🛑 आदिती , तू कुठे आहेस ?
शिक्षकांना अशी किती मुलं भेटत असतील नाही का ? पेशा स्वीकारल्यापासून कित्येक मुलांचा सहवास लाभला आहे. छोट्या शाळेत काम करताना त्या दहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या बाललीला पाहताना भान हरपून जाते. ती मग त्या विशिष्ट पालकांची मुलं राहत नाहीत , ती आपलीच मुलं होऊन जातात.
शिरवल रतांबेवाडी शाळेत असतानाचे दिवस आठवतात. तिथला निसर्गरम्य परिसर आठवतो. तिथल्या सगळ्या आठवणी कधीही शिळ्या न होणाऱ्या आहेत. खरंतर माणसाच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडत असतात , त्या लक्षात ठेवण्याची गरजही नसते. पण काही अशा आठवणी चिरकाल स्मरणात राहतात.
दोन शिक्षकी शाळा. सात ते आठ मुलांचा पट. प्रत्येक मुलाशी आपुलकीचं नातं जडलेलं. प्रत्येक मुलाने शिक्षकांशी तसंच जिव्हाळ्याचं नातं जपलेलं. नातं जडणं तसं सोपं , पण ते अखंड जपणं कठीणच. मुलांनी ते नातं कायमचं जपत राहण्यासाठी माझ्यासारखे शिक्षक नक्कीच देवाकडे प्रार्थना करतील.
शाळेत जाण्यासाठी अडचणीची वाट होती. उतरत्या रस्त्याने जाताना जीव मुठीत ठेवून जावे लागे. तरीही पाच वर्षे त्या रस्त्याची सवय झाली. गाडी रस्त्याच्या कडेला लावायची आणि दहा मिनिटे चालत जायचे. रतांब्यांची झाडे दिसू लागली की त्यापुढे शाळा दिसे. मी धावतच शाळेत जाई. शेतीच्या मळ्यांच्या मेरेवरुन जाताना भीती वाटे. कधी भेकरे वाटेत आडवी येत. दाट झाडीतून शाळेपर्यंत पोहोचताना वाघाचीही भीती चटका लावून जाई. पण एवढ्या वर्षात वाघ काही भेटला नाही. डुकरांची झुंडच्या झुंड एकदा पाहिली. तशी झुंड नंतर पाहायला मिळाली नाही.
या रस्त्याने जाताना बऱ्याचदा माझे विद्यार्थी माझ्यासोबत असत. त्यांच्या साथीमुळे माझी भिती कुठल्या कुठे पळून जाई. कुडतरकरांची आदिती नुकतीच पहिलीत आली होती. तिला शिकवायला मडवबाई होत्या. आदिती मला घाबरत असे. ती माझ्याकडे अजिबात पाहत नसे. तिसरी चौथीच्या मुलांना ओरडताना तिने मला पाहिले होते. त्यामुळे तिच्या मनात माझ्याबद्दल भीती निर्माण झाली असावी.
पण एक दोन महिन्यांत ती माझ्याशी बोलू लागली. गाडीवर बसून निघताना मी दिसेनासा होईपर्यंत टाटा करणारी आदिती आजही मला जशीच्या तशी दिसते आहे. हळूहळू तिची आणि माझी छान गट्टी जमली. ती माझ्याशी न घाबरता बोलू लागली. ती माझ्या एकदम जवळ येऊन काहीतरी सांगू लागली. तिचं ते निरागस हसणं मलाही खूप आवडू लागलं. ती एखाद्या दिवशी शाळेत आली नाही तर सगळ्या मुलांना शाळा खायला येऊ लागली. तिचे बोल बोबडे होते. त्या बोलांमध्ये अनोखी जादू होती.
आणि तिच्या साठी तो सुट्टीचा काळा दिवस उगवला. मकर संक्रांत होती. दुपारची भोजनाची वेळ असेल. घराबाहेरच्या अंगणातील तुळशीसमोर निरांजन तेवत होते. वाऱ्याने तिची ज्योत आज जरा जास्तच वेगाने फडफडत होती. सुंदर ड्रेस परिधान केलेली खेळकर आदिती तिथेच खेळत , बागडत होती. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती दुडूदुडू धावत होती नुसती. तिचे कुठेच लक्ष नव्हते. तिचा फ्रॉक पायापर्यंत होता. तोही तिच्या गिरकीबरोबर गोल गिरक्या घेत होता. अचानक ती गिरक्या घेत घेत कधी त्या निरंजनापाशी आली ते तिचे तिलाच समजले नाही.
जोराने पेटणाऱ्या त्या निरांजनाच्या ज्योतीने आदितीच्या फ्रॉकला अलगद स्पर्श केला होता. तिच्या फ्रॉकने घेतलेला पेट तिला समजला. तिचे शरीर भाजू लागले. ती जिवाच्या आकांताने किंचाळू लागली. तिच्या भयानक ओरड्याने घरातले सगळे बाहेर धावले. सर्वांनी तिला वाचवण्यासाठी जीवावर उदार होऊन प्रयत्न केले. ती साठ टक्केपेक्षा जास्त भाजली होती. नॉयलॉनच्या फ्रॉकने आग भडकवली होती. तिला डॉक्टरांकडे तातडीने हलवले होते.
मला ही बातमी समजली तसा मीही लगेच निघालो. तिच्या चेहऱ्याला काहीही झाले नव्हते. तिचे मानेखालील शरीर भाजले होते. तिच्या संपूर्ण शरीराला बँडेज लावलेले दिसत होते. मी तिच्या निरागस चेहऱ्याकडे अतिशय प्रेमाने पाहिले. तिनेही माझ्याकडे नेहमीप्रमाणे पाहिले होते. तिला असह्य वेदना होत होत्या. तिचे पालक हतबल झाले होते. ती बरी होईल असे त्यांना वाटत होते. डॉक्टरांनी तिला मुंबईला हलवायला सांगितले होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिला मुंबईला नेण्याची तयारीही करण्यात आली होती.
अरेरे !!! संध्याकाळी तिला मुंबईला नेण्याअगोदरच तिच्याविषयीची दुःखद बातमी कानावर येऊन धडकली. आदितीचे ते बोबडे बोल आता कधीच ऐकू येणार नव्हते.
त्यानंतर दोन तीन महिन्यांत माझं शाळेत जाणं येणं यंत्रवत झालं होतं. मला हसतमुखाने टाटा करणारी माझी विद्यार्थिनी आदिती आता कधीच दिसणार नव्हती. आता ती शाळा बंद झाली आहे. मुलांच्या आठवणी काहीकेल्या बंद होऊ शकत नाहीत. आदिती बाळा , तू आता कुठे असशील ? ये ना परत , स्वप्नात तरी !!!
©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )