Thursday, October 31, 2024

🛑 आली दिवाळी घरोघरी

 🛑 आली दिवाळी घरोघरी


          दिवाळी जवळ आली कि कधी एकदा दिवाळीची सुट्टी पडते असे होऊन जाते. मुलांना आणि मोठ्यांना दोघांनाही दिवाळीच्या सुट्टीची ओढ असते. शाळा आणि दिवाळीची सुट्टी हे दरवर्षीचं समीकरण आहे. मुलांना सुट्टी हवीसुद्धा असते आणि पालकांना ती कधी हवी किंवा नकोसुद्धा असते. 

          दिवाळीत खूप मौज करायची असते. मामाच्या घरी जायचे असते. ज्यांना मामा असतात, त्यांना होणारा आनंद वर्णनीय असतो. मुलांच्या मामाच्या घरी जायच्या ओढीने आईलासुद्धा आपल्या माहेरी जायची संधी मिळत असते. एखादी रात्र मामाच्या किंवा भावाच्या घरी राहण्यातली मज्जा तिथे आनंद उपभोगणाऱ्या माझ्यासारख्या भाच्याला नक्कीच सांगता येईल. 

          “ दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा ” हे जे म्हटलं गेलं आहे ते अगदी खरंच आहे. आमच्या मामांच्या घरच्या दिवाळीने आमच्या तनमनात दिवाळी साजरी केली आहे. बालपणापासूनच आम्हां सर्व भावंडांना आजोळीची आत्यंतिक ओढ होती. ती अजूनही आहे. मामांनी आम्हाला खूप दिले. धन, धान्य, संस्कार, प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा हे सर्व शब्द कमी पडतील. आम्हाला घडवणारे आमचे आजोळच होते. कारण प्रत्येक मामा म्हणजे आमच्यासाठी एकेक संस्कारयुक्त शिदोरीच असे. त्यांच्या सहवासात गेल्यावर आमच्या सहवासाला सुगंधी उठण्याचा वास येऊ लागला.

          मामांच्या घरचे संस्कारांचे मोती आम्हांला नेहमीच चकचकीत करीत होते. त्यांची वागणूक आम्ही प्रत्यक्ष पाहात होतो. दिवाळी सणाला माझ्या बाबांनी माझ्या आजोळी जाऊन ‘ नरक चतुर्दशीच्या ‘ चाव दिवशी एकत्र घेतलेला फराळ मला अजूनही आठवतो आहे. सर्व मुले, माणसे एकत्र येऊन त्यांचं ते आनंदाचं आदरातिथ्य फराळातल्या गोड पदार्थांपेक्षाही कित्येक पटीने गोड असे. मामांच्या या गोडपणाचा स्पर्श आम्हांला झाला आणि आम्हीही काही प्रमाणात गोड बनण्याचा प्रयत्न केला. मामा, मामी आणि त्यांची मुले आम्हांला आपल्या घरातील समजत. त्यांचं नारळाचं दुकान, सलून दुकान, काहींच्या खाजगी नोकऱ्या, काहींच्या सरकारी नोकऱ्या या सगळ्या गोष्टींचं मला अप्रूप असे. आपणही त्यांच्यासारखं व्हावं असं वाटायला लागावं असं प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व. आमच्या मामांनी आमच्या घराला नेहमीच आपलंसं मानलं त्यात माझ्या आई बाबांचा सिंहाचा वाटा आहे. आम्ही गरीब असलो तरी मामांनी आमच्या आईबाबांचा नेहमी सन्मानच केला आहे. 

          फराळ खाण्यात मजा नसते, तो एकत्र खाण्यात मजा असते. एकत्र गप्पा गोष्टी मारत मारत फराळाची गोडी अधिक वाढत जाते. आमच्या मामांनी भाऊबीजेला आमच्या घरी येणं, हा म्हणजे आमच्यासाठी खरा दिवाळीचा सण असे. मामांनी आणलेली प्रत्येक गोष्ट माझ्या आईसाठी सन्माननीय असे. आईने आपल्या मोठ्या भावांना कधी ‘ अरे ’ म्हटले नाही. भावांचा निरतिशय आदर करणारी आई आम्हांला लाभली होती. अशी प्रेमळ आई, प्रेमळ मावशी, प्रेमळ आत्या, प्रेमळ बायको आणि प्रेमळ आजी होणे कठीण आहे. आईने केलेले गोड पोहे, कांदेपोहे, रव्याचे लाडू, बेसनलाडू, करंज्या, चकल्या, शंकरपाळ्या अजूनही आठवतात. त्या करतानाच आम्ही जास्त खाल्ल्या असतील. पण तिने त्या आम्हांला खायला दिल्या. कधीही हे खाऊ नकोस म्हणाली नाही. 

