Saturday, June 15, 2024

🛑 बाबापण भारी देवा

🛑 बाबापण भारी देवा


          माझे बाबा आज अठ्ठयाहत्तर वर्षांचे आहेत. गेली  अठठेचाळीस वर्षे मी त्यांच्यासोबत आहे. आमचे बाबा खूप भारी आहेत. हे फक्त मीच नाही सांगत. आमचे अनेक मित्र आणि नातेवाईक यांनीही त्यांना भारी म्हटलेले आहे. 

          आज फादर्स डे आहे. पूर्वी आम्हांला हे असं काही असतं ते माहित नव्हतं. आमच्यासाठी रोजच फादर्स डे. बाबांनी नेहमीच आम्हांला नवीन काहीतरी सांगितलेलं असतं. ते असं काही शिकवून जातात कि ते कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही. पुस्तकाबाहेरची शाळाच आहेत आमचे बाबा. 

          माझं आणि त्यांचं अनेकदा चांगलंच जमतं. कधीतरी वाद होणं हेही पुढे चांगलं काही घडण्याची नांदी असतात असं मी नेहमीच समजत आलोय. आम्ही बाबांचं नेहमीच ऐकत आलोय म्हणून आज असे आहोत. ऐकलं नसतं तर कुठेही असलो असतो. प्रत्येक वेळी ते आमच्या सोबत असतात. सुखात कमी आहेत असे वाटेल, ते जास्त जाणवू देत नाहीत. पण दुःखात ते अधिक सोबत करतात. 

          ते सतत सत्य बोलतात. खोटे त्यांना आवडतच नाही. आम्ही आजची मुलं सत्य तोंडातच ठेवतो. दुसऱ्यांना चांगलं वाटावं असंच बोलत राहिल्यामुळे सत्य बाहेर पडत नाही हा आमचा दोषच म्हणायला हवा. बाबांचं सत्य बोलणं सर्वांनाच कितपत आवडेल असं आम्हांला वाटत राहतं आणि वाद सुरु होण्यास सुरुवात होते. हे असले वाद तकलादू असतात. ते मजबूत नसतात. त्यामुळे काही मिनिटांत आम्ही पुन्हा होते तसे होऊन जातो. शब्दांचा महापूर कधीच वाहून दूरदूर गेलेला असतो. या शब्दपुराने केलेली पडझड बोलून गेल्यानंतर सतत पिच्छा पुरवत राहते. जन्मदात्या वडिलांना वाईट वाटेल असे बोलणे खरंच समर्थनीय नाहीच. अशा मुलांना शिक्षा भोगावी लागणारच. तरीही आई बाळाला आपले काळीज देत असते, तसे बाबा आपले हृदय द्यायला नेहमीच तयार असतात. 

          मी त्यांची काळजी कितीवेळा घेतली आहे ते मोजत बसलेलो नाही. पण त्यांनी माझी नेहमीच काळजी घेतलेली आहे. मी कधी, कुठे गेलो आहे, काय काय करतो आहे, हे सर्व त्यांना माहित असावंच लागतं. ते माझ्याकडे असतात तेव्हा त्यांना ते माहिती असतंच. पण ते दुसरीकडे कुठे गेले असतील तर माझ्या पत्नीला फोन करुन रोजची खुशाली घेतल्याशिवाय राहणार नाहीतच. 

          हल्लीच माझे डोळ्याचे ऑपरेशन झाले. मला सुट्टी असल्यामुळे मी घरातच होतो. ऑपरेशन करणं सोपं असतं. पण त्यानंतर तीन महिने सतत ड्रॉप घालत राहणं अवघड असतं. बाबांनी ते काम नेहमी लक्षात ठेवून केलेलं आहे. माझ्या लक्षात नसेल त्यावेळी त्यांनी आठवण करुन ड्रॉप घातला आहे. बाहेर जाता येताना काय काळजी घ्यायची हे डॉक्टरांपेक्षा त्यांनी मला जास्त समजावून सांगितले आहे. 

