Wednesday, March 31, 2021

सायलेंस सर

 सायलेन्स सर


    गाडी चालवताना सावकाश चालवण्यासाठी खूपदा प्रयत्न केला जातो. पण गाडीवर बसल्यानंतर सोयीस्करपणे ही गोष्ट विसरली जाते. मग ती टू व्हीलर असो , नाहीतर आणखी जास्त व्हीलर. गाडी चालवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. एकदा गाडीवर बसल्यानंतर ती कशी चालवायची हे मागून कोणी सांगत राहिले की रागच येतो. पण सांगणारे आपल्या भल्यासाठीच सांगत असतात ना ? आपल्याला ऐकायला काय हरकत आहे. आपण ऐकत नाही, मनाला वाटेल तशी गाडी पळव पळव पळवतो. पडल्यानंतर लक्षात येते की सांगणाऱ्याचे ऐकले असते तर ही वेळ आलीच नसती. 

    त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत जायला बाहेर पडलो. जाताना छोट्या उर्मीने मला प्रेमाने सांगितले, “ 'पप्पा , सावकाश जावा आणि सावकाश येवा. ” मी तिला जवळ घेऊन तिचा गोड गोड पापा घेतला. किती काळजी घेतात आपली घरातली माणसं ! अगदी लहानांकडूनही आपली अशी काळजी घेतली जाते. आपल्यावर नियंत्रण ठेवण्यात घरातल्यांचा मोठा वाटा असतो. त्यांच्या अश्या सांगण्यामुळे आपणही गंभीर होतो. कुठेही जाता येताना जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न तरी करतो. शाळेतून यायला उशीर झाला तरी घरातली माणसं वाटेकडे डोळे लावून असतात. घरातून बाहेर पडलेला आपला माणूस घरी सुखरूप परत यावा यासाठी त्यांची ही तळमळ असते. त्यांनी फोन केला आणि आपण तो वेळीच उचलला नाही तरी त्यांना अधिकच काळजी वाटते. नियोजित ठिकाणी पोहोचल्यानंतर एखादा फोन करावा एवढीच त्यांची रास्त मागणी असते आणि आपण ती बऱ्याचदा पूर्ण करत नाही ही आपली अक्षम्य चूकच असते. आपण कामात असतो त्यामुळे फोन करायचा राहून जातो. घरच्यांसाठी एक फोन करणे किंवा एक संदेश पाठवणे हे अशक्य तर बिलकुल नाही. माझ्याकडूनही कधी असा फोन करायचा राहून जातो आणि त्यांचाच फोन येतो. 

    आज शाळा सुटल्यानंतर घरी जात होतो. गाडीचे नुकतेच काम करून घेतल्याने स्पीड कमी ठेवण्याबद्दल मला सांगितले गेले आहे. त्यामुळे मुद्दाम 40 चा स्पीड ठेवण्याचा प्रयत्न करतोय. इतका कमी स्पीड ठेवून गाडी चालवताना गाडी चालतच नाही असे वाटत राहते. मग हळू हळू कधी स्पीड वाढतो , समजतसुद्धा नाही. त्यात स्पीडो मीटर बंद असल्यामुळे स्पीडही समजत नाही. असो. आज स्पीड 40 चाच होता. तळेरे पर्यंत अगदी व्यवस्थित आलो. रस्त्याचे काम सुरूच आहे. फ्लाय ओव्हर वरून जाता येईल असे वाटले. वाटले काय, वाटण्याआधी गाडी आपोआप त्यादिशेने वळलीही. मग काय, पुढे पुढे जात राहिलो. दोन तीन डंपर माती टाकण्याचे काम करत होते. वाटेत एका ठिकाणी विचारूनच पुढे गेलो. त्यांनी पुढे जाता येईल असे सांगितले. त्यांचा हिरवा कंदील मिळाला. आता जाणे अवघड नसेल असे वाटून पुढे जात राहिलो. लाल माती रस्त्यावर मस्त अंथरली होती. तिच्या पलीकडे 100 मीटरवर गेलो की झाले. मूळ रस्त्यावर पोहचणे अगदी जवळ आलेले होते. 40 च्या स्पीडने गाडी पुढे दामटली. रस्त्यात पाणी टाकून त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मलाही युद्धपातळीवर घरी जाण्याचे वेध लागले होते. नेहमीप्रमाणे काहीतरी मनात विचारचक्रे सुरूच होती. गाडीचीही चक्रे तशीच सुरू होती. गाडीने अचानक वेग कमी केला होता. गाडीचे मागचे चाक निसटले. चिखलामुळे गाडी स्लिप झाली होती. डाव्या दिशेला गाडी कमालीची कलली. मी ती कंट्रोल करणे शक्य नव्हते. मी कोसळलो होतो. कोसळल्यानंतर भानावर आलो. अरे, मी पडलो कसा काय ? काहीही समजण्याच्या आत कोसळलो होतो. गाडी चिखलात रुतली होती. चप्पलही चिखलाने पुरते बरबटले. टाचा जाड झाल्या होत्या. मी पडल्याचे पाहून एक जेसीबीवाला धावतच माझ्याजवळ आला. माझी आपुलकीने चौकशी केली. पाणी आणून दिले. माझ्या उजव्या पायाला गाडीचा ‘ सायलेन्सर ’ लागला होता. गाडीने 10 किमी अंतर पार केले होते. उन्हाळा असल्यानेही सायलेन्सर बऱ्यापैकी तापलेला होता. माझ्या उजव्या पायाच्या पोटरीचा पुसटसा स्पर्श सायलेन्सरला झाला होता. पायाला चांगलाच चटका बसला. ( चटका तर बसला , त्याला वाईटच म्हणायला हवे होते, पण आता नाईलाजास्तव त्याला चांगला चटका असे विशेषण देणे भाग पडतंय ) पॅंटीच्या कापडाला काहीही झाले नाही. त्याच्या आत माझ्या पायाला बसलेला चटका तेव्हा जाणवला नाही. त्यावर मी माझ्याकडचे प्यायचे पाणी ओतले. जेसीबीवाल्याने दिलेल्या बाटलीभर पाण्याने मी माझ्या गाडीला थोडेसे धुवून घेतले आणि जाड चपलांनी , जड अंतःकरणाने गाडीला किक मारली. गाडी बिचारी तशीच त्याच वेगाने पूर्वीसारखीच न कंटाळता पळू लागली. ती मला म्हणत होती , “ सायलेन्स सर …. सायलेन्स सर …. नाहीतर पुन्हा लागेल सायलेन्सर.


