Tuesday, May 4, 2021

सगळ्याच बॅटी

 🟣 सगळ्याच बॅटी


          त्यावेळी आमच्याकडे मातीची चूल होती. भुसा भरून पेटवण्याची शेगडी होती. चूल असल्यामुळे लाकडे आणि शेगडी असल्यामुळे लाकडाचा भुसा आणावा लागत असे. भाड्याच्या खोलीत राहत होतो. लाकडाच्या गिरणीवरून लाकडे आणि भुसा आणावा लागे. सुट्टीच्या दिवशी आम्ही भावंडे आईला मदत करत असू. खोलीपासून दोन तीन किलोमीटरवर लाकडाची गिरणी होती. आई गिरणीवर जाताना आम्हा सर्व भावंडांना घेऊन जात असे. आमची तिला तेवढीच मदत होई. आम्ही सुकी लाकडे काढून देत असू. आई भुसा काढून पोत्यात भरत असे. मग ते भरलेले भलेमोठे पोते डोक्यावरून घरी आणत असे. आईची तब्येत बरी नसली तरी ती अशी ताकदीची कामे करत असे. तिला दम्याचा त्रास सुरू झाला होता. डॉक्टर मराठे यांच्याशिवाय ती कोणत्याही डॉक्टरांकडे जात नसे. आईचा त्रास दिसू लागला होता. त्यामुळे माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींनी लाकडे आणि भुसा आणण्याची जबाबदारी स्वीकारली होती. तसे ते सोपे काम नव्हते , पण महत्वाकांक्षा दांडगी होती. मग आम्ही पाचही भावंडे आपापल्या परीने कामे करण्याचा प्रयत्न करत होतो. माझा छोटा भाऊ आमच्या सोबत कायम असायचा. तो लाकडाच्या गिरणीवर लाकडाची बॅट शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करी. सगळ्या लाकडांमध्ये त्याला बॅटच दिसे. लाकडे घरी आणल्यानंतर कोयता घेऊन त्याची बॅट करून तो खेळायला सुरुवात करी. कधी बॅट , कधी स्टंप असे बनवून झाले की ती लाकडे तो जीवापाड जपून ठेवत असे. घरातील लाकडे जाळून संपली की आई त्याच्या ह्या बनवलेल्या बॅटी जाळायला घेई. शाळेतून घरी आल्यानंतर चहा घेऊन झाला की भावाचा मोर्चा बॉल, बॅट आणि स्टंप यांच्याकडे वळे. आपल्या बॅट्स दिसल्या नाहीत तर तो रडून गोंधळ घालत असे. मग माझी मोठी ताई , आका त्याला समजावून सांगत. मी समजावण्याच्या भानगडीत पडत नसे. कारण त्यामुळे आमच्यात मारामारी होण्याचीच शक्यता अधिक असे. तो माझ्या पोटावर बसेल या भीतीनेच मी त्याच्याशी नाहक वाद घालत नसे. 

          कुठे जत्रा असली की आम्ही जायचो. बाबा आम्हाला पैसे देत. आम्ही त्याचे खाऊ घेत असू. पण माझा भाऊ मात्र खाऊ न घेता प्रत्येकवेळी बॉल विकत घेत असे. दुकानदार जेवढे सांगतील ते पैसे अजिबात आढेवेढे न घेता लगेच देऊन बॉल पदरात पाडून घेत असे. आम्ही दोघेजण क्रिकेट खेळत असू. तो मला लगेचच आऊट करत असे. मला मात्र तो अजिबात आऊट होत नसे. तो इतक्या लांबून बॉलिंग करी की तो बॉल माझ्यावर बसेल या भीतीने मीच स्टंपवर बॉल सोडून देत आऊट होत असे. आमच्यात सतत या ना त्या कारणावरून वाद होत. पण त्या लाकडाच्या बॅटी आमच्यातले वाद विसरायला मदत करत. घरी आलो की वाद विसरून पुन्हा खेळायला निघून जात असू. आता आम्ही मोठे झालो. आणि दोघेही शिक्षक झालो. मी जिल्हा परिषद आणि तो माध्यमिक. माझा भाऊ मितभाषी असला तरी प्रेमळ आहे. मी त्याला लहानपणी मारले असेल , आताही त्याला बोलतो. तो ऐकून घेतो, पण उलट उत्तर कधीच करत नाही. आज आम्ही दोघेही वेगवेगळे राहत असलो तरी मनाने कायमच एकत्र असणार आहोत. क्रिकेट खेळणार नसलो तरी आयुष्याची बॉलिंग नक्कीच चांगली करणार आहोत. कधीतरी आऊट होण्याची भीती असली तरी संयमाने सामोरे जाणार आहोत. संकटांचा कितीही गुगली चेंडू पडला तरी लाकडाच्या साध्या फळीने ( संयमाने ) ते संकट टोलवणार आहोत. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

होणारा होतला

 🟦 होणारा होतला


          माणसाचं कधी काय घडेल समजणार नाही. आता चांगला असलेला माणूस थोड्या वेळानंतर चांगला असेल याची खात्री देत येत नाही. माणसाचं जीवन असं कसं बनलं आहे ? देव जाणे !!! देवाची आराधना केली तरीही देवाच्या मनात असेल तर तसेच घडेल , नाही का ? म्हणूनच की काय माणूस हे जग कायमचे सोडून गेला की ' तो देवाघरी गेला ' किंवा ' त्याला देवाज्ञा झाली ' असे म्हटले जाते. कोरोनामुळे तर मानवाचं जीवन अगदीच क्षणभंगुर झालेलं आहे. ' आज हाय , तर उद्या न्हाय ' असं झालंय. रोजच्या बातम्या वाचून , ऐकून आणि पाहून तर अगदी सुन्न व्हायला होतं. 

