Monday, March 14, 2022

🛑 गोमू संगतीनं

🛑 गोमू संगतीनं

          होळी आली की गोमुची आठवण येते. प्रत्येक घराघरात खेळे घेऊन जाणारे गावागावातील गट पुन्हा एकदा त्यानिमित्ताने एकत्र येतात. काही गावात ' कोळीण ' नावाचा प्रकार असतो. ही कोळीण म्हणजे एक पुरुषच असतो. त्याने साडी परिधान केलेली असते. तो किंवा ती अगदी बालगंधर्व दिसत नसली तरी बाईसारखी तरी नक्कीच दिसते. मेकअप थोडा भडकच केलेला असतो. पण ही ' कोळीण ' होळीच्या काळात भाव खाऊन जाते.      

          पूर्वी परंपरेने एकाच घरातील पुरुष साड्या नेसून कोळीणी बनत. मग पुढे पुढे साड्या नेसणारे मिळेनासे झाले. मग आता कोणालाही धर दपट साडी नेसवून रंग फासून कोळीण बनवले जाते. थोडे नाचायला आले की झाले. 

          होळीच्या दिवसांत या कोळीणीचा दर वाढतो. अशा कोळिणी आता अडवून दाखवू लागल्या आहेत. देवस्थानासाठी करावे लागते म्हणून या कोळीण होणाऱ्या नटांच्या हाता पाया पडण्याची वेळ येते. 

          लहानपणी आम्ही कोळीणीच्या मागे फिरत असू. तीच तीच गाणी असली तरी ऐकायला मजा वाटे. कोळीण आपली रुमाल हातात धरुन पुढे मागे  ठेक्यात नाचत राही. डफाच्या तालावर पायांचा ठेका धरणाऱ्या गवळणी प्रशंसेस पात्र ठरत. कोणी वीस , पन्नास , शंभर रुपये तळीमध्ये ठेवून कोळीणीला शबय देत. 

          माझे बालाकाका कोळीण झाले की छान नाचत. त्यांच्यासारखे नाचून गाणे म्हणणारी गवळण मी आजपावेतो पाहिली नाही. सूर , ताल आणि चाळांचा अचूक ठेका असल्यामुळे त्यांची कोळीण सर्वांनाच आवडे. त्यांच्या लावण्या सुद्धा वैविध्यपूर्ण असत. चाली श्रवणीय असत. त्यामुळे प्रत्येक घरात वेगळा नाच पहावयास मिळे. आमच्या भाईकाकांची डफावरची थाप कोणालाही नाचायला भाग पाडेल अशी होती. 

          गुढीपाडव्याच्या रात्री मांडावर सगळी गाणी होत. मध्येच एखादी बतावणी असे. विनोद असत. काही माणसे विचित्र सोंगे आणून उपस्थितांना हसवून सोडत. ती सोंगे पुन्हा पुन्हा पहावीशी वाटत. 

          आम्ही कणकवलीत असल्यामुळे शाळा करुन ' गोमुचा नाच ' करताना खूपच धावपळ उडून जाई. आम्हाला अभ्यासही करायचा असे आणि गोमुचा नाचही करायचा असे. मग शनिवार , रविवार दोन दिवस निवडून किंवा जोडून एखाद्या दिवसाची शाळेला दांडी मारुन गोमुचा नाच घेऊन जात असू. 

          त्यावेळी आम्ही जळकेवाडीत राहत होतो. सदानंद डिचोलकरांच्या घरी भाड्याच्या खोलीत राहत असलो तरी मालक आणि सर्व शेजारी यांच्याशी आमचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. मी गाणी म्हणण्यात पटाईत होतो. माझा छोटा भाऊ कृष्ण होत असे. शेजारचे दोघे सवंगडी होत असत. 

          त्या दिवशी रविवार होता. आम्ही दिवसभर आमचा गोमू घेऊन फिरत होतो. कोणी दहा पैसे , वीस पैसे असे पैसे देत असत. पन्नास पैसे म्हणजे आमच्यासाठी त्यावेळी सगळ्यात मोठी देणगी असे. सोबत मोठा संजयदादा डिचोलकर कायम असायचा. तो आमचा खजिनदार होता. संध्याकाळपर्यंत आमचे एकूण सोळा रुपये जमले होते. एका दिवसात आमच्या गोमूने केलेली ही कमाई आमच्यासाठी त्यावेळी लाखमोलाची होती. आमच्या वाटणीला येणारे सर्व पैसे आम्ही आमच्या आईच्या ताब्यात देऊन ठेवू. आम्हाला शिक्षणासाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी आई त्यातले थोडे थोडे पैसे देत राही. आम्ही त्या पैशातून कधीही खाऊ घेतल्याचे मला आठवत नाही. आपल्या या कलेचा उपयोग आम्ही शेवटी शिक्षणासाठीच केला होता या गोष्टीचा आजही मला सार्थ अभिमान वाटतो. 

          लहान असताना लाज वाटत नसे , थोडा मोठा झाल्यानंतर गोमू घेऊन जायला लाज वाटू लागली. होळीच्या काळात परीक्षांचे वातावरण असे. त्यामुळे काही लोक आम्हाला ओरडत असत. परीक्षेत ' गोमूची गाणी ' लिहिणार आहात काय ? असेही म्हणणारी माणसे भेटली आहेत. काहींनी पाठीवर शाबासकीही दिली आहे. शाबासकी देणाऱ्या लोकांना आम्ही नेहमीच लक्षात ठेवले आहे. ओरडणाऱ्या व फुकटचे सल्ले देणाऱ्यांनाही नेहमीच आदर दिला आहे. 

          आता गोमुचा नाच बघितला की माझा लहानपणीचा गोमुचा नाच लक्षात येऊन आजही हसू येतं आणि स्वतःचा अभिमानही वाटतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Sunday, March 13, 2022

🛑 शिडवणे नं . १ च्या मुलांनी पाहिली पावनखिंड

🛑 ऐतिहासिक चित्रपट मुलांनी एकत्र बसून अनुभवला

🛑 कणकवली : 

          चौथीच्या ' शिवछत्रपती ' या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगितली आहे. त्यातील बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव शिडवणे नं.१ च्या विद्यार्थ्यांनी लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली येथे सिनेमागृहात जाऊन घेतला. 

          " पावनखिंड " हा चित्रपट बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित असला तरी त्यात शिवाजी महाराज , शंभूराजे , बहिर्जी नाईक , जिजाऊ , हरप्या , कोयाजी , रायाजी बांदल , दिपाई , अगिन्या , शिवा काशिद , पंत ,  किल्लेदार आणि अशा अनेक मावळ्यांनी केलेल्या पराक्रमाचे प्रसंग दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे त्यावेळी घडलेले प्रसंग जसेच्या तसे मुलांच्या लक्षात राहण्याइतके दाखवले गेले आहेत. 

          त्यावेळी शाळेतील बत्तीस मुले , शिक्षक प्रवीण कुबल , सुजाता कुडतरकर , सीमा वरूणकर , मुख्याध्यापक सुनिल तांबे आणि शिक्षणप्रेमी सुनिल शेट्ये , पालक सचिन टक्के आदी उपस्थित होते. माफक दरात चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल चित्रमंदिर व्यवस्थापनाचे व शिक्षण विभागाचे सर्व पालक , शिक्षक यांनी आभार मानले आहेत.




Saturday, March 12, 2022

🛑 पावनखिंड : एक ऐतिहासिक बाजी

         " काळाच्या जबड्यात घालूनी हात , जात ही आमुची , पाहा चाळूनी पाने आमच्या इतिहासाची " हे गाणे मी महाविद्यालयात शिकताना कधी काळी म्हटल्याचे आठवते. खरंच या ओळीतील शेवटची ओळ खूप महत्त्वाची आहे. आपल्याला आपला इतिहास चाळून पाहता यायला हवा. 

          आज दुसऱ्यांदा शाळेतील मुलांसोबत ' पावनखिंड ' हा चित्रपट पाहण्याचा सुवर्णयोग आला. मी एक शिक्षक आहे , म्हणून मला हा सुवर्णयोग वाटतो. कारण कुटुंबासोबत चित्रपट पाहणं आणि आपल्या विद्यार्थ्यांसोबत चित्रपट पाहणं हे वेगवेगळे अनुभव आहेत. मी हे दोन्ही अनुभव घेतले आहेत. दोन्ही वेळेला माझ्या भूमिका बदलल्या होत्या. मनोरंजन आणि ज्ञानार्जन अशा त्या दोन गोष्टी असाव्यात. 

          मुलांना चित्रपटाविषयी सांगितल्यापासून ती बघण्यास अधीर झालेली दिसत होती. दररोज मुलांचे आकडे वाढताना दिसत होते. चित्रपटात मोठया पडद्यावर दिसणारा थरार मुलांना अनुभवायचा होता. 

          शनिवारी सर्रास उशिरा शाळेत येणारी मुले माझ्याअगोदरच शाळेत येऊन वाट बघताना दिसली. गाडीने जायचे तर प्रवासी गोळ्यांपासून तयारी ठेवली होती. सर्वांना शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले बॅज लावले. मुले आनंदाने निघाली होती. 

          शाळेतील आम्ही शिक्षक त्यांच्याबरोबर होतो. आज आम्हांला त्यांना अधिक जाणीवपूर्वक सांभाळण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी होती. बोलता बोलता सिनेमागृह कधी आले ते मुलांनाही समजले नाही. आमच्या आधीच बरीच मुले येऊन रांगेत राहिलेली दिसली. आम्ही मुलांना महत्त्वाच्या सूचना द्यायला सुरुवात केली होती. आमचा नंबर यायला उशीर होत होता. मुले नुसती " सर , कधी जाणार आपण ? " असे प्रश्न विचारत राहिली होती. त्यांना कंटाळा येऊ नये म्हणून मी त्यांचे छान छान फोटो काढत राहिलो होतो. शेवटी एकदाचा नंबर लागला. मुले भराभर आत जात होती. त्यांच्या नजरा चौफेर दौडत होत्या. त्यांनी जे बघितले नव्हते , ते त्यांना बघायला मिळत होते. ते सर्व क्षण मुले आपल्या मेंदूत टिपून घेताना दिसत होती. बॅज लावल्यामुळे आम्ही आमची मुले ओळखु शकत होतो. 

          मुलांनी खुर्च्यांचा ताबा घेतला. चित्रपट सुरु होण्याआधीच त्यांनी आपल्याकडील आणलेले खाऊ खायला सुरुवात केली. कदाचित त्यांना भूक लागली असावी !!! चित्रपट सुरु झाला होता. आता मात्र त्यांचे खाऊ खाणे थांबले होते. ती चित्रपटात दंग झाली. 

          शिवाजी महाराजांचा इतिहास बघताना त्यांचे डोळे विलक्षण चमकताना दिसत होते. पहिल्याच दृश्यात शिवाजी महाराज आपल्या शंभुबाळाला पावनखिंडीचा पराक्रम सांगत असताना आमची मुले जणू शंभुबाळ झालेली दिसली. 

          चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात नसलेले मावळे पाहून त्यांच्या ज्ञानात अधिक भरच पडत होती. जे वर्षभरात पुस्तकातून शिकवले जाणार नव्हते , ते दोन तीन तासांत बघण्याची संधी मुलांना प्राप्त झाली होती. 

          हरप्या , अगिन्या , रायाजी , कोयाजी , दिपाई , शिवा काशीद , बहिर्जी नाईक , बांदल , बाजीप्रभू आणि सगळी मावळे मंडळी पाहून मुले भारावून गेली होती. आपल्या प्राणांची पर्वा न करणारी कितीही उदाहरणे दिली तरी ती समजली नसती , पण चित्रपट पाहिल्याने त्यांचा देशाभिमान , स्वराज्याभिमान अधिकाधिक वृद्धिंगत होताना पाहायला मिळाला ही विशेष नोंद करण्यासारखी गोष्ट आहे. त्यावेळी शिवाजी महाराजांनी उच्चारलेले हे वाक्य मनात अधिक खोलवर रुजले जायला हवे असे वाटते. राजे म्हणाले , " ज्या सत्ता स्वार्थासाठी असतात , त्यांना त्याग आणि स्वामीनिष्ठा माहिती नसते. " आपण आपल्या कर्तव्याशीही असेच कर्तव्यनिष्ठ असायला पाहिजे असाही एक अर्थ मी काढला होता. 

          " वज्र वलय " हा युद्धाचा प्रकार पहावयास मिळाला. शिवा काशिद जेव्हा शिवाजीराजे बनून सिद्धी जोहरला भेटण्यास गेला तेव्हाची त्याची स्वामीभक्ती पाहिली. डोक्यावरचा शिवरायांचा जिरेटोप उतरवून त्याला त्याने मुजरा केला आणि तो जे वाक्य बोलला त्याने अंगावर शहारे आले. शिवा म्हणाला , " राजं , शेवटचा मुजरा " … 

          रायाजीने पावनखिंड लढवताना आपला देह ठेवला , तेव्हा इकडे त्यांची पत्नी शौर्याचा दीप विझु नये म्हणून आटापिटा करताना दिवा विझतानाचा क्षण हृदय भेदून टाकणाराच होता. 

          बाजीप्रभूंनी आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत शत्रुसैन्याला रोखून ठेवतानाचे दृश्य पाहताना त्या काळी प्रत्यक्षात काय घडले असेल याची जाणीव होऊन त्यांना नतमस्तक व्हावेसे वाटले. विशाळगडावर पोहोचल्यानंतर शिवाजीराजे म्हणाले , " आमचे बाजी वाट पाहत असतील , तोफा वाजवा. " त्यावेळी ते स्वतः ही गर्भगळीत झाल्याचे दिसले. तेव्हा ते म्हणाले , " बाजी लवकर या " बाजी काही परत आले नाहीत. पण आपले बाजी कायमचे सर्वांच्या मनामनात अमर झाले आहेत. 

          चित्रपट संपला , तरी मुलांना घरी जाईपर्यंत पावनखिंड डोळ्यासमोरुन हलता हलत नव्हती. धन्य ते शिवराय , धन्य तो बाजी.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर (9881471684 )




















Thursday, March 10, 2022

🛑 कणकवली शहर अध्यक्ष मा. अनिलजी शिंदे यांना हॅप्पी बर्थडे

          आम्हाला जे अनिल भेटले ते अफलातून आहेत. जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , देवगडचे अनिल चव्हाण आणि आता आमचे कणकवली शहराचे अध्यक्ष अनिल सहदेव शिंदे.

          त्यांचे चौकस व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना अनेक प्रश्न पडतात. काही प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडेच असतात. काहीवेळा प्रश्न तेच उपस्थित करताना दिसतात आणि त्यांची उत्तरेही तेच देताना दिसतात.
          त्यांचे प्रश्न भारीच असतात. पण आता ते स्वतः अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी आता आपले प्रश्न न मांडता दुसऱ्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी कार्यतत्पर असायला पाहिजे. ते एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी ठरवले तर आपल्या शहराचा ते कायापालट करु शकतात. पण त्यांनी आता स्वतःहून संघटनेत सक्रिय व्हायला हवे. संघटनेच्या सर्व उपक्रमांमध्ये हिरीरीने भाग घेत राहायला हवा. सभांव्यतिरिक्त कार्य करता यायला हवे. त्यांच्यामध्ये या सर्व क्षमता आहेत.
          ते एकदा गायला लागले तर समोरच्याने फक्त ऐकत राहायचे आहे मंत्रमुग्ध होऊन. इतका त्यांचा कर्णमधुर आवाज आहे. ते आध्यात्मिक आहेत. त्यांच्या पत्नीही आमच्या महिला आघाडीच्या कोषाध्यक्षा आहेत. त्याही हुशार आहेत. त्यांची मुलेही बोलकी आहेत.
          आज आमच्या या मित्राचा वाढदिवस आहे. नाभिक संघटनेच्या वतीने आम्ही सर्वजण त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे , समृद्धीचे , भरभराटीचे व आरोग्यदायक जावो अशी संत सेना चरणी प्रार्थना करतो. संघटनेतील पुढील उत्तुंग कामगिरीसाठी त्यांना कोटी कोटी शुभेच्छा.

©️ सरचिटणीस , कणकवली नाभिक संघटना



🛑 नाभिक महिलांचा जल्लोष

           कित्येक दिवस कणकवली तालुक्यातील नाभिक महिलांच्या मनात होतं. जागतिक महिला दिन साजरा करण्याची संकल्पना त्यांचीच. एके दिवशी सायंकाळी ही संकल्पना घेऊन काही महिला भगिनी माझ्या घरी मला भेटायला व त्याचे नियोजन करण्यासाठी आल्या. मी सांगण्यापूर्वीच त्यांच्याकडे नियोजन तयार होतं. मी त्यांच्या नियोजनाला शब्दरूप दिलं इतकंच. त्या सर्वांच्या मनातला उपक्रम कागदावर मांडला गेला. माझ्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर कार्यक्रमाचे मूर्त रुप पाहून स्मित हास्य विलसताना दिसले. 

          ८ मार्च कार्यक्रमाची तारीख जवळ येऊ लागली होती. महिलांच्या हालचाली आणि भेटी वाढत गेल्या. त्यांच्या ग्रुपवर धडाधड मेसेज येऊन चर्चा घडू लागल्या होत्या. मीही त्यांना कार्यक्रमातील बारकावे समजावत होतो. जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर , जिल्हा खजिनदार चंद्रशेखर चव्हाण महिलांच्या या धडपडींना पाहत होते. त्यांना प्रोत्साहन देताना दिसत होते. या प्रोत्साहनाची महिलांना जास्त गरज दिसून येत होती. महिलांनी खूप तयारी केलेली दिसत होती. सर्वांना फोनद्वारे , संदेशांद्वारे आमंत्रणे कळवली होती. नेहमीच्या महिलांव्यतिरिक्त त्यांना आणखी अधिक महिलांची उपस्थिती हवी होती. 

          शेवटी तो दिवस उजाडला. कार्यक्रम दुपारनंतर होता. पण सगळ्या महिलांनी सकाळपासून घरातली आवराआवर करायला सुरुवात केली होती. मी मला सोपवलेल्या गोष्टींची यादी करण्यात दंग होतो. सगळं घेऊन मी कार्यक्रमस्थळी पोहोचलो. मलासुद्धा तयारीसाठी दोन दिवस लागले. मी हे आनंदाने केले होते. मी त्यांना तसा शब्द दिला होता. त्यांचा माझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता. म्हणून त्यांनी माझ्यावर काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन त्यांनी माझ्याकडेच दिले होते. त्याचा क्रम आम्ही सर्वांनी मिळून ठरवला होता. 

          कायम घरी चूल आणि मूल यात रमणाऱ्या या महिलांनी उत्तम प्रकारचं नियोजन करुन कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येकाला तोंडात बोट घालण्यास भाग पाडलं होतं. 

          सुरुवातीला शाब्दिक स्वागत झालं. मान्यवर पदाधिकारी व नाभिक महिलांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करुन जल्लोषात उदघाटन संपन्न झाले. संत शिरोमणी सेना महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करुन त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

          चार पाच निवडक महिलांच्या गटाने सुस्वर ईश्वस्तवन व स्वागतपद्य गाऊन उपस्थितांची मने जिंकली. कमी कालावधीत त्यांनी चांगली तयारी केलेली दिसली. पन्नास साठ जणांसमोर सामुदायिक सादरीकरण करणं तितकंसं सोपं नसतं. पण त्यांनी ते सहजपणे केलेलं दिसलं. हे सगळं करताना त्यांच्यावर कोणताही ताण आलेला दिसत नव्हता ही विशेष गोष्ट होती. रंगीत तालीम करुनही इतकं चांगलं सादरीकरण झालं नसतं. त्यानंतर मीच प्रास्ताविक केलं.

          वेशभूषेने कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. अनेक मुली , महिला सावित्रीबाई फुले बनून आल्या होत्या. महिलांनी विविध भूमिका सादर केल्या. जिजाबाई , शिक्षिका , बंगाली बाई , डॉक्टर , परिचारिका , साऊथ इंडियन , पारंपारिक वेशभूषा , मासेवाली , झाशीची राणी , नृत्यांगना इत्यादी विविधांगी वेशभूषा साकारताना महिला अधिक उत्साहाने समोर येताना दिसत होत्या. याचा अर्थ महिलांचा आत्मविश्वास वाढत चाललेला दिसून येत आहे ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. 

          हल्ली रेकॉर्डडान्सची सर्वांना सवय झाली आहे. त्यात देखील वैयक्तिक गीत गायन करुन काही महिलांनी वाहवा मिळवली हे विशेष. या महिलांचा अभिनय आम्ही घरात प्रत्यक्ष बघितला आहे , पण चारचौघातसुद्धा त्या त्याहीपेक्षा जास्त चांगला अभिनय करु शकतात हे त्यांचे त्यांनीच सिद्ध करुन दाखवले असे म्हणायला काहीच हरकत नाही. छोट्या मुलींनीही बाजी मारली. ठुमकत , मुरडत विविध पदविन्यास दाखवत त्यांनीही प्रेक्षकांकडून पुरेपूर टाळ्या वसूल केल्या. हा कार्यक्रम संपू नये असेच वाटत असताना महिलांचे गमतीदार खेळ सुरु झाले. 

          संगीत खुर्ची खेळात सर्व महिला सहभागी झाल्या. संगीत थांबल्यावर खुर्चीवर बसतानाची त्यांची तारांबळ बघणाऱ्यांना अधिक आनंद देऊन जात होती. सर्व महिला आनंदात होत्या. हरल्या तरी आनंदातच होत्या हे नमूद करायलाच हवे. प्रत्येकाने अक्षरशः जल्लोष साजरा केला होता. 

          मेणबत्या पेटवणे , बादलीतील वाटीत नाणे टाकणे , डोक्यावर वही घेऊन चालणे , सुईत दोरा ओवणे , लिंबू चमचा शर्यत अशा प्रकारच्या खेळात सर्व महिलांनी सहभाग घेऊन प्रथम , द्वितीय , तृतीय क्रमांक प्राप्त केला. 

          लकी ड्रॉ हा या कार्यक्रमाचा आकर्षण बिंदू ठरला होता. उपस्थितीशिवाय बक्षिस मिळणार नव्हते. त्यामुळे सर्व महिला शेवटपर्यंत थांबून कार्यक्रम यशस्वी करत होत्या. शेवटी चिठ्ठी उचलून लकी विजेते जाहीर करण्यात आले. त्यावेळी ज्यांचा लकी नंबर येत होता , त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता त्या कॅमेऱ्यात टिपणेही शक्य झाले नसते. महिला सचिव हेमांगी अणावकर यांना हिरकणी पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे संपदा चव्हाण यांनाही हिरकणी पुरस्कार देण्यात आला. अल्पोपहार व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची गोड सांगता झाली. कणकवलीत विविध ठिकाणी जंगी महिला दिनाचे आयोजन केलेले असूनही आमच्या मेळाव्याला पन्नासपेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या ही आमच्यासाठी नेहमीच गर्वाने सांगण्यासारखी गोष्ट असणार आहे. सर्व महिलांनी आपल्यातील सुप्तगुण विकसित करण्यासाठी असे व्यासपीठ निर्माण केले ही आमच्या नाभिक संघटनेलाही मानाचा तुरा असल्यासारखे आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर। ( 9881471684 )
























Sunday, March 6, 2022

🛑 बबलू , तू लगता है डब्लू

🛑 बबलू , तू लगता है डब्लू

          लहानपणी मी त्याला ' बबलू , तू लगता है डब्लू ' असे मी कायम चिडवायचो. गंमत करायचो. असं म्हटलं तो कसा मिश्किल हसायचा. आता हा बबलू भला मोठा भाचा झाला आहे. तो नोकरीही करतो. मोठा झाला असल्यामुळे फोन करत नाही. तो म्हणतो , " पप्पा , मम्मी यांच्याकडून खुशाली समजते , त्यामुळे वेगळा कशाला फोन करायचा ? " त्याचेही बरोबर आहे. कामाच्या व्यापात हल्ली मुलांना वेळ तरी कुठे मिळतो. नाही का ? तो फोन करत नाही , पण मी तरी त्याला कुठे करतो फोन !!! आता व्हाट्स अँप आले आहे ना ? त्याद्वारे संवाद होतात कधीतरी वर्षाने. 

