Sunday, September 28, 2025

दशावतार आणि मी

 दशावतार आणि मी 


आज सकाळी स्वप्नभंग होऊन जाग आली होती. सकाळचे स्वप्न खरे होते असे म्हटले आहे , पण बऱ्याचदा माझी स्वप्ने अजिबात खरी झालेली नाहीत. म्हणून आजच्या स्वप्नाबाबत मी तितकाच साशंक आहे. हल्लीच मी सहकुटुंब दशावतार हा चित्रपट पाहिला. त्याची गाणी खूपच चांगली लिहिली आहेत गुरु ठाकूर यांनी. त्यामुळे ती सतत आमच्या घरात वाजत असतात. माझी छोटी मुलगी तर त्यातल्या ‘ आवशीचो घो ‘ ह्या गाण्याची फॅनच झाली आहे. ते गाणं तिने पाठांतर करुन टाकलं आहे. दशावतार नाटकानं माझ्या मनावर गारुड केलं असावं. पण खूप पूर्वीपासूनच दशावतार आवडू लागला होता. लहानपणी दशावतारी नाटक लागले मी रात्र रात्र ते पाहताना कधी झोपून जाई समजतच नसे. जसा मोठा होत गेलो , समज वाढली. नाटकांची आवड वाढतच गेली. अनेक नाटकं पाहिली असतील. त्यातले विविध पात्रांचे अभिनय मी पुढे बसून पाहण्यात घालवली आहेत. 

माझी खोलीमध्ये आवाज येईल इतक्या जवळ नवरात्रोत्सव सुरु आहे. तेथे होणारे सगळे कार्यक्रम आम्हांला अगदी स्पष्ट ऐकू येतात. त्यामुळे रात्री झोपताना शांतता झाल्यावर हे सगळे आवाज कानात पोहोचतात, मनाच्या पडद्यावर हे सर्व कलाकार नाचू लागतात. प्रत्यक्ष नाटक न बघताही ते बघितल्यासारखे होते. कदाचित झोपताना जे ऐकतो , पाहतो त्याचा विचार आपलं मन कदाचित रात्रभर करत असेल असे वाटते. त्यामुळे मला आज माझ्या स्वप्नात लोकराजा सुधीर कलिंगण यांचा मुलगा सिद्धेश कलिंगण आला होता. त्याचे ते सुंदर केस मला आकर्षून घेत होते. मी नुकतंच त्याच नाटक पाहिलं आहे. कणकवली रिक्षा युनियनने गणेशोत्सवात त्यांचे नाटक दाखवले होते. खरंच , सिद्धेश म्हणजे त्याच्या बाबांची नवीन आवृत्ती आहे असे म्हणायला हरकत नाही. काहीकाळ आपल्यासमोर साक्षात ‘ सुधीर कलिंगण ‘ अवतरले आहेत असा भास झाल्याशिवाय राहत नाही. मी रात्री झोपेत शांतपणे झोपेचा आनंद घेत असताना , माझ्या स्वप्नात ‘ सिद्धेश ’ यावा याचे आश्चर्य वाटते. सिद्धेश बालवयापासून नाट्यक्षेत्रात आहे. त्याच्या वडिलांनी आणि आजोबांनी पाजलेले नाटकाचे बाळकडू तो कोळून प्यायला आहे. हा सिद्धेश माझ्या अगदी जवळून गेला आणि मी त्याला नुसता पाहतच राहिलो होतो. थोड्या वेळाने मी त्याच्या घरी पोहोचलो होतो. त्याचे टुमदार घर मला दिसले होते. मी त्या घरात जाण्याचा प्रयत्न करु लागलो. पण मला घरात जायचा रस्ता , गेट सापडेना. तेवढ्यात माझ्यासमोर एक गाडी आली. मला त्यात बसवण्यात आलं . मी थेट सिद्धेशच्या घरी पोहोचलो. आत अनेक माणसं राहत होती. सिद्धेशला भेटायला गेलेला मी त्याला प्रत्यक्ष भेटायला मिळणार म्हणून अतिशय आतुर झालो होतो. पण आत पुरता अंधार होता. मला येणारी जाणारी माणसं दिसत होती. पण त्याचा माझा कलाकार ‘ सिद्धेश ’ कुठेच दिसत नव्हता. मला सिद्धेशला भेटायचे होते, त्याच्याशी हृद्य संवाद साधायचा होता. तो भेटेपर्यंत थांबणे माझे कर्तव्यच होते. त्याची वाट पाहण्याशिवाय पर्यायच नव्हता. शेवटी मी थांबलोच. कोणीतरी सांगितले कि , “ सिद्धेशची तब्येत थोडी बरी नाही. त्याची विश्रांतीची वेळ आहे. आम्ही नुकतेच एका नाटकाच्या दौऱ्यावरुन आल्यामुळे खूप प्रवास झाला आहे आणि त्रासही झाला आहे. सिद्धेश उठला कि तुम्हाला भेटले. त्याच्या उठण्याची वाट पहा ”. मी ठीक आहे म्हणून प्रतीक्षा करत राहिलो. 

