🛑 देवाचा प्रसाद
आपल्याला देव कधी भेटेल ते अजिबात सांगता येणार नाही. आपण अपेक्षा ठेवली नाही तरी तो माणसाच्या रुपात भेटून जाऊ शकतो. आपल्या ते ध्यानातही येणार नाही. कारण आपण तशी दृष्टी ठेवत नाही म्हणून तसे घडत असावे.
मनात सकारात्मकता असली की सगळ्या गोष्टी साध्य होतील असे वाटू लागते. आज शिक्षण परिषद होती. पूर्वीचं गटसंमेलन , आता त्याचं नाव ' शिक्षण परिषद ' असं झालं आहे. या शिक्षण परिषदेत शिक्षकांनी शिक्षकांना मार्गदर्शन करावयाचे असते. शैक्षणिक आणि प्रशासकीय मार्गदर्शनाचा एक उत्तम प्लॅटफॉर्म असतो तो. त्यानिमित्ताने केंद्रातील शिक्षक एकत्र येतात. विचारांची देवाणघेवाण करतात. नवीन शाळांचे दर्शन घडते. नवीन वाटा चोखळताना नवीन काहीतरी दृष्टीस पडत राहतं. हे नवीन नवोपक्रमात परावर्तित होतं. नवीन दृष्टिकोन सापडतो. पठारावस्था निघून जाते.
आजच्या शिक्षण परिषदेच्या निमित्ताने शिक्षकांशी हृद्य संवाद साधण्यासाठी डॉ. प्रसाद देवधर स्वतःहून आले होते. ते बोलायला उभे राहिल्यापासून त्यांनी केलेला संवाद शेवटपर्यंत मेंदूला जाऊन भिडत होता. शिक्षकांबद्दलचा त्यांच्या मनातील आदर ओथंबून बाहेर पडत होता. शिक्षकांनी काय केले पाहिजे म्हणजे शिक्षकांबद्दल समाजात आदराची भावना वाढेल यासाठी त्यांनी केलेले प्रबोधनपर वक्तृत्व उंचावत जाणारे होते. शिक्षकांनी फक्त शब्द आणि अक्षरे शिकवायची नसून त्यातील अर्थ समजून उमजून सांगितला पाहिजे या गोष्टीचा त्यांनी पुनरुच्चार केला. शिक्षकांनी भरपूर वाचन करायला हवे हे त्यांनी कमालीचे स्पष्ट करुन सांगितले. समाजातील लोकमनावर अधिराज्य करणारा कल्पनातीत शिक्षक पुनश्च निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी वैयक्तिक प्रयत्न करायला हवेत असे त्यांनी ठासून सांगितले.
नवीन पिढी शिक्षकांच्या एक पाऊल पुढे जात आहे. त्यामुळे या पिढीला मार्गदर्शन करणारा शिक्षकही तसाच त्यांच्यापुढे कित्येक पावलं गेलेला असला पाहिजे.
पुस्तकातील शिकवायच्या प्रत्येक गोष्टीचा शिक्षकाने दररोज धांडोळा घेतला पाहिजे. परिस्थितीनुरुप दररोज बदलणारे प्रवाह स्वीकारुन त्याचे आपल्या जीवनावर होणारे परिणाम सांगताना शिक्षकाला एका समुपदेशकाची भूमिका बजावायची आहे. प्रत्येक मूल वेगळं आहे , तर प्रत्येकाला तसं वेगळं शिकवण्याची उर्मी बाळगायला हवी. तशी ही अवघड गोष्ट असली तरी प्रयत्नसाध्य आहे हेही तितकेच खरे आहे.
शिक्षकाने स्वतः भरपूर फिरायला हवे. आपल्या जिल्ह्यातील माहिती त्याला असायलाच हवी. पण त्याने जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या आणि देशाच्याही बाहेर जाऊन नवीन बघून ते खरे प्रसंग मुलांना सांगायला हवेत.
शिक्षकांची स्वतःची लायब्ररी असायला हवी. नुसती लायब्ररी नको , तर ती पुस्तकं त्याने वाचायला हवीत. पुस्तकांचं धन असणारे शिक्षक आजच्या काळाची गरज आहे. हे जेव्हा घडेल तो सुवर्णदिन असू शकतो.
शिक्षक म्हणून नोकरी मिळाली की आपलं कर्तव्य अधिक मोठया प्रमाणात वाढलेलं आहे हे प्रत्येक शिक्षकाच्या लक्षात आलेली गोष्ट असेल. सध्याच्या इंटरनेटच्या युगात सगळं जगच त्यावर चालू लागलं असतानाही शिक्षकांचं महत्त्व जसंच्या तसं राहिलेलं आहे. संदर्भ बदलले आहेत. अपेक्षा वाढल्या आहेत. इंग्रजी शिक्षणाची गरज लोकमनाला शहराकडे नेऊ पहात असताना त्यांचे हे प्रचंड लोंढे पुन्हा जिल्हा परिषदेकडे वळतील हे आपलं सर्व शिक्षकांचं स्वप्न खरं होण्यासाठी अधिक विचार करावा लागेल. शैक्षणिक उन्नतीसाठी खूप काम करावं लागेल. काय करता येईल याचं विचारमंथन सतत होत राहायला हवे. विचार आला की तो तसाच विरु न देता त्याचं आचरण प्रत्यक्ष घडण्यासाठी जाणीवपूर्वक कृती करायलाच हवी.
वेळ न पुरणं हे सगळ्यांचंच दुखणं आहे. त्यावर मात करता येते का ? हेही आजमावून पाहिलं पाहिजे. मुलांसाठी झोकून देऊन काम करताना मिळणारा आनंद आणि समाधान हे कित्येक मोठ्या पुरस्कारांपेक्षाही वरचढ असणार हेही तितकेच खरे आहे. कोणीतरी प्रोत्साहन देईल म्हणून आपल्याला कोणतीही गोष्ट करावयाची नसून ती आपली जबाबदारी आहे असे समजून करायला हवी.
डॉ. प्रसाद देवधर यांनी केलेल्या पंचवीस मिनिटांच्या संबोधनात अशा अनेक उत्तम गोष्टींवर परखड मते मांडली आणि अप्रत्यक्षपणे आम्हां शिक्षकांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचेही नकळत कार्य केले आहे. त्यांच्या मनोगतातून ते छान व्यक्त झाले आहेत. त्यांची प्रत्येक भावना सकारात्मकपणे घेतली पाहिजे. कधी कधी शिक्षकांनाही अशा मार्गदर्शनाची गरज असते. असं मार्गदर्शन माझ्यासारख्या शिक्षकांना अधिक प्रेरणा देणारं ठरतं आणि त्यांच्या वाक्यांना आपसूक टाळ्या पडतात.
ते आले , ते बोलले आणि त्यांनी सर्वांची मनं जिंकून घेतली. ते ' भगीरथ ' साठी भगीरथ प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आडनावात देव आहे , तसा तो त्यांच्यातही असावा असं माझं प्रांजळ मत आहे. त्यांचं नाव प्रसाद आहे. त्यांनी आज आम्हाला आपल्या मौलिक विचारांचा प्रसाद वाटला आहे. म्हणूनच हा विचारांचा प्रसाद ' देवाचा प्रसाद ' मानून आम्ही सर्वांनी मिळून प्राशन केला आहे.
©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )


No comments:
Post a Comment