          ' जे जे लिहिले भाळी , ते चुके न कदा काळी ' असे म्हटले जाते. आपल्या भाळावर लिहून ठेवलेले आहे , असे प्रत्येकाच्या भाळावर त्याचे आयुष्य लिहायला त्या विधात्याला ( निर्मात्याला ) किती त्रास झाला असेल माहीत नाही. आजचा दिवस निघून गेला की आपण  " सुटलो बुवा एकदाचे " असा सुटकेचा श्वास टाकायचा. फक्त त्यावेळी आपला श्वास मात्र पुरेसा असायला तरी हवा. 

          आजचा दिवस म्हणजेच चार मे , हा दिवस माझ्यासाठी खूपच दुःखदायक असाच आहे. माझ्या पूर्वपत्नीचा आज स्मृतिदिन. गेलेल्या माणसाची जास्त आठवण काढत बसू नये , असे मला बहुतेकांनी सांगितल्याचे आठवते. त्यांचे फोटो बघत बसू नये , मोबाईलमध्ये त्यांचा फोटो बघत राहू नये , असे अनेकांनी मार्गदर्शन केलेलं माझ्या चांगलेच लक्षात आहे. पण मी त्याकडे लक्ष देत नाही. कारण मी माझे आयुष्य अधिक चांगले व्हावे यासाठी या गोष्टींचा उपयोग करत आहे. प्रत्येकाच्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात. ते येऊ नयेत यासाठीही अनेकजण प्रयत्न करत असतात. पण जे घडू नये असे नेहमी वाटत राहते ना , तेच घडू लागते आणि आपला आत्मविश्वास डळमळीत होऊ लागतो. एकदा आपला आत्मविश्वास कमी व्हायला लागला, की अर्थातच आपला न्यूनगंड वाढू लागतो. 

          ती गेल्यानंतर मला समजले की , या जीवनात काहीच अर्थ नाही. सगळं निरर्थक आहे. क्षणभंगुर आहे. आपलाही कधीतरी शेवट ठरलेला आहे. तो दिवस फक्त आपल्याला माहीत नाही. तो दिवस माहीत नाही हे एक बरे आहे. तो दिवस माहीत असता तर .... त्या दिवसाच्या आधीच आपण संपून गेलो असतो. 

          एखादी प्रिय व्यक्ती आपल्यातून गेली की जे दुःख होतं , त्याची तीव्रता त्याच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तींनाच जास्त प्रकर्षाने जाणवते. गेलेली व्यक्ती फक्त शरीराने जात असते. आठवणींच्या रूपाने ती सतत आपल्यासोबतच असते. त्या व्यक्तीबरोबर व्यतीत केलेले क्षण जसेच्या तसे आठवतात. त्यावेळी या आशयाच्या ओळीं मुखात येतात , ' भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले , एवढे मी भोगिले की मज हसावे लागले .... लोक भेटायास आले काढत्या पायासवे ..... अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले......

          गेलेली माझी पत्नी आठवणींच्या रूपाने माझ्या सतत सोबत आहे अशा माझ्या भावना आहेत. व्यक्तिपरत्वे त्या बदलूही शकतील. पण तिचे माझ्या आयुष्यातील स्थान कधीही कमी होऊ शकत नाही. आज ती जाऊन 14 वर्षे झाली आहेत. तिचा मला सात वर्षांचा सहवास लाभला. दुसऱ्या पत्नीने मला दिलेली तेरा वर्षांची साथ अतिशय मोलाची अशी आहे. गेलेली ऐश्वर्या होती आणि आता आलेली ईश्वरी आहे. आज मी ऐश्वर्यासह ईश्वरी जीवन जगत आहे ही माझ्यासाठी आणि माझ्या समस्त कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. 


©️ *प्रवीण अशितोष कुबलसर , 9881471684*

Monday, May 3, 2021

झाकराचा आंबा

 🟩 झाकराचा आंबा


          आम्ही आंब्याच्या काळात गावी गेलो की एक आंब्याचे झाड आमचा मित्र झालेलं होतं. ते आंब्याचं झाड आमच्या घरापासून 100 मीटर अंतरावर होतं. त्या आंब्याच्या झाडासोबत आमची सदैव मैत्री असे. त्या आंब्याच्या झाडाला आम्ही एक नाव दिले होते. झाडाला आम्ही ' झाकराचा आंबा ' असे म्हणत असू. झाकराच्या आंब्याची सावली दाट पडायची. झाडाखाली एकावेळी 20 - 25 माणसे असली तरी त्यांना सावली मिळत असे. एवढे मोठे आंब्याचे झाड ' सर्वांना झाकण्याची क्षमता ' असल्यामुळे कदाचित त्याला झाकराचा आंबा असे नाव पडले असावे. 