©️ प्रवीण अशितोष कुबल( 9881471684 )   



Monday, February 8, 2021

कानात फुंकर

 कानात फुंकर


          कुबल कुटुंबाचे शिरवंड्यामध्ये देवाच्या होमाचे धार्मिक कार्य संपन्न होणार होते. पूर्वीचे मूळगाव आणि मूळघर असल्यामुळे मुंबईपासून बरीच मंडळी होमासाठी आली होती. त्या होमाला ' पाठंतार ' असे म्हणत असत. पाठांतर किंवा पाठंतार ( मालवणीतील शब्द असू शकतो ) मूळघरात संपन्न होण्यासाठी महिने दोन महिने अगोदर बैठका घेतल्या गेल्या होत्या. जपजाप , गार्‍हाणी, भटजींचे पठण , नारळांची पोती, कडकबुंदी लाडू , फुले , हार , केळीची पाने , गोड जेवण असं बरंच काही असावं. 

          सगळंच काही आठवणं कठीण जातंय. त्यावेळी मी लहान असल्यामुळे काही घटना पुसटश्या आठवताहेत. लहानपणी मी बघितलेला तो सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम होता. लांबलांबून आलेले नातेवाईक व भाऊबंदकी असणारे सर्वजण त्यानंतर कधी एकत्र आले नाहीत. आपला देव आपल्याकडे सतत पाहत राहावा ही ओढ सगळ्यांना जवळ घेऊन आली होती. कदाचित घरच्या देवाला घाबरुनही सगळे एकत्र एका छताखाली आले असावेत. अगदी सगळे हेवेदावे विसरुन. 

          देवासाठी किंवा देवाच्या भयाने का होईना माणसांनी कधीतरी एकत्र आलेच पाहिजे. पण आता लोक इतके मोठे झाले आहेत कि ते देवालाही आपल्यापेक्षा लहान समजू लागले आहेत. देव तर आहेच, पण तो जाणला पाहिजे. पूर्वजांनी नातेवाईकांना एकत्र येण्यासाठी ' गेटटुगेदर फॉर गॉड ' म्हणजेच पाटंतार हा धार्मिक उपक्रम सुरु केला असावा असे मला वाटते. त्यानिमित्ताने आपल्या भावबंदांच्या ओळखीपाळखी होतात. जुने नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते. 

          पूर्वी पाळण्यात बघितलेल्या बंटीचे लग्न होऊन त्यालाही एखादा दुसरा बंटी झाल्याचे पहावयास मिळायचे. इतक्या वर्षांनी बंटीला पाहिले म्हणून बंटीचे त्यावेळचे मोठेथोरले लोक त्याचे बालपण सांगू लागत. मग ते असेही म्हणत, " तुझा मुलगा हा दुसरा बंटी अगदी तू लहान असताना रडायचास तसाच रडतोय बघ." तसं बघितलं तर सगळी लहान मुले एकसारखीच रडतात. त्यात फारशी विविधता असेल असे मला वाटत नाही. त्यांचे ऐकून हसूच येई. 

          जख्खड म्हातारी माणसेही त्या कार्यक्रमात भेटत. मान हलणारी, पोक काढून चालणारी, सतत बडबड करणारी , फुकटचा सल्ला देणारी अशी बरीच वयस्कर माणसं भेटत , तशी लहानांवर जीवापाड प्रेम करणारी, पाठीवरुन मोरपिसासारखा हात फिरवणारी, बोबडं बोलणारी मोठ्या वयाची लहानांसाठी सान होणारी माणसंही भेटत. अशा प्रेमळ माणसांची माया लहानांना समजतही नसेल. पण ज्यांना नातवंडं असतात त्यांना सगळ्या छोट्यांमध्ये आपलीच नातवंडं दिसत असावीत. ज्यांना ती नसतील ते या नातवंडांनाच आपली नातवंड समजत असावीत. 

          जगातील सगळे आजीआजोबा आपल्या नातवंडांसाठी असंच प्रेम करत असतील का ? पण त्यांची ही नातवंडं आजीआजोबांचं हे निर्व्याज प्रेम समजत असतील तर त्यांना महानच म्हणावे लागेल. पण सर्रास तसे घडताना दिसत नाही. त्यावेळी वयाने म्हातारे पण मनाने तरुण असलेले हळवलचे कुबलआजोबासुद्धा आम्हांला जिव्हाळ्याचे वाटत. ते आमची गंमत करत. ते आमचे लाड करत. आमच्याशी बोलायला त्यांना खूप आवडायचे. त्या दिवशी ते सुद्धा आले होते. वयस्कर माणसांपेक्षा ते आमच्यातच जास्त रमत. 

          आम्ही भावंडे ह्या कार्यक्रमाला या घरातून त्या घरात फिरतच होतो. मज्जा मज्जा करत होतो. सगळ्या लहानथोरांशी ओळख वाढवत उदंड हुंदडत होतो. शाळेला सुट्टी मारून मजा करण्यातला आनंद अनुभवत होतो. धार्मिक कार्यक्रमातला ओ की ठो आम्हाला समजत नव्हता.  पण सगळ्या मोठ्यांकडून विविध प्रकारचा गोड खाऊ मिळत होता. कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. सगळे लहानथोर एकत्र येऊन विचारमंथन करु लागले होते. रात्री महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला मिळाला होता.  

          पंगतीला जेवताना श्लोक म्हणत जेवणे होत होती. प्रत्येकजण आपल्या मुलांना श्लोक म्हणण्यासाठी प्रवृत्त करत होते. आम्ही कधी श्लोकच म्हटले नव्हते. त्यामुळे आम्ही त्या खेड्यातल्या लहान मुलांच्या मुखातून बाहेर पडणारी सरस्वती पाहून थक्क होऊन गेलो होतो. एवढे अवघड संस्कृत श्लोक ती दोन तीन मुले न घाबरता म्हणताना दिसत होती. आम्ही शहरातल्या शाळेत शिकत होतो. आम्हाला फक्त गुरुर्र ब्रम्हा ... हा एकच श्लोक येत होता. 

          उत्तररात्रीत भजने आणि दशावतारी नाटक वगैरे कार्यक्रम झाले. आम्ही न झोपता सकाळपर्यंत ते कार्यक्रम बघता बघता कुठे झोपलो ते आठवतंही नाही. सकाळी बाबांनी हलवून उठवले तेव्हा जाग आली. कणकवलीला जाणारी गाडी सकाळी नऊ वाजता होती. आम्ही तोंड धुवून चहा पिऊन स्टाॕपवर हजर झालो. माझ्या डोळ्यावरची झोप गेलीच नव्हती. गाडी अजून आली नव्हती. गाडीची वाट पाहणाऱ्या नातेवाईकांची बडबड सुरु होती. 

          माझा छोटा भाऊ रात्री लवकरच झोपला होता. त्यामुळे तो सकाळी ताजातवाना असल्यामुळे ' याची कळ काढ,  त्याला चिमटा काढ ' असे त्याचे कारनामे सुरु होते.  मी आपला डोळे बंद करुन गाडी यायची वाट बघत होतो. गाडी काही येत नव्हती. तेवढयात माझ्या कानात कोणीतरी जोरात फुंकर मारली. मी आधीच कंटाळलो होतो. झोप अनावर झाली होती. माझ्या लहान भावाचीच ही खोडी असणार याची मला पक्की खात्री होती. माझा रागही अनावर झाला. रागाच्या भरात मी डोळे न उघडताच भावाच्या कानशिलात लगावून दिली. एवढे मोठ्याने मारले होते कि माझा भाऊ मोठ्याने भोकाड पसरणार होता. 

          पण अजून तो रडत कसा नाही म्हणून डोळे उघडून बघितले तर , बिचारे कुबलआजोबा माझ्यासमोर हसतहसत उभे. मी भावाच्या नाही तर कुबलआजोबांच्या कानाखाली मारल्याचे माझ्या लक्षात आले. तरी मला शंका आलीच होती, ज्या गालावर मी मारले होते तो गाल एवढा लिबलिबीत कसा काय ? तो गाल भावाचा नसून कुबलआजोबांचा होता हे समजल्यानंतर माझा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. सगळे माझ्याकडे रागाने बघू लागले होते. माझी झोप उडाली होती. आता माझे बाबा मला शिल्लक ठेवणार नाहीत या भितीने मी रडू लागलो. पण त्या कुबलआजोबांनीच मला जवळ घेतले. ते म्हणाले , " अरे बाबा, मीच तुझ्या कानात फुंकर मारली होती, मी तुझी गंमत केली, म्हणून मला शिक्षा मिळाली. तू काय स्वतःहून माझ्या कानशिलात मारले नाहीस. तुझ्याकडून अनावधानाने तसे घडले. मी लहान मुलासारखा वागलो, तू बरोबर वागलास. मला अजिबात राग आलेला नाही. तू रडू नकोस. " असे त्यांनी म्हटले तेव्हा मी त्यांच्या कुशीत शिरलो. 

          मला ती म्हण आठवू लागली. डोळ्यात केर आणि कानात फुंकर ....... आज वेगळेच घडले होते. डोळ्यात झोप, कानात फुंकर आणि कानशिलात चापटी .... पुन्हा मात्र माझ्या भावाने कधीच माझ्या कानात फुंकर मारली नाही. कारण हा घडलेला प्रसंग त्याने प्रत्यक्ष पाहिला होता. तो म्हणाला होता , " मी फुंकर मारली असती तर माझ्या गालाचे काय झाले असते ? " मी आता कधीही हा प्रसंग आठवतो तेव्हा तेव्हा ते कुबलआजोबा माझ्या मनःचक्षुंसमोरुन सरकन निघून जातात. ते आज असते तर .. ?.... ही फक्त एक कल्पनाच असू शकते.


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Sunday, January 31, 2021

टुमक्या

 टुमक्या


          लग्नात वाजंत्री मंडळाला त्याकाळी खूप मागणी होती. ' याचं वाजवलं, त्याचं वाजवलं ' अशी आपली प्रसिद्धी प्रत्येक वाजंत्री मंडळ करत असणार. आमचेही वाजंत्री मंडळ त्याला अपवाद नव्हते. आमच्या गावकडच्या वाडीत काही ठराविक हौशी तरुण ढोल, ताशा, ढोलकी इत्यादी आवड म्हणून वाजवत. या आवडीचे रुपांतर हळूहळू व्यवसायात कधी झाले ते त्यांना समजलेही नाही. 

          लोकं लग्न वाजवायला बोलवत कि हे आनंदाने निघालेच म्हणून समजा. पैसे मिळवणे हे एकमेव उद्दिष्ट नव्हते. तर शब्दाला किंमत देऊन त्यांच्या लग्नात जाऊन आपली वादन कला दाखवणे असाही सुप्त उद्देश होता. अर्थार्जनाबरोबर वाडीची आणि वादकांचीही प्रशंशा होत होती. प्रशंशा वाढत चालली. 

          प्रसिद्धी कणकवलीपर्यंत येऊन पोहोचली. वाजवणारे चार पाच लोक असत. हळूहळू कामधंद्याच्या निमित्तानं त्यातील एखादी व्यक्ती नसली तर तिथे अचानक एखादा नवीन वादक शोधावा लागे. मी आणि माझा भाऊ हे नवीन वादक बनलो होतो. माझा भाऊ न्हानू ढोलकी तालात वाजवायचा. 

          मी आपला टुमके वाजवणारा. टुमके म्हणजे ' टुम टुम ' असा आवाज करणारे एक छोटेसे वाद्य असे. टुमके या वाद्याला आम्ही मालवणी भाषेत ' टुमक्या ' म्हणत असू. हे वाद्य खूप हलके असते. काठीने फक्त दोन तीन सेकंदांच्या अंतराने बडवत राहायचे असते. इतर वाद्यांची गती वाढली कि आपणही टुमक्याची गती वाढवायची असे करत राहायचे. मोठ्या माणसांना याचा सराव असे. आम्ही शाळेत शिकत असल्याने लग्नातच आमचा सराव आणि रंगीत तालीम दोन्ही लाईव्ह चाले. ठेका चुकला तर आमचे तिन्ही काका  मला डोळ्यांनी खुणावत. बरोबर ठेका पडला तर ते माझ्याकडे प्रेमाने बघत , मग तर मी अधिक तालात येई. 

          आम्हांला खेड्यापाड्यातील लग्नांच्या जास्त आॕर्डरी असत. मला एका लग्नाला टुमके वाजवल्याबद्दल १०० ते १२० रुपये मिळत. मे महिन्यात सलग सात आठ लग्ने वाजवल्यानंतर पैसे मोजताना ते खूप वाटत. भरपूर पैसे मिळाल्याबद्दल बाबांकडून शाबासकी मिळे. मिळालेले पैसे आम्ही बाबांकडेच देत असू. बाबा ते आमच्या शिक्षणासाठी वापरायला देत. 

          बाबांनी आमच्या कष्टाचे पैसे कधीच स्वतःला घेतले नाहीत. पैसे मिळतात म्हणून आम्ही कधीकधी शाळेला दांडी मारुन लग्न वाजवायला जात असू. आम्ही लग्न समारंभात वाजंत्री मंडळातील आहोत असे समजल्यामुळे वराकडील किंवा वधूकडील मंडळी आम्हाला बाहेर बाजूला जेवायला वाढीत. मग आमच्या ओळखीचे लोक त्यांना ओरडत व आम्हांला सर्वांसोबत पंगतीत जेवण्याचा बहुमान मिळे. 

          त्यावेळी लहानपणीही वाटायचे , कि आपण सगळीच माणसे सारखीच आहोत, तरी हा वर्णभेद , जातीभेद का ? आपल्याच काही बांधवांना आत आणि काही बांधवांना बाहेर जेवण का देतो ? आपण माणुसकी हा धर्म पाळत नव्हतो हे त्यावेळीही आमच्या बालमनावर तीव्र आघात करणारी गोष्ट होती. 

          आम्ही नाभिक समाजाचे आहोत, म्हणूनही आम्ही अवमान सहन केलेला आहे. दाढी, केस स्वच्छ करताना आम्ही यांचे संपूर्ण डोकेच हातात घेतो, तरीही आम्ही कमी याची बोच मनात सतत टोचतच राही. टुमक्याच्या प्रत्येक आघाताबरोबर ही बोच वाढत चालली होती. पण मनात पक्के ठरवले होते कि कोणतेही काम प्रामाणिकपणे करायचे. 

          कणकवलीच्या लग्नाची आॕर्डर होती. वधुपक्षाकडून बोलावणे होते. त्यादिवशी शाळेला सुट्टी नव्हती. टुमक्या वाजवणारा उपलब्ध नव्हता. मला सांगण्यात आले. मी शाळेला दांडी मारुन टुमक्या वाजवण्यासाठी वधुपक्षाच्या घरी दाखल झालो. 

          वधुकडील मंडळी वाजतगाजत लग्न कार्यालयाकडे चालली. कार्यालय अगदी जवळ आले होते. लग्न कार्यालय म्हणजे आमचे एस्, एम्. हायस्कूल होते. खालच्या प्रार्थनाहाॕलमध्ये साध्या पद्धतीने लग्न समारंभ होता. वरच्या मजल्यांवरील वर्ग सुरु होते. मी ' टुमक्या ' वाजवत वर्गाच्या खालून मान खाली घालून निघालो होतो. 

          मान खाली घालून अशासाठी कि माझे मित्र मला वरच्या खिडकीतून बघून हसत होते. मला त्यांच्या हसण्यामुळे लाज वाटत होती. एक दोनदा त्यामुळे माझा ठेकाही चुकला होता. पण काकांनी माझ्याकडे डोळे वटारुन पाहिले होते. त्यामुळे ठेका चुकवून आणि लाजूनही चालणार नव्हते. शाळेला दांडी मारुन राहिल्याबद्दल वाईट वाटत होते. शिक्षकांनी मला बघितले तर ओरडणार म्हणून भिती वाटत होती. 

          पण हळूहळू धीर चेपला. गावाकडे ओळखीच्या माणसांची लग्ने वाजवताना लाजलो नाही , तर आता तरी का लाजावे ? मनाशी ठाम निश्चय केला , " वाईट करताना लाजावे, चांगले काम करताना अभिमान बाळगावा." त्यानंतर मी अशी अनेक लग्ने वाजवताना कधी लाजल्याचे आठवत नाही. लोकं हसतात , तेव्हा त्यांचे दात दिसतात , आपण शांत चित्ताने ते दात बघत राहावेत. कारण नंतर ही हसणारी माणसे आपल्यासाठी अभिमानाने टाळ्या वाजवतानाही मी प्रत्यक्ष अनुभवली आहेत. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



खामकरांचा खाऊ

 खामकरांचा खाऊ


          मराठी शाळेतून हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी जाताना माहेराकडून सासुरवाडीला गेल्यासारखे होते. पूर्वी मराठी शाळेत बसण्यासाठी साधी सारवलेली जमीन किंवा कोबा असे. 

          हायस्कूलमध्ये आरामात बेंचवर बसायला मिळणार याचा अधिक आनंद असल्यामुळे आम्हा मुलांना कमालीचे आकर्षण असे. नवीन गणवेश, नवीन मित्र , नवीन सर, नवीन मॕडम , नवीन वर्ग हे कधी एकदा बघायला आणि अनुभवायला मिळते असे होऊन जाई. तासिकेप्रमाणेच पुस्तके , वह्या न्याव्या लागणार होत्या.मोजकी पुस्तके, वह्या हातातून नेणारी मुलेही पाहायला मिळत. 

          पहिल्या दिवशी हजर राहून पहिली बेंच पकडण्यासाठी स्पर्धा लागे. आमचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण कणकवली नं.३ शाळेत झाले होते. गांगोवाडीत भाड्याने राहायचो. तिथून एसेम्हायस्कूल ( एस्.एम्. हायस्कूलचे लघुरुप ) जवळ होते. त्यावेळी आम्हाला त्याचा लाँगफाॕर्मही माहित नव्हता. 

          आम्ही अजूनही ' एसेम्हायस्कूल ' च म्हणतो. तेथे आम्हाला एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व पाहायला मिळणार होते. आता असे व्यक्तिमत्त्व अभावानेच पाहायला मिळत असावे. खामकरसर हे नाव ऐकून होतो. खामकरसर पाहायला मिळणे सर्वांनाच सोपे होते. पण त्यांना परिपूर्ण जाणून घेणे ही अवघड गोष्ट होती. 

          मी आठवीच्या एच् तुकडीत दाखल झालो. आमचा वर्ग तिसऱ्या मजल्यावर होता. पहिला दिवस अगदी मजेत गेला. माध्यमिक शिक्षणाला सुरुवात झाली होती. मुलांचे, मुलींचे घोळकेच्या घोळके शाळेकडे येत होते. त्यात मीही बुटका दिसतही नव्हतो. मधल्या सुट्टीत सर्वजण कँटिनमध्ये आले होते. मी ही आलो. रस्त्याच्या पलिकडेच कँटिन होते. 

          मी आपला कँटिनमधल्या तळलेल्या भज्यांचा वास घेत होतो. माझ्या मित्रांनी पैसे आणले होते. त्यांनी पटापट पैसे काढले. भजी खाल्ली. मी त्यांच्याकडे बघत होतो. मलाही भजी खावीशी वाटत होती. पण पैसे नव्हते. मित्रांनी भजी संपवली व वर्गात जायला निघाले. मी इतर काहीतरी बघत राहिलो होतो. असाच रेंगाळत असताना माझ्या पाठीवर एक उबदार हात पडला होता. 

          मागे वळून बघितले तर एक भारदस्त व्यक्तिमत्त्व उभे होते. त्यांनी बहुदा माझी समस्या जाणली असावी. त्यांनी लगेच एका भजीची आॕर्डर दिली होती. माझ्या समोर गरमागरम भज्यांची प्लेट आली. मी त्या गृहस्थांना ओळखत नव्हतो. मी संकोचलो. माझा हात अलगद पुढे झाला. मी एक भजी उचलली. चवदार भजी मी संपवून टाकली. नंतर बघतो तर ते भजी देणारे गृहस्थ शाळेच्या दिशेने दिसेनासे झाले होते. 

          मी वर्गात आलो. सर्वांना सांगितले. माझ्या वर्गातील एका ज्येष्ठ मुलाने मला त्यांचे नाव सांगितले. मी चक्रावूनच गेलो होतो. ते ' खामकरसरच ' होते. एका प्रसिद्ध प्रशालेचे मुख्याध्यापक खामकरसर असे विद्यार्थीप्रिय म्हणूनच असावेत यावर माझा विश्वास बसला. त्यानंतर खामकरसरांशी माझा अनेकदा संपर्क आला. त्यांनी आम्हाला वर्गावर येऊन शिकवले नाही. 

          सुट्टीत ते आम्हांला बोलवत. इंग्रजी करसिव लिपी सुलेखन पुस्तिका आमच्याकडून गिरवून घेत. आठवीपासून मी इंग्रजी रनिंग लिपी लिहू लागलो. पुढे मी नववीत असताना माझे हस्ताक्षर पाहून कणकवली काॕलेजमधील पंधरावीच्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे माझ्याकडून लिहून घेतली गेली. मला हे भाग्य मिळाले ते खामकरसरांमुळेच. 

          दर रविवारी खामकरसर आमचा हस्ताक्षराचा क्लास घेत. क्लासला आलेल्या सर्व मुलांना खामकरसरांकडून खाऊ मिळे. शिक्षणाचा खाऊ आणि खायचा खाऊ देणारे खामकरसर आम्ही कधीही विसरु शकणार नाही. आज मीही शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांचा हा गुण माझ्यात आणण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करतो तो त्यामुळेच.


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Saturday, January 30, 2021

के फोर हंड्रेड

 के फोर हंड्रेड


         प्रत्येकाच्या आयुष्यात जशी माणसं येतात, तशा गाड्यासुद्धा. माणसांशी नाती घट्ट होतात, तशीच गाड्यांशीही. फक्त माणसं सजीव असतात, ती बोलू शकतात. गाड्या निर्जीव असतात, त्या बोलतात यावर कोणाचाही विश्वास कसा बसणार ? आपण सायकलीपासून विमानापर्यंत विविध वाहतुकीची साधने विकत घेतो. 

          विकत घेतलेले वाहन आपला मित्र बनून जातं. त्या वाहनावर आपला जीवच जडतो. आता तर सगळ्यांकडेच अशी वाहने दिसत आहेत. टू व्हिलर, थ्री व्हिलर, फोर व्हिलर अशा चाकांची वाहने आपण सर्रास वापरतो. टू व्हिलर वाहनांचा तर कचराच झाला आहे. जागोजागी या टू व्हिलर गाड्यांचे ट्राफीक जाम झाल्याचे दिसून येते. 

