Friday, August 16, 2024

🛑 शंभर नंबरी शुद्ध सज्जन

🛑 शंभर नंबरी शुद्ध सज्जन

          जो स्वतः चांगलं वागतो आणि दुसऱ्यांशी चांगलं वागतो तो खरा सज्जन. सज्जन माणसाला अशा अनेक व्याख्या जोडता येतील. ज्याच्या मनात दुसऱ्यांबद्दल अपार प्रेम भरलेले असते तो स्वतःवरही तितकाच प्रेम करत असला पाहिजे. अशी सज्जन माणसं आपल्याला भेटतात तेव्हा ती पुन्हापुन्हा भेटत राहावीत असे वाटत राहते. 

         सज्जन बनणं हे सर्वस्वी आपल्याच हातात असतं. सज्जनपणाचं नाटक अजिबात करायचं नसतं. ते करु लागलात तर ते कळायला वेळ लागत नाही. कधीही सज्जनपणाचा आव आणू नये. सज्जनपणाचा अभिनय करणाऱ्या माणसांचे बुरखे फाडले जातात तेव्हा खऱ्या सज्जनांवर अविश्वास दाखवले जातात. म्हणून आपल्याला सज्जन बनायचे नसेल तर बनू नका, पण खोटे सज्जन अजिबात बनू नका. 

         टीव्ही मालिकांमधील अशी माणसं पाहिली की त्यांच्या वागण्याची आपल्यालाही सवय होईल की काय अशी भिती वाटते. एकाच घरातील दोन सख्खी भावंडे सज्जन आणि दुर्जन दाखवली जातात तेव्हा आश्चर्य वाटते. एकाच सुसंस्कारातून जाणारी काही मुले  कुविचार कशी करु शकतात ? याचे नवल वाटते. 

         माझ्या घरातील माणसे ' शंभर नंबरी शुद्ध सज्जन ' बनायला माझ्या बाबांचे संस्कार कामी आले आहेत. माझे बाबा खऱ्या अर्थाने शंभर नंबरी सोनं होते. ते सज्जन होते आणि शुद्ध आचरण करणारे होते. त्यांच्याकडे बघत बघत आम्हीही त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यासारखे बनणं खूपच कठीण गोष्ट आहे. त्यांच्या जीवनाचा अखंड प्रवास खूपच गुंतागुंतीचा होता. अनेक अवघड अडचणींनी कायमच भरलेला होता. कितीही संकटे आली तरी त्यावर पाय ठेवून पुढे जाणारे माझे बाबा पाहिले कि आमच्या जिद्दीची दोरी बळकट का झाली मूळ कारण समजते.

         बाबा देवाघरी जाण्यापूर्वी सुद्धा बाबांची चौकशी करत राहणारे लोक आजही बाबांच्या जाण्यामुळं हळहळताना दिसतात तेव्हा बाबांच्या मोठेपणाचा नित्यनियमित अभिमान वाटत राहतो. बाबा गेल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक शोकाकुल व्यक्तीकडे बघून बाबांच्या गोष्टी सांगताना मी त्यांच्या डोळ्यातले पाणी बघितले आहे. सज्जन बाबांच्या सज्जन स्नेही मंडळींना माझा मानाचा मुजरा. त्यांच्या जाण्याने उणीवेचा मोठा खोल खड्डा पडला आहे. तो भरुन काढण्याचा प्रयत्न आम्ही भावंडे नक्कीच करणार आहोत. 

©️ मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १

Thursday, August 8, 2024

🛑 हेमलो

🛑 हेमलो

         नाव वाचल्यानंतर आश्चर्यचकीत झाला असाल ना? हे नाव मराठीतील आहे. मालवणीत ' हेमंत ' नावाची माझ्या बाबांनी मारलेली प्रेमाची हाक आहे ती. 

         हेमंत म्हणजे आमच्या किर्लोस आंबवणेवाडी मधला खालच्या लाडवाडीतील हेमंत लाड. साधा, सरळ आणि शास्त्रीय भजन, गायनाची आवड जोपासणारा आजच्या काळातील तरुण बुवा. 

         त्याची आणि माझी ओळख खूप वर्षांपूर्वीची आहे. तो आमच्या कुटुंबाचा नेहमीच आदर करत आला आहे. माझ्या बाबांचे आणि त्याचे चांगलेच जमे. ते त्याला प्रेमाने काही गोष्टी ऐकवत. तो त्या मंत्रमुग्ध होऊन ऐकायचा. त्याचे भजन आम्हांला आवडते. 

         कै. परशुराम पांचाळबुवांचा तो फॅन आहे. राजापूरच्या संतोष शिर्सेकरबुवांचा तो पट्टशिष्य आहे. तो त्याच्या गायन आणि संवादिनी वादन कलेत पारंगत आहे. तो या कलांची आराधना करताना स्वतःचे भान हरपून जातो. त्याचे गायन लांब राहून ऐकलात तर कै. परशुराम पांचाळबुवाच गात आहेत असा भास होतो. 

         सुरुवातीच्या काळात तो शिकत असताना घाबरत असे. हे घाबरणे म्हणजे त्याचे लाजणे होते. त्याने आतापर्यंत अनेक संगीत बाऱ्या केल्या आहेत. त्याला साथ देणारे कोरस तरुण अतिशय मनापासून गाताना पाहून मला माझे बालपण आठवते. मी मला त्यांच्यात पाहतो. कारण मीसुद्धा हेमंत सारखाच भजनवेडाच आहे. त्याचं गायन माझ्या मनाचा ठाव घेतं. त्यामुळे माझा त्याच्याबद्दलचा आदर अधिकाधिक वाढतच जातो. 

         त्याचे वडिलही बुवा आहेत. त्यांचं गायनदेखील मला आवडते. नव्या दमाचा, नव्या युगाचा गायक म्हणून ' हेमंत लाडबुवा ' आमच्या पिढीचं नेतृत्व करतो तेव्हा माझी छाती आनंदाने फुलून येते. मला त्याचा सार्थ अभिमान वाटतो. मला माझ्या भजनमंडळींचा आदर वाटतो. आमच्याकडे त्यांनी केलेल्या भजनांच्या व्हिडीओज आहेत. आठवण आली कि आम्ही त्या बघत बसतो. 

         गणेश चतुर्थीला आमच्या हेमंतला खूप मागणी असते. तो शक्यतो कोणाला नाही म्हणत नाही. पण तो एकटा कोणाकोणाला पुरणार. तरीही तो कोणाला नाराज करत नाही. जमतील तेवढी भजने करत राहतो. जुन्या कलाकार मंडळींचा तो आदर करतो. नुकताच त्याने मला आमच्या जुन्या तमाशा मंडळाचा फोटो पाठवला. त्यात माझे बाबा आणि काका आहेत. त्यावेळचे धुरंधर कलाकार. अजूनही त्यातील काही कलाकार आपली कला जोपासत आहेत. काही आज हयात नाहीत. त्यांच्या आठवणी मात्र हेमंतच्या मनात हयात आहेत. त्याने त्यांचा तो दुर्मिळ फोटो पाठवला, त्यावेळी ' जुना सोना ' असे कॅप्शन लिहून पाठवले. खरंच तो फोटो पाहून माझ्याही अंगावर सरकन काटा उभा राहिला. असं २४ कॅरेटचे सोने आता मिळणे खूप कठीण आहे. 

         मला वाटते हेमंत लाड म्हणजे आजच्या युगातील भजनी बुवांच्या भाषेत बोलायचे तर शंभर नंबरी सोने आहे. त्यामळे ते जिथे जिथे जाईल तिथे तिथे चमकल्याशिवाय राहणार नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १

Tuesday, August 6, 2024

🛑 बाराव्याला बाबा आले

🛑 बाराव्याला बाबा आले

          बाबांचा बारावा दिवस. सकाळपासून माणसांची गर्दी व्हायला सुरु झाली होती. बाबांसाठी हाक मारायला येणाऱ्या हजारो माणसांना शोकाकुल होताना पाहून बाबांचा मोठेपणा अधिक ठळकपणे दिसू लागला होता. मी त्यांच्यासमोर काहीच नाही. ते नेहमीच म्हणत, " मी जे नखाने करीन, ते तुम्हाला कुऱ्हाडीने जमणार नाही. " बाबांचे हे वाक्य अगदी खरे आहे. त्यांनी केलेल्या गोष्टी मला करता येणार नाहीत. त्यांच्या सानिध्यात इतकी वर्षे राहूनसुद्धा मला त्यांच्या नखाचीही सर येणार नाही इतके ते मोठे होते. 

         दहाव्या दिवशी बाबांच्या पिंडाला काकस्पर्श झाला नाही म्हणून बाबा माझ्यावर नाराज असतील असे मला वाटणे साहजिकच होते. माझे प्रेम खरे असेल तर बाबा माझ्यावर नाराज होऊच शकत नाहीत असा भाबडा विश्वास मी नेहमीच बाळगत आलो आहे. 

         त्यांच्याशी माझे मित्रत्वाचे नाते होते. बाबा रागावले तरी त्यांचा तो राग तात्पुरता असे. माझ्या प्रेमाने ते पुनःश्च मेणासारखे विरघळून जात.  मी अगदी त्यांच्यासारखाच झेरॉक्स कॉपी आहे. माझाही राग असाच विरघळून जात असतो. त्यांच्याकडूनच वारसा मिळालाय. प्रेमाने राग जिंकता येतो. 

         दिवसभर बाराव्या दिवसाचे विविध धार्मिक विधी संपन्न होत असताना दुपारनंतर ' सुत '  घालण्याचा विधी सुरु झाला. हा विधी बघवत नाही. तो करत असताना मी डोळे बंद करुन बाबांची आराधना करत होतो. परंपरेने चालत आलेल्या या विविध प्रथा करताना त्या बाबांसाठी करतो आहोत याची जाणीव होती. त्यामुळे बाबांसाठी काहीही करण्याची तयारी असणारा मी निमूटपणे सर्वकाही करत राहत होतो.

         ज्येष्ठ व्यक्तींनी मार्गदर्शन करायला सुरुवात केली होती. माझे लक्ष त्यांच्या शब्दांकडे होते. ते शब्द बाबांचेच आहेत असे मला वाटत होते. मला आलेल्या सर्वांचे हृदय आभार मानावेसे वाटले. मी स्वतःहून उभा राहून बोलू लागलो. मला सर्वांचे आभार मानायचे होते. मी सर्वांच्या ऋणात राहण्याचे ठरवले असल्याचे सांगितले. घरच्यांनी गेले काही दिवस माझ्यासोबत जो प्रेमळ व्यवहार केला होता त्यामुळे मी भावनाप्रधान झालो होतो. माझ्या अश्रुंचा बांध फुटू लागला होता. मी रडताना मलाच मी आवडत नव्हतो. पण रडू काहीकेल्या थांबवता येत नव्हते. मी माझ्या चुका मान्य करुन टाकल्या होत्या. बाबा मला जाताना काहीही सांगून गेले नव्हते. बाबा गेल्याचे दुःख सर्वांनाच झाले होते, पण मला झालेले दुःख मला क्षणाक्षणाला बाबांची माफी मागत राहायला लावणारे होते. बाबा नेहमीच क्षमाशील होते. ते मला क्षमा करणार ही काळ्या दगडावरची रेघ. पण तरीही मनातील भिती डोके वर काढत होती. जाता जाता त्यांनी मला काहीतरी सांगावे असे मला वाटत होते, जे त्यांच्या अचानक जाण्याने राहून गेले होते. 

         त्यांनी आमच्या संगोपनात कोणतीही कसूर सोडली नसताना आम्ही त्यांच्या सेवेत काहीतरी दिरंगाई केली की काय ? अशा प्रश्नांनी माझा मीच व्याकुळ होत होतो. 

        रात्री भजन सुरु झाले. भैरवीचे आर्त सूर आणि टाळांचा आवाज टिपेला पोचत असतानाच आमचे बाबा तेजस्विनीच्या ( वहिणी ) अंगात संचारू लागले होते. ते बाबाच आहेत का याची खात्री करण्यासाठी माझ्या बालाकाकांनी नेहमीप्रमाणे तीन फुले ठेवून त्यातले एक उचलण्याची विनंती केली. काकांच्या मनातील चाफ्याचे फुल त्यांनी न ओळखता पिवळे झेंडूचे फुल त्यांनी निवडले. मी मात्र पिवळे फुलच मनात धरले होते. ते बाबाच आहेत याची मला अगदी खात्री झाली होती. 

         तरीही मी धुपारतीचे भांडे घेऊनच होतो. त्यांनी मला स्वतःहून हाक मारावी अशी माझी इच्छा होती. माझी इच्छा त्यांना कशी समजली तेच जाणो. त्यांनी काहीवेळातच पहिली मलाच हाक मारली. मी आणि सगळेच अवाक झाले. मी धावतच त्यांच्यापाशी गेलो. त्यांनी मला गोंजारले. मी त्यांच्यापाशी काही दिवस सतत बसून होतो. माझी अपेक्षा त्यांनी पूर्ण केली होती. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मी आणि माझा भाऊ पेलू शकतो हे त्यांना जिवंतपणीच माहिती होते. तरीही त्यांनी दिलेली ही धुरा मी समर्थपणे सांभाळण्यासाठी त्यांचा भक्कम आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असणार याबाबत मी निशंक झालो आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १










Sunday, August 4, 2024

🛑 दूर देशी गेले बाबा

🛑 दूर देशी गेले बाबा

         सलील कुलकर्णी यांच्या अल्बम मधील ' दूर देशी गेला बाबा ' हे गाणे मला खूप आवडत असे. बाबा सोबत असताना हे गाणं ऐकताना त्यातल्या शब्दांकडे कमी लक्ष जाई. सलीलच्या आवाजातील आर्तता मला नेहमीच आवडते. पण आता बाबा नसताना हे गाणं ऐकणं मला तरी कठीण जाईल. 

         लहानपणापासून ज्या बाबांचे बोट पकडून कायमच सगळीकडे जाणारा मी आता या बोटाला पारखा झालो आहे. बाबांचे बोट पकडण्यात एक वेगळ्या प्रकारची आश्वासकता होती. कितीही मोठा झालो तरी बऱ्याच गोष्टी बाबांना विचारल्याशिवाय मी केल्या नाहीत. त्यांचा आदेश शिरसावंद्य मानूनच पुढे जाणे सावधगिरीचे असे याचा मी अनेकदा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. 

         त्यांची आणि माझी सोबत कधीही न संपणारी असेल असे मला वाटले होते. बाबा गेले आणि माझ्यातून एक अदृश्य चैतन्यशक्ती वेगळी होत असल्याची थरथर जाणवते आहे. बाबा म्हणजे काय अदभूत रसायन असतं ना ? 

         आज आई आणि बाबा दोघेही नाहीत. त्यांच्यासोबतच्या अनेक उत्तम आठवणी माझ्याभोवती नुसत्या रुंजी घालत आहेत. त्यातल्या अनेक माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्या जपून ठेवणे माझे कर्तव्य आहे. माझे बाबा माझ्यासोबत सतत सोबत्यासारखे पाठीशी राहिलेले आहेत. त्यांच्या केवळ असण्याने माझी अवघड कामेसुद्धा चुटकीसरशी मार्गी लागत असत. आता मात्र मला त्यांची तीव्र उणीव भासत राहणार आहे. 

         त्यांच्यासाठी काही दिवसांपूर्वीच नवा बेड घेतला होता. तो बघून त्यांना किती आनंद झाला होता. त्यावर बसून त्यांचे टीव्ही पाहणे, मोबाईल बघणे, पेपर वाचणे अशी दैनंदिन कार्यें पार पडत. आता तो बेड सुना सुना बघवणार नाही. त्यांनी वापरलेल्या सर्व वस्तूंमध्ये मला ते दिसत राहतील. पहिल्यांदा मला त्याचा त्रास होईल, पण मग त्यांच्या आठवणीच्या कोषात मी रमून जाईनही. हे माझे आताचे दिवास्वप्न आहे. 

         काल बाबा गेल्यानंतरचा दहावा दिवस होता. आम्ही नदीशेजारी स्मशानभूमीत धार्मिक विधीसाठी गेलो होतो. एकही कावळा कुठेही दिसत नव्हता. पिंडाला कावळा स्पर्श करायला येईल अशी सर्वांची इच्छा होती. मी पिंड हातात घेऊन इकडे तिकडे फिरत बाबांना हाका मारत होतो. काव काव, बाबा या हो..... पिंडाला स्पर्श करा ना..... मला एका क्षणाला मोठ्याने हंबरडा फोडावा असे वाटले होते. पण मी स्वतःला सावरलं. माझे बाबा माझे नक्कीच ऐकणारे होते. त्यांनी काकरूपाने येऊन माझ्या हातातील पिंडाला स्पर्श करावा असे वाटत असले तरी मला मुळीच वाईट वाटलेले नाही. त्यांचे माझ्यावर अपार प्रेम होते. त्यांचे पुत्रप्रेम असेच अबाधित राहणार आहे याबद्दल शंका बाळगण्याचे कारणच उरत नाही. 

         कारण स्वतः बाबांनी मला सांगितले होते. ते असेच कधीतरी वाढी ठेवत होते. लहानगा मी त्यांच्या सोबतच असे. ते ' आ आ ' करत होते. एकही कावळा वाढीला स्पर्श करायला आला नव्हता. मी न राहवून बाबांना विचारले होते, " बाबा, आज कावळा का आला नाही? " तेव्हा बाबा म्हणाले होते, " अरे झिला, हे कावळे असेच असतात, कधी येतील, कधी येणार नाहीत, पण आपण आपल्या पूर्वजांना अजिबात विसरायचे नाही. " बाबा आमचे प्रॅक्टिकल होते. ते आधी करत,मगच सांगत. त्यामुळे त्यांच्या सर्व गोष्टी मला पटत. 

         कणकवलीतील आमच्या रूमवर बाहेरच्या कटड्यावर बाबांनी बिस्किटे ठेवताक्षणी कुठूनतरी कावळे येत आणि बिस्किटे वरच्यावर उचलत. बाबांना आणि आमच्या घरातील सर्वांनाच मग दैनंदिन सवयच लागली आहे. देवाचे पूजन झाले की आपण काहीही खाण्यापूर्वी कावळ्यांना बिस्किटे, फरसाण असे खाऊ घालण्यात येते. 

         काल नदीशेजारी एकही कावळा फिरकताना दिसला नाही. कदाचित हे सगळे कावळे कणकवलीला आमच्या खोलीच्या बाहेर बाबांची वाट बघत नसतील ना? किती दिवस खोली बंद आहे. आमचा खाऊ घालणारा कुठे गेला असेल ? 

         आता तेराव्या दिवशी कणकवलीला गेलो कि मी पहिल्यांदा बाबांच्या ' काकमित्रांसाठी ' साद घालीन आणि त्यांना बिस्किटे, खाऊ दिल्याशिवाय मला स्वतःला स्वस्थता लाभणार नाही. माझे दूर देशी गेलेले बाबा सुद्धा त्यांच्याबरोबर यावेत अशी मी माझ्या बाबांच्या पवित्र आत्म्याकडे साश्रू नयनांनी प्रार्थना करतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १



🛑 शिक्षक स्मृती ठेवुनी जाती

🛑 शिक्षक स्मृती ठेवुनी जाती

          बदली हवी असली तर ती झाली पाहिजे अशी प्रत्येकाची तीव्र इच्छा असते. कोकणात येणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला परत आपल्या जिल्ह्यात जायची इच्छा झाली तर नवल वाटायला नको. आमचे काही मित्र एकदम बदली न करता सामूहिक राजीनामे देऊन आलो तेव्हा असेच झाले होते. सिंधुदुर्गात नोकरी मिळाली म्हणून आम्हांला खूप आनंद झाला होता. एक नोकरी सोडताना डोळ्यात आसू होते आणि दुसरी लगेचच स्वीकारताना ओठात हसूही होते.

         खोत आणि कासार दोघेही कोकणातील सिंधुदुर्गात मिसळून गेले होते. दोघेही तंत्रस्नेही. उच्चविद्याविभुषित. ज्या शाळेत जातील तिथे वेगळा ठसा उमटवणारे नवोपक्रमशील शिक्षक. 

         रस्सा मंडळातील काही सदस्य आधीच बदलीने निघून गेल्यानंतर आता तर रस्सा संपून गेल्याची जाणीव होऊ लागली आहे. रस्याची चव तेवढी जिभेवर रेंगाळते आहे. असे गेट टुगेदर करताना त्यांनी केलेली नियोजने नेहमीच भाव खाऊन गेलेली. आपुलकीचे शब्द आणि जिव्हाळ्याचा रस्सा थंड होत असताना तो पुनरुज्जीवीत करण्याची जबाबदारी नवनियुक्त शिक्षकांनी पेलावी अशी आम्ही जुने शिक्षक अपेक्षा बाळगून आहोत. नवनियुक्त शिक्षक नव्या दमाचे आहेत. ते जुन्यांपेक्षा अधिक तंत्रस्नेही असतील तर त्यांच्याकडूनही खूप शिकण्याची आमची तयारी आहे. 

         अनिल खोत आणि प्रवीण कासार मला येथेच भेटले. त्यांच्याकडून आम्ही सगळेच शिक्षक खूप काही शिकलो आहोत. अनिल खोत म्हणजे जणू केंद्राचे खोतच. त्यांनी एखादी गोष्ट सुचवली त्यावेळी ती आम्ही सर्वांनी उचलून धरली आहे. त्यांचं बोलणं नेहमीच ऐकत राहावं असं. बोलण्यात विनोदी शैली आणि विषयाचे मुद्देसूद विवेचनसुद्धा. त्यांनी अनेकदा सूत्रसंचालन केलेले मी पाहिले आहे. त्यांचे वक्तृत्व ओघवते असते म्हणून ते सर्वांना आवडते. ते उभे राहतील तिथे त्या जागेचे सोने करतील. सोने म्हणजे ते सोने नव्हे. ते नेहमीच सभा जिंकत. यापुढेही त्यांनी असेच करावे. संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांना अधिक जवळून पाहता आले. त्यांनी केलेली शैक्षणिक साहित्याची पखरण वर्गभर वर्षत राहणारी अशीच. ते पुढे अजून अधिक शिकत आहेत म्हणून मला त्यांचा अधिक अभिमान वाटतो. 

         कासार ह्यांच्या नावातच प्रवीण आहे. त्यांचं हसणं लाजबाब. त्यांचं सहकार्य लाखमोलाचं असतं. त्यांनी कमी कालावधीत सजवलेला वर्ग आमच्याशी शिक्षण परिषदेच्या वेळी बोलला आहे. ज्यांच्या वर्गाच्या भिंती बोलतात, त्यांचा वर्गही तसाच बोलू लागतो. त्यांनी अगदी तसेच केले आहे. पुढे हजर होणाऱ्या शिक्षकांना असे वर्ग अधिक पुढे नेण्यासाठी खूप सोपे जाणार हे नक्कीचे आहे. मला एकदा एका लिंकबद्दल काही अडचणी आल्या होत्या. मला काहीकेल्या जमत नव्हते. मग मला कासारांच्या प्रवीणतेची आठवण आली. मी त्यांना फोन करुन समस्या सांगितली. त्यांनी पाचच मिनिटात माझे काम करुन त्याचा स्क्रिनशॉट सुद्धा पाठविला. क्रीडास्पर्धेच्या वेळी या सर्वांनीच मला उदंड सहकार्य केलेले आहे. शेर्पे केंद्रातील सर्वच शिक्षकांकडून आपल्याला हवा असतो त्यापेक्षा जास्त आदर मिळत असतो हे त्यांचे मोठेपणच आहे. 

         असे हरहुन्नरी शिक्षक बदली होऊन जातात तेव्हा खूप हुरहूर लागते. चणचण भासते. त्यांची उणीव भरुन काढणारे शिक्षक नियुक्त होतीलच. तरीही त्यांच्यासोबत घालविलेल्या आठवणी आम्हां सर्वांसाठी अनमोल ठेवा असणार आहेत. 

         आमच्या शाळेतील सुजाता कुडतरकर मॅडम यांचीही बदली झाली आहे. गेली ५ वर्षे आम्ही शिक्षक जे टीमवर्क करत होतो त्याला तोड नाही. प्रत्येकाचे काम आणि कामाची पद्धत वेगळी असते. त्यांच्या कामाचा उरक चांगला होता. मी नसताना त्यांनी माझ्यापेक्षा शिस्तबद्ध शाळा ठेवली आहे. वृक्षारोपण कार्यक्रमात मी नसताना त्यांनी मारलेली बाजी मी लोकांच्या तोंडून ऐकली आहे. मला त्यावेळी जो आनंद झाला तो शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. 

         बदली होऊन गेलात,  तुम्हांला चांगलं वाटावं म्हणून मी हे लिहित नसून मला मनापासून लिहावेसे वाटले म्हणूनच लिहित आहे. तुमचा सर्वांचा आदर करत शब्दप्रपंच थांबवतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शिडवणे नं. १

Saturday, August 3, 2024

🛑 ढवणसरांची अकाली एक्झिट

🛑 ढवणसरांची अकाली एक्झिट

        बदली ही शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कधी सुखाची तर कधी दुःखाची गोष्ट बनलेली असू शकते. मला याचा अनेकदा दुःखदायक अनुभव आला आहे. त्यामुळे मी आता बदलीला सकारात्मक पद्धतीने बघू लागलो आहे. 

         काही शिक्षकांच्या बाबतीत खूपच सुखदायक बदल्या होताना मी पाहिल्या आहेत. मी मात्र नेहमीच अडचणींचा सामना करतच बदल्यांना सामोरा जात आलोय. त्यामुळे मला आता त्यांची सवय झाली आहे. पण सर्वांनाच त्यांची सवय होईल याची अजिबात खात्री देता येणे कठीण आहे. प्रत्येकाचा दृष्टिकोन त्याला कारणीभूत असू शकतो. तरीही मनात घडणाऱ्या मानसिक तणावांच्या लहरी थांबवणे हे ज्याला त्याला कसे शक्य होईल हे त्याच्यावर होणाऱ्या प्रसंगानुरूप बदलत राहू शकते. 

         मी कणकवलीत राहणारा असून वैभववाडीतील मांगवली नं.१ शाळेत सात वर्षे अतिशय सुखदायक नोकरी केली आहे. १२० पेक्षा जास्त किलोमीटरचा दैनंदिन प्रवास करुनही शारीरिक, मानसिक तणावावर सात वर्षे राज्य केलं. ऑनलाईन बदली झाली म्हणून आता ६० किलोमीटर अंतरावरची शाळा मला जवळ वाटू लागली आहे. हल्लीच्या मे मधील समुपदेशनात मी बदली झाली नाही म्हणून हसत हसत आलो आहे. हसत यासाठी कारण मला एकही शाळा मिळाली नाही म्हणून मी नकार देऊन पूर्वीचीच शाळा नवीन मिळाल्यासारखा चेहरा करुन दालनाच्या बाहेर पडलो होतो. तुम्ही एकदा नोकरी स्वीकारली की हे असे घडणार याचा कायमच स्वीकार करत राहण्याशिवाय पर्याय नसतो हे मान्यच करायला हवे. असो. 

         लक्ष्मण ढवण सरांची निधनाची बातमी समजली आणि मला त्यांच्याविषयी लिहावेसे वाटले म्हणून मी मध्यरात्री लिहावयास बसलो. मला त्यांच्याविषयी अतिशय आदर आहे. त्यांची आणि माझी वैभववाडी तालुक्यात भेट झाली. माझ्या आणि त्यांच्या मैत्रीला एका तपाचा काळ लोटून गेला आहे. या काळानंतर एक असा काळ त्यांच्यावर येईल असे कधीच वाटले नव्हते. चांगला धटधाकट वाटणारा माणूस अचानक ब्रेन हॅमरेज सारख्या आकस्मिक आजाराने आपल्यातून कायमचा निघून जातो यासारखी वेदनादायक गोष्ट दुसरी असूच शकत नाही. 

         सर्वच माणसांना तणाव असतात. पण कधीतरी अनेक तणावांची बेरीज होऊन वेगळेच विपरीत घडलेले पाहिले की आपणही आता सावधान झाले पाहिजे ही घंटा आपल्या सर्वांच्याच मनात कायम वाजत राहणार आहे. माणूस अतिविचार करु लागला की त्याचे व्यवस्थापन करणे त्याला जेव्हा अजिबात शक्य होत नाही तेव्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता असते. 

         ढवण सर म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. शिक्षक म्हणून त्यांच्यात अनेक उत्तम गुणांचा संगम झालेला होता. शाळेत त्यांचे काम पहात राहण्यासारखे असे. शिक्षक समितीचा खंदा कार्यकर्ता. वैभववाडी तालुक्याची शिक्षक समिती सचिव पदाची धुरा सांभाळत असताना त्यांची इतिवृत्ते मी बऱ्याचदा ऐकली आहेत. ते अभ्यासू होते. त्यांचे बोलणे ओघवते असे. त्यांची संघटनेवर अपार निष्ठा होती. त्यांच्या जाण्याने एक निष्ठावंत कार्यकर्ता आपल्यातून कायमचा हरपला आहे. 

         ते सांगुळवाडी शाळेत असताना कणकवलीत राहत असत. त्यांनी कोकिसरे गावात सुंदर घर बांधले आहे. त्यांच्या घरी मी एकदा गेलो होतो. त्यांच्या स्वतःच्या घराबद्दल खूप सुंदर संकल्पना होत्या. तरीही मुलाच्या शिक्षणासाठी त्यांना कणकवलीत घर घ्यावसं वाटलं. त्यांनी फ्लॅट घेतला. मुलाचं शिक्षण सुरु होतं. त्यांचं वैभववाडी सांगुळवाडी ते कणकवली रोजचं अपडाऊन मी कित्येकदा पाहिलं आहे. मीही त्यांना महिन्यातून सात आठ वेळा तरी सतत सहा सात वर्षे कणकवली ते वैभववाडी किंवा वैभववाडी ते कणकवली येता जाता कधीना कधी टू व्हीलरने नेले आणले आहे. एकटं जाण्यापेक्षा सोबतीला ढवण सरांसारखे सोबती असताना प्रवास कमी वाटत असे. बोलता बोलता कणकवली कधीच येत असे. प्रवास सुखकर होऊन जाई. गजाली मारत असताना त्यांच्यातील आतला आवाज मला खूप काही देऊन जाई. ते खरंच खूप चांगले मित्र आणि मार्गदर्शक होते. वैभववाडीत काही सलग वर्षे त्यांनी पगाराचा खोका सांभाळला होता. आकडेवारीमध्ये त्यांचे ज्ञान आम्हांला लाजवणारे होते. 

        २०१९ मध्ये ऑनलाईन बदल्या झाल्या. मी कणकवली तालुक्यात आलो. त्यांनीही कणकवली तालुक्यातील भरणी नं. १ शाळा निवडली. आता ते कणकवलीत कमी आणि कोकिसरे गावी जास्त जाऊ लागले होते. कितीही काहीही झाले तरी प्रत्येकाला आपला गाव प्रिय असतोच. त्यांचे पुन्हा कणकवली वैभववाडी अपडाऊन सुरु झाले. त्यांना ते त्रासदायक होऊ लागले म्हणून त्यांनी शेर्पे केंद्रशाळेत कामगिरी मागून घेतली. ती आमची केंद्रशाळा असल्यामुळे पुन्हा शिक्षण परिषदेच्या निमित्ताने त्यांच्या भेटी घडत असत. कामगिरी शेवटी कामगिरीच असते. ती कधीच कायमची नसते. त्यामुळे त्यांना पुन्हा भरणी शाळेत हजर व्हावे लागले. मे मधील समुपदेशनात त्यांना वैभववाडीतील शिराळे शाळा प्राप्त झाली होती. पण बदल्या झाल्याच नाहीत. कदाचित त्यामुळेही त्यांचा तणाव वाढला असेल नक्की सांगता येणे कठीण आहे. पण मी त्यांच्या जागी असतो तर मलाही नक्कीच तणाव आला असता. आता मात्र त्यांनी पदवीधर पदावरून पदावनत होण्याचा निर्णय घेतला होता असे समजले. शेवटी माणसं आपला तणाव कमी होण्यासाठीच असं करत असावीत असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांना आता त्यांच्या घरापासून जवळची शाळा मिळत होती असेही ऐकले. त्या शाळेत ते हजर होण्यासाठी जाण्याआधीच जर त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होऊन त्यातच त्यांची वणवण कायमची संपणार असेल तर देव खरंच आहे का हा मला प्रश्न पडतो. सर्वांना आवडणारं व्यक्तिमत्व देवालाही आवडतं आणि तो त्यांना आकस्मिक घेऊनही जातो तेव्हा माझ्यासारख्या अनेकांच्या मनाला खूप खोलवर वेदना होतात. 

         ढवणसर आता मला कधीही भेटणार नाहीत याचं अपार दुःख आहेच. कदाचित त्यांनाही माहित नसेल की त्यांना अचानक असे काय झाले ते. मृत्यूदेवतेनं इतकं कठोर वागायला नको होतं. माझ्या बाबांना, आईला आणि पत्नीलाही तिनं असंच अकाली नेलं आहे. नियती, प्राक्तन  आणि जे जे लिहिले भाळी वगैरे ऐकून ऐकून कानांचे पडदे फाटले आहेत. 

         आदरणीय कै. ढवण सरांच्या पवित्र मृतात्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल





💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...