          मीही आता एक पालक आहे. तरीही त्यांच्यासारखा पालक होणे आम्हांला जमेल असे अजिबात वाटत नाही. नोकरी असल्यामुळे आम्ही आज जे करु शकत आहोत, ते त्यांनी नोकरी नसताना करुन दाखवलं आहे. त्यांचे अनेक मित्र त्यांची आठवण काढत असतात. अजूनही माझे बाबा आपल्या जिवलग मित्रांना भेटायला जातात. फोन करतात. आम्हांला एवढे जमत नाही म्हणून आम्ही त्यांच्यावर त्रागा करतो. 

          आज सीसीटीव्ही कॅमेरे असतात. बाबांचं आमच्या वर्तनावर त्यापेक्षा जास्त पटीने लक्ष असतं. आमच्याकडून काहीही चुकीचं घडू नये यासाठी त्यांचा आटापिटा असतो हे आमच्या लक्षात येत नाही. दोन पिढ्यामधील हे अंतर आम्हांलाही पुढे त्रास देणार आहे हे आम्हांलाही आता कळू लागलं आहे. 

          बाबांचा धाक आणि आईचं निष्पाप प्रेम आम्हांला सुसंस्कारीत करुन जाण्यासाठी महत्वाचं ठरलं आहे. लहान असताना माझ्या डोळ्यात नीज दाटून आल्यानंतर त्यांच्या छातीत घुसून झोपणारा मी अजूनही त्यांच्यासाठी तेवढाच लहान आहे हे सांगताना माझे दोन्ही डोळे पाण्याने भरुन आले आहेत हे अगदी सत्य आहे. 


©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. 1

माझा पहिला शाळा प्रवेश

🥘 माझा पहिला शाळा प्रवेश 

    आज मला शिक्षक होऊन अठ्ठावीस वर्षे झाली आहेत. १५ जून हा दिवस मला दरवर्षी जुन्या आठवणींमध्ये घेऊन जात असतो. मी सहा वर्षाचा असताना मला शाळेत नेताना घरच्यांना खूप त्रास झाला असेल. कारण मी काही शाळेत जायला तसा तयार नव्हतो. 

    पण माझे शाळेत जाणे माझ्यावर अजिबात अवलंबून नव्हते. ते माझ्या पालकांच्या मनावर होते. त्यावेळी माझे चार पाच पालक होते. माझे बाबा , माझी आई , माझी ताई , माझी आक्का , माझे दोन काका असे सहा पालक होते. माझ्यावर या सर्वांची सत्ता चाले. यापैकी कोणाचेही ऐकावेच लागे . त्यांच्यापैकी कोणीही मला शाळेत नेण्यासाठी कधीही तयार होण्याची जास्त शक्यता असे. 

    ताई आणि आक्का दोन्ही भावंडे माझ्यापेक्षा सिनियर असल्याने त्यांना शाळेत जाण्याचा अधिक अनुभव होता. कधीतरी त्यांच्यासोबत शाळेत गेलोही असेन. शाळेतले गुरुजी , बाई बघून मला त्यांची नेहमी भीतीच वाटे. त्यात एक धोतरवाले मुख्याध्यापक शिक्षक होते. साधी राहणी असलेले गुरुजी. पण त्यांच्या कडे मला बघायला भीती वाटे. एक दोन बाई मला जवळ घेण्याचा प्रयत्न करीत. पण मी त्यांच्या जवळ जातच नसे. माझ्यासमोर काही मुलांना ओरडताना , पट्टीने मारताना मी पहिले होते. तेव्हापासून तर मी धसकाच घेतला होता. 

    आता माझी शाळेत जाण्याची पाळी आली होती. माझ्यासाठी दप्तराची पिशवी बाबांनी स्वतः शिवून दिली होती. वेगवेगळ्या रंगांचे तुकडे एकत्र करुन शिवलेली ती दप्तराची पिशवी मला सुरुवातीला गोधडीसारखी वाटे. माझी आई नेहमी गोधड्या शिवायची. बाबांनी कपडे शिवताना कापून खराब झालेले छोटे छोटे तुकडे ती गोधडीसाठी वापरायची. त्या गोधडीरूपी पिशवीत माझ्यासाठी पुस्तके , पाटी , खडू घालून मला ते पाटीवर मारुन शाळेत न्यायचे होते. 

    मी दुसऱ्या दिवसापर्यंत शाळेत जाण्याची तयारी करीत होतो. तयारी म्हणजे माझ्या मनाची तयारी. कदाचित ही मनाची तयारीच माझी झालेली दिसत नव्हती. गोधडीसारखी दिसणारी ती पिशवी पाठीला लावून मी शाळेत जाण्याची नक्कल छान वटवत होतो. अखेर तो दिवसही उजाडला. मला सकाळी लवकर उठवण्यात आले. मशेरी लावण्यात आली. त्यावेळी आम्ही रतनज्योत नावाची मशेरी लावत असू. ती नसली तर राखुंडी किंवा कोळसा रगडून त्यापासून मशेरी तयार करीत असू. त्यावेळी टूथपेस्ट म्हणजे काय ते आमच्या घरात माहित नसावे. कारण मोठी माणसे तंबाखू भाजून त्याची मशेरी लावताना दिसत. चुलीत पत्रा टाकून त्यावर तंबाखू भाजला जात असताना माझ्या नाकात जो वास गेला आहे तो अजूनही जात नाही. मग ही मोठी माणसे तंबाखूची काळी मशेरी लावत लावत परसाकडे जात. तिथून आल्यावर सुद्धा यांची मशेरी लावणे सुरुच असे. मग गप्पागोष्टी सुरु होत. मशेरी गालावर चांगलीच ओघळू लागे . दात चांगले घासतो आहोत असे दाखवण्यासाठी ते उजव्या अंगठ्याचा अधिकवेळा वापर करीत. तोंड आणि हात दोन्ही काळेकुट्ट होऊन गेलेले मी अनेकदा पाहिलेले आहे. 

    मी मात्र रतनज्योतीने माझे इवलेसे दात पाजळत बसलो होतो. मोठी माणसे बराच वेळ मशेरी लावतात म्हणून मीही त्या दिवशी बराच वेळा दात पाजळण्याचे ठरवले असावे. तोपर्यंत बाबांची ऑर्डर कानावर आली. " झिला , आजपासून तुका शाळेत जावचा आसा. " आईने मला भरभर आंघोळ घातली. पुसून घेतले. देवाकडे दिवा लावला. देवापुढे साखर ठेवली. वंशाचा दिवा असल्याने देवाकडे दिवा लावला असेल हे मला त्यावेळी अजिबात कळलेले नव्हते. पण आज कळले आहे. आजचे काही पालक आजही आपल्या मुलींपेक्षा मुलाला जास्त सोयी सुविधा उपलब्ध करुन देतात तेव्हा खूप वाईट वाटते. 

    माझी दप्तराची पिशवी पाठीवर अडकवली गेली होती. माझ्या बाबांची ऑर्डर म्हणजे ऑर्डर. त्यांची ऑर्डर ऐकावीच लागली. मी आणि माझ्या मोठ्या दोन बहिणी शाळेला निघालो. दोन्ही बहिणी कधीच तयार झाल्या होत्या. त्या माझी तयारी होण्याची वाट पाहत ताटकळल्या असाव्यात. आता मात्र माझ्या डोळ्यांतून ' गंगा यमुना ' दोन्ही नद्या वाहू लागल्या होत्या. मला माझ्या आईचा सहवास हवाहवासा वाटत होता. तिला सोडून शाळेत जाणं माझ्या जीवावर आलेलं होतं . माझ्या डोळ्यातलं पाणी बघून आईच्या डोळ्यांत पाणी तरळलं. ती मुळातच हळव्या स्वभावाची. मी अधिकच हुंदके देऊन रडू लागलो होतो. पण माझ्या रडण्याचा माझ्या बहिणींवर कोणताही परिणाम होत नव्हता. त्यांना आधीच उशीर झालेला होता. मोठ्या बहिणीने मला हलकेच ओढून बघितलं. पण मी अधिक जोर लावून आईला चिकटून बसलो होतो. आईलाही मला सोडवत नव्हतं. तिला मी जसा बिलगू लागलो , तशी तीही रडत रडत मला शाळेत जाण्याविषयी लाडेलाडे सांगू लागली. माझा लहान भाऊ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होता. तो शाळेत जाणार नव्हता आणि मी मात्र शाळेत जायचे हा माझ्यावर अन्याय होत आहे असे मला वाटत होते. 

    अखेर माझ्या दोन नंबर बहिणीने आक्काने मला जोरात ओढलेच. मी आईच्या कुशीतून सुटून मोठ्या संकटात सापडायला जात आहे असे मला त्यावेळी वाटत होते. दोन बहिणींनी दोन बाजूंनी धरुन नेताना मला दोन बगळ्यांची आणि कासवाच्या गोष्टीची आठवण येत होती. शाळेच्या रस्त्याकडे माझे लक्षच नव्हते. मी जमिनीला नीट पायसुद्धा लावत नव्हतो. माझ्या बहिणी मात्र जिद्दी होत्या. त्या मला फरफटत नेत होत्या. जाता जाता बाबांची भीती दाखवत होत्या ते वेगळेच. आमचे दुकान आणि शाळा यात फारसे अंतर नव्हते. त्यामुळे मला पहिल्यांदा दुकानात नेण्यात आले. माझे रडवेले तोंड बाबांना दाखवूनच मला शाळेकडे जायचे होते. 

    बाबांनी काठी काढण्याच्या अगोदर शाळेत गेलेले कधीही चांगले म्हणून मी माझ्या बहिणींबरोबर शाळेची वाट न फरफटत चालू लागलो. शाळेत गेल्यावरही मला माझ्या आईची अतिशय आठवण येत होती. मी स्फुंदून स्फुंदून रडत होतो. पण मला जवळ घेणाऱ्या बाईंना मी अजिबात आई मानत नव्हतो. शाळेतील इतर मुलांबरोबर खेळता खेळता मला शाळेची ओढ वाटू लागली होती. काळ्या दगडी पाटीवर बाईंनी भला मोठा ' ग ' काढून दिला होता. शाळा सुटेपर्यंत मी तो गिरवून गिरवून त्याची पुरती वाट लावून टाकली होती. गणपतीच्या नावातील या ' ग ' ने आज मला शिक्षक बनवले हे आज कोणालाही खरे वाटणार नाही. 


Ⓒ प्रवीण अशितोष कुबल ( मुख्याध्यापक , शिडवणे नं. १ ) 

Tuesday, April 23, 2024

परीक्षा संपल्या , आत्ता मज्जा

     नुकत्याच परीक्षा संपल्या आहेत आणि सुट्ट्या सुरु होण्याचा हंगाम सुरु झाला आहे. मार्च , एप्रिल हे दोन महिने परीक्षांचे महिने म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या दोन महिन्यांची संपण्याची वाट सर्वच परीक्षार्थी करत असावेत. 

    आम्ही त्यावेळी परीक्षांच्या दिवसांत खूप अभ्यास करत असू. नेहमी पुस्तकांच्या सानिध्यात राहत असू. पुस्तके म्हणजे पाठ्यपुस्तके. ही पाठ्यपुस्तकेच आमचे मित्र झालेले होते. त्यांचा सहवास सतत लाभण्याचे ते दिवस आठवले की मस्त वाटते. 

    आता मुले अभ्यासाचा कंटाळा करताना दिसतात. पुस्तकांचा सहवास तर त्यांना नकोच असतो. काही अपवाद सोडले तर अनेकांना परीक्षेपुरता अभ्यास करताना पाहून खूपच वाईट वाटते. आजची मुले फक्त परीक्षार्थी झाली आहेत की काय ? परीक्षा आल्या कि अभ्यास करायचा एवढेच त्यांचे म्हणणे असते. वाचन करायला सांगितले तर त्यांना झोपा येतात. अभ्यासाची पुस्तके वाचणे तर त्यांच्या जीवावरच येते. 

    आज प्रसार माध्यमे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यावर अनेक प्रकारचे लिखाण उपलब्ध असते. मुलांना हे सर्व प्रकारचे वाचन करण्याची अनमोल संधी असते. 

Thursday, February 29, 2024

🛑 दक्ष राहणारी दक्षता

 🛑 दक्ष राहणारी दक्षता

          माणसं जन्माला येतात, मरुनही जातात. कधीतरी मरुन जाणार हे प्रत्येकाला माहित असतं. माणसाचं मरण कधी येणार हे माहित असतं तर!!! तर माणसाची जगण्याची इच्छाच मरुन गेली असती. मरणार कधी हे माहित नसतं, म्हणून आपण सुखाने जगत राहात असतो.

          काही लोकांचं वय झालेलं असतं. त्यांना त्यांच्या जीवनाचा कंटाळा आलेला असतो. कंटाळून जगणं हेच त्यांच्या जीवनाचं गणित झालेलं असतं. ज्यांना जगायचं असतं, त्यांना मात्र नियती लवकर का घेऊन जाते ते समजत नाही. जगायची तीव्र इच्छा असते. जीवनाकडे आशेने पाहत असताना अचानक एखादी व्याधी जडते आणि जगण्याच्या उमेदीचेच खच्चीकरण होते.

          दक्षता एक गुणी मुलगी. खेड्यात राहणारी. तिचे कुटुंब अतिशय प्रेमळ. तिचे आई, वडील, बहिण, भाऊ, आजी सगळे दक्षताला जीव की प्राण. तिनेही या सर्वांवर अतिशय जीव लावला. तिला गप्पा मारायला खूप आवडत असे. ती गप्पांमध्ये रंगून जाई. तिचा हसरा चेहरा त्यावेळी अधिक खुलून दिसे.

          तिचं बोलणं, वागणं, मिसळणं, मैत्री करणं लक्षात राहण्यासारखंच होतं. तिची आणि माझी भेट तिच्या वडिलांमुळे झाली. वडील समाजाची सेवा करण्यात आनंद मानणारे. समाजाची सेवा करताना त्यांनी आपल्या मुलांनाही चांगले संस्कार दिले हे विसरून चालणार नाही. आपल्या मुलांना मार्गदर्शन करताना आपल्या समाजातील मुलांनाही मार्गदर्शन करताना ते नेहमीच तहानभूक हरपून जात असतात.

          मुलगी शिकली की पुढे काय करावे हा प्रत्येक बापाला प्रश्न पडतो. दक्षताच्या बाबांनी तिला ब्युटीपार्लरचे शिक्षण देण्याचे ठरवले. एका प्रसिद्ध ब्युटीपार्लरमध्ये ती ' कमवा आणि शिका ' पद्धतीने शिकू लागली. एकदा बघितले की दक्षताला चांगले लक्षात येई. तिने सर्व प्रकारच्या थेरपी लवकरच आत्मसात केल्या. बोलता बोलता तिचे हातसुद्धा सफाईने चालत असत. तिचं बोलणं गोड होतं. त्यामुळे तिच्या हातून ब्युटी थेरपी करायला आलेली महिला कस्टमर खुश होऊन जाई. दिसत असे शिकण्यात सुंदर रितीने निघून जाताना समाधान आणि सुखाचा अनुभव येत होता.

          अचानक दक्षताला त्रास सुरु झाला. तिला कॅन्सर असल्याचे समजले तेव्हा तर संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. ती स्वतः मात्र खंबीर होती. तिने धीटपणे दुर्धर व्याधीला पळवून लावण्याचे ठरवले होते. तिच्या वागण्या - बोलण्यात काहीच फरक जाणवत नव्हता. ती जशी पूर्वी होती, तशीच हसरी मुद्रा घेऊन समोर येई. तिचे दुःख तिने स्वतःच सूर्यासारखे गिळून टाकले होते. कर्करोगाला पळवून लावण्याचं धारिष्ठ्य करणारी दक्षता अजिबात हार मानायला तयारच नव्हती.

          ती आली की हसतमुखाने यायची. तिची लहान मुलांशी लगेच मैत्री व्हायची. मग तिच्या अमर्याद गप्पा सुरु होत. ती मनुष्यवेल्हाळ होती. तिला माणसांमध्ये राहायला खूप आवडे. तिने एकदा मैत्री केली की कायमची. तिच्या अनेक मैत्रिणी होत्या, तसे मित्रही. तिची मैत्री निरागस होती.

          बऱ्याचदा तिला केमोथेरपीसाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावे लागे. तिथल्या स्टाफबरोबर तिने मैत्री केली होती. केमोमुळे तिचे केस जाऊ लागले होते. ब्युटी थेरपी करणारी मुलगी केसांच्या गळण्याने डगमगली नाही. तिने निकराने प्रतिकार केला. ती आली की तिचा निस्तेज झालेला चेहरा पाहून काळीज आतून चर्र होई. ती आपल्या त्या जीवनावर अजिबात नाखुश नव्हती.

          त्यादिवशी तिला ताप आला होता. ताप आला आणि तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. डॉक्टर उपचार करण्यासाठी पुन्हा लांबच्या हॉस्पिटलमध्ये नेणे भाग होते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला तिला होणारा त्रास असह्य मानसिक वेदना देत होता. हॉस्पिटलाईज करुन सुद्धा तिच्या तब्येतीत काहीच चांगला फरक पडत नव्हता. तिचे शरीर निश्चल पडू लागण्याची लक्षणे डॉक्टरांनाही दिसू लागली होती. तिचा हसरा चेहरा हळूहळू शांत शांत होत जाऊन कायमचा शांत झाला होता. तिचे हसणे आता पुन्हा कधीही पाहता येणार नव्हते. कायमची दक्ष असणारी दक्षता खूप खूप दूर निघून गेली होती.

©️ प्रवीण अशितोष कुबल, कणकवली

Saturday, November 11, 2023

🛑आली दिवाळी

 🛑 दिवाळ सण आला

          दरवर्षी दिवाळी सण येतो. प्रत्येक वर्षाला नवीन आकर्षण असते. तो येतो तेव्हा उत्साह घेऊनच येतो. माणसं तीच असतात, त्यांच्यात उत्साह मात्र नवीन येत असतो.

          शाळांना सुट्ट्या लागतात. दिवाळीची सुट्टी हिवाळी सुट्टी म्हणून देण्यात येते. यंदा हिवाळी सुट्टीत हिवाळा जाणवताना दिसत नाहीय. नोव्हेंबर आला तरी गारवा, थंडी कुठे अनुभवायला मिळताना कठीणच झालेली दिसते आहे. कपाटातील स्वेटरे तशीच पडून आहेत.

          उद्या नरक चतुर्दशी. अनेक ठिकाणी नरकासुराचे मोठाले देखावे मांडले जातात. स्पर्धा भरवल्या जातात. अगडबंब राक्षस जाळले जातात. भावना महत्वाची असल्याने सगळेच त्यात सहभाग घेताना दिसतात.

          सकाळी लवकरच फटाक्यांच्या अतिशबाजीने जाग येते. शहरात रात्री बारा वाजल्यानंतर फटाके सुरु होतात, ते सकाळी दिसू लागले तरी वाजतच असतात. कानठळ्या वाजवणारे बॉम्ब बोंब मारत असतात. रोशनाईने शहरे झगमगून उठतात. लोकांच्या रोमारोमात चैतन्य संचारु लागते. तेही त्या आवाजाचा एक भाग बनून जातात.

          अभ्यंग स्नान करताना सुगंधी उटण्याचे सार्थक होते. अंग सुगंधाने दरवळू लागते. गरमागरम पाण्याचा शिडकावा अंगावर घेताना शहारे येतात. नवीन फोडलेला सुगंधी साबण अंगावर चोळताना पूर्वीची दिवाळी आठवून शहाऱ्यांची संख्या वाढत जाते.

          बाहेर पेटणाऱ्या पणत्या, आकाशकंदील हसत हसत नव्या दिपवर्षाचे स्वागत करताना अधिक सुंदर दिसू लागतात. आईने केलेल्या फराळाचा वास तोंडात पाणी आणू पाहत असतो. नवीन खरेदी केलेले कपडे आज घालताना खूप मस्त वाटत असते. कांदेपोहे, चकल्या, करंज्या आणि लाडवांची ताटे समोर येऊ लागतात. फराळ खाण्याचा अतिआग्रह केला जातो. हे खाऊ कि ते खाऊ असे होऊन जाते. गोड पदार्थांपेक्षा तिखट व कुरकुरीत पदार्थांचा फडशा पाडला जातो.

          जवळच्या मंदिरात काकड आरती सुरु होते. अजित कडकडे आणि सुरेश वाडकरांची गाणी कानांना तृप्त करु लागतात. परिवारासह मंदिरात जाताना वाटेतले विविध प्रकारचे आकाशकंदील, आकर्षक रांगोळ्या पाहताना मनाला अपार आनंद होऊ लागतो.

          तुळशी वृंदावनासमोर कडू कारेटांची फोडलेली रांगोळी दिसू लागते.



Friday, November 10, 2023

तुम्ही लिहित आहात का ?

 🔴 तुम्ही लिहित आहात का ? 

          हल्ली बरेच दिवस काहीतरी लिहावं असं वाटतंय !!! खरंच , लिहावं आणि मोकळं व्हावं असं वाटत असेल प्रत्येकालाच. पण वेळ कुठे मिळतोय लिहायला ? लिहायला सुचतंय खूप. लिहायला बसायला वेळ कसा तो मिळत नाही. 

          लिहायला बसलो कि काहीतरी काम समोर येऊन उभं राहतं. मग तेच काम महत्त्वाचं वाटतं. लिहिणारा मग ते काम करण्यात दंग होतो. लिहिणं राहूनच जातं. माझं हल्ली अगदी असंच होतंय. 

          मघाशीच माझा एक लेखक मित्र भेटला. त्याने आपली गाडी काहीशी स्लो केली. त्यालाही गडबड होतीच. तरीही त्याने मला हाच प्रश्न विचारला , " अरे प्रवीण , तू लिहितो आहेस ना ? " मी त्याला माझ्या कामांची यादी पुढे केली. त्यालाही ते पटलं. तो म्हणाला , " तुझं म्हणणं अगदीच बरोबर आहे मित्रा , पण तू तुझं लिहिणं सोडू नकोस " त्याच्या म्हणण्यात तथ्य होतं. मी त्याचं ते म्हणणं गंभीरपणे घेतलं आणि लिहायला सुरुवात केली. 

          माणसाने आपल्या जगण्यात आवडीच्या गोष्टी केल्या नाहीत , तर त्याचं जगणंच निरस होऊन जातं. मला वाचनाची आवड आहेच , पण त्याहीपेक्षा लेखनाची अधिक आवड आहे. मी एकदा लिहायला बसलो कि थांबता थांबत नाही. माझा लेख पूर्ण होईपर्यंत व्यत्यय आला नाही तर मी माझं भाग्यच समजतो. पण व्यत्यय आला नाही असं होतच नाही मुळी. 

          मी एक शिक्षक आहे. शिक्षकाने जसं सतत वाचत राहायला हवं , तसंच त्यानं प्रसंगानुरुप लिहीत सुद्धा राहायला हवं. लिहायला वेळ मिळत नसेल तर वेळ काढायला हवा. तुमच्या मनात आलेले विचार व्यक्त करायला हवेत. एकदा का तुमची लिहिण्याची सवय गेली की पुन्हा तुम्हाला लिहिताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल. 

          लिहिता म्हणजे तुम्ही नक्की काय करता ? तर तुमच्या मनातील विचारांना वाट करुन देत असता. एकदा विचार सत्यात प्रकटले की तुम्ही तुमच्या विचारांना योग्य दिशा मिळालेली असते , विचारांचा निचरा झालेला असतो. अन्यथा विचारांचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही. 

          तुमचे अनमोल विचार वाचण्यासाठी अनेक वाचक उत्सुक असू शकतात. त्या वाचकांची तहान भागवणे हेही तुमच्या लेखनाचे ध्येय असू शकते. तुम्ही स्वतः ताणतणावमुक्त होऊन जाता ही गोष्ट वेगळी. सतत सर्जनशील संकल्पना निर्माण करण्याची तुमची क्षमता वापरली कधी जाणार ? 

          तुमचे मित्र तुम्हाला एखादी चांगली गोष्ट सांगत असतील तर नक्की ऐका. तुम्ही तुम्हाला एका चांगल्या वाटेने नेत आहात हीसुद्धा चांगलीच गोष्ट आहे. नाही का ? 



Wednesday, September 6, 2023

🛑 सर्वांची माई गेली

🛑 सर्वांची माई गेली

          प्रत्येकाला एक आई असते. आपल्या आईवर आपण जिवापाड प्रेम करतो. ती आपल्यावर निरतिशय प्रेम करत असते.  आईला अनेक मुले असली तरी सर्वांवर तिचे तितकेच प्रेम असते. 

          आमची बिडवाडीची आत्या सर्वांची आईच होती. तिला सर्वजण माई या नावाने हाक मारत. हिंदीतील माँ आणि मराठीतील आई या दोन शब्दांचा संगम म्हणजे ' माई ' हे संबोधन तयार झाले असावे. माई या शब्दातच अपार माया भरलेली आहे. माई होतीच तशी. अतिशय मायाळू. तिची माया तिच्या शब्दांतून प्रकट होत असे. तिच्या डोळ्यांत माया दिसे. ती सर्वांना दिसत नसे. ती निर्मळ माया पाहणारा विरळाच. 

          माझ्या बाबांपेक्षा एक ते दोन वर्षांनी मोठी असलेली माझी आत्या सर्वांची खऱ्या अर्थाने माईच होती. तिच्या मालवणी गावठी भाषेतील माया तिच्या शिवराळ शब्दांतून प्रकट होई. ती खूपच परखड होती. तिचा आवाजही मोठा होता. त्या आवाजात अजूनही जरब होती. ती कधीही कोणालाही घाबरलेली नव्हती. 

          आम्हां भाचरांवर तिचं खूपच प्रेम. आम्ही तिच्याकडे गेलो कि ती मायेने आमचं सगळं करीत असे. जेवू खाऊ घाली. तिच्या हाताची चवच भारी. काहीही खाल्ल्याशिवाय तिने आम्हांला कधीच पाठवले नाही. ती आमच्या पाठीवरुन मायेने हात फिरवी. तिच्या मायेची ऊब आता पारखी झाली आहे. तिच्या घरी आता जी उणीव निर्माण झाली आहे , ती कधीही भरुन न येणारी पोकळीच आहे. आमचे चुकले की ती आमच्यावर रागवायची. तिचे रागावणे बरोबरच असे. तिला सर्वांनी व्यवस्थित असावे , सुखी , समाधानी असावे असे वाटे. तिने कधीही कोणाकडूनही कसलीच अपेक्षा केली नव्हती. आमच्याकडून तर मुळीच नाही. तिच्याकडून जाताना ती आमच्या हातात काहीतरी दिल्याशिवाय पुढे पाठवत नसे. ती निस्वार्थी आणि धार्मिक होती. 

          ती आपल्या नातवंडांना बोलबोल बोलायची. पण त्यांनी वेळीच खावे , अभ्यास करावा यासाठी तिचा तीळ तीळ तुटताना मी बघितले आहे. 

          तिचे पती म्हणजेच आमचे ' जिजी ' एक सुप्रसिद्ध वैद्य होते. त्यांच्यावर तिचे खूप प्रेम होते. ते गेले आणि ती दुःखी झाली होती. तिचे रिक्त कपाळ पाहून आम्हांलाही वाईट वाटे. नवरा गेल्याचे दुःख फक्त त्या बाईलाच असते. तिचे ते दुःख कोणीही काहीही केले तरी कमी होणारे नसते. 

          दोन मुलगे , दोन सुना , नातवंडे , एक मुलगी , जावई आणि आम्ही जवळचे नातेवाईक तिच्या जवळ असलो की तिच्या बोलण्याला बहर येई. ती बोलत राही. तोंडात दात नसले तरी न चावता येणारे पान चघळत राही. 

          ती आजारी पडली. तिचा आजार वाढत गेला. तो कमी होण्याची चिन्हे दिसेनात. मुलांनी बरेच प्रयत्न केले. पण ती पुरती थकून गेली होती. आता तिला थांबावेसे वाटत नव्हते. ती कोणालाही ओळखेना. ती फक्त डोळे उघडून बघायची. मानेने होकार किंवा नकार द्यायची. ती स्वतःच्या आजाराला कंटाळली होती. अखेर तिने अखेरचा श्वास घेतला. एक गावप्रसिद्ध माई सर्वांनाच कायमची सोडून गेली होती. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , मुख्याध्यापक

शाळा शिडवणे नं.१



आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...