          आम्ही घरी गेलो रे गेलो की पहिल्यांदा झाकराला भेटायला जात असू. झाडाखाली जाऊन आंबे गोळा करायचे आणि ते पोट भरेपर्यंत खायचे. काय उत्तम चव होती म्हणून सांगू ? आंब्याचे झाड मोठे असले तरी त्याचे आंबे मात्र बिटकी एवढे छोटे होते. आंबा कापण्याची कधीच आवश्यकता नव्हती. फक्त मागची बाजू पिळून त्यातला चीक काढून टाकायचा आणि मनसोक्त चोखून आंबा संपवायचा. चव इतकी गोड की एखाद्या नवख्याने आंबा मागितला तर तो पुन्हा पुन्हा आंबा मागेल असा होता तो झाकराचा आंबा. आयुष्यात कित्येक प्रकारचे आंबे खाल्ले असतील , पण झाकराच्या त्या आंब्याची सर दुसऱ्या कुठल्या आंब्याला आलेली नाही. आज आता तो आंबा आम्हाला खावासा वाटला तरी खाता येणार नाही. कारण आमचा तो परमप्रिय झाकराचा आंबा वादळवाऱ्यामुळे अस्तंगत झाला आहे. त्यामुळे जमीनमालकांकडून तो नाईलाजास्तव तोडण्यात आला असे ऐकायला मिळाले. 

          त्या आंब्याशी आम्ही अक्षरशः बोलत असू. त्याच्याशी हितगुज करत असू. तोही मग आपल्या फांद्या हलवून वाऱ्याची शीळ घालत आम्हाला दाद देत असे. आम्ही त्यावेळी एका काठीला खिळा लावून ठेवला होता. जर झाकराने आंबा पाडला नाही तर , मी किंवा माझा भाऊ त्या खिळा असलेल्या काठीने झाडाच्या मुळाला खिळ्याने टोचत असू. असे आम्ही सतत करत नसू. कारण प्रत्येकवेळी आम्हाला झाडाखाली आंब्यांचा सडा पडलेला दिसे. एखाद्या दिवशी वाराच नसला तर आंबे पडत नसत. पण आम्ही आमची काठी उगारली किंवा काठीचा खिळा टोचला की एकतरी आंबा पडेच पडे. असे बरेचदा घडल्यामुळे आमच्या बालमनाला वाटले की झाडाला शिक्षा केली की झाड आपणांस आंबे देते. झाडाला अशी शिक्षा करणे हे चुकीचे आहे , हे आम्हाला मोठ्यांनी समजून सांगितल्यानंतर आम्ही तो प्रकार बंद केला. 

          आज आम्ही आमच्या घरी गेलो की त्या झाडाची ती मोकळी जागा खायला येते. बालपणातील या निसर्गप्रेमी आठवणी जाग्या होतात. आज तो आंबा नाही पण त्याच्यासोबत आम्ही घालवलेले ते अविस्मरणीय दिवस नक्कीच जिवंत आहेत असे म्हणायला हरकत नाही. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( 9881471684 )



खळ्यातले लाडू

 🟪 खळ्यातले लाडू


          शाळेच्या परीक्षा संपल्या की आम्ही गावाकडे जात असू. निकाल लागण्याच्या अगोदरच आम्ही आमच्या गावचा रस्ता धरलेला असायचा. शहरात गरमही व्हायचे. गावाकडे कसं थंडगार वाटायचं. गावातील घर नदीपासून अगदीच जवळ आहे. घर आणि नदी यांच्यामध्ये हिरवीगार शेती असल्यामुळे त्या निसर्गरम्य वातावरणात नयन मनोहर वाटत असे. सगळे शेतकरी शेतात काम करण्यात दंग असलेले आताही पाहायला मिळतात. दुपारी जेवल्यानंतरही कामे थांबत नसत.

          दुपारनंतर खळ्यातली कामे सुरू होत. शेतात भात झोडण्यासाठी खळी बनवली जात. आमच्या घराच्या शेजारीच अशी अनेक खळी होती. प्रत्येकजण आपापल्या खळ्यात नाचण्याची कणसे झोडत असत. आमची आजी आम्हाला प्रत्येक खळ्यावर जायला सांगत असते. आम्ही लहान असल्यामुळे आम्ही नाचण्याची कणसे झोडण्यासाठी उपयोगी नसलो तरी त्यांना पाणी देणे, चहा नेऊन देणे या कामांसाठी उपयोगी पडत असू. माझे तिन्ही काका कणसे झोडण्यात पटाईत. माझे बाबासुद्धा शेतात कामे करत. पण ते कायम सलून कामात दंग असल्याने ते शक्यतो शेतीकामात नसत. 

