Tuesday, July 30, 2024

🛑 बाबा आमचे शिल्पकार

🛑 बाबा आमचे शिल्पकार

        आमच्या बाबांना अनेक गोष्टींचे ज्ञान होते. ते अंतर्ज्ञानी होते. पुढे घडणाऱ्या घटना त्यांना आधीच समजत. त्यांनी आम्हांला एखादी गोष्ट करु नकोस म्हटले आणि आम्ही ती केली तर ती योग्य होणार नाही याचा मलातरी अनेकदा अनुभव आलेला आहे. 

         एखादी गोष्ट करायला सांगितली तर ती केलीच पाहिजे असा त्यांचा दंडक असे. ती परिपूर्ण होऊन सुद्धा जाई. त्यामुळे बऱ्याचदा मी त्यांच्या नकळत अनेक गोष्टी करत गेलो आहे. यशस्वी झाल्यानंतर मी त्यांना सांगत गेलो आहे. त्यावेळी त्यांना आनंद झालेला दिसे, पण मी त्यांना ती गोष्ट पश्चात सांगितली याचे दुःखही होई. 

         ते आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या यशाचे शिल्पकार आहेत. आमचे सुंदर आणि यशस्वी आयुष्य व्हावे यासाठी त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्या आहेत. ते अष्टपैलू होते. ते अनेक कौशल्ये जाणत असत. 

         ते उत्तम केशकर्तनकार होते. त्यांनी कात्रीने कापलेले केस नुसते पाहत राहावेत असे असत. केस मिळविण्याची त्यांची पद्धत अप्रतिम होती. त्यामुळे कणकवलीतील अनेक श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब सर्व पातळीचे लोक त्यांचे कायमचे कस्टमर होते. त्यांचे कायमचे कस्टमर आमच्याकडे खूप क्वचित बसत. बाबांचा हात लागला नाही तर त्यांना केस कापल्यासारखे वाटत नसे. म्हणून मीदेखील त्यांचे कस्टमर करण्याचे धाडस करत नसे. बाबांनी अनेकांना आपल्या दुकानात सलून काम शिकवले आहे. मी त्यांचाच शिष्य. सुरुवातीला मला गालाला साबण लावण्याचे काम असे. हळूहळू बाबांची कला माझ्या हातात रूळली. शाळा, अभ्यास, दुकान एवढीच आमची दैनंदिनी असे. अनेक विनंत्या केल्यानंतर आम्हांला कधीतरी खेळायला किंवा सायकल चालवायला पाठवले तर. नाहीतर आम्ही नेहमी बाबांच्या आदेशांचे बांधलेले. 

         टेलरिंग हा त्यांच्या आवडीचा छंद होता. तोही त्यांनी व्यवसाय बनवला. आमच्या दुकानात एक शिलाई मशीन असे. ती खूप जुनी झाली होती. तरीही बाबांनी तिला दुरुस्त करुन करुन वापरले. तिच्यावर त्यांनी जिवंत व्यक्तीवर प्रेम करावे तसे प्रेम केले. बाबा ब्लाऊज, झबली, हाफ पॅन्ट, सदरे, लेंगे, फ्रॉक छान मापात शिवत असत. नाडीची चड्डी स्पेशालिस्ट म्हणून ते प्रसिद्ध होते. अजूनही बाबांचे नाडी चड्डीचे कस्टमर घरी येत. बाबा घरच्या घरी चड्डया शिवून देत किंवा त्यांच्या घरपोच करत. त्यांचे आवडीचे काम असल्याने मी त्यांना बोलत नसे. 

         बाबा कधीही स्वतःसाठी खर्च करत नसत. ते नेहमी कुटुंबासाठी खर्च करत राहीले. खिश्यातील पैसा संपल्यावर त्यांना आनंद होई. मी किंवा भावाने दिलेले पैसे ते परोपकारासाठी खर्च करत. पैसे संपेपर्यंत ते खर्च करीत राहत. 

         बाबा उत्तम मूर्तिकार होते. त्या काळात त्यांनी कणकवली, आंब्रड, गोठणे आणि किर्लोस अशा चार मूर्तिशाळा चालवल्या. त्यांचे हातीकाम बघतच राहावे. आता अनेक मूर्तिकार साच्यांचा आधार घेतात. आमची गणपतीची शाळा म्हणजे त्यांचा अभिमान होता. गणपतींचे डोळे उघडणे म्हणजे अतिशय अवघड काम असे. रात्र रात्र जागरणे करुन बाबा ते काम करीत. दोन्ही भुवया सारख्याच कशा येतात हा मला प्रश्न पडे. त्यांचे हात आणि ब्रश भराभर चालत. 

         ते कविमनाचे होते. चांगले वाचक होते. त्यांनी अनेक पुस्तके त्या काळात वाचून फडशा पाडला होता. त्यामुळे त्यांच्या मुखातून नेहमीच सरस्वती नांदत असे. फक्त जुनी सातवी शिकलेले माझे बाबा जेव्हा बोलत तेव्हा त्यांच्या गोष्टी आम्ही भान हरपून ऐकत असू. 

         आई आजारी असताना तिची सेवा करत असताना बाबांनी आपले आत्मचरित्र लिहायला घेतले. आई गेल्यानंतर बाबांची लेखणी थांबली. सलून मधील त्यांच्या गजाली ऐकायला कणकवली कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे व कणकवली नं. ३ चे उच्चश्रेणी मुख्याध्यापक मारुती पालवगुरुजी मुद्दाम येऊन दोन दोन तास सलग बसत असत. 

         असे आमचे बाबा ज्यांच्याबद्दल मी कधीही लिहायला घेतले की त्यांच्या अनुभवांच्या शाळेतील शिल्पे माझ्यासमोर अशीच नाचत राहतात. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १



Sunday, July 28, 2024

🛑 झिला, माका सोड

🛑 झिला, माका सोड 

         बाबांची तब्येत अचानक बिघडली. बिपी वाढण्याचे निमित्त झाले. वाढत असलेला बिपी आणि त्यांचे पूर्वीचे आजार थांबायचे नाव घेईनात. 

         अगदी काल परवा पर्यंत चांगले चालते फिरते बाबा विविध आजारांनी त्रस्त झाले होते. १० ते १२ दिवसांच्या कालावधीत ते कोमात गेले. 

         हात खांद्यात दुखणे, संडासातून रक्त पडणे, हर्निया हे त्यांचे खूप जुने आजार वयोमानानुसार पुन्हा पुन्हा उद्भवत होते. या आजारांची त्यांनी स्वतः कधीच पर्वा केली नव्हती. त्यांचा त्यांनी नेहमीच हसतमुखाने प्रतिकार केला होता. अचानक बिपी कसा वाढला हे अजूनही आमच्यासाठी असलेलं गूढच आहे. 

         आम्ही बाबांना नेहमीच खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ते आमच्यावर लहान मुलासारखे प्रेम करीत. बारीकसारीक गोष्टी आम्ही लहान मुले असल्यासारखी समजावून सांगत. आम्ही त्यांच्यासाठी नेहमीच लहान होतो आणि असणार. त्यांच्याइतकं मोठं होणं कधीच शक्य नाही. त्यांनी हे जग सोडून जाणं आमच्यासाठी अपार दुःखाच्या नावेत सतत हेलकावे खात राहण्यासारखं आहे. 

         त्यांनी आम्हाला अनेकदा दुःखाचा वारा लागू दिलेला नाही. संकटात समर्थपणे पाठीशी ठाम उभे राहिले. स्वतः कधीही रडले नाहीत आणि अनेकदा आमचं रडणंही थांबवलं आहे. 

         गेले १० ते १२ दिवस मी सतत त्यांच्यासोबत होतो. त्यांची जितकी सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करत होतो. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना त्यांनी जणू असहकार पुकारला होता. त्यांना आपल्या शरीराला अनेकविध चाचण्या करुन घेतानाही अतिशय वेदना होत होत्या. जे त्यांनी आपल्या शरीराबरोबर कधीही करुन घेतले नव्हते तेच त्यांना करावे लागत होते. आम्हांलाही त्यांना होणाऱ्या यातना सहन होत नव्हत्या. एकदा डॉक्टरांच्या उपचारांच्या कचाट्यात सापडलो की ते सांगतील तसे करत बसण्याशिवाय पर्याय उरत नाही. आमच्या बाबांच्या बाबतीत तसेच घडले. 

         वेगवेगळ्या तीन डॉक्टरांच्या सहा दिवसांच्या उपचार मालिकेनंतर आता प्रेमाच्या सेवेचा उपचार करण्याचे सर्वानुमते ठरले. कोमासदृश्य परिस्थितीत असलेले माझे बाबा अजिबात हालचाल करु शकत नसताना आम्ही घरी आणण्याचा योग्य निर्णय घेतला होता. 

         घरी आणताना रुग्णवाहिकेत बाबांनी डोळे उघडले. अर्थात त्यांना घरीच जायचे होते म्हणून त्यांनी डोळे उघडले असावेत. घरी जाईपर्यंत मी त्यांच्याशी बोलतच होतो. वाटेतील सर्व देवदेवता त्यांना आठवून देण्याचा माझा प्रयत्न मलाच केविलवाणा वाटत होता. माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले होते. 

         अखेर आम्ही बाबांना घेऊन घरी ( घर मठी ) आलो होतो. त्यांच्या स्वतःच्या रूममध्ये त्यांना झोपवले. सर्वांनी त्यांना हाका मारायला सुरुवात केली. पाण्याचे दोन चमचे जिभेवर पडताच बाबांनी पुन्हा डोळे मिटले. श्वास सुरु, हातापायांची गती मंद झालेली, डायपर बदलताना तो स्वच्छ अशी परिस्थिती होती. नाकात घातलेल्या नळीवाटे पेज, पाणी आणि शहाळ्याचे पाणी असेच भरवणे सुरु होते. 

         नेहमीप्रमाणे सकाळ झाली होती. बाबा निश्चलच होते. नातेवाईक, मित्र, गावकरी येऊन येऊन विचारपूस करुन जात होते. नळीत पेज भरवायला घेतली. पेज पोटात जात असताना ती पुन्हा मागे येत असलेली पाहून नाकातील नळी सुद्धा काढून टाकावी लागली. 

         आता बाबा नाकातून श्वास घेतील असे मला वाटले. पण नळी काढली तरी नाकातून श्वास घेणे सुरु नव्हते. बाबा तोंडाने जलद गतीने श्वास घेत होते. अचानक त्याचीही गती मंदावली. त्यांच्या मुखातून कधी काळा तर कधी तपकीरी रंगाचा फेस यायला लागला होता. मी त्यांच्या उशाशीच बसून होतो. रात्री १० वाजल्यानंतर त्यांनी आपली जीभ वळवली. मान दोन्ही दिशांना हलवली. माझ्या काकांनी मला बाबांचे डोके मांडीवर घ्यायला सांगितले. मी डोके मांडीवर घेऊन बाबांना दोन चमचे पाणी भरवताच बाबांनी माझ्या मांडीवरच आपला देह कायमचा ठेवला. 

         डॉक्टरांकडे असताना त्यांना ३५ पेक्षा जास्त सलाईन लावावी लागली. त्यांना ती सहन होईनात म्हणून ते हलू लागले, मोठ्याने हलवू लागले. त्यामुळे त्यांचे हात पाय बांधून ठेवण्याचा पर्याय डॉक्टरांनी निवडला. आम्ही उघड्या डोळ्यांनी बाबांचे होणारे हाल निमूटपणे पाहत होतो. 

         बाबा मला नुसते विनंती करत होते. " झिला, माका सोड, झिला,  माका सोड " मी त्यांना सोडू शकलो नाही. मला त्यांना बरे झालेले बघायचे होते. त्यांना सोडत नव्हतो म्हणून त्यावेळी त्यांना माझा खूप राग आलेला होता. बाबा डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्यामुळे मी त्यांना सोडले नाही. पण घरी आणल्यानंतर ते चारच दिवसात आम्हाला कायमचे सोडून गेले. त्यांचे आम्हा सगळ्यांवर निरतिशय प्रेम होते. त्यांची जगण्याची तीव्र इच्छा होती. सगळी मुले, माणसे प्रत्यक्ष येऊन गेल्यानंतरच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला आम्हाला पोरके करुन. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १



Monday, July 1, 2024

🛑 तुझी आभाळाइतकी माया

 🛑 तुझी आभाळाइतकी माया

     ममतेची छाया असणाऱ्या माझ्या आईचा आज स्मृतिदिन. ती गेली आणि आम्ही विनाआईचे झालो. आईची माया आईच देऊ शकते. माझी आई अगदी तशीच होती. मायेची निस्सीम मूर्ती आमची आई. जणू श्यामची आईच. मी श्याम नसेन , पण माझी आई श्यामची आईच होती. तिच्यात आणि श्यामच्या आईमध्ये मी बरंच साम्य बघितलं आहे. 

    माझ्या शाळेतील मुलांसाठी मी जो ब्लॉग लिहितो , त्याचं नाव मी ‘ या लाडक्या मुलांनो , तुम्ही मला आधार ’असंच ठेवलं आहे.आमची आई तशीच होती. ती आमचे खूप लाड करी. कारण आम्ही तिचे आधार होतो असे तिला सतत वाटत राही. ‘ या लाडक्या मुलांनो ’ या गाण्यात कवी सानेगुरुजी म्हणतात , “ आईस देव माना , वंदा गुरुजनांना ” हे अगदी खरेच आहे. आई म्हणजे देवच आहे. ती आता नाही म्हणून तिच्या फोटोचे पूजन करण्यात येते. त्याहीपेक्षा जास्त ती आपल्या कायमच हृदयात आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 

    ज्यांना आई आहे ते भाग्यवान आहेत. ज्यांना आई नाही त्यांना ज्यावेळी आईचं निष्पाप प्रेम मिळत नाही तेव्हा ‘ आई ’ किती थोर असते हे समजते. आई आपल्या बाळांना सर्वानाच नेहमीच हवीहवीशी वाटत असते. तिच्या पदरात जी ऊब असते , ती हल्लीच्या ओढणीमध्ये आहे असे वाटत नाही. तिच्या पदराला धरुन राहण्यात मुलांना खूप मोठा आधार वाटत असतो. आईचं प्रेम तिच्या पदरात लपलेलं असतं. म्हणूनच जेव्हा बाबा आपल्याला मारु लागतात , आपण रडत रडत आईच्या दिशेने धावतो , तेव्हा आई आपल्याला पदरात घेते. पदरातील प्रेमात बाबांच्या रागाचा डोंगर कोसळवून टाकण्याचे सामर्थ्य असते. बाबाही मारायचे थांबतात. 

    लहान तान्ह्या बाळांना ‘ आईच्याच जुन्या साड्यां ’ मध्ये गुंडाळून ठेवलेलं मी अनेकदा बघितलं आहे. आम्हीसुद्धा असेच कधीतरी आमच्या आईच्या मायेने मंतरलेल्या साडीच्या फडक्यात गुंडाळलेले असताना छान गाढ झोपी गेलेले असू. त्यासाठी आईचीच साडी का लागते ? कारण त्यात आईची माया ओतप्रोत भरलेली असते. आई ही आईच असते , तुमची आमची सर्वांची सेम असते. 

    माझी आई जेवण चवदार बनवी. तिने बनवलेल्या चपात्या व उसळ दुसऱ्या दिवशी सकाळी तर अधिकच गोड लागत असत. तिच्या जेवणाची चव अजूनही विसरायला होत नाही. ती सर्व प्रकारचे पदार्थ बनवी. ते सर्व पदार्थ का गोड आणि चवदार असत ? कारण त्यात प्रेम ओतलेले असे. आता माझी पत्नी ईश्वरी सुद्धा आपल्या मुलींसाठी अतिशय चवदार पदार्थ बनवत असते. त्यात ती असेच प्रेम ओतत असते. तिच्या हाताची चव माझ्या आईच्या हातासारखीच आहे. कारण ती माझ्या मुलींची आई आहे. 

    आमच्या आईने कधी टिकली लावली नाही. ती गंधक लावत असे. सकाळी लावलेले गंधक दिवसभर अगदी ठसठशीत दिसे. केस नीट विंचरलेले असत. तिची तयारी आमच्या आधीच होत असे. देवाला दिवा लावताना तिला पाहायला हवे. ती ईश्वराकडे निस्वार्थी अंतःकरणाने काहीतरी मागत असे. तिच्या मागण्या देवाने ऐकल्या असतील का ? आज मला ते सांगता येणार नाही. तिची त्यावेळची प्रसन्न मुद्रा मला सतत तशीच असावी असे वाटत राही. एकत्र कुटुंबासाठी तिचे आपलं समर्पण दिले आहे. स्वतःसाठी काहीही न करता कायमच झिजत राहिली ती सर्वांसाठी. तिच्या मनातील भावना तिने कधी मोकळ्या केल्या असतील तर आम्ही तेव्हा तिथे नव्हतोच. ती बाबांना सर्व सांगे. बाबांवर तिचे जीवापाड प्रेम होते. बाबा आणि आई दोन्ही उभयतां एकमेकांसाठीच बनले असावेत. एकमेकांशिवाय कधीही राहू शकत नसत ही दोघं. त्यात आम्ही पाच भावंडं होतो. आमचे सर्व करता करता तिचं आयुष्यच संपून गेलं. तिला आम्ही सगळे कर्तृत्ववान झालेले पाहायचे होते. ती आज आमच्या कर्तृत्वाला पाहायला जिवंत असती तर किती खुश असती ? 

    आमचे बाबा मात्र आम्हांला आईला आठवू देत नाहीत. ती गेली तेव्हापासून बाबांनी आम्हांला कधीही आईची उणीव भासू दिलेली नाही. बाबा मात्र आपण आपल्या पत्नीसाठी खूप काही करायचे राहून गेले असे सांगत आपली खंत व्यक्त करत असतात. बाबांची आई म्हणजे आमची आजी सुद्धा खूप प्रेमळ होती. तिच्या संस्कारात वाढलेले बाबा आमचं एकत्र कुटुंब मनानेही सदैव एकत्र राहावं यासाठी झटत असतात. 

    आज आईचा आत्मा कुठे असेल तेथे माझ्या या शाब्दिक भावना पोहोचतील अशी आशा करतो. ती आमच्यावर कधीच नाराज नसणार. तिचा वरदहस्त नेहमीच आपल्या पिल्लांवर राहो , तिच्या प्रेमपंखांची ऊब आम्हांला सदैव जाणवत राहो अशी तिच्या अदृश्य अस्तित्वाकडे मागणी करतो. प्रिय आई , तुला भावपूर्ण आदरांजली. 

©️ तुझा मुलगा : प्रवीण अशितोष कुबल ( मुख्याध्यापक , शिडवणे नं. 1 )


🎈स संदीपचा , क कदमांच्या , क कवितेचा

 🎈स संदीपचा , क कदमांच्या , क कवितेचा 


संदीप कदम हे एक गुणी आणि आदर्श शिक्षक आहेत. त्यांचा आणि माझा परिचय देवगड तालुक्यातला. अनेकदा आम्ही प्रशिक्षणे , स्पर्धा आणि एकाच तालुक्यात असल्यामुळे एकत्र आलो आहोत. कणकवली तालुक्यात माझ्या कणकवलीतील घरापासून तीन ते चार किलोमीटरवर त्यांचे जानवली येथे घर आहे. मला त्यांच्या घरी जाण्याचा एकदाही योग आलेला नाही. तरीही संदीप कदम सरांच्याकडे बघून मीही त्यांचे काही गुण घेतले असावेत. 

‘ एक घास चिऊचा ’ हा त्यांचा सुप्रसिद्ध शालेय उपक्रम मलाच काय कोणालाही भुरळ पाडू शकतो. शाळेत जाऊन प्रामाणिकपणे फक्त शिकवावे असे म्हणणाऱ्या शिक्षकांच्या व्याख्येला त्यांच्यासारखेच शिक्षक बदलवू शकतात. त्यांनी शाळेच्या भिंतींच्या बाहेर जाऊन शिकवले आहे. शिक्षण हे कधी चार भिंतींच्या आत घडत नसते हे त्यांनी प्रात्यक्षिकाने सिद्ध केलेले आहे. त्यांच्या सहवासात राहणारा माणूस सुजनवाक्य बोलणारा नाही झाला तरच नवल. ते आपला अभ्यासक्रम जगत असतात. 

सानेगुरुजींच्या ‘ भूतदया ’ या गोष्टीची आठवण येते. झाडावरुन खाली पडून मरत असलेल्या पक्ष्याला छोट्या श्यामने जीवदान दिले होते खरे , पण तोच पक्षी जेव्हा हे जग सोडून गेला तेव्हा झालेले दुःख सानेगुरुजींनी अत्यंत करुण शब्दांत व्यक्त केलेले दिसते. या मृत पक्ष्याला मातीत पुरुन त्यावर आठवणीसाठी झाड लावणारे छोटे सानेगुरुजी मला म्हणूनच आठवतात. मुलांनी पक्ष्यांवर प्रेम करावे , प्राणिमात्रांवर दया करावी यालाच भुतदया असे म्हणतात. हीच भुतदया मुलांमध्ये निर्माण होण्यासाठी संदीप कदम सरांनी राबविलेला छोटासा उपक्रम खूप मोठे आणि चिरकाल टिकणारे संस्कार करुन जातो. या उपक्रमाची संकल्पना त्यांच्या डोक्यात कशी आली असावी याचा विचार केला तरी कदमांच्या विचारांतील दम लक्षात येतो. 

त्यांचे अक्षर मोत्यासारखे म्हटले तरी वावगे ठरूच नये. अक्षरांचे मोड त्यांच्याकडून शिकलेली मुले भाग्यवान म्हटली पाहिजेत. शिक्षकाचे अक्षर सुंदर असलेच पाहिजे. त्याने लिहिलेला फळा कधीच पुसू नये असे वाटत राहावे असे कदमसरांचे अप्रतिम लेखन असते. त्यांनी कलेची कोणतीही डिग्री घेतली असेल तर मला माहिती नाही. तरीही हस्ताक्षरात त्यांचा हात धरणारे विरळेच असावेत. सध्या ते नडगिवे नं. 1 शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून अतिशय उपक्रमशील रीतीने कार्यरत आहेत. त्यांच्यासारखे शिक्षक मिळणे हे त्या शाळेचे आणि केंद्राचेही भाग्यच म्हणायला हवे. आदर्शवत राहणीमान बघून ते शिक्षक आहेत हे कोणीही सांगेल. ते अतिशय नम्र आहेत. 

मिठबांव , शिरगांव अशा ठिकाणी आमची दहा दहा दिवसांची प्रशिक्षणे झाली आहेत. प्रत्येकवेळी त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केलेली ऐतिहासिक पात्रे अजूनही डोळ्यासमोर उभी राहतात. त्यांचा इतिहासाचा गाढा अभ्यास आहे. त्यांनी आपल्या शिक्षकमित्र चमूंसोबत अनेकविध कार्यक्रम केलेले असू शकतात. आत्मविश्वास त्यांच्यात ठासून भरलेला आहे. ते मार्गदर्शक म्हणून बोलू लागले कि श्रोत्यांना याचा प्रत्यय आल्याशिवाय राहायचा नाही. 

शिक्षक संघटना आणि सामाजिक संघटनेमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर असूनही त्यांनी कधीही अहंकार केलेला असेल असे वाटत नाही. ते अतिशय संवेदनशील आणि सहनशीलही आहेत. आपल्यापेक्षा कमी सेवा झालेल्या आम्हांलाही ते अतीव आदर देतात. त्यांच्यासोबत काही तासांचा कालावधी जाणे हेही माझ्यासारख्याला अतिशय आनंददायी असू शकतं. त्यांना हल्लीचं हे बेगडी जग आवडत नाही. त्यांना प्रसिद्धीही नको असते. प्रसिद्धीपासून ते जरा दूरच राहणं पसंत करतात. 

ते कविमनाचे आहेत हे माहिती होते. पण नुकत्याच आमच्या मुख्याध्यापक सहविचार सभेत त्याची प्रचिती आली. त्यांनी आणि त्यांच्या कवीमित्रांनी लिहिलेल्या एका काव्यसंग्रहाचे नुकतेच समारंभपूर्वक प्रकाशन झाले होते. कदम सरांनी आम्हांला ही माहिती दिली आणि आम्हीही आनंदलो. आमच्या एका शिक्षक मित्राच्या काही सुंदर निवडक कविता काव्यसंग्रहात छापून येतात हेच आमच्यासाठी अभिमानाची बाब असते. मग काय त्यांना केंद्रप्रमुख पवार साहेबांनी कविता वाचन करण्याची अनमोल संधी दिली. आमच्यासाठी ऐकण्याची ती सुवर्णसंधी होती. पुढील पाच दहा मिनिटे कदम सरांच्या सुंदर शब्दांचा जागर आमच्यासमोर धबधब्यासारखा कोसळत राहिला होता. ‘ स संदीप सरांच्या ’ ‘ क कदमांच्या ’ ‘ क कवितांचा ’ तास कधी संपूच नये असे मला अजूनही वाटते आहे.   


Ⓒ प्रवीण अशितोष कुबल ( मुख्याध्यापक , शिडवणे नं. 1 )  








💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...