          दिवाळीचा ‘ आकाश कंदील ’ बनवणे माझे आवडते काम. मी आणि माझा भाऊ चिव्याच्या काठ्यांचा आकाश कंदील बनवत असू. काहीवेळा तो आम्हांला नीटसा साधत नसे. तेव्हा मोठी ताई, आक्का यांची साथ मिळे. पताकाच्या कागदांना कापून त्याच्या करंज्या बनवून लावणे भारीच असे. आपण स्वतः केलेल्या ‘ कंद्याची ’ मज्जा काही औरच. आता तसे घडत नाही. घडले तरी तो आनंद अगदी तस्साच मिळत नाही. 

          आज ही माझी पहिली दिवाळी असेल, माझी दिवाळी आहे, पण ती बघायला बाबा फोटोत आहेत. ते नाहीत, आई नाही. माझ्या कुटुंबाने केलेली दिवाळी कायम लक्षात राहण्यासारखी असते. त्यात एखाद्या माणसाची उणीव म्हणजे फराळात लाडू नसल्यासारखेच. माणसांनी दिवाळी नक्की करावी, असलेल्या माणसांना सुखी ठेवत, त्यांच्या मनातले दिवे सतत जिव्हाळ्याने पेटते ठेवलात तर ती समाधानाची दिवाळी होईल यात अजिबात शंका नाही. 


लेखन : श्री. प्रवीण अशितोष कुबल ( मुख्याध्यापक, शिडवणे नं. १) 

दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२४ 

वेळ : सायंकाळी ७. १५ वाजता

Saturday, October 26, 2024

🛑 अंधाराच्या बेटावर गेलो तेव्हा .......

🛑 अंधाराच्या बेटावर गेलो तेव्हा ....... 

          एखाद्या खऱ्याखुऱ्या बेटावर जाण्याची वेळ अजूनतरी माझ्यावर आलेली नाही. कदाचित तसा योग पुढे कधी येईल असेही वाटत नाही. तरीही काल एका अंधाराच्या बेटावर जाण्याची संधी ‘ ध्यास परफॉर्मिंग आर्टस् , पुणे ’ यांच्या दोन अंकी नाटकानं दिली. वामन पंडितांच्या Whats App मेसेजमुळेही संधी मिळत असली तरी ‘ निलायम ’ या त्यांच्या वैयक्तिक थिएटर मुळे माझ्यासारख्या नाटकाची आवड असणाऱ्या माणसांना चांगलं बघण्याची सुवर्णसंधी मात्र प्राप्त झाली आहे असे मी म्हटले तरी तेही ‘ सोळा आणे ’ सच आहे. 

          नाटकाचे अप्रूप मला लहानपणापासूनच आहे. ते आजही तसेच आहे. नाटक घरात प्रवेश करताना आज मला एका बेटावर जायला मिळणार ही उत्सुकता होतीच. नाटक सुरु होण्याच्या अर्धा तास अगोदरच मी ‘ निलायम ‘ मध्ये पोहोचलो. काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच नाट्यवेडी माणसं तिथे माझ्याआधीच येऊन बसलेली दिसली. त्यात माझ्याहीपेक्षा वयाने मोठी असलेली माणसंच अधिक प्रमाणात होती. नंतर हळूहळू माणसांची संख्या वाढत गेली. तिकीट काढलं आणि तिकीट काढणाऱ्या काकांशी बोलत बसलो. नाटक घरात लवकर प्रवेश करता यावा ही अधीरता होतीच. सात वाजता नाटकाची वेळ होती. बरोबर सात वाजता नाटकघराचं दार उघडलं. मी एक नंबरवालं तिकीट काढणारा होतो याचा मला आनंद वाटत होता. माझ्यासारखे नाटक बघायला आतुर झालेले नाट्यवेडे दरवाजाकडे गर्दी करु लागले. मीही त्यात मिसळून गेलो. प्रवेश करताना स्वतः कलाकारांनी आमचं स्वागत केलं. त्यांनी आमच्या हाताला ‘ नाटकाचं अत्तर ’ लावलं. हातात एक ‘ हिरवं पान ’ दिलं. ते पान आणि तो अत्तराचा वास घेत मी माझ्या आसनावर जाऊन बसलो. नाटकातील काही कलाकार रंगमंचावर आधीच उपस्थित होते. हसतमुखाने स्वागत करताना स्वतः एक वाद्य वाजवत एक वेगळालं गाणं म्हणत होते. तो रिदम आपलासा वाटत होता. प्रेक्षक बसेपर्यंत कलाकारांचं हे वादन जणू आपल्याला वंदन करत आहे असा भास होत होता. नाटकाचं हे एक भन्नाट नैसर्गिक संगीत रसिकांच्या मनात पुढील नाटक बघण्याचं कुतूहल वाढवणारं होतं. 

          मी माझ्या हाताचा वास घेत असताना मिळालेल्या पानाकडे बघत राहिलो होतो. ते पान म्हणजे रंगमंचावर केलेल्या बेटाच्या नेपथ्याचा एक भाग होतं. बेटावरील अनेक वेलींच्या कुंजातील पाने प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या हातात एकेक दिसत होती. आपणही या बेटावर गेल्याची ही नाटकाची खरी सुरुवात होती. 

          नाटक बरोबर सव्वा सात वाजता सुरु झालं. नाटकातील सर्व कलाकार अप्रतिम अभिनय करत होते. प्रत्येक कलाकार आपला अभिनय नैसर्गिक करत आहेत असं वाटत होतं. उगीच आपले शब्द फेकत राहावेत असं काही घडत नव्हतं. त्यामुळे ते नाटक लवकरच आपलंसं झालं होतं. ज्या लेखकाने नाटक लिहिलं त्यानेच ते परफॉर्म करावं ही नेहमीच अधिक चांगली गोष्ट असते. कारण एक तर ते नाटक म्हणजे त्याचंच अपत्य असतं. त्या अपत्याशी कसं वागावं हे त्याच्याशिवाय अधिक चांगलं कुणालाच कळू शकत नाही. नाटकाचे लेखक , दिग्दर्शक , मुख्य अभिनेते नाटकवेडे ‘ श्रीकांत भिडे ’ यांनी लिहिलेले नाटक अफलातून आहे. एकांकिकेचं एका दिर्घांकात रुपांतर झाल्यानंतर देखील नाटकाला बघताना शेवटपर्यंत कंटाळा येत नाही हे विशेष आहे. कुडाळचे श्रीकांत भिडे खरंच माझ्या मनात भिडले. 

          सुरुवातीपासूनच हे नाटक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतं. कलाकारांनी स्वतः ते नाटक जगले आहेत. सर्व कलाकारांचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. जी भूमिका मिळाली , त्या भूमिकेचं प्रत्येकानं ‘ सोन्याचं हिरवं पान ’ केलेले होतं , जे आम्ही आमच्या हातात अत्तराच्या वासासहित घरापर्यंत घेऊन आलो होतो. माझ्या घरातल्या सदस्यांनाही मी या नाटकाचं वेगळेपण सांगितल्यावर त्यांनाही आपण नाटकाला न गेल्याचं शल्य जाणवावं इतकं नाटक मनात रुजलं होतं. 

          अर्थात प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. नाटकाबद्दल माहिती असणारे आणि नाटकावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला अतिशय आवडावं असंच हे नाटक आहे. मी या नाटकाबद्दल सकाळी लवकर उठून लिहितो आहे , असं मला का वाटलं ? यातच त्याचं खरं उत्तर दडलेलं आहे. हा लेख लिहिताना माझ्या हाताला लावलेल्या अत्तराचा मी वास घेतो आहे , तो अजूनही तसाच आहे. दिलेले ते हिरवं पान माझ्यासमोर आहे आणि हसत हसत ते माझ्याकडे बघतं आहे. 

