🛑 रिश्ता खून से नही , परवरिश से बनता है
काल एक नवीन चित्रपट बघायला गेलो होतो. चित्रपट कॉमेडी होता. त्यात संस्कारांबद्दल सांगण्यात आलेले आहे.
खरंच संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. मूल जन्माला आल्यापासून त्याच्यावर विविध गोष्टींचे संस्कार सुरु होतात. त्याच्यावर चांगल्या गोष्टींचे संस्कार करताना वाईट गोष्टींचेही संस्कार घडत असतात. हे वाईट आहे , असं करु नये अशा बाबी त्याला पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात.
अर्थात हे सांगणारे आपण स्वतः पालक , आई , वडील , घरातील मंडळी आणि त्याचे शिक्षक असतात. या सर्वांच्या सानिध्यात राहूनच मुलांवर चांगल्या गोष्टींची सवय होत राहते. या चांगल्या सवयीचं रुपांतर सुसंस्कारात होतं.
संस्कार देणारे पालक संस्कारांची शाळाच असतात. सगळे संस्कार शाळेत शिकवले जात असतील , पण शाळेतील वेळेपेक्षा मूल घरात जास्त वेळ असतं. त्यामुळे शाळेतील संस्कार वृद्धिंगत करणं हे सर्वस्वी पालकांचं काम असतं. फक्त शाळेत घातलं की आपलं काम झालं असं कधीच होता कामा नये. चांगल्या आणि सगळ्या सुविधा असलेल्या शाळेत घालून पालक मोकळे होतात. शाळेची भरमसाठ फी भरली की त्यात सगळे संस्कार मिळतील अशी त्यांची सहज भावना असते. संस्कार असे विकत घेण्याची गोष्ट नसते. ते जाणीवपूर्वक करण्याची प्रक्रिया आहे.
निर्जीव दगडाची गोष्ट आहे. एका दगडाचे दोन भाग केले गेले. त्याचा एक भाग देवीची पाषाणमूर्ती बनवण्यासाठी वापरला गेला. सुबक मूर्ती तयार झाली. देवालयात त्या देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. भक्तगण त्या देवीच्या पाषाणमूर्तीवर मनोभावे फुले , पुष्पहार अर्पण करु लागले. निर्जीव दगडाचा उद्धार झाला. दररोज त्या दगडाची पूजा अर्चा होऊ लागली. दगडाच्या जीवनाचे सार्थक झाले. सर्व भक्त आपल्याला नमस्कार करण्यासाठी येत आहेत हे दगडाच्या लक्षात आले. दगड मनोमन आपल्या असण्यावर खुश होत राहिला. त्याचं देवी असणं त्याला निरंतर समाधान देत होतं.
इकडे त्या दगडाचा दुसरा भाग बाजूला करण्यात आला होता. दगड अगदी दिसायला तसाच होता. पण त्याची मूर्ती बनवली गेली नव्हती. बरेच दिवस तो दगड तसाच पडून होता. तेवढ्या मूर्तीची ऑर्डर मिळाली नव्हती. एक धनाढ्य व्यापारी आला. त्याने तो दगड पाहिला. त्याला तो आवडला. त्याने तो विकत घेतला. त्याच्या नवीन बंगल्याचे काम सुरु होते. या दगडाचा वापर आपल्या बंगल्यासाठी होईल म्हणून त्याने तो मुद्दाम आणला होता. बंगल्याच्या स्वच्छतागृहाचे काम सुरु होते. त्याला एक दगड कमी पडत होता. हा नवीन आणलेला दगड स्वच्छतागृहामध्ये बसवण्यात आला. या दगडाचा उपयोग असा वेगळ्या प्रकारे होणार होता. दगडाचा दर्जा चांगला होता , तरीही त्याचा हा असा होणारा वापर पाहून स्वतः दगड नाराज झाला होता. स्वच्छतागृहात जाणारे लोक त्याच्यावर पाय ठेवून पुढे जात होते. दगड त्या घाणेरड्या , अस्वच्छ पायांच्या वासाने गुदमरुन गेला होता. यापुढे त्याचे जगणे असेच असणार होते. दुसऱ्या दगडाचा वापर स्वच्छतागृहासाठी झाल्याने दगड मनोमन खट्टू होऊन बसला होता.
या गोष्टीतील एका दगडाच्या दोन तुकड्यांचे जीवन वेगवेगळे झालेले दिसते आहे. एकाच दर्जाचे असलेले हे दगड ज्या संस्कारात गेले , अगदी त्या संस्काराचे घडून गेले आहेत. त्या संस्कारातून आता त्यांची सुटका होणे कठीण आहे. पहिला दगड मजेत नमस्कार स्वीकारतोय , तर दुसरा दगड लाथा.......
याचा अर्थ असा की आपली सजीव असणारी मुले ज्या संस्कारात वाढतील , तशी ती घडत जातील. म्हणून तशा म्हणी निर्माण झाल्या आहेत , " खाण तशी माती , बाप तसा बेटा , कुंभार तसा लोटा ". यांत सुसंस्कार आणि कुसंस्कार दोन्ही दाखवले आहेत. म्हणूनच त्या चित्रपटातील ते हिंदी भाषेतील वाक्य मला अधिक संयुक्तिक वाटतं , " रिश्ता खून से नही , परवरिश से बनता है !!! "
©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )





