Friday, November 25, 2022

🛑 होईल समदं ठिक

 🛑 होईल समदं ठिक


          कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण आम्हां सर्व शिक्षकांसाठी महत्त्वाचे होते. नेरुर माड्याची वाडी माध्यमिक विद्यालयातील एक दिवस सर्वच उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला असेल. माझ्यासाठीही हा प्रशिक्षण दिवस अनमोल असाच होता. 

          प्रत्येक तालुक्यातील दहा निवडक शिक्षकांची निवड करण्यात आली होती. तसं पाहिलं तर सगळेच शिक्षक निवडकच असतात. त्यातून निवडून काढणं जिकिरीचे काम असावे. किंवा स्वतःहून प्रशिक्षणाला जाणारे मोजके असावेत. कारण प्रशिक्षण करण्यापेक्षा शाळेत काम करणं काही शिक्षकांसाठी अधिक महत्त्वपूर्ण असतं. अर्थात सर्व शिक्षक हे शाळेत शिकविण्यासाठीच असतात , तरीही शाळेचा एक एक दिवस विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाचा असतो. आपल्या वर्गशिक्षकांची ते आतुरतेने वाट पाहत असतात. 

          प्रत्येक शिक्षकासाठी प्रशिक्षण हे नवनवीन अनुभवांची शिदोरी उघडण्यासारखं असतं. ते उघडून बघितल्याशिवाय आणि त्याचा परिपूर्ण आस्वाद घेतल्याशिवाय त्याची चव कशी समजणार ? जेवणात विविध प्रकारच्या संतुलित आहाराचे सेवन करताना जशी तृप्ती होते , तसा तृप्तीचा ढेकर कालच्या प्रशिक्षणात घेता आला. 

          प्रारंभीच माड्याची वाडी शाळेच्या वाद्यचमूने केलेलं उत्साहवर्धक स्वागत  भारावून टाकणारं होतं. अतिथींचं असं झालेलं स्वागत आमच्यासाठी तसं नवीन नव्हतं. आतापर्यंत आम्ही पदाधिकारी , अधिकारी यांचं स्वागत केलं होतं , आज आमचं असं धुमधडाक्यात झालेलं स्वागत भाव खाऊन गेलं. 

          सिंधुदुर्ग शिक्षण विभाग , माड्याची वाडी शिक्षण संस्था आणि भगीरथ प्रतिष्ठान यांच्या वतीनं घेतलं गेलेलं कौशल्य विकासाचं प्रशिक्षण प्रत्येक शिक्षकाला खूप अनुभुती देऊन गेलं. असं आगळं आणि वेगळं प्रशिक्षण कदाचित प्रत्येक शिक्षकाच्या आयुष्यातील पहिलंवहिलं आणि अविस्मरणीय असावं असं म्हटलं तरी वावगं ठरु नये. 

          औपचारिक स्वागतासाठी जास्त वेळ खर्च न करता प्रत्यक्ष प्रशिक्षणाला आरंभ झाला. माड्याची वाडी विद्यालयाने केलेले शैक्षणिक प्रयोग व व्यावसायिक होण्याचे धडे देणारी संस्कार शाळा पाहून सगळे शिक्षक अचंबित झालेले दिसले. विद्यालयाचे सर्व विद्यार्थी , शिक्षक आणि कर्मचारी आपापलं दिलेले काम मनापासून करत होते. प्रत्येकाचं सादरीकरण आत्मविश्वासयुक्त होतं. त्यात नाटकी भाव अजिबात नव्हता. येथील सर्व शिक्षक मुलांकडून हे सर्व कधी करुन घेतात हा प्रश्न आम्हां प्रत्येकाला पडला. कार्यानुभव विषयांच्या तासिका एकत्र करुन शुक्रवारी आणि शनिवारी जास्तीचा वेळ देऊन हे सर्व उपक्रम राबवले जातात. शाळेचा एक ठराविक वेळ असला तरी अभ्यासक्रम पूर्ण करुनच या उपक्रमांची नियोजनपूर्वक अंमलबजावणी केली जाते हे विशेष आहे. 

          या कार्यशाळेत शाळेने केलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. मधुमक्षिका पालन प्रत्यक्ष दाखवण्यात आले. शाळेतील दोन मुलींनी मधमाश्यांना न घाबरता त्याचे सादरीकरण केले होते. त्यांना प्रशिक्षित करणाऱ्या चेंदवणकरसरांसारखी माणसं या क्षेत्रात कार्यरत असतील तर मुलांचं व्यावसायिक प्रशिक्षण खऱ्या अर्थाने होऊ शकतं. टाकाऊ पासून टिकाऊ हे ब्रीदवाक्य मानून केलेलं वेल्डिंगचं कामही तसंच. आय बी टी च्या माध्यमातून मुलांना प्रशिक्षित करताना शाळेतील अभ्यासात हुशार नसणाऱ्या पण व्यावसायिकतेकडे वळू शकणाऱ्या ऐशी टक्के पटसंख्येचा केलेला विचार अतिशय योग्य वाटतो. नोकरीसाठी शिक्षण घेण्यापेक्षा स्वतः व्यावसायिक होऊन दुसऱ्यांना नोकरी देणारं शिक्षण इथं दिलं जातं. 

          इथल्या स्वच्छता गृहातही भिंतींवर गणिताची महत्त्वाची सूत्रे प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारी अशीच. खाद्यपदार्थ विभागातील प्रत्येक पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवलेले. स्थानिक जत्रेतील त्यांचे स्टॉल्स शाळेचं आर्थिक उत्पन्न आणि विद्यार्थ्यांचं अर्थार्जनाचं ज्ञान वाढवणारे आहेत. एकदा का या मुलांचा व्यवसायातील आत्मविश्वास वाढला की ही मुले आयुष्यात कधीही कमी पडू शकणार नाहीत हा आत्मविश्वास देणारे शिक्षक या शाळेला लाभले आहेत हे नाकारुन चालणार नाही. गुरुने दिलेला ज्ञानरुपी वसा ही मुले पुढे पुढे नक्की चालवतील याचीही खात्री झाल्याशिवाय राहत नाही. 

          मुलांनी केलेली हस्तकला , आधुनिक शेतीतील केलेले विविध नवनवीन प्रयोग पाहून हे बघू की ते बघू असे होऊन गेले. हे सगळं एका दिवसांत पाहत असताना त्याचं ऑटोमॅटिक ट्रेनिंग आमच्या मेंदूत नोंद होत गेलं. 

          डॉ. प्रसाद देवधर यांनी केलेले भगीरथ प्रयत्न येथे अधोरेखित करणारे आहेत. प्रत्येक उपलब्ध वस्तूचा केलेला जाणीवपूर्वक वापर हे त्यांच्या यशाचं गमक आहे. आपणही असा विचार केला तर आपल्याला जमू शकतं हा विश्वास या प्रशिक्षणानं प्रत्येकाला दिला. 

          प्रत्येक शिक्षकाला यात बोलतं करताना त्यांच्याकडून अपेक्षित काढून घेण्याची कला डॉ. देवधर यांनाच जमू शकते. त्यांनी खूप कमी वेळेत ते दाखवून दिले आहे. ठरवलं तर शिक्षकच ही गोष्ट करु शकतात यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. या विश्वासाकडे त्यांनी जास्त लक्ष दिलेलं होतं. काही शिक्षकांनी आपल्या सादरीकरणात केलेलं विश्लेषण नवनवीन अनुभवांची भर घालणारं होतं. कमी निधीचा कसा छान वापर करता येतो हेही त्यांनी सांगत असताना त्यांचे प्रत्यक्ष अनुभव खूप शिकवून जाणारे होते. 

          यावर खूप लिहिण्यासारखे असले तरी हे प्रशिक्षण एका छोट्या लेखात बंदिस्त होणारे नक्कीच नाही. माननीय शिक्षणाधिकारी धोत्रे साहेबांनी दिलेली प्रेरणा प्रत्येक शिक्षकाला अनमोल असणार आहे. ' एक कौशल्यपूर्ण दिवस ' असंही  शीर्षक या दिवसाला शोभू शकतं. प्रशिक्षणात भेटलेले सर्वच घटक एकमेकांमध्ये तरतरी पेरण्याचं काम करुन गेले हे या प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. 

