Friday, December 31, 2021

🔴 लेट्स लर्न इंग्लिश

          🔴 लेट्स लर्न इंग्लिश

        इंग्रजी ही आपली ज्ञानभाषा आहे. ती जगाची भाषा आहे. ती वाघिणीचे दूध आहे असेही म्हटले जाते. इंग्रजी बोलणे , वाचणे व आकलन होणे ही काळाची गरज आहे. सध्या जिल्हा परिषदच्या काही शाळांमध्ये सेमी इंग्लिश माध्यम आहे. पहिलीपासून इंग्रजी विषय आहे. तसेच शासकीय टॅग मिटिंगच्या माध्यमातून शिक्षकांचे इंग्रजी संभाषण विषयक विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाही फायदा शिक्षकांना आणि पर्यायाने विद्यार्थ्यांना होऊ लागला आहे. 

          आम्ही लहान असताना आम्हाला पाचवीपासून इंग्रजी विषय अभ्यासक्रमामध्ये आला. त्यावेळी पाचवी म्हणजे आमची इंग्रजीची पहिली इयत्ता होती. तरीही आम्ही बारावीमध्ये सर्व विषय इंग्रजीमध्ये असूनही ते लिलया पेलले. चांगली टक्केवारी मिळवली. इंग्रजी प्रश्नांची उत्तरे इंग्रजीत व्यवस्थित लिहिली. 

          फक्त ऐकणे , वाचणे , लिहिणे या क्षमतांमध्ये बाजी मारली. पण इंग्रजी भाषण , संभाषण यात तितकी बाजी मारता आली नाही. इंग्रजी ऐकलेले समजत होते , पण बोलण्याची वेळ आली कि भीती समोर येत राहिली. पोटात मोठा गोळा येत गेला. 

          इंग्रजीत बोलायचे तर मराठी सारखे जलद गतीने जमेनासे झाले. घरी मालवणीत बोलत होतो. मराठीही शुद्ध बोलताना अडखळायला होई. मग इंग्रजी बोलणे तर त्याही पुढची गोष्ट होती. माझी मोठी बहिण कणकवली कॉलेजमध्ये जात होती. तिचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. तिच्यासोबत बोलायला गेलो तरीही भीतीच वाटे. आमच्या सलूनात येणारी बरीचशी गिऱ्हाईके उच्चशिक्षित असत. ती आम्हांला इंग्रजी बोलण्याचा आग्रह धरत. तरीही आमच्यात आत्मविश्वास वाढला नाही. व्याकरण चुकेल अशी भीती नेहमीच वाटत आली आहे. चुकून मराठी शब्द येईल आणि हसे होईल ही भीतीसुद्धा दडलेली होतीच.  इंग्रजीत बोलायचे तर मराठीत विचार करावा लागे. त्या मराठीतील विचारांचे इंग्रजीत भाषांतर करुन बोलल्यामुळे चुका जास्त होत. जेवढ्या चुका होत , तेवढा आत्मविश्वास कमी होत जाई. 

          आता आत्मविश्वास वाढला आहे. कारण आता आपल्याला इंग्रजीचे अनेक शब्द सतत समोर येत आहेत. विविध प्रसार माध्यमे , पुस्तके , यु ट्युब याद्वारे आपल्याला ऐकण्याची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. फक्त आपल्याला त्यांचा समर्पक उपयोग करता यायला हवा. अनेक इंग्लिश स्पिकिंग कोर्स ऑनलाईन स्वरुपात मिळू शकतात , त्यांनीही आपली इंग्रजी बोलण्याची क्षमता अधिक विकसित होऊ शकते. इंग्रजी बोलण्यासाठी आपला सराव कमी पडतो , म्हणूनच आपण संभाषणात कमी पडतो. त्यात रस घेतला तर ते संभाषण सोपे होऊन जाईल आणि तो आपल्या सवयीचा भाग होऊन जाईल. जे आपण सतत करतो , ते आपल्या अंगवळणी पडते. इंग्रजी सतत ऐकायला हवे , वाचायला हवे , मोठयाने बोलायला हवे आणि दुसऱ्यांना प्रत्यक्ष प्रतिसाद द्यायला हवा. हे सतत घडेल तेव्हाच तुमची भीती आपसूकच कमी कमी होत जाईल. इंग्रजी शब्दांची संपत्ती वाढवायला हवी. त्यासाठी इंग्रजी पाठ्यपुस्तके वाचायला हवी. बालभारतीच्या संकेतस्थळावर सर्व पुस्तके ऑनलाईन उपलब्ध आहेत. ती पुस्तके डाऊनलोड करुन वाचल्यास खूपच चांगले. आपल्याला आपल्या मनात इंग्रजीत थॉट आला पाहिजे. तो विचार म्हणजेच थॉट इंग्रजीत येऊ लागला कि तुमचे इंग्रजी बोलणे आलेच म्हणून समजा. 

          आता जाल तिथे तुमचे इंग्रजीमुळे अडत असेल तर तुम्हाला इंग्रजी भाषेत पारंगत झालेच पाहिजे. काही शिक्षक वर्गात शिकवताना संपूर्णपणे इंग्रजीत शिकवतात , त्यांनी सांगितलेला सर्वच आशय मुलांना समजतही नसेल , पण त्यांचा इंग्रजी ऐकण्याचा कान तयार होत आहे ही चांगली गोष्ट आहे. 

          आपली मातृभाषा मराठी आहे. ती बोलतानाही आपले कधीकधी बारा वाजतात. म्हणजे बोलताना जो शब्द आठवायला पाहिजे तो ऐनवेळी आठवत नाही. अर्थात मराठीची जर अशी अवस्था असेल तर इंग्रजीला थोडा वेळ लागणार. किंवा थोडा अधिक जाणीवपूर्वक वेळ द्यावाच लागणार. नवीन वर्षात हा संकल्प सर्वांनी नक्कीच करायला हरकत नाही. दररोज पंधरा मिनिटे इंग्रजी बातम्या ऐका , पाहा. मित्रांसोबत सोपी इंग्रजी बोला. मराठी लिहिता तसे इंग्रजीही लिहिण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलांबरोबर , विद्यार्थ्यांबरोबर साधी इंग्रजी बोलत राहा. जमेल , पळेल, धावेल तुमची इंग्रजी तुमच्या मुखातून. लेट्स लर्न इंग्लिश.हॅपी न्यू इयर टू थावजंड ट्वेन्टी टू.

 ©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



🔴 दाने दाने पर

           🔴 दाने दाने पर

            कालचीच गंमत गोष्ट आहे. तशा अनेक गंमत गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. पण त्या आवश्यकही असतात. कारण काहीवेळा त्यामधूनही आपल्याला धडे मिळत असतात. आपलीच गंमत सांगायला आपल्याला जमली पाहिजे. गंमत एकदा झाली म्हणजे ती पुन्हा होणार नाही हेही सांगता येत नाही. कधी कधी गंमत घडण्याचीही आपण वाट बघत असतो. ती घडली की मज्जा येते. ती मज्जा अनुभवता आली पाहिजे म्हणजे झाले.

          आम्ही मुंबईवरुन गावी आलो. दुपारी बारानंतर आल्यामुळे माझ्या वहिनीने तिच्याकडे जेवायला बोलावले. भाऊ आमच्यासोबतच होता. सहावीत शिकत असलेली माझी मुलगी तनिष्का क्लासला व तिथून शाळेत गेली होती. तिची शाळा  अडीच वाजता सुटणार होती. तोपर्यंत आम्ही सगळे जेवलो. तिला आणायला मी शाळेत जायला निघालो. माझ्याबरोबर पत्नी आणि छोटी मुलगी उर्मीही यायला निघाली. वहिनीने तनिष्कासाठी जेवणाचा डबा भरुन दिला होता. 

          सकाळी लवकर उठून प्रवासाला सुरुवात केली. रेल्वेत झोप मिळालीच नव्हती. त्यामुळे मुलीला शाळेतून घेऊन आल्यानंतर भरपूर झोपावे असे ठरवले होते. 

          वहिनीने मुलीसाठी दिलेला जेवणाचा डबा मी माझ्या पलेजर गाडीच्या पुढच्या पाय ठेवण्याच्या जागेवर ठेवला. शाळा जवळच होती. रुमसुद्धा जवळच होता. वाटले डबा कशाला डिकीत ठेवायचा ? म्हणून तिथेच ठेवला. शाळेच्या मागच्या बाजूच्या रस्त्यापाशी आलो. आम्ही तिघे तनिष्काला न्यायला आलो हे तिच्यासाठी सरप्राईज असणार होते.  तिला तीन दिवसानंतर अशा प्रकारे शाळेत भेटायला मिळणार हे आमच्यासाठीही वेगळेच फिलिंग असणार होते. 

          मी गाडी साईड स्टँडवर लावली. माझ्यासारखे आणखी काही पालक आपल्या मुलांना न्यायला आलेले दिसले. त्यातल्या ओळखीच्या पालकांना मी आदरपूर्वक हात वर करुन हाय केले. शाळा सुटली होती. मुले शाळेच्या मागील अरुंद गेटमधून येऊ लागली होती. आमची नजर तनिष्का कुठे दिसते का ? यासाठी भिरभिरत होती.  ती मुलींच्या घोळक्यातून बोलत बोलत येत होती. तिने आम्हाला पाहिले आणि सुखावली. छोट्या उर्मीने लगेच तिचा हात पकडला. आम्ही परत गाडीकडे आलो. गाडीवर बसणार तितक्यात ??? गाडीच्या समोरच्या फुटरेस्टवर ठेवलेला जेवणाचा डबा दिसत नव्हता. मला वाटले मी तो डिकीमध्ये ठेवला. म्हणून डिकी उघडून बघितली तर डिकी रिकामीच होती. 

          डबा कुठे गेला असावा म्हणून इकडे तिकडे पाहिले तर काय ? रस्त्याच्या शेजारच्या झाडांच्या अतिदाट झाडीमध्ये एक भटकता कुत्रा आमचा जेवणाचा डबा उघडताना दिसला. त्याला तो काही उघडता येत नव्हता. मी त्या डब्याची आणि त्यातल्या जेवणाची आशा सोडली. मुलीला एका हॉटेलमध्ये घेऊन जाऊन चपाती भाजी घेतली. येताना पुन्हा त्याच दिशेने सहजच आलो. आता मात्र त्या ठिकाणी कुत्रा दिसत नव्हता फक्त न उघडलेला डबा  दिसत होता. मी डबा आणायला त्या झाडीत शिरलो. डबा बाहेर काढला. डबा घट्ट झाकणाचा होता. तो थोडी ताकद लावून उघडला. त्यातले जेवण जसेच्या तसे होते. डबा उघडताच तो कुत्रा पुन्हा कुठूनतरी धावतच माझ्याजवळ आला. मी तो डबा त्याच्यासाठी जमिनीवर पालथा केला. अधाशासारखा त्याने तो पटकन संपवून टाकला. मी आणि माझी मुलगी दोघेही त्याच्याकडे तोंडात बोट घालून पाहतच राहिलो. एका कुत्र्याची भूक भागवली याचा आनंद मुलीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहात होता. खरंच त्यावर आज त्याचेच नाव लिहिले होते याचा प्रत्यय आला. ' दाने दाने पर लिखा होता है खानेवाले का नाम ' हे पटल्याने आम्ही हसत हसत घरी परतलो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



🔴 सुपारी

          🔴 सुपारी

         लहानपण खरंच निरागस असतं. हट्ट करायला मिळतो. हट्ट पुरवले जातात. लगेच नाही पुरवले गेले तरी कधीतरी पूर्ण होण्याची शक्यता असते. तेव्हा कसं केव्हाही हट्ट करता येत असतो. पण जसे मोठे आणि समंजस होत जातो , तसे हट्टीपणा सोडण्याचे सल्ले दिले जातात. मीही हट्टीच होतो. आमचे अनेक हट्ट बाबांनी आणि आईने पुरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलेला होता. आम्ही पाच भावंडे असल्याने आमच्या पालकांचीही आमचे लाड पुरे करताना दमछाक होत असे. ऐपतीप्रमाणे आमचे लाड केले गेले. मागणीप्रमाणे सर्व मिळाले नाही तरी निदान आम्ही मागणी तरी करु शकत होतो. आमची शैक्षणिक वस्तुंची मागणी आधी पूर्ण केली जात असे. इतर मुलांच्या सुविधा बघून आम्ही केलेली मागणी तात्काळ धुडकावून लावली जात असे. आम्ही आमच्या रास्त मागण्या आईमार्फत बाबांपर्यंत पोहचण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहू. तेव्हा कुठे महिन्यातून एखादी मागणी पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागत. 

          त्यावेळी स्वस्ताई होती. आजसारखी महागाई नव्हती. ५ पैशाची लिमलेटची गोळीही आम्हाला आनंदी ठेवत असे. बाबांनी बाजार आणायला सांगितला कि आम्हाला ५ किंवा १० पैसे हमखास मिळत. फक्त त्याचे चांगले खाऊ आणावे लागे. काहीतरी आणून खात असलेले दिसलो की मार पडलाच म्हणून समजा. 

          एकदा मला खाऊसाठी २० पैसे मिळाले. बाबांनी मला खाऊ आणण्यासाठी पाठवले. मी धावतच कांबळी गल्लीच्या शेजारी असलेल्या छोट्या पानपट्टीच्या दुकानात गेलो. तिथे मिलन नावाची सुपारी मिळत असे. आमच्या शाळेतली बरीच मुले ती मधल्या सुट्टीत खाताना मी बघायचो. पण प्रत्यक्ष खाण्याची संधी मला मिळाली नव्हती. आता ती संधी मिळाली होती. मी २० पैशाच्या २ मिलन सुपारी घेतल्या. एक खिश्यात ठेवली. दुसरी फोडली आणि खात खात किंवा चघळत चघळत आमच्या दुकानात आलो. आमच्या सलूनात तेव्हा दोन तीन गिऱ्हाईके बसली होती.  ती माझ्या चांगली ओळखीची होती. मी सुपारी खात आलो होतो , हे त्यांनीही बघितले आणि बाबांनीही. सुपारी लाल रंगाची असल्यामुळे माझे तोंड पोपटाच्या चोचीसारखे लालभडक झाले होते. 

          बाबांनी माझ्या तोंडाकडे पाहिले. मी सुपारी खाऊन आल्याचे पाहून बाबांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी मला तिथेच कानफटात लगावून दिली. अचानक झालेल्या हल्ल्याने मला रडताही येईना. पण ओळखीच्या माणसांसमोर रडणार तरी कसे ? कायम मारल्यानंतर भोकाड पसरुन रडणारा मी अगदी शांत कसा राहिलो हेच मलाही समजेना. 

          माझी मलाच लाज वाटू लागली होती. पुन्हा सुपारी घ्यायची नाही अशी मला सक्त ताकीद देण्यात आली. मीही ती पुढे पाळली. त्या बालवयात मला वेळीच शिक्षा मिळाल्याने मी पुन्हा मिलन सुपारी घेण्याच्या फंदात कधीच पडलो नाही.

          आमच्या दुकानात पानाची तबकडी होती. आजोबा , बाबा , काका पान खात असत. हे आमच्या गिऱ्हाईकांनाही माहीत होते. काही गिऱ्हाईके केवळ पान खात आणि निघून जात. पण आमच्या बाबांनी त्यांना लोभ लावला , त्यामुळे अशी ही गिऱ्हाईके आमची कायमची बनून गेली. आम्हां पाचही भावंडांना नावासह ओळखू लागली. 

          सतत पानाचे तबक , तबकडी समोर असूनही आम्हाला कोणालाही पानाचे किंवा कसलेही व्यसन लागले नाही. 

          गावच्या घरी गेल्यावर आमची आजी खूप प्रेमाने सुपारीचा छोटा तुकडा पुढे करत असे. तिच्या प्रेमापोटी आम्ही तो तुकडा थोडासा चघळून फेकून देऊ. पण व्यसन लागू दिले नाही. आम्ही आता मोठे झालो तरीही पानाचा डबा अजून आमच्या घरी सुरुच आहे. 

          बाबांनी दातांमुळे पान , तंबाखू सोडून दिली आहे. लहर आली तर कधीतरी सुपारी खातात. तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम सांगितले तरी आमची गावाकडील घरची पान खाणारी माणसे पान सोडू शकत नाहीत या गोष्टीचे दुःख वाटते. मी स्वतः तंबाखूमुक्त शाळा अभियानात सहभागी झालो. प्रदर्शनात तालुक्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले तरी घरातील माणसांच्या बाबतीत कोरा तो कोराच राहिलो आहे.

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



🔴 गजबजपुरी

          🔴 गजबजपुरी

            एका नातेवाईक पेशंटला बघण्यासाठी मी मुंबईला गेलो होतो. जाताना ट्रेनने जायचे ठरवले. ऑनलाइन बुकिंग भाच्यानेच करुन दिली. तिकीट कन्फर्म असल्यामुळे आमचा जीव भांड्यात पडला. पत्नी , मी आणि छोटी मुलगी असे निघालो.  नाताळची सलग तीन दिवस सुट्टी होती , ती सत्कारणी लावावी असे मनात आले होते. 

          भाऊसुद्धा यायला तयार झाला. त्याची तिकीट कन्फर्म झालीच नाही. पण तिकिटाचे पूर्ण पैसे भरुन कन्फर्म नसताना तोही आमच्याबरोबर यायला तयार झाला. स्लीपरमधून पहिल्यांदाच प्रवास करत होतो. या प्रवासाचा आगळा वेगळा अनुभव येत होता. आमच्या बोगीमध्ये आम्ही बसलो. लांबच्या लांब झोपता येईल एवढी मोठी सीट बघून हायसे वाटले. भाऊ वरच्या बर्थवर बसला. आम्ही खालच्या सीटवर व्यवस्थित बसलो. 

          समोरच्या सीटवर एक सहा सात वर्षाची छोटी मुलगी बसली होती. माझ्या छोट्या मुलीची आणि त्या छोट्या मुलीची काही क्षणातच ओळख झाली. ती तिच्याशी खेळण्यात चांगलीच रमली. तिने त्या मुलीचे नाव , गाव सर्व विचारुन घेतले. त्या मुलीला आपल्याकडील खाऊ दिले. छोट्यांमुळे आम्हां मोठ्यांचीही ओळख झाली. गप्पा मारत मारत प्रवास सुरु होता. फेरीवाले विक्रेते इकडून तिकडे फिरत होतेच. मी आपला सर्वांचे निरीक्षण करत होतो. 

          कितीतरी माणसे मुंबईच्या दिशेने चालली होती. नोकरीसाठी , शिक्षणासाठी , पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी , करिअर घडवण्यासाठी , खरेदीसाठी अशा अनेकविध कारणांसाठी त्यांचा प्रवास चाललेला होता. सकाळी सहा वाजता आम्ही ठाण्यात पोहोचलो. त्यानंतर सलग दोन दिवस डोंबिवली , उल्हासनगर , परेल असे फिरणे झाले. लोकलट्रेनमधून प्रवास करताना विविध गोष्टी पहावयास मिळाल्या. हॉटेलिंग झालं. 

          शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो. मेनुकार्ड बघितले. भावोजी , ताई , आका आणि भाचा सोबत होते. त्यांनी स्प्रिंग रोल आणि पनीर रोटी मागवली. एकत्र बसून ते खातानाचा आम्हां भावंडांचा उत्साह द्विगुणित झाला होता. लहानपणी चटणी भाकरी किंवा कांदा , मसाला , चपाती खाणारे आम्ही आज एका दर्जेदार हॉटेलात वेगळी डिश खाण्यात दंग झालो होतो. खाता खाता गजाली सुरुच होत्या. समोर आलेल्या वेगळ्या पदार्थांच्या थाळ्या कशा संपवायच्या इथपासून टिशूपेपरचा वापर कसा करायचा इथपर्यंत गंमत गोष्टी आमच्या हसण्याचा आवाज वाढवित होत्या. थाळ्या संपल्या एकदाच्या. आता वेटरने प्रत्येकाला एकाएका प्लेटमधून गरम पाणी व त्यात कापलेले लिंबू टाकून आणून दिले. त्यात आम्ही हात धुतले आणि मग ओले झालेले हात टिशुपेपरने छान पुसून घेतले. नाश्त्याची चव जिभेवर चांगलीच रेंगाळत होती. 

          आदल्या रात्री नीट झोप न झाल्यामुळे डोळ्यावर झोपेने आक्रमण करायला सुरुवात केली होती. मस्त दोन तीन तास झोपलो. प्रवासाचा शीण गेला होता. संध्याकाळी आणखी दोन भाचे आम्हांला मुद्दाम भेटायला आले. त्यांच्यासोबत मस्त भोजन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी उशिराच उठलो. ज्या पेशंटला आम्ही बघायला गेलो होतो, ती पेशंट आमच्या सतत गप्पांमध्ये येत होती. तिच्या उपचारासाठी डॉक्टरांनी लाखो रुपयांचे पॅकेज सांगितल्याचे ऐकून आम्ही हादरुन गेलो होतो. 

          एखादा माहीत नसलेला आजार खूप उशिरा कळावा आणि त्याचे दुष्परिणाम त्या पेशंटला भोगावे लागावे ही कल्पनाच आम्हाला सहन होत नव्हती. तरीही एक मानसिक आधार देण्यासाठी आम्ही त्या पेशंटला भेटायला मुद्दाम गेलो होतो. आम्ही तिच्याशी बोलत असताना तीही आमच्याशी भरभरुन बोलत होती. ती स्वतः उच्चशिक्षित होती आणि उच्च विचारांचीही होती. ती स्वतः सकारात्मक विचारांची असल्याने आम्ही तिला अधिक मोटिवेट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तरीही कितीही काहीही केले तरी तिचा आजार काही आम्ही घेऊ शकणार नव्हतो याचे दुःख आम्हाला सलत होते. 

          प्रत्येकाला आपले जीवन खूपच महत्त्वाचे असते. हे जीवन क्षणभंगुर असते , हे प्रत्येकाला माहिती असते. पण माणूस कितीही आजारी असला तरी त्याला शेवटच्या क्षणापर्यंत जगण्याची उमेद असतेच असते. मलाही माझ्या त्या जवळच्या नातेवाईकाबद्दल ती पूर्ण बरी व्हावी अशी अतिशय प्रामाणिक भावना आहे. तिच्या कुटुंबियांना तिची आत्यंतिक गरज आहे. तिचे असणे तिच्या लहान बाळासाठी किती महत्त्वाचे आहे याची कल्पना केली तरी आपल्या हृदयाचा ठोका चुकेल. 

          मुंबई ही एक गजबज असलेली गजबजपुरीच आहे. तिच्या पोटात असे कित्येकजण असतील कि जे अशा प्रकारे समस्यांना तोंड देत असतील. या समस्यांवर मात करत असतील. माझे निरीक्षण माझ्यापुरते मर्यादित असेल , पण या गजबजपुरीत स्वतःला सामावून घेणारे हे सगळे गजबजपुरीचे महानायकच आहेत. हे आपल्या समस्यांवर सदोदित मात करत राहण्याची क्षमता बाळगतात हे ही मला विचार करायला भाग पाडत आहे. 

          मी उद्या माझ्या घरी कोकणात जाईन , पण इथल्या समस्या तशाच राहतील. तरीही मी एक वेगळाच सकारात्मक दृष्टिकोन घेऊन जात आहे याचा मला आनंद आहे.

©️ प्रवीण अशितोष कुबल

( 9881471684 ) कणकवली



🔴 रात्रीचा राजा

           🔴 रात्रीचा राजा

            जीवन हा एक रंगमंच आहे. त्या रंगमंचावर आपण प्रवेश केलेला आहे. कधीतरी एक्झिट घ्यायची आहेच. आपल्याला या रंगमंचावर विविध पात्रे रंगवावी लागतात. खरा खोटा अभिनय करावा लागतो. कधी अभिनयाला उत्स्फूर्त दाद मिळते , तर कधी मिळतच नाही. 

          मी लहानपणी नाट्यवेडा होतो. कोठेही नाटक असले तर ते प्रत्यक्ष बघावे असे वाटत राही. दशावतारी नाटके बरीच पाहिली असतील. बाबी नालंग , बाबी कलिंगण , आप्पा दळवी , चंद्रकांत तांबे , सुधीर कलिंगण अशा कलाकारांची दशावतारी नाटके विशेष लक्षात राहिली. ' माझी ढवळी , माझी पवळी ' असे म्हणत नाचत गात येणारे बाबी कलिंगण अधिक लक्षात राहिले आहेत. त्यांचा प्रवेश आला कि प्रेक्षक भारावून गेलेले मी पाहिले आहेत. त्यांच्या प्रत्येक वाक्याला आणि हालचालीला जबरदस्त टाळ्या पडत. त्यांनी बहुतेकदा साकारलेली म्हातारी गवळण विलक्षण भाव खाऊन जाई. आम्हाला ती म्हातारी आमच्या आजीसारखी दिसत असे. 

          एक पुरुष हुबेहूब म्हातारीचे सोंग वटवतो आहे अशी शंका सुद्धा येणार नाही , एवढे बारकावे बाबी कलिंगण दाखवत असत. नऊवारी साडीमध्ये ते छान दिसत. लाल मोठे कुंकू लावून,  तोंडात दात असतानाही दात नसल्याचा अभिनय ते करत असत. 

          मी तेव्हा कणकवली नं.३ या शाळेत शिकत होतो. जवळच भालचंद्र महाराजांचा मठ होता. मठात बऱ्याचदा नाटके असत. आम्ही एकही नाटक पहायचे सोडत नसू. त्यावेळी रात्री उशिराच नाटक सुरु होई. ते पहाटे पाच सहा वाजेपर्यंत चालत असे. चणे , शेंगदाणे , कांदाभजी खात खात नाटक बघण्याची लज्जत अधिकच वाढत असे. नाटकात राक्षस आला की मला भीती वाटे. मी बाबांचा हात घट्ट पकडून राही. थंडी असे. कुडकुडायला होई. पण राजाचे आणि राक्षसाचे युद्ध बघायला मज्जा येई. त्यांची गाणी म्हणण्याची पद्धत आवडे. एकही गायक आवाजाची पट्टी सोडत नसत. 

          सगळ्याच पात्रांचा एवढा मोठा आवाज असे की लाईट गेला तरी स्पिकरची गरज पडत नसे. राक्षसाचा आवाज तर खूपच मोठा असे. त्याच्या आवाजाने झोपलेली मुले उठून रडू लागत. पैशाची तळी घेऊन एक बाई प्रेक्षागृहात फिरे. तिच्या तळीमध्ये लोक सुटे पैसे टाकत. ती पैसे न देणाऱ्या लोकांच्या  गालाला हलकेच हात लावत असे. त्यामुळे ते लोकसुद्धा लाजून पैसे देत असत. बाबांनी मला नंतर सांगितले तेव्हा समजले कि ती बाई नसून तो एक साडी नेसून आलेला पुरुष होता ते. पण तो पुरुष होता असे कोणालाही वाटणार नाही अशी त्याची अफलातून वेशभूषा , रंगभूषा असे. 

          नाटकात हनुमान असला कि आणखी मजा येई. चंद्रकांत तांबे यांनी साकारलेला हनुमान मी अनेकदा बघितला आहे. त्यांचा प्रवेश प्रेक्षकांमधूनच होई. हनुमानाची चपळाई दाखवताना त्यांनी प्रेक्षकांची नेहमीच वाहवा मिळवली आहे. टाळ्यांचा कडकडाट.  प्रेक्षक चुरमुऱ्याचे लाडू फेकत असत आणि हनुमान ते अचूक पकडत असे. आम्ही लहान असताना आम्हीही लाडू फेकले होते. हा हनुमान आला कि संपूर्ण रंगमंच दणाणून सोडत असे. त्यावेळी या कलाकारांनी आपली एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनात कायमची उमटवली होती. त्यावेळी प्रेक्षकांची इतकी गर्दी असे कि बसायला जागा नसे. लोक दाटीवाटीने बसत आणि सकाळपर्यंत तोंडाचा आ करुन नाटक पाहात. सुधीर कलिंगण यांनी केलेला श्रीकृष्ण अगदी खराच वाटे. त्यांची राजाची , विष्णूची भूमिका जीवनविषयक तत्वज्ञान शिकवून जाई. 

          बाबी नालंग म्हणजे एक चालते बोलते नाट्यसाहित्यच. त्यांनी अनेक दशावतारी कलाकार घडवले असतील. त्यांचे शब्दांचे उच्चार स्पष्ट आणि शुद्ध असत. 

          हे दशावतारी कलाकार रात्रीचे राजा असत. सकाळी त्यांच्या सामानाचा बोजा त्यांच्याच कपाळावर घेऊन त्यांना पुढील नाटकासाठी रवाना व्हावे लागत असे. त्यांचे रंगकर्म सुरु असताना आम्ही त्यांच्या रंगखोलीत हळूच जाऊन पाहात असू. स्वतःचा मेकअप स्वतः करत आरशासमोर प्रखर प्रकाशात ते भडक रंग देत असत. त्यांचा प्रवेश येईपर्यंत त्यांचा मेकअप सुरुच राही. 

          यातील काही कलाकार हे हौशी आहेत , तर काही व्यावसायिक झाले आहेत. दिवसा नोकरी करुन रात्री नाटके करणारेही कलाकार मी पाहिले आहेत. एकदा मी रत्नागिरी गाडीत बसलो होतो. त्या गाडीच्या चालकाकडे माझं लक्ष गेलं. गाडी साक्षात श्रीकृष्ण चालवतोय असं मला वाटलं. खरंच तो श्रीकृष्णच होता. श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे सुधीर कलिंगण गाडीचे सारथ्य करत होते. नाटकात हुबेहूब अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारा हा माणूस आज आम्हाला एसटीने रत्नागिरीला घेऊन चालला होता. समाजाची सेवा करणाऱ्या व समाजाला कलेची संस्कृती जपत विधायक संदेश देणाऱ्या अशा सर्व नाट्यवेड्यांना खरंच अभिवादन करावं तितकं थोडंच असणार आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

कणकवली ( 9881471684 )



💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...