🎈स संदीपचा , क कदमांच्या , क कवितेचा
संदीप कदम हे एक गुणी आणि आदर्श शिक्षक आहेत. त्यांचा आणि माझा परिचय देवगड तालुक्यातला. अनेकदा आम्ही प्रशिक्षणे , स्पर्धा आणि एकाच तालुक्यात असल्यामुळे एकत्र आलो आहोत. कणकवली तालुक्यात माझ्या कणकवलीतील घरापासून तीन ते चार किलोमीटरवर त्यांचे जानवली येथे घर आहे. मला त्यांच्या घरी जाण्याचा एकदाही योग आलेला नाही. तरीही संदीप कदम सरांच्याकडे बघून मीही त्यांचे काही गुण घेतले असावेत.
‘ एक घास चिऊचा ’ हा त्यांचा सुप्रसिद्ध शालेय उपक्रम मलाच काय कोणालाही भुरळ पाडू शकतो. शाळेत जाऊन प्रामाणिकपणे फक्त शिकवावे असे म्हणणाऱ्या शिक्षकांच्या व्याख्येला त्यांच्यासारखेच शिक्षक बदलवू शकतात. त्यांनी शाळेच्या भिंतींच्या बाहेर जाऊन शिकवले आहे. शिक्षण हे कधी चार भिंतींच्या आत घडत नसते हे त्यांनी प्रात्यक्षिकाने सिद्ध केलेले आहे. त्यांच्या सहवासात राहणारा माणूस सुजनवाक्य बोलणारा नाही झाला तरच नवल. ते आपला अभ्यासक्रम जगत असतात.
सानेगुरुजींच्या ‘ भूतदया ’ या गोष्टीची आठवण येते. झाडावरुन खाली पडून मरत असलेल्या पक्ष्याला छोट्या श्यामने जीवदान दिले होते खरे , पण तोच पक्षी जेव्हा हे जग सोडून गेला तेव्हा झालेले दुःख सानेगुरुजींनी अत्यंत करुण शब्दांत व्यक्त केलेले दिसते. या मृत पक्ष्याला मातीत पुरुन त्यावर आठवणीसाठी झाड लावणारे छोटे सानेगुरुजी मला म्हणूनच आठवतात. मुलांनी पक्ष्यांवर प्रेम करावे , प्राणिमात्रांवर दया करावी यालाच भुतदया असे म्हणतात. हीच भुतदया मुलांमध्ये निर्माण होण्यासाठी संदीप कदम सरांनी राबविलेला छोटासा उपक्रम खूप मोठे आणि चिरकाल टिकणारे संस्कार करुन जातो. या उपक्रमाची संकल्पना त्यांच्या डोक्यात कशी आली असावी याचा विचार केला तरी कदमांच्या विचारांतील दम लक्षात येतो.
त्यांचे अक्षर मोत्यासारखे म्हटले तरी वावगे ठरूच नये. अक्षरांचे मोड त्यांच्याकडून शिकलेली मुले भाग्यवान म्हटली पाहिजेत. शिक्षकाचे अक्षर सुंदर असलेच पाहिजे. त्याने लिहिलेला फळा कधीच पुसू नये असे वाटत राहावे असे कदमसरांचे अप्रतिम लेखन असते. त्यांनी कलेची कोणतीही डिग्री घेतली असेल तर मला माहिती नाही. तरीही हस्ताक्षरात त्यांचा हात धरणारे विरळेच असावेत. सध्या ते नडगिवे नं. 1 शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून अतिशय उपक्रमशील रीतीने कार्यरत आहेत. त्यांच्यासारखे शिक्षक मिळणे हे त्या शाळेचे आणि केंद्राचेही भाग्यच म्हणायला हवे. आदर्शवत राहणीमान बघून ते शिक्षक आहेत हे कोणीही सांगेल. ते अतिशय नम्र आहेत.
मिठबांव , शिरगांव अशा ठिकाणी आमची दहा दहा दिवसांची प्रशिक्षणे झाली आहेत. प्रत्येकवेळी त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केलेली ऐतिहासिक पात्रे अजूनही डोळ्यासमोर उभी राहतात. त्यांचा इतिहासाचा गाढा अभ्यास आहे. त्यांनी आपल्या शिक्षकमित्र चमूंसोबत अनेकविध कार्यक्रम केलेले असू शकतात. आत्मविश्वास त्यांच्यात ठासून भरलेला आहे. ते मार्गदर्शक म्हणून बोलू लागले कि श्रोत्यांना याचा प्रत्यय आल्याशिवाय राहायचा नाही.
शिक्षक संघटना आणि सामाजिक संघटनेमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर असूनही त्यांनी कधीही अहंकार केलेला असेल असे वाटत नाही. ते अतिशय संवेदनशील आणि सहनशीलही आहेत. आपल्यापेक्षा कमी सेवा झालेल्या आम्हांलाही ते अतीव आदर देतात. त्यांच्यासोबत काही तासांचा कालावधी जाणे हेही माझ्यासारख्याला अतिशय आनंददायी असू शकतं. त्यांना हल्लीचं हे बेगडी जग आवडत नाही. त्यांना प्रसिद्धीही नको असते. प्रसिद्धीपासून ते जरा दूरच राहणं पसंत करतात.
ते कविमनाचे आहेत हे माहिती होते. पण नुकत्याच आमच्या मुख्याध्यापक सहविचार सभेत त्याची प्रचिती आली. त्यांनी आणि त्यांच्या कवीमित्रांनी लिहिलेल्या एका काव्यसंग्रहाचे नुकतेच समारंभपूर्वक प्रकाशन झाले होते. कदम सरांनी आम्हांला ही माहिती दिली आणि आम्हीही आनंदलो. आमच्या एका शिक्षक मित्राच्या काही सुंदर निवडक कविता काव्यसंग्रहात छापून येतात हेच आमच्यासाठी अभिमानाची बाब असते. मग काय त्यांना केंद्रप्रमुख पवार साहेबांनी कविता वाचन करण्याची अनमोल संधी दिली. आमच्यासाठी ऐकण्याची ती सुवर्णसंधी होती. पुढील पाच दहा मिनिटे कदम सरांच्या सुंदर शब्दांचा जागर आमच्यासमोर धबधब्यासारखा कोसळत राहिला होता. ‘ स संदीप सरांच्या ’ ‘ क कदमांच्या ’ ‘ क कवितांचा ’ तास कधी संपूच नये असे मला अजूनही वाटते आहे.
Ⓒ प्रवीण अशितोष कुबल ( मुख्याध्यापक , शिडवणे नं. 1 )





No comments:
Post a Comment