Thursday, March 31, 2022

🛑 एप्रिलफुल बनाया

🛑 एप्रिलफुल बनाया

          आज एक एप्रिल. दुसऱ्यांना फुल बनवण्याचा दिवस. आज आपण दुसऱ्यांना फुल बनवणार आहोत असे म्हणता म्हणता आपण स्वतः फुल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फुल म्हणजे फुलझाडाचे फुल नव्हे ? ते फुल असते तर बरे झाले असते. हे मूर्ख बनवणारे फुल आहे , ज्याला आपण ' एप्रिलफुल ' या नावाने सगळीकडे ओळखतो. 

          जुन्या काळी आजच्या दिवशी एक गाणे नेहमी लागायचे. " एप्रिलफुल बनाया , तो उनको गुस्सा आया , तो मेरा क्या कुसुर , जमाने का कुसुर जिसने दस्तुर बनाया " हे गाणे म्हणता म्हणता आम्हीही कोणाचीतरी खोड काढायचो. मजा वाटायची. तो फसला की म्हणायचो , " एप्रिलफुल , कानात डुल , खिशात फुल , हातात बांगडया " वगैरे ...... लहानपणी एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला एप्रिलफुल करण्यात जी मजा येई ती आता येत नाही. ती निष्पाप मजा निखळ असे. त्यात हेवेदावे नसत. तो एक खेळच असे. तो आम्ही कधीच जीवघेणा बनवला नाही. 

          " तुला गुरुजींनी बोलावलंय " असे सांगून कित्येकांना आम्ही गुरुजींकडे पाठवले आहे. " तुझ्या मागे बघ काय ? " असे म्हणत त्याला मागे बघायला लावले आहे. मित्रांना फसवले. त्यांनी फसून घेतले. मीही अनेकदा त्यांची शिकार होऊन गेलो आहे. घरात आणि शेजारी तर खूपच मज्जा केली आहे. भाड्याने राहत असताना अनेक खोल्या बदलल्या. प्रत्येक खोलीचा वेगवेगळा अनुभव असेल. पण या दिवशी ' राग ' मात्र कधीच येऊ दिला नाही. आमचे एप्रिलफुल हे समोरच्याला खजिल करुन सोडून दिलेले असे. जीवघेणे एप्रिलफुल आम्ही कधीच केले नाही आणि कदापि करणारही नाही. 

          अक्षयकुमारचा एक हिंदी पिक्चर बघितलेला आठवतोय. त्यात त्यांनी एक खोटाच खून केल्याचा अभिनय केला होता. मित्र मित्र मिळून असा खोटा खोटा एप्रिलफुलचा खेळ खेळत होते. आणि खरंच कोणीतरी कोणाचा तरी खून केला होता. त्यामुळे त्यांच्या मजेचे रूपांतर सजेत झाले होते. गुन्हा दुसऱ्यांनी केला होता , सजा त्यांना मिळाली होती. त्यांना फक्त मजा करायची होती , पण वेगळेच घडले होते. 

          हल्ली काही ठिकाणी एप्रिलफुलच्या निमित्ताने खोड्या काढल्या जात असतील तर त्या ठीक आहेत. त्यांचे स्वरुप जीवघेणे ठरु नये याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. एखाद्याने खोडी काढली तर आपणही ती समजून घेतली पाहिजे. त्याचा सूड न घेता त्याची मस्करी करता आली पाहिजे. अर्थात थट्टा मस्करी ही मस्करी पुरती मर्यादित असली पाहिजे , तिची कुस्करी होऊ नये म्हणजे झाले. 

          सध्या ' राडा ' हा नवीन शब्द सर्वांच्याच शब्दकोशातील शब्द झाला आहे. जावे तिथे ' राडा संस्कृतीने ' थैमान मांडले आहे. सुड वृत्तीने बेभानपणे वागणारी तरुण पिढी बघितली की मन विदीर्ण होऊन जातं. एप्रिलफुलचे काहीसे तसेच झाले आहे. त्याचा मिश्कीलपणा जाऊन त्याची जागा ' बदला ' या नवीन भावनेने घेतली आहे. हे चुकीचे आहे. 