          कणसे झोडून झाली की सर्वांना लाडू मिळत असत. घरगुती बनवलेले शेंगदाण्याचे लाडू , मुगाचे लाडू , चवळीचे लाडू मस्त मोठे चवदार असत. एक लाडू खाल्ला तर रात्री जेवलो नाही तरी चालत असे. आम्ही पाणी , चहा देत असताना आम्हालाही खळ्यातले लाडू मिळून जात. आम्ही शहराकडून कधीतरी येत असल्यामुळे आमच्यावर अधिक माया असे. प्रेमाने एखादा लाडू अधिकचा आम्हाला मिळून जाई. असे हे प्रेमळ आणि गोड लाडू मिळावेत या एकमेव उद्देशाने आमची आजी आम्हा सर्व भावंडांना खळ्यात पाठवी. 

          आजीचा आदेश शिरसावंद्य मानून आम्ही खळ्यात हजर होऊ. मी आणि माझा भाऊ दोघेही लाडवांचा फडशा पाडत असू. उरलेले लाडू घरी घेऊन येत असू. घरी आल्यानंतर आजी आमच्याकडून सगळे लाडू काढून घेई. ती त्यातला एकही लाडू कधी खाताना आम्ही बघितलेला नाही. ती बिचारी आमच्या इतर भावंडांना त्याचे बारीक बारीक तुकडे करून अगदी समसमान सर्वांना कशी वाटणी येईल याची काळजी घेत असे. तिचे नेहमी असे म्हणणे असे की , ' घरात येणारा पदार्थ सर्वांच्या मुखाला लागला पाहिजे. ' आमच्या मुखाला पदार्थ लागला की तिचे पोट भरून जाई. 

          शेंगदाण्याचे भलेमोठे गुळयुक्त लाडू खाताना त्यांची चव आणखी वाढत जाई. एक लाडू खाऊन झाला की आणखी एखादा खावासा वाटे. मग आजीला बाबापुता करून तिच्याकडून आणखी एखादा लाडवाचा तुकडा कसा मिळेल यासाठी आमची स्पर्धा चाले. 

          आता बाजारात विविध प्रकारचे लाडू विकत मिळतात. ते आम्ही विकत आणतो. खातो. पण ते ' खळ्यातले लाडू ' त्यांची चव आमच्या जिभेवर जी ठाण मांडून बसली आहे ती चव आताच्या कोणत्याही लाडवांना येणार नाही हे तितकंच खरं आहे. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर

Sunday, May 2, 2021

कोंबा आरवला

 🔴 कोंबा आरवला


          मे महिन्याची सुट्टी पडली की आम्ही सर्व भावंडे आमच्या मुळघरी किर्लोस येथे जात असू. सुट्टी पडली की सगळेच जण आपल्या मूळगावी जायला उत्सुक असतात. वर्षभर शहरात राहून त्या जीवनाचा कंटाळा आलेला असतो. गावातल्या लोकांना मात्र शहराचं अप्रूप असतं. गावाकडच्यांना म्हणावा तसा शहराचा लाभ घडत नाही. शहरातले मात्र दरवर्षी गावाकडे जातातच. आले की सगळे पाहुणे , नातेवाईक यांच्याकडे फिरून येतात. इथली गावाकडची माणसं कामात मग्न , त्यांना कुठे फिरायला उसंत. याचा अर्थ असा नव्हे की शहराकडल्यांना कामच नसतं. त्यांना त्यांच्या कामाचा कंटाळा आलेला असतो, म्हणून ती विश्रांतीसाठी गावाला हवा खायला आलेली असतात. गावाकडची हवाच भारी. ती सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी. या हवेचा कधीच कंटाळा येत नाही. स्वच्छ , शुद्ध हवा आणि निसर्गसौदर्य यांनी भारलेलं जीवन अनुभवण्यासाठी सगळी शहरातील मंडळी अतिआतुर झालेली असतात. 

          सकाळीच उठताना कानावर पडणारे नैसर्गिक आवाज उत्साह वाढवतात. लहानपणी एक गाणे ऐकले होते. ते आम्ही होळीच्या सणात गोमुच्या वेळीही म्हणत असू. ' कोंबा आरवला , चाराच्या ठोक्याला , बायको उठविते आपुल्या नवऱ्याला , अहो उठा उठा ... गिरणीचा भोंगा झाला ' हे गाणे तुम्हालाही माहीत असेल कदाचित. ते शहरातील गिरणी कामगारांच्या बायकांसाठी असेलही. पण आता शंका येते , गिरणी शहरात होत्या , मग तिकडे शहरात कोंबडे होते का ? होते तर ते गावाकडे आरवतात तसे आरवत असतील का ? पूर्वीचे कोंबडे असतीलही तसे. किंवा गिरणी कामगारांकडे घड्याळे नसतील तर त्यांना समजणार कसे ? म्हणून त्यांच्या बायकांनी ( की बायकोनी ) कोंबडा आपल्या सोबत नेला असेल तर ? असो. पण त्यावेळचे कोंबडेच भारी होते , ते वेळीच ओरडत. पण आताच्या कोंबड्यांमध्ये तितकासा आरव राहिलेला नाही. 

          आमच्या घरी भरपूर कोंबडी पाळलेली होती. आमच्या आजीचा त्यांच्यावर खूप जीव. तपकिरी कोंबडे , काळे कोंबडे , खुडकाची कोंबडी, काली कोंबडी, मानकापी कोंबडी , लांब शेपटीचे तुरेवाले कोंबडे असे अनेक प्रकार खुराड्यात पाहायला मिळत. तरुण कोंबडीला तलाग असे म्हणत. तिच्या मागे कोंबडे फिरू लागले की काही दिवसातच ती अंडी देणार हे आम्हाला आमच्या आजीनेच सांगितले होते. 

     संध्याकाळ झाली की ही कोंबडेमंडळी आपल्या खुराड्यात दाखल होण्यास येत. त्यांना अलगद पकडून किंवा त्यांच्या मागे धावून त्यांना पकडण्याची मज्जा काही औरच असे. एखाद्या रविवारी त्यापैकी एकाचे प्राण पणाला लागत. गावठी कोंबडी घराभोवती फिरताना परिसर स्वच्छ करून टाकत. घरातही त्यांचा वावर स्वच्छंदी असे. जणू आपल्या घरातले सदस्यच असल्याप्रमाणे स्वयंपाक घरापासून शयनगृहापर्यंत त्यांना परवानगी दिलेली असल्याने त्यांनी आपल्या ' शिटीने ' रांगोळीच काढलेली असे. 

     एखादी कोंबडी घरातच कुठेतरी कोपऱ्यात खुडूक करून बसे. ती निघून गेली की तिथे एक पांढरट गुलाबी रंगाचे अंडे मिळे. आम्ही ते आमच्या आजीकडे नेऊन देऊ आणि छानशी शाबासकी किंवा खाऊ मिळवत असू. दुसऱ्या दिवशी त्या अंड्याची पोळी , भुर्जी किंवा अंडाकडी खायला मिळत असे. 

     आजीच्या मदतीला आमची दांडगी आत्येही असे. तिला कोंबड्यांची भारी हौस. मंगळवारच्या बाजारात ती कोंबड्या विकून मिळालेल्या पैशात बाजार घेऊन येत असे. घरात एखादा धार्मिक कार्यक्रम असला तरीही बिचाऱ्या कोंबड्यांवर संक्रांत येई. देवाने निर्माण केलेल्या कोंबड्यांनाच देवाला देण्यात येई. घराच्या बाहेर असलेल्या उदंड देवतांना स्मरून न दिसणाऱ्या देवाला ' एखादा कोंबडा ' बळी दिला जाई. बळी देताना त्याची मान कापून त्याला तडफडताना पाहून आमचा जीव तडफडत असे. 

     आमच्या गणपतीकडे गौरी आणली जाई. त्यावेळी गौरीला ' कोंबड्याची सागोती ' लागत असे. त्यावेळीही एका कोंबड्याचा हकनाक जीव जाई. एकदा मीच माझ्या बाबांना सांगितले की यावर्षी गौरीला कोंबडीचा नैवेद्य दाखवू नका. बाबांनी नाईलाजाने ते ऐकले. त्याच दिवशी संध्याकाळी ' तो ' कोंबडा गायब झालेला होता. माझी आजी शोधून शोधून दमली. शेवटी तिनेच निष्कर्ष काढला की आज गौरीला कोंबडं दिलं नाही म्हणून तिने आपलं कोंबडं नेलं.    

     पुढील वर्षांपासून दरवर्षी पुनश्च कोंबडी वडे चा नैवेद्य देणे सुरू झाले. तो कोंबडा गणपतीच्या आईने नेला असे आम्हाला सांगण्यात आले. मी रात्रभर विचार करत राहिलो. पण आता मोठा झालो तरी मला या गोष्टीला विरोध करता येत नाही.


©️ प्रवीण कुबलसर



Wednesday, March 31, 2021

सायलेंस सर

 सायलेन्स सर


    गाडी चालवताना सावकाश चालवण्यासाठी खूपदा प्रयत्न केला जातो. पण गाडीवर बसल्यानंतर सोयीस्करपणे ही गोष्ट विसरली जाते. मग ती टू व्हीलर असो , नाहीतर आणखी जास्त व्हीलर. गाडी चालवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. एकदा गाडीवर बसल्यानंतर ती कशी चालवायची हे मागून कोणी सांगत राहिले की रागच येतो. पण सांगणारे आपल्या भल्यासाठीच सांगत असतात ना ? आपल्याला ऐकायला काय हरकत आहे. आपण ऐकत नाही, मनाला वाटेल तशी गाडी पळव पळव पळवतो. पडल्यानंतर लक्षात येते की सांगणाऱ्याचे ऐकले असते तर ही वेळ आलीच नसती. 