थोड्या वेळाने मला निरोप आला , मला आत बोलावण्यात आले. मी आत गेलो. खोलीमध्ये मिट्ट काळोख होता. माझा कलाकार तिथेच शांत झोपला होता. त्याने मला आवाज दिला होता. तो म्हणाला , “ बोला , काय काम आहे तुमचे माझ्याकडे ? ” आता तो एक साधा सरळ माणूस होता. त्याचा राजाचा आवेश कुठंच दिसत नव्हता. पण त्याला त्रास होत असल्याने तो झोपूनच बोलत होता. मला याचेही आश्चर्य वाटले. मी एवढा मुद्दाम भेटायला गेलो आणि माझा कलाकार माझ्याशी झोपूनच बोलतो आहे. तरीही मी त्याच्याजवळच राहिलो बोलत , बडबडत. बोलता बोलता त्याला म्हणालो , “ अरे सिद्धेश , किती सुंदर नाटकं करता तुम्ही !! तुझे नाटक पाहताना तुझ्या बाबांची आणि आजोबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही रे , आता आपण काय करुया . तू मला तुझ्या आयुष्यातील गोष्टी सांग , घडामोडी सांग, तू कसा घडल्यास ते सांग , मी तुझं किंवा तुझ्या वडिलांचं आत्मचरित्र बनवतो . ” मी त्याच्या आत्मचरित्राचे बोलत असतानाच मला जाग आली आणि माझे ‘ सिद्धेश कलिंगण ’ चे आत्मचरित्र लिहिण्याचे स्वप्न भंगून गेले. 


लेखक : प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १ ( ९८८१४७१६८४ )




दशावतार आणि मी: स्वप्नातील भेट

आज सकाळी स्वप्न भंगून जाग आली, पण ती सकाळ काहीतरी वेगळं घेऊन आली होती. लोक म्हणतात की सकाळचं स्वप्न खरं होतं, पण माझी स्वप्नं क्वचितच खरी होतात. त्यामुळे आजच्या स्वप्नाबद्दलही मी साशंक होतो, तरीही ते मन सोडून जात नव्हतं.

काही दिवसांपूर्वीच आम्ही कुटुंबासोबत 'दशावतार' हा चित्रपट पाहिला. त्याचे गुरु ठाकूर यांनी लिहिलेले शब्द आणि संगीत मनाला भिडले. विशेषतः 'आवशीचो घो' हे गाणे तर माझ्या लहान मुलीला इतके आवडले की तिने ते पाठ करून टाकले. दशावतार नाटकाचे गारूड माझ्या मनावर खूप पूर्वीपासूनच होते. लहानपणी दशावतारी नाटक लागले की रात्र-रात्र जागून ते कधी संपले आणि कधी झोप लागली हे कळायचेच नाही. जसजसा मोठा झालो, तसतशी नाटकाची आवड वाढतच गेली. विविध नाटकांच्या, विविध पात्रांच्या अभिनयाने मी रंगून गेलो.

माझ्या खोलीच्या अगदी जवळ नवरात्रोत्सव सुरू आहे. तिथे होणारे सगळे कार्यक्रम आम्हाला स्पष्ट ऐकू येतात. रात्री शांतता झाल्यावर ते आवाज कानात पोहोचतात आणि मनाच्या पडद्यावर ते कलाकार नाचायला लागतात. त्यामुळे नाटक प्रत्यक्ष न पाहताही ते पाहिल्यासारखं वाटतं. कदाचित झोपताना जे ऐकतो किंवा पाहतो, त्याचाच विचार मन रात्रभर करत असावं. म्हणूनच आज माझ्या स्वप्नात लोकराजा सुधीर कलिंगण यांचा मुलगा सिद्धेश कलिंगण आला होता.

त्याचे लांबसडक, सुंदर केस मला आकर्षित करत होते. मी नुकतेच कणकवली रिक्षा युनियनने गणेशोत्सवात आयोजित केलेले त्याचे नाटक पाहिले होते. खरंच, सिद्धेश म्हणजे त्याच्या बाबांची नवीन आवृत्तीच आहे. त्याला पाहताना काही क्षणांसाठी साक्षात सुधीर कलिंगण अवतरले आहेत असा भास झाल्याशिवाय राहत नाही. रात्री शांत झोपेत असताना सिद्धेशचं स्वप्नात येणं हे माझ्यासाठी एक आश्चर्यच होतं.

स्वप्नात तो माझ्या अगदी जवळून गेला आणि मी त्याला नुसता पाहतच राहिलो. थोड्या वेळाने मी त्याच्या टुमदार घरासमोर पोहोचलो. मी आत जाण्याचा प्रयत्न करू लागलो, पण मला घरात जायचा रस्ता किंवा गेट सापडेना. तेवढ्यात एक गाडी आली आणि त्यात मला बसवून थेट सिद्धेशच्या घरी पोहोचवण्यात आले. आतमध्ये अनेक माणसे होती. पण माझा कलाकार, सिद्धेश कुठेच दिसत नव्हता. मला त्याला भेटायचे होते, त्याच्याशी मनमोकळा संवाद साधायचा होता. तो भेटेपर्यंत थांबणे माझे कर्तव्यच होते. त्याची वाट पाहण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

शेवटी मी थांबलोच. कोणीतरी मला सांगितले की, "सिद्धेशची तब्येत थोडी बरी नाही. तो विश्रांती घेत आहे. आम्ही नुकतेच एका नाटकाच्या दौऱ्यावरून आलो आहोत, त्यामुळे त्याला खूप प्रवास आणि त्रास झाला आहे. तो उठला की तुम्हाला भेटेल, त्याच्या उठण्याची वाट पहा." मी 'ठीक आहे' म्हणून वाट बघत राहिलो.

थोड्या वेळाने मला आत बोलावण्यात आले. मी आत गेलो. खोलीत मिट्ट काळोख होता आणि माझा कलाकार तिथे शांत झोपला होता. त्याने मला आवाज दिला, "बोला, काय काम आहे तुमचे माझ्याकडे?" आता तो एक साधा, सरळ माणूस होता. त्याच्या राजाचा आवेश कुठंच दिसत नव्हता. त्याला त्रास होत असल्याने तो झोपूनच माझ्याशी बोलत होता. मला याचेही आश्चर्य वाटले. मी एवढा मुद्दाम भेटायला गेलो आणि माझा कलाकार माझ्याशी झोपूनच बोलत होता. तरीही मी त्याच्याजवळच राहिलो, बोलत राहिलो.

बोलता-बोलता मी त्याला म्हणालो, "अरे सिद्धेश, किती सुंदर नाटकं करता तुम्ही! तुझे नाटक पाहताना तुझ्या बाबांची आणि आजोबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आता एक काम करूया. तू मला तुझ्या आयुष्यातील गोष्टी, घडामोडी सांग. तू कसा घडलास ते सांग. मी तुझं किंवा तुझ्या वडिलांचं आत्मचरित्र लिहितो."

मी त्याच्या आत्मचरित्राबद्दल बोलत असतानाच मला जाग आली आणि माझ्या 'सिद्धेश कलिंगण'चे आत्मचरित्र लिहिण्याचे स्वप्न भंगून गेले. हे स्वप्न भंगले असले तरी, दशावतार आणि नाट्यकलेविषयी माझ्या मनात असलेलं प्रेम मात्र अधिक घट्ट झालं.

© लेखक : प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १ ( ९८८१४७१६८४ )




No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...