार पुन्हा पुन्हा उद्भवत होते. या आजारांची त्यांनी स्वतः कधीच पर्वा केली नव्हती. त्यांचा त्यांनी नेहमीच हसतमुखाने प्रतिकार केला होता. अचानक बिपी कसा वाढला हे अजूनही आमच्यासाठी असलेलं गूढच आहे.
आम्ही बाबांना नेहमीच खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ते आमच्यावर लहान मुलासारखे प्रेम करीत. बारीकसारीक गोष्टी आम्ही लहान मुले असल्यासारखी समजावून सांगत. आम्ही त्यांच्यासाठी नेहमीच लहान होतो आणि असणार. त्यांच्याइतकं मोठं होणं कधीच शक्य नाही. त्यांनी हे जग सोडून जाणं आमच्यासाठी अपार दुःखाच्या नावेत सतत हेलकावे खात राहण्यासारखं आहे.
त्यांनी आम्हाला अनेकदा दुःखाचा वारा लागू दिलेला नाही. संकटात समर्थपणे पाठीशी ठाम उभे राहिले. स्वतः कधीही रडले नाहीत आणि अनेकदा आमचं रडणंही थांबवलं आहे.
गेले १० ते १२ दिवस मी सतत त्यांच्यासोबत होतो. त्यांची जितकी सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करत होतो. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना त्यांनी जणू असहकार पुकारला होता. त्यांना आपल्या शरीराला अनेकविध चाचण्या करुन घेतानाही अतिशय वेदना होत होत्या. जे त्यांनी आपल्या शरीराबरोबर कधीही करुन घेतले नव्हते तेच त्यांना करावे लागत होते. आम्हांलाही त्यांना होणाऱ्या यातना सहन होत नव्हत्या. एकदा डॉक्टरांच्या उपचारांच्या कचाट्यात सापडलो की ते सांगतील तसे करत बसण्याशिवाय पर्याय उरत नाही. आमच्या बाबांच्या बाबतीत तसेच घडले.
वेगवेगळ्या तीन डॉक्टरांच्या सहा दिवसांच्या उपचार मालिकेनंतर आता प्रेमाच्या सेवेचा उपचार करण्याचे सर्वानुमते ठरले. कोमासदृश्य परिस्थितीत असलेले माझे बाबा अजिबात हालचाल करु शकत नसताना आम्ही घरी आणण्याचा योग्य निर्णय घेतला होता.
घरी आणताना रुग्णवाहिकेत बाबांनी डोळे उघडले. अर्थात त्यांना घरीच जायचे होते म्हणून त्यांनी डोळे उघडले असावेत. घरी जाईपर्यंत मी त्यांच्याशी बोलतच होतो. वाटेतील सर्व देवदेवता त्यांना आठवून देण्याचा माझा प्रयत्न मलाच केविलवाणा वाटत होता. माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले होते.
अखेर आम्ही बाबांना घेऊन घरी ( घर मठी ) आलो होतो. त्यांच्या स्वतःच्या रूममध्ये त्यांना झोपवले. सर्वांनी त्यांना हाका मारायला सुरुवात केली. पाण्याचे दोन चमचे जिभेवर पडताच बाबांनी पुन्हा डोळे मिटले. श्वास सुरु, हातापायांची गती मंद झालेली, डायपर बदलताना तो स्वच्छ अशी परिस्थिती होती. नाकात घातलेल्या नळीवाटे पेज, पाणी आणि शहाळ्याचे पाणी असेच भरवणे सुरु होते.
नेहमीप्रमाणे सकाळ झाली होती. बाबा निश्चलच होते. नातेवाईक, मित्र, गावकरी येऊन येऊन विचारपूस करुन जात होते. नळीत पेज भरवायला घेतली. पेज पोटात जात असताना ती पुन्हा मागे येत असलेली पाहून नाकातील नळी सुद्धा काढून टाकावी लागली.
आता बाबा नाकातून श्वास घेतील असे मला वाटले. पण नळी काढली तरी नाकातून श्वास घेणे सुरु नव्हते. बाबा तोंडाने जलद गतीने श्वास घेत होते. अचानक त्याचीही गती मंदावली. त्यांच्या मुखातून कधी काळा तर कधी तपकीरी रंगाचा फेस यायला लागला होता. मी त्यांच्या उशाशीच बसून होतो. रात्री १० वाजल्यानंतर त्यांनी आपली जीभ वळवली. मान दोन्ही दिशांना हलवली. माझ्या काकांनी मला बाबांचे डोके मांडीवर घ्यायला सांगितले. मी डोके मांडीवर घेऊन बाबांना दोन चमचे पाणी भरवताच बाबांनी माझ्या मांडीवरच आपला देह कायमचा ठेवला.
डॉक्टरांकडे असताना त्यांना ३५ पेक्षा जास्त सलाईन लावावी लागली. त्यांना ती सहन होईनात म्हणून ते हलू लागले, मोठ्याने हलवू लागले. त्यामुळे त्यांचे हात पाय बांधून ठेवण्याचा पर्याय डॉक्टरांनी निवडला. आम्ही उघड्या डोळ्यांनी बाबांचे होणारे हाल निमूटपणे पाहत होतो.
बाबा मला नुसते विनंती करत होते. " झिला, माका सोड, झिला, माका सोड " मी त्यांना सोडू शकलो नाही. मला त्यांना बरे झालेले बघायचे होते. त्यांना सोडत नव्हतो म्हणून त्यावेळी त्यांना माझा खूप राग आलेला होता. बाबा डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्यामुळे मी त्यांना सोडले नाही. पण घरी आणल्यानंतर ते चारच दिवसात आम्हाला कायमचे सोडून गेले. त्यांचे आम्हा सगळ्यांवर निरतिशय प्रेम होते. त्यांची जगण्याची तीव्र इच्छा होती. सगळी मुले, माणसे प्रत्यक्ष येऊन गेल्यानंतरच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला आम्हाला पोरके करुन.
©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १

No comments:
Post a Comment