          एका अंधाराच्या बेटात गेलेल्या ‘ राख्या ’ नावाच्या कलाकाराची ही कथा आहे. नाटक तसं म्हटलं तर पैसे देणारं , नाहीतर असलेले पैसे घालवणारं असतं . एखादं नाटक प्रेक्षकांच्या मनात रुजायला वेळ लागतो. हे नाटक नाटकवाल्यांची ‘ व्यथा ’ सांगणारं नाटक आहे. बेटावरील बोचरी थंडी लागते म्हणून केलेली शेकोटी प्रत्येक रसिक प्रेक्षकालाही ऊब देणारी ठरली. शेकोटीत तयार झालेली राख तोंडाला फासून ‘ आपल्या नाटकाच्या आयुष्याचं नाटक ’ दाखवताना श्रीकांत भिडे यांनी केलेला अभिनय टाळ्या द्यायलाही विसरायला लावतो. इथे विनोद नाहीत , पण आपण स्वतः मनातल्या मनात आपल्यावर हसण्यासारखं खूप काही आहे. नाटकाचा शेवट झाला तरी प्रेक्षक टाळ्या द्यायला विसरतात , कारण त्यांना हे नाटक संपूच नये असं वाटत राहतं म्हणून. 

          नाटकाचा सूत्रधार म्हणून डॉक्टरांची भूमिका केलेल्या कलाकाराने केलेला अभिनय , आवाजाची शब्दफेक थेट मेंदूत जाते. राख्याच्या मित्रांनी , मैत्रिणींनी राख्यावर केलेलं प्रेम त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणून गेलं तेव्हा त्या कलाकारांचा त्या नाटकाचा अभ्यास किती सखोल असेल याची कल्पना येते. नाटकाच्या संहितेबद्दल परिपूर्ण लिहिणं चुकीचं आहे , कारण रसिक प्रेक्षकांनी तिकीट काढून हे असलं नाटक थिएटर मध्ये जाऊन बघतानाचा आस्वाद घ्यायला हवा. नेपथ्य , प्रकाश योजना , ध्वनी योजना खरंच भडकावू नाहीत. 

          नाटकात एक दोन प्रणय प्रसंग आहेत. तेही अश्लिल नाहीत , ते श्रुंगारपूर्ण आहेत. नेपथ्याचा केलेला काळजीपूर्वक वापर , ती वस्तू तिथेच चांगली आहे असं वाटावं. राजाच्या मुलीने केलेली वेशभूषा आणि अभिनय अप्रतिम. रात्रीच्या अंधारात कंदिलाचा केलेला वापर ‘ अंधाराचं बेट ’ प्रत्यक्ष समोर ठाकल्यासारखा. या नाटकाविषयी बरंच काही लिहिल्यानंतरही आठवत राहावं असं बरंच काही अजूनही मनात रेंगाळतं आहे. पण नाटक करणाऱ्यानं कधी थांबायचं , हे जसं त्याला कळलं पाहिजे , अगदी तसंच लिहिणाऱ्यानेही कधी थांबावं हे त्याला कळलं पाहिजे. नाटकाबद्दल काहीतरी रिव्ह्यू द्यावा म्हणून हा लेखनप्रपंच नसून , तो लिहिल्याशिवाय राहवलं नाही म्हणून लिहून मी स्वतः समाधानाने मोकळा झालो आहे. 

© प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १ ( मोबाईल : 9881471684 ) 
















Sunday, October 20, 2024

भय इथले संपत नाही

 भय इथले संपत नाही 

        हल्ली मुलींच्या सुरक्षेविषयीचा प्रश्न खूपच ऐरणीवर आला आहे.घरातून मुली बाहेर पडल्यानंतर त्या पुन्हा घरी येईपर्यंत त्यांच्या सुरक्षेविषयी अतिशय काळजी वाटू लागली आहे. पेपर उघडला कि एखादी नव्हे तर मुलींवर होणाऱ्या अनेक अत्याचारांच्या बातम्या वाचून प्रत्येकाचे मन भयग्रस्त होऊ लागले आहे. 

        ज्यांच्या घरात अनेक मुलींचा जन्म झाला असेल , त्यांना तर खूपच काळजी वाटू लागली आहे .  घरात एखादी मुलगी असली तरी तिच्या पालकांना धास्ती वाटते. ही धास्ती वाढत गेली कि मग त्याचे तणावात रुपांतर होत जाते. जगात असे अनेक पालक असतील जे मुलींना घराबाहेर एकटीला पाठवताना दहावेळा तरी विचार करत असतील. 

        प्रसार माध्यमांच्या आकर्षणाच्या जाळ्यात अडकलेल्या ह्या नवीन पिढीतील युवक युवती ज्यावेळी आपलं सर्व जीवनच सोशल करुन टाकतात , तेव्हा त्यांच्या शोषणाला सुरुवात होण्याची जास्त शक्यता असते .  आपलं संपूर्ण जीवन आपण माध्यमांच्या स्वाधीन करुन आपल्या लाईकची वाट पाहत बसतो , तिथेच आपले चुकते. आपणही काहीअंशी समोरच्याला आपल्याशी संवाद साधण्याची संधी देऊन मोकळे होतो. मग संवादांना सुरुवात झाल्यावर मग त्याला एखादा रिप्लाय दिला तरी पुढून लगेचच रिप्लाय वर रिप्लाय येत जातात. या रिप्लायच्या जाळ्यात सापडणाऱ्या मुली त्यांचे भक्ष्य बनण्याची अधिक शक्यता असते. या मिडीयावर आता ओळखीपाळखीशिवायच मैत्री होण्याचे प्रमाण वाढले आहे .  

        ही मैत्री मग भयानक रुप घेऊन पुढे येते. कुठेतरी एकांतात बोलाविले जाते. मुलगी कोणालाही न सांगता तिकडे जाते. तिच्या आयुष्याची वाट लावायला काही नराधम टपून बसलेले असतात. ती जाते आणि त्यांच्या सापळ्यात सापडते. मग ती पुन्हा मागे येऊच शकत नाही अशीही परिस्थिती निर्माण करण्यात येते. तिला ब्लॅकमेलिंग केलं जातं. तिच्याकडून हवी तशी कोणतीही कामे करुन घेण्यात येतात. तिच्या आयुष्याची पुरती धूळधाण उडते. तिला यातून मागे यायचे मनात येते , पण आपण पुन्हा समाजात कोणत्या तोंडाने जाणार अशी भीती वाटून ती होणारा अत्याचार सहन करत राहते. ज्यावेळी या सहनशीलतेचा कळस होतो , तेव्हा आपलं आयुष्य संपवण्याशिवाय तिला कोणताही पर्याय ठेवला जात नाही. ती आत्महत्येचा अघोरी मार्ग निवडते. खरंच , हे सारं वाचताना , लिहिताना जर अंगाचा थरकाप उडवणारं असेल , तर ज्यांच्यावर हे प्रसंग प्रत्यक्ष येत असतील त्यांची काय अवस्था होत असेल , याची फक्त कल्पना केली तरी आपल्या पायाखालची जमीन सरकते. 

        ही अशी एखादी घटना आपल्या घरी घडत नाही , तोपर्यंत आपल्याला त्याचे काहीही गांभीर्य वाटत नाही. आपल्या आप्तजनांच्या बाबतीत घडल्यानंतरच आपल्याला त्याची भयानकता समोर येते. आपल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत म्हणून आपण त्यांना कायमचं घरी डांबून ठेवू शकत नाही ना ? 

        माझ्या लहानपणी मी एक ' मोहरा ' नावाचा हिंदी चित्रपट पाहिला होता. त्यात एका मुलीवर ' पार्टी ' मध्ये अत्याचार करण्यात आलेला होता. तो अत्याचार समजण्याचं माझं त्यावेळी वयही नव्हतं. तरीही मला त्या युवकांचा खूप राग आला होता. माझ्या बहिणीसुद्धा सुरक्षित नाहीत , हे त्यावेळीही माझ्या लक्षात आले होते. मला माझ्या दोन मोठ्या बहिणी व एक लहान बहिण असल्याने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आम्हां भावांवर आहे ही समज मला त्यावेळी अंतर्मनात रुजली होती. त्या जिथे जिथे जात , तिथे तिथे मी स्वतः उपस्थित राहून त्यांच्यावर लक्ष ठेवीत असे. अर्थात त्या काळात मोबाईल , फोन संस्कृती नव्हती. त्यामुळे आज जेवढ्या घटना घडत आहेत , तशा घटना वारंवार घडताना दिसत नव्हत्या.