    त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत जायला बाहेर पडलो. जाताना छोट्या उर्मीने मला प्रेमाने सांगितले, “ 'पप्पा , सावकाश जावा आणि सावकाश येवा. ” मी तिला जवळ घेऊन तिचा गोड गोड पापा घेतला. किती काळजी घेतात आपली घरातली माणसं ! अगदी लहानांकडूनही आपली अशी काळजी घेतली जाते. आपल्यावर नियंत्रण ठेवण्यात घरातल्यांचा मोठा वाटा असतो. त्यांच्या अश्या सांगण्यामुळे आपणही गंभीर होतो. कुठेही जाता येताना जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न तरी करतो. शाळेतून यायला उशीर झाला तरी घरातली माणसं वाटेकडे डोळे लावून असतात. घरातून बाहेर पडलेला आपला माणूस घरी सुखरूप परत यावा यासाठी त्यांची ही तळमळ असते. त्यांनी फोन केला आणि आपण तो वेळीच उचलला नाही तरी त्यांना अधिकच काळजी वाटते. नियोजित ठिकाणी पोहोचल्यानंतर एखादा फोन करावा एवढीच त्यांची रास्त मागणी असते आणि आपण ती बऱ्याचदा पूर्ण करत नाही ही आपली अक्षम्य चूकच असते. आपण कामात असतो त्यामुळे फोन करायचा राहून जातो. घरच्यांसाठी एक फोन करणे किंवा एक संदेश पाठवणे हे अशक्य तर बिलकुल नाही. माझ्याकडूनही कधी असा फोन करायचा राहून जातो आणि त्यांचाच फोन येतो. 

    आज शाळा सुटल्यानंतर घरी जात होतो. गाडीचे नुकतेच काम करून घेतल्याने स्पीड कमी ठेवण्याबद्दल मला सांगितले गेले आहे. त्यामुळे मुद्दाम 40 चा स्पीड ठेवण्याचा प्रयत्न करतोय. इतका कमी स्पीड ठेवून गाडी चालवताना गाडी चालतच नाही असे वाटत राहते. मग हळू हळू कधी स्पीड वाढतो , समजतसुद्धा नाही. त्यात स्पीडो मीटर बंद असल्यामुळे स्पीडही समजत नाही. असो. आज स्पीड 40 चाच होता. तळेरे पर्यंत अगदी व्यवस्थित आलो. रस्त्याचे काम सुरूच आहे. फ्लाय ओव्हर वरून जाता येईल असे वाटले. वाटले काय, वाटण्याआधी गाडी आपोआप त्यादिशेने वळलीही. मग काय, पुढे पुढे जात राहिलो. दोन तीन डंपर माती टाकण्याचे काम करत होते. वाटेत एका ठिकाणी विचारूनच पुढे गेलो. त्यांनी पुढे जाता येईल असे सांगितले. त्यांचा हिरवा कंदील मिळाला. आता जाणे अवघड नसेल असे वाटून पुढे जात राहिलो. लाल माती रस्त्यावर मस्त अंथरली होती. तिच्या पलीकडे 100 मीटरवर गेलो की झाले. मूळ रस्त्यावर पोहचणे अगदी जवळ आलेले होते. 40 च्या स्पीडने गाडी पुढे दामटली. रस्त्यात पाणी टाकून त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मलाही युद्धपातळीवर घरी जाण्याचे वेध लागले होते. नेहमीप्रमाणे काहीतरी मनात विचारचक्रे सुरूच होती. गाडीचीही चक्रे तशीच सुरू होती. गाडीने अचानक वेग कमी केला होता. गाडीचे मागचे चाक निसटले. चिखलामुळे गाडी स्लिप झाली होती. डाव्या दिशेला गाडी कमालीची कलली. मी ती कंट्रोल करणे शक्य नव्हते. मी कोसळलो होतो. कोसळल्यानंतर भानावर आलो. अरे, मी पडलो कसा काय ? काहीही समजण्याच्या आत कोसळलो होतो. गाडी चिखलात रुतली होती. चप्पलही चिखलाने पुरते बरबटले. टाचा जाड झाल्या होत्या. मी पडल्याचे पाहून एक जेसीबीवाला धावतच माझ्याजवळ आला. माझी आपुलकीने चौकशी केली. पाणी आणून दिले. माझ्या उजव्या पायाला गाडीचा ‘ सायलेन्सर ’ लागला होता. गाडीने 10 किमी अंतर पार केले होते. उन्हाळा असल्यानेही सायलेन्सर बऱ्यापैकी तापलेला होता. माझ्या उजव्या पायाच्या पोटरीचा पुसटसा स्पर्श सायलेन्सरला झाला होता. पायाला चांगलाच चटका बसला. ( चटका तर बसला , त्याला वाईटच म्हणायला हवे होते, पण आता नाईलाजास्तव त्याला चांगला चटका असे विशेषण देणे भाग पडतंय ) पॅंटीच्या कापडाला काहीही झाले नाही. त्याच्या आत माझ्या पायाला बसलेला चटका तेव्हा जाणवला नाही. त्यावर मी माझ्याकडचे प्यायचे पाणी ओतले. जेसीबीवाल्याने दिलेल्या बाटलीभर पाण्याने मी माझ्या गाडीला थोडेसे धुवून घेतले आणि जाड चपलांनी , जड अंतःकरणाने गाडीला किक मारली. गाडी बिचारी तशीच त्याच वेगाने पूर्वीसारखीच न कंटाळता पळू लागली. ती मला म्हणत होती , “ सायलेन्स सर …. सायलेन्स सर …. नाहीतर पुन्हा लागेल सायलेन्सर.


