Sunday, December 25, 2022

🛑 रिश्ता खून से नही , परवरिश से बनता है

🛑 रिश्ता खून से नही , परवरिश से बनता है

          काल एक नवीन चित्रपट बघायला गेलो होतो. चित्रपट कॉमेडी होता. त्यात संस्कारांबद्दल सांगण्यात आलेले आहे. 

          खरंच संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. मूल जन्माला आल्यापासून त्याच्यावर विविध गोष्टींचे संस्कार सुरु होतात. त्याच्यावर चांगल्या गोष्टींचे संस्कार करताना वाईट गोष्टींचेही संस्कार घडत असतात. हे वाईट आहे , असं करु नये अशा बाबी त्याला पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात. 

          अर्थात हे सांगणारे आपण स्वतः पालक , आई , वडील , घरातील मंडळी आणि त्याचे शिक्षक असतात. या सर्वांच्या सानिध्यात राहूनच मुलांवर चांगल्या गोष्टींची सवय होत राहते. या चांगल्या सवयीचं रुपांतर सुसंस्कारात होतं. 

          संस्कार देणारे पालक संस्कारांची शाळाच असतात. सगळे संस्कार शाळेत शिकवले जात असतील , पण शाळेतील वेळेपेक्षा मूल घरात जास्त वेळ असतं. त्यामुळे शाळेतील संस्कार वृद्धिंगत करणं हे सर्वस्वी पालकांचं काम असतं. फक्त शाळेत घातलं की आपलं काम झालं असं कधीच होता कामा नये. चांगल्या आणि सगळ्या सुविधा असलेल्या शाळेत घालून पालक मोकळे होतात. शाळेची भरमसाठ फी भरली की त्यात सगळे संस्कार मिळतील अशी त्यांची सहज भावना असते. संस्कार असे विकत घेण्याची गोष्ट नसते. ते जाणीवपूर्वक करण्याची प्रक्रिया आहे. 

          निर्जीव दगडाची गोष्ट आहे. एका दगडाचे दोन भाग केले गेले. त्याचा एक भाग देवीची पाषाणमूर्ती बनवण्यासाठी वापरला गेला. सुबक मूर्ती तयार झाली. देवालयात त्या देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. भक्तगण त्या देवीच्या पाषाणमूर्तीवर मनोभावे फुले , पुष्पहार अर्पण करु लागले. निर्जीव दगडाचा उद्धार झाला. दररोज त्या दगडाची पूजा अर्चा होऊ लागली. दगडाच्या जीवनाचे सार्थक झाले. सर्व भक्त आपल्याला नमस्कार करण्यासाठी येत आहेत हे दगडाच्या लक्षात आले. दगड मनोमन आपल्या असण्यावर खुश होत राहिला. त्याचं देवी असणं त्याला निरंतर समाधान देत होतं. 

          इकडे त्या दगडाचा दुसरा भाग बाजूला करण्यात आला होता. दगड अगदी दिसायला तसाच होता. पण त्याची मूर्ती बनवली गेली नव्हती. बरेच दिवस तो दगड तसाच पडून होता. तेवढ्या मूर्तीची ऑर्डर मिळाली नव्हती. एक धनाढ्य व्यापारी आला. त्याने तो दगड पाहिला. त्याला तो आवडला. त्याने तो विकत घेतला. त्याच्या नवीन बंगल्याचे काम सुरु होते. या दगडाचा वापर आपल्या बंगल्यासाठी होईल म्हणून त्याने तो मुद्दाम आणला होता. बंगल्याच्या स्वच्छतागृहाचे काम सुरु होते. त्याला एक दगड कमी पडत होता. हा नवीन आणलेला दगड स्वच्छतागृहामध्ये बसवण्यात आला. या दगडाचा उपयोग असा वेगळ्या प्रकारे होणार होता. दगडाचा दर्जा चांगला होता , तरीही त्याचा हा असा होणारा वापर पाहून स्वतः दगड नाराज झाला होता. स्वच्छतागृहात जाणारे लोक त्याच्यावर पाय ठेवून पुढे जात होते. दगड त्या घाणेरड्या , अस्वच्छ पायांच्या वासाने गुदमरुन गेला होता. यापुढे त्याचे जगणे असेच असणार होते.  दुसऱ्या दगडाचा वापर स्वच्छतागृहासाठी झाल्याने दगड मनोमन खट्टू होऊन बसला होता. 

          या गोष्टीतील एका दगडाच्या दोन तुकड्यांचे जीवन वेगवेगळे झालेले दिसते आहे. एकाच दर्जाचे असलेले हे दगड ज्या संस्कारात गेले , अगदी त्या संस्काराचे घडून गेले आहेत. त्या संस्कारातून आता त्यांची सुटका होणे कठीण आहे. पहिला दगड मजेत नमस्कार स्वीकारतोय , तर दुसरा दगड लाथा....... 

          याचा अर्थ असा की आपली सजीव असणारी मुले ज्या संस्कारात वाढतील , तशी ती घडत जातील. म्हणून तशा म्हणी निर्माण झाल्या आहेत , " खाण तशी माती , बाप तसा बेटा , कुंभार तसा लोटा ". यांत सुसंस्कार आणि कुसंस्कार दोन्ही दाखवले आहेत. म्हणूनच त्या चित्रपटातील ते हिंदी भाषेतील वाक्य मला अधिक संयुक्तिक वाटतं , " रिश्ता खून से नही , परवरिश से बनता है !!! " 

©️ प्रवीण अशितोष कुबल  ( 9881471684 )



Saturday, December 24, 2022

🛑 मयुरेश जन्माला आला

🛑 मयुरेश जन्माला आला

          नऊ महिने पोटात होणाऱ्या हालचाली वाढत चालल्या की आईला बाळाच्या येण्याची आतुरता वाढीस लागलेली असते. माझा बाळ कधी एकदा बघते असे तिला झालेले असते. तिची ही आतुरता साहजिकच असते. ती त्या बाळाची आईच असते. त्या बाळाची वाट बघणारे त्याचे वडील , बहिणी आणि घरातील सर्व आमच्यासारखी मंडळी त्याच्या प्रतिक्षेत असतात. ' तो कधी येतोय ' ची आतुरता कमालीची उत्कंठेला जाऊन पोहोचते. गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट भक्त पाहत असतात , तशी या छोट्या बाप्पाच्या आगमनाची वाट घरातील सर्वच सदस्य पाहात असतात. 

          मी स्वतः माझ्या होणाऱ्या बाळांची अतिशय आतुरतेने वाट बघितलेली आहे. जणू स्वतःच्या पोटात बाळ असल्यासारखे नऊच्या नऊ महिने मी अक्षरशः मोजत राहिलो होतो. स्वतःचं बाळ जन्माला आल्यानंतर होणारा आनंद शब्दांत व्यक्त होणारा नसतो. तो शब्दातीत असतो. ते माझं बाळ आहे , त्याच्यावर माझा हक्क आहे ही ती निर्मळ प्रेमळ भावना असते. ते बाळ तो किंवा ती आहे याच्याशी मतलब नसतो. त्या बाळाचं हसणं आणि रडणं दोन्ही आपल्याला आसू आणि हसु देणारं असतं. 

          आमच्या घरात आम्ही दोघे भाऊ जन्माला आलो. बाबांना आम्ही दोन मुलगे. इतर चारही काकांना सर्व मुलीच. त्यामुळे माझ्या भावाच्या जन्मानंतर घरात मुलगा जन्माला येण्याचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होताना दिसत नव्हतं. रोज स्वप्नं पडत होती , पण ती सत्यात उतरताना दिसत नव्हती. 

          माझं लग्न झाल्यानंतर माझ्याकडून सर्वांच्या अपेक्षा वाढत होत्या. अर्थात माझ्याकडून त्या अपेक्षा पूर्ण होणं हे सर्वस्वी नशिबावर अवलंबून होतं. पहिल्या वेळी मुलगी झाली , तेव्हा ' पहिली बेटी धनाची पेटी ' असे म्हणून सर्वांनी माझ्यासाठी जल्लोष केला होता. दुसऱ्या वेळी मला असे काहीच नको होते. पत्नीला नऊ महिने होणारा त्रास मला सहन होत नव्हता. माझ्यापेक्षा माझी पत्नीच दुसऱ्या बाळंतपणासाठी आतुर झालेली. मुलगा हवा हा तिचा हव्यास तिला आणि पोटात वाढणाऱ्या तिच्या बाळाला दोघांनाही देवाघरी घेऊन गेला. ' तो बाळ ' हे जग बघू शकला नाही. त्यानंतर एका वर्षभरात माझे दुसरे लग्न लावण्यात आले. आता मला पुन्हा दोन मुलीच आहेत. एकूण तीन मुलींचा बाप असलो तरी मला मुलगा नसल्याचे अजिबात दुःख नाही. 

          गावी गेलो की गावातील ज्येष्ठ मंडळी अजूनही मला सांगत असतात , " तुका झिल होतलो " मी त्यांचं हे बोलणं कायमच हसण्यावारी नेत असतो. एका व्यक्तीने तर मला खूपच आपुलकीने म्हटलं , " तू इतका चांगला आहेस , सगळ्यांशी प्रेमाने वागतोस , तुझ्याच आयुष्यात असे का घडावे , तुला मुलगा नाही ही तुझी एकच बाजू लंगडी आहे. आम्हाला तुझी दया येते. " त्यांचं हे बोलणं ऐकलं आणि मला माझ्या अनेक नातेवाईकांच्या मनातही हेच चालले असेल असे वाटून मला हसू आले. लोकं किती अपेक्षा ठेवून असतात , नाही का ? मी अशी कधीच अपेक्षा ठेवली नाही , म्हणून मला त्याचे काहीच वाटत नाही. 

          मी माझ्या कुटुंबाला मुलगा देऊ शकलो नाही. भावाचे लग्न झाले. आता त्याच्याकडून अपेक्षा होत होत्या. त्यालाही पहिली मुलगीच झाली. पुन्हा अपेक्षाभंग..... 

          भाऊ यशस्वी होण्यासाठी घरातल्या सर्वांनी मनोमन गाऱ्हाणी सुरु केली होती. लवकरच गोड बातमी आहे असं समजलं. सर्वांना खूप आनंद झाला होता. आता नऊ महिने , नऊ दिवस वाट पाहणे कठीण जात होते. हे नऊ महिने लवकर संपावेत याचीही प्रतिक्षा सुरु झाली होती. आणि सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांनी सिझेरियन विभागात दाखल करुन घेतले. डॉक्टरांनी आपले काम सुरु केले होते. आम्ही सगळे दवाखान्यात ऑपरेशन थिएटरच्या बाहेर तहानभूक विसरुन जन्माला येणाऱ्या बाळाची वाट बघत बसलो होतो. नर्स बाहेर येत होत्या , आत जात होत्या. त्यांची होणारी तारांबळ किंवा धावपळ आमच्या मनात अधिकची भिती निर्माण करत होती. आम्ही सर्वजण देवाची आळवणी करत होतो. अखेर देव जागा झाला होता. देवाने आमचे ऐकले असावे. थोड्याच वेळात एक नर्स आमच्या बाळाला घेऊन बाहेर आली आणि म्हणाली , " मुलगा झाला हो " आम्ही सगळेच एवढे आनंदलो की आमच्या तोंडातून एकही शब्द फुटेना. डोळ्यातून आनंदाच्या धारा वाहू लागल्या होत्या. आमचा मयुरेश जन्माला आला होता. आमचं घरातल्या सर्वांचं स्वप्न पूर्ण झालं होतं.  बाप्पाच्या आगमनाची आतुरता संपली होती. आमचा बाप्पा म्हणजेच मयुरेश रडत होता आणि आम्ही सगळे त्याच्याकडे बघून हसत होतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )




Monday, December 19, 2022

🛑 लक्ष्मीने प्राण वाचवले

🛑 लक्ष्मीने प्राण वाचवले

          संकट काही सांगून येत नसतं , तुम्ही गाफिल राहिलात तर ते हमखास येऊ शकतं. संकट येताना काळ आणि वेळ दोन्ही सोबतीने येत असतात. त्या संकटाचा सामना करताना आपण वाचलो , तर म्हणतो ..... काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काळ आपले प्राण घेऊन जायला येतो , तेव्हा तो त्या व्यक्तीला नक्कीच दिसतो. त्यातून वाचता आले तर त्या काळाचा अदृश्य चेहरा सतत डोळ्यासमोर येत राहतो त्या भयंकर आठवणींच्या रुपाने. 

          तो लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. दिवाळीत लक्ष्मीपूजन आमच्यासाठी कायमच उत्साहाचे राहिले आहे. दरवर्षी आमच्या दुकानात लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. जुन्या दुकानातील गरीबी लक्ष्मीने दुर केली. नवीन दुकानात पुन्हा लक्ष्मीचा वास सुरु झाला. लक्ष्मी येत राहिली , कधी जात राहिली , कधी स्थिर राहिली. हे असे प्रत्येकाच्या बाबतीत घडत असते. आता आम्ही आमच्या राहत्या घरी सुद्धा लक्ष्मीपूजन थाटात साजरे करु लागलो आहोत. त्या दिवशी आम्ही आमच्या घरातील लक्ष्मीचे पूजन करुन दुकानातील लक्ष्मीचे पूजन करण्यास गेलो होतो. घरातील सर्व सदस्य दुकानात लक्ष्मीपूजन साजरं करताना आनंदून गेलो होतो. दुकानाच्या बाहेर सुंदर रांगोळी काढण्यात आली. लक्ष्मीची पावले आपल्या दुकानात सदैव यावीत यासाठी मनोभावे प्रार्थना केली. 

          भुईनळे , फटाके , आपटबार , पावसाचे फटाके अशी आतिषबाजी सुरुच होती. शेजारी पाजारी , गिऱ्हाईके , मित्र , ज्ञातीबांधव लक्ष्मीला नमस्कार करुन प्रसाद घेऊन जात होते. आमच्या दुकानाच्या बिल्डिंगप्रमाणेच सर्व शहरातील दुकाने प्रकाशमय झालेली पाहून उत्साह द्विगुणित होत होता. आपल्या लक्ष्मीला नमस्कार करत असताना आपल्याला दुसऱ्यांच्या लक्ष्मीपूजनाची आमंत्रणे येत असतात. त्यांच्याकडे जाणे हेही आपले कर्तव्य असते. हे कर्तव्य मी दरवर्षी पार पाडत असतो. याहीवर्षी मी माझ्या स्नेह्यांच्या दुकानातील लक्ष्मीदेवींना वंदन करण्यासाठी निघालो. 

