Sunday, April 30, 2023

🛑 समितीचा श्रीकृष्ण अवतार

🛑 समितीचा श्रीकृष्ण अवतार

          महाभारतात श्रीकृष्णाने अवतार घेतला होता. अर्जुनाचा सारथी होऊन पांडवांसोबत राहून गीता सांगणारा श्रीकृष्णच होता. दशावतारांपैकी एक अवतार असलेला हा श्रीकृष्ण. श्रीकृष्णाने केलेल्या लिला आपल्याला परिचित आहेत. 

          कणकवली शिक्षक समितीच्या विद्यमान उमेदवाराचे नावही योगायोगाने श्रीकृष्णच आहे. हे श्रीकृष्ण सुद्धा सध्या सुरु असलेल्या भाग्यलक्ष्मी पॅनलच्या प्रचारात आघाडीवर आहेत.   

          संत जनाबाईने रचलेल्या एका गवळणीत या श्रीकृष्णाला ' कांबळीवाला ' असे संबोधले आहे. आमच्या या श्रीकृष्ण नावाच्या उमेदवाराचे आडनावही ' कांबळी ' असे आहे. असे योगायोग आपोआप येत नसतात. श्रीकृष्ण कांबळी हे नाव सध्या सर्वांच्या ओठावर येत आहे ही समितीसाठी अधिक अभिमानाची गोष्ट असायला हवी. शिक्षक समितीचा कणकवलीचा उमेदवार म्हणून नवा चेहरा असला तरी संघटनेतील जुना जाणता , धडाडीचा कार्यकर्ता म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपरिचित असलेला हा व्यासंगी चेहरा आहे.  कणकवली शिक्षक समितीतील ' श्रीकृष्ण कांबळी ' हे एक हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे.

          मी आणि श्रीकृष्ण कांबळीसर एकाच प्राथमिक शाळेत शिकलो आहोत. भालचंद्र विद्यालय कणकवली तीन नंबर शाळेचे आम्ही माजी विद्यार्थी आहोत. ते मला सिनियर आहेत. त्यांच्याबद्दल मला तेव्हापासून अभिमान वाटत आला आहे. ते सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्यानंतर त्यांच्याबद्दलचा आदर अधिकाधिक वाढत गेला. त्यावेळी एक अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची आमच्या शाळेत गणना व्हायची. त्यांच्या यशाकडे बघत बघत मलाही त्यांचा आदर्श घ्यावासा वाटला. मीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून यशस्वी होण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्ण कांबळींसारख्या आदर्श व्यक्तिमत्वाचा संस्कार त्यावेळी माझ्यावर नकळत झाला. ही घटना 1985 , 86 च्या दरम्यानची आहे. कदाचित त्यावेळी स्वतः श्रीकृष्ण कांबळी यांना मी माहित असेन किंवा माहित नसेन ही गोष्ट माझ्यासाठी तितकीशी महत्त्वाची नाही. ते माझ्या आदर्शांपैकी एक आहेत हे नक्की.

          2007 मध्ये मी शिरवल रतांबेवाडी शाळेत बदलीने आलो. क्रीडा स्पर्धा सुरु झाल्या होत्या. प्रभागस्तर स्पर्धा वागदे केंद्रशाळेत होत्या. कित्येक वर्षांनी माझी आणि श्रीकृष्ण कांबळी यांची गाठ पडली. परखड बोलणं , शिस्तबद्ध राहणं , मुद्दा पटला नसेल तर आपल्या मुद्द्याशी सतत ठाम राहणं या गोष्टींशी आपसूकच गाठ पडली होती. विद्यार्थी म्हणून शिकून झालेच होते , आता शिक्षक म्हणूनही त्यांच्याकडून शिकायला मिळू लागले होते.

          भाग्यलक्ष्मी पॅनलमध्ये असलेले सर्व उमेदवार तरुण तडपदार आहेत. भाग्यलक्ष्मी पॅनलला आणि शिक्षक समितीला श्रीकृष्ण कांबळींसारखे अभ्यासू व्यक्तिमत्त्व लाभावे हीसुद्धा भाग्याची गोष्ट आहे. 

          शिक्षक बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा श्रीकृष्ण कांबळी यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले. श्रीकृष्ण कांबळी हे शिक्षक म्हणून अतिशय आदर्श आहेत. शिक्षक समितीमध्ये तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम करताना सर्वांनीच मला प्रोत्साहन दिले आहे. सर्वांची प्रसिद्धी करता करता सर्वांनी मलाही प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. 

          श्रीकृष्ण कांबळींसारखे उमेदवार निवडून येणे ही काळाची गरज आहे. श्रीकृष्ण कांबळी म्हणजे कणकवली शिक्षक समितीचे ब्रँड आहेत. ते उभे आहेत म्हणजे शिक्षक समितीचा प्रत्येक सदस्य उमेदवार म्हणून उभा आहे असे प्रत्येकाला मनोमन वाटत असावे. असे जेव्हा वाटेल तो शिक्षक समितीसाठी सोन्याचा दिवस असेल. 

          तर मग कणकवली शिक्षक बँकेचं सारथ्य करायला सिद्ध झालेल्या श्रीकृष्णाला सर्वांनी मिळून प्रचंड मतांनी निवडून देऊया आणि भाग्यलक्ष्मी पॅनलच्या यशात मानाचा तुरा खोऊयात. 

▪️प्रवीण कुबल



Friday, April 14, 2023

नाभिकांचे संत सेना महाराज आणि सिंधुदुर्ग नाभिक संघटना

      नाभिक म्हणजेच न्हावी समाजाचे संत सेना महाराज यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील बांधवगड येथे झाला. बांधवगडचे तत्कालीन राजा वीरसिंह यांच्या पदरी केशकर्तन , अंगमर्दन अशी सेवा देण्याचे काम संत सेना महाराज अतिशय इमाने इतबारे करीत असत. संत सेना हे स्वामी रामानंद यांचे शिष्य. विठ्ठलभक्तीची नितांत आवड असणारे सेना महाराज वारकरी संप्रदायाचे संत म्हणून ओळखले जातात. 

संत निळोबा , संत जनाबाई यांनी संत सेनांबद्दल गौरवोद्गार काढलेले दिसतात. संत जनाबाई म्हणतात , “ संत सेना न्हावी भला , तेणे देव भुलविला ”. संत निळोबा म्हणतात , “ जन्मोनि न्हावियाचे वंशी , भक्ती केली तुवा भोळी ”. अनेक संतांनी आपल्या अभंगांतून संत सेना महाराजांचे विशेषत्व सांगितले आहे.  

संत सेना महाराजांचे अभंग शिखांच्या ‘ गुरुग्रंथसाहिब ’ या ग्रंथात आढळतात , यावरूनच त्यांचे संतपण दिसून येते. तत्कालीन सर्व संतांना संत सेना महाराजांबद्दल कमालीचा आदर होता. संत सेना महाराज विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. विठ्ठलाची भेट घेण्यासाठी ते मध्यप्रदेशातून म्हणजेच उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात ते सुमारे वीस वर्षे राहिले. या काळात त्यांनी मराठी भक्तिमय कविता लिहिल्या. इयत्ता पाचवीच्या मराठीच्या पुस्तकात ‘ धन कोणा कामा आले , पहा विचारुनी भले , ऐसे सकळ जाणती , कळोनिया आंधळे होती ’ या अभंगात संत सेना महाराज म्हणत आहेत , ‘ सखा पांडुरंगाविण , सेना म्हणे दुजा कोण ? ’ 

संत सेना महाराजांची पत्नी होती सुंदरबाई. तीही संत सेना महाराजांच्या सत्संग सेवेत सहभागी असे. घरी येणाऱ्या भक्त , संत यांची सेवा करण्यात हे दांपत्य कोणतीही कसर सोडत नसत. असेच एकदा घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करताना वीरसिंह बादशहाकडून संत सेनांना नाभिक सेवेसाठी निरोप पाठवण्यात आला. संत सेना परिवार सेवेत दंग होता. त्यामुळे त्यांना बादशहाच्या सेवेला जाण्यास थोडा उशीर झाला. इकडे बादशहा रागावला होता. राजाच्या आदेशाचे तात्काळ पालन न केल्यामुळे संत सेनांना पकडून आणण्यास सांगितले. राजाचे सैनिक संत सेनांना पकडण्यासाठी निघाले. 

बादशहा संत सेनांची वाट पाहत असतानाच संत सेना बांधवगडावर दाखल झाले. राजाला संत सेनांची  प्रसन्न मुद्रा पाहून आनंद झाला. बादशहाने संत सेनांकडून आपली दाढी करुन घेतली. अंगमर्दन करुन घेतले. राजा कुष्ठरोगाने पिडीत होता. ही गोष्ट फक्त राजाच्या पत्नीला आणि संत सेना यांनाच माहिती होती. बादशहाने आपला चेहरा आरशात पाहिला. त्यावेळी संत सेना त्यांना विठ्ठलासारखे दिसले. राजाने पुन्हा पुन्हा पाहिले तरी त्याला तोच अनुभव आला. राजाचा कुष्ठरोग निघून गेला होता. राजाला संत सेना यांचा खूप अभिमान वाटला. आपण विठ्ठलाकडून आपली शरीर सेवा करुन घेतली याची खंतही वाटली. संत सेना महाराजांच्या धोकटीमध्ये राजाने सुवर्णमुद्रा घातल्या. संत सेना आपल्या घरी जायला निघाले. खुद्द विठ्ठलच संत सेनांचे रुप घेऊन आल्यामुळे ते वाटेत अंतर्धान पावले. राजाच्या सैनिकांनी खऱ्या संत सेना महाराजांना पकडून राजासमोर उभे केले. संत सेना महाराज पुन्हा आलेले पाहून राजा आश्चर्यचकित झाला. राजाने घडलेली संपूर्ण घटना सांगितली. धोकटीमध्ये सुवर्णमुद्रा पाहताच संत सेनांना सर्व गोष्ट लक्षात आली. साक्षात पांडुरंगाने संत सेनांना शिक्षा होऊ नये म्हणून सेना महाराजांचे रुप घेतले होते. 

अशा प्रकारे संत सेना महाराज यांच्याबद्दलच्या घडलेल्या गोष्टी वाचायला मिळतात. संत सेना महाराज हे नाभिक समाजातील असल्यामुळे त्यांची पुण्यतिथी नाभिक समाजाचे ज्ञातिबांधव साजरी करतात. यंदा महाराष्ट्रातील तमाम नाभिकांनी संत सेना महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात सगळीकडे संत सेना महाराजांची जयंती साजरी होत असताना विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र नाभिक महामंडळ , मुंबई अशी नाभिक समाजाची नोंदणीकृत समाज संघटना आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र नाभिक महामंडळाची जिल्हा शाखा कार्यरत आहे. गेली अनेक वर्षे या संघटनेचे कार्य सुरु आहे. संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील नाभिक समाजाला एकत्र करण्याचे महत्त्वाचे कार्य ही संघटना करीत आहे. त्यासाठी तालुकास्तरावर आणि विभागस्तरावर पदाधिकारी , कार्यकारिणी स्थापन करुन संघटनात्मक कार्य सुरु आहे.

मी विद्यार्थीदशेत असल्यापासून नाभिक संघटनेचे कार्य अतिशय जवळून पाहिले आहे. कणकवली शहरातील कै. यशवंत हरी अणावकरगुरुजी , मालवणचे कै. विवेकानंद उर्फ स्वामी लाड , कुडाळचे कै. चंद्रकांत चव्हाण आणि सध्याचे राज्य प्रांत संघटक विजय चव्हाण यांचे संघटनात्मक कार्य पाहताना त्यावेळीही मी प्रभावित झालो होतो. त्यांनी केलेले संस्कार मी कदापि विसरु शकत नाही. शाळेत परीक्षेत चांगले यश मिळाल्याबद्दल त्यावेळी माझा मालवण येथील भैरवी मंदिरात झालेला सत्कार अजूनही लक्षात आहे. त्यामुळे मला मिळालेली प्रेरणा हा लेख लिहिण्यासाठी प्रवृत्त करुन गेला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

त्या पहिल्या पिढीच्या काळात संपर्क साधनांची वानवा होती. तरीही या कार्यकर्त्यांनी नाभिक समाजाच्या बांधणीसाठी जंगजंग पछाडले होते. गावागावांत जाऊन घरोघरी भेटी देऊन त्यांनी केलेले मार्गदर्शन अतिशय मोलाचे असेच होते. त्यांची विचारसरणी त्यागाची होती. समाजहिताची होती. प्रोत्साहनाची होती. त्यांनी माझ्यासारखे संघटनेवर निस्सीम प्रेम करणारे कार्यकर्ते निर्माण केले. आज नाभिक संघटनेसाठी कार्य करणारे अनेक कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. त्यासाठी जुन्या जाणत्या मंडळींनी संघटनेसाठी दिलेला वेळ मोलाचा होता. कै. स्वामी लाड आणि आजचे राज्य संघटक विजय सीताराम चव्हाण यांनी संघटनेसाठी केलेले अनमोल कार्य मालवण पासून सुरु झाले. आज सिंधुदुर्गात खारेपाटणपासून दोडामार्गपर्यंत सर्वदुर संघटनेचे पाईक पसरले आहेत. कुडाळात कै. चंद्रकांत चव्हाण यांच्या कार्यकारिणीने केलेले कार्य नव्या नाभिक पिढीचा उत्साह वाढवणारे आहे. आता यातील काही मंडळी हयात नसली तरी ती त्यांच्या कार्याच्या रुपाने कायमच अमर राहणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. 

गेली सहा सात वर्षांत नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्षपद कणकवलीतील अनिल अणावकर यांनी सांभाळले. त्यांनी संघटनेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. संघटनेचे काम करणारे अनेक धडाडीचे कार्यकर्ते त्यांच्या काळात त्यांनी निर्माण केले आहेत. मी शिक्षक झाल्यामुळे पहिली तेरा चौदा वर्षे संघटनेपासून दूर होतो. पण पुन्हा कणकवली तालुक्यात आल्यानंतर अनिल अणावकर यांच्यामुळे कणकवली तालुका नाभिक संघटनेचा सरचिटणीस म्हणून कार्य सांभाळीत आहे. संघटनेच्या समाजोपयोगी उपक्रमांना समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्धी दिल्यामुळे संघटनेची नव्याने ओळख निर्माण होण्यास अधिक मदत होत आहे. संघटनेचे संकेतस्थळ , यु ट्युब चॅनेल यांचीही मदत होत आहेच. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रसारमाध्यमांची मदत संघटना वाढवण्यासाठो मोलाची ठरत आहे हे वेगळे सांगायला नको. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाभिक भवन असावे यासाठी शासनस्तरावर नाभिक संघटनेची मागणी जोर धरु लागली आहे. मालवण येथे भैरवी मंदिरात संत सेना महाराजांच्या मूर्तीची स्थापना करुन अनेक वर्षे उलटली आहेत. मालवण तालुक्याप्रमाणेच इतर तालुक्यातही नाभिक समाजाचे संत शिरोमणी सेना महाराज यांचे मंदिर बांधण्यासाठी , भवन बांधण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज वाटते आहे. जुन्या कार्यकारिणीने नव्या कार्यकारिणीकडे हे कार्य पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी सोपवली आहे. नवीन कार्यकारिणी , माजी कार्यकारिणी आणि नाभिक कर्मचारी बंधु भगिनी यांनी मनात आणले तर नाभिक भवन उभारण्याची ताकद त्यांच्यात नक्कीच आहे हे मी सांगू शकतो. 

हल्लीच आमच्या एका नाभिक भगिनींवर संकट ओढवले. तिला मदत करण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे झाले हे त्याचेच एक छोटे उदाहरण आहे. कोरोना काळात जय भवानी ग्रुप आणि सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नाभिक व्यावसायिकांना , सावंतवाडी बांदा येथील पूरग्रस्तांना वस्तुरुपाने मदतीचा हात देण्यात आला. संघटनेचे अनेक उपक्रम सुरु असताना या कार्यात महिला वर्गानेही भरारी घेतली आहे. नाभिक समाजातील अनेक हिरकणी तयार होऊ लागल्या आहेत. ड्रेसकोडचा वापर , १० वी , १२ वी आणि स्पर्धा परीक्षांत यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान , नाभिक रत्न पुरस्कार , समाजभूषण पुरस्कार , खेळाडू , कलावंत , ज्येष्ठ श्रेष्ठ , महिला ब्युटिशियन , नाभिक कर्मचारी , आदर्श नाभिक कार्यकर्ता यांचा सन्मान , वाढदिवस , पदाधिकारी यांच्या भेटी , जातीवाचक विधानाबद्दल विराट मोर्चा , सलून व्यवसायाला उभारी , गरीब होतकरु मुलींना आर्थिक सहाय्य मिळवून देणे , आंगणेवाडी पायी नाभिक वारी , व्यापारी महासंघात प्रवेश , योगविषयक मार्गदर्शन , महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन , कायदेविषयक मार्गदर्शन , भव्य दिव्य वधु वर मेळावा , रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबीर , ऑनलाईन गाऊ नाचू सेनानंदे उपक्रम आणि अशा प्रकारचे अनेक उत्तम उपक्रम राबवून पुढील नाभिक पिढी अधिक गतिमानतेने कार्य करण्यासाठी नेहमीच एक पाऊल पुढे ठेवील अशी आशा करतो. 


लेखन : प्रवीण अशितोष कुबल 

जिल्हाध्यक्ष , सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक कर्मचारी संघटना 

महाराष्ट्र नाभिक महामंडळ , मुंबई ( शाखा : सिंधुदुर्ग ) 





Wednesday, April 12, 2023

🛑 Tag's Swag

 🛑 Tag's Swag


          2018 पासून ब्रिटिश कौन्सिल अंतर्गत शिक्षक उपक्रम समूह बनविण्यात आला. मी त्यावेळी वैभववाडी तालुक्यातील मांगवली नं.१ शाळेत होतो. आम्हाला मंगला कदम या अत्यंत हुशार अशा टॅगच्या समन्वयक होत्या. त्यांची शिकविण्याची शैली समजून सांगण्याची होती. अध्यापनात जास्तीत जास्त इंग्रजीचा वापर करण्याचे कौशल्य त्यांनीच आम्हाला शिकवले. आम्ही त्यापूर्वीही इंग्रजी शिकवीत होतोच. पण त्यांच्या सुचनांनी आम्ही विशेषतः  प्रभावित होत गेलो. मनात इंग्रजी बोलण्याची भीती पाठ सोडायला तयार नव्हती. या भीतीला सोबत घेऊनच शिक्षक असूनही सामोरा जात होतो. 

अर्थात ही भीती फक्त मलाच होती असे नसावे. ती प्रत्येकाच्या मनात होती. पण कोणीही स्पष्ट बोलताना दिसत नव्हते. आम्ही सगळे विद्यार्थी म्हणून शिकत असताना पाचवीपासून इंग्रजी शिकलो होतो. आता पहिलीपासून इंग्रजी सुरु झाले होते. सेमी इंग्रजीचे वारे सगळीकडेच वाहू लागल्यामुळे आम्हीही त्यासोबत वाहण्याचा प्रयत्न करत होतो. प्रयत्न सफल होताना दिसत होते. महिन्यातून एक दिवस इंग्रजी शिकविणारे प्रत्येक शाळेतील एक किंवा दोन शिक्षक आमच्यासोबत इंग्रजी बोलण्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत होते. 

आम्ही सगळे भाषांतर पद्धतीने इंग्रजी शिकलेले होतो. त्यामुळे मराठीत विचार करुन इंग्रजीत बोलण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू असताना होणाऱ्या चुकांना हसण्याशिवाय पर्याय नव्हता. मजा येत होती ती आमच्या फजितीची. हळूहळू आत्मविश्वास वाढताना दिसत होता. दोन ते तीन टॅग मिटिंग झाल्यानंतर त्यात भर पडली. वर्गातही जाणीवपूर्वक इंग्रजी विषयाकडे लक्ष देणे सुरु झाले. शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांची यादी तर दररोज वाढत चाललेली दिसत होती. नवीन आलेली धोरणे राबवण्याची इच्छा असूनही इंग्रजी सराव कमी पडताना दिसत होता. शिक्षक संख्याही कमी कमी होत सहाची तीन झाली. काम तेवढेच होते. सहांनी करायची कामे तिघांना करताना दमछाक होत होती. टॅग मिटिंग झाल्यानंतर प्रभावित झालेले सगळे शिक्षक शाळेत आणि वर्गात जाताच टॅगला विसरुन जुनुच पद्धती वापरताना दिसत होते. पुन्हा भाषांतर पद्धती वापरण्याशिवाय पर्यायच दिसत नव्हता. अखेर बदलीची ऑर्डर आली. शिडवणे नं. १ शाळा मिळाली. नवीन शैक्षणिक वर्षात पुन्हा टॅग मिटिंग सुरु झाली. साळीस्ते केंद्रात दोन केंद्रांची टॅग अनुभवताना विविध शिक्षकांचे इंग्रजीवरील प्रभुत्व पाहून विलक्षण प्रभावित होत गेलो. आपणही अधिक प्रभुत्व मिळवावे असे वाटत होते. इंग्रजी ऱ्हाईम्स पाठ होत्या. पण त्यापुढे जाणं ही काळाची गरज होती. टॅग समन्वयक गोविंद वावदाने यांनी अजिबात मराठी बोलायचे नाही असे निक्षून सांगितले होते. सलग तीन तास फक्त ऐकायचे आणि बोलायचे होते. नवीन उपक्रमात सहभागी व्हायचे होते. आपण बोलताना कमी पडू याची भीती सतत सतावत होती. पण त्यामुळे जास्त वाचन करायला हवे याचीही जाणीव डोके वर काढत होती. 

वावदाने सरांच्या नियोजनपूर्वक टॅग मिटिंगमुळे इंग्रजी बोलण्याचा जास्त सराव झाला. तरीही मराठीत विचार करुन बोलण्याची सवय काहीकेल्या जात नव्हती. वर्गातही इंग्रजी शिकवताना मराठीचा वापर करणे कमी होतच नव्हते. पण दर महिन्याला होणाऱ्या टॅग मिटिंगमुळे अजून आत्मविश्वास वाढला. कधीकधी टॅग मिटींगला जायला मिळाले नाही. त्यामुळे तोटाच झाला असे म्हणायला हवे. आमचे हे शैक्षणिक नुकसान कधीही भरुन निघणारे नाही. वावदाने सरांनी नेहमीच सर्व शिक्षकांना इंग्रजी बोलण्यासाठी वाव दिला. त्यांना इंग्रजी विषयाचे गोविंद म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

पुन्हा एकदा खारेपाटण आणि शेर्पे केंद्राच्या संयुक्त टॅग मिटिंग होऊ लागल्या. तिथेही पुन्हा नवे शिक्षक शिक्षिका इंग्रजी बोलताना पाहून त्यांच्यासोबत बोलण्याचा सराव होऊ लागला. ऊन , पाऊस , थंडी काहीही असले तरी टॅग काही थांबली नाही. कोरोना काळातही ग्रुपवर चर्चा सुरु असे. कोरोना असतानाही ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन पद्धतीने टॅग करणे आम्हाला योग्य वाटले. घाबरत घाबरत आम्ही दोन पेक्षा जास्त टॅग पूर्ण केल्या. कोरोनाची आणि इंग्रजीची दोन्हींची भीती कमी कमी होऊ लागली. यात आम्हाला प्रोत्साहन देणारे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबलसर आणि नवे केंद्रप्रमुख संजय पवार यांचाही वाटा आहे. शेर्पे केंद्राची वैयक्तिक टॅग सुरु झाल्यानंतर प्रत्येकाचा सहभाग वाढत गेला. तरीही मराठीत विचार करुन इंग्रजीत बोलणे सुरुच आहे. मराठी , हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांचे अध्यापन करताना होत असलेली नेहमीचीच कसरत अशीच पुढे चालू राहणार आहे. पण टॅग आणि टॅग समन्वयक यांच्या मार्गदर्शनाने इंग्रजीच्या ज्ञानात पडलेली ही भर कधीही कमी न होणारी आहे. प्रत्येक शिक्षकाने इंग्रजीत विचार करता करता बोलण्याचा सराव करायलाच हवा. इंग्रजी साहित्य वाचायला हवे. इंगबंराजी ऐकायला हवे. इंग्रजी वर्तमानपत्र वाचायला हवे. इंग्रजी बातम्या समजल्या नाही तरी ऐकत राहत अर्थ समजून घेत राहायला पाहिजे. या सरावाने मनातील इंग्रजीच्या भीतीला पळवून लावण्याचे सामर्थ्य आहे.आपल्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारायचे असेल तर प्रथम सर्व शिक्षकांनी आपले स्वतःचे इंग्रजी सुधारायला हवे. मग बघा , प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही न घाबरता इंग्रजी बोलू लागतील. हा क्षण प्रत्येक शिक्षक आपल्या जीवनात आणेल तो क्षण विद्यार्थी आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत भाग्याचा असेल यात कोणतीही शंका नाही. 


Ⓒ प्रवीण अशितोष कुबल ( पदवीधर शिक्षक ) शाळा शिडवणे नं. १


Monday, April 10, 2023

🛑 आम्ही वारीक वारीक

🛑 आम्ही वारीक वारीक

          संत सेना महाराज हे नाभिक समाजाचे संत म्हणून सर्वांनाच ज्ञात आहेत. ते मूळ मध्यप्रदेशातील बांधवगडचे. त्यांनी अनेक काव्यरचना केल्या. कवने केली. आजही ती अभंग आहेत. त्यांनी केलेल्या रचना विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या आहेत. 

          त्या काळात नाभिक हे नाव वापरले जात नव्हते. न्हावी या नावाचा उच्चार पुनःपुन्हा होत होता. अजूनही कागदोपत्री ' न्हावी ' या नावालाच उल्लेख आढळतो. नाभिक समाजावर राम नगरकर या नाभिक समाजातील शाहिराने ' रामनगरी ' हे विनोदी पुस्तक लिहून नाभिक समाजाचे प्रश्न मांडले आहेत. नाभिक समाजाचे लोक हे केशकर्तनाचा पारंपरिक व्यवसाय करतात. त्यात आता आधुनिकता आली आहे. हा नाभिक आपली कात्री , फणी , वस्तरा , वाटी आणि एक कापड ज्या पिशवीत किंवा ट्रंकेत ठेवत असे , त्याला ' धोकटी ' असे म्हटले जाई. 

          गावोगावी फिरुन काम करणारे नाभिक व्यावसायिक आता कमी झाले आहेत. काही गावांमध्ये एकही नाभिकाचे घर नसेल तर दुसऱ्या गावातून नाभिक बोलावले जात. त्याला वर्षाची ' कुल ' दिली जाई. कुल म्हणजे न सडलेला भात. एका माणसाची वर्षभर स्वच्छता केल्याबद्दल एखादी गोणी भात मिळे. हळूहळू या गोणीचाही आकार कमी कमी होत गेला. 

          कुंभार , मांग , रामोशी , महार , सोनार , लोहार , सुतार , गुरव , चांभार , कोळी , परिट आणि न्हावी असे बारा बलुतेदार म्हणजे लोकांचे सेवकच. या लोकांमध्ये नाभिकांचा धंदा म्हणजे हातावरचं पोट. 

          लग्नातील नवऱ्याची रेग , मयत झालेल्या घरातील पुरुष सदस्यांचे शौरकर्म करणं , अशुभ कार्याच्या वेळी शेंडी कापणे इत्यादी कामे नाभिकाशिवाय पुढे जात नाहीत. या कामाबद्दलही पूर्वी जमीन , झाड , कपडे , टॉवेल इत्यादी मिळे. आता रोख रक्कम दिली जाते. रितीरिवाज असेल तर काही वस्तुरुपाने भेटी दिल्या जातात. 

          आता नाभिक समाजातील शिकलेली मुले  पारंपरिक व्यवसाय करण्यास पुढे सरसावताना दिसत नाहीत. जेंटस ब्युटीपार्लर , युनिसेक्स सलून , स्पा इत्यादी व्यवसाय वाढीस लागत असले तरी हे व्यवसाय नाभिकेतर लोक चालवू लागले आहेत. चांगला पैसा मिळत असल्याने इतर समाजही या धंद्याकडे आकर्षिला जात आहे. याचा परिणाम मूळ नाभिक बांधवांवर होऊ लागला आहे. 

          नाभिक व्यवसाय करणाऱ्या मुलास लग्नासाठी मुली मिळणेही अवघड बनत चालले आहे. सर्वांनाच मुंबईला स्थायिक असलेले नोकरीवाले नवरे हवे आहेत. याचाही मोठा फटका नाभिक बांधवांना बसतो आहे. 

          संत शिरोमणी सेना महाराज हे नाभिक समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. विविध समाजोपयोगी कार्यक्रम केले जातात. तळागाळातील नाभिक समाज सुशिक्षित झाला पाहिजे असे प्रयत्न नाभिक  संघटनेच्या वतीने केले जातात. आधुनिकतेकडून अत्याधुनिकतेकडे जाण्यासाठी नाभिक युवक , युवतींनी नाभिक संघटनेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होणे ही काळाची गरज आहे. आजची पिढी हे उद्याचे भविष्य आहे. त्यांनीच जर संघटनेकडे पाठ फिरवली तर उद्याचे भावी कर्तबगार नाभिक कसे निर्माण होणार ? नाभिक युवक , युवतींनी नाभिक व्यवसायाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला पाहिजे. लोकांना काय हवे आहे याचा अभ्यास करुन त्यांची सेवा करण्याचे हे लोकव्रत पुढे सुरु ठेवण्यासाठी अग्रस्थानी राहिले पाहिजे. नोकरी करण्यापेक्षा आपल्या दुकानात दुसऱ्याला नोकरीला ठेवण्याची क्षमता बाळगली पाहिजे. 

          संत सेना महाराजांनी बादशहाची सेवा केली. असेच एकदा संत सेना महाराजांना बादशहाकडे बोलावणे आले होते. संत सेना महाराज विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांना विठ्ठलासाठी वेळ देणे महत्त्वाचे वाटले. त्यामुळे बादशहाकडे जायला उशीर झाला. याचा राग येऊन बादशहाने सेना महाराजांना पकडून आणण्याचे फर्मान काढले. बादशहाचे सैनिक सेनांना पकडण्यासाठी घरी आले. इकडे बादशहाची दाढी करायला दुसरेच सेना आले होते. बादशाहाच्या सेवकांनी सेना महाराजांना बंदी करुन त्यांच्यासमोर उभे केले. बादशहाला आश्चर्यच वाटले. " सेना महाराज जर घरी होते , तर मग माझी दाढी करुन गेलेले सेना कोण होते ? " बादशहाला संत सेना महाराजांच्या विठ्ठलभक्तीबद्दल आदर वाटला. कारण बादशहाची दाढी करण्यास आलेले दुसरे संत सेना म्हणजे साक्षात विठ्ठल पांडुरंग होते. बादशहा शरमला. त्याने संत शिरोमणी सेना महाराजांचा गौरव केला. 

          असे हे संत सेना महाराज आपल्याला ' वारीक ' म्हणत. त्यांनी एका अभंगात असे म्हटले आहे , " आम्ही वारीक वारीक , हजामत करु बारीक. " आज त्यांची जयंती आहे . त्यानिमित्ताने या थोर विभूतीस माझे कोटी कोटी प्रणाम. 

©️ प्रवीण अशितोष कुबल , जिल्हाध्यक्ष , सिंधुदुर्ग नाभिक कर्मचारी संघटना





Friday, April 7, 2023

ओढ गावाची

         प्रत्येकाला आपला गाव आवडत असतो. ज्या गावात आपला जन्म झाला , तोही आपलाच गाव असं आपल्याला वाटत असतं. अर्थात जन्मस्थळ आणि गाव यांत साम्य असलं तर त्या गावाविषयी आपल्याला कमालीची ओढ असते. नव्हे ती असायलाच हवी. आपल्या गावाशी आपली नाळ जोडलेली असते. त्या गावातील आठवणी आपल्याला सतत गावाची ओढ तीव्र करत राहतात. 

        ' गड्या आपला गावच बरा ' असं म्हणणारी अनेक माणसं मी बघितली आहेत. त्यांना हे सतत कळत असतं . गावात आले कि त्यांना शहराचा विसर पडतो. रजा संपत आली कि पोटात भला मोठा गोळा येतो. शहराकडे जाताना पावले जड होत जातात. शेवटी आपल्या मातृभूमीला सोडताना जणू आईलाच पारखे होत असल्याचा अनुभव येत असतो. गावातील ते अविस्मरणीय क्षण आठवले कि पाय पुढे पडणारच कसे ? 

        माझा जन्म कणकवलीत झाला. त्यावेळी वाहतुकीची आतासारखी साधनं नव्हती. संपर्क साधनं तर नव्हतीच म्हणाना. गोरगरिबांसाठी कुठला आलाय फोन ?  तो फक्त बघण्यापुरता मर्यादित होता. कणकवलीपासून दहा मैलावर असणारं माझं किर्लोस गाव. आता त्याचं नाव आंबवणेवाडी असं झालं आहे. पण आम्ही किर्लोस या नावाचाच उच्चार करतो. किर्लोस हेच नाव आमच्या तनामनात कोरले गेले आहे. सर्व धार्मिक कार्यक्रम आमच्या गावीच केले जातात. मराठी दिनदर्शिकेप्रमाणे येणाऱ्या अधिकाधिक सणांना बालपणी आम्ही किर्लोस गावी जात असू. बालपणीचा तो काळ खूप सुखाचा म्हणायला हवा. त्याचं वर्णन करताना प्रत्येकवेळी वेगवेगळ्या उपमा सुचू शकतात. बालपणी गावात घालवलेले क्षण आनंदाचे परमोच्च बिंदूच म्हणायला हवेत. 

        शेतावर गुरे घेऊन जाणे , गुरे पाण्यावर घेऊन जाणे , गुरे पाण्यावर नेत असताना वाटेत सापडणारी सगळी झाडे आपल्याला फळे द्यायला आधीच उत्सुक असत. झाडाखाली पडलेली जांभळे , चिंचा , बोरे खाताना येणारी मजा काही औरच. करवंदे खाऊन ओठ चिकटत. करवंदांचा लालभडक कोंबडा खातानाचे दिवस पार काळवंडून गेले आहेत. नदीवर नेलेल्या गुरांना पाण्यात डुंबताना पाहून आपणांस डुंबता येत नाही ही खंत अजूनही सलते आहे.  काकांनी पोटाखाली हात धरून पोहायला शिकवतानाचे धडे लक्षात आहेत. पण आता मात्र त्याच पाण्याची ज्याम भीती वाटते. आमच्या नदीने त्यावेळी मुंबईकरांचे घेतलेले जलबळी आमच्या मनात थरकाप आणत. त्यामुळे पाण्याची भीती वाटत गेली. पोहोणे राहूनच गेले. कपडे धुणाऱ्या फडतरीच्या पुढे पोहत जाण्याचे आमचे धाडस काहीकेल्या झालेच नाही. 

        पावसाळ्यात शेतावरील गुट्यावर बसून चिखलात पडताना झालेला आनंद अजूनही अंगावर रोमांच आणतो आहे. रात्रीच्या वेळी काकांनी पकडून आणलेले ' न्हयचे  माश्ये ' मनःचक्षूंसमोर फडफडताना दिसत आहेत. त्याचं तिखट सार आणि हाताचा दोन दिवस न जाणारा वास गायबच झाला आहे. हे सगळे क्षण अविस्मरणीय आहेत म्हणूनच मला माझ्या गावाची ओढ वाटत राहते. सुट्टी कधी एकदा पडते आणि गावाला जायला मिळते असे आम्हाला होऊन जाई. शनिवारी आणि रविवारी मिळालेली संधीही आम्ही सोडत नसू. आंबे , काजू तर होतेच. फणसाचे गरे खाताना स्पर्धा लागे. माझे बाबा एकावेळी पन्नास साठ पेक्षा जास्त बरके गरे खात. त्यांचा कायम पहिला नंबर ठरलेला असे. आम्ही वीस पंचवीसच्या पुढे कधी गेलोच नाही. खाऊन पचवणे त्यावेळी चांगले जमे. आता जास्त खाल्ले तर त्रास होईल म्हणून स्पर्धाच लावली जात नाही. 

        मी रत्नागिरी जिल्ह्यात नोकरीला लागलो. आता जन्मभूमी आणि कर्मभूमी बदलली होती. नोकरीत खुश होतो. पण गावाकडे जाण्याची ओढ काही कमी होत नव्हती. एक नोकरी सोडून दुसरी नोकरी पकडली. तीही रत्नागिरीतच. माध्यमिक शाळेतील नोकरी सोडून मराठी जिल्हा परिषदेची नोकरी स्विकारताना मनस्वी त्रास होत होताच. सरांचा गुरुजी झालो. तिथेही अठरा ते एकोणीस महिने छान नोकरी केली. गावाकडून येणारी पत्रे डोळ्यात पाणी आणत होती. मीही पाणी भरल्या डोळ्यांनी उत्तरे देत राहिलो. 

        शेवटी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओढ तीव्र झाली. नवीन भरतीच्या वेळी माझी सिंधुदुर्गात निवड झाली. एका दिवसांत निर्णय घेतला. रत्नागिरीतील नोकरी सोडून सिंधुदुर्गात आलो. देवगडात नऊ वर्षे नोकरी केली. पुन्हा कणकवलीत पाच वर्षे , वैभववाडीत सात वर्षे आणि आता पुन्हा कणकवलीत म्हणजे माझ्या जन्मभूमीत आलो आहे. माझी माणसे माझ्यासोबत आहेत. ती मला रोज भेटत आहेत. त्यांच्यासोबत आयुष्य जगताना आयुष्याचं सोनं होत आहे. 

© प्रवीण अशितोष कुबल ( पदवीधर शिक्षक , शाळा शिडवणे नं. १ ) 





        

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...