©️ प्रवीण अशितोष कुबल( 9881471684 )   



Monday, February 8, 2021

कानात फुंकर

 कानात फुंकर


          कुबल कुटुंबाचे शिरवंड्यामध्ये देवाच्या होमाचे धार्मिक कार्य संपन्न होणार होते. पूर्वीचे मूळगाव आणि मूळघर असल्यामुळे मुंबईपासून बरीच मंडळी होमासाठी आली होती. त्या होमाला ' पाठंतार ' असे म्हणत असत. पाठांतर किंवा पाठंतार ( मालवणीतील शब्द असू शकतो ) मूळघरात संपन्न होण्यासाठी महिने दोन महिने अगोदर बैठका घेतल्या गेल्या होत्या. जपजाप , गार्‍हाणी, भटजींचे पठण , नारळांची पोती, कडकबुंदी लाडू , फुले , हार , केळीची पाने , गोड जेवण असं बरंच काही असावं. 

          सगळंच काही आठवणं कठीण जातंय. त्यावेळी मी लहान असल्यामुळे काही घटना पुसटश्या आठवताहेत. लहानपणी मी बघितलेला तो सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम होता. लांबलांबून आलेले नातेवाईक व भाऊबंदकी असणारे सर्वजण त्यानंतर कधी एकत्र आले नाहीत. आपला देव आपल्याकडे सतत पाहत राहावा ही ओढ सगळ्यांना जवळ घेऊन आली होती. कदाचित घरच्या देवाला घाबरुनही सगळे एकत्र एका छताखाली आले असावेत. अगदी सगळे हेवेदावे विसरुन. 

          देवासाठी किंवा देवाच्या भयाने का होईना माणसांनी कधीतरी एकत्र आलेच पाहिजे. पण आता लोक इतके मोठे झाले आहेत कि ते देवालाही आपल्यापेक्षा लहान समजू लागले आहेत. देव तर आहेच, पण तो जाणला पाहिजे. पूर्वजांनी नातेवाईकांना एकत्र येण्यासाठी ' गेटटुगेदर फॉर गॉड ' म्हणजेच पाटंतार हा धार्मिक उपक्रम सुरु केला असावा असे मला वाटते. त्यानिमित्ताने आपल्या भावबंदांच्या ओळखीपाळखी होतात. जुने नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते. 

          पूर्वी पाळण्यात बघितलेल्या बंटीचे लग्न होऊन त्यालाही एखादा दुसरा बंटी झाल्याचे पहावयास मिळायचे. इतक्या वर्षांनी बंटीला पाहिले म्हणून बंटीचे त्यावेळचे मोठेथोरले लोक त्याचे बालपण सांगू लागत. मग ते असेही म्हणत, " तुझा मुलगा हा दुसरा बंटी अगदी तू लहान असताना रडायचास तसाच रडतोय बघ." तसं बघितलं तर सगळी लहान मुले एकसारखीच रडतात. त्यात फारशी विविधता असेल असे मला वाटत नाही. त्यांचे ऐकून हसूच येई. 

          जख्खड म्हातारी माणसेही त्या कार्यक्रमात भेटत. मान हलणारी, पोक काढून चालणारी, सतत बडबड करणारी , फुकटचा सल्ला देणारी अशी बरीच वयस्कर माणसं भेटत , तशी लहानांवर जीवापाड प्रेम करणारी, पाठीवरुन मोरपिसासारखा हात फिरवणारी, बोबडं बोलणारी मोठ्या वयाची लहानांसाठी सान होणारी माणसंही भेटत. अशा प्रेमळ माणसांची माया लहानांना समजतही नसेल. पण ज्यांना नातवंडं असतात त्यांना सगळ्या छोट्यांमध्ये आपलीच नातवंडं दिसत असावीत. ज्यांना ती नसतील ते या नातवंडांनाच आपली नातवंड समजत असावीत. 

          जगातील सगळे आजीआजोबा आपल्या नातवंडांसाठी असंच प्रेम करत असतील का ? पण त्यांची ही नातवंडं आजीआजोबांचं हे निर्व्याज प्रेम समजत असतील तर त्यांना महानच म्हणावे लागेल. पण सर्रास तसे घडताना दिसत नाही. त्यावेळी वयाने म्हातारे पण मनाने तरुण असलेले हळवलचे कुबलआजोबासुद्धा आम्हांला जिव्हाळ्याचे वाटत. ते आमची गंमत करत. ते आमचे लाड करत. आमच्याशी बोलायला त्यांना खूप आवडायचे. त्या दिवशी ते सुद्धा आले होते. वयस्कर माणसांपेक्षा ते आमच्यातच जास्त रमत. 