          एप्रिलफुल हा दिवस ' एक गंमत दिवस ' म्हणून नक्कीच साजरा केला गेला पाहिजे. त्याला गालबोट न लावता त्याचा निखळ , निर्मळ आनंद घेता आला तर हा दिवस ' एक उनाड दिवसासारखा ' नक्कीच अविस्मरणीय होऊ शकतो यात शंका नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



🛑 रणी निघाले समितीचे शूर

          काल कणकवली तालुका प्राथमिक शिक्षक समितीची नियामक सभा संपन्न झाली. तीन वर्षे परिपूर्ण झाल्यानंतर किंवा मुदत पूर्ण झाल्यामुळे नवीन कार्यकारिणी गठित करण्यासाठी अशा सभा घ्याव्या लागतात. मी अशा सभेला पहिल्यांदाच उपस्थित होतो. सभेचे कामकाज पाहण्याचा भाग्यशाली योग आला. 

          मागील तीन वर्षांपूर्वीच्या इतिवृत्ताचे वाचन झाले. त्यावर आवश्यक चर्चा झाली. चर्चा नेहमी साधक आणि बाधक दोन्ही प्रकारे व्हावी लागते असेही लक्षात आले. सर्वांच्या सकारात्मक किंवा नकारात्मक मतांचा सन्मान केला जातो , आदर करायचा असतो हे त्या निमित्ताने माझ्या लक्षात आले. प्रत्येकाचे मत हे स्वतःचे वैयक्तिक असते. या वैयक्तिक मताला सभागृहात मांडले जाते , हा खऱ्या लोकशाहीचा विजय ठरतो हे समितीच्या या सभेने अधोरेखीत केले आहे. 

          समितीचा तळागाळातील किंवा ग्रास रुटवर काम करणारा अत्यंत महत्त्वाचा असतो हे स्पष्ट झाले आहे. हे सगळेच आपले धडाडीचे शिलेदार असतात. या सगळ्यांनाच पदाशिवाय काम करण्यात धन्यता वाटत असते. 

          काल मला तिसऱ्यांदा पावनखिंड चित्रपट बघण्याची संधी मिळाली. त्यामुळे माझ्यावर त्याचा असर होताच. मला आमचे समस्त समितीचे शिलेदार बाजीप्रभू , अगिन्या , शिवा काशिद , रायाजी , कोयाजी आणि समस्त मावळ्यांसारखे वाटू लागले. 

          चित्रपटातील काही वाक्ये मला इथे मुद्दाम सांगावीशी वाटतात. " मराठे कधी पळत नाहीत , ते पळायला लावतात. " हे खरंच आहे. आमचे समितीचे निष्ठावंत शिलेदार कधीच पळत नाहीत , तेही पळायला लावतील असे कार्य करताना दिसतात. " हट्टाला पेटतो , त्याला मरहट्टा म्हणतात " या वाक्याला अनुसरुन आमचे समितीचे शिलेदार जर एखाद्या हट्टाला पेटले तर ते कार्य पूर्ण केल्याशिवाय गप्प बसणारे नाहीत. 

          विशाळगडावर शिवाजी महाराजांसोबत प्रयाण करताना मावळ्यांना कित्येक समस्यांचा सामना करावा लागला होता. वाटेतल्या गांधीलमाश्यांचे चावे त्यांना वेदना देत होते. पण शिवरायांचे मावळे अजिबात मागे हटले नाहीत. आता आमच्या समितीच्या मुख्य नेतृत्वाखाली काम करत असताना अनेकदा अध्यक्ष आणि पदाधिकारी यांना अनेक शासकीय संघर्षांना नेहमीच तोंड देत राहावे लागते. परंतु आपल्या मताशी नेहमी ठाम राहत झुंजत राहणारे समितीचे शिलेदार पाहिले की थक्क व्हायला होते. त्यावेळी नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची पाठ थोपटावी तितकी थोडीच असते. शिवाजी महाराजांना त्यांच्या मावळ्यांनी जसे बळ दिले , तसे बळ समितीचे शिलेदार आपल्या खंबीर नेतृत्वाला नेहमीच देत असतात. या शिलेदारांच्या निस्सीम पाठिंब्यावर आपलं नेतृत्व अधिक आत्मविश्वासाने लढत असतं. आपल्या समितीच्या शिक्षक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अगदी असेच काम केल्याचे दिसून येते आहे. 

          पावनखिंडीत लढताना बाजीप्रभू शिवाजी महाराजांना म्हणाला होता , " महाराज , कुणाचं नाव कुठं कोरलं जातं , आमचं इथं कोरलं जाणार आहे , आजचा उत्सव साजरा करु द्या. " आमच्या समितीच्या सर्व शिलेदारांनी नेहमी हिच भावना ठेवली आहे. त्यांनी आपली नावे प्रत्येक नेतृत्वाच्या हृदयात अशीच अप्रत्यक्षपणे कोरुन ठेवलेली दिसून येतात. 

          पावनखिंड पार करताना सगळे मावळे शिवरायांना विनम्र विनंती करतात , " जा राजं जा , जा राजं जा " त्यावेळी शिवाजीराजे विशाळगडाकडे जायला निघतात. आमच्या समितीची नेतृत्वे जेव्हा शासनाशी संघर्ष करत असतात , तेव्हा आमचे शिलेदार असेच त्यांच्या सदैव पाठीशी असतात. या शिलेदारांच्या जीवावरच ते शासनाच्या लढ्यात न घाबरता नेटाने लढताना पाहून आम्हालाही स्फुरण चढते. 

          " न्यायाची चाड आणि अन्यायाची चिड " सदैव बाळगणारे समितीची नेतृत्वे जणू म्हणत असतात , " आज तुम्हाला लढावं लागेल स्वतःसाठी , शैक्षणिक विकासाचा सूर्य उगवू पाहतोय , घाबरु नका. तुमचं युद्ध आहे तुमच्या कमजोरीशी , उमेदीच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा. " अशी उत्स्फूर्त मार्गदर्शन करणारी नेतृत्वे समितीने कायमच दिली आहेत. 

          समितीची एक नवीन नेतृत्व असलेली कार्यकारिणी गठित झाली आहे. त्यांना आपण अशीच साथ द्यायची आहे. मागील केलेल्या कार्याची जाण ठेवून अधिक प्रेरणेने उत्साहाने काम करत राहायचे आहे. " जय शिक्षक समिती " च्या घोषणेचा दीप सदासर्वकाळ तेवत ठेवत आपलं कार्य समितीच्या सर्व शिलेदारांनी असेच वृद्धिंगत करत राहिले पाहिजे. समितीचे नवे शूरवीर रणी निघाले आहेत , ते मागे फिरणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे.  

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Tuesday, March 29, 2022

🛑 एकदम सही

🛑 एकदम सही

          भरत माझा आवडता मराठी नट आहे. त्याचं ' ऑल दि बेस्ट ' हे पहिलं नाटक खूप पूर्वी पाहिलं होतं. त्यात त्याने केलेली ' मुक्या ' ची भूमिका कमालीची होती. तेव्हा भरत एवढा भरात नव्हता. त्याच्या चित्रपटांची सलग शृंखला येत गेली. अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे नंतर भरतला पाहायला प्रेक्षक पसंती देऊ लागले. त्याचा मॅड परफॉर्मन्स लोकांना इतका आवडू लागला कि त्याचे बघितलेले चित्रपट पुन्हा पुन्हा बघण्यात मज्जा वाटू लागली. 

          श्रीमंत दामोदरपंतने तर कहरच केला. त्याच्या ' गोड गोजिरीने ' त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. एक साधा अभिनेता आपल्या विनोदी अभिनयाच्या जोरावर प्रचंड लोकप्रिय होताना आपण सर्वांनीच पाहिला असेल. त्याचं वेगळं हसणं आपल्याला हसवून जातं. त्याच्या चित्रविचित्र अंगविक्षेपांनी हास्याचे फवारे उडू लागतात. 

          त्याच्या गंभीर भूमिका पाहिल्या. तो हसवतो , तसा रडवू शकतो इतका त्याचा सहज सुंदर अभिनय आहे. त्याचे दहा हजारांपेक्षा अधिक नाट्यप्रयोग झाल्याचे समजते आणि आपला विश्वासही बसत नाही. पण हे खरे आहे. 

          विजय कदम यांनी साकारलेली ' मोरुची मावशी ' करणं सोपी गोष्ट नव्हती. ती त्याने लिलया पेलली आहे. ' टांग टिंग टिंगाक , टांग टिंग टिंगाक , टांग टिंग टिंगाक , टुंग ' हे त्याने स्वतः म्हणून नाचलेलं गाणं पुन्हा पाहावसं वाटत राहतं. 

          हल्लीच त्याचं ' पुन्हा सही रे सही ' हे नाटक पाहिले. एकाच नाटकात पाच भूमिका करताना त्याने केलेले प्रवेश चक्रावून सोडतात. एका विंगेतून निघून जातो आणि दुसऱ्या विंगेतून वेगळी वेशभूषा करुन परत परत येणारा भरत ग्रेटच आहे. डोळ्यांच्या पापण्या लवत नाहीत , तोपर्यंत तो दुसऱ्या भूमिकेत कसा काय हजर होतो हे त्यालाच ठाऊक. ते नाटक पाहताना आमचा गोंधळ उडून जातो , तर त्याचा किती गोंधळ होत असेल याची कल्पना केलेलीच बरी. शेवटपर्यंत रंगमंचावर होणारा गोंधळ अनुभवतानाची मजा प्रत्यक्षच  घ्यायला हवी. 

          मदन सुखात्मे नावाचे एक गृहस्थ असतात. ते मृत झाल्याचे त्यांच्या लांबच्या नातेवाईकांना समजतं आणि त्यांची मालमत्ता आपली करुन घेण्यासाठी सर्वांची चाललेली धडपड माणसाच्या मरणाची वाट पाहणारी ठरते. 

          ज्यांच्याकडे भरपूर इस्टेट असते , त्यांच्या जाण्याची वाट मुलं , पत्नी किंवा नातेवाईक बघत असतील तर किती भयानक गोष्ट आहे. शेवटी हा मदन सुखात्मे मेलेलाच नसतो हे समजते तेव्हा तोतया बनलेल्या मदन सुखात्मेंची झालेली घाई विनोद निर्माण करते. एका वेळी पाच पाच ठिकाणी मदन सुखात्मे दाखवताना दिग्दर्शक आणि सहकलाकार यांनी केलेला अभिनय हुबेहूब भरत जाधव सारखाच वाटतो.  ही कला भरत जाधवांसारखे कलाकारच दाखवू शकतात. ही सगळी ड्रामेबाजी एका सहीसाठी चाललेली असते. प्रत्येक घरात जर सहीसाठी एवढा आटापिटा केला जात असेल तर तो थांबला पाहिजे. इस्टेटीसाठी आपण घरातच शत्रू बनतो. ही इस्टेट नसती तर खूप बरे झाले असते असे जेव्हा वाटते , तेव्हा माणसे डेडस्टॉक संपत्ती वाढवण्यापेक्षा ' मानवीय नात्यांची संपदा ' वाढवण्यासाठी प्रयत्न करु लागतात. हे मात्र ' एकदम सही ' आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Monday, March 28, 2022

🛑 अमोल भंडारी : एक अनमोल शैक्षणिक भांडार

🛑 अमोल भंडारी : एक अनमोल शैक्षणिक भांडार

          मला शेर्पे केंद्रात आता तीन वर्षे होतील. मी हजर झालो , तेव्हा शेर्पे केंद्रशाळेचा मुख्याध्यापक चार्ज अमोल भंडारी यांच्याकडे होता. त्यावेळी पाठयपुस्तके आणण्यासाठी मी केंद्रशाळेत गेलो होतो. अमोल भंडारी हे एक आमच्यापेक्षा वयाने लहान असलेले उपशिक्षक तिथे मार्गदर्शन करताना दिसले. तेव्हाच त्यांचा माझ्यावर पहिला वहिला प्रभाव पडला होता. मुद्देसूद मार्गदर्शन करत केंद्रमुख्याध्यापकांची जबाबदारी ते पेलताना दिसत होते. 

          त्यानंतर तीन वर्षात त्यांच्यासोबत विविध उपक्रमांच्या निमित्ताने पुनः पुन्हा भेट झाली. प्रत्येकवेळी त्यांच्यातील धडपड करणारा शिक्षक मला खुणावत होता. मी त्यांच्या वयाचा असताना अगदी असाच होतो याची जाणीव होऊन मला त्यांच्याविषयी असलेला आदर वाढत जाताना दिसत होता. शिक्षकाने नेहमी असेच असावे , नेहमी कार्यरत. त्यांचे व्यक्तिमत्त्व साधे ,  सरळ आहे. त्यांना स्वतःची ओळख करुन देण्याची गरज पडत नाही , त्यांचे शैक्षणिक कार्यच त्यांची ओळख बनली आहे. शेर्पेसारख्या दुर्गम भागात अमोल भंडारींसारखे शिक्षक कार्यरत असतील तर ते तिथल्या विद्यार्थ्यांचे भाग्यच म्हणायला हवे. 

          आपल्या शैक्षणिक कार्याने मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे माझ्यासारखा शिक्षक नक्कीच सांगू शकतो. यश मिळवण्यासाठी जी जिद्द लागते , ती त्यांच्याकडे आहे. त्यांनी मुलांना यश मिळावे म्हणून आपला वैयक्तिक वेळही मुलांसाठी दिलेला असेल. कारण काही काळ त्यांनी आपले व्हॉटस ऍप , फेसबुक बंद ठेवले होते हे मला माहिती आहे. आता आपल्याला या तंत्रांची इतकी सवय झाली आहे की त्यावर नियंत्रण ठेवणे ही अशक्यच गोष्ट आहे. तरीही अमोल भंडारी यांनी त्यावर कमालीचा संयम बाळगला होता. 

          नेट सेटची परीक्षा उत्तीर्ण होणारे ते एक हुशार प्राथमिक शिक्षक आहेत. ते आपली फुशारखी मारताना मला कधी दिसलेले नाहीत. ते म्हणूनच मला जास्त आदर्श वाटतात. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करु शकणाऱ्या मार्गदर्शकांमध्ये त्यांचा वरचा नंबर लागेल. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन यु ट्युबच्या माध्यमातून शैक्षणिक मार्गदर्शन केले आहे. अशा तरुण व उमेदीने शिकवणाऱ्या अमोल भंडारींसारख्या शिक्षकांनी गावोगावी शाळांमधून अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी उद्युत करायला हवे. त्यासाठी अमोल भंडारी सरांचे अनमोल मार्गदर्शन नक्कीच उपयोगी पडेल. शिक्षण प्रक्रिया ही निरंतर असते. तिच्यात खंड पडला की विद्यार्थ्यांना भविष्यात त्याची किंमत मोजावी लागते. अखंडपणे सलग अव्याहतपणे काम करणाऱ्या अमोल भंडारींसारख्या शिक्षकांकडून म्हणूनच भव्य दिव्य असे शैक्षणिक कार्य घडते आणि आम्हां शिक्षकांची मान अभिमानाने अधिकाधिक उंचावत राहते. 

          अमोल भंडारी हे शिक्षण क्षेत्राला लाभलेले एक अनमोल रत्नच आहेत. त्यांचे आडनांव भंडारी आहे आणि ते स्वतः ज्ञानाचे भांडार आहेत. त्यांच्या मनात कायमच मुलांच्या स्पर्धाविषयक विविध प्रश्नांची चक्रे फिरत असतील. कधी एकदा शाळेत जातो आणि मुलांना सांगून टाकतो असे त्यांचे नेहमीच होत असेल. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असतीलही , त्यांना त्या पुरस्काराने अधिक प्रोत्साहन मिळत राहते. खेड्यापाड्यात काम करणाऱ्या अमोल भंडारींसारख्या स्पर्धा परीक्षेसाठी जीवाचे रान करणाऱ्या शिक्षकांचा म्हणूनच सन्मान होत राहिला पाहिजे. अशा अमोलांना पुरस्कारापेक्षा शाबासकीची थाप महत्त्वाची असते. पदाधिकारी , अधिकारी , पालक यांनी दिलेली अशी जिव्हाळापूर्ण थाप अमोलांना अनमोल बनवते. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



Sunday, March 27, 2022

🛑 वेताळ गेलो चोरीक

 🛑 वेताळ गेलो चोरीक

          चांदोबा हे आमचे सर्वांचे लाडके मासिक. कणकवली नगर वाचनालय येथे बालवाचक म्हणून नोंदणी केल्यानंतर दर दोन दिवसांनी नवनवीन पुस्तके वाचायला मिळत. चांदोबा , कुमार , किशोर , ठकठक , लोटपोट अशी अनेक बालवाङमये आम्ही वाचत असू. चांदोबातील ' विक्रम वेताळाच्या गोष्टी '  क्रमशः असत. त्यामुळे पुढच्या अंकाची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसे. त्या गोष्टीतील वेताळ विक्रमाला प्रत्येक कथेत प्रश्न विचारत असे. विक्रमाच्या पाठीवर लोंबणारा वेताळ त्याकाळी आमच्या स्वप्नातही यायचा. घाबरत उठून आम्ही भावंडे आईबाबांच्या कुशीत सामावत असू. 

          त्यानंतर पाचवी ते सातवीच्या दरम्यानच्या काळात महेश काणेकर नावाचे बालकादंबरीकार आम्हाला एक बालनाट्य शिकवायला येत. त्याचे नावच होते , " वेताळ गेलो चोरीक ". ते स्वतः त्याचे लेखक आणि दिग्दर्शक दोन्ही होते. त्यांनी लहानांसाठी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ते चित्रकारिता करीत. ते पोर्ट्रेट काढत असताना मी अनेकदा थक्क होऊन पाहत बसत असे. उंच ,  कुरळे केस असलेले महेश काणेकर उत्तम गायक असल्याने त्यांची श्रवणीय गाणी ऐकून मलाही तसं गाण्याची सवय लागली असावी. त्यांच्या या नाटकाची स्टोरी आता अजिबात आठवत नाही. त्यात माझी भूमिका कोणती होती तेही आठवत नाही. रिहर्सलच्या वेळी भालचंद्र मठाच्या रंगमंचावर आम्ही बसत असू. तिथे एक भले मोठे पिंपळाचे झाड होते. त्याची सावली आम्हाला सोबत करी. 

          वाचता वाचता ' कॉमिक्स ' ची पुस्तकेही वाचत गेलो. त्यात वेताळ असे , स्पायडरमॅन असे. गोष्टी चित्ररुप असत. त्यामुळे ही पुस्तके पुन्हा पुन्हा वाचूनही कधीच कंटाळा आला नाही. त्यातील वेताळ वेगळाच असे. त्याच्या अंगावर कायम बुरखा असे. त्याचा बुरखा काढलेला चेहरा कधीच पाहता आला नाही. 

          अभ्यासामुळे काहीच दिवसांत त्यांचे वाचन मागे पडले. वाचण्याची आवड वाढल्यामुळे कणकवली कामगार केंद्रातील पुस्तके वाचायला जाऊ लागलो. अभ्यास जास्त आवडू लागल्याने किंवा स्कॉलरशिप परीक्षेला बसल्यामुळे अभ्यास करण्याचे माझे तास वाढत गेले. 

          ' वेताळ गेलो चोरीक ' या बालनाट्याचे कथानक आठवत नसले तरी माझ्या वाचनातील ' वेताळ ' केव्हाच चोरीला गेला होता. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



Friday, March 25, 2022

🛑 रेशमी पुरस्कार

🛑 रेशमी पुरस्कार

          पुरस्कार मिळणे हा प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय ठेवा असतो. त्यासाठी आपल्या आयुष्यातील कित्येक वर्षांचे योगदान द्यावे लागते. चाकोरीतून काम करताना त्याच्या पलीकडे जाऊन काम करण्याचे धाडस ज्यांच्या अंगी असते , तेच पुरस्काराचे मानकरी ठरतात. रश्मी आंगणे या त्यापैकीच एक गुणी आणि उपक्रमशील शिक्षिका आहेत. त्यांचे आडनांव आंगणे आहे म्हणजे त्या मूळ आंगणेवाडीच्या आहेत. देवी भराडीचा त्यांच्यावर असाच वरदहस्त राहो. कधी कधी मला असे वाटते , भराडीदेवी त्यांच्या भक्तांमध्ये वास करत असेल , तर ती काही अंशाने त्यांच्यातही वास करत असावी. 

          रश्मी मॅडमांच्या अध्यापनाचे पाठ पाहण्याची संधी मिळाली होती. त्यांचे अध्यापन विद्यार्थीकेंद्री आहे. दैनंदिन जीवनाची सांगड घालत घटक शिकवण्याची त्यांची पद्धत म्हणूनच बालकांना आपलीशी वाटत राहते. त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्यांचे संस्कार प्रकट होताना दिसतात. त्यांनी सातरल कासरल शाळेत असतानाही नवोपक्रम राबवले आहेत. मी एकदा त्यांच्या शाळेत गेलो होतो तेव्हा मला प्रचिती आली आहे. कदाचित त्यांना हे आठवतही नसेल. 

          बीएडला असताना त्यांच्या ग्रुपमध्ये नसलो तरी त्यांच्या पाठांविषयी ऐकले आहे. त्या अभ्यासू आहेत. जे ठरवतील , ते पूर्ण करण्याची त्यांची जिद्द इतरांनाही लाजवणारी असते. त्या जिद्दी आहेत , म्हणून त्यांच्या हातून अपूर्व असे शैक्षणिक कार्य घडताना आपण पाहात आहोत. त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले असेल. 

          त्यांचा आवाज श्रवणीय आहे. त्यांनी आपल्या आवाजात पाठ्यपुस्तकातील कवितांचे केलेले गायन पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असेच आहे. त्यांना नेहमी गुणवत्तेचा ध्यास लागलेला असतो. त्या भारावून व झोकून देऊन काम करताना दिसतात. त्यांची काम करण्याची ऊर्जा पाहिली की माझ्यासारख्या पुरुष शिक्षकालाही त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. 

          त्यांचे कथावाचन वाचिक अभिनय , आवश्यक विराम आणि ओघवतेपणा यांचा त्रिवेणी संगमच आहे. त्यांच्या काही कथा मी ऐकल्या आहेत. त्यांचे सूत्रसंचालन नियोजनबद्ध असते. ते एक व्यावसायिक सूत्रसंचालन वाटते. 

          आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी एक पाऊल पुढे असण्यासाठी त्या सदैव प्रयत्नशील असतात. अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असलेल्या शिक्षिका लाभलेले विद्यार्थी खरेच भाग्यवान असतील. त्या ज्या शाळेत जातील तिथे शैक्षणिक सोने पिकवतील. त्यांचे पती सध्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणेसाहेब यांची त्यांना लाभलेली साथ त्यांच्या यशात उत्तुंग शिखरे सर करताना मिळालेली देणगीच आहे. त्यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणूनच रेशीमगाठीचा रेशमी पुरस्कार आहे असे मला वाटते. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



🛑 वृद्धाश्रमातील वृद्ध

          असा प्राणी ओळखा जो सकाळी चार पायांनी , दुपारी दोन पायांनी आणि संध्याकाळी तीन पायांनी चालतो ? या कोड्याचे उत्तर विचार करण्यासारखे आहे. तो प्राणी म्हणजे आपणच आहोत. मनुष्यप्राणी. हा मनुष्य बाल्यावस्थेत चार पायांवर रांगतो , तारुण्यात दोन पायांवर रुबाबात चालतो आणि म्हातारपणी काठी घेऊन चालतो. आपण सगळे या तीन अवस्थांमधून जाणार हे नक्की असतं. 

          यातील पहिल्या दोन अवस्था हव्याहव्याशा असतात. तिसरी अवस्था येऊच नये असं वाटतं. ती येईपर्यंत आपण त्या अवस्थेतील आप्तांशीही व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. त्या अवस्थेत गेलो की समस्या नकोशा होऊन जातात. आपल्याला कोणी वृद्ध म्हटलेलं आवडत नाही. आपण ज्या कुटुंबसंस्थेचे भाग होतो , ती स्वतःची संस्था आपणांस नाकारु लागते ही आजची मोठी खंत आहे. 

          आजीबाईचा बटवा आज गायब झालेला आहे. आजीच्या गोष्टी हरवल्या आहेत. नातवंडांना आजोबा नकोसे झाले आहेत कि मुलांना आपले आईवडील नकोसे झाले आहेत ? असे अनेक प्रश्न भेडसावू लागले आहेत. वृद्ध झाल्यानंतर त्यांची उपयोगिता कमी झाल्यामुळे असे झालेय का ? आयुष्याच्या उत्तरायणात जेव्हा खरी गरज आहे , त्याचवेळी त्यांना विलग करणं कितपत योग्य आहे ? असे प्रश्न यक्षप्रश्न बनत आहेत. 

          अशा वेळी बिचारे वृद्ध आई बापच निर्णय घेतात. " आता आम्ही या घरातील अडगळीच्या वस्तू झालो आहोत."  हे असह्य जगणं जगण्याच्या संघर्षातून काही वृद्ध आत्महत्येलाही प्रवृत्त झाले असल्यास ती आजच्या तरुण पिढीची चूकच म्हणायला हवी. 

ज्यांना आत्महत्या करण्याचं धाडस होत नाही ते वेगळं घर थाटण्याचा प्रयत्न करतात. वेगळं घर थाटलं तर आम्हांला बघणार कोण ? हा प्रश्न ज्यांना पहिला पडला असेल त्यांच्या सुपिक डोक्यात ' वृद्धाश्रम ' नावाची संकल्पना रुजली असेल. मुलांच्या सुखाच्या संसारात आपली अडचण नको म्हणून स्वतः वृद्धाश्रमाला जवळ केलेली माणसं मी पाहिली आहेत. काहींचं असं म्हणणं आहे , " आमची सगळी मुलं परदेशात राहतात , आम्हांला भारतातच राहायचे आहे. त्यांना वरचेवर येणे शक्य नाही म्हणून आम्ही स्वतःच वृद्धाश्रमात राहतो आहोत. ते तिकडून आम्हाला फोन करतात , पैसे पाठवतात. पण एक मात्र खरं आमच्या जीवनाचा उद्देश सफल झाला असला तरी पुढील जीवन मुलांच्या सहवासाशिवाय जाणार याचे अतीव दुःख होते. " 

          काहींना त्यांच्या मुलांनी ' सासू सुनांची ' भांडणे नको म्हणून वृद्धाश्रमात पाठवले आहे. अर्थात वृद्ध झाल्यानंतर या मुलांनाही त्यांची मुले वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवणार नसतील तर ते नवल म्हणावे लागेल. 

          स्वेच्छेने किंवा जबरदस्तीने किंवा अपघाताने वृद्धाश्रम जवळ करावा लागणे ही कोणत्याही मानव प्राण्याला आवडणारी गोष्ट नसेल. एखाद्या दांपत्याला मुलंच नसतील तर त्यांना नाईलाजाने आपल्या सुरक्षेसाठी वृद्धाश्रमाला घर म्हणावे लागते. 

          सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या माध्यमातून दोन तीन वेळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका वृद्धाश्रमात जाण्याचा योग आला. तिथे जाऊन त्यांची एका दिवसासाठी आस्थेने विचारपूस केली. त्यांना वस्तू , धान्य , फळे , खाऊ दिले. त्यांच्या संस्थेला जमेल तशी आर्थिक मदत दिली. फोटो काढले. बातम्या दिल्या. या कार्याने त्या वृद्धांची काही प्रमाणात सोय होणार होती. प्रश्न सुटणार नव्हते.

          मी तेथील प्रत्येक वृद्धाला बघत होतो. त्यांचे चेहरे वाचण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो. त्यांचे चेहरे तात्पुरते फुललेले दिसत होते. ते  कायम तसे नसावेत हे लक्षात येत होते. कोणाची दाढी वाढली होती , कोण खोकत होते , कोण आजारी होते , कोणाच्या केसात उवा दिसत होत्या. आमच्या मंडळातील सेवाभावी नाभिक तिथे जाऊन मोफत केशकर्तनाची सेवा देत असल्याचे समजले. मला माझ्या ज्ञातीबांधवांचा आदर वाटला. 

          मी तिथे त्यांच्याशी बोलता बोलता एक अंगाई गीत म्हटले. ' श्यामची आई ' या नवीन चित्रपटातील ते गाणे होते. ' माझा बाळ गुणाचा गं , माझा श्याम गुणाचा गं ' असे गाण्याचे बोल होते. मी मधुर सुरात गाणे म्हणत होतो. समोरचे वृद्ध मंत्रमुग्ध होऊन मला ऐकत होते. जणू त्यांची स्वतःची मुलं त्यांना दिसत असावीत. अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलेले मला दिसले. डोळ्यातील पाणी त्यांनी पुसलेही नाही. त्यांच्या डोळ्यांतील पाणी पाहून मी गहिवरुन गेलो होतो. वृद्धाश्रमाने आम्हांला दिलेली वेळ संपली होती. आम्ही परत निघालो होतो. माझ्या डोळ्यांसमोरुन त्या वृद्धांचे चेहरे जाता जात नव्हते.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर(  9881471684 )



🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...