          या बबलूचे नाव आम्हीच ठेवले. ' प्रणिल ' किती छान नाव आहे. त्यालाही ते आवडत असेल. लहानपणी मोठा भाचा साईश आणि हा दोघे आमच्याकडे आले होते. तेव्हा आम्ही गांगो वाडी येथे सावंतांच्या घरात राहत होतो. शेजारी एक भवानी मंदिर होते. त्या मंदिरात हे दोघेही मस्त मजेत खेळत होते. मी त्यांच्या मागे मागे धावत होतो. ते पडतील म्हणून त्यांना सांभाळत होतो. पण दोन्ही भाचे एवढे चपळ होते की मला अजिबात सापडत नव्हते. त्यांनी मला दमवून टाकले होते. मी घामाघूम झालो होतो. 

          त्यांना सारखे बाबासूट घातले आणि माझ्या कॅमेऱ्यात फोटो काढला. त्यात ते अगदी सारखेच दिसत होते. लहानपणी मुलं किती गोंडस दिसतात नाही , अगदी तशीच. 

          आता हा बबलू खूप समंजस झाला आहे. त्याच्या अनेक महत्त्वाकांक्षा आहेत. त्याला खूप फिरायचे आहे. त्यासाठी त्याने स्पोर्ट्स बाईक घेतली. ती महागडी आहे. त्यावर बसला की तो भारीच दिसतो. त्याला संपूर्ण भारत फिरायचा आहे. तो मला एकदा म्हणाला , " मी कन्याकुमारीला जाणार " फिरल्यामुळे खूप काही शिकता येते. लोकांचा अभ्यास करता येतो. आम्हाला आपली भीती वाटते , कारण आम्ही कधी अशी हटके महत्त्वाकांक्षा बाळगली नाही. त्याची महत्त्वाकांक्षा तो पूर्ण करीलही. आताची पिढी खूप शार्प आहे. ते जे ठरवतात ते करण्यासाठी काहीही करतील. 

          आम्ही आपलं त्याला नोकरी , खोली आणि छोकरी स्वतःच्या हिमतीवर मिळवण्यासाठी सांगत राहतो. तो आमचं ऐकतोही. शेवटी त्याचं जीवन हे त्याचं स्वतःचं आहे. ते कसं मजेशीर जगावं हा त्याचा प्रश्न आहे. तो नक्की चांगलं करत आहे ,आणि यापुढे अजून अधिक चांगलं चांगलं करत राहील याबद्दल खात्री आहे. त्याचं काही चुकत असेल तर त्याचे त्यालाच समजेल इतका तो शहाणा नक्कीच आहे.  त्याला मी मामा आहे म्हणून वेगळं काही सांगायला पाहिजे असे मला अजिबात वाटत नाही. एवढं मात्र खरं आहे , माझे भाचे आम्हांला कधीच उलट उत्तर करणार नाहीत.

          प्रणिलने आपल्या आयुष्याची यशाची शिखरे चढत असताना तो खूप खूप मोठा होत राहावा आणि त्याने योजलेली सर्व कामे होत राहोत अशी त्याला वाढदिनी शुभेच्छा. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 )



Saturday, March 5, 2022

🛑 लली

           वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचा तीन दिवसीय नाट्याविष्कार पाहण्याचा योग आला. मी त्यांच्या ' रंगवाचा ' त्रैमासिकाचा आजीवन सभासद असल्यामुळे मला विनामूल्य प्रवेश तिकीट घरपोच मिळाले. तो दिवस माझ्या वाढदिवसाचा होता. मला त्यांनी मस्त नाट्यभेट दिल्याबद्दल मी सुखावलो. पहिल्या दिवशी ' बहिणाबाई चौधरी ' यांच्या कवितांचा गायनाचा कार्यक्रम पाहताना साक्षात बहिणाबाई त्यांनी शब्दरूपाने उभी केली. 

          दुसरा दिवस ' नली ' हे एकल नाट्य सादर झाले होते. मी थोडा उशिराच नाट्यगृहात पोहोचलो होतो. नाटकाचे नाव नली होते , म्हणजे ते एका मुलीचे असणार हे मनात आधीच बिंबले होते. पण रंगमंचावर फक्त एकच पुरुष अभिनय करताना दिसत होता. त्याचे नाव बाळू होते. तो स्वतःची गोष्ट सांगत होता. माझेही घरातले टोपणनाव बाळूच. त्यामुळे मीच मला त्याच्यात पाहू लागलो होतो. एका मुलीचा हसण्याचा आवाज येत होता. रंगमंचावर मुलगी नसतानाही तिचे असणे लक्षात येत होते. ती हसणारी मुलगी म्हणजे त्या बाळूची ' नली ' होती. 