          मी घरी आलो , तेव्हा टीव्हीवर एक मालिका सुरु होती. त्यात एका बाळाचा जन्म झाला होता. बाळ हलत नव्हतं. श्वास घेत नव्हतं. त्याची आई डोळ्यांत पाणी आणून आपलं बाळ रडण्याची वाट बघत होती. दवाखान्यातील त्या प्रसंगी घरातील सारं कुटुंब बाळाला निश्चेष्ट पाहून पार हबकून गेलं होतं. आणि प्रत्येकानं बाळाच्या पायांना हात लावून म्हणायला सुरुवात केली होती , " होईल समदं ठिक " . बाळ काही सेकंदात पाय हलवू लागलं होतं. तोंड उघडून चिमुकलं तोंड उघडू लागलं होतं. बाळ एक दीर्घ श्वास घेऊन मोठ्यांदा रडू लागलं तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहू लागले होते. 

          आमच्या समोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना असं जागं करण्याचं काम आपलं आहे , ते जागं करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. आपण सर्व शिक्षकांनी आपल्या समोर असलेल्या मुलांसाठी असंच कौशल्यपूर्ण काम करण्याचं कौशल्य अंगी बाळगणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि ही गरज प्रत्येक शिक्षकाला वाटेल तेव्हा प्रत्येक शाळा माड्याची वाडी झाल्याशिवाय राहणार नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल , कणकवली 

( 9881471684 )
















































































Thursday, November 17, 2022

🛑 प्रसिद्धी गणेशु

🛑 प्रसिद्धी गणेशु

          प्रसिद्धी करणं ही खूप कठीण गोष्ट नसली तरी सोपी मात्र अजिबात नाही. त्यासाठी अभ्यास लागतो. अभ्यास केल्यावर ती साध्य होणारी गोष्ट आहे. काहींना दुसऱ्यांची चांगली प्रसिद्धी करणं आवडतं. आपली स्वतःची प्रसिद्धी अशांना अजिबात नको असते. 

          असंच एक हसतमुख व्यक्तिमत्त्व म्हणजे गणेश चव्हाण. ते फक्त पत्रकारिता करत नाहीत , तर ती जोपासतात. ते एक उत्तम पत्रकार आहेत आणि खूप काही आहेत. पत्रकार हा त्यांचा एक पैलू आहे. त्यांच्या सहवासात जावं , तसे त्यांचे इतर पैलू दिसू लागतात. त्याचं बोलणं , त्यांचं वागणं , त्यांचं आदर देणं या सर्व गोष्टी मनाला अंतर्गत स्पर्श करीत जातात. 

          श्रावण गावातील हा एक हिरा आहे. हा माणूस स्वतः हिरा असला तरी दुसऱ्याचं आयुष्य चमकण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. कोणत्याही अपेक्षेने त्यांनी कार्य केलेलं नसतं. परोपकारी वृत्तीच त्यांना तसं करण्यासाठी भाग पाडते. कधी ते ऑटोरिक्षा चालवताना दिसतील तर कधी व्हॅन. कधी ते समाजसेवा करताना दिसतील. कधी ते छान लेख लिहून पाठवतील. लोकांना प्रेरणा देण्याचं महत्त्वाचं कार्य ते नेहमीच करताना दिसतात. त्यांचं ते अतिशय आवडीचं काम असतं. ते करताना त्यांना जो आनंद होत असतो तो आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर अनेकदा पाहिला आहे. अर्थात कोणत्याही मानधनाची अपेक्षा त्यांनी कधीही केलेली नसते हे विशेष आहे. 

          ' जाता जाता भलं करावं ' या सुविचाराने ते नेहमीच प्रभावित झालेले मी स्वतः पाहिले आहेत. शिक्षणाने माणूस हुशार होतो , असे असले तरी त्यांनी आपल्या शिक्षणाच्या पदव्या कधीही पुढे पुढे केल्या नाहीत. उच्चशिक्षित असूनही एका साध्या , सरळ माणसाचं जीवन ते जगताना दिसतात. आपल्या शिक्षणाचा त्यांनी कधी टेंभा मिरवला नाही. 

          सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक समाजाशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. गोवा राज्यातील अखिल गोमंतक नाभिक समाजाशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. हल्लीच कुडाळ येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या राज्यस्तरीय सभेत त्यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुख या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली हे आमच्यासाठीही अभिमानास्पद आहे. प्रसिद्धी करणाऱ्या व्यक्तीलाच प्रसिद्धी प्रमुख हे पद मिळून त्या पदालाही योग्य असा न्याय मिळाला आहे असे आम्ही मानतो. त्यांचं प्रसिद्धीचं कार्य अविरत सुरुच आहे. त्यात खंड पडणार नाही यात तिळमात्र शंका नाही.

          आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याबद्दल लिहिणं हे मी माझं कर्तव्य समजतो. हे शब्द जसे सुचतील तसे लिहित गेलो आहे. त्यांच्यासोबतच्या निवडक आठवणी असल्या तरी त्यांची प्रत्येक भेट माझ्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आहे हे सांगायला मला अतिशय आनंद होतो आहे. अशा या ' प्रसिद्धी गणेशु ' यांना त्यांच्या पुढील भव्य दिव्य आयुष्यासाठी कोटी कोटी शुभेच्छा.

©️ प्रवीण कुबल ( कणकवली ) 9881471684



Friday, November 11, 2022

🛑 कुठे हरवली मळणी

🛑 कुठे हरवली मळणी

          पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी नुकताच रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेत जामगे सीमावाडी येथे हजर झालो होतो. त्या आठवणी अजूनही ताज्या वाटत आहेत. त्या सर्व आठवणी स्मरणकुपीत जतन करुन ठेवण्यासारख्याच आहेत , म्हणून जपून ठेवल्या आहेत. 

          मी तेव्हा एकवीस बावीस वर्षांचा असेन. मिशीसुद्धा दिसत नव्हती. दाढी तर आलीच नव्हती. शाळेत शिक्षक असल्याने मोठ्या वयस्कर माणसांचा आदर स्विकारताना भारावून जायला होत होते. दोन वाड्यांच्या मध्यभागी द्विशिक्षकी शाळा होती. शाळा रस्त्यालगत होती. त्यावेळी तो मार्ग एसटी साठी सुरु झाला नव्हता. शाळेपासून जवळपास शेतीच शेती होती. त्यामुळे भात कापणी झाल्यानंतर शाळेसमोरुन भाताच्या पेंड्या नेताना पालक , गावकरी यांच्या भेटीगाठी होत असत. त्यांच्या मनात शिक्षकांबद्दल कमालीचा आदर असे. डोळ्यात बघून ते कधीही बोलत नसत. ' गुर्जी , गुर्जी ..... अशी प्रेमळ हाक तिथे कायम ऐकू येई. त्यात असलेला आदर ओसंडून वाहत असल्यासारखा असे. त्यात कृत्रिमता अजिबात नसे. 

          मी तेव्हा एका रिकाम्या घरात राहत होतो. मोरे , शेलार आणि सुर्वे नावांच्या घरमालकांनी दिलेले प्रेम विसरलेलो नाही. सुर्वे आणि शेलार यांच्या घरात त्यांचं कुटुंब होतं. मोरे यांचं बंद घर मला शाळेपासून जवळ होतं. म्हणून मी तिथे राहायला लागलो. 

          शाळा सुटल्यानंतर मी त्या रिकाम्या घरात एकटाच कंटाळून जाई. मग हळूहळू मी सायंकाळची अभ्यासिका घेऊ लागलो. दहा पंधरा मुले दररोज अभ्यासासाठी येऊ लागली. त्यांना येणाऱ्या शंका मी सोडवू लागलो. त्यांना न्यायला पालक येत असत. त्यामुळे सगळ्या पालकांशी माझी चांगली ओळख झाली. 

          ओळखी सुरु झाल्या होत्याच आणि भात कापणीचे दिवसही सुरु झाले होते. कापलेले भात एकावर एक रचून ठेऊन नंतर समूहाने एकदम झोडण्याची त्या लोकांची सवय माझ्यासाठी नवीनच होती. 

          आमच्या गावी गाईबैलांचा किंवा रेड्यांचा वापर करुन मोठ्या जाड खांबाभोवती भात पसरवून मळणी करत असत. गुरांच्या पायाखाली पेंड्या तुडवल्या जात. त्याखाली भाताच्या पेंडीला उरलेसुरले शिल्लक भाताचे  गोटे तुटून पडत. दोन तीनदा असे करुन मग भाताच्या पेंड्यांचे गवतात रूपांतर होई. ते गवत गुरांना चारा म्हणून वापरले जाई. लहानपणी आम्ही कधी गावी गेलो असताना रात्री रात्री गॅसबत्तीच्या उजेडात मळण्या बघितल्या आहेत. 

          मोठया पाटावर भात झोडल्यावर काही दिवसानंतर ही मळणी पार पडे. मळणी झाली की घरात मस्त गरमागरम पिठी आणि उकडाभात भरपेट खायला मिळे. लाकडी डोण्यात ठेवलेल्या उकड्या पेजेवर दुधासारखी जाड सुरसुरीत साय जमा झालेली दिसे. तशी उकडी पेज आता पाहायला मिळत असेल असे वाटत नाही. मातीच्या गोलीमध्ये पेज केली जात असे. गोली म्हणजे मातीची कळशी. ती चुलीवर ठेऊन ठेऊन काळीकुट्ट झालेली असे. त्यात बनलेली पेज मात्र पांढरीशुभ्र दिसे. करवंटीच्या डवलीतून पेज वाढणारी माझी आजी सर्वांना प्रेमाने पुन्हा पुन्हा वाढत राही. तिला नाही उरली तरी खरवडून वाढणारी आजी आज जिवंत हवी होती. 

          रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील मळणी म्हणजे सामुहिक भात झोडणीच असे. एका दिवसांत त्यांची मळणी आणि झोडणी पूर्ण होताना मी बघितली आहे. 

          त्या दिवशी माझ्याकडे माझा एक शिक्षक मित्र आला होता. आम्ही मालवणी भाषेत मस्त बोलत होतो. कितीतरी दिवसांनी मालवणीत बोलण्याची संधी मिळाली होती. गावाकडे आल्यासारखा अनुभव येत होता. मस्तपैकी गाव गाता गजाली सुरु होत्या. तेवढ्यात एक विद्यार्थी निरोप घेऊन आला. म्हणाला , " गुर्जी , गुर्जी , तुम्हाला आमच्या मळणीकडे बोलावले आहे."   आम्हांला गंमतच वाटली. आम्ही दोघेही धावतच मळणीच्या ठिकाणी गेलो. मळणीचा धबधब आवाज येत होता. मोठ्या काळ्या पत्थरावर भाताच्या ओंब्या रपारप आपटल्या जात होत्या. पिवळेजर्द भाताचे दाणे चहूकडे उडत होते. आम्हीही सहज मळणीत भाग घ्यायला जाण्याच्या प्रयत्नात होतो. पण आम्ही आल्याचे समजताच मळणी करणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी आम्हांला आदरपूर्वक नमस्कार केला आणि बसण्याची विनंती केली. 

          आम्ही आतल्या खोलीत जाऊन बसलो. पाच दहा मिनिटांत आमच्यासमोर कोंबडीचे जेवण आले. आमच्याकडे ज्याला ' वडे सागोती ' म्हणतात , तसा त्यांचा जेवणाचा बेत पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. सगळ्यांच्या जेवणापूर्वी आम्हाला आदरपूर्वक वाढण्यात आले होते. पुन्हा पुन्हा आग्रहाने वाढले गेले. नारळाच्या वापराशिवाय केलेल्या जेवणाची एव्हाना सवय झाली होती. 

          आमचे जेवण झाले तरी मळणी सुरु होतीच. मळणी संपल्यावर सर्व मंडळी जेवली असतील. त्यांनी आम्हां शिक्षकांना प्रथम जेवण्याचा मान दिला होता. त्यातले काही लोक कधीही शाळेत गेले नव्हते , तरीही शिकलेल्या माणसांपेक्षा जास्त आदर देण्यास शिकलेले पाहून माझं शिक्षण मला त्यांच्यासमोर खुजं वाटायला लागलं. 

          त्यानंतर प्रत्येकवेळी आम्हाला मळणीच्या जेवणाला बोलावणे व्हायचे. नेहमी तसाच आदर पाहायला मिळायचा.  ही मळणी आणि आदर दोन्ही आता हरवलीत की काय ? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. नवीन युगातील तंत्रज्ञान वापरून केली जाणारी मळणी आणि आदर या दोहोंचा आज अंगीकार करण्याशिवाय पर्याय नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )




आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...