Sunday, July 14, 2019

माझा भाचा - तुषार उर्फ साईश

          आज आमच्या साईशचा वाढदिवस....माझ्या मोठ्या भाच्याचा मला सार्थ अभिमान आहे...तो एक चांगल्या मामाचा चांगला भाचा आहे...खूप आदर आहे मला त्याच्याबद्दल ...एवढं Higher शिक्षण घेऊनही त्याच्यामध्ये मीपणा नाही....तो आमचा आदर करतो...कारण अगदी लहान असतानाचा आमचा सर्वप्रथम भाचा आहे तो..
          आम्हीही शिकत असताना त्याचा जन्म झाला..डी.एड. सुरु होते माझे तेव्हा...शाहिरी प्रशिक्षण , योगप्रवेश परीक्षा, मुलांचे क्लास घेणे, बाबांचे जेवण पोचवणे, दुकानात दाढ्या करणे ( पाय पोचत नसले तरी )...जराही जीवाला उसंत न देता कामे सुरु होती...ताईने एका गोंडस बाळाला जन्म दिला ही आमच्यासाठी तेव्हा अतिशय महत्त्वाची बाब होती...तेव्हा आमच्या घरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता..एक हलकेच आळस देणारं, भोकाड पसरुन रडणारं बाळ, टुकूर टुकूर माझ्याकडे बघणारं बाळ आम्हाला परमानंद देऊन गेलं होतं..त्याला मांडीवर घेतलं कि सगळा दिवसभराचा शीण निघून जात असे...मज्जा ..मज्जा होती..पहिल्यांदा त्याला घेताना भिती वाटत असे...पण नंतर अलगद उचलून घ्यायची सवय झाली...रडणारा बाळ गाणं म्हटल्यावर रडायचा थांबत असे...त्यामुळे मी गाणं म्हणण्याचा सपाटाच लावला...
          बालगीतांपासून समूहगीतांपर्यंत सगळी गाणी माझी गाऊन संपत असत.म्हणायचा थांबलो कि आमचा गोट्या रडू लागे..मग पुन्हा माझ्या आवाजाचा रेडिओ गर्जू लागे...मग काही काळानंतर आमची ताई डोंबिवलीला राहायला गेली..मी त्यावेळी भावोजींची ताईला आलेली पत्रे वाचून भारावून जात असे...त्यांच्या सुंदर हस्ताक्षरातील पत्रे वाचताना ते जवळच असल्याचा क्षणभर भास होई...पण त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला कमालीचा आदर वाटू लागला...त्यांचे हसणे, बोलणे आम्हाला आवडू लागले होते...
          ताईला मी सायकलवरुन स्टँडवर व स्टँडवरुन रेशनदुकानापर्यंत सोडण्याचे काम करत असे...साईशचा जन्म आमच्यासाठी महत्त्वपूर्ण होता...भावोजींचे आणि ताईचे बाळाबरोबरचे प्रेमळ बोलणे मला गुदगुल्या करत असे...एवढे प्रेमळ भाषेतील शब्द आम्ही पहिल्यांदाच ऐकले होते...मला आमच्या घरातले बाळू म्हणायचे..हे नाव मला आवडत नसे...कारण रागाच्या भरात त्याचा उच्चार बाळग्या किंवा बाळगो असा केला जाई आणि मला ते नाव म्हणूनच अजिबात आवडत नसे...त्यानंतर साईश मोठा होत असताना त्याचं बालपण बघता आले तेव्हा तेव्हा आम्हाला ते पाहताना आनंदाच्या उकळ्या फुटत असत...असा माझा लाडका भाचा तुषार कधी हुशार झाला ते समजलेदेखील नाही...
          एकदा तो पाटगांवात आला होता...तेव्हा तो ५ वी , ६ वीत असेल कदाचित ...मी त्याला सहज विचारले कि तू मोठेपणी कोण होणार आहेस...त्यावेळी त्याने दिलेले उत्तर आठवले कि अजूनही आम्हाला हसू येते...तो म्हणाला, बघूया आता मला माझे पप्पा - मम्मी काय बनवतात ते...ते उत्तर आज खरेच वाटते...
          आई वडिलांनी त्याला जसा घडवला आहे..तसाच तो बनला आहे...तो एक अत्यंत हुशार मुलगा आणि समंजस भाचा असून तो ज्या क्षेत्रात जाईल त्याचे सोने केल्याशिवाय राहणार नाही असे त्याला माझे उदंड आशीर्वाद आहेत...त्याचे भवितव्य उज्ज्वल असेल यांत मला किंवा कोणालाही तिळमात्रही शंका असायला नको.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली.


माझी मुलगी - तनिष्का

          माझी २ नंबर मुलगी तनिष्का ....आज तिचा वाढदिवस...ती २ वर्षांची होती...तेव्हाची गोष्ट ..मी नुकतेच नवीन सलून सुरु केले होते. तो दिवस पहिला रविवारचा होता.आमचे अचानक ठरले राधानगरीला जायचे. उन्हाळ्याचे दिवस होते. दुकानाचे सोमवारी उद्घाटन केले होते मागच्या. हा त्यानंतरचा १ ला रविवार असूनही मी बाबांना आणि संतोषला दुकानात ठेवून मी , माझी पत्नी ईश्वरी व छोटी मुलगी तनिष्का उर्फ गुड्डीला आमच्या TVS Sport टू व्हिलरने घेऊन निघालो होतो. 
          १० वाजता सकाळी सुटलो. ११ वा. फोंडाघाटात होतो. पोहोचायला फक्त अर्धा तास बाकी होतो. उन्ह मी म्हणत होतं. माझ्या गाडीचा वेग थोडा वाढला होता. गाडी एजिवड्याच्या पुढे आली होती. अचानक काय झाले समजलेच नाही. पत्नीच्या हातात आमची गुड्डी गाढ झोपी गेली होती. पत्नीसुद्धा उन्हाचा कडाका सहन करु शकत नव्हती. काय झाले हे समजायला वेळच मिळाला नाही. गाडीचे मागचे चाक ट्यूब फुटल्याने लडबडले. गाडीच्या मागच्या चाकातील संपूर्ण हवा निघून जाऊन टायरदेखील फुटला होता. 
          माझी बेसावध पत्नी अचानक घडलेल्या पंक्चरमुळे स्वतःला आणि गुड्डीला आवरु शकली नाही. ती १०-१२ फुटांवर दूरवर फेकली गेली. मला तीव्र धक्का बसला ..पण मी पुढे जाऊन गाडी कंट्रोल केली. गुड्डी पत्नुच्या हातून निसटून आपटली होती. तिच्या डोक्याला थोडा मार बसल्याने रक्त येऊ लागले. तिची मम्मी जवळच जमिनीवर निश्चेष्ट पडून कण्हत होती..मुलगी पडली तरी ती उठून तिला उचलून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिला मी कसेतरी उठवले व पाणी पाजले. तिला मुका मार लागला होता. हातापायांना खरचटले होते. 
          माझ्या मुलीच्या डोक्याचे रक्त माझ्या हातावर सांडले होते. गुड्डीने ते रक्त बघितले. तिला वाटले ते माझेच रक्त आहे.ती रडू लागली. तिला मी समजावून सांगितले कि ते माझे नसून तुझे रक्त आहे. तेव्हा ती चिमुकली मला जे बोलली ते आठवले कि आजही माझ्या पायाखालची जमीन सरकते....
          ती म्हणाली होती, " पप्पा , मला लागले तरी चालेल...तुम्हाला लागले नाही ना ? ...." मी गारच झालो आणि माझ्याच डोळ्यातून पाणी वाहू लागले ...मला रडू आवरेना....मोठ्या संकटातून आम्ही वाचलो होतो...
          समोरचा मैलाचा दगड एक फुटावरुन माझ्याकडे बघून भेसूरपणे हसताना मला दिसला...जर आमच्यापैकी कुणीही त्याच्यावर आपटलो असतो तर .........ती कल्पनाच सहन होत नाही.....ती माझी मुलगी आता ७ वीत आहे....तिला कधीही दुखावणार नाही आसा मी त्याचक्षणी निश्चय केला होता....आणि मी तो पाळणारच....माझी गुड्डी म्हातारी- शितारी होऊ दे ...अशी माझ्या तिला अनंत शुभेच्छा .
          Happy Birthday Guddi.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 ) कणकवली.


माझी पत्नी - ईश्वरी

          मी आणि माझी पत्नी ईश्वरी 

          २००८ पासून आज 14 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला, नवीन संसार थाटला...कारण माझी प्रथम पत्नी कै.सौ.ऐश्वर्या हिच्या अकाली दुःखद निधनामुळे माझी मुलगी फक्त ४ वर्षांची असल्याने तिला कमालीचा मातृशोक झाला होता. म्हणून मला दुसरे लग्न करावे लागले. अर्थात मलाही सहचारिणी गेल्याचे अतोनात दुःख झाले होते. ही उणीव भरुन काढणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. शिक्षिका पत्नीच्या जाण्याने तिच्यासोबतच्या २००० ते २००७ पर्यंतच्या आठवणी उचंबळून येत होत्या. शाळा, मुलीची देखभाल, पत्नीचा वियोग यांचे व्यवस्थापन करणे मला जिकिरीचे झाले. मी विमनस्क झालो होतो..तिच्याशिवाय जीवन जगणे मला असह्य झाले होते. शाळेतून आल्यानंतर मी मला एका बंद खोलीत स्वतःला कोंडून घेत असे. आणि मार्च २००८ मध्ये माझ्या आयुष्यात दुसऱ्या पत्नीने ( राणी नारायण टिपुगडे - राधानगरी ) हिने प्रवेश केला. समायोजन होईपर्यंत एक वर्षाचा काळ लोटला. तिने माझ्या मुलीला हर्षदा ( छकुली ) हिला चांगलेच आपलेसे केले. तिने केलेले हे सहकार्य माझ्यासाठी अत्यंत मोलाचे असेच आहे. आज माझ्या पत्नीला ३२ वर्षे पूर्ण होत आहेत...३३ व्या वर्षात पदार्पण करत असताना तिने गेल्या ११ वर्षात मला जे समजून घेतलेले आहे ती गोष्ट मला महत्त्वाची वाटते....पूर्वपत्नीला विसरु न देता ईश्वरीने मला जी साथ दिली आहे ती अखंड आहे...तिला तिचे पुढील आयुष्य वैभवशाली जाण्यासाठी मी अधिक जोमाने , प्रेमाने व जबाबदारीने वागण्यासाठी ईश्वर मला शक्ती देवो आणि आपणा सर्वांच्या सदिच्छा पाठिशी राहोत म्हणजे झाले.


Tuesday, July 2, 2019

माझी आई

          माझी आई म्हणजे एक सुंदर स्वप्न .....आज २ जुलै २०१९ ...१० वर्षांपूर्वी आज माझी आई मला सोडून देवाघरी गेली. तिची आठवण येते आणि खूप उणीव भासते. आम्ही ५ भावंडे ...ताई, आका, मी बाळू , न्हानू  आणि पपी ....सर्वजण आज अगदी मजेत आणि तिच्या छत्रछायेखाली सुखासमाधानात आयुष्य उपभोगताना ती सर्वत्र असायला हवी होती. ती खूप सहनशील होती. आम्ही लहान असताना आम्हाला ती कधी मनाला लागेल असे बोलली नाही. तिचा सहवास आम्हाला नेहमीच हवाहवासा वाटणारा.... कधी तिच्या कुशीत जायला  मिळते यासाठी आम्हा भावंडांमध्ये चढाओढ लागत असे. ती बिचारी सर्वांना आनंद देण्याचा नेहमीच प्रयत्न करताना नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवत असे. तिने आपले दुःख कधीच आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला नाही. आपले दुःख आपल्याकडेच ठेवून नेहमी आनंदात जगण्याचा अनमोल मंत्र आईने आम्हा सर्व भावंडांना दिला.
             दिसायला अगदी साधी...पण खूप प्रेमळ स्वभावाची आमची आई सर्वांशी खूप कमी बोलत असे. खूप चर्चा करत वेळ घालवण्याचा तिचा स्वभाव नव्हता. ती नेहमी आपल्या कामात दंग असे. जगाशी प्रेमाने वागावे असे तिनेच आम्हाला शिकवले. ती न बोलता आम्हाला खूप काही शिकवून जात असे. अजूनही आठवण येते आणि सर्रकन अंगावर काटा उभा राहतो. आता ती असती तर तिला किती आनंद झाला असता. नातवंडांबरोबर गमतीजमती करता आल्या असत्या. दररोज झोपताना तिची नामजप केल्याशिवाय मी कधीच झोपत नाही. तिला आठवत झोपी जावे...जगातील सर्व समस्या आपोआप कमी होऊन शांत झोप लागते असा माझा नेहमीच अनुभव आहे.
              कामात माझी आई पटाईत होती. जेवण बनवणे, उसळ, चपाती, भाकरी, पुरणपोळ्या , टोमॅटोची आमटी ( आम्ही पूर्वी सार  म्हणत असू ) , फोडणीचा भात , पिठी, वडे सागोती, भजी  असे पदार्थ बनवून ती आम्हाला जेवू घाली. जे घरात असे त्यात ती माऊली आम्हाला कधीच कमी पडू देत नसे. पण आम्हाला जेवायची घाई झालेली असे, ती बनवत असतानाच आम्ही दोघे भाऊ त्यावर फडशा पडत असू. ती शांतपणे त्यात आनंद मानायची. कारण कधी आम्ही एवढे जेवत असू कि आम्ही तिच्या वाटणीचे जेवणही फस्त करीत असू. मग ती म्हणे कि ' तुम्ही जेवलास कि माझा पॉट भरला '. आता आमच्याकडे भरपूर अन्न आहे,  खायला खूप आहे, पण पूर्वीची मजा येत नाही. आई नसल्यामुळे तिची उणीव जगातील दुसरी कोणतीही व्यक्ती भरून काढू शकत नाही हे सत्य आहे.    

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...