          मलाही माझी स्वतःची टू व्हिलर असावी असे वाटत होते. वाटायला काहीच हरकत नव्हते . पण ते सहजच अमलात आणणे सोपी गोष्ट नव्हती. मी नोकरीला लागून ४ वर्षे होऊन गेली होती. मला आता टू व्हिलर गाडीची जास्त गरज भासू लागली होती. कोणीही अशा गाड्या विकत घेताना दिसत होते. मला मात्र एक साधी टू व्हिलर घ्यायला जमत नव्हते. त्यावेळी पगारही कमी होता. पण गाड्यांच्या किमतीसुद्धा कमी असल्या तरी मला त्या नेहमीच जास्त वाटत आलेल्या. 

          लग्न झाल्यानंतर गाडी घेण्याची इच्छा जास्त प्रबळ झाली. लग्नासाठी खर्चही झाला होता. माझ्या पत्नीने त्यासाठी रोख दहा हजारांची मदत केली. लग्नानंतर दोन महिन्यातच नागपंचमीच्या दिवशी आमच्या घरात पहिली टू व्हिलर आली. नुकताच एक नवीन शोरुम उघडला होता. त्या शोरुममध्ये कायनेटीकच्या टू व्हिलर्स होत्या. मी त्यातली ' के फोर हंड्रेड '  ही बाईक निवडली होती. लाल कलरची ही बाईक दिसायला छानच होती. माझ्या ती आवडीची बनली. मी ती फायनान्सने घेतली. गाडी बटनस्टार्ट होती. रत्नागिरीत असतानाच टू व्हिलर शिकल्याचा फायदा झाला होता. लायसेन्स काढले. गाडी चालवू लागलो. 

          आता माझी स्वतःची गाडी होती. घरात एक नवीन पाहुणी आली होती म्हणून तिचे जंगी स्वागत झाले होते. रोज तिला धुवून पुसून स्वच्छ ठेवत होतो. माझ्यापेक्षा मी माझ्या नव्या गाडीकडे जास्त लक्ष देऊ लागलो होतो. गाडीचे ॲवरेज ताशी नव्वद किलोमीटर मिळत होते. माझी गाडी दररोज ९० किलोमीटर पळत होती. कणकवली ते गढिताम्हाणे दादरावाडी शाळा ४५ किलोमीटर होती. यायला जायला नव्वद किलोमीटरचा प्रवास होई. रोज घरी यायला मिळत होते. शनिवार रविवार बायकोला फिरवायला नेताना गाडीचा चांगला उपयोग होत होता. सोमवारी पत्नीला बसपर्यंत सोडण्यासाठी गाडी उपयोगी पडे. पुन्हा आठवडाभर पत्नी नोकरीच्या ठिकाणी दाणोली येथे असे. 

          मला पत्नीची तीव्र आठवण आली कि माझी गाडी मला दाणोलीपर्यंत घेऊन जाई. पत्नी जवळ नसताना गाडीच माझी पत्नी झाल्याप्रमाणे साथ देत असे. त्यावेळी पेट्रोल २७ रुपये लीटर होते. दररोज ३० रुपयांचा पेट्रोलखर्च होई. पण बजेटमध्ये बसे. पत्नीची बदली झाल्यानंतर आम्ही पाटगांव येथे राहू लागलो. आता गाडीने आमचे जगणे सुसह्य बनवले. खेड्यात स्वतःची गाडी असणे हे अजूनही प्रतिष्ठेचे मानले जाते. 

          आमच्यासाठी गाडीचे असणे प्रतिष्ठेपेक्षा गरजेचे जास्त होते. गाडीने भरपूर प्रवास केला होता. पहिल्या वर्षाला ती वीस हजारपेक्षा जास्त किलोमीटर धावली असेल. पुढील सहा वर्षात ती लाखाच्या पुढेच गेली. माझ्यासाठी माझी गाडी परमप्रिय अशीच होती. ती वाटेत कधीच बंद पडली नाही. जवळ गॅरेज बघून ती बंद पडलेली मी स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे. 

          मी तिच्यावरुन पडलो तरी मला काहीच लागले नाही. गाडी बाजूला टाकून मी उभा राहत असे. गाडीलाही काही जास्त दुखापत होत नसे. माझी गाडी ' माझी लक्ष्मीच' होती जणू. तिच्यासोबतचे माझे ते अविस्मरणीय क्षण आठवले कि आजही अंगावर काटा येतो. त्यानंतर मी चार पाच गाड्या घेतल्या असतील , पण त्या पहिल्या ' के फोर हंड्रेड ' ची सर कोणालाच आलेली नाही. माझ्या जीवनाला गतीमान करण्यात त्या निर्जीव गाडीने दिलेली साथ म्हणून मला मोलाची वाटते. 

          ती गाडी फक्त मीच वापरली नाही तर माझ्या भावानेही वापरली. त्याच्यासाठी ती गाडी पहिली मैत्रीणच ठरली होती. त्यानंतर ती गाडी माझ्या मेहुण्याने वापरली. ती गाडी त्याची बहिणच झाली. त्याची सख्खी बहिण काळाने हिरावून नेली होती, पण ज्या गाडीवर त्याच्या स्वतःच्या बहिणीने सात वर्षे प्रवास केला होता ती गाडीच त्याची बहिण झाली होती. अशी ही माझी गाडी माझ्या आयुष्यातील एक सहचारिणीच होती असे म्हटले तरी चुकीचे ठरु नये. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Saturday, January 23, 2021

सर्जनशील अनिलसाहेब

सर्जनशील अनिलसाहेब

          माझी आणि अनिल अणावकर यांची ओळख कणकवली नं.३ शाळेत शिकत असल्यापासूनची आहे. पण आता ती ओळख गेल्या चार पाच वर्षात खुप दृढ झाली आहे. आमच्या लहानपणी आम्ही त्यांचे वडील म्हणजेच अणावकरगुरुजींची भाषणे ऐकत मोठे झालो आहोत. 

        अणावकरगुरुजींचा व्यासंग दांडगा होता. त्यांना माहित असलेल्या विषयांबद्दल ते भरभरुन बोलत. त्यांनी सानेगुरुजी कथामालेत सांगितलेली कथा मला सांगताना मला ते आता जसेच्या तसे दिसत आहेत. शुभ्र पांढरे कपडे परिधान केलेले आणि काळ्या फ्रेमचा चष्मा लावून हावभावासह कथा सांगणारे अणावकरगुरुजी म्हणून माझ्या मनात ते लहानपणीच फिट बसलेले होते. 

          अशा या आदर्श आणि सुप्रसिद्ध असलेल्या अणावकरांच्या देखरेखीत मोठे झालेले आमचे मित्र अनिल आमच्यासाठी आदर्शच आहेत. ब्युटीपार्लरचे आधुनिक शिक्षण घेऊन त्यांनी सुरु केलेले ' अनिल हेअर ड्रेसर्स ' हे त्याकाळातील सिंधुदुर्गातील पहिले अद्ययावत सलून असावे. कणकवलीत तर त्यांच्या सलूनचा बोलबाला अजूनही आहे. त्यांचे वडिल सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे सल्लागार म्हणून काम करत. वरिष्ठ पातळीवरील उच्च पदस्थ अधिकारी वर्ग त्यांच्या अधिक परिचयाचे असत. त्यांचे नाव सांगून अनेकांनी आपली कार्यालयातील न होणारी कामे करुन घेतल्याचे त्यांनीच मला एकदा सांगितले होते. मलाही त्यांनी माझ्या लहान बहिणीच्या शिक्षणाच्या वेळी प्रवेश मिळताना अडचण आल्यास माझे नाव सांगून काम करुन घ्या असे सांगितले होते. पण भितीपोटी मी वरिष्ठांना भेटायला गेलो नाही. अर्थात त्यामुळे माझ्या बहिणीला प्रवेश मिळाला नाहीच. अणावकरगुरुजींची ओळख सांगितली असती तर माझ्या बहिणीचा प्रवेश झाला असता तर !!! याचा मी विचारच केला नाही. मी माझा अहंभाव बाजूला ठेवला असता तर ? पण त्यावेळी माझी वृत्तीच मला अडसर ठरली होती. हे अणावकर कुटुंबाला माहितही नसेल. 

          सगळेजण गुरुजींना बाबा म्हणत, अजूनही म्हणतात. मी पाटगांवला असताना तिथले बबनरावही महिन्यातून एकदा तरी बाबांना भेटायला येत. नाभिक संघटनेतील त्यांचे सक्रिय काम मी खूप जवळून पाहिले आहे. आता आम्ही नवीन तंत्रज्ञान वापरुन प्रसिद्धी देतो. त्यावेळी जलदगतीची प्रसारमाध्यमे नसतानाही त्यांनी संघटना वाढवली होती.रात्रंदिवस लेखन करुन व शनिवार , रविवार दौरे करुन त्यांनी नाभिक संघटना सर्वदूर पोहोचवली. ते प्रत्येकवेळी पुढे नसले तरी तेच खरे सुत्रधार होते. त्यांनी अनेक उत्तम कार्यकर्ते घडवलेले मी पाहिले आहेत. नंतर त्यांचे कामाचे व्याप इतके वाढले कि निवृत्त झाल्यानंतरही त्यांना अजिबात वेळ पुरत नसे. तरीही त्यांचे लेखन, भाषण सुरुच होते. 

          अशा या हरहुन्नरी गुरुजींचा लहान मुलगा अनिल. अणावकरगुरुजींची समाजात ओळख असताना अनिलसाहेबांना आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करायची होती. अनिलसाहेबांनी कणकवलीत आपली ओळख ठळकपणे निर्माण केली. अनिल हेअर ड्रेसर्सचे नाव त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मोठे केले. 

          आज अनिल अणावकर नावाचा एक ब्रँड आहे असे म्हटले तरी वावगे ठरु नये. त्यांच्या सलूनात काम करुन नवनवीन कला कौशल्ये शिकून अनेक कारागिर एक्स्पर्ट बनलेले मी पाहिले आहेत. त्यांचे सलून म्हणजे एक प्रशिक्षण शाळाच होती. त्यांनी अनेक हेअर डिझायनर घडवले आहेत. अनेक सेमिनारांमध्ये अकुशलांना कुशल बनवले आहे. सलूनकाम शिकण्यासाठी पुढे सरसावलेल्या प्रत्येकामध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे.

          हळूहळू अनिलसाहेबांनी नाभिक संघटनेतही जोर धरला. उभे राहून आपले म्हणणे ठामपणे मांडू लागले. त्यांनी आपल्या बाबांचे व्रत सुरु ठेवले. बाबांनी दिलेला वसा ते जोपासत आहेत. कणकवली नाभिक संघटना मजबूत करण्यासाठीही त्यांनी आपले निवासस्थानच कार्यालय म्हणून कायमचे दिलेले आहे. आता गेली अनेक वर्षे जिल्हा संघटनेत त्यांना मानाचे स्थान आहे. 

          जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी अनेक उत्तम कामे केली आहेत, करत आहेत. त्यांना आज ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचे काम दिवसेंदिवस अधिकाधिक वृद्धिंगत होत जावो अशी भालचंद्रचरणी प्रार्थना करतो.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Friday, January 22, 2021

नकय नकय जावया

नकय नकय जावया


          आपण आपल्या इच्छा प्रत्येकवेळी सांगत बसत नाही. मनात ठेवून राहतो. पोटातली इच्छा ओठात येत नाही. तुमच्या ओठातून बाहेर आल्याशिवाय ती दुसऱ्यांना समजणार तरी कशी ? लहानपणापासून असेच होत राहते. इच्छा आकांक्षांची मोठीच्या मोठी लांबलचक यादी आपण आपल्यालाही कळू देत नाही एवढी लपवून ठेवतो. 

          मनात आलेली गोष्ट बोलण्याचा संकोच करत राहतो. यांना काय वाटेल ? त्यांना काय वाटेल ? असे विचार मनातल्या मनात करत राहतो आणि कधीकधी विसरुनही जातो कि आपण कोणत्या इच्छा मनात आणल्या होत्या ते !!!! काहीजण तर आपल्या इच्छा सतत मारण्याचं काम करत असतात. इच्छा असायलाच पाहिजेत. त्या चांगल्या असल्या पाहिजेत. त्या वाईटही असू शकतात. 

          वाईट इच्छा मात्र नक्कीच मारुन टाकाव्यात. त्यांना जवळ फिरकू देऊ नये. पण ज्यांना सोडायचं असतं त्याच आपण होऊन वेगाने मागे लागत असतात. त्यामुळे त्यांना सोडणंही शक्य नसतं. चांगल्या इच्छांचं सतत संवर्धन करत राहायला हवं. त्यांचं प्रबळ महत्त्वाकांक्षेत रुपांतर करायला हवं. त्या पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करुन तर बघा. त्या लवकरच पूर्ण होऊ लागतील. 

          अर्थात त्यासाठी आपल्याकडे कमालीचा संयम हवाच. ' इच्छा तिथे मार्ग ' असं सुवचनच आहे. इच्छाशक्ती असली तर सगळी योजलेली कार्ये हवी तशी घडू लागतात. सगळीच नाही साध्य होत , पण आपण प्रयत्न करण्यात कमी पडलो असं होऊ नये. आपण त्यांचा आपल्या गतीने पाठलाग करत राहायला हवं. कधीतरी सापडणार नक्की. आपला वेग त्या इच्छेला गाठणारा हवा. 

          नुसती इच्छा बाळगली आणि बसून वाट बघत राहिलो तर काहीच घडणार नाही. ' असेल माझा हरी , तर देईल खाटल्यावरी ' असं म्हणणारे सतत मागे राहीलेले मी पाहिले आहेत. ते सगळ्याला मुहुर्त बघत बसतात. आज शनिवार आहे म्हणून नाही करायचे अशी इच्छा बाळगतात. सगळे शनिवार फुकट घालवतात. ' न कर्त्याचा वार शनिवार ' ही म्हण त्यांना खरी करुन दाखवायची असते जणू. एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती लगेच अंमलात आणा. 

          वार आणि मुहुर्त बघत बसू नका. तुम्ही जन्माला येताना मुहुर्त बघून जन्माला आलात का ? नाही ना ? मग झालं तर .... तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कामाला सुरुवात कराल तो चांगला मुहुर्त आणि चांगला दिवस. सुरुवात करुन बघा , नको नको म्हणत वेळ दवडू नका. 

          एकदा एक जावई सासरवाडीला आले होते. त्यांच्यासाठी छान बेत केला होता. सासुबाईंनी व्हायनात ( मालवणी शब्द ) तीळ कुटून मस्त तिळकूट बनवलं होतं. जावयांच्या नाकात तो खमंग वास भरला होता. जेवायला वाढण्यात आले. जावई भरपूर जेवले. आग्रह करण्यात आला. संकोचून जावयांनी तिळकुट थोडेच खाल्ले. पण तिळकुटाची चव काही त्यांच्या चवदार जीभेवरुन जाता जाईना. सगळे झोपले. 

          जावई मात्र झोपेत जागे होते. डोळे मिटून सगळ्यांच्या झोपण्याची वाट पाहत झोपलेले. सगळे गाढ झोपलेले लक्षात येताच जावई मांजराच्या पावलांनी व्हायनसळापर्यंत वास काढत पोहोचले. जाता जाता सासुबाईंना त्यांचा पाय लागला होता. जावयांच्या ते लक्षात आले नाही. ते आपले आपल्याच तंद्रीत. व्हायन सापडले. जावयांनी योगा करायला सुरुवात केली. पोटावर झोपून ते मकरासन करु लागले. 

          सासुने हळूच उठून कानोसा घेतला. बघते तर काय ? जावई अंथरुणात नाहीत. अरे बापरे !!! आमचे जावई अंधारात चालतात कि काय असे तिला वाटले. ती त्यांच्या मागून गेली. अंधुक दिव्याच्या उजेडात स्पष्ट दिसत नव्हते. पण हालचाली जाणवत होत्या. आपले जावई रात्री योगाभ्यास करत असावेत असे तिला वाटले. तीने आणखी पुढे जाऊन बघितले. तिला मांजरासारखा चाटण्याचा आवाज आला. तिने खाली वाकून पाहिले तर तिचे जावई जमिनीला चिकटलेल्या व्हायनातील उरले सुरले तीळ चाटत होते. तिळकुटाचा आस्वाद घेत होते. सासू गालातल्या गालात हसली व परत जाऊन झोपली. 

          सकाळी सगळेजण उठले. जावईसुद्धा उठले. त्यांच्या जीभेवर अजूनही तिळकूटाची चव रेंगाळत असावी. सासूने जावयांना गमतीने म्हटले , " नकय नकय जावया , व्हायन चाटून खावया " हे ऐकताच जावयाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. जावयाची पुरती फजिती झाली होती. 

          अशा अनेक घटना आपल्या जवळपास घडत असतीलही. पण इच्छा असताना नको नको म्हणणे बरे नाही. नाहीतर इच्छा उफाळून येते आणि अशी फजितीही होऊ शकते. ही एक गंमतगोष्ट आहे. घडलेली असेल किंवा नसेलही. पण कित्येक माणसं या जावयांप्रमाणे असू शकतात. त्यांनी  " कशाला , कशाला " म्हणत लाजत राहू नये. हवी असलेली वस्तू विनंती करुन थेट मागावी. कधीकधी  जेवणाच्या पंगतीमध्ये असाही आग्रह केला जातो, " लाजू नका, मागू नका , पोटभर जेवा. " आता काय जेवणार कप्पाळ !!!! जेवढ्या इच्छा दाबून ठेवाल , त्या कधीतरी उचंबळून वर येतील. आपण त्यावर योग्य नियंत्रण ठेवणे हे आपल्या आणि आपल्याच हातात आहे. नाही का ?


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...