🛑 मत्स्यगंधा
मत्स्यगंधा माझ्या आयुष्यात आली. माझ्या बालपणात या मत्स्यगंधेची आणि माझी भेट झाली. मत्स्यगंधा म्हणजे कोण ? हा प्रश्न वाचकांना पडणार याचे मला भान आहे. तिचा आणि माझा संबंध होता याबद्दलही अनेकांना कुतूहल वाटल्याशिवाय राहणार नाही.
काल कितीतरी वर्षांनी मला ही मत्स्यगंधा पुन्हा एकदा भेटली. मला खूप आनंद झाला. सलग पाऊण तासापेक्षा जास्त काळ मी तिच्यासोबत होतो. हे वाचून तर तुमचा गैरसमज अधिकच वाढणार याबद्दल मला खात्रीच झाली आहे.
मला लहानपणापासून भजनांची खूप आवड. ही भजने करताना, भजने ऐकताना ही मत्स्यगंधा मला भेटली. ही अदृश्य मत्स्यगंधा मला पुढे दरवर्षी गणेश चतुर्थीला भेटू लागली. गेले काही वर्षे ती मला भेटली नव्हती. काल ती अनेक वर्षांनी पुन्हा भेटली तेव्हाचा आनंद मी शब्दांत व्यक्त करताना कमी पडेन.
आमचा नेहमीचा बुवा. हेमंत बुवा लाड याने आमची आणि तिची अनेक वर्षानंतर पुनःश्च भेट घडवून आणली. या अविस्मरणीय भेटीचे श्रेय पूर्णपणे ' हेमंत लाडबुवा ' यांनाच द्यायला हवे. त्यामुळे माझ्या तिच्यासोबतच्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या.
कोकण दर्शन गजराचे निर्माते कै. परशुराम पांचाळ यांनी माझ्या बालपणात सादर केलेल्या ' मत्स्यगंधा ' भारुडाबद्दल मी बोलतोय. परशुराम पांचाळबुवा माझे आवडते भजनीबुवा. त्यांना मी प्रत्यक्ष ऐकले आहे. त्यांचा ' कोकण दर्शन ' हा गजर माझा सर्वात लाडका गजर. डीएडला असताना ' कोकण दर्शन ' हा गजर मी एकदा किंवा दोनदा तरी परिपाठात सादर केल्याचे आठवते. त्यावेळी कॅसेट्स होत्या. टेपरेकॉर्डर होते. त्यांची ही कॅसेट मी कित्येकदा ऐकली असेन. त्यामध्ये मला ' मत्स्यगंधा ' सापडली. पांचाळबुवांनी रचलेले मत्स्यगंधा भारूड लोकं अजूनही शेवटपर्यंत ऐकतात. त्यांच्या आवाजात ताकद होती. त्यांच्या शब्दांना अर्थ होता. त्यांचा लय, सूर आणि ताल उल्लेखनीय होता. त्यातील कथा सांगण्याची त्यांची पद्धत पुढे पुढे ऐकत राहण्यासारखी असे. त्यामुळे त्यांना पुन्हा ऐकावे असे अजूनही वाटते. कंटाळा येत नाही. आळस तर अजिबातच येत नाही. उलट आळस कुठल्या कुठे पळवून लावण्याची किमया पांचाळबुवांच्या गायनात होती.
कोळ्याची कन्या मत्स्यगंधा आणि पराशर ऋषी यांच्याबद्दल त्यात अधिक माहिती सांगितली आहे. नव्या आणि जुन्या गीतांच्या चालींचा त्यात सुरेख संगम साधला आहे. म्हणून आपण पण पांचाळबुवांनी सादर केलेल्या रचनांच्या प्रेमात पडतो.
मला जात्याच गाण्यांची आवड आहे. त्यात असे पांचाळबुवांसारखे शास्त्रीय गायन करणारे बुवा असले तर माझ्यासारख्या भजनवेड्यांसाठी ती पर्वणीच असते. मी आणि माझा भाऊ दोघांनीही त्यावेळी अनेकदा या मत्स्यगंधा भारुडाचे पारायणच केले होते म्हणानात.
हेमंत बुवांनी हे ' मत्स्यगंधा ' भारूड म्हणून पुन्हा आमच्या दोघांच्या लहानपणीच्या आठवणी जागृत करुन आम्हांला जो आनंद दिला आहे त्याची गणना करता येणार नाही. अशी ही ' मत्स्यगंधा ' पुनःश्च मला भेटली होती. ती पुन्हा जेव्हा कधी भेटेल तेव्हा कदाचित एखादे वर्ष झालेले असेल.
©️ प्रवीण अशितोष कुबल
मुख्याध्यापक शिडवणे नं. १
