आज सकाळी शाळेच्या वाटेवर नेहमीप्रमाणे कुत्र्यांचे दर्शन झाले आणि पुन्हा तोच विचार मनात घोळू लागला - या कुत्र्यांचे करायचे काय? सकाळी कुणी कुत्रा विव्हळताना ऐकला, की एक अनामिक भीती मनात घर करते, 'काही वाईट तर होणार नाही ना?' ही तीच भीती आहे, जी कदाचित हा अनुभव वाचणाऱ्या प्रत्येकाला जाणवली असेल.
माझा अनुभव तर याहून वाईट आहे. कित्येकदा या कुत्र्यांनी मला दुचाकीवरून पाडले आहे. नशीब बलवत्तर म्हणून केवळ खरचटलो, हाडं-बिडं मोडली नाहीत. पण या कुत्र्यांना काही होत नाही, आपण त्यांना वाचवायला जातो तेव्हा मात्र आपले हात, पाय किंवा एखादे हाड नक्की मोडते. मग ते सांधेपर्यंत त्या कुत्र्याची आठवण येते, कारण आपल्याला बघायला आलेल्या प्रत्येकाला तो किस्सा सांगताना, त्या सुप्रसिद्ध कुत्र्याचा उल्लेख केल्याशिवाय पर्याय नसतो. सांगताना तर असे वाटते, जणू आपणच भुंकत आहोत!
हे कुत्रेही कमालीचे असतात! आपल्याला हुलकावणी देतात आणि 'कसं फसवलं?' म्हणत भुंकत भुंकत अचानक गायब होतात. आपण मात्र कोण उठवतंय याची वाट बघत राहतो.
काही घरांच्या किंवा बागांच्या बाहेर लावलेली 'कुत्र्यांपासून सावधान' ही पाटी वाचली की आधीच धडकी भरते. मी तर जन्मजात कुत्राभित्रा! ( हा शब्द कुठल्याही शब्दकोशात तुम्हाला सापडणार नाही ) त्यामुळे ती पाटी दिसताच शक्यतोवर तो रस्ता टाळतो. मग नाइलाजाने जावे लागलेच, तर त्या कुत्र्याचे मालक त्याला साखळी बांधून पुढे येतात. पण त्यांच्या हातातून साखळी सुटली तर आपले काही खरे नाही, ही भीती घरी स्वस्थ बसू देत नाही.
एकदा मी सकाळी लवकर शाळेत निघालो होतो. शासनाने शाळेची वेळ लवकर केल्यामुळे लवकर जावे लागते, हे त्या कुत्र्यांना काय माहीत असणार! ते तर रस्त्याला आपले साम्राज्य समजून आरामात पसरलेले असतात. मी माझ्याच विचारात चाललो होतो, पण समोर येऊन मलाच घाबरवणारा तो कुत्रा मात्र पूर्णपणे सावध होता. त्याने माझी तंद्री पुरती घालवली. त्याने माझ्या गाडीमागे धावायला सुरुवात केली आणि मग सुरू झाली जणू एक शर्यत! मी गाडीचा वेग वाढवला, त्यानेही त्याचा वेग वाढवला.
कुत्रा आणि माझ्यामध्ये जीवघेणी स्पर्धा लागली होती. माझ्या गाडीचा वेग खूप वाढला होता, कारण एकतर मला कुत्र्यांची भीती वाटते आणि त्यात हा माझ्या मागे लागला होता. शेवटी माझाच विजय झाला! त्या शर्यतीत मी पहिला आलो आणि तो बिचारा खूप मागे राहिल्यामुळे दुसरा आला.
पण आता मात्र मला भीती वाटू लागली आहे. जर पुन्हा तो कुत्रा पहिल्या नंबरवर आला तर काय करायचे? म्हणून सगळ्यांना सांगतो, कुत्र्यांपासून सावधान राहा!
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
































































