🛑 लक्ष्मीने प्राण वाचवले
संकट काही सांगून येत नसतं , तुम्ही गाफिल राहिलात तर ते हमखास येऊ शकतं. संकट येताना काळ आणि वेळ दोन्ही सोबतीने येत असतात. त्या संकटाचा सामना करताना आपण वाचलो , तर म्हणतो ..... काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काळ आपले प्राण घेऊन जायला येतो , तेव्हा तो त्या व्यक्तीला नक्कीच दिसतो. त्यातून वाचता आले तर त्या काळाचा अदृश्य चेहरा सतत डोळ्यासमोर येत राहतो त्या भयंकर आठवणींच्या रुपाने.
तो लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. दिवाळीत लक्ष्मीपूजन आमच्यासाठी कायमच उत्साहाचे राहिले आहे. दरवर्षी आमच्या दुकानात लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. जुन्या दुकानातील गरीबी लक्ष्मीने दुर केली. नवीन दुकानात पुन्हा लक्ष्मीचा वास सुरु झाला. लक्ष्मी येत राहिली , कधी जात राहिली , कधी स्थिर राहिली. हे असे प्रत्येकाच्या बाबतीत घडत असते. आता आम्ही आमच्या राहत्या घरी सुद्धा लक्ष्मीपूजन थाटात साजरे करु लागलो आहोत. त्या दिवशी आम्ही आमच्या घरातील लक्ष्मीचे पूजन करुन दुकानातील लक्ष्मीचे पूजन करण्यास गेलो होतो. घरातील सर्व सदस्य दुकानात लक्ष्मीपूजन साजरं करताना आनंदून गेलो होतो. दुकानाच्या बाहेर सुंदर रांगोळी काढण्यात आली. लक्ष्मीची पावले आपल्या दुकानात सदैव यावीत यासाठी मनोभावे प्रार्थना केली.
भुईनळे , फटाके , आपटबार , पावसाचे फटाके अशी आतिषबाजी सुरुच होती. शेजारी पाजारी , गिऱ्हाईके , मित्र , ज्ञातीबांधव लक्ष्मीला नमस्कार करुन प्रसाद घेऊन जात होते. आमच्या दुकानाच्या बिल्डिंगप्रमाणेच सर्व शहरातील दुकाने प्रकाशमय झालेली पाहून उत्साह द्विगुणित होत होता. आपल्या लक्ष्मीला नमस्कार करत असताना आपल्याला दुसऱ्यांच्या लक्ष्मीपूजनाची आमंत्रणे येत असतात. त्यांच्याकडे जाणे हेही आपले कर्तव्य असते. हे कर्तव्य मी दरवर्षी पार पाडत असतो. याहीवर्षी मी माझ्या स्नेह्यांच्या दुकानातील लक्ष्मीदेवींना वंदन करण्यासाठी निघालो.
वेळ संध्याकाळी 8 नंतरची असेल. रस्त्यावर प्रकाशाची लक्ष्मी जागोजागी दिसत होती. रात्रीच्या काळोखात लक्ष्मी हसतमुखाने सर्वांना दर्शन देत असावी. ती साक्षात दिसत नसली तरी जाणवत होती. तिचे असणे लक्षात येत होते.
मी माझ्या स्कुटरने निघालो. पुढे माझी छोटी मुलगी उर्मी बसली होती. ती बसली नव्हती , तर स्कुटरच्या पुढच्या छोट्या जागेत उभी राहिली होती. पत्नी मागे बसली होती. जाता जाता ओळखीच्या दुकानात जाऊन नमस्कार करत पुढे पुढे जाणे सुरुच होते.
एका दुकानात जाण्यासाठी मी गाडी स्टँडवर लावली. गाडी सुरुच होती. गाडीची चावी मी फिरवली नव्हती. गाडी थांबवल्याबरोबर छोटी उर्मी गाडीवरून उतरली. पण गाडीजवळच थांबून दुकानांची रोषणाई पाहात उभी राहिली होती. पत्नीही गाडीवरून उतरुन दुकानाच्या दिशेने निघाली. मुलीला गाडीवरून खाली उतरण्यासाठी मीही माझे दोन्ही हात कधीच हँडलवरुन सोडले होते. मी फक्त गाडीवर बसलो होतो. गाडी सुरुच होती. मीही दुकानाकडे पाहत दंग झालो होतो. सभोवताली दिसणारी अदृश्य लक्ष्मी मला आकर्षित करीत होती. मी काही काळ भान विसरुन गेलो होतो. माझे माझ्याकडे आणि गाडीकडे काही क्षणांसाठी दुर्लक्ष झाले असेल बहुदा. अचानक गाडीने वेग घेतला. मला काहीच समजायला मार्ग नव्हता. मी आपोआप गाडीबरोबर पुढे जाऊ लागलो आहे हे माझ्या लक्षात आले. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करु लागलो. मोठ्याने ओरडत गाडीचे हँडल पकडण्याचा प्रयत्न केला. गाडीच्या एक्सीलेटरवर माझा हात पडला. माझ्या हाताने एक्सीलेटर आणखी पिळला गेला. गाडी अजून पुढे पुढे गेली. पुढून एक नवी कोरी करकरीत पांढरीशुभ्र कार येत होती. त्यांची कार नवीनच होती. ती यायला आणि माझी गाडी पुढे जायला काही सेकंदांचा कालावधी पुरेसा होता. मी माझ्या गाडीसह धाडकन त्या नव्या कोऱ्या गाडीवर जाऊन आदळलो. माझ्या गाडीचे बरेच नुकसान झाले. त्यांच्या गाडीला थोडेसे खरचटले. त्यांनाही खुप वाईट वाटले , कारण त्यांची नवी कोरी कार होती. मी गाडी बरोबर रस्त्यावर वायूवेगाने चित्रपटात घडावे तसा जाऊन आदळलो. माझे कपडे पूर्ण फाटून गेले. माझी मुलगी माझ्याबरोबर उडाली की काय असे मला काही क्षणांसाठी वाटले. मी भेदरुन गेलो. पण मी उठलो तेव्हा माझी छोटी मुलगी उर्मी रस्त्याच्या कडेला अधिक घाबरलेल्या अवस्थेत बघायला मिळाली. मी तिला जवळ घेतले. तिने मला घट्ट मिठी मारली. तिला काही झाले नाही हे पाहून माझा जीव भांड्यात पडला. संपूर्ण मोडून उध्वस्त झालेल्या गाडीकडे माझे मुळीच लक्ष नव्हते. मला लागलेला मुका मार अजिबात जाणवत नव्हता. मला फक्त माझी मुलगी वाचली याचा आनंद वाटत होता. मी स्वतः गाडीखाली जाणार होतो. सेकंदांच्या काही भागांचे अंतर असेल , काळ माझ्याकडे येत असताना मी साक्षात पाहत होतो. पण माझी वेळ आलेली नव्हती. मला माझ्या लक्ष्मीने थोडे मागे ओढून घेतले असावे. मी आणि माझी मुलगी दोघेही सुखरुप आहोत हे पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
हा अपघात कशामुळे घडला हे सांगावंच लागेल. माझ्या मुलीने गाडीवरून उतरल्यानंतर सहज एक्सीलेटर दाबला होता , तिच्याकडून ते सहज घडून गेले होते. तिच्यामुळे हा अपघात घडला असे म्हणणेही चुकीचेच. कारण मीही गाडी बंद करायला विसरलो होतो. घरी आल्यानंतर माझ्या मुलीने स्वतःचे दोन्ही कान पकडले होते आणि म्हणत होती , " पप्पा , मी असं पुन्हा कधीच करणार नाही. " तिच्या त्या निष्पाप वागण्याने माझ्या डोळ्यात आलेले पाणी मी कधीही विसरु शकत नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )

No comments:
Post a Comment