          वेळ संध्याकाळी 8 नंतरची असेल. रस्त्यावर प्रकाशाची लक्ष्मी जागोजागी दिसत होती. रात्रीच्या काळोखात लक्ष्मी हसतमुखाने सर्वांना दर्शन देत असावी. ती साक्षात दिसत नसली तरी जाणवत होती. तिचे असणे लक्षात येत होते. 

          मी माझ्या स्कुटरने निघालो. पुढे माझी छोटी मुलगी उर्मी बसली होती. ती बसली नव्हती , तर स्कुटरच्या पुढच्या छोट्या जागेत उभी राहिली होती. पत्नी मागे बसली होती. जाता जाता ओळखीच्या दुकानात जाऊन नमस्कार करत पुढे पुढे जाणे सुरुच होते. 

          एका दुकानात जाण्यासाठी मी गाडी स्टँडवर लावली. गाडी सुरुच होती. गाडीची चावी मी फिरवली नव्हती. गाडी थांबवल्याबरोबर छोटी उर्मी गाडीवरून उतरली. पण गाडीजवळच थांबून दुकानांची रोषणाई पाहात उभी राहिली होती. पत्नीही गाडीवरून उतरुन दुकानाच्या दिशेने निघाली. मुलीला गाडीवरून खाली उतरण्यासाठी मीही माझे दोन्ही हात कधीच हँडलवरुन सोडले होते. मी फक्त गाडीवर बसलो होतो. गाडी सुरुच होती. मीही दुकानाकडे पाहत दंग झालो होतो. सभोवताली दिसणारी अदृश्य लक्ष्मी मला आकर्षित करीत होती. मी काही काळ भान विसरुन गेलो होतो. माझे माझ्याकडे आणि गाडीकडे काही क्षणांसाठी दुर्लक्ष झाले असेल बहुदा. अचानक गाडीने वेग घेतला. मला काहीच समजायला मार्ग नव्हता. मी आपोआप गाडीबरोबर पुढे जाऊ लागलो आहे हे माझ्या लक्षात आले. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करु लागलो. मोठ्याने ओरडत गाडीचे हँडल पकडण्याचा प्रयत्न केला. गाडीच्या एक्सीलेटरवर माझा हात पडला. माझ्या हाताने एक्सीलेटर आणखी पिळला गेला. गाडी अजून पुढे पुढे गेली. पुढून एक नवी कोरी करकरीत पांढरीशुभ्र कार येत होती. त्यांची कार नवीनच होती. ती यायला आणि माझी गाडी पुढे जायला काही सेकंदांचा कालावधी पुरेसा होता. मी माझ्या गाडीसह धाडकन त्या नव्या कोऱ्या गाडीवर जाऊन आदळलो. माझ्या गाडीचे बरेच नुकसान झाले. त्यांच्या गाडीला थोडेसे खरचटले. त्यांनाही खुप वाईट वाटले , कारण त्यांची नवी कोरी कार होती. मी गाडी बरोबर रस्त्यावर वायूवेगाने चित्रपटात घडावे तसा जाऊन आदळलो. माझे कपडे पूर्ण फाटून गेले. माझी मुलगी माझ्याबरोबर उडाली की काय असे मला काही क्षणांसाठी वाटले. मी भेदरुन गेलो. पण मी उठलो तेव्हा माझी छोटी मुलगी उर्मी रस्त्याच्या कडेला अधिक घाबरलेल्या अवस्थेत बघायला मिळाली. मी तिला जवळ घेतले. तिने मला घट्ट मिठी मारली. तिला काही झाले नाही हे पाहून माझा जीव भांड्यात पडला. संपूर्ण मोडून उध्वस्त झालेल्या गाडीकडे माझे मुळीच लक्ष नव्हते. मला लागलेला मुका मार अजिबात जाणवत नव्हता. मला फक्त माझी मुलगी वाचली याचा आनंद वाटत होता. मी स्वतः गाडीखाली जाणार होतो. सेकंदांच्या काही भागांचे अंतर असेल , काळ माझ्याकडे येत असताना मी साक्षात पाहत होतो. पण माझी वेळ आलेली नव्हती. मला माझ्या लक्ष्मीने थोडे मागे ओढून घेतले असावे. मी आणि माझी मुलगी दोघेही सुखरुप आहोत हे पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. 

          हा अपघात कशामुळे घडला हे सांगावंच लागेल. माझ्या मुलीने गाडीवरून उतरल्यानंतर सहज एक्सीलेटर दाबला होता , तिच्याकडून ते सहज घडून गेले होते. तिच्यामुळे हा अपघात घडला असे म्हणणेही चुकीचेच. कारण मीही गाडी बंद करायला विसरलो होतो. घरी आल्यानंतर माझ्या मुलीने स्वतःचे दोन्ही कान पकडले होते आणि म्हणत होती , " पप्पा , मी असं पुन्हा कधीच करणार नाही. " तिच्या त्या निष्पाप वागण्याने माझ्या डोळ्यात आलेले पाणी मी कधीही विसरु शकत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल  ( 9881471684 )



Thursday, December 8, 2022

🔴 कुप्पम ज्ञानम खुप्पम : भाग १

🔴 कुप्पम ज्ञानम खुप्पम : भाग १

          कुप्पम येथील अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन अंतर्गत प्रशिक्षणाचा पहिला दिवस अतिशय प्रेरणादायी ठरला. हे बघू की ते बघू असे प्रत्येकाला झाले होते. आदल्या दिवशीचा प्रवासाचा शीण कधीच निघून गेला होता. सगळीकडे वैज्ञानिक रचना दिसू लागल्या होत्या. 

          172 एकर जमिनीच्या मोठया प्रदेशात आमचं प्रशिक्षण सुरु झालं होतं. अगस्त्या फाऊंडेशनच्या रेखाचित्राने आकर्षित व्हायला झाले. त्यात मोबाईल लॅब , सायन्स सेंटर , सायन्स फेअर , लर्निंग मेथड्स , टिचर ट्रेनिंग , कॅम्पस इत्यादींचा उल्लेख करण्यात आला होता. म्हणजे हे सर्व आम्हाला चार दिवसांत बघायला मिळणार होते. 

          मानवता , आत्मविश्वास , कुतूहल या तीन गोष्टी नजरेसमोर ठेवून शिक्षण , संस्कार आणि संसार निर्माण करणं अगस्त्याला अतिशय गरजेचं वाटलं. 

          " आ , आहा आणि हाहा " या तीन शब्दांनी आश्चर्य , मनोरंजन आणि आता मला खरे काय ते समजल्याची भावना प्रगट होते. 

          ज्ञानरचना संकल्पना सांगणारा ज्ञानरचनावाद सगळीकडे ओसंडून वाहताना दिसत होता. " जाऊ तिथे शैक्षणिक वैज्ञानिक पाहू" असंच काही तिथलं शैक्षणिक वातावरण दिसत होतं. फुलपाखरांनी बागेत उडावं आणि पकडणाऱ्यांना हे पकडू की ते पकडू असं वाटावं असा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा ' आहा आणि हाहा ' खूप काही सांगून जात होता. प्रत्येक गोष्टीत ज्ञानाची रचना कशी करावी याचे धडे प्रत्येकाच्या डोक्यात धडाधड आपटत होते. 

          दररोज सकाळी 7 वाजता राहत्या खोलीच्या तळमजल्यावर गरमागरम ग्रीन टी येत होता. चालत्या जमिनीवर पानांचे ठसे कोरलेले दिसत होते. प्रत्येक इमारतींची नियोजनपूर्वक बांधणी केलेली दिसून येत होती. या इमारतींना दिलेली नावेही आमचं लक्ष वेधून घेत होती. मल्लिका , नथीनी , रजनीगंधा अशी ती नावे होती. आम्ही नथीनीमध्ये राहत होतो. मल्लिकामध्ये जेवत होतो. प्रत्येक ठिकाणी दगडांचे आकार बनवून त्यातून वैशिष्टयपूर्ण आकार बनवलेले होते. फुलझाडे , शोभेची झाडे , औषधी झाडे सगळीकडे विखुरलेली होती. आम्हांला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. 

          ट्रेनिंग सेंटरवर प्रवेशद्वारापाशी सुंदर दगडी  पार्श्वभूमी असलेला सेल्फी पॉईंट कमालीचा लक्षवेधी होता. तिथेच एक निरुपयोगी रबरी टायरपासून बनवलेला हत्ती शांतपणे आम्हांला पाहात आहे असे वाटत होते. गुरु शिष्य परंपरा सांगणारी उठावाची भित्तिचित्रे सेल्फी घेण्यास आकर्षित करणारी होती. ' जाऊ तिथे एक सेल्फी घेऊ ' असं प्रत्येकाला वाटत असतानाच त्यांच्याकडून सेल्फी घेण्याचा मोह आवरता येत नव्हता. पिण्यासाठी गरमागरम पाण्याचीही सोय अगस्त्याने केली होती. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची त्यांनी घेतलेली काळजी उल्लेखनीय अशीच होती. दररोज दिले जाणारे बदलते जेवणाचे , नाश्त्याचे मेनू चविष्ट असेच. वर्गात कंटाळा न येणारी मार्गदर्शने म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच. 

          प्रशिक्षण कक्षात पहिले पाऊल टाकताच एका मॉडेलवर प्रत्येकाची नजर फुलपाखरांसारखी भिरभिरली. त्यावर लिहिलं होतं , " Butterfly makes the world beautiful , Acharya Initiative makes Teaching beautiful. " याचा अर्थ असा आहे , " फुलपाखरं जसं आपलं जग सुंदर बनवतात , तसंच हे प्रशिक्षण शिक्षकांचं शिकवणं सुंदर बनवते. "

          सर्व शिक्षक प्रशिक्षण घेण्यासाठी आतुर झाले होते. स्वागत समारंभ संपन्न झाला. अगस्त्या टीमने फाऊंडेशनची संक्षिप्त ओळख करुन दिली. व्हिडीओ क्लीपचे सादरीकरण करण्यात आले. तज्ज्ञांनी आपली ओळख करुन दिली. त्यानंतर चार दिवसांत करावयाचे " डूज अँड डोंट्स " समजावून सांगण्यात आले. एका वर्गाचे तीन वर्गात विभाजन करण्यात आले. प्रत्येक वर्गाला वेगळी खोली देण्यात आली. आईस ब्रेकिंग उपक्रम घेऊन यलो , ग्रीन , रेड , ब्लू , व्हायलेट असे पाच ग्रुप बनवण्यात आले. प्रत्येक सदस्याने आपल्याला मिळालेल्या फुग्याला फुगवून त्या रंगाची वैशिष्ट्ये सांगितली. त्यासोबत आपला परिचय दिला. इथूनच ज्ञान रचनावाद सुरु झाला. 

          सुधाकर सर आणि विजयाशांतीमॅडम यांनी आमच्या वर्गाचा ताबा घेतला. इंग्रजीचा जास्तीत जास्त वापर आणि हिंदीचा आवश्यक वापर करत मार्गदर्शन सुरु झाले. पूर्वचाचणी घेण्यात आली. वर्ग कशाप्रकारे घेण्यात येणार ते स्पष्ट करण्यात आले. उद्दिष्टे सांगण्यात आली. त्यानंतर चहासाठी विश्रांती घेण्यात आली. 

          कागदी कपात ओतप्रोत पाणी भरुन त्यांवर येणाऱ्या ताणाचे निरीक्षण करण्यात आले. ड्रॉपरने हळूहळू पाण्याचे थेंब अलगद टाकताना पाण्याचा दंडगोलाकार पृष्ठभाग पाहता आला. त्यानंतर त्यात बॉल बेरिंग टाकण्यात आले. नव्यान्नव बॉल टाकेपर्यंत पाणी सांडले नाही हे विशेष होते. त्यामुळे दिसणे आणि प्रत्यक्ष असणे यांत फरक असतोच याची जाणीव झाली. शाळेतील मुलांकडून असे छोटे छोटे प्रयोग करुन घेतल्यास त्यांच्या मेंदूतील ज्ञानाची रचना अधिक दृढ होण्यास नक्कीच मदत होऊ शकते हे विश्वासही या प्रयोगाने सर्वांना दिला. 

          त्यानंतर भोजनासाठी ' मल्लिका ' येथे नेण्यात आले. सर्वांनी चवदार व गरमागरम भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेतला. अगस्त्याने प्रत्येक शिक्षकाला एक पर्यावरणप्रेमी हँडबॅग भेट दिली. ती घेऊन फिरताना आपण विज्ञान गणित शिक्षक असल्याची अधिक जाणीव झाली. सात भौमितिक आकारांपासून एक एक वेगळी भौमितिक आकृती बनवण्यास शिकलो. आपणही विद्यार्थी बनलो आहोत आणि विद्यार्थी राहूनच आपल्याला आजन्म अध्ययन , अध्यापन करत राहायला हवे हा दृष्टीकोन निर्माण झाला. 

          सायंकाळी कला दालनात नेण्यात आले. मुलांनी बनवलेली अनेक हस्त कला प्रदर्शन रुपात मांडण्यात आल्या होत्या. त्या सर्वांना नीट बघण्यास वेळ पुरत नव्हता. हे सर्व कला कौशल्य डोळ्यात आणि मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्याचे कार्य सातत्याने सुरुच होते. सुरु झालेला दिवस संपूच नये असे प्रत्येकालाच वाटत होते. 

          रात्रीच्या भोजनानंतर खोलीत गेल्यावर अंथरुणावर पडल्या पडल्या कधी झोप आली ते समजलेही नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )





Friday, November 25, 2022

🛑 होईल समदं ठिक

 🛑 होईल समदं ठिक


          कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण आम्हां सर्व शिक्षकांसाठी महत्त्वाचे होते. नेरुर माड्याची वाडी माध्यमिक विद्यालयातील एक दिवस सर्वच उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला असेल. माझ्यासाठीही हा प्रशिक्षण दिवस अनमोल असाच होता. 

