🛑 दमदार वक्तृत्वाचा आविष्कार : किशोर कदमसर
शिक्षकी पेशामध्ये पदार्पण केले कि अनेक पैलूंवर काम करावे लागते. कसलेला आणि दमदार शिक्षक तयार होण्यासाठी डी. एड , बी. एड. कॉलेजातील वर्षे अतिशय महत्त्वपूर्ण असतात. नोकरीला लागल्यानंतर होणारी सेवांतर्गत प्रशिक्षणे शिक्षकातील अंतरंग , बाह्यरंग दोन्ही बदलून टाकत असतात.
किशोर कदम हे माझे खूप जवळचे शिक्षक मित्र. त्यांची पत्नी शुभांगी. ती माझी क्लासमेट. तिचे पती किशोर कदम आहेत एवढाच सुरुवातीचा परिचय. त्यानंतर अक्षरसिंधु संस्थेत काम करताना कधीतरी किशोर कदमांची गाठ पडली. धावती भेट झाली. त्यांचं राजबिंडं व्यक्तिमत्त्व त्यावेळी माझ्यावर प्रभाव टाकून गेलं होतं.
मग पुन्हा माझी आणि त्यांची भेट थेट पुण्यात झाली. बाहुली नाट्य प्रशिक्षणात. दहा दिवसीय प्रशिक्षणात आम्ही दोघे सिंधुदुर्गवासीय असल्याने एकत्र बसत होतो. मालवणीत बोलत होतो. तिथे मला त्यांच्या अभिनय प्रतिभेचा परिचय घडला. त्यांच्या आवाजाचे टोन , आरोह , अवरोह ऐकून मी अक्षरशः भारावून गेलो. त्यांचं ऐतिहासिक नाट्यात्मक बोलणं माझ्यासाठी नवीन होतं. तेव्हाच माझ्या लक्षात आलं. या कदमांमध्ये चांगलाच दम आहे. त्यांनी ऐतिहासिक वाक्यांची फेक करताना एकदा दम घेतला कि वाक्य संपेपर्यंत ते दम सोडत नाहीत हे विशेष. अशी वाक्ये बोलताना त्यांच्या अंगात जणू ती पात्रेच शिरलेली असतात असे वाटते.
त्या दहा दिवसात आम्ही दोघे एकमेकांच्या अधिक जवळ आलो होतो. आम्ही जेवायला , नाश्त्याला एकाच हॉटेलमध्ये जात असू. दोघांचा गट असल्याने सादरीकरण करताना मला त्यांची खूपच मदत झाली होती. ते खूप हुशार आहेत.
त्यानंतर पुन्हा एकदा ' अतिपरिणामकारक व्यक्तींच्या सात सवयी ' हे तीन दिवसांचं जिल्हास्तरीय प्रशिक्षण नांदगांव शाळेत होतं. तिथे हे किशोर कदम मस्त सुट सफारी घालून आले होते. ते आमचे तज्ज्ञमार्गदर्शक होते. त्यांनी मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि पुन्हा मला त्यांचा अधिक अभिमान वाटू लागला. त्यांचं बोलणं तुफान होतं. ते इतक्या जलद गतीने बोलत होते कि ते इतक्या जलद कसे बोलू शकतात हा मला त्यावेळी प्रश्न पडला होता. पुस्तकातील मुद्दे भरपूर होते. तीन दिवसांत ते सर्व समजून सांगायचे तर वेगवान वक्तृत्व गरजेचं होतं. आम्हाला एवढ्या वेगाने ऐकण्याची सवय नव्हती , त्यामुळे त्यातला काही भाग आमच्या डोक्यावरुन गेला ही गोष्ट वेगळी. पण त्यात त्यांचा अजिबात दोष नव्हता. आमची ग्रासपिंग पॉवर तेवढी काम करत नव्हती हेही त्याचे कारण असू शकते.
त्यांच्या दोन्ही मुली खूप हुशार आहेत त्यांच्यासारख्याच. ' बाप तश्या बेट्या ' असे म्हटले तरी वावगे ठरु नये. मुलींनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वक्तृत्वाचा वसा पुढे चालवला आहे. विविध स्पर्धांमध्ये केवळ भागच घेत नाहीत , तर ठरवून प्रथम क्रमांकाचे बक्षीसही मिळवतात. तीन ते चार मिनिटांच्या भाषणात श्रोत्यांच्या मनाचा ताबाच घेतात म्हणा ना !! शब्द बाबांचे आणि आवाज मुलींचा. बाबांना अपेक्षित यश मिळवत पुढे जाताना त्यांनी कधीही मागे वळून बघितलेले नाही. कालपेक्षा आज जास्त जिद्दीने लढा देत ' वक्ता दशसहश्रेषु ' हे सिद्ध करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे असे वाटते.
भाषण करत असताना ज्यांच्यावर त्या बोलत असतात त्यांचा पोशाख परिधान करुन त्यांनी कित्येकदा ' भूमिकाभिनय देखील केला आहे. यांच्या भाषणाच्या सुरुवातीच्या वाक्यांपासून प्रेक्षकांच्या टाळ्या सुरु होतात. भाषण संपताना मात्र लोक टाळ्या वाजवायचे विसरुन जातात एवढे ते त्यांच्या भाषणात एकरुप झालेले असतात.
किशोर कदम यांना या सर्व गोष्टींचे श्रेय जाते. दोन्ही मुलींना असे वक्तृत्व शिकवत असताना त्यांनाही अधिक उत्तम वाचावे लागते. त्यांनी एकदा लिहायला घेतले की विषयाची मांडणी पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत. त्यांचं व्यक्तिचित्र प्रत्यक्ष बोलण्यासाठी तयार झालेलं असतं. या शब्दांमध्ये आवाजाचे प्राण ओतले कि एक सुंदर प्रभावी वक्त्याचं दर्शन घडायला वेळ लागत नाही.
असे वक्तृत्व लेखन करता करता किशोर कदम यांच्या दिव्य लेखणीतून एक पुस्तकच जन्माला आले आहे. त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक सर्व विद्यार्थी , पालक , शिक्षक आणि वाचक यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. शाळेतील जयंत्या , पुण्यतिथी कार्यक्रम साजरे करत असताना मुलांनी या पुस्तकातील भाषणांचा वापर केला तर समोरचे श्रोते खुश होऊन टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाहीत. आवाजात ताकद असली तरी किशोर कदमांनी लिहिलेल्या शब्दांच्या ताकदीमुळे पुस्तक बेस्टसेलर ठरायला हवे यांत शंका असण्याचे कारण नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर , पदवीधर शिक्षक , शाळा शिडवणे नं.१ ( 9881471684 )