        आजच्या मुली आणि मुलगे , युवक , युवती , लग्न झालेल्या विवाहिता यांच्यावर अन्याय , अत्याचार होताना पाहून मन विषन्न होते. आकाशवाणीवर माझ्या लग्नापूर्वी मी एक नभोनाट्य ऐकले होते. ' वाटेवरती काचा गं ' असं त्या नाट्याचं शीर्षक होतं. मुलींना नेहमीच अशा काचांनी भरलेल्या वाटेने चालत जावं लागत असेल. बिचाऱ्या कित्येक वर्षं हा अन्याय , अत्याचार सहन करत आल्या आहेत. त्यांना होणारे वाईट स्पर्श , त्यांच्याकडे बघणाऱ्या वखवखलेल्या नजरा कधी कमी होणार हे आम्हांला अजूनही माहिती नाही. सोशल मीडियाची माहिती नसणाऱ्या किंवा ज्यांना अत्याचार म्हणजे काय असतो हेही माहिती नसणाऱ्या निरागस छोट्या मुलींवर असा अन्याय झाल्याचे ऐकतो , वाचतो तेव्हा तर आपल्या तळपायाची आग मस्तकात जाते. 

        हल्लीच एका मराठी चॅनलवर एक अशी धीट युवती दाखवण्यात आली आहे कि ती मुलासारखी वागते. तिच्या वडिलांनी तिला लहानपणापासून मुलासारखी वागणूक दिली , त्यामुळे ती ' दुर्गेसारखी ' अन्यायाविरुद्ध तुटून पडते. अन्याय करणे हा गुन्हा आहे ,  तसंच अन्याय सहन करणे हासुद्धा गुन्हाच आहे. त्यामुळे हल्लीच्या महिला वर्गाने अन्याय सहन करणं सोडून दिलं पाहिजे. अन्यायाचा निकराने प्रतिकार केला पाहिजे. मोबाईलचा वापर करुन पोलिसांना वेळीच कल्पना देऊन कायदेशीर मार्गाने अशा नराधमांना शिक्षा होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. तर आणि तरच इथले भय संपण्याच्या आशेचा किरण दिसेल. 

© प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं . १ 

Wednesday, October 2, 2024

हत्ती घूस रेडा गेंडा

🛑 मनात घुसलेला हत्ती 

          वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान म्हणजे कणकवलीकरांचं नाटकघर म्हणून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही सुप्रसिद्ध आहे असे म्हटले तर वावगं ठरू नये. मी या प्रतिष्ठानची अनेक नाटकं , एकांकिका बघितल्या आहेत. त्यांनी केलेली नाटकं किंवा एकांकिका मनात घर करतात. त्यातील संदेश मनाच्या आतल्या कोपऱ्यात पोहोचतो. 

          ' हत्ती घूस रेडा गेंडा ' हे सुद्धा एक असं आगळं वेगळं नाटक नुकतंच पाहण्याची सुवर्णसंधी लाभली. असं विचार करायला लावणारं दोन अंकी नाटक करण्याचं धाडस जेव्हा वसंतराव प्रतिष्ठान करतं, तेव्हा त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित होत जातो. नाटकाला झालेली गर्दी म्हणजे एखाद्या व्यावसायिक नाटकाला लाजवेल अशीच. खूप कमी प्रवेशमुल्यात असं बोधप्रद नाटक सर्व जिल्हावासियांना पाहायला मिळालं. खूप लांबून लांबून नाट्यरसिक आले होते. देवगड, सावंतवाडी, वैभववाडी, मालवण मधील माझे काही शिक्षक मित्र, नाटक मित्र आलेले पाहून मला माझ्या कणकवलीचा अभिमान वाटला. 