          आम्ही भावंडे ह्या कार्यक्रमाला या घरातून त्या घरात फिरतच होतो. मज्जा मज्जा करत होतो. सगळ्या लहानथोरांशी ओळख वाढवत उदंड हुंदडत होतो. शाळेला सुट्टी मारून मजा करण्यातला आनंद अनुभवत होतो. धार्मिक कार्यक्रमातला ओ की ठो आम्हाला समजत नव्हता.  पण सगळ्या मोठ्यांकडून विविध प्रकारचा गोड खाऊ मिळत होता. कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. सगळे लहानथोर एकत्र येऊन विचारमंथन करु लागले होते. रात्री महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला मिळाला होता.  

          पंगतीला जेवताना श्लोक म्हणत जेवणे होत होती. प्रत्येकजण आपल्या मुलांना श्लोक म्हणण्यासाठी प्रवृत्त करत होते. आम्ही कधी श्लोकच म्हटले नव्हते. त्यामुळे आम्ही त्या खेड्यातल्या लहान मुलांच्या मुखातून बाहेर पडणारी सरस्वती पाहून थक्क होऊन गेलो होतो. एवढे अवघड संस्कृत श्लोक ती दोन तीन मुले न घाबरता म्हणताना दिसत होती. आम्ही शहरातल्या शाळेत शिकत होतो. आम्हाला फक्त गुरुर्र ब्रम्हा ... हा एकच श्लोक येत होता. 

          उत्तररात्रीत भजने आणि दशावतारी नाटक वगैरे कार्यक्रम झाले. आम्ही न झोपता सकाळपर्यंत ते कार्यक्रम बघता बघता कुठे झोपलो ते आठवतंही नाही. सकाळी बाबांनी हलवून उठवले तेव्हा जाग आली. कणकवलीला जाणारी गाडी सकाळी नऊ वाजता होती. आम्ही तोंड धुवून चहा पिऊन स्टाॕपवर हजर झालो. माझ्या डोळ्यावरची झोप गेलीच नव्हती. गाडी अजून आली नव्हती. गाडीची वाट पाहणाऱ्या नातेवाईकांची बडबड सुरु होती. 

          माझा छोटा भाऊ रात्री लवकरच झोपला होता. त्यामुळे तो सकाळी ताजातवाना असल्यामुळे ' याची कळ काढ,  त्याला चिमटा काढ ' असे त्याचे कारनामे सुरु होते.  मी आपला डोळे बंद करुन गाडी यायची वाट बघत होतो. गाडी काही येत नव्हती. तेवढयात माझ्या कानात कोणीतरी जोरात फुंकर मारली. मी आधीच कंटाळलो होतो. झोप अनावर झाली होती. माझ्या लहान भावाचीच ही खोडी असणार याची मला पक्की खात्री होती. माझा रागही अनावर झाला. रागाच्या भरात मी डोळे न उघडताच भावाच्या कानशिलात लगावून दिली. एवढे मोठ्याने मारले होते कि माझा भाऊ मोठ्याने भोकाड पसरणार होता. 

          पण अजून तो रडत कसा नाही म्हणून डोळे उघडून बघितले तर , बिचारे कुबलआजोबा माझ्यासमोर हसतहसत उभे. मी भावाच्या नाही तर कुबलआजोबांच्या कानाखाली मारल्याचे माझ्या लक्षात आले. तरी मला शंका आलीच होती, ज्या गालावर मी मारले होते तो गाल एवढा लिबलिबीत कसा काय ? तो गाल भावाचा नसून कुबलआजोबांचा होता हे समजल्यानंतर माझा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. सगळे माझ्याकडे रागाने बघू लागले होते. माझी झोप उडाली होती. आता माझे बाबा मला शिल्लक ठेवणार नाहीत या भितीने मी रडू लागलो. पण त्या कुबलआजोबांनीच मला जवळ घेतले. ते म्हणाले , " अरे बाबा, मीच तुझ्या कानात फुंकर मारली होती, मी तुझी गंमत केली, म्हणून मला शिक्षा मिळाली. तू काय स्वतःहून माझ्या कानशिलात मारले नाहीस. तुझ्याकडून अनावधानाने तसे घडले. मी लहान मुलासारखा वागलो, तू बरोबर वागलास. मला अजिबात राग आलेला नाही. तू रडू नकोस. " असे त्यांनी म्हटले तेव्हा मी त्यांच्या कुशीत शिरलो. 

          मला ती म्हण आठवू लागली. डोळ्यात केर आणि कानात फुंकर ....... आज वेगळेच घडले होते. डोळ्यात झोप, कानात फुंकर आणि कानशिलात चापटी .... पुन्हा मात्र माझ्या भावाने कधीच माझ्या कानात फुंकर मारली नाही. कारण हा घडलेला प्रसंग त्याने प्रत्यक्ष पाहिला होता. तो म्हणाला होता , " मी फुंकर मारली असती तर माझ्या गालाचे काय झाले असते ? " मी आता कधीही हा प्रसंग आठवतो तेव्हा तेव्हा ते कुबलआजोबा माझ्या मनःचक्षुंसमोरुन सरकन निघून जातात. ते आज असते तर .. ?.... ही फक्त एक कल्पनाच असू शकते.


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...