          बाळूचे नलीवर जिवापाड प्रेम होते. पण त्याने ते कधीच व्यक्त केले नव्हते. ज्यावेळी त्याने व्यक्त करण्याचा प्रयत्न केला होता , त्या प्रत्येक वेळी तो असफल ठरला होता. ती दोघे प्राथमिक शाळेत असल्यापासूनच एकमेकांना जीवाला जीव देत होती , पण दोघांनीही कधीही एकमेकांवरचं प्रेम व्यक्त केलं नाही. कधीकधी त्यांचे शिक्षक बाळूला वर्गावर ठेवून आपल्या कामाला निघून जात. त्यावेळी मुलांचा अभ्यास तपासताना जर चुकला तर त्यांना शिक्षा करण्याची मुभा बाळूला दिलेली असे. तरीही बाळूने नलीला कधीही मारले नाही. तो हळूच तिचा हात हातात घेऊन मारल्याचा अभिनय करत असे. 

          पुढील शिक्षणासाठी बाळूला शहरात जावे लागले. बाळू शिकून खूप मोठा साहेब झाला. तरीही त्याचे ' नली ' वरचे प्रेम काही कमी झाले नव्हते. तो जेव्हा जेव्हा गावी येई , तेव्हा तेव्हा ' नली ' ची भेट घेई. तो तिच्याशी बोले. ती फक्त हसे आणि त्याला खूप मोठा झाल्याबद्दल आनंदाने शुभेच्छा देत राही. 

          एकदा असाच बाळू गावी आला होता. त्याला समजले कि त्याच्या ' नली ' चं लग्न झालं होतं. त्याला धक्काच बसला होता. तरीही बाळूचे प्रेम नलीवरच राहिले होते. आता त्याने लग्न न करण्याचे ठरवले होते. नली बरोबर लग्न करता आले नाही याचं दुःख बाळूला कायमच भेडसावत राहिलं होतं. 

          एकदा असाच पेपर वाचत असताना अचानक नलीचा फोटो बाळूला दिसला. फोटोवरची हेडिंग वाचून तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या ' नलीने ' आपल्या जीवनाला कंटाळून आत्महत्या केली होती. बाळूला हा धक्का सहन होण्यासारखा नव्हताच मुळी. तो त्यानंतर कायमच विमनस्क राहायला लागला. नलीच्या जाण्याने त्याचं जीवनच उध्वस्त झालं होतं. 

          हे एकल नाट्य पाहिले आणि मला माझी पत्नी ललिता आठवली होती. तिला सगळे प्रेमाने ' लली ' म्हणत असत. ती एक प्रेमाची हाक होती. आमचे लग्नापूर्वी प्रेम नव्हते. ओळख नव्हती. आमचं लग्नानंतरचं प्रेम. सात वर्षांच्या संसारानंतर माझी ' लली ' माझ्याकडे तिचं चार वर्षाचं बाळ सोपवून देवाघरी निघून गेली होती. त्या नाट्यातील ' नली ' चं हास्य मला माझ्या ' लली ' सारखं वाटत होतं. त्या बाळूसारखा मीही विमनस्क झालो होतो. आता मी इतक्या वर्षांनी विमनस्क अवस्थेतून पूर्ण बाहेर आलो असलो तरी ' लली ' सोबतच्या आठवणी जशाच्या तशा ताज्या आहेत. 

          काल आमचा प्रशिक्षणाचा दुसरा आणि शेवटचा दिवस होता. कणकवली गटसाधन केंद्राच्या दळवी मॅडम मला म्हणाल्या , " कुबलसर , तुमची ललिता आणि मी कुडाळ हायस्कुल मध्ये दोन वर्षे एका वर्गात होतो. ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. ती हुशार होती. " मी माझ्या ' लली ' बद्दल त्यांच्याकडून ऐकलं आणि माझी ' लली ' मला अर्धवट सोडून गेल्याचे दुःख अजून गडद होत जाताना मला दिसू लागलं.  ' लली ' यु आर ऑलवेज ग्रेट , आय मिस यु.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...