          अर्थात गेले कित्येक वर्षं प्रतिष्ठानची ही नाट्यचळवळ सुरु असलेली मी प्रत्यक्ष पाहतो आहे. माझं बालपण कणकवलीत झाल्यामुळे प्रतिष्ठानचे अनेक कलाकार माझ्या ओळखीचे आहेत. शरद सावंत यांचा अभिनय वाखाणण्यासारखा. सुदिन तांबे यांना परीक्षक म्हणून पाहिलं होतं. त्यांचा अभिनय अफलातून. पुरळकर यांना यु ट्यूबवर पाहिले, त्या दिवशी त्यांचा अभिनय जवळून पाहिला. विकास कदम यांचं ढोल वाजवताना बोलण्याचं टायमिंग लाजबाब. माझे मित्र काणेकरांचे राकेश आणि खटावकरांचे सिद्धेश यांच्या अभिनयाला सलाम करावासा वाटतो. युवा अभिनेत्री व गायिका प्रतिक्षा कोयंडे हिचा आवाज ऐकतच राहावा असाच. अगदी सर्वांच्याच अभिनयाची दाद द्यायला हवी. विंगेतून टिपऱ्या वाजवून संगीत देणारी युवती ( सोनाली कोरगावकर ) पाहिली. अगदी समरसून ती संगीत देण्यात मग्न होती. दिग्दर्शक केतन जाधव यांनी अप्रतिम कलाकृती बसवली आहे याचा प्रत्यय आला. नाटकाची संकल्पना मनात येणं सोपं असतं, ते प्रत्यक्षात राबवताना त्यांना कोणकोणत्या दिव्यातून जावं लागलं असेल याची कल्पनाच केलेली बरी. 

          माझ्या दोन मुली नाटकाला जायचंच असा हट्ट धरुन बसल्या होत्या. तसंही मी त्यांना नेहमीच नाटकांना नेत असतो. पण या नाटकाची जाहिरात पाहिल्यापासूनच ती माझ्यामागे लागली होती. तनिष्का ( 9 वी ) आणि स्वानंदी ( 3 री ) दोन्हीही मुलींनी नाटकाचा शेवटपर्यंत आस्वाद घेतला. त्यांनी सर्वांच्या अभिनयाचे माझ्याकडे कौतुक केले. पुढच्या पिढीकडून कौतुक होणं हे आजच्या तरुण पिढीसाठी खूप मोठी पावती आहे. आजच्या आभासी दुनियेत ' नाटक ' तिकीट काढून पाहणं लोकं टाळू लागले आहेत. कोरोना काळात तर या नाट्यअभिनेत्यांची खूपच आर्थिक गोची झाली असेल. पुन्हा एकदा नव्या दमाने आजच्या युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे असे कलाकार वेगळं समाजमनावर राज्य करु पाहणारं दाखवणार असतील तर ' नाटकांचा उदय ' पुन्हा झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री वाटते. 

          छोट्या स्वानंदीला अगदी जवळून ' हत्ती, घूस, रेडा, गेंडा ' हे सर्व प्राणी पाहायचे होते. आमची तिकीट एक्सच्या म्हणजे शेवटच्या रांगेत होती. तिथून तिला काहीही दिसत नव्हते. ती कुठे अचानक गायब झाली होती. मी शेजारीच बसलेल्या माझ्या शिक्षक मैत्रिणीला ' कल्पना मलये ' हिला विचारलं. मला वाटलं तिच्याकडे बसली असेल. ती तिथेही नव्हती. ती थेट सी रांगेत जाऊन एका रिकाम्या सीटवर बसून अगदी जवळून नाटक बघण्यात दंग होऊन गेली होती. नाटकाच्या पहिल्या अंकाच्या समाप्तीनंतर दहा मिनिटांच्या रिसेसमध्ये मी तिला शोधून काढण्यात यशस्वी ठरलो. 

          नाटकाला माझ्या मुलींच्या वयाची मुलेसुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. सर्वांचे माझ्यासारखेच अनुभव असू शकतील असे नाही. मुलांना नाटकं दाखवली पाहिजेत या मताचा मी आहे. हल्ली मुले मोबाईलवर गेम खेळतात. त्यांचा स्क्रिन टाइम कमी करण्यासाठी ' नाटक ' हे एक उत्तम माध्यम आहे असं मला वाटतं. सर्व पालकांनी आपल्या मुलांना आपल्यासह असंच ' वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली ' यांच्या विविध उपक्रमांना सातत्याने भेट देत राहावी आणि जे  कमी वेळेत जास्त प्रबोधन करणारं असं काहीतरी शिकून शहाणं होऊन जावं. 

          प्रतिष्ठान पुढील काळात अनेक उत्तम प्रयोग घेऊन आपल्यासाठी येत आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मी कायमच ' रंगवाचा ' हे त्यांचे उत्तम त्रैमासिक वाचत असतो. वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या सर्व कलाकारांना, सदस्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १ 

( 9881471684 )



💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...