          प्रत्येक तालुक्यातील दहा निवडक शिक्षकांची निवड करण्यात आली होती. तसं पाहिलं तर सगळेच शिक्षक निवडकच असतात. त्यातून निवडून काढणं जिकिरीचे काम असावे. किंवा स्वतःहून प्रशिक्षणाला जाणारे मोजके असावेत. कारण प्रशिक्षण करण्यापेक्षा शाळेत काम करणं काही शिक्षकांसाठी अधिक महत्त्वपूर्ण असतं. अर्थात सर्व शिक्षक हे शाळेत शिकविण्यासाठीच असतात , तरीही शाळेचा एक एक दिवस विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाचा असतो. आपल्या वर्गशिक्षकांची ते आतुरतेने वाट पाहत असतात. 

          प्रत्येक शिक्षकासाठी प्रशिक्षण हे नवनवीन अनुभवांची शिदोरी उघडण्यासारखं असतं. ते उघडून बघितल्याशिवाय आणि त्याचा परिपूर्ण आस्वाद घेतल्याशिवाय त्याची चव कशी समजणार ? जेवणात विविध प्रकारच्या संतुलित आहाराचे सेवन करताना जशी तृप्ती होते , तसा तृप्तीचा ढेकर कालच्या प्रशिक्षणात घेता आला. 

          प्रारंभीच माड्याची वाडी शाळेच्या वाद्यचमूने केलेलं उत्साहवर्धक स्वागत  भारावून टाकणारं होतं. अतिथींचं असं झालेलं स्वागत आमच्यासाठी तसं नवीन नव्हतं. आतापर्यंत आम्ही पदाधिकारी , अधिकारी यांचं स्वागत केलं होतं , आज आमचं असं धुमधडाक्यात झालेलं स्वागत भाव खाऊन गेलं. 

          सिंधुदुर्ग शिक्षण विभाग , माड्याची वाडी शिक्षण संस्था आणि भगीरथ प्रतिष्ठान यांच्या वतीनं घेतलं गेलेलं कौशल्य विकासाचं प्रशिक्षण प्रत्येक शिक्षकाला खूप अनुभुती देऊन गेलं. असं आगळं आणि वेगळं प्रशिक्षण कदाचित प्रत्येक शिक्षकाच्या आयुष्यातील पहिलंवहिलं आणि अविस्मरणीय असावं असं म्हटलं तरी वावगं ठरु नये. 

          औपचारिक स्वागतासाठी जास्त वेळ खर्च न करता प्रत्यक्ष प्रशिक्षणाला आरंभ झाला. माड्याची वाडी विद्यालयाने केलेले शैक्षणिक प्रयोग व व्यावसायिक होण्याचे धडे देणारी संस्कार शाळा पाहून सगळे शिक्षक अचंबित झालेले दिसले. विद्यालयाचे सर्व विद्यार्थी , शिक्षक आणि कर्मचारी आपापलं दिलेले काम मनापासून करत होते. प्रत्येकाचं सादरीकरण आत्मविश्वासयुक्त होतं. त्यात नाटकी भाव अजिबात नव्हता. येथील सर्व शिक्षक मुलांकडून हे सर्व कधी करुन घेतात हा प्रश्न आम्हां प्रत्येकाला पडला. कार्यानुभव विषयांच्या तासिका एकत्र करुन शुक्रवारी आणि शनिवारी जास्तीचा वेळ देऊन हे सर्व उपक्रम राबवले जातात. शाळेचा एक ठराविक वेळ असला तरी अभ्यासक्रम पूर्ण करुनच या उपक्रमांची नियोजनपूर्वक अंमलबजावणी केली जाते हे विशेष आहे. 

          या कार्यशाळेत शाळेने केलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. मधुमक्षिका पालन प्रत्यक्ष दाखवण्यात आले. शाळेतील दोन मुलींनी मधमाश्यांना न घाबरता त्याचे सादरीकरण केले होते. त्यांना प्रशिक्षित करणाऱ्या चेंदवणकरसरांसारखी माणसं या क्षेत्रात कार्यरत असतील तर मुलांचं व्यावसायिक प्रशिक्षण खऱ्या अर्थाने होऊ शकतं. टाकाऊ पासून टिकाऊ हे ब्रीदवाक्य मानून केलेलं वेल्डिंगचं कामही तसंच. आय बी टी च्या माध्यमातून मुलांना प्रशिक्षित करताना शाळेतील अभ्यासात हुशार नसणाऱ्या पण व्यावसायिकतेकडे वळू शकणाऱ्या ऐशी टक्के पटसंख्येचा केलेला विचार अतिशय योग्य वाटतो. नोकरीसाठी शिक्षण घेण्यापेक्षा स्वतः व्यावसायिक होऊन दुसऱ्यांना नोकरी देणारं शिक्षण इथं दिलं जातं. 

          इथल्या स्वच्छता गृहातही भिंतींवर गणिताची महत्त्वाची सूत्रे प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारी अशीच. खाद्यपदार्थ विभागातील प्रत्येक पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवलेले. स्थानिक जत्रेतील त्यांचे स्टॉल्स शाळेचं आर्थिक उत्पन्न आणि विद्यार्थ्यांचं अर्थार्जनाचं ज्ञान वाढवणारे आहेत. एकदा का या मुलांचा व्यवसायातील आत्मविश्वास वाढला की ही मुले आयुष्यात कधीही कमी पडू शकणार नाहीत हा आत्मविश्वास देणारे शिक्षक या शाळेला लाभले आहेत हे नाकारुन चालणार नाही. गुरुने दिलेला ज्ञानरुपी वसा ही मुले पुढे पुढे नक्की चालवतील याचीही खात्री झाल्याशिवाय राहत नाही. 

          मुलांनी केलेली हस्तकला , आधुनिक शेतीतील केलेले विविध नवनवीन प्रयोग पाहून हे बघू की ते बघू असे होऊन गेले. हे सगळं एका दिवसांत पाहत असताना त्याचं ऑटोमॅटिक ट्रेनिंग आमच्या मेंदूत नोंद होत गेलं. 

          डॉ. प्रसाद देवधर यांनी केलेले भगीरथ प्रयत्न येथे अधोरेखित करणारे आहेत. प्रत्येक उपलब्ध वस्तूचा केलेला जाणीवपूर्वक वापर हे त्यांच्या यशाचं गमक आहे. आपणही असा विचार केला तर आपल्याला जमू शकतं हा विश्वास या प्रशिक्षणानं प्रत्येकाला दिला. 

          प्रत्येक शिक्षकाला यात बोलतं करताना त्यांच्याकडून अपेक्षित काढून घेण्याची कला डॉ. देवधर यांनाच जमू शकते. त्यांनी खूप कमी वेळेत ते दाखवून दिले आहे. ठरवलं तर शिक्षकच ही गोष्ट करु शकतात यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. या विश्वासाकडे त्यांनी जास्त लक्ष दिलेलं होतं. काही शिक्षकांनी आपल्या सादरीकरणात केलेलं विश्लेषण नवनवीन अनुभवांची भर घालणारं होतं. कमी निधीचा कसा छान वापर करता येतो हेही त्यांनी सांगत असताना त्यांचे प्रत्यक्ष अनुभव खूप शिकवून जाणारे होते. 

          यावर खूप लिहिण्यासारखे असले तरी हे प्रशिक्षण एका छोट्या लेखात बंदिस्त होणारे नक्कीच नाही. माननीय शिक्षणाधिकारी धोत्रे साहेबांनी दिलेली प्रेरणा प्रत्येक शिक्षकाला अनमोल असणार आहे. ' एक कौशल्यपूर्ण दिवस ' असंही  शीर्षक या दिवसाला शोभू शकतं. प्रशिक्षणात भेटलेले सर्वच घटक एकमेकांमध्ये तरतरी पेरण्याचं काम करुन गेले हे या प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. 

          मी घरी आलो , तेव्हा टीव्हीवर एक मालिका सुरु होती. त्यात एका बाळाचा जन्म झाला होता. बाळ हलत नव्हतं. श्वास घेत नव्हतं. त्याची आई डोळ्यांत पाणी आणून आपलं बाळ रडण्याची वाट बघत होती. दवाखान्यातील त्या प्रसंगी घरातील सारं कुटुंब बाळाला निश्चेष्ट पाहून पार हबकून गेलं होतं. आणि प्रत्येकानं बाळाच्या पायांना हात लावून म्हणायला सुरुवात केली होती , " होईल समदं ठिक " . बाळ काही सेकंदात पाय हलवू लागलं होतं. तोंड उघडून चिमुकलं तोंड उघडू लागलं होतं. बाळ एक दीर्घ श्वास घेऊन मोठ्यांदा रडू लागलं तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहू लागले होते. 

          आमच्या समोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना असं जागं करण्याचं काम आपलं आहे , ते जागं करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. आपण सर्व शिक्षकांनी आपल्या समोर असलेल्या मुलांसाठी असंच कौशल्यपूर्ण काम करण्याचं कौशल्य अंगी बाळगणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि ही गरज प्रत्येक शिक्षकाला वाटेल तेव्हा प्रत्येक शाळा माड्याची वाडी झाल्याशिवाय राहणार नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल , कणकवली 

( 9881471684 )
















































































💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...