Sunday, July 14, 2019

माझी मुलगी - तनिष्का

          माझी २ नंबर मुलगी तनिष्का ....आज तिचा वाढदिवस...ती २ वर्षांची होती...तेव्हाची गोष्ट ..मी नुकतेच नवीन सलून सुरु केले होते. तो दिवस पहिला रविवारचा होता.आमचे अचानक ठरले राधानगरीला जायचे. उन्हाळ्याचे दिवस होते. दुकानाचे सोमवारी उद्घाटन केले होते मागच्या. हा त्यानंतरचा १ ला रविवार असूनही मी बाबांना आणि संतोषला दुकानात ठेवून मी , माझी पत्नी ईश्वरी व छोटी मुलगी तनिष्का उर्फ गुड्डीला आमच्या TVS Sport टू व्हिलरने घेऊन निघालो होतो. 
          १० वाजता सकाळी सुटलो. ११ वा. फोंडाघाटात होतो. पोहोचायला फक्त अर्धा तास बाकी होतो. उन्ह मी म्हणत होतं. माझ्या गाडीचा वेग थोडा वाढला होता. गाडी एजिवड्याच्या पुढे आली होती. अचानक काय झाले समजलेच नाही. पत्नीच्या हातात आमची गुड्डी गाढ झोपी गेली होती. पत्नीसुद्धा उन्हाचा कडाका सहन करु शकत नव्हती. काय झाले हे समजायला वेळच मिळाला नाही. गाडीचे मागचे चाक ट्यूब फुटल्याने लडबडले. गाडीच्या मागच्या चाकातील संपूर्ण हवा निघून जाऊन टायरदेखील फुटला होता. 
          माझी बेसावध पत्नी अचानक घडलेल्या पंक्चरमुळे स्वतःला आणि गुड्डीला आवरु शकली नाही. ती १०-१२ फुटांवर दूरवर फेकली गेली. मला तीव्र धक्का बसला ..पण मी पुढे जाऊन गाडी कंट्रोल केली. गुड्डी पत्नुच्या हातून निसटून आपटली होती. तिच्या डोक्याला थोडा मार बसल्याने रक्त येऊ लागले. तिची मम्मी जवळच जमिनीवर निश्चेष्ट पडून कण्हत होती..मुलगी पडली तरी ती उठून तिला उचलून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिला मी कसेतरी उठवले व पाणी पाजले. तिला मुका मार लागला होता. हातापायांना खरचटले होते. 
          माझ्या मुलीच्या डोक्याचे रक्त माझ्या हातावर सांडले होते. गुड्डीने ते रक्त बघितले. तिला वाटले ते माझेच रक्त आहे.ती रडू लागली. तिला मी समजावून सांगितले कि ते माझे नसून तुझे रक्त आहे. तेव्हा ती चिमुकली मला जे बोलली ते आठवले कि आजही माझ्या पायाखालची जमीन सरकते....
          ती म्हणाली होती, " पप्पा , मला लागले तरी चालेल...तुम्हाला लागले नाही ना ? ...." मी गारच झालो आणि माझ्याच डोळ्यातून पाणी वाहू लागले ...मला रडू आवरेना....मोठ्या संकटातून आम्ही वाचलो होतो...
          समोरचा मैलाचा दगड एक फुटावरुन माझ्याकडे बघून भेसूरपणे हसताना मला दिसला...जर आमच्यापैकी कुणीही त्याच्यावर आपटलो असतो तर .........ती कल्पनाच सहन होत नाही.....ती माझी मुलगी आता ७ वीत आहे....तिला कधीही दुखावणार नाही आसा मी त्याचक्षणी निश्चय केला होता....आणि मी तो पाळणारच....माझी गुड्डी म्हातारी- शितारी होऊ दे ...अशी माझ्या तिला अनंत शुभेच्छा .
          Happy Birthday Guddi.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 ) कणकवली.


No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...