सिंधुदुर्गातील माझ्या नोकरीचा पहिला दिवस: २७ वर्षांपूर्वीची अविस्मरणीय आठवण
आज सकाळी कोसळणाऱ्या धो-धो पावसाने मला २७ वर्षांपूर्वीच्या एका दिवसाची आठवण करून दिली. तो दिवस माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता – सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील माझ्या शिक्षकी पेशाचा पहिला दिवस. २९ जून १९९८ रोजी मी कणकवलीहून देवगडला, माझ्या बाबांसोबत सकाळी लवकरच एसटीने ६० किलोमीटरचा प्रवास करत रवाना झालो होतो.
पंचायत समिती देवगडच्या ऑफिस आवाराबाहेर आम्ही अनेक नव्याने रुजू होणारे शिक्षक जमलो होतो. आमच्यासाठी तो दिवस अत्यंत महत्त्वाचा होता, पण हजर करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी तो रोजचाच कामाचा भाग होता. त्यांच्यासाठी हे काही नवीन नव्हते, कारण त्यांनी यापूर्वीही अनेक शिक्षकांना वेगवेगळ्या दिवशी रुजू करून घेतले असेल. पण आम्हांला मात्र या दिवसाचे खूप महत्त्व होते. आम्ही उत्सुकतेने शिक्षण विभागातील मंडळींची वाट पाहत होतो. अधिकारी त्यांच्या दैनंदिन वेळेप्रमाणे उपस्थित होऊ लागले. गटशिक्षणाधिकारी साहेब आणि त्यांच्या हाताखालील शिक्षण विस्तार अधिकारीही लवकरच येऊन कामाला लागले होते.
त्यांना अडचणीतील शाळा नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकांना द्यायच्या होत्या. आम्ही पहिले चार शिक्षक लवकर पोहोचल्यामुळे आम्हांला गढीताम्हाणे गावातील सडेवाडी, कालवी वाडी, तेली वाडी आणि दादरा वाडी या चार शाळांमध्ये रुजू होण्याचे आदेश मिळाले. देवगड तालुक्याची मला काहीच माहिती नव्हती, ना माझे तिथे कोणी नातेवाईक होते. बाहेर धो-धो पाऊस कोसळत होता आणि ऑर्डर स्वीकारल्यामुळे त्या शाळांमध्ये हजर होण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. माझी ओळख असली तरी त्याचा मला त्यावेळी काहीच उपयोग झाला नाही, कारण मला मिळाली होती ती एक खूपच अडचणीची शाळा. गेली अनेक वर्षे त्या शाळेत कोणीही शिक्षक हजर झाला नव्हता. माझी पहिलीच नेमणूक असल्यामुळे मला तिथे जाणे भागच होते. सोबत माझे बाबा होते. तेव्हा मोबाईल फोन नव्हते, त्यामुळे जलद संपर्क साधणे शक्य नव्हते. स्वतःच्या गाड्या नसल्यामुळे एसटीशिवाय प्रवास करणेही शक्य नव्हते.
गढीताम्हाणे गाव तळेबाजारापासून चार-पाच किलोमीटर खाली होते. जाताना वाटेत एक मोठी खाडी होती. पहिल्या दिवशी पावसातून ती खाडी ओलांडणे शक्य नाही, असे समजले. त्यामुळे पुन्हा कणकवलीला येऊन दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ३० जून १९९८ रोजी तळेरेमार्गे जाण्याचे ठरवले. माझा पहिला दिवस प्रवासातच संपला होता.
आजचा दिवस, ३० जून १९९८! कणकवली-रत्नागिरी गाडी पकडून आम्ही (बाबा सोबत होतेच) तळेरे गाठले. तिथून दुसरी कणकवली-पाटगाव बस पकडली आणि फणसगावला उतरलो. फणसगावहून गढीताम्हाणे गाडीने गढीताम्हाणे गावी पोहोचलो. जाताना वाटेतच सड्यावर धनगरवाडीत माझी शाळा शांतपणे माझ्याकडे बघून हसताना दिसली. मला मनात प्रश्न पडला, "मी कशाला हसतोय? रत्नागिरीतील दोन चांगल्या नोकऱ्या सोडून माझ्या जन्मभूमीत मी कशाला आलो?" तरीही, स्वतःच्या जिल्ह्यात नोकरी मिळाली हे एकमेव सुख खुणावत होते, त्यामुळे मुग गिळून गप्प राहण्याशिवाय पर्याय नव्हता.
आम्हाला मोठ्या एक नंबर शाळेत हजर व्हायचे होते. आम्ही तिथे पोहोचलो, मुख्याध्यापक अजून आले नव्हते. ते आल्यावर त्यांना कालच्या तारखेने हजर करून घेण्याची विनंती केली, पण ते शिस्तबद्ध होते. त्यांनी मला आजच्याच तारखेने हजर करून घेतले. माझ्या शाळेवर मोठ्या शाळेतील 'लक्ष्मण बारकू चौधरी' नावाचे शिक्षक कामगिरीवर होते, त्यामुळे त्यांच्याकडे चार्ज होता. आता आम्हांला त्यांच्यासोबत माझ्या नवीन शाळेमध्ये, दादरावाडीत हजर व्हायला जायचे होते. रस्ता चांगला होता, पण आम्हाला एकही वाहन मिळाले नाही. शेवटी, चालत चालत सहा किलोमीटरचा प्रवास करावा लागला. त्यावेळी काय वाटले ते वाटले, पण काय करणार, नोकरी मिळाली होती ना?
एकदाचे शाळेत पोहोचलो. मुले आमची वाटच बघत शाळेच्या व्हरांड्यात थांबली होती. लक्ष्मण चौधरी दिसताच एक मुलगा धावत त्यांच्याकडे आला आणि त्याने त्यांच्याकडून चावी घेतली. माझी शाळा आता उघडली गेली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझ्या सेवेला सुरुवात झाली होती.
मी त्या शाळेत साडेसहा वर्षे अतिशय आनंदाने शैक्षणिक कामकाज केले. त्या संपूर्ण काळात मी एकटाच स्कुलमास्टर म्हणून काम करत होतो. माझ्या शाळेत त्यावेळी एकोणीस विद्यार्थी असूनही मला दुसरा शिक्षक कधीच मिळाला नाही. त्यामुळे मला सुट्टीवर जाणेही शक्य नव्हते. त्या वाडीत राहणे मला सुरुवातीला जमले नाही, त्यामुळे मी गावात राहत असे. दररोज शाळेत जाण्या-येण्याचा १२ किलोमीटरचा प्रवास मी चालत करत असे. या प्रवासाची आता मला सवयच झाली होती.
आजच्या नवनियुक्त शिक्षकांना कितीतरी सोयीच्या शाळा मिळतात, त्यांना आमच्या काळातील या समस्यांना नक्कीच तोंड द्यावे लागत नाही, हे मी स्वतः बघतो आहे. तरीही, त्यांना आताच्या काळात काही समस्या भेडसावत असतील असे वाटत असेल, तर आमच्या समस्या कितीतरी भयंकर होत्या, हे वाचून तरी त्यांना "आम्ही सुखी प्राणी आहोत" असा दिलासा नक्कीच मिळेल!
लेखक : प्रवीण अशितोष कुबलसर ( मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं . १ )