Saturday, October 22, 2022

🛑 आमच्या घरी अन् तुमच्या घरी

 🛑 आमच्या घरी अन् तुमच्या घरी

          दिवाळी येण्यापूर्वीच सर्वांनाच दिवाळीचे वेध लागलेले असतात. कितीतरी आतुरता असते दिवाळीच्या पहाटेची. चाळीस वर्षांपासून दिवाळीच्या विविध घडामोडी बघितल्या आहेत. तेव्हा मी सात आठ वर्षांचा असेन. दिवाळी समजू लागली होती. 

          बाबा पहाटे चार वाजता उठून आंघोळ करुन कारीट फोडत होते. ' गोविंदा गोपाळा  यश्वदेच्या तान्ह्या बाळा ' असं म्हणत असताना त्यांच्या पायाखालच्या नरकासुराचा त्यांनी कृष्ण बनून वध केला होता. शेजारी फटाक्यांचे आवाज कानी पडत होते. एक आकाश कंदिल दरवाजाच्या बाहेर दिमाखात लटकत होता. आईसुद्धा उठून कामाला लागली होती. बाबांनी आधीच ' सुगंधी उठणे ' तयार करुन ठेवलं होतं. ताई , आक्का , मी , भाऊ सगळे एकामागोमाग एक उठण्याची सुरुवात झाली होती. पपी अगदीच छोटी होती. एक दिड वर्षाची असेल. तिलाही तिच्या आयुष्यात पहिली दिवाळी पाहायला मिळाली होती. मोठ्या बहिणी लहान असल्या तरी आमच्यापेक्षा खूपच समंजस होत्या. आईच्या आणि बाबांच्या कामात लक्ष देणाऱ्या होत्या. आम्ही दोघे भाऊ मात्र त्यांनी काढलेल्या रांगोळ्या पुसण्याचे काम करीत होतो. 

          आईने थंड पाण्यात तयार केलेले उठणं माझ्या अंगावर चोळलं होतं. तेव्हा अंगावर सर्रकन काटा उभा राहत होता. मी त्या पहाटेच्या प्रसंगी रडत आंघोळ केली होती. तरीही आईने मला घासघासून आंघोळ घातलीच होती. छोटं टॉवेल गुंडाळून तसंच मला कारेट फोडायला तुळशीसमोर नेण्यात आलं. मी छोटं कारेट फोडू शकलो नव्हतो. मग ते बाबांनीच चिरडलं होतं. 

          बाबांची देवळात जायची घाई सुरु झाली होती. मीही त्यांच्यासोबत जाण्याचा हट्ट धरला. शेवटी बाबांच्या करंगळीला पकडून मी त्यांच्याबरोबर गेलो होतो. 

          काशीविश्वेश्वराच्या मंदिरात छान काकड आरती सुरु झाली होती. बाबांच्या हातातील टाळ मला हवा होता. त्यांनी तो मला दिला नाही , म्हणून मी खट्टू झालो होतो. लवकर उठल्यामुळे मला झोप येत होती. पण आरतीच्या आर्त सुरांमुळे मी झोपूही शकलो नव्हतो. एक तासानंतर आरती संपली होती. देवळात माणसांची गर्दी होऊ लागली होती. माझ्यावर आरतीचे संस्कार घडत जात होते. 

          दरवर्षी काकड आरतीला जाणे सुरुच राहिले होते. सतत आरती म्हणत राहिल्यामुळे आरती पाठ होत चालली होती. आरती संपल्यावर घरी आल्यावर आईने केलेले गोड पोहे आणि पिवळे कांदापोहे खाण्याचा आनंदच वेगळा होता. आमच्याकडे त्या दिवसांतच पोहे खायला मिळत असत. बाकी इतर दिवसात कधी पोहे खायला मिळत नसत. आईबाबांनी केलेले रव्याचे लाडू अप्रतिम गोड असत. यापेक्षा काहीच बनवले जात नसे. तरीही आमची दिवाळी खूप मजेत असे. बाबा आमच्या सलून दुकानात टेलरिंग देखील करत. त्यामुळे दिवाळीला गिऱ्हाईकांचे कपडे शिवायला येत. ते शिवण्याची बाबांची आणि आईची घाईच घाई दिसे. ते कपडे शिवल्यानंतरच आमची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होई. त्या शिवलेल्या शिलाईतून बाबा आमची भावंडांची भाऊबीज धुमधडाक्यात साजरी करीत. आम्हाला जे हवे असे ते देण्याचा बाबांचा प्रयत्न असे. गोवा फटाक्यांच्या दोन माळा आम्हांला पुरत. कारण आम्ही त्या माळेतील शिवलेले सगळे फटाके सिंगल करुन वाजवण्याचा आनंद घेत असू. फुलबाजा , भुईनळे यांचाही आनंद घेऊ. कधीतरी पाऊस मिळे. पाऊस म्हणजे आगीचे तुषार सोडणारी एक आवाज न येणारी फटाकीच. 

          थोडे मोठे झाल्यावर आम्ही भाऊ चिव्याच्या काठ्यांपासून चांदणी किंवा आकाशकंदील बनवत असू. तो बनवायला आम्हाला दोन ते तीन दिवस लागत. पताकाचे कागद आणून ते गव्हाच्या चिकीने चिकटवत स्वतः बनवलेला कंदिल डौलाने डुलताना बघून खूप अभिमान वाटे. 

          आम्ही रतनज्योत नावाची गुलाबी रंगाची मशेरी लावत असू. पण दिवाळीच्या दिवसांत भाऊबीजेच्या दिवशी आम्हांला बहिणींकडून टूथब्रश , टुथपेस्ट अशी भेट मिळे. त्यामुळे भाऊबीजेचा दुसरा दिवस उजाडण्याची आम्हाला घाई झालेली असे. तोपर्यंत मी कितीतरी वेळा टुथपेस्टचे बुच उघडून वास घेतलेला असे. 

          आता बहिणींकडून मोठमोठ्या भेटवस्तू मिळतात. संपत्तीचं प्रदर्शन घडत राहतं. पण त्यावेळचे दिवस आठवले की तेच दिवस चांगले होते असंही वाटत राहतं. 

          आमच्या आईबाबांनी आम्हाला त्यावेळी दिलेली दिवाळीची भेट ही आमच्यासाठी सर्वोत्तम भेट असे , जी आम्ही आजही लक्षात ठेवलेली आहे. नव्हे कधीही